वेचित चाललो...

वेचित चाललो’ ही विविध प्रकारच्या लेखनातील लक्षणीय वेच्यांची संचयनी आता नव्या देखण्या रूपात, शोधासाठी सोयीच्या विविध अनुक्रमणिकांसह

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - २

...कोणताही प्रसंग उपरा वाटत नाही, त्याचा कुठे ना कुठे सांधा जोडून घेतलेला दिसून येतो. (पुढे चालू)


टॉड ज्या कामासाठी आलेला आहे ते ट्रेनिंगचे काम चालू होते. तो इथल्या एम्प्लॉईजना सांगतो की इथल्या ऑफिसच्या कामावर कंपनी समाधानी नाही. ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत नि बहुतेक सर्व या येथील कर्मचार्‍यांना अमेरिकेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने उद्भवल्या आहेत. यावर उपाय म्हणून सर्वांना कंपनीची प्रॉड्क्टस, अमेरिकन वोकॅब्युलरी, जीवनपद्धती इ. बद्दल त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे. इथल्या ऒफिसचा एम.पी.आय. (मिनिट्स पर इन्सिड्न्स) जो १२ मिनिटाच्या आसपास आहे तो फार जास्त आहे नि तो ६ पर्यंत खाली आणण्याची आवश्यकता आहे हे ही सांगतो. ’बेसिकली यू पीपल शुड लर्न अबाउट अमेरिका’ टॉड म्हणतो. ’जर ग्राहकाशी तुम्ही नेटिव इंग्रजी मधे बोललात तर संभाषण लवकर पूर्णत्त्वाला जाईल’. ’बट वी आर स्पीकींग नेटिव इंग्लीश’ एक एम्प्लॉई म्हणते. ती म्हणते ’आमच्या देशाची कारभाराची भाषाच मुळी इंग्रजी आहे. तुम्ही आम्ही दोघांनीही ही भाषा ब्रिटिशांकडून घेतली आहे. आमचे उच्चार तुमच्या पेक्षा वेगळे आहेत हे खरे पण बहुधा आमचे उच्चार तुमच्यापेक्षा अचूक असतात’. ’उदाहरणार्थ आम्ही ’इंटरनेट’ असा नेमका उच्चार करतो तर तुम्ही ’इंट्रनेट’ असा सदोष उच्चार करता’ ती हसत हसत सांगते. टॉड म्हणतो ’हे बरोबर आहे. पण हाच तर मुद्दा आहे. तुम्हाला जर अमेरिकनाशी अमेरिकन बनून बोलायचे असेल तुम्हाला ’इंट्रनेट’ असाच उच्चार करावा लागेल’. एक एम्प्लॉई शंका विचारण्यासाठी हात वर करतो. ’मी मनमीत...’ तो सांगतो. ’मॅनमीट...?’ टॉड उच्चारतो. मनमीत त्याचा उच्चार दुरूस्त करतो, पण टॉडला बरोबर उच्चार करता येत नाहीच. आता आपल्याला टॉड ऐवजी इथे सरसकट टोड म्हणून का हाक मारली जाते ते टॉडला समजून येते. स्मॉल टॉक म्हणजे काय हे समजावून सांगताना तो म्हणतो की ’समजा तुम्ही एखाद्या खेळाबद्दल बोलत असाल...’, ’उदाहरणार्थ क्रिकेट’ पुरू मधेच बोलतो. बेसबॉल नि हाताने खेळण्याचा ’फुट’बॉल च्या चाहत्या नि ’जे जे इंग्लिश ते ते टाळावे” अशा वृत्तीच्या देशातून आलेला टॉड चटकन विषय बदलून टाकतो. तो त्यांना काही किमान काळजी घेण्यास सांगतो. 'इफ समवन आस्कस हाऊज द वेदर, आलवेज से विंडी’ तो सांगतो. मगाशी इंग्रजीबद्दल सडेतोड बोलणारी ती कन्या पुन्हा एकदा त्याचे बोलणे थांबवते. ती म्हणते, आम्ही इथे घारापुरीत आहोत, शिकागोत नाही. मग हे खोटं बोलणे नाही का? आम्हाला नोकरी देताना आमचे काम फोनवरून प्रॉडक्टस विकण्याचे आहे असे सांगण्यात आले होते, ग्राहकांशी खोटे बोलण्याचे नाही.’ ’बहुतेक अमेरिकन हे आउटसोर्सिंगवर नाराज आहेत.’ तो समजावू पाहतो. ’पण ते विकत घेत असलेल्या बहुतेक सर्व गोष्टी तर ’मेड इन चायना’ असतात ना?’ या तिच्या प्रश्नावर तो निरुत्तर होतो. ही मुलगी - आशा तिचे नाव - ही पुढे आणखी एक-दोनदा त्याचे तोंड बंद करते, पण ते वेगळ्या प्रकारे.


ट्रेनिंग चालू होते. कंपनीच्या प्रॉडक्टसबद्दल एंप्लॉईजना असलेल्या शंकांचे टॉड एकएक करून निरसन करतो आहे, त्या निमित्ताने त्यांना अमेरिकन जीवनपद्धतीची ओळख होते आहे. काही गोष्टींचा खुलासा देणॆ टॉडला अवघड जाते आहे.

आयटेम नं एच फोर-झीरो-थ्री - चीज कॅप.

टॉड : बरेच अमेरिकन्स एखाद्या खेळाचा सामना बघायला जाताना ही टोपी घालतात’

मनमीत : का?’

टॊड : (गडबडलेला) ’अम्म... इट्स हार्ड टू एक्स्प्लेन’

आयटेम नं ए टू-टू-वन - बर्गर ब्रँड.

टॉड : ’काही अमेरिकन्सना अन्न शिजवताना अन्नावर आपला खास शिक्का उमटवायला आवडतो. जसे आपल्या मालकीच्या गायींच्या पाठीवर मालकी दाखवणारे शिक्के उमटवतात तसे’

राणी: ’पण गाय पळून जात नाही का?’

टॊड : ’नाही, अगदी लहान वासरू असतानाच - जेव्हा त्याला पकडून ठेवता येऊ शकते - तेव्हाच हे ब्रँडिंग केले जाते’. या उत्तरावर प्रश्न विचारणार्‍या मुलीला - राणीला - विलक्षण धक्का बसल्याचे दिसते. या ठिकाणी पुन्हा एकवार आशा काही बोलण्याची परवानगी मागते ’एक अनाहुत सल्ला आहे टॉड. यू नीड टू नो अबाऊट इंडिया’. इंडियातल्या लोकांना ’यू मस्ट लर्न अबाऊट अमेरिका’ म्हणणार्या टॉडला त्याचाच सल्ला देऊन आशा वास्तवाची जाणीव करून देते. एक वर्तुळ पूर्ण होते. हा ब्रँडिंगचा प्रसंगही नीट लक्षात ठेवण्याजोगा. पुढे एका प्रसंगात याचा भारतीय संदर्भ येतो तो अतिशय मार्मिक नि दोन जगातला फरक दाखवणारा.

ट्रेनिंग चालू आहे. टॉड एक रेकॉर्डेड कॉल ऐकवतो. एक अमेरिकन आजीचा फोन आहे हेल्पडेस्कला. त्यात ती सांगते की तिचा नातू आता शाळेत जाणार आहे. त्यासाठी आवश्यक गोष्टींची खरेदी तिला करायची आहे. पण तिला हल्लीच्या व्यवस्थेत काय काय हवे ते ठाऊक नाही. हेल्पडेस्कवरील एग्जिक्युटिव तिला यादी देऊ लागतो, त्यात ’रबर’ हा शब्द ऐकून आजी किंचाळतातच ’काय??????’. ’तुमचा नातू पेन्सिल वापरेल ना, मग त्याबरोबर रबर नको का?’ एग्जिक्युटिव खुलासा करू पाहतो. हे ऐकवून झाल्यावर टॉड विचारतो की या संभाषणात काय चूक आहे. बहुतेक सर्वांना काहीच समजत नाही. तो सांगतो रबर नव्हे ’इरेजर’ म्हणायला हवे, ’रबर’ म्हणजे काँडम, रबर जे संततीनियमनासाठी वापरले जाते ते. या संवादाकडे मनमीत चे अर्धवट लक्ष आहे. तो ’संततीनियमन’ हा शब्द ऐकतो, बुचकळ्यात पडतो, त्या ’इरेजर’चे कव्हर काढतो, त्याकडे साशंक नजरेने पहात विचारतो ’बट डज इट वर्क?’.

डज इट वर्क?

ऑफिसमधील बहुतेक सर्व प्रसंगांचे चित्रण हे सुपरवायजर्स केबिनच्या कोनातून केले आहे. त्यामुळे समोरच्या भिंतीवरचा एमपीआय मॉनिटर सतत दिसत राहतो. ट्रेनिंग जसजसे पुढे सरकते तसतसा त्यावरचा आकडा हळूहळू कमी होत गेलेलाही दिसतो.

देशी खाणे खाऊन हैराण झालेल्या टॉडला एकदा पेपरमधे मॅक्डोनल्डस ची जाहीरात दिसते. आता त्याला बर्गर खायचा आहे. पण ते दुकान मुंबईत आहे. एका टॅक्सीवाल्याला चार हजार रुपये देऊन अखेर तो त्या दुकानी पोहोचतो नि खुषीत दोन चीज बर्गर्सची ऒर्डर देतो. ऑर्डर घेणारा नम्रपणे सांगतो ’इथे चीज बर्गर मिळत नाही’. ’काय सांगतोस? मॅक्डोनल्ड्समधे चीज बर्गर मिळत नाही?’ टॉड वैतागाने विचारतो. ’सॉरी सर, धिस इज Mc Donnells नॉट Mc Donalds'. तेवढ्यात एक शेजारचा गोरा साहेब ’एक महाराजा वेज बर्गर’ अशी ऑर्डर देतो नि टॉड कडे वळून सांगतो ’दॅट इज क्लोजेस्ट यू गेट.’ टॉड पूर्ण वैतागतो. तो म्हणतो मी चार हजार रुपये खर्च करून घारापुरीहून फक्त चीज बर्गर खाण्यासाठी इथे आलोय. ’तुला माहित नाही का, घारापुरी मधेच एक खरे खुरे मॅक्डोनल्डस आहे ते?’ दुसरा गोरोबा सांगतो. ’अर्थात तिथेही चीज बर्गर मिळत नाहीच.’ अशी पुस्तीही जोडतो.

हे दोन गोरोबा समदु:खी असतात. दोघांचेही जॉब्स भारतात आलेले नि ज्यांना ते मिळालेत त्यांनाच मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली. संभाषणाच्या ओघात दुसरा सांगतो ’मी जोवर या व्यवस्थेचा, भारताचा विरोध करत होतो तोवर मला त्रास होत होता. आता मी तो सोडून दिल्यावर स्थिती बरीच सुधारली आहे.’ टॉड अंतर्मुख होतो.

एकदा सुपरवायजर केबिनमधून टॉड एम्प्लॉईजचे कॉल मॉनिटर करत असतो. एक एग्जिक्युटिव आपण शिकाsssगो (हा टॉडने शिकवलेला अमेरिकन उच्चार) मधे असल्याची बतावणी करत न्यू जर्सीतल्या कुण्या एलिझबेथ बरोबर फोनवरून फ्लर्ट करतोय. टॉड चिडतो. तेवढ्यात पुरू एक ट्रे घेऊन येतो. टॉड आपला वैताग त्याच्यावर काढतो. माफी मागून पुरू जाऊ लागतो. त्याने ठेवलेला ट्रे पाहून टॉड हे काय आहे म्हणून विचारतो. ’हे तुझ्यासाठी. इथल्या जेवणामुळॆ तुझे पोट बिघडते म्हणून खास हायजिनिक अन्न तुझ्यासाठी आणले आहे.’ टॉड शरमतो नि त्याच्यावर राग काढल्याबद्दल माफी मागतो.

काही दिवस जातात. होळीचा दिवस आहे. सकाळी घाईघाईत बाहेर पडलेल्या टॉड दारावर आंटीने लावलेली 'आज बाहेर जाऊ नये' ही चिठी न पाहिल्यामुळे बाहेर जातो. आधी घाबरतो पण नंतर मस्तपैकी होळीचा आस्वाद घेतो. बेसबॉलच्या अनुभवाचा वापर करून अचूक नेमबाजी करून पोरांना भिजवतो. त्यानंतर जवळच्या कुंडात स्वत:ला झोकून देतो. थोडक्यात सांगायचे तर दुसर्‍या गोरोबाने दिलेला सल्ला अंगीकारून गाडी रुळावर आणतो.

होली है

होळीची मजा करून तो आणि पुरू ऑफिसात पोचताच तो ऑफिस अमेरिकन पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल माफी मागतो नि ऑफिसमधे योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक ते करण्याची सर्वांना मुभा देतो. एवढेच नव्हे तर कंपनीची उत्पादने एम्प्लॉईजना भरघोस डिस्काउंट मधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही देतो. यावर कंपनीतर्फे त्याची कान उघाडणी करणार्‍या त्याच्या बॉसला तो शांतपणे सांगतो ’एक बिलियन लोकांच्या देशात या मार्गाने कंपनीच्या प्रॉडक्ट्सचा शिरकाव व्हावा अशी माझी योजना आहे.’ तडतडणारा बॉसचा आवाज बंद होतो.

याच प्रसंगात एक गंमत आहे जी कदाचित संवादाच्या ओघात दुर्लक्षित राहू शकते. एक एम्प्लॉई काही शंका विचारण्यासाठी हात वर करते. तिचे नाव टॉडला आठवत नाही. तो विचारतो ’वॉटज् योर गुड नेम?’. पहिल्या भेटीत आंटीच्या या ब्रिटिश इंग्रजीला बावचळलेला टॉड आता त्याच्या इंडियन एम्प्लॉईजच्या संगतीने त्याला नुसताच सरावलेलाच नाही तर नकळत त्याने ते काही प्रमाणात अंगीकारले सुद्धा आहे.

होळीची संध्याकाळ. पुरू नि टॉड मस्तपैकी मदिरेच्या संगतीत गप्पा मारतायत. टॉड थोडा होमसिक थोडा नॉस्टाल्जिक झालाय. ’होली’ या शब्दावरून त्याला त्याच्या आईने बनवलेल्या कॉस्चुमस्ची आठवण येतेय. गाडीने गेल्यास ती त्याच्या घरापासून दोन तासाच्या अंतरावर राहते. तरीही ते वर्षातून एकदोनदाच भेटतात. इतक्या जवळ राहूनही इतक्या कमी वेळा भेटता? पुरू आश्चर्यचकित झालेला. मद्याच्या अंमलामुळॆ थोडा सैलावलेला तो सांगतो ’तुमच्या जीवनपद्धतीचे हेच मला कळत नाही. तुम्ही लोक आईवडिलांबरोबर का रहात नाही?’ आणि तुला तुझा बॉस आवडत नाही मग तू दुसरी नोकरी का शोधत नाहीस?’ एकाच प्रश्नात त्या जीवनपद्धतीमधला अंतर्विरोध स्पष्ट होतो. आईवडिलांचे घर सहज सोडणार्‍या अमेरिकन्सना कटकट्या बॉसस असूनही कंपनी सोडणे सहजासहजी जमत नाही. टॉडकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. ’इन अवर वर्ल्ड, वी वर्क अवर अ‍ॅस आउट’ तो कडवटपणे म्हणतो.

यानंतर आशाचे नि टॉडचे जवळ येणे हा एक भाग येतो, परंतु तो बहुतेक हिंदी चित्रपटाच्या वळणाने जातो त्यामुळे त्याबद्दल फारसे सांगण्यासारखे काही नाही. या घारापुरी ऐवजी कंपनीचे पार्सल घारापुरी बेटांवर जाणे, ते आणण्यासाठी स्वत: टॉड नि असिस्टंट मॅनेजर इन-मेकिंग आशा या दोघांनीच जाणे (जसे काही एक फोन करून नव्या पत्त्यावर रिडायरेक्ट करणॆ या मागास देशात शक्यच नसते... पण हा चित्रपट आहे राव, थोडासा रोमान्स टाकायला चानस नको का? ) शेवटची फेरीबोट रद्द होणे, त्यांना तिथेच रहावे लागणे, धूर्त होटेल मॅनेजरने त्यांना सर्वात महाग स्वीटच उपलब्ध असल्याचे सांगणेआणि मग आशाने ’हॉलिडे इन गोवा’ साजरा करणे वगैरे आपल्या ओळखीचे सगळे घडते नि टॉड नि आशा जवळ येतात. परत येताना आशा टॉड च्या मोबाईलवर स्वत:च्या नंबरसाठी खास बॉलिवूड रिंगटोन सेट करून देते आणि हा तुझ्या इंडियन ट्रेनिंगचा भाग आहे असा मिश्कील चिमटाही काढते.

डान्सिंग टोड :)

इथे रुळलेल्या टॉडला पुढे सलमानची भूमिका देऊन त्याचे ज्युनियर्स ’साजन के घर आयी...’ वर नाचायलाही लावतात. तो पठ्ठ्याही त्या ठेक्यावर मस्तपैकी नाचून बिचून घेतो.

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा