मंगळवार, ५ जून, २०१२

बुधाच्या माचीच्या शोधात एक दिवस

म्हाराजांच्या टायमाला घोड्यावरून गडकोटांवर येणे-जाणे असायचे हे शाळेत गेलेल्या नि त्यातील इतिहासाचे पुस्तक किमान एकदा उघडलेल्या व्यक्तीला ठाऊक असतेच. आता आजच्या काळात घोड्यावरून चढाई होत नसली तर आमचा चढाईचा बेत मात्र घोड्यावरून निघाल्यासारखाच ठरला.

शनिवारी सकाळी आमच्या कराडच्या मित्रवर्यांनी - अविनाशनी - फोनवरून आदेश दिला की आपण बुधाच्या माचीला भेट देण्यासाठी रविवारी प्रस्थान करणार आहोत, भिडू जमवा. मग सतत 'मला फोन केला असतात तर मी देखील आलो असतो.' असली कुरकुर करणार्‍या सगळ्या थापाड्या भिंडूंना फोन करून झाले, त्यांची तीच तीच कारणे फक्त माणसे बदलून ऐकली  नि अखेर नेहमीचे कलाकार म्हणजे अविनाश, राज जैन नि मी जाऊ एवढे निश्चित झाले, जोडीला आमच्या सागरगड ट्रेकचे जोडीदार पिंगूशेट ऊर्फ भारत येऊन सामील झाले. म्हटले चला चारच लोक म्हणजे जास्त बारदाना नाही त्यामुळे एका अर्थी सोयीचेच झाले. अविनाशचा निवांतपणा इतका की सोमवारी ११ वाजता एक परिक्षा देण्यासाठी हा माणूस पुण्यात आलेला नि परिक्षेच्या आदल्या दिवशी ट्रेकला जाऊन येऊ म्हणून लकडा लावणारा. आमचे म्हणजे परिक्षेच्या आठवडाभर आधीपासून खेळ, जेवण, वगैरे गोष्टींवर आचारसंहिता लागू व्हायची. हे प्रकरण काही औरच आहे.

हा बुधा कोण हे आधी सांगायला हवे. हा अविनाशचा नि त्यांच्यामुळे अलिकडेच आमचाही सुहृद झालेला गोनिदांचा मानसपुत्र. नागर जीवनाचे सूत्र सोडून आपल्या जगण्याचे मूळ शोधायला माचीच्या कुशीत येऊन विसावलेला. खुराड्यातून येऊन विशाल आकाशाखाली राहून जगण्याच्या मूलभूत प्रेरणा नि आसमंताशी नाते जोडू पाहणारा, दारच्या आवळीला 'आवळीबाय' म्हणत, ऐटीत त्याच्या झोपडीत येऊन खाणे मागणार्‍या खारुटलीला नि तिच्या कुटुंबाला पुरेसे अन्न मिळावे म्हणून नागलीची लागवड करणारा, भैरोबाच्या देवळाजवळून दिसणार्‍या तळकोकणावर जीव जडवून बसलेला नि त्याचवेळी विशिष्ट वेळेला डोक्यावरून जाणार्‍या 'इवायना'शी नकळत गुंतून गेलेला. कुणाही संवेदनशील माणसाने बुधाची कहाणी वाचली तर आपल्यातला एक बुधा सोडवून तो आपल्यासमोर आणून उभा करतो नि त्याचे स्वागत करावे की नव्या जगातले असंवेदनशील जगणे निश्चिंतपणे जगता यावे म्हणून त्याला पुन्हा मनात खोलवर गाडून टाकावे हा प्रश्न आपल्यासमोर उभा करतो. त्याची ती आवळाबाय, ती खारुटली, त्याची ती भात-खाचरे, त्याला सोबत करणारे ते कड्यावरचे निर्गुंडीचे झाड, नि कित्येक मैल अंतरावरून जाणारे पण त्याची साथ-सोबत करणारे ते इवायन हे सारे सारे शोधू या, अनुभवू या म्हणून त्याच्या जिवाभावाच्या माचीला जायचा घाट घातला.

राजमाची हा तसा अर्वाचीन किल्ला. किल्ल्यावर भले सातवाहन कालीन आहे वगैरे लिहिलेले असो पण खर्‍या अर्थाने माचीचा वापर थोरल्या महाराजांपासूनचा, कदाचित डोंगरांवर 'पागोटे' चढवणेही त्यांच्याच काळचे असावे. खरंतर हा एक किल्ला नव्हे, हे आहेत दोन आवळेजावळे बालेकिल्ले, 'श्रीवर्धन' (जो पुणे-मुंबई रेल्वेप्रवास करत असता रेल्वेतून दिसतो) नि 'मनरंजन'. यांना माची अशी फारशी नाहीच नि दोघांचा पसाराही तसा आटोपशीरच. माची म्हटली तर दोघांना जोडणारा एक लहानसा जेमतेम शंभर-सव्वाशे मीटर रुंदीचा पठाराचा पट्टा, ज्यावर माचीच्या देवाचे - काळभैरवाचे - मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागून मनरंजनच्या बालेकिल्ल्याची वाट जाते तर समोरून श्रीवर्धनची. गडावर जायचे ते भैरोबाच्या साक्षीने, त्याच्या आशीर्वाद घेऊन.

राजमाचीचा नि माझाही ऋणानुबंध तसा जुना. विद्यापीठात असताना चार-दोन मित्रांच्या सोबतीने माचीची गळाभेट वर्षातून किमान एकदा व्हायचीच. खास करून पावसाळ्यात एखाद्या पौर्णिमेच्या रात्री लोकलने लोणावळ्यात उतरून रमतगमत (किर्रर्र अंधारातून जाताना भुतांच्या गोष्टी सांगत) राजमाची गाठायची, श्रीवर्धन नि मनरंजनच्या समाईक माचीवर असलेल्या भैरोबाच्या देवळासमोरील छोट्या पठारावर पिठूर-चांदण्या आकाशात ताणून द्यायची हा शिरस्ता बराच काळ चालला. जसजसे सगळे रोजगार नि कौटुंबिक जबाबदार्‍यात गुरफटले तसे ही नियमितता बरीच कमी झाली. आता तर तब्बल पाच वर्षांनी माचीची भेट घडणार होती. त्यामुळे तिच्या आसमंतात काय काय बदल झाले असतील नि तिचे ते अनुपम सौंदर्य नि जवळीक अजून तशीच असेल का याची उत्सुकताही होती.

लोणावळा स्टेशनपासून चालू लागलो तर नियमित ट्रेकर सुमारे साडेतीन ते चार तासात माचीला पोहोचतो. गाडीनेच जावे, शक्य होईल तितकी गाडी आतपर्यंत न्यावी असे ठरले. पूर्वी गेलो तेव्हा थेट उल्हास नदीचा उगम ज्या ओढ्यातून होतो असे सांगितले जाते तिथवर गाडी जाऊ शकते हे पाहिले होते, त्यामुळे किमान तिथवर गाडी न्यावी असे ठरले. सकाळी सातला इथून निघावे, आठ-सव्वाआठ वाजेपर्यंत लोणावळ्यात पोचावे, तिथे न्याहारी वगैरे उरकून नि सकाळच्या जेवणासाठी काही पार्सल न्यावे असे ठरले. पण प्रत्यक्षात न्याहारीचा वेळ जमेस धरता लोणावळा सोडायला नऊ वाजले. राजमाचीला जाणारा रस्ता प्रथम तुंगार्ली गावातून जातो, तिथून एक चढण चढली की तुंगार्ली धरण आहे. हे धरण आहे हे राजला सांगताच त्याने मला वेड्यात काढले. कारण उघड होते, धरणात एक टिपूस पाणी नव्हते. आपण माचीला जाण्याची वेळ चुकीची निवडली आहे याची इथे प्रथम जाणीव झाली. 

मला रस्ता ठाऊक असला तरी अधे मधे पडलेले प्लॉट्स पाहता आता कोणी मुख्य रस्ता बळकावून तर ठेवला नाही ना या शंकेने सुरुवातीला एकदोघांना विचारून रस्ता बरोबर असल्याची खात्री करून घेतली नि आमच्या सारथ्याने गाडी सोड्ली ती खाचखळग्यांचे रस्ते, अधेमधे आत्महत्त्या करण्याच्याच उद्देशाने रस्त्यावर आले असावेत अशी शंका यावी असे कातकरी लोकांचे कोंबडे वगैरे चुकवत पाऊण एक तासात गाडी उल्हास नदीचा उगम समजला जाणार्‍या ओढ्यापाशी आली. अर्थातच या आणि इतर कोणत्याही ओढ्यांच्या जागी पाण्याचा टिपूस नव्हता. मधे एकाला रस्ता विचारताना गाडी कुठवर नेता येईल याची चाचपणी केली होती. त्याने थेट पायथ्यापर्यंत गाडी जाते याची खात्री दिली होती. पण मग पदभ्रमणाची मजा काय राहिली म्हणून इथेच गाडी थांबवावी असे सुचवले. राजे गुडघे दुखतात म्हणून शेवटपर्यंत न्या म्हणत होता, पण ’इतक्या वाईट रस्त्यावर पंक्चर वगैरे झाली तर काय घ्या’ अशी भीती घातली.   ’पंक्चर’ हा शब्द ऐकताच अविनाशनी ताबडतोब गाडी इथेच लावण्याचा निर्णय जाहीर केला. राजेंनी ताबडतोब माझ्या बारा पिढ्यांची अतिशय आस्थेने 'विचारपूस'  करून माझ्या गुड्घ्याला लावण्याच्या बिबळ्याच्या तेलाची* बाटली आधी ताब्यात घेतली. 

जिथे गाडी लावली तिथूनच या आवळ्याजावळ्या किल्ल्यांचे पहिले दर्शन घेतले.
डावीकडचा मनरंजन नि उजवीकडचा श्रीवर्धन


आता इथून मंड्ळी माचीच्या दिशेने मोर्चा वळवून निघाली. रस्ता कच्चाच असला तरी पावसाळा नसल्याने सुकर होता. दिसताना हे किल्ले ’हेऽ काय कासराभर’ अंतरावर दिसत असले तरी प्रत्यक्ष चालत जाताना आपण जिथे आहोत ती डोंगररांग धरून बरेच आडवे चालत जाऊन सुमारे पाच-सहा किमी अंतरावर जिथे ती पलिकडच्या रांगांना मिळते तिथे सांधा बदलून पलिकडच्या डोंगरावर आपण जाणार आहोत तेव्हा एका वळणानंतर अचानक किल्ले खूपच दूर दिसू लागतात तेव्हा धैर्य सांभाळून असावे असे सल्ले देत मी भाव मारून घेत होतो. असे असूनही जेव्हा प्रत्यक्षात ते वळण आले तेव्हा मंडळी अंमळ वैतागलीच ) (कदाचित हा म्हातारा उगाच खोटे सांगून आपल्याला घाबरवतो आहे असे गृहित धरून चालले असावेत). पण काही मिनिटे विश्रांती घेऊन पुन्हा चालू लागली.

जंगलवाटांवर


अखेर सुमारे पावणे-दोन तास चालल्यानंतर किल्ले राजमाचीचा पायथा आला. इथे थोडासा बदल दिसून आला. वनविभागाने आता प्रतिव्यक्ति पाच रू ’उपद्रव शुल्क’ नि पार्किंग शुल्क वसूल करायला सुरुवात केलेली आहे. 'आपण उपद्रव करणार हे आधीच गृहित कसे धरतात हे’ असा संतप्त सवाल........ (नाही मी नाही) अविनाशनी केला. अखेर ’येणार्‍यां पैकी काही लोक उपद्रव करतात. तो नक्की कोणी केला हे अन्वेषण कटकटीचे असल्याने तो निस्तरण्यासाठी सरसकट सर्वांकडून हे नाममात्र शुल्क घेतले जात असावे' असा तर्क करून  ’आलीया भोगासी’ म्हणत पुढे निघालो.

आता माची गाव जवळ आले. समोर मनरंजन नि उजवीकडे श्रीवर्धन


या टप्प्यावर राजमाची(उधेवाडी) गाव आहे. इथे शाळा चावडी वगैरे गोष्टी गेल्या बर्‍याच वर्षांपासून अस्तित्वात आहेत. आसपासच्या वाड्या पाड्यांवरची पोरे इथे शिकायला येत असतात. गाव लहानसे, जेमतेम चाळीस-पन्नास घरांचे. पण आता इथे मस्त आरसीसी स्ट्रक्चरची दुमजली घरे आहेत, छपरावर डिश अ‍ॅंटेना आहेत.... पण वीज मात्र क्वचितच असते. काहीका असेना वर्षानुवर्षे माचीची वारी करणार्‍याला रात्रीचा निवारा नि पोटभर जेवण देण्याचे काम या गावचे लोक नियमाने करत आले आहेत. आता तर इथे कोल्ड्रिंकदेखील मिळते. पूर्वी इथल्या हापशावरून पाणी भरून घेऊन माचीचा डोंगर चढायला लागायचे असा शिरस्ता होता. पणा आता त्याचीही गरज नव्हती. सरळ दोन पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या नि निघालो.

छोटा डोंगर चढून आलो पंधरा-वीस मिनिटात नि भैरोबाचे - काळभैरवाचे - देऊळ आले. माचीच्या आसंमतातील हा एक भैरोबा नि दुसरा तो पाठीमागच्या डोंगरातला ढाकचा, हे दोन भैरोबा या आसमंतातील नागरिकांची श्रद्धास्थाने. 

जय भैरोबा


आता माध्यान्ह झाली होती. सुमारे दोन तासांच्या पायपिटीनंतर आता पोटात ’काकस्पर्श’ जाणवत होते. भैरोबा मंदिरासमोरच्या पारावर मुक्काम ठोकला नि जेवणावर ताव मारला. ट्रेकच्या दिवशी हलके जेवण असावे असा संकेत धरून मी बहुधा सॅंडविचेस खाणे पसंत करतो. लोणावळा स्टेशनच्या किंवा बस स्टॅंडच्या आसपास सहज मिळतील म्हणून घरून नेण्याचा आळस केला होता. पण राज नि मी सुमारे अर्धा तास भटकून देखील सॅंडविचेस प्रसन्न झाली नाहीत. अखेर तिथल्या कॅफे-कॉफी-डे मधून काही ’हुच्चभ्रू’ सॅंडविचेस (सुदैवाने सोबतीला राजस्थानी पद्धतीचे समोसेही मिळाले होते) मिळाली होती ती हादडली.

हुच्चभ्रू जेवण/न्याहारी


दहा एक मिनिटे विश्रांती घेतली नि श्रीवर्धनकडे कूच केले. आता सरळ उभा बालेकिल्ला चढायचा होता. लहानसाच असला तरी राजसारख्या म्हातार्‍याला झोळीतून न्यावे लागेल का असा एक-दोन मिनिटांचा परिसंवाद अविनाशनी नि मी घेतला, अखेर त्याला उचलायला एक गडी कमी पडेल (आम्ही तिघेच होतो) त्यामुळे ती कल्पना रद्द केली नि पुढे निघालो. सुमारे दहा मिनिटांची चढण चढल्यावर अखेर बालेकिल्ल्यावर पोहोचलो नि सुखिया जाला. 
अखेर पोचलो रे बाबा


पिंगूशेटनी आपण इथे आलो होतो हे 'पुराव्याने शाबित' करण्यासाठी तिथल्या दारातच आपला एक फोटो काढून घेतला.
मि. पिंगू


गडावर खडकात खोदलेल्या दोन खोल्या आहेत. तिथे भर उन्हाळ्यात मध्यान्हीही इतके थंड होते की अविनाशनी तिथेच मुक्काम ठोकण्याचा निर्धार जाहीर केला. अखेर एकदोनदा ’तुमचेही वय झाले वाटतं’ वगैरे टोचून बोलून त्यांना उठवण्यात यशस्वी झालो नि पुन्हा पाचेक मिनिटांची चढण चढून किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या मुख्य बुरुजावर एकदाचे पोहोचलो. आणि चार म्हातार्‍यांनी श्रीवर्धन सर केल्याचा संदेश घरी टिव्हीवर नॅशनल जिओग्रफिक किंवा डिस्कवरी च्यानेल्सवर थरारक वगैरे मालिका पहात 'कित्ती ग्रेट लोक हैत नाय' म्हणत गुबगुबीत कोचावर बसलेल्या - स्वत:ला तरुण म्हणवणार्‍या - अन्य मित्रांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली.

श्रीवर्धनवरून दिसणारा मनरंजन, त्याच्या पायथ्याशी इटुकले दिसणारे भैरोबाचे देऊळमराठी पाउल पडते पुढे


तिथे असलेल्या पाच बाय पाचच्या पठारावर बसून 'सध्याची जातीयता' याविषयावर एक लहानसा परिसंवाद झाला.  वक्ते अर्थातच दस्तुरखुद्द आम्ही नि इतर सुज्ञ लोक फक्त ऐकत होते (तसाही फार पर्याय नसतो बिचार्‍यांना). इथे दहा एक मिनिटे विश्रांती घेऊन पुन्हा खाली मंदिरापाशी जावे नि तिथे पाचेक मिनिटे टेकून मनरंजन कडे कूच करावे असे ठरले होते. परंतु श्रीवर्धनच्या मुख्य बुरुजावरून आपण चालत आलेली वाट - थेट तुंगार्ली धरणापासून ते गडापर्यंतची - दाखवली नि एवढे परत उलटे चालत जायचे आहे हे लक्षात येताच आमच्या खलाशांनी क्याप्टनविरुद्ध बंड केले. मनरंजन पुढच्या भेटीसाठी राखून ठेवावा असा प्रस्ताव मांडून बहुमताने तो मंजूर करण्यात आला. शिवाय अधेमधे उभी केलेली गाडी अंधार पडल्यावर बाहेर नेणे अवघड होईल हा ही एक मुद्दा होताच.

श्रीवर्धनच्या मुख्य बुरुजावरून दिसणारा मनरंजन


अखेर तीन वाजता श्रीवर्धनचा निरोप घेतला, मनरंजनला ’पुढच्या वेळी आधी तुला भेटू’ असे आश्वासन दिले नि ’परतुनी ये घरा’ च्या वाटे चालू लागलो. पण प्रथम माची गावात उतरून दिवसभराचा चहाचा उपवास सोडला, पाण्याची शिबंदी घेतली (अर्थात पुन्हा तिथेही थोड्या गजाल्या केल्या) नि ’चलो पुणे’ म्हणून मार्गक्रमणा सुरू केली.

परतीच्या वाटेवर भेटलेला श्रीवर्धनचा बेलाग बुरूज


चालता चालता पिंगूशेट करवंदाची कमाई करत होते तर नेहमीप्रमाणे अविनाश नि आम्ही ’व्यक्ती नि व्यवस्था’ या विषयावर भांडत होते.  राज आपण त्याक्षणी  त्याने चालू केलेल्या संस्थळावर - मीमराठी.नेट - चर्चा करत नाही हे विसरून कधी याला कधी त्याला सपोर्ट देत चर्चा थांबणार नाही याची काळजी घेत होते. ’हे तिघेही गंडलेत’ असे जाहीर करून पिंगूशेट सरळ पुढे गेले नि करवंदांशी सलगी करत चालू लागले. वाटेवर दोन दणदणीत तब्ब्येतीच्या हनुमान लंगूर माकडांनी अचानक वाटेवर उडी घेऊन वादात खंड पाडला. पण या स्वत:ला आपल्यापेक्षा प्रगत म्हणवणार्‍या जमातीतील चार माकडांकडे ढुंकूनही न पाहता ते आपला वाद सोडवायला जंगलात घुसले. अखेर दोन तासांच्या पायपिटीनंतर गाडी दिसू लागली नि परतायची वेळ झाली हे ध्यानी आले नि थोडासा खट्टू झालो. त्या 'स्पर्धा हा प्रगतीचा मार्ग' समजणर्‍या समाजात कशाला मरायला जायचं, सालं बुधासारखं आपल्यालाही इथे का राहता येऊ नये असं पुन्हा एकदा वाटून गेलं. आपणही इथे आपले सुहृद जमा करू, आपलीही एक आवळीबाय असेल, एक कुत्रा सोबत करेल, चार भात खाचरे दोन वेळच्या पेजेइतका भात देतील, रान तर जांभळी, करवंदांनी भरलेले आहेच, सोबतीला चार-दोन कैर्‍यांची झाडे आहेत. कातकर्‍यांकडून नागली मिळेल(?), कुरडूचा जंगल-पाला तर महामूर. जगायला एवढे खूप झाले की. बुधासारखं किंवा वॉल्डन नदीच्या काठी राहणार्‍या त्या थोरो ऋषीसारखं निदान चार दिवस राहून पहावं. ओमर खय्यामला स्मरून ’मद्याची सुरई, कवितेची वही अन् तू (माची)’ यात सारे जगणे आले असे म्हणत ’प्रगती प्रगती’ म्हणत आयुष्यात धावपळीशिवाय काही शिल्लक न राहिलेल्या नि ती धावपळ म्हणजेच प्रगती अशी व्याख्या करून जगणार्‍या जगाला फाट्यावर मारून जगू. पण हे जमत नाही, त्या प्रगती बरोबरच काही जबाबदार्‍याही येतात, त्या कशा अव्हेराव्या? नव्या जगातील माणसे व्यक्तिस्वातंत्र्याचा धोषा लावत किंवा ’कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है’ म्हणत बेशरमपणे त्या जबाबदार्‍या उलथून टाकतात, आमच्यासारख्या दोन्ही डगरीवर हात ठेवू पाहणार्‍यांना त्या टाळता येत नाहीत तसेच नव्या जगाचा मोह ही टाळता येत नाही हेच खरे. त्यामुळे एकाच वेळी राजमाची नि संगणक दोन्हीशी सलगी करू पाहणारे आम्ही कायमच त्रिशंकूसारखे लटकलेले राहतो.

माचीच्या बुरुजावर एक झाड नि पाण्याचे टाके, बुधा इथेच त्याच्या 'इवायना'ची वाट पहात बसत असेल का?

1 टिप्पणी:

  1. आधी वाचला होता..बहुदा 'मी मराठी' वरच.
    फक्त आज थोड्या वेगळ्या संदर्भाने वाचला गेला.
    माणसे गेली तरी आठवणी सोबत रहातात हे वापरून फारच गुळगुळीत झालेलं वाक्य किती प्रभावीपणे खरं आहे हे जाणवून गेलं वाचल्यानंतर.

    उत्तर द्याहटवा