सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ०६: समाजवाद्यांची बलस्थाने

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ५: आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही << मागील भाग 
---

मुळात आज आपल्या पराभवाचे खापर यांच्यावर फोडले जात आहे ती पैसा वा माध्यमे ही समाजवाद्यांची शक्ती होती कधी? असे असेल तर प्रतिस्पर्ध्याने ती वापरली असता आपण हतबुद्ध होऊन जात असू तर मग आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतरही त्या शक्तीला पर्यायी शक्ती आपण उभी करू शकलो नाही हे मान्य करण्यासारखे आहे. मग समाजवाद्यांची शक्ती होती कोणती जिच्या आधारे त्यांचे राजकीय अस्तित्व टिकून होते. माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यांची बलस्थाने होती ती दोन... कदाचित तीन.

पहिले म्हणजे निश्चित तत्त्वांच्या अथवा दृष्टिकोनाच्या आधारे होणारे राजकारण. ही तत्त्वे काटेकोरपणे ग्रथित केलेली असल्याने दृष्टिकोनात बरीच पारदर्शकता होती. इतकेच नव्हे तर या तत्त्वांची चिकित्सा करणारे, त्याबाबत खंडनमंडन करत त्यांना तपासणार्‍या अभ्यासकांचे गट सातत्याने त्यावर काम करत होते.

दुसरे म्हणजे संघटन किंवा निरलसपणे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांची फौज. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी फौज सातत्याने उभी ठेवून भाजपला ती रसद पुरवू शकत असेल तर त्यांच्याही पूर्वी असे संघटन उभे करणार्‍यांना आपले हे बलस्थान कमकुवत होत होत नाहीसे का झाले याचा धांडोळा घ्यावासा का वाटत नाही? पैसा नि माध्यमे या दोन शक्तींना टक्कर देण्यासाठी उत्कृष्ट संघटन ही नवी ताकद उभी करता येऊ शकते का याचा विचार करता येणार नाही का? की इथेही हल्ली असे निरपेक्ष कार्यकर्ते मिळतात कितीसे असं म्हणत पुन्हा दोष जनतेच्या माथी मारत आपण मोकळे होणार आहोत? 'आपले दोष' कधी तपासणार आहोत? आपल्या पराभवाची कारणे सतत इतरांच्या अवगुणात शोधणे कधी थांबवणार आपण? आज माध्यमांचा वेगाने प्रसार होत असताना असे आत्मवंचना करणारे समर्थन समोरच्यांना खरंच पटतं आहे का याचा वेध घ्यावासा वाटतो का?

तिसरे एक बलस्थान मी मानतो ते म्हणजे विचारांचा खुलेपणा, आणि मूल्यमापनाची शक्यता असणे. हा एक दुर्मिळ गुण (आणि कदाचित तोच दुर्गुणही, कारण यातूनच वैचारिक मतभेद नि अखेर फाटाफूट हा परिणामही संभवतो) केवळ समाजवादी विचारधारांत दिसतो. धार्मिकतेच्या आधारे संघटना उभी करणार्‍या उजव्यांना परंपरा, जुने ग्रंथ यांचे प्रामाण्य हवे असते तर सर्वात अर्वाचीन तत्त्वज्ञान असलेल्या साम्यवादी संघटनेत पोथी वेगळी असते इतकेच. शेवटी दोन्ही प्रकारात 'वरून आलेला आदेश' शिरोधार्य मानायचा असतो. आपल्या तत्त्वाची चिकित्सा करण्याचा वा त्याचा अर्थ लावण्याचा हक्क त्या त्या संघटनेतील मूठभरांच्या हाती राहतो.

याउलट समाजवादाचे अनेक रंग आपण पाहिले आहेत. कम्युनिस्ट, लोहियावादी, रॉयिस्ट वगैरे मूलतः समाजवादी असलेल्या परंतु तरीही वेगळ्या असलेल्या परंपरा दिसून येतात. केवळ पक्षाचे राजकीय नेतेच नव्हे तर राजकारणाबाहेर असलेले तत्त्वज्ञही विविध प्रकारे आपल्या मतांना तपासून खंडनमंडनाच्या मार्गे वेगवेगळे मुद्दे मांडत राहिले आहेत. त्याला त्यांच्या राजकीय पक्षांचा धोरणात्मक विरोध असलेला दिसून येत नाही. वैयक्तिक पातळीवर वा अस्वीकृतीच्या पातळीवरचा वेगळा, पण ते म्हणणे मांडण्याचा हक्कच हिरावून घेण्याच्या पातळीवर तो नसतो/नव्हता हे नमूद करून ठेवायला हवे. अशा विचार-विश्लेषणाची परंपरा सांगणार्‍यांची अवस्था आज फक्त प्रतिस्पर्ध्याबाबत बोटे मोडण्यापर्यंत आलेली पाहून मन विषण्ण झाले. विचारांच्या परंपरेचा शेवट अशा आततायी राजकारणी विचारांपाशी व्हावा हे दुर्दैव म्हणावे लागेल.

या पलीकडे जाऊन समाजवादी पक्षांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भूगोलाच्या सीमा बंदिस्त करत नाहीत अशी अंगीकृत विचारसरणी असणारा भारतीय राजकारणातला एक प्रमुख राजकीय गट. ती व्यापकता अन्य कोणत्याही पक्षाची वा विचारसरणीची दिसून येत नाही. साम्यवाद्यांनी शेतकरी नि मजूर वर्गाची लोकशाही म्हणत प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे इतर समाजघटकांना दुय्यम लेखले आणि भूगोलाच्या नाही तरी सामाजिक गटांच्या संदर्भात आपले तत्त्वज्ञान एका कुंपणाआड बंदिस्त करून ठेवले. या व्यापक विचारसरणीमुळे जगात अन्यत्र झालेल्या/होणार्‍या अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींपासून बोध घेणे, तुलनात्मक अभ्यास करणे शक्य होते. कम्युनिस्टांनी बर्‍याच अंशी हा फायदा उचलला होता. लोहियांसारख्या नेत्याने लोकशाही समाजवादी गटांसाठीही याचा काही प्रमाणात उपयोग करून घेतलेला दिसतो.

(क्रमशः)

पुढील भाग >>  समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ७. समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा