बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

एफ-१, वन झीरो फाईव: तंबूत शिरू पाहणार्‍या उंटाची गोष्ट

लहानपणी आपण सार्‍यांनीच तंबूत शिरलेल्या उंटाची गोष्ट ऐकली असेल. थोडे डोके तंबूत आणू का, पोटाला थंडी वाजते आहे ते आत घेऊ का, शेपटावर माशा बसून चावताहेत ते आत घेऊ का असे करत हळूहळू पुरा तंबूत शिरलेला नि अखेर मालकालाच हाकलून तंबूच बळकावून बसलेल्या उंटाची गोष्ट! मुळात मालकाने उंट पाळला तो त्याची कामे करण्यासाठी पण अखेर तो मालकाचेच काही हिरावून घेऊ लागला.

माणसाच्या जगण्यात असे अनेक अदृष्य उंट त्याच्या हक्काचे बरेच काही बळकावून बसलेले असतात, आधी डोके, मग पोट असे करत संपूर्णपणे तंबूत घुसून तो तंबूच ताब्यात घेतात. यात माणसाने स्वतःच निर्माण केलेल्या व्यवस्था फार मोठा वाटा बळकावताना दिसतात. काहीवेळा हे उंट जन्मतःच आपल्या बोकांडी बसलेले असतात, त्यांच्यापासून सुटका नसते. या उंटांपासून आपले तंबू कसे वाचवायचे असा वरकरणी साधा वाटणारा प्रश्न संदर्भ बदलले की पाहतापाहता अक्राळविक्राळ होऊन बसतो.

F1-105

आदिम काळापासून माणूस एकटा नाही. त्याची जात कळपाने राहणार्‍या प्राण्याचीच. कळप हा 'साम्यवादी' कधीच नसतो. त्यात अधिकारांची नि कर्तव्यांची उतरंड नेहेमीच अस्तित्वात असते. परंतु आदिमकाळात ही विभागणी कदाचित जबाबदारीचे वाटप या भूमिकेतून असावी आणि ती करण्याची जबाबदारीही कुण्या एका नेत्याची असावी. पण पुढे या रचनेला 'व्यवस्थेचे' रूप येत गेले नि एकाऐवजी अनेक नेते, निश्चित धोरणाधारित व्यवस्था असे काहीसे औपचारिक रूप तिला येत गेले.

पण असे घडत असतानाच मुळात माणसाच्या हिताच्या हेतूने केलेली व्यवस्था हे रूप बदलत जाऊन त्या व्यवस्थेने आपलेही हित-अहित निर्माण केले आणि त्यांना आपले घटक असलेल्या माणसाच्या हिताहिताच्या वर नेऊन ठेवले. हा झाला पहिला टप्पा. पुढच्या टप्प्यात तर व्यवस्थेच्या हिताहिताचा विचार करतो असा दावा करत व्यवस्थेच्या ठेकेदारांनी आपलेच हित व्यवस्थेचे हित म्हणून दामटायला सुरुवात केली.

माणसाने स्वतःला संस्कृतीच्या आणखी पुढच्या टप्प्यावर आणल्याचा उद्घोष करताना व्यवस्थेचे ठेकेदार नसलेल्यांनीही आपण व्यवस्थेचे हित पहात असल्याची बतावणी करत आपले स्वार्थ साधायला सुरुवात केली. या सार्‍या संक्रमणात मुळात ज्याच्यासाठी हा सारा डोलारा विकसित होत गेला त्या माणसाला मात्र कागदोपत्री स्वातंत्र्याच्या सनदा बहाल करत त्याच्याभोवती गुलामगिरीचा फास आवळला जाऊ लागला.

एफ-१/१०५ ची कथा अगदी एका घरगुती प्रश्नापाशी सुरु होते नि लहान लहान तपशीलाची, प्रसंगांची जोड देत पाहता पाहता एक मोठा प्रश्न कवेत घेऊन उभी राहते. सागर नि मुमु हे शहरी बहुसांस्कृतिक वातावरणातील जोडपे. सागर मेट्रोसेक्शुअल म्हणतात तसा, स्वयंपाकाची अतिशय आवड असलेला नि घराचे स्वयंपाकघर ताब्यात घेऊन असलेला. मुमु बुद्धिमान, करियर करणारी स्त्री. जोडप्याचे परस्पर प्रेम जसे दिसते तसेच लग्न हा तडजोडीचा भाग असल्याचे भानही. आसपासचा समाज हा कॉस्मोपोलिटन. घरात काम करणार्‍या स्त्रीपासून, रंगकामाला येणार्‍या पेंटरपर्यंत आसपासचे लोक वेगवेगळ्या सामाजिक गटाचे. त्या अर्थी या समाजाचा एक असा चेहरा नाही... पण खरंच...? खरंच या समाजाला एक असा चेहरा नाही/नसतो?

प्रसंग साधा असतो. सागर नि मुमुचे घर रंगवायला काढले आहे. त्यासाठी मूळचा 'नॉर्थ'चा असलेला पेंटर आलेला आहे. सागर घरात नसल्याने मुमुशी त्याचे संभाषण होते. घराला देण्यासाठी सागरने रंग निवडला आहे 'हिरवा'. हे मुमुने सांगताच तो दचकतो आणि घरातील गणपतीच्या तसबिरीकडे पहात शंकित होऊन विचारतो 'क्या आप सचमुच घरमें हरा रंग लगाना चाहती हैं?' बस्स. घटना म्हटली तर एवढीच. पण घटनेपेक्षाही तिच्याकडे पाहण्याचे दृष्टीकोनच तिचे मूल्यमापन आणि परिणती ठरवतात याची सुरेख मांडणी लेखकाने पुढे केलेली आहे.

माणसाच्या जगण्याचे मुख्य आधार त्याची पंचेंद्रिये आणि त्या आधारे उमटणार्‍या रस, रंग नि गंध यांच्या जाणीवा. आहार या मूलभूत गरजेला रस नि चवीची जोड देत कौशल्याच्याच नव्हे तर पाक'कले'च्या टप्प्यापर्यंत पोचलेला माणूस! निसर्गातून दिसणार्‍या रंगांचा आस्वाद घेत असतानाच आपल्या निवासासाठी रंगांच्या निवडीने स्वातंत्र्य मागणारा. या दोन किमान पातळीवरही आपले स्वातंत्र्य आपण गमावतोय का या भीतीने गांजलेला माणूस!

पण रंगांच्या निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आणि रंगांना फक्त दृष्टीचा आयाम असतो की आणखी काही गुणावगुणांचा, मूल्यांचा अवमूल्यांचाही? रंग हे निव्वळ रंग न म्हणून राहता त्यांची प्रतीके होऊन जातात तेव्हा मुमु सारख्या अगदी कॉस्मोपॉलिटन वातावरणातील स्त्रीच्याही मनात ती खोल रुजून बसतात. मुमूच्या बाबतीत केवळ पूर्वग्रहाच्या पातळीवर उरलेले हे प्रतीक, सामाजिक व्यवस्थेच्या संदर्भात वेगळा 'रंग' घेऊन उभे राहते तेव्हा त्याचा व्यापक व्यवस्थेअंतर्गत एक व्यवस्था म्हणून सागर नि मुमूच्या कुटुंबाला/घरावर त्यातील व्यक्तींवर कसकसा परिणाम होतो याची एक शक्यता मांडून त्या आधारे आशुतोष पोतदार यांनी व्यापक अर्थाकडे अंगुलिनिर्देश करून ठेवला आहे.

पथनाट्याची शैली आज रंगभूमीवर येऊन बस्तान बसवू पाहते आहे. अलिकडेच 'अभिनय कल्याण' च्या 'लेझीम खेळणारी पोरं, 'नाटक कंपनी'च्या 'बिनकामाचे संवाद' मधेही या स्वरूपातील सादरीकरण पहायला मिळाले होते. दिग्दर्शक मोहित टाकळकरांनी एफ १/वन झिरो फाईवला त्याच बाजात सादर केले आहे. पार्श्वभूमीवर प्रसंगाला अनुरूप अशा स्टिल फोटो प्रोजेक्शन'चा अलिकडे बर्‍यापैकी बस्तान बसवलेला पर्याय निवडला आहे. मी पाहिलेला प्रयोग 'सुदर्शन' सारख्या लहान रंगमंचावर असल्याने प्रेक्षक मुख्य रंगमंचाच्या अगदी जवळ असल्याने आणि प्रोजेक्शन पार्श्वभूमीवरचा पूर्ण स्क्रीन व्यापणारे असल्याने ते काहीसे त्रासदायक झाले. मोठ्या रंगमंचावर कदाचित हे अधिक समर्पक ठरावे.

अभिनयात आवर्जून उल्लेख करायचा तो मुमू झालेल्या मृण्मयी गोडबोलेचा. प्रसंगांतून येणारे विराम आणि त्यातील काही प्रसंगी अपेक्षित असलेली भावनिक आंदोलने, स्थिर स्थितीत केवळ चेहर्‍यावरील बदलत्या भावांतून दाखवणे दाद घेऊन गेले. बिहारी पेंटरच्या भूमिकेती रामकुमार तांगडेंची भूमिकाही चांगलीच लक्षात रहावी अशी. यांना यापूर्वी 'शिवाजी अंडरग्राऊंड...' मधे पाहिले होते नि तेव्हाही त्यांचे काम दाद देण्याजोगे असल्याने चांगलेच लक्षात राहिले होते.

शेवटी जाताजाता नाटकाच्या काहीशा विसंगत वाटणार्‍या नावाबाबत. एफ-१/१०५ हा सागर्/मुमुच्या फ्लॅटचा नंबर असावा असा होरा होता. पण तसा काही उल्लेख ऐकल्याचे आठवत नाही. जरी एफ-१ चा संदर्भ लागला नाही तरी त्यातला १०५ हा 'वयं पञ्चाधिकं शतं' कडे अंगुलिनिर्देश करणारा आहे का असा कुतूहलजनक प्रश्न पडला, कधीतरी लेखकाला विचारेन म्हणतो.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५

AAPtard मित्रांना अनावृत पत्र

माझ्या AAPtard मित्रांनो,

या संबोधनाने तुम्ही मुळीच विचलित होणार नाही याची खात्री आहे. कारण तुमच्या नेत्याला त्याच्या आजारावरून, गळ्यातील मफलरवरून झालेल्या हिणकस शेरेबाजीला भीक न घालता तुम्ही त्याचा 'मफरलमॅन' बनवून चोख प्रत्युत्तर दिले होते. तसेच 'रिटार्ड'शी साधर्म्य सांगणारे हे हिणकस संबोधनही तुम्ही मनावर न घेता गल्ली बोळातून आपले काम निष्ठेने चालू ठेवले नि दिल्लीत विजयश्री खेचून आणली. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.

हे संबोधन देणारे स्वतःला तुमच्यापेक्षा बरेच बुद्धिमान वगैरे समजत असावेत. एखाद्या मंदबुद्धी समजल्या गेलेल्या भावाने स्वतःला कुशाग्र बुद्धिमान समजणार्‍या भावाला दिलेली ही मात आहे, नुसती मातच नव्हे तर काही सेकंदात अस्मान दाखवणे आहे. तेव्हा आता हे संबोधनही तुम्ही अभिमानाने मिरवायला हरकत नाही.

राज्याराज्यातून जमवलेली फौज, प्रत्यक्ष मसीहाच समजला जाऊ लागलेला नेता याच्याविरोधात एक 'भगोडा' म्हणून हिणवलेला जेमतेम तीन वर्षे वयाच्या पक्षाचा - थोडा बोलभांड का होईना - नेता आणि त्याची अननुभवी फौज, या लढाईचा निकाल पाहता डेविड आणि गॉलिएथच्या लढतीचीच आठवण व्हावी.

IAmAamAadmi

तुमच्या या विजयासाठी तुमचे अभिनंदन करण्यासाठी काही मित्रांना आज भेटलो. सोबत पुण्यातून आप'चे नेते आणि लोकसभेचे उमेदवार असलेले प्रा. सुभाष वारे यांचीही भेट झाली. त्यांच्याशी संवाद साधत असताना तुम्ही तरुण लोक कोणतीही भीड न ठेवता अवघड प्रश्न, आव्हान देणारे प्रश्न ज्या सहजतेने वारे सरांना विचारलेत ते पाहता या लोकांत काही दम आहे अशी भावना झाली. 

कार्यकर्ता याचा अर्थ होयबा म्हणणारा गुलाम अशी जी व्याख्या होऊन बसली आहे त्याला छेद देणारे, नेत्यांना प्रसंगी जाब विचारू शकतील इतके निर्भिड कार्यकर्ते असतील तर ते पक्षाच्या नेत्यांवर चांगला अंकुश ठेवू शकतात नि सत्तातुर होऊ देत नाहीत असा माझा होरा आहे. बॅकवर्ड फीडबॅक सिस्टम जेव्हा संपते तेव्हा पक्षनेत्यांचे जमिनीवरचे भान सुटते नि पक्ष विघटनाच्या मार्गावर चालू लागतो. काँग्रेसबाबत आज हे निर्विवादपणे सिद्ध झालेले दिसते आहे. 'आप'बाबत हा उलट-संवाद अजून जिवंत आहे हे समाधानकारक आहे. पण सत्तासंपादनानंतरच त्याच्या अस्तित्वाची खरी कसोटी असते हे लक्षात असू द्या.

तुमच्यापैकी माझ्या मित्रमंडळींना माझे 'आप' बद्दलचे मत नेमके ठाऊक आहेच. 'आप'च्या धोरणांबाबत नि प्रामुख्याने वाटचालीबाबत मला असलेल्या शंका, आक्षेप मी सातत्याने तुमच्यासमोर मांडलेच आहेत, जसे मोदींबद्दल नि त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या राजकारणाबद्दलचेही. काँग्रेसपासून खुद्द 'आप'पर्यंत सार्‍याच पक्षांतून भगव्या बोटीत बसण्याच्या घाईत असलेल्या अनेक उंदरांच्या रांगा लागलेल्या असताना तुमच्यासारखे कार्यकर्ते आपल्या पक्षावर निष्ठा ठेवून काम करत राहिले याचे मला अतिशय अप्रूप आहे. पक्षनिष्ठा नावाचा शब्द लोकसभा नि विधानसभांच्या निवडणुकीत कचरापेटीत जाऊन विसावलेला आम्ही पाहिला. अशा वेळी तुमच्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांचे अविचल राहणे खरोखर कौतुकास्पद म्हणावे लागेल. त्याअर्थी राजकारणातले खर्‍या अर्थाने रिटार्ड लोक आहात तुम्ही, आणि तुम्ही तसेच रहावे अशी इच्छा आहे.

भाजपाच्या लोकसभेतील विजयानंतर सर्वत्र दिसू लागलेला धार्मिक नि राजकीय उन्माद एका भयप्रद भविष्याकडे घेऊन जाणारा होता/आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. दुर्दैवाने सक्षम विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याने हा उन्माद वेगाने पसरणार हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती. तेव्हा हा पिसाळलेला वारु रोखण्यासाठी एका सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता होती. त्याची सुरुवात दिल्लीमधून व्हावी हे औचित्यपूर्ण ठरेल असे मला वाटत होते. दिल्लीमधे भाजपाचा पराभव व्हावा अशी माझी इच्छा होती आणि तो पराभव घडवून आणण्याइतपत ताकद असलेला एकमेव पक्ष म्हणून मी 'आप'कडे पहात होतो.

मोदींच्या दणक्याने एकत्र आले असले, तरी प्रत्यक्ष निवड्णुकीच्या जागावाटपाच्यावेळी नाही तरी सत्ता दिसू लागल्यावर समाजवादी म्हणवणारे तीन यादवांचे पक्ष पुन्हा तोंडे फिरवून आपापल्या वाटे चालू लागतील हे उघड आहे. तेव्हा आज गरज होती ती सर्वस्वी नव्या पर्यायाची, जुन्या पक्षांचे तुकडे जोडून केलेल्या 'जनता पक्षा'ची नव्हे. अशा कोणत्याही जुन्या पक्षाचा वारसा न सांगणारा 'आप' म्हणूनच माझ्या दृष्टीने कुतूहलाचा आणि काही प्रमाणात अपेक्षेचा विषय होता.

'हा विजय कोणाचा?' असा घासून गुळगुळीत झालेला प्रश्न आता सर्वत्र चर्चेला घेतला जाईल. पण या प्रश्नाला तितकीच गुळगुळीत उत्तरे दिली जाऊ नयेत याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. 'हा आपचा विजय की भाजपाचा पराभव?', 'हे मोदी सरकारच्या कामगिरीवरचे मत मानावे का?', 'भाजपाचा पराभव मोदींमुळे की बेदींमुळे?' या माध्यमांच्या लाडक्या आणि सोप्या प्रश्नांचा वेध त्यांना घेऊ द्या. तुमच्या पुढचे प्रश्न वेगळे असायला हवेत कारण माध्यमांचे प्रश्न आजच्या टीआरपीसाठी असतील तर तुमच्या समोरचे प्रश्न उद्याच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक उत्तरे शोधणारे असायला हवेत.

अशा प्रपाती विजयाचे श्रेय सर्वस्वी स्वतःकडे घेण्याची घाई करू नका. या विजयाला काही बाह्य घटकही सहाय्यभूत झाले असतील का याचा तुम्हाला शोध घ्यायला हवा. 'मोदींच्या विजयात काँग्रेसच्या पराभवाचा जसा मोठा वाटा होता, तसाच आज 'आप'च्या, केजरीवालांच्या विजयात मोदींच्या पराभवाचा मोठा वाटा आहे का?' याचा धांडोळा घेता यायला हवा.

निव्वळ शक्यतांमधून अनेक 'कॉन्स्पिरसी थिअरीज्' जन्माला येतात तशा 'भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला बेदी डोक्यावर बसलेल्या नको होत्या', 'संघाने मोदींना दणका दिला', 'काँग्रेसला आपण मोदींना हरवू शकत नाही हे ध्यानात आले म्हणून त्यांनी आपले वजन 'आप'च्या पारड्यात टाकले' अशा अनेक तर्कांना उधाण येईल. 

पण त्यावरच्या चर्चेत अडकण्याऐवजी तुमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांशी बोला. तिथे त्यांनी 'आप'चे जाळे कसे विणले, त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी आल्या त्यावरचे उपाय कसे शोधले याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. काय करायचे ते नेत्यांनी सांगण्याची पद्धत मोडीत काढून थेट तळाच्या कार्यकर्त्याशी बोलण्याने कदाचित वास्तव तुम्हाला अधिक चांगले समजेल अशीही शक्यता आहे. दिल्लीच्या यशाची पुनरावृत्ती अन्यत्र करायची असेल तर यशातून पदरी पडलेले माप मोजण्यात नि शासनाशी संबंधित विषयांत अडकून पडलेल्या नेत्यांपेक्षाही तुमच्यासारखे कार्यकर्ते यासाठी अधिक काही करू शकतात हे विसरू नका.

मोदीभक्तांनी त्यांच्या विजयांनंतर एक मसीहाच जणू अवतरला आहे अशा थाटात जे थैमान मांडले तसे केजरीवाल आणि आप यांच्याबाबत होऊ न देण्याचे शहाणपण तुमच्याकडे असायला हवे. माणूस यशाच्या प्रसंगीच अधिक बेफिकीर होतो असे म्हटले जाते. आपले नेते केजरीवाल यांच्याकडूनच मागच्या विजयाच्या वेळी नेमके असेच वर्तन घडल्याचे आपण पाहिले. सुदैवाने सरकार सोडल्यानंतरच्या काळात त्यांनी निदान काही प्रमाणात का होईना आपल्या धोरणात, विचारात बदल केलेले दिसतात (विशेषतः सरकारमधून माघार घेणे ही चूक होती हे प्रांजळपणे मान्य करणे.) जे स्वागतार्ह आहे.

'End justifies the means' या तत्त्वानुसार 'दिल्लीच्या सरकारमधून ४९ दिवसांत बाहेर पडणे ही चूक नाही हे सिद्ध झाले' असा दावा आता केला जाऊ शकेल. निवडून आल्यानंतर 'जनतेनेच आम्हाला न्याय दिला आहे' या नेहेमीच्या तर्काच्या सहाय्याने, 'मागील सार्‍या चुका या चुका नव्हत्याच तर तो विरोधकांचा कांगावा वा कट होता' असे दावे केलेले आपण वर्षानुवर्षे ऐकत आलेलो आहोत. पुढे भ्रष्टाचार सिद्ध होऊन तुरुंगवास भोगत असलेले लालूप्रसाद यादवही एक सोडून दोनदा असे निवडून आलेले होते हे विसरता कामा नये. निवडणुकीतला विजय हा मागचे सारे दावे बरोबर असल्याचे सिद्ध करणारा 'व्हाईटवॉश' नसतो याचे भान रहायला हवे. ते सरकार पायउतार झाल्यानंतर, आज नवी विधानसभा अस्तित्वात येईपर्यंत मधे घडलेल्या घडामोडी, घटना, राजकारणाने घेतलेली वळणे इ. अनेक घटकांचा यावर परिणाम होत असतो याची नोंदही घ्यायला हवी.

कधीकाळी माझ्यासोबत असलेल्या नि खर्‍या अर्थाने विश्लेषकाच्या, पुरोगामित्वाच्या, वैचारिकतेच्या भूमिकेतून जगाकडे पाहणार्‍या एका समवयस्क मित्राने राजकीय पळापळीवर 'आपल्याला हवा तो उमेदवार निवडून आल्याशी कारण, कोणत्या पार्टीचा आहे याच्याशी काय करायचे आहे.' असे भाष्य केले तेव्हा मला धक्का बसला होता. अनेकांच्या मनात या धक्का बसण्यासारखे काय आहे असा विचार चमकून जाणार आहे, असा विचार करणारे आमच्या मित्राच्याच वाटेवरचे प्रवासी आहेत असे खेदाने नमूद करायला हवे. आपला विचार इतका 'लोकल' (स्थानिक नव्हे एका लहान वर्तुळापुरता या अर्थी) झाला आहे की ज्याला होलिस्टिक व्ह्यू, ब्रॉडर पिक्चर अर्थात व्यापक दृष्टिकोन म्हणतात तो केव्हाच हरवला आहे असा याचा अर्थ आहे.

प्रत्येक राज्यातून श्राध्दाचे पिंड घातल्यासारखे पडलेले स्थानिक पक्ष एकुण देशाच्या राजकारणाला, प्रगतीला बाधक ठरतात हे इतक्या वर्षात स्पष्ट झालेले आहे. जितके पक्ष अधिक तितक्या अस्मितांचे नि स्वार्थाचे ताण अधिक. त्यातून शासनाची निर्णयक्षमता कमकुवत होत जाते नि शासन गतिरुद्ध होऊन बसते. बळकट केंद्रीय सत्ता जशी हुकूमशाहीकडे जाण्याचा धोका असतो, तसेच इतके विखुरलेले विरोधी पक्षही त्याच परिस्थितीला कारणीभूत ठरतात.

तेव्हा 'आप' हा दिल्ली किंवा आसपासच्या चार दोन राज्यातला स्थानिक पक्ष होऊन बसला, तर उलट तो नसता तर बरे असे म्हणायची वेळ येईल. तेव्हा 'आप' हा जर राष्ट्रीय पक्ष व्हायला हवा असेल तर त्याची मुख्य जबाबदारी तुम्हा कार्यकर्त्यांचीच असायला हवी. निव्वळ आपल्या गावात, शहरात, राज्यात 'आप' कसा वाढेल याचा संकुचित विचार न करता एक राष्ट्रीय पक्ष म्हणून तो कसा उभा राहील या दृष्टीने विचार करता यायला हवा. प्रसंगी स्थानिक सत्तेला तिलांजली देऊन दीर्घकालीन हिताला प्राधान्य देता यायला हवे, त्यासाठी नेत्यांवर दबाव आणता यावा यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक रहायला हवे.

'आप'चे देशाच्या राजकारणातले स्थान काय असा विचार करता, आज 'आप' हा भाजपाचा नव्हे तर हतप्रभ झालेल्या काँग्रेसचा पर्याय आहे हे ध्यानात घ्यायला हवे. भारतीय राजकारणात तुमच्या आमच्या दुर्दैवाने धार्मिक अधिष्ठान असलेले (त्यांनी कितीही विकासाचे कोट किंवा प्रगतीच्या पगड्या घालू द्या, मूळ भगवी कफनी लपून राहिलेली नाहीच, किंबहुना सोयीच्या प्रसंगी तेच तिचे जाहीर प्रदर्शनही करत आलेले दिसतात) राजकारण करणारा भाजप हा एक अक्ष बनलेला आहे. दुसर्‍या अक्षावरचा पक्षोपक्षांचा गोंधळ निस्तरायचा तर तिथे एका बळकट मध्यममार्गी पक्षाची आवश्यकता आहे.

अनेक वर्षे सत्तेत राहून काँग्रेसची जनतेशी नि सर्वसामान्यांची नाळ तुटलेली आहे. जिथे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर दरवर्षी फक्त पॅकेज दिले की काम झाले असे समजणारे, नि तरीही स्वतःला शेतकर्‍यांचे नेते म्हणवणारे दांभिक नेते असतात, अशा पक्षाच्या आजाराचे निदानच चुकलेले असते, त्याचे पुन्हा निरोगी होणे अवघडच असते. तेव्हा या काँग्रेसची जागा आता 'आप'ने भरून काढणे अपेक्षित आहे.

बुखारींचा पाठिंबा नाकारून आपण समूहाचे राजकारण करत नसल्याचा संदेश देऊन 'आप'ने काँग्रेसपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहेच, पण इथेच न थांबता या वाटेवरचे काँग्रेसच्या स्थानिक क्षत्रपांचे गड ताब्यात घेणे हे तुम्हा स्थानिक कार्यकर्त्यांने पहिले उद्दिष्ट असायला हवे. त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न असायला हवेत.

हे आणि असे बरेच काही तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर हवे. गुलालाचा रंग बदलला तरी तो उधळला की दृष्टीचा पल्ला कमी होतो याचे भान तुमच्याकडे असावे ही सदिच्छा.

'आप'ला नसलो तरी आपला,

- रमताराम


हे वाचले का?