रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

सत्तेचे भोई

आठ ऑगस्ट रोजी बंगालमधील काँग्रेस छात्र परिषदेचा कार्यकर्ता असलेल्या कृष्णप्रसाद जेना या विद्यार्थ्याची प्रतिस्पर्धी 'तृणमूल छात्र परिषद' या तृणमूल काँग्रेसशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत हत्या केली. या मारहाणीचे कारण काय होते तर तृणमूल काँग्रेसचे मंत्री सौमेन महापात्र यांच्या स्वागतासाठी आला नाही!

हे महापात्र महाशय त्यावेळी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी म्हणून आले होते. तरीही त्यांना आदरसत्काराची हौस होती की नेत्यावर छाप पाडण्यासाठी कार्यकर्तेच अति आक्रमक होते हे सांगता येत नाही. पण इतक्या क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याची हत्या करण्याइतके बेभान होण्यात शासन धार्जिणे असण्याचा आधार नक्कीच कामी येत असणार.

यावर शासन आणि विद्यापीठ संलग्न व्यक्तींच्या प्रतिक्रिया अतिशय संवेदनशून्य होत्या. एका विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे हे बिनमहत्त्वाचे ठरवण्यासाठी शिक्षण मंत्री तो 'बाहेरचा' विद्यार्थी असल्याचे ठसवत आहेत, दोनदा नापासही झाल्याचे आवर्जून सांगत आहेत. ज्यांच्या अधिकारक्षेत्रात ही हत्या झाली ते प. मिदनापूरचे एसपी देखील तो 'बाहेरचा' विद्यार्थी असल्याचे तुणतुणे लावत आहेत. म्हणजे महाविद्यालयाबाहेरचा आहे म्हणून त्याची हत्या कमी महत्त्वाची वा क्षम्य ठरते?

अर्थात ज्या देशात हत्या झालेल्या नन्सच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांच्या हत्त्येचे महत्त्व कमी करत अप्रत्यक्षपणे त्या गुन्ह्याला त्याच जबाबदार आहेत असे सुचवले जाते, दहा दहा वर्षांच्या मुलांना जिवंत जाळणार्‍या नराधमाचे समर्थन करताना त्याचा बाप धर्मांतर करत होता हे बेशरमपणे सांगितले जाते, बलात्काराच्या गुन्हयाला स्त्रीच जबाबदार असते असे म्हणणारे नेते आणि अध्यात्मिक गुरु असतात अशा माथेफिरुंच्या देशात हे तर्कही वाजवीच मानले जातील.

तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यापासून त्यांच्या नेत्यांचा उद्दामपणा, गुंडांचा नंगानाच बंगालमधे चालू आहे. बंगालमधे कम्युनिस्ट जाऊन तृणमूल काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा 'आगीतून फुफाट्यात' अशी काही जणांची प्रतिक्रिया होती. तेव्हा त्यांची 'कम्युनिस्टांचे पक्षपाती' अशी संभावना केली गेली.

पण सत्तेचे फासे उलटतात ते सत्तेच्या चाव्या हाती असलेले धनको आणि गुंड आपल्या जागा बदलतात म्हणून, एकदा ते झाले की त्याला अनुसरून जनमत निमूटपणे बदलतेच. अनेक वर्षे कम्युनिस्टांसाठी गुंडगिरी करणारे तृणमूलसाठी तेच काम करू लागले तेव्हा सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती गेल्या हे सर्वसामान्यांना दिसू शकले नव्हते. ज्यांना दिसू शकले त्यांनी 'लोहा लोहेको काटता है' अशा शब्दात या गुंडगिरीचे समर्थनही केले होते. 'आपल्याला वाईट, गैरसोयीच्या अथवा घातक वाटणार्‍या परिस्थितीतला कुठलाही बदल योग्य दिशेनेच असतो असे समजायचे कारण नाही.त्या बदलाचेही मूल्यमापन व्हायला हवे.' असा सावधगिरीचा इशारा काही तटस्थ निरीक्षकांनी दिला होता.

सतत काहीतरी बदल होत रहावेत, तीच प्रगती अथवा विकास असे समजणारे किंवा मुळातच कम्युनिस्टांचे वैचारिक विरोधक असलेल्यांनी प्रथमच कम्युनिस्ट सत्तेबाहेर गेल्याच्या उन्मादी आनंदात तो कानाआड केला. झेंड्याचा रंग बदलला असला तरी तो झेंडा धरणारे हात तेच आहेत याचे भान हरवले होते. कम्युनिस्ट शासन गेल्यामुळे बंगालच्या परिस्थितीत बदल झालेला नाही. फरक पडला असला तर तो इतकाच की पूर्वी गुंडगिरीचे समर्थन करणारे आणि त्याबद्दल आक्रोश करणारे आता आपापल्या भूमिका उलट करून उभे आहेत इतकेच.

बंगालमधे जे घडले तेच कमी अधिक फरकाने गेल्या वर्ष, दीड वर्षात देशपातळीवर घडते आहे. लोकसभेच्या नि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीही राजकारण्यांचे प्रत्यक्ष पक्षांतर आणि धनदांडग्यांचे नि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे छुपे पक्षांतर यातूनच सत्तांतर घडून आले आहे हे सहज पाहता येते. वृत्तपत्रीय बातम्यांच्या आधारे नेमका आकडा सांगायचा तर तब्बल ११४ नेत्यांनी (पडताळा करून घेता न आलेले नेते जमेस धरता हा आकडा २००ची संख्या सहज ओलांडून जातो आहे.) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या सत्ताधारी पक्षांतून सध्या सत्तेवर असणार्‍या पक्षांत प्रवेश केला. यातील बहुसंख्य निवडूनही आले आहेत. या राजकीय नेत्यांचे आश्रित किंवा बाहुबल असणार्‍या, 'कार्यकर्ते' म्हणवल्या जाणार्‍या अनेक गुंडांनीही आपल्या मालकासोबत नवा घरोबा स्वीकारला आहे. जुनी पालखी जमिनीवर ठेवून नव्या राजाची पालखी घेऊन हे भोई चालू लागले आहेत. त्यामुळे जे बंगालचे झाले तेच बहुधा देशातही घडणार आहे.

एखाद्या राजकीय पक्षाच्या, नेत्याच्या अथवा विशिष्ट वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या शासकांच्या हातात दीर्घकाळ सत्ता असली आणि सुरुवातीच्या काळातला आशावादाचा भर ओसरला की हळूहळू त्या व्यवस्थेतील उणीवा दिसू लागतात. मग त्यांचे परिणाम तपासले जाऊ लागतात, हळूहळू त्यावर ध्यान इतके केंद्रित होते की हे आता बदलले पाहिजे या निष्कर्षापर्यंत लोक येऊन पोचतात. याला दीर्घकाळ सत्तेबाहेर राहिलेले विरोधक सक्रीय पाठिंबा देत असतात. पण हे विरोधक जेव्हा जुन्या सडलेल्या व्यवस्थेचा पर्याय म्हणून पुढे येतात तेव्हा ते नवे पर्याय खरंच जुन्या व्यवस्थेहून काही वेगळे असतात का असा प्रश्न आपण विचारून पाहत नाही.

'आज' काहीतरी चुकते आहे, काहीतरी बिघडलेले आहे आणि एखादी छानपैकी क्रांती करून ते बदलून काहीतरी करून सगळे व्यवस्थित करून टाकायचे आहे असे बर्‍याच जणांना वाटत असते. फक्त ते 'काहीतरी' करायचे म्हणजे काय याचे उत्तर मात्र बहुधा असा बदल, अशी क्रांती करू इच्छिणार्‍यांकडे नसते. मग समोर येईल त्यालाच उत्तर मानण्याची, ते पुरेसे ठरले नाही तर मग 'निदान जुने तर गेले' असे समर्थन करण्याची प्रवृत्ती दिसून येते.

OnTheShoulders

केवळ सत्ताधारी बदलले की 'पुरेशी' क्रांती झाली असा समज करून घेतला जातो. अनेकदा रोगापेक्षा उपाय भयंकर आहे हे लक्षात येते, पण ती चूक प्रांजळपणे मान्य न करता तर्कांच्या कोलांटउड्या, वैयक्तिक शेरेबाजी, मागच्यांच्या तुलनेत नवे 'कमी वाईट' अशा मखलाशा सुरू होतात. हा स्वप्नाळूपणा भारतात आहे तसाच इजिप्तमधेही, महाराष्ट्रात आहे तसा बंगालमधेही. अवघड नि गुंतागुंतीच्या प्रश्नांना नवा धर्म, नवा इजम, नवा नेता, नवा त्राता अशी साधीसोपी उत्तर शोधण्याची माणसाची सवय हा जगाच्या कानाकोपर्‍यात वसलेल्या माणसांत एक समान धागा आहे.

स्वातंत्र्यानंतर दोन-अडीच वर्षांचा अपवाद वगळता केंद्रात काँग्रेस सत्ताधारी होता, तसेच १९७७ पासून बंगाल हा डाव्यांचा बालेकिल्ला होऊन बसला होता. भारतात सत्तेचे राजकारण निर्णायकरित्या बदलवणारे तीन प्रसंग दाखवता येतात. पहिले १९७७ केंद्रात झालेल्या काँग्रेस पाडावाची उपपत्ती म्हणून बंगालमधे काँग्रेसला बाजूला सारून कम्युनिस्टांचे सत्ता हस्तगत करणे, दुसरे या सरकारने तब्बल साडेतीन दशके निरंकुश सत्ता भोगल्यानंतर २०११मधे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने डावी सत्ता उलथून टाकत सत्ता बंगालमधे सरकार स्थापणे आणि तिसरे सर्वात अलिकडचे म्हणजे २०१४ मधे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप या उजव्या, कडव्या धार्मिकतेला धार्जिण्या पक्षाचे केंद्रात सरकार स्थापन होणे.

जरी आणिबाणीचा परिणाम म्हणून विरोधक एकत्र येऊन त्यांनी केंद्रात काँग्रेसचा पाडाव केला असला तरी त्या कालखंडाने देशाच्या राजकारणाची दिशा - वर उल्लेख केलेला बंगालचा अपवाद वगळता - फारशी बदलली असे म्हणता येत नाही. ती दोन अडीच वर्षे संपताच गाडी पुन्हा मूळपदावर आली. परंतु बंगालमधे मात्र सत्ता हाती येताच डाव्यांनी ती दीर्घकाळ हातून निसटू दिली नाही. क्रांतीला मूर्त रूप देत असताना किंवा एखादे नकोसे सत्ताकेंद्र उखडून फेकत असताना त्याला पर्याय म्हणून आपण काय उभे करतो आहोत याचेही भान त्या बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांना असायला हवे. वर उल्लेख केलेल्या तीनही प्रसंगी ते लोकांमधे होते असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

काही काळापूर्वी इजिप्तमधे प्रसिद्ध 'जस्मिन क्रांती' झाली. क्रांतीच्या रम्य नि गुलाबी कल्पना घेऊन जगणारे आपल्याकडचे क्रांतिकारक लगेचच भारावून गेले. त्यांना भारतातही अशी क्रांतीबिंती व्हायला हवी अशी स्वप्ने पडू लागली. पुढे अण्णांच्या तथाकथित क्रांतीच्या काळात ते स्वप्न प्रत्यक्षात उतरेल अशी आशा त्यांना वाटू लागली. समाजाच्या आर्थिक उतरंडीत वरच्या स्थानावर असलेल्या आयटीतील एंजिनियर्सनी गांधी टोप्या घालून हिंजवडी फेज-१ टू फेज-२ मोर्चा काढून तात्कालिक स्वातंत्र्यसैनिक वगैरे होण्याची संधी साधली.

पण अपेक्षेप्रमाणे इजिप्तमधे मुबारक बरे होते असे म्हणता येईल अशा कट्टर मुस्लिम ब्रदरहुडच्या हाती सत्ता गेली आणि अण्णांच्या आंदोलनाने डोंगर पोखरून उंदीर काढावा तसे आणखी एका स्थानिक प्रभाव असलेल्या राजकीय पक्षाला जन्म देऊन जंतरमंतरवरच डोळे मिटले.

सामान्यपणे जगात अशी क्रांती होते ती शस्त्राच्या बळावर, मतपेटीच्या लोकशाही मार्गाने किंवा जनतेच्या उठावाच्या मार्गाने. बुद्धिभेदाचे किंवा प्रबोधनाचे (त्या क्रांतीचे तुम्ही समर्थक आहात की विरोधक यानुसार) हत्यार देखील वापरले जाऊ शकते, वापरले जाते. परंतु स्वतंत्रपणे काम करताना याची परिणामकारकता कमी होते आणि प्रगतीचा वेगही संथ असतो. पण याच्या जोडीला वरील तीनपैकी एखादे हत्यार असेल तर बदल वेगाने घडवून आणता येतो. जगातील धार्मिक आणि कम्युनिस्ट अशा वैचारिकदृष्ट्या दोन ध्रुवांवर असलेल्यांनी बुद्धिभेद/प्रबोधनाच्या जोडीला हत्यार उचलून बर्‍याच देशात सत्ताबदल घडवून आणले आहेत.

'काहीतरी बदल हवा' म्हणणारे बदल झाला की झाली क्रांती किंवा झाला विकास म्हणून झोपी जातात. पण त्याची किंमत अनेकांना चुकवावी लागते. अफगाणिस्तानमधे बमियानमधे उभ्या असलेल्या शांतिदूताच्या पुतळ्याला आपल्या विध्वंसाने, इराकमधल्या स्त्रियांना आपल्या शीलाने, श्रीलंकेतील तमिळांना आपल्या सर्वस्वाने, ईजिप्तमधल्या लोकांना स्वातंत्र्याने आणि जगातील जवळजवळ प्रत्येक तथाकथित क्रांतीमध्ये अनेक जीवांना आपल्या मृत्यूने!

एकीकडे हजार वर्षांपूर्वीच्या तथाकथित मूल्यांना घट्ट कवटाळून बसलेले जडबुद्धी आणि दुसरीकडे सतत नाविन्याला आणि बदलांना हपापलेले लोक दोन्हीही सारखेच विचारहीन. पहिला गट म्हणतो 'बघा तुमच्या प्रगतीने कसं वाटोळं केलं, आपली महान संस्कृती सोडल्याचा परिणाम', दुसरा म्हणतो 'इतक्या वर्षांत किती मागे राहिलो, आता बदल हवाच.' पहिल्याला बदलाने आपले आयुष्य किती सुखकर केले याचे 'सोयर' नाही, आणि दुसर्‍याला तथाकथित बदलाने घडवलेल्या विध्वंसाचे 'सुतक' नाही. तारतम्याची वाट मात्र या धुमश्चक्रीत हरवून गेली नि ते दिङ्मूढ होऊन बसलेले दिसते.

बंगालमधे काय किंवा देशात काय, झेंड्याचा रंग बदलला की बरेच काही बदलेल हा असलेला आशावाद किती भाबडा नि कुचकामी आहे हे दोन्ही ठिकाणी दिसून आलेच आहे. देशाच्या आर्थिक, सामाजिक स्थितीत बदल घडवायचा असेल तर केवळ सत्ता बदलून भागत नाही तर सर्वसामान्यांचे विचार नि कृती यात बदल घडावा लागतो, सत्तेत जाण्याचा धन आणि ताकद या व्यतिरिक्त तिसरा मार्ग निर्माण करावा लागतो. आणि हा बदल या दोन्हीचा वापर करूनच सत्ता राबवणारे मुळीच करणार नाहीत, तो सामान्यांनाच करावा लागेल याची समज येत नाही तोवर 'अच्छे दिन' हे जुमलेच राहतील किंवा बदल झाल्याचे आभास निर्माण करणारी भांगेची गोळी.

पालखीतला राजा वेगळा असेल पण पालखीचे भोई तेच असतील तर वाटचाल बदलण्याची शक्यताच नसते.त्यामुळे बदलाची सुरुवात राजापासून नव्हे तर त्याला खांद्यावर घेणार्‍या भोयांपासून करावी लागते.

-oOo-

(पूर्वप्रकाशितः पुरोगामी जनगर्जना सप्टेंबर २०१५)


हे वाचले का?

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

गण्या आणि मी - १ : गण्याचे गणित

मी आणि गण्या एकाच हापिसात काम करतो. मी शाळेत गणितात हुशार नि गण्या त्या विषयात ढ. पण इतिहासाने आणि समाजशास्त्राने मला दगा दिला, आणि पाठांतर-प्रवीण गण्याने नेमक्या त्या विषयांत भरपूर मार्क्स काढले नि तो पुढे गेला. आता तो हेडक्लार्क आहे आणि मी त्याच ऑफिसला प्यून आहे.

तसं म्हटलं तर आमचं हे दोघांचंच ऑफिस. हे दहा बाय दहाचं ऑफिस आणि बाहेरच्या भिंतीवर पाच बाय पाच आमच्या ऑफिसच्या नावाची पाटी. आमचं हेडऑफिस अमेरिकेला आहे. आमचा बडा साहेबही तिकडेच बसतो. तो तिथून आमच्या दोघांवर नियंत्रण ठेवून आहे.

मागच्या वर्षी गण्याला महिन्याला ८३ हजार रुपये होता आणि मला चौदा हजार. यावर्षी बड्या साहेबांनी मला तेहेतीसशे रुपयाची पगारवाढ दिली आणि गण्याला तेरा हजार रुपयांची. आता गण्याचा पगार शहाण्णव हजार झाला आहे तर माझा साडेसतरा हजार.

NagpurachaCA

मला साधारण चोवीस टक्के पगारवाढ मिळाली आणि गण्याला सुमारे सोळा टक्के! दरवर्षी पगारवाढीमधे मला अधिक टक्केवारी मिळते म्हणून गण्या माझ्यावर खार खाऊन आहे. तो म्हणतो, "तुला जास्त पगारवाढ दिल्याने एक दिवस तू प्यून असूनसुद्धा माझ्यापेक्षा जास्त पगार घेशील."

गण्याशी बोलण्यात अर्थ नसतो हे ठाऊक आहे. पण एकतर ऑफिसमधे दोघेच असल्याने कधीतरी तोंड उघडतो मी. आणि दुसरे म्हणजे माझं गणिताचं ज्ञान पाजळून त्याला खिजवायची संधी मला सोडायची नसते.

थोडे गणित करून मी त्याला सांगितले की आज तुमच्या माझ्या पगारात जवळजवळ अठ्ठ्याहत्तर हजाराचा फरक आहे. आजच्या टक्केवारीच्या (१६%) हिशोबाने पाहिले तर पाच वर्षांनी तुमचा पगार असेल एक लाख पंचाहत्तर हजार रुपये आणि माझा (२४% वाढीने) एक्केचाळीस हजार रुपये. म्हणजे तेव्हा आपल्या पगारात फरक असेल तो 'एक लाख चौतीस हजार रुपयांचा'! दहा वर्षांनी हा फरक असेल दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा!

आजच्या पगारवाढीच्या हिशोबाने पुढची एकवीस वर्षे तुमचा पगार नि माझ्या पगारातला फरक वाढतच जाणार आहे. माझा पगार तुमच्यापेक्षा जास्त होण्यासाठी "सत्तावीस वर्षे" लागतील! आणि हे सुद्धा माझा पगार वाढत गेल्यावरही साहेब वाढीची टक्केवारी कमी करणार नाही हे गृहित धरून. (स्वगत: आणि माझ्यावरच्या असूयेपोटी तुम्ही काड्या करून नोकरीवरून काढून टाकले नाहीत तर.) शिवाय आजच्या आपल्या वयाचा हिशोब ध्यानात घेतला तर तोवर आपण "निवृत्त" झालेले असू.

एका प्यूनने आपल्याला गणित शिकवावे हे गण्याला अजिबात आवडलेले नाही. "तुझ्यासारखा भिकारडा प्यून आता मला गणित शिकवणार?" असे म्हणून त्याने माझ्या एक कानाखाली वाजवली आणि म्हणाला, "माझ्या नागपूरच्या सीएने मला सांगितले आहे की 'लवकरच तुझा पगार माझ्यापेक्षा जास्त होणार आहे.' त्या सीएपेक्षा तुझ्यासारख्या दहावी पासला जास्त अक्कल आहे का?" दोन थपडा खाऊन मी निमूट आपल्या जागी जाऊन बसलो.

त्या नागपूरच्या सीएकडे माझ्यासारख्या दहावी-पास माणसाला अप्रेंटिस म्हणून घेतात का हे विचारायला हवे. बिनचूक चुकीचे गणित कसे करतात हे ही शिकून घ्यायला हवे. आहे. जगण्यातला एक महत्त्वाचा धडा आहे तो.

- oOo -

संबंधित लेखन : गण्या आणि मी - २: गण्याचे ग्यान


हे वाचले का?

बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

अन्योक्ती १ - एका 'जॉन स्नो'चा मृत्यू

'Game of Thrones' नावाच्या एका बहुचर्चित दूरचित्रवाणी मालिकेतला पाचवा सीजन नुकताच संपला. कोण्या काल्पनिक जगातले सात राजे, काही भटक्या टोळ्या नि त्यांचे राजे यांच्यात सतत चालू असलेले सत्तासंघर्ष, त्यासाठी वापरली जाणारी देहापासून पारलौकिकापर्यंत सारी साधने, परस्परद्रोह, हत्या, हिंसाचार, लैंगिकता यांचा विस्तीर्ण पट असलेली ही मालिका जगभरातल्या प्रेक्षकांना बांधून ठेवणारी ठरली आहे.

तिचे पुढचे भाग चॅनेलवर येण्याआधीच पहायला मिळावेत यासाठी ते खटपट करू लागले आहेत इतकी उत्सुकता त्याबद्दल निर्माण झालेली आहे. अनेक प्रेक्षक त्यात इतके गुंतले आहेत की नुकत्याच सादर झालेल्या शेवटच्या भागात झालेल्या 'जॉन स्नो'च्या हत्येने प्रेक्षकांमधे संतापाची लाट उसळली. अनेकांनी ती मालिका दाखवणार्‍या चॅनेलकडे निषेध नोंदवला. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियांतून तिखट प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.

स्वयंघोषित सुसंस्कृत जग आणि त्यांनी असंस्कृत ठरवलेल्या जमाती (ज्यांना wildlings असं संबोधले जाते आहे, पण जे स्वतःला 'free folks' किंवा 'स्वतंत्र लोक' म्हणवून घेतात) यांच्या जगाला विभागणारी एक विशाल बर्फभिंत सुसंस्कृत समाजाचे प्रातिनिधित्व करणार्‍या सात राजांनी मिळून बांधली आहे. या दोन समाजात सातत्याने युद्धे होतात; समोरासमोर होतात, गनिमी काव्यानेही होतात. त्या युद्धांच्या खुणा मिरवणारे, त्यात गमावल्या व्यक्तींचा अभाव सोसणारे दोन्ही बाजूला आहेत.

त्यातही भिंतीचे रक्षण करण्यास नेमलेली सेना म्हणजे त्या तथाकथित सुसंस्कृत जगातले सारे असंस्कृत लोक; गुन्हेगार, पराभूत वृत्तीने जगण्यापासून दूर जाऊ पाहणारे, ज्यांना त्या सुसंस्कृत म्हणवणार्‍या जगात आपले म्हणतील असे कुणी नसणारे कदाचित. जॉन स्नो हा एका राजाचा अनौरस पुत्र आणि या 'मोले घातले लढाया' सेनेतील युद्धाचा पूर्वानुभव आहे अशी एकमेव व्यक्ती, त्याच आधारे त्यांचा नेता बनलेला.

पण भिंतीच्या उत्तरेकडून आता एक भयानक संकट चालून येते आहे. मृतांना पुनर्जात करून उभी केलेली 'White Walkers' ची सेना खोलवर जंगलात कुठेतरी उभी राहते आहे. प्रचंड संख्येने चालून येणार्‍या या सेनेला जॉनचे अक्षरशः मूठभर असलेले लोक थोपवू शकणार नाहीत. दुसरीकडे भिंतीपलिकडे उत्तरेलाच असणारे ते असंस्कृत म्हटले जाणारे लोक तर त्यांचे पहिले बळी ठरणार आहेत, इतकेच नव्हे तर बळी गेलेले पुनर्जात होऊन आपल्याच लोकांचे बळी घेण्यासाठी चालून येणार आहेत. अशा परिस्थितीत जुन्या वैराला विसरून दोन्ही बाजूंनी एक होऊन येणार्‍या संकटाचा सामना केला तर कदाचित त्या अफाट आणि अजेय सेनेला काही प्रमाणात विरोध करू शकू असा प्रस्ताव जॉन स्नो देतो.

दोन्ही बाजूचे बरेच लोक या नव्या युती बाबत नाखूशच नव्हे तर कट्टर विरोधात आहेत. परस्परांशी झालेल्या युद्धात ज्यांनी जिवाभावाचे कुणी गमावलेले आहे अशा लोकांच्या भावना याबाबत अर्थातच अधिक तीव्र आहेत.

भिंतीपलिकडे जाऊन 'असंस्कृत' म्हणवल्या जाणार्‍या त्या लोकांचे मन वळवण्यात आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन येण्यात - त्यांच्यावर ते संकट आधीच येऊन कोसळल्यामुळे कदाचित - जॉन यशस्वी होतो. परंतु परतून आलेल्या जॉनला 'सुसंस्कृत' जगातील लोक 'द्रोही' ठरवून दग्याने ठार मारतात. यात मागून येऊन 'कमांडर' झालेल्या जॉनचा मागे राहिलेला प्रतिस्पर्धी असतो, तसाच भिंतीपलिकडच्या लोकांनी ज्याचे आईवडील ठार मारले होते असा दहा वर्षांचा जॉनचा मदतनीस 'ऑली'ही. तो ही जॉनवर प्रत्यक्ष वार करून आपला सूड उगवतो.

आता भिंतीपलिकडच्या आणि अलिकडच्या माणसांतील हा दुवा तोडून टाकल्यावर येणार्‍या त्या महाकाय संकटाचा सामना नक्की कसा करायचा याची कोणतीही पर्यायी योजना जॉनच्या खुन्यांकडे नाही. कदाचित जॉनच्या योजनेनुसार भविष्यातील काही मृत्यू टाळता आले असते, पण भूतकाळातला सूड उगवण्यासाठी भविष्यात आता इतर अनेकांना मृत्यूच्या खाईत लोटण्यात आले आहे.

दीर्घकाळ चाललेल्या वैराबाबत नेहेमीच अनुभवास येणारे हे वास्तव आहे. माणसे भविष्यापेक्षा भूतकाळातच अधिक रमलेली दिसतात. अस्मितेच्या आणि वैराच्या चुडी भूतकाळातल्या जाळावरच चेतवल्या जात असतात. असे एखादे वैर दोन्ही बाजूंनी परस्परांचे केलेले नुकसान विसरून, बाजूला ठेवून दोन्ही बाजूंना सामोरे जावे लागणार्‍या कैक पट मोठ्या संकटाला एकत्रित सामोर गेल्यास भविष्यातील मोठे नुकसान कदाचित टाळता येऊ शकते हे शहाणपण स्वतःला प्रगत म्हणवणार्‍या माणसांत अजून फारसे रुजलेले आढळत नाही. एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर त्याला त्याची विश्वासार्हता, नेतृत्व आणि क्वचित प्राणही गमवावा लागतो.

वैयक्तिक सूडासाठी, स्वार्थासाठी सार्‍या समाजाला आपण संहाराच्या खाईत लोटत आहोत याचे भान नसणारे संख्येने अधिक असतात, कमी असलेच तरी त्यांचा आवाज मोठा असतो. ते 'ऑली'सारखे असतात. आपल्या आईबापाच्या खुन्यांच्या जमातीशी समझोता करणारा म्हणून जॉन आपला शत्रू आहे असा त्याचा समज होतो (किंवा तसे ठरवणे त्याच्या सूडाच्या पूर्तीसाठी सोयीचे असते) आणि आईवडिलांच्या खुन्यांना शासन करण्याइतके बळ आणि परिस्थिती त्याला निर्माण करता आले नाही तरी जॉनची हत्या करण्याइतके बळ तो जमवू शकतो, जमवतो. यातून आईबापांच्या मृत्यूचा सूड आपण उगवतो आहोत असे खोटे समाधान तो स्वत:साठी मिळवू पाहतो, पण त्याचवेळी तो स्वतःला आणि त्याच्याबरोबरच्या त्या मूठभर सैनिकांना मृत्यूच्या खाईकडे घेऊन जातो.

'ऑली'चे आईवडील तर गेलेच. पण जॉनची योजना राबवली तर आपला कदाचित जीव वाचू शकतो हे त्याला आणि त्याच्यासारख्याच मूलबुद्धी सहकार्‍याना समजत नाही, किंवा समजले तरी विचाराऐवजी उन्मादाला अधिक महत्त्व देत असल्याने त्याची त्यांना फिकीर नाही. ती भिंत केवळ त्या सैनिकांचीच नव्हे तर त्या भिंतीपाठी सुरक्षित असणार्‍या सात राज्यांतील सर्वसामान्यांची रक्षणकर्ती असल्याने आपल्याबरोबरच आपण त्या सार्‍यांचे आयुष्य धोक्यात घालतो आहोत याची त्या उन्मादी तथाकथित सैनिकांना जाणीव नसते.

जसे त्या मुलाचे आईवडील आणि भिंतीच्या रक्षणकर्त्या सैनिकांपैकी काही लोक भिंतीपलिकडच्या लोकांनी ठार मारले तसेच इकडच्या लोकांनीही ठार मारलेल्यांचे सुहृदही त्या बाजूला आहेत याचे भान ते विसरतात, केवळ सूडाला प्राधान्य देतात आणि सतत नवनव्या सूडभावना जन्माला घालणारी कृत्ये करत राहतात. युद्धात वित्तहानी होते त्यापेक्षाही अधिक मोलाच्या अशा जीविताची हानी होत असते.

युद्ध हा खेळ नव्हे, ती अपरिहार्यता असते हे कधीही विसरता कामा नये. सूडाचा प्रवास अशा युद्धांचे सातत्य निर्माण करतो आणि युद्धभूमीपासून दूर असणार्‍यांना खोट्या अभिमानाचे आणि अस्मितांचे खेळ देऊन टाकतो. गमावणारे वेगळे आणि खेळणारे वेगळे अशा विषम सामन्यात खेळणार्‍यांचा कैफ समजण्यासारखा असतो. पण ज्याने एकदा गमावले आहे त्याला गमावण्याची वेदना ठाऊक असते, त्याची जाणीव ठेवून तो खेळ पुन्हा त्याच परिणतीपर्यंत पोचू नये यासाठी यथाशक्ती प्रयत्न करण्याऐवजी त्यानेच सूडाचे अग्निकुंड पेटते रहावे म्हणून नव्या समिधांची सोय करावी हे अधिक असंस्कृतपणाचे लक्षण मानायला हवे.

GandhiTheWall

असे जॉन स्नो तुमच्या आमच्या आयुष्यातही असतात. दूरदृष्टीचा अभाव असलेले, भूतकाळात जगू पाहणार्‍यांचे जमाव त्यांची हत्या करतात. त्यानंतर तेच द्रोही असल्याचे मागे राहिलेल्यांच्या गळी उतरवतात. त्यापूर्वी भिंतीवरच्या आणि भिंतीआड सुरक्षित माणसांसाठी त्याने लढलेल्या लढाया, गाजवलेला पराक्रम जणू 'अगा जे घडलेचि नाही' असा आव आणतात. पण अशा जॉन स्नो कडे असलेली दूरदृष्टी, त्याचे शहाणपण त्यांच्याकडे नसते. त्याअर्थी जॉन स्नोचा मृत्यू हा एका शहाणपणाचा मृत्यू ठरतो.

भूतकाळाकडे बघत अशा सूड आणि अस्मितांचे खेळ खेळणारे अखेर स्वतः सर्वनाशाकडे जातातच, पण त्याहून वाईट हे की ते इतरांनाही आपल्याबरोबर घेऊन जातात. ज्याप्रमाणे जॉन अनेकांना जगण्याची संधी देऊ शकत होता तसे हे त्याचे मारेकरी देऊ शकत नाहीत, हत्येने सुरु झालेला त्यांचा प्रवास त्यांच्या इतरांबरोबरच विनाशापाशीच संपणार असतो. कधीकाळी जॉनवर उगारलेले खंजीर उगारून पुढे ते एकमेकावरच वार करु लागतात, कारण समस्या सोडवण्याचा तेवढाच एक उपाय त्यांना ठाऊक असतो.

'गेम ऑफ थ्रोन्स' एक काल्पनिक कथा असेल, पण तुमचा आमच्या वास्तवाशी त्याची नाळ घट्ट जुळलेली आहे. त्यात आपल्या जगण्याचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले आहे. अशा बर्फभिंती तुमच्या-आमच्या आयुष्यातही उभारलेल्या असतील. त्या भिंतीच्या अलिकडचे आपण सारे सुसंस्कृत आणि पलिकडचे रानटी, जंगली अशा गृहितकांवर आपण जगत असू कदाचित. त्या भिंतीच्या दोन बाजूंमधे समेट घडवू पाहणार्‍याची हत्या होत असेल आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याची द्रोही म्हणून होणारी विटंबना सुसंस्कृतांमधले असंस्कृत लोक कदाचित करत असतील. वार करणारा खंजीर ज्यांच्या हाती आहे त्यांना हे समजणे तर दुरापास्तच आहे, पण आपल्या लाडक्या 'जॉन स्नो'ची हत्या झाली म्हणून निषेध नोंदवायला जाणार्‍यांना तरी हे उमगले असेल का?

-oOo-

(पूर्वप्रकाशित: पुरोगामी जनगर्जना ऑगस्ट २०१५)


हे वाचले का?

सोमवार, १० ऑगस्ट, २०१५

जग दस्तूरी रे...

DeviDeepakAndGanga

विषयसंगती ध्यानात घेऊन हा लेख ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. .

- oOo -


हे वाचले का?

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

'ऑल दॅट आय वॉन्ना डू' : आभासी स्वातंत्र्याचा प्रवास

'Mother died today, or may be yesterday; I can't be sure' कामूच्या 'द स्ट्रेंजर'च्या सुरुवातीचे हे मर्सोऽचे हे वाक्य म्हणजे साहित्यातील एका नव्या प्रवाहाची नांदी मानलं जातं. अस्तित्ववादी विचारधारेचा प्रभाव असलेल्या साहित्याचा प्रवाह तिथून बळकट होत गेला. वरवर पाहत अब्सर्ड, अर्थहीन जगातील माणसाच्या जगण्यातील तुटलेपणाचा, दिशाहीनतेचा मर्सोऽ प्रतिनिधी दिसतो. जगण्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा आधार गमावतानाही त्याबाबत बेफिकीर, खरंतर संवेदनाशून्य कंटाळा असलेल्या, कोणत्याही बंधनातून दूर राहू पाहणार्‍या, गुंतण्याचे टाळणार्‍या व्यक्तींचा प्रतिनिधी बनून राहिला होता. दुसर्‍या महायुद्धानंतर कामूच्या या नायकाची प्रतीरूपे प्रत्यक्ष जगण्यात दिसू लागली आणि साहित्यिकांनीही त्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली.

AllIWannaDo

'माझा बाप मेला, आणि मी गावात हत्तीवरून साखर वाटून आलो.' असे म्हणत आपल्या गोष्टीची सुरुवात करणारा संजीव खांडेकर यांच्या 'ऑल दॅट आय वॉन्ना डू' या कवितेमधील कुबडा या मर्सोऽची आठवण करून देतो. मातेचा मृत्यू असो, मरीबरोबर केलेला सेक्स असो की रेमंडच्या गर्लफ्रेंडला त्याच्यासाठी लिहिलेले पत्र असो, मर्सोऽ हा एकतर साक्षीदार आहे किंवा अंमलबजावणी करणारा; निर्णय घेणारे वेगळेच आहेत. त्या निर्णयांच्या योग्यायोग्यतेबद्दलही त्याने फारसा विचार केलेला नाही की घडल्या घटनेबद्दल. एक प्रकारची निरिच्छ तटस्थता त्याला व्यापून राहिली आहे. याउलट खांडेकरांचा कुबडा हा स्वतःला काय मिळवायचे आहे याचा निश्चित निर्णय घेतलेला, त्या साध्याला आवश्यक साधने काय याचा वेध घेणारा आणि त्याच्या आड येणार्‍या कुटुंबासह सार्‍या तथाकथित जवळच्या गोष्टी निर्ममपणे नाकारणारा, निष्ठुरपणे स्वतःच त्यांचा ध्वंस करणारा.

या कुबड्याला मि. इंडिया व्हायचे आहे! आणि हे साध्य करण्यासाठी त्याला बुद्धाच्या मार्गावर जायचे आहे. हे साध्य नि साधन परस्परविसंगत नसले तरी त्यांत कोणती संगतीही नाही. पण आजचे जगच असे की अशा परस्पर विसंगत भासणार्‍या आकांक्षा ठेवणे हे तितकेसे हास्यास्पद राहिलेले नाही. इतकेच नव्हे तर कदाचित नव्या संदर्भात त्यांत काही संगती उगवूनही येते आहे. या कुबड्याच्या पाठीवरचे कुबड आहे ते परंपरांचे, पूर्वग्रहांचे, कर्मकांडाचे जोखड. ते कुबड हा त्याचा नकोसा झालेला वारसा आहे. कारण त्याला नाहीसे होत जाणार्‍या जगाचे संदर्भ आहेत. कुबड्याला हे जोखड उतरवून फेकायचे आहे, नव्या जगाच्या स्पर्धेसाठी तयार व्हायचे आहे. त्यासाठी त्याला बुद्धाचा मार्ग मदत करणार आहे. बुद्धमार्गाच्या आधारे एकदा का हे विरूप कुबड नाहीसे झाले की मग शारीर सौंदर्याच्या आधारे मिळवले जाणारे ते बिरुद मिळवणे त्याला शक्य होणार आहे.

जागतिकीकरण, वेगाने वाढलेली उत्पादकता, मिळवण्याजोगे बरेच काही समोर ठेवणार्‍या जगाला सामोरे जाणारा कुबडा भूतकाळ, परंपरांचे कुबड उतरवून टाकून पुढे पुढे धावत जाण्याची अगदी लालसेच्या, हव्यासाच्या पातळीवरची उमेद बाळगणारा. नवी परिस्थिती अशी की 'पङ्गु लङ्घयते गिरीम्' ही उक्ती केवळ ध्वन्यर्थाच्या पातळीवर न राहता एखाद्या कुबड्यालाही मिस्टर इंडिया होण्यास उद्युक्त करणारी. त्यातच त्याचे हित आहे असे पटवत वास्तवात आपलेच हित साधून घेणारी जमात आज अप्रत्यक्ष सत्ताधारी होऊन बसली आहे. बुद्धापर्यंत पोचायचे तर सीमेपार जायला हवे इतके कुबड्याला ठाऊक आहे. पण तिकडे जाण्याचा मार्ग त्याला ठाऊक नाही. पण वर्षानुवर्षे उपस्थित असलेले बडवे, पंडे आता 'बडी' म्हणून जवळीक साधत हा मार्ग दाखवण्याचे आश्वासन देत आहेत आणि तुझा मार्ग कोणता हे तुझ्या खिशात किती पैसे आहेत यावर ठरेल असे बिनदिक्कतपणे सांगत आहेत. पण धार्मिक क्षेत्रात ईश्वराचे ठेकेदार म्हणून उभे राहिलेल्या पंड्या-बडव्यांविरोधात झालेली जागृती अजून या नव्या वारसदारांबाबत झालेली दिसून येत नाही.

जुन्या जगातील लोकांच्या मानसिकतेवर गारुड करणार्‍या धर्मसंस्थांचा इतिहास पाहिला तर प्रेषितांशी द्रोह करणारेच नंतर पश्चात्तापाचा दावा करत त्यांच्या नावे दुकाने उघडून बसले होते. प्रेषिताचा अनुग्रह झाल्याचा दावा करत त्याचा वारस म्हणून मिरवत होते. आपल्या अलौकिक अशा 'मार्केटिंग' तंत्राच्या आधारे प्रेषिताचे शब्द जगाच्या कानाकोपर्‍यात पसरवत होते. त्यातून पदरी पडणारे लाभ उठवत होते. या कुबड्याच्या बुद्धमार्गावरही कधीकाळी थेट लोकांची हत्या करुन त्यांची बोटे माळ करून गळ्यात मिरवणारे 'अंगुलीमाल' बुद्धाचा अनुग्रह झाल्याचा दावा करत बस्तान बसवून आहेत. एकवेळची भूक भागवत मरत्या माणसाला जेमतेम जिवंत ठेवणार्‍या वडापाव पासून सेलेब्रिटी अंत्यसंस्कारांपर्यंत सर्व काही आता 'अंगुलीमाल' ब्रँड आहे. सार्‍या जगण्याचेच आता ब्रँडिंग झाले आहे.

केवळ मार्ग दाखवूनच ते थांबत नाहीत, त्या मार्गावरचा प्रत्येक थांबा हा त्यांनी आपल्या मालकीचा करून घेतला आहे. जगातील शासनांच्या ध्येयधोरणांवर, हाडामासांच्या माणसांच्या जगण्यातील निर्णयांवर ही नवी सत्ताधारी जमात अधिराज्य गाजवते आहे. त्यांनी काय खावे, काय परिधान करावे हे तीच ठरवून लागली आहेत, इतकेच नव्हे तर त्यांनी कोणती स्वप्ने पहावीत, त्यांची पूर्तता कोणत्या मार्गाने करावी यावरही तिचे संपूर्ण नियंत्रण आहे. एक प्रकारे हा एक विशाल असा खेळ ती खेळते आहे नि यातील माणसे जणू यातील केवळ अँड्रॉईड्स किंवा रोबॉट्स बनून राहिली आहेत. आणि असे असूनही त्यांना निर्णयस्वातंत्र्य असल्याचा आभास निर्माण करण्यात सत्ताधारी जमात यशस्वी होते आहे.

सारे जग जणू धावते ट्रेडमिल झाले आहे. या ट्रेडमिलवरच हे अंगुलीमाल धावण्याच्या शर्यती आयोजित करताहेत. केवळ एकालाच अंडे फलित करण्याची संधी मिळेल हे ठाऊक असूनही आकांताने धावणार्‍या शुक्रजंतूंप्रमाणे सारे ऊर फुटेपर्यंत धावत आहेत, पण अंडे फलित करण्याचा हक्क पुन्हा अंगुलीमालच मिळवत आहेत. अंगुलीमालांच्या कृपेने कुबड्याचे कुबड तर गळते, परंतु त्या यशाचे नवे कुबड उलट दिशेने पोटावर उगवून येते आहे. थोडक्यात एका समस्येचे निराकरण करणारे अंगुलीमाल तुमच्यावरच्या ओझ्यांची जागा फक्त बदलत आहेत. आणि पुन्हा त्या नव्या ओझ्यावरचे उपायही तेच तुम्हाला देत आहेत. जुन्या विरूपतेला मागे सारून नवी विरूपता तिची जागा घेते आहे.

'ऑल दॅट आय वॉन्ना डू' चा पुण्याच्या एका तरुण मुलांच्या ग्रुपने त्याचा रंगमंचीय आविष्कार सादर केला. 'हल्लीचे तरूण साहित्यादी कलांपासून दूर जाताहेत, त्याची त्यांना कदर नाही' हा जुन्या जाणीवा घेऊन जगणार्‍या समीक्षकांचा तक्रारीचा सूर मोडून काढत तरुण मंडळींनी या प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कदाचित हे म्हणत असतील की आमच्या जगण्याशी रिलेट होणारे, आम्हाला सामावून घेणारे काही समोर येते तेव्हा तिथे आमची दाद असतेच. पण आमच्या जगण्याचा भाग नसलेल्या इतिहासातील काही घटना वा जाणीवांच्या आवृत्त्या आम्हाला रुचत नाहीत, त्यात आम्हाला रस नाही. कदाचित समीक्षकांनाच आता नव्या चौकटी मांडण्याची गरज निर्माण झाली असेल.

भावकवितांचे नृत्याविष्कार अनेकदा पाहिले पण अशा वैचारिक बैठक असलेल्या एखाद्या कवितेचे असे माध्यमांतर हा दुर्मिळ प्रयोग असावा. कवितेतील मिथक नेमके पकडून त्याचा सादरीकरणाशी मेळ घालण्याचे कौशल्य अविनाश सपकाळ या तरुणाने उत्तम पेललेले दिसले. मूळ कवितेमधे दिसणारा कुबड्याचा 'प्रवास', त्यातले टप्पे हे संहितेमधे आणताना त्याला एखाद्या कम्प्यूटर गेमच्या 'स्टेजेस'मधे रूपांतर करून त्याचे प्रवाहीपण राखण्यात त्यांची टीम बव्हंशी यशस्वी झाली. संहिता आणि सादरीकरणाचा नवा बाजही कवितेच्या मूळ विषयाला पूरक ठरणारा. कवितेच्या पहिल्याच वाक्यात असलेला 'मी साखर वाटून आलो' या उद्घोषणेतला निष्ठुर नि ठाम निश्चय मात्र त्यांच्या हातून निसटलेला दिसतो. कुबड्याचे कुबड नेमक्या कोणत्या टप्प्यावर गळून पडले हे ही ठसठशीतपणे समोर आणण्यात दिग्दर्शक फारसा यशस्वी झालेला दिसला नाही. परंतु या प्रयोगात सर्वात उल्लेखनीय गोष्ट होती ती मूळ कवितेच्या कथनाला जोडलेला उपसंहार. कवितेचे सारे मर्म एकाहुन अधिक पात्रांच्या तोंडून उलगडत त्यातून एका गोंधळाचा, संभ्रमाचा आभास निर्माण करण्यात प्रयोग चांगलाच यशस्वी झाला असे म्हणावे लागेल.

- oOo -

(पूर्वप्रसिद्धी: हा लेख दैनिक ’दिव्य मराठी’च्या ’रसिक पुरवणी’मध्ये ’आभासी स्वातंत्र्याचा आवेगी प्रवास (आभासाचा प्रयोग)’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला.)


हे वाचले का?