शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

तो कलकलाट होता...

काही काळापूर्वी मराठी संस्थळांवर असताना मी आपले लेखन दर्जेदार असल्याचे कसे ठसवावे यावर एक लेख लिहिला होता. (जिथे लिहिला त्या संस्थळाबरोबरच तो शहीद झाला.)

त्यात एक मुख्य धागा होता तो असा की अनेक ठिकाणी आपणच वेगवेगळ्या अवतारांनी असावे नि इथले तिथे, तिथले आणखी कुठे असे रेफरेन्सेस देत ते लेखन अनेक ठिकाणी रेफर झाल्याचे, एक प्रकारे मान्य झाल्याचे ठसवावे असा होता.

ArnabWithABlowHorn

निवडणुकांच्या काळात नीती सेन्ट्रल आणि त्यासारख्या अनेक वेबसाईट अचानक निर्माण झाल्या नि परस्परांच्या हवाल्याने बातम्या पसरवू लागल्या. नीती... च्या अवतारसमाप्तीनंतर स्क्रोलने लिहिलेल्या लेखात यांची एक लहानशी यादीच दिली होती.

खोटे अनेक तोंडांनी वदवून खर्‍याचा आभास निर्माण करणे हा आता भारतात प्रस्थापित होऊन बसलेला प्रकार आहे. आज याचे आणखी एक उदाहरण दिसते आहे. PoKमध्ये घुसून वीस अतिरेकी ठार मारून 'ऊरी'चा बदला घेतला अशा बातम्या अनेक पोर्टल्सवर दिसू लागल्या आहेत. आश्चर्य म्हणजे अजूनतरी एकाही बड्या वृत्तपत्रसमूहाने वा चॅनेलने याची दखल घेतली नसली, तरी आपल्याच गटातल्या दुय्यम चॅनेलच्या पोर्टलवर ही बातमी टाकून कितपत खपते आहे याची चाचपणी चालू झाली आहे.

प्रथम ही बातमी क्विंट्वर दिसली, मग 'कोब्रापोस्ट'वर (तरुण तेजपाल यांच्या अटकेनंतर 'रंग' बदललेला) . नुकतीच क्विंटचा हवाला देऊ ही बातमी ABP Majhaच्या वेबसाईटवर दिसू लागली आहे. कदाचित आता ती त्या चॅनेलवर येईल. फारसा गदारोळ झाला नाही, तर त्यांच्या हिंदी चॅनेलकडे सरकेल असा अंदाज आहे.

हा कालपर्यंतचा अपडेट. आज हीच बातमी क्विंटच्याच हवाल्याने 'दिव्य मराठी'ने नकाशा बिकाशा काढून दाखवत अधिक अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण्यांचा अजेंडा राबवणारी 'फ्रस्ट्रेटेड इंडियन', इतकेच नव्हे तर डिफेन्सन्यूज.इन या नावाने जणू लष्कराची अधिकृत साईट असल्याचा आभास निर्माण करण्यार्‍या खासगी साईटनेही ही बातमी अहमहमिकेने दिली. चॅनेल्स बघणे मी बंद केल्याने तिकडे किती हुदाळ्या मारल्यात माहीत नाही.

देशाच्या संरक्षण मंत्रालयाने अथवा कोणत्याही अधिकार असलेल्या व्यक्तीने याबाबत माहीती न देताही अशा तर्‍हेची बातमी दिली जात आहे. अर्थात संघटनांच्या कुजबूज ब्रिगेडकडे 'आमच्या आतल्या गोटातल्या बातमीनुसार' हे विनोदी कारण कायम हत्यार म्हणून असतेच. अधिकृत बातमी नंतर दिली जाईल अशी मखलाशीही केली जाऊ शकते. 'द डॉन' या पाकिस्तानच्या वृत्तपत्राने ही बातमी कशी दिली नाही?' या प्रश्नाला 'आपली हार ते कशी काय जाहीर करतील?' असे साडेअठ्ठावीस इंच फुलवलेल्या छातीने उत्तर दिले जाईल...

सगळं कसं सहज तर्क करण्याजोगे होऊ लागले आहे. लाज, लज्जा शरम सगळे गुंडाळून खोटारडेपणा चालू आहे. असंच चालू राहिलं तर या देशात काही दिवसांत केवळ 'तुमचं खोटं विरूद्ध आमचं खोटं' इतकंच शिल्लक राहील की काय अशी भीती वाटू लागली आहे. खरं काय हे कधीच कुणाला समजू शकणार नाही. जो तो आपल्या सोयीच्या खोट्यालाच खरे मानून चालू लागेल असे दिसते. थोडक्यात भक्तांचा डीएनए सर्वत्र पसरलेला दिसेल अशी शक्यता आहे. 

ही बातमी जर खोटी असेल तर या तीन वेबसाईट्सवर 'सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे वर्तन केल्याचा' ठपका ठेवून खटला भरणार की 'मन की बात' पसरवल्याबद्दल पद्मविभूषणची खिरापत वाटणार हे कोण सांगू शकेल? ट्विट करून विचारू का?

खोटे बोलण्यात काही लाज वाटून घेऊ नये असा संदेश थेट शीर्षस्थ व्यक्तींकडून दिला जात असल्याने जनतेने आणि त्यातही सनसनाटीपणावरच पोट भरता येते असे समजणार्‍या काही माध्यमांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळावे यात नवल नाही. अशा खोट्या बातम्या युद्धज्वर वाढवण्यास कारणीभूत होतात. 

एकदा हे पचते असे दिसले की जी प्रथितयश माध्यमे आहेत, नि ज्यांनी अजून ही बातमी दिली नाही, त्यांनाही 'स्पर्धेत टिकण्यासाठी' हे करावे लागणार आहे. त्यांची न्यूज पोर्टल्स पाहिली तर तिथे हेल्थ, लाईफस्टाईल आणि रोमान्स या तीन वेगवेगळ्या स्तंभशीर्षकाखाली जे सॉफ्ट पॉर्न निलाजरेपणे छापले जाते त्यावरून हे सहज लक्षात येईल.

यात दुसरा धोका आहे तो दस्तऐवजीकरणाचा. आज इंटरनेटच्या जमान्यात दहा ठिकाणी ही बातमी छापली गेली आहे. भविष्यातले 'खरा इतिहास' शोधणारे गल्लीबोळातले गुगलपंडित इतिहाससंशोधक इतक्या ठिकाणी बातमी दिसते म्हणून त्याचा अजाणता वा हेतुतः वापर करून आपले इतिहासाला आपल्या सोयीने वळवण्याचे आपले काम 'समरसतेने' करत राहतील.

दोन महत्त्वाचे मुद्दे, पुराव्याशिवाय अशा बातम्या देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करता येत नाही का? दुसरे, तुम्ही आम्ही 'शाहीद कपूरच्या मुलीचे नाव काय ठेवले किंवा करीना कपूरला कुठले डोहाळे लागले' अशा बातम्या चवीने वाचण्याइतके खुजे नि विचाराने किडके आहोत तोवर माध्यमे हा प्रकार करत राहणारच आहे.

या विशिष्ट केसमधे बातमी सध्याच्या सत्ताधार्‍यांच्या सोयीची असल्याने त्याकडे - अनेकदा केला तसा - काणाडोळा केला जाईल हे उघड आहे. आपल्या देशातील समाजाची ओळख दिवसेंदिवस 'मला सोयीचे असत्य त्याला सत्य म्हणून मान्यता देणार्‍यांचा' अशी होते आहे. जात धर्मांवरच्या मारामार्‍या नि विच-हंटिंग तर नेहमीचेच.

दक्षिण पूर्व पुण्यातील, एकाच जमातीच्या चार टाळक्यांना एकत्र करून एक राजकीय पक्ष काढून स्वतःला 'राष्ट्रीय अध्यक्ष' वगैरे बिरुदे मिरवत फ्लेक्स लावणारा कुणी बाबा, त्याच्या फ्लेक्सवर झळकायला मिळाले म्हणून कृतकत्य होणारी नि त्याबद्दल आयुष्यात दादांसाठी कायप्पन म्हणत सतरंज्या उचलत धन्यता मानणारी मठ्ठ पोरटी, टीकेला उत्तर देण्यासाठी 'त्यांना सांगा की' आणि 'तेव्हा का नाही' हे दोन रामबाण हाती घेतलेले सारे निर्बुद्ध लोक गल्लीबोळात बार्गेनिंग पॉवर जमा करत आपला चार सेंटीमीटर स्वार्थ साधून घेताहेत नि वर राष्ट्रप्रेमाच्या पिचक्या डरकाळ्या फोडताहेत.

परक्या देशांकडे सतत 'एफडीआय वाढा वं माय' म्हणत हात पसरणारा, शेजार्‍याशी कचरा टाकण्यावरून भांडत बसणार्‍या माणसांचा हा देश महासत्ता होईल असे समजणारे निर्बुद्ध, मूर्ख आहेत नि आळशीही. त्या रम्य भूतकाळाच्या स्वप्नात नि रंगीत भविष्यकाळाच्या दिवास्वप्नात वर्तमानात त्यांना विचारहीन, सुखवस्तू जगायचे आहे.

संस्कृतीच्या बाता मारणारा हा देश १००% टक्के स्वार्थी आणि इहवादी आहे. कोण्या देवाच्या टाळक्यावर चार फुले वाहिल्यामुळे किंवा त्याच्या नावे सार्‍या समाजाला वेठीस धरणारे उत्सव साजरे करण्याने प्रगती होईल असे समजणारा बिनडोक समाज कधीच प्रगती करू शकत नसतो. आणि हे सांगणारे देशद्रोही असतात. 

जिथे अभ्यास करायचा तिथे विचार न करता रट्टे मारून पदव्या पदरी पाडून घेताना - आता तर विकतही सहज मिळतात - सोशल मीडियात मात्र अमक्याला 'घ्यायचाच' असे ठरवून त्याच्या पोस्ट, लेखनातून कीस पाडून गैरअर्थ काढून वाद घालणारे शूर मावळे फेसबुकवर असताना या देशाला वेगळ्या सैन्याची गरज काय? सोबतीला नुसत्या फोटोशॉपवर समाजसेवा नि बातम्या पसरवण्यावरच ज्यांचे कर्तृत्व सिद्ध होते करणारे असे सत्ताधारी झाल्याने आनंदीआनंद झाला आहे.

या देशातील माझ्यासकट सगळ्या निर्बुद्धांचा विजय असो.

- oOo -

बातमी: Army Denies 'Cross-border Surprise raid'.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा