मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

मराठी साहित्यातले नेहरु

राजकारण असो की साहित्यकारण, आपल्या नि आपल्या गटाची प्रगती व्हायची असेल त्याला एकसंघ ठेवायचा असेल, तर दुर्योधनाने जसा सतत पांडवांचा बागुलबुवा उभा करून आपल्या शंभरांची एकजूट राखली तसे एक बाह्य शत्रू, एक बाह्य विरोधक सतत जिवंत ठेवावा लागतो.ही शत्रूलक्ष्यी मांडणी आदिम माणूस जेव्हा टोळ्या करून राहात होता तेव्हापासून रक्तात भिनलेली आहे. माणसाला जसजशा प्रगतीच्या वाटा सापडत गेल्या तसतशी ही गरजही बदलत गेली असली तरी पुरी नष्ट झालेली नाही.

सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय असो की धार्मिक कोणत्याच क्षेत्रात, कुण्याही मोठ्या झालेल्या व्यक्तीला अथवा संघटनेला समाजाची जमीन राब घातल्यासारखी स्वच्छ नि बीजरोपणायोग्य अशी आयती मिळालेली नाही. जुन्या, प्रस्थापित व्यक्तींच्या आणि विचारव्यूहांच्या मर्यादा दाखवून देत असतानाच त्यांचे ऋण मनमोकळेपणे आणि डोळसपणे मान्य करून (हे महत्त्वाचे !) पुढे जाणे आवश्यक असते.

पण आपले स्थान निर्माण करू इच्छिणारे आणि तरीही आपल्या पूर्वसुरींचा साकल्याने नि साक्षेपाने विचार करून मूल्यमापन करण्याची कुवत असणारे आता जवळजवळ अस्तंगत झाले आहेत. तुम्ही एखाद्या नेत्याचे, लेखकाचे, विचारवंताचे नाव उच्चारताच समोरचा/ची एकदम तलवार तरी उभारतो, झेंडा तरी उभारतो किंवा एक कुत्सित हसू तरी फेकतो. या तीनच्या पलिकडच्या शक्यता आता जवळजवळ दिसून येत नाहीतच.

'आम्हाला समजलेले सत्यच काय ते वैश्विक' हा गंड केवळ धार्मिकांची मिरासदारी आहे असे मुळीच नाही, 'आम्हाला रुचते तेच श्रेष्ठ साहित्य' (आकलनाबाबत मी काहीही बोललेलो नाही याची कृपया नोंद घ्यावी) हा गंड घेऊन जगणार्‍या प्रसिद्ध नि अप्रसिद्ध अशा दोन्ही प्रकारच्या साहित्यिकांची वारुळे जागोजागी दिसतात. आपली नावड आणि लेखनाचे सर्वंकष सामान्यत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याचे भान भल्या-भल्या 'मराठी सारस्वताच्या सेवकां'ना नसते.

अगदी वस्तुनिष्ठ साहित्यिक मूल्यमापन म्हटले तरी ते निकषांच्या अधीन असते हे विसरता कामा नये. 'मराठी साहित्य हे निकस आहे कारण त्यात वैश्विक भान नाही.' असे कुण्या समीक्षकाचे वाक्य फेसबुकवर पोस्ट म्हणून कुणी लिहिले होते. मुळात हे भलतेच सबगोलंकार वाक्य आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ पुरेसे पुरावे नि तर्क दिल्याखेरीज त्याचा अर्थही स्पष्ट होणे अवघड आहे. पण ते असो. यावर 'वैश्विक भान असणे ही श्रेष्ठ लेखनासाठी किमान पात्रता आहे का?' असा प्रश्न मला पडला होता.

गंमत म्हणजे हे वाक्य फेकणारे बहुधा वंचित साहित्य हे वैश्विक असल्याचा समज बाळगून असतात. 'जगभराचे वंचित एकाच प्रकारचे असतात. त्यांच्या समस्या, त्यांचे जगणे एकाच मुशीतले असते' असा भाबडा समज असणार्‍या राजकीय व्यूहाची पोथी मिरवणार्‍यांचे सोडून द्या. त्यांना संघटन ही अपरिहार्यता असल्याने काही व्यावहारिक तडतोडी कराव्या लागतात. परंतु साहित्यिकांनीही अशा एकसाचीकरणाची, किंवा एक प्रकारच्या साहित्यिक एकेश्वरवादाची पुंगी वाजवावी हे अनाकलनीय आहे.

नेहरूंनी सामाजिक पातळीवर जसा जगण्याचे बहुपर्यायी आयाम, बहुसांस्कृतिकवाद मान्य केला. ते शहाणपण आमचा रथ सर्वसामान्यांपेक्षा वेळा आहे, तो जमिनीपासून चार अंगुळे वर चालतो असा समज करून घेत स्वतःला समाजाचे सांस्कृतिक, वैचारिक नेते मानत स्वतःसाठी सर्वंकष(!) अभिव्यक्ति-स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवणार्‍या साहित्यिकांनी मात्र केलेला दिसत नाही.

आम्ही समाजाचे नेते या गंडाची दुसरी बाजू म्हणजे 'सर्वसामान्यांना जे रुचते, उमजते ते सामान्य' हा उफराटा तर्क नि गंड. आपला गट अबाधित राखण्यासाठी जसा एक बाह्य शत्रू लागतो तसेच आपल्या गटाअंतर्गत आपले तथाकथित उच्च स्थान वगैरे निर्माण करण्यासाठी बहुसंख्येपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे. श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी फार कष्ट करावे लागतात नि त्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता आपल्या अंगी असेलच असेही नाही. आता यावर दोन सोपे उपाय आहेत.

पहिला म्हणजे बहुसंख्येला तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला काही कळत नाही हे सतत सांगत राहणे. यासाठी एखादा लेख, एखादा लेखक, एखादे पुस्तक, एखादा गायक, एखादा चित्रपट लोकप्रिय होऊ लागला की ताबडतोब तो कसा सामान्यच नव्हे तर वाईट आहे हे सर्वसामान्यांना सांगायला सुरुवात करणे. आपली समज काहीही असो, बहुसंख्येला ती नाही हे सतत सांगत राहावे. 

दुसरा सोपा उपाय म्हणजे अन्य श्रेष्ठ ठरलेल्या किंवा मानल्या जाणार्‍यांचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न करणे. अमुक एक माणूस चूक आहे असे सिद्ध करून दिले, की त्याच्या रिकाम्या केलेल्या देव्हार्‍यात सामान्य अज्ञ जन थेट आपल्यालाच जागा देतील- इतिहासाचा विचार करता रास्तपणे - हा उपाय त्याहून सोपा असतो. कर्तृत्वापेक्षा निंदा केव्हाही सोपी असते. तिला निर्मितीची अपरिहार्यता नसते, मूर्तिभंजनाच कौशल्य जमले की पुरते.

पुरेसा कलकलाट करता आला की साठ-पासष्ट वर्षे घडवलेला देश चार महिन्यात 'कचर्‍यात गेल्याचे' सिद्ध करता येते, नेहरुंचा वारसा नाकारता येतो. त्यांनीच निर्माण केलेल्या सुस्थिर देशातील व्यवस्थेवर आयता कब्जा करताना त्यांनी देश कचर्‍यात नेला हे निलाजरे दावेही करता येतात. नेहरूंच्या डोक्यावर पाय दिल्याखेरीज नव्या नेत्यांना आपले स्थान निर्माण करताच येत नाही, तितका आत्मविश्वास त्यांच्या मनात कधी निर्माणच होत नाही हे उघड दिसते आहे.

PLAndNehru

मराठी साहित्यात सध्या हाच 'मान' पुलंचा आहे. आज 'पुलंनी वाचकांची अभिरुची बिघडवली.' हे परवलीचे वाक्य म्हटल्याखेरीज नव्या साहित्यिक वारकर्‍यांच्या दिंडीत प्रवेशच मिळत नाही. त्यांच्या डोक्यावर पाय दिल्याखेरीज साहित्यिक क्षेत्रात आपल्याला मान मिळणार नाही, असा काहीसा समज नवलेखकांचा होताना दिसतो आहे.

सामाजिक जाणीवेचे लेखन, किंवा अगम्य घाटाचे लेखन किंवा कुण्या फलाण्या परदेशी लेखकाचे लेखन ते तसे आहे म्हणूनच श्रेष्ठ आणि 'मध्यमवर्गीय जाणिवां'चे लेखन व्याख्येनुसारच कमअस्सल, असे एकतर्फी निकाल देत लोक पुढे जाताना दिसतात.

जसे वाचक खांडेकर, फडके, अत्रे, पुलं या मार्गाने पुढे येताना आता अनेक वाटांनी विखुरले तसे वाचकांची अभिरुची विस्तारली, त्यांच्यासमोर अनेक पर्याय निर्माण झाले. आपल्या इच्छेनुसार, कुवतीनुसार, आवडीनुसार निवड करताना अन्य पर्यायांना मुळातच कमअस्सल ठरवण्याची गरज नाही याचे भान मात्र अजून लेखकांना आलेले नाही तिथे वाचकांना कुठून येणार.

खांडेकरांच्या कादंबर्‍यांतून दिसणारा - नाक वरुन चालणार्‍यांना बेगडी वाटणारा - देशप्रेमी, त्यागी वगैरे स्वरूपाचा नायक, फडकेंच्या कादंबर्‍यांतून रोमँटिक वगैरे झाला. देशात जन्माला आलेली नोकरशाही, औद्योगिकरणाने झालेले नागरीकरण, त्यातून एकाच वेळी निर्माण झालेले मध्यमवर्गीय आणि कामगार समाज.आणि या दोन्हींना सामावून घेणारी शहरे, त्यातून उभे राहणारे जगणे यातील अनेक पैलूंचा पुलंसारख्या माणसाने बहुधा नर्मविनोदी शैलीत वेध घेतला. कधी टोपी उडवली, कधी वैगुण्यावर बोट ठेवले, कधी त्यातील वरवरच्या संघर्षातही मुळी घट्ट असलेल्या नात्यांची वीण उलगडून दाखवली.

साहित्य, संगीत, कला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोरकरांपासून आरती प्रभूंपर्यंत, वसंतखाँपासून मन्सूरअण्णांपर्यंत अनेक 'उत्तम गुणांची मंडळी' जोडत गेलेला हा माणूस पुढच्या अनेक पिढांतील संभाव्य गुणवत्तेलाही हात देत गेला.

प्रत्येक व्यक्तीच्या आकलनाचे एक वर्तुळ असते. तसेच त्यांचेही होते. पण 'ते वर्तुळ दुय्यम नि आमचे हे वर्तुळ श्रेष्ठ' हे विधान पुराव्याशिवाय केले तर अदखलपात्र असते. केवळ त्यांचा झेंडा तपकिरी रंगाचा नि आमचा चॉकलेटी रंगाचा म्हणून आम्ही श्रेष्ठ हे विधान जितके हास्यास्पद तितकेच. कारण आधी चॉकलेटी रंग श्रेष्ठ का याची मीमांसा द्यावी लागते, त्यासाठी निकष द्यावे लागतात आणि सर्वात महत्त्वाचे मुळातच त्याला श्रेष्ठ ठरवता येईल अशा पक्षपाती निकषांना कटाक्षाने दूर ठेवावे लागते.

अर्थात 'डोक्यावर पाय देऊन' वर चढण्याची इच्छा असणार्‍यांना एवढे कष्ट घ्यायचे नसतात. 'पासष्ट वर्षात देश कचर्‍यात गेला' किंवा 'पुलंनी मराठी वाचकाची अभिरुची बिघडवली.' ही विधाने बिनदिक्कतपणे करून पुढे जायचे असते.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा