मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

मन मनास उमगत नाही

हल्लीचे कवी पुरेसे पावरबाज नाहीत असे आमचे मत आहे. पूर्वीचे कवी पहा कसे आपल्या कवितेला आंजारत गोंजारत असत, ती कुठे भेटली (उदा. ब्रायटन, १९३६, संध्याकाळ) वगैरे नोंदवून ठेवून तिला जोजवत असत. वर अवघड शब्दांसाठी टीपा देऊन वाचकाला ती कविता समजून घेण्यासाठी मदत करत. (हल्ली आमची कविता तुम्हाला समजली नाही तर ती ग्रेट नि आम्ही ग्रेट असे समजतात म्हणे कवी. त्यातून कवीला स्वतःलाही ती समजली नाही तर मग थेट साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठाच्या दर्जाचा होतो तो कवी. पण ते असो.) तेव्हा आमच्या पुनुरुज्जीवनवादी (शब्द-श्रेयः साथी राहुल बनसोडे) भूमिकेला अनुसरून आम्ही जुन्या कवींच्या परंपरेला उजाळा देत आहोत.
---
मन(१) मनास(२) उमगत नाही
आधार(३) कसा शोधावा !
रोकडा मम घामाचा
हातास कसा लागावा ?
मन नोटांचे आकाश
भाटांनी सावरलेले
मन आक्षेपांचे रान
भवताली अवघडलेले
मन गरगरते मस्तिष्क
मन रानभूल(४), मन चकवा(५)
मन काळोखाची गुंफा
मन माझेच(६) राऊळ
मन सैतानाचा(७) हात
मन अडखळते पाऊल
दुबळ्या मडक्या डोकीत
हा अर्थ कसा पेरावा?
चेहरा-मोहरा ह्याचा
दिसभरी समोरी राही(८)
धनि धूसरतेचा तरीही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नेत्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?

- अधीर पोरे
(१६ मे २०१४, निवडणूक आयोगाच्या मुख्यालयासमोरील चहाची टपरी)

टीपा: १. मन की बात' मधले मन २. तुमचे-आमचे मन ३. आधार कार्ड, ४. अर्थशास्त्रीय रानभूल ५. निरंतर अवस्था ६. माझेच म्हणजे फक्त माझेच ७.'रिकामे मन सैतानाचे डोके' म्हणतात त्या म्हणीनुसार...उगाच भलत्या कुणाचा समजू नका. ८. काय हे हे सोपंय की, सगळ्यालाच कशा टीपा हव्यात.
---
स्वतःला कवी म्हणवणार्‍या कुण्या सुधीर मोघे नामक महाभागाने आमच्या या कवितेचे केलेले विडंबन खाली पहा/ऐका:

http://www.aathavanitli-gani.com/Song/Man_Manas_Umagat_Nahi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा