शनिवार, २८ जानेवारी, २०१७

वेचित चाललो: युगान्त

आपल्या अभिमानाची स्थाने भूतकाळात शोधणार्‍या भारतासारख्या देशात, इतिहासाच्या आधारे केलेले लेखन हे साहित्य क्षेत्रात वाचकांतील लोकप्रियतेबाबत संख्यात्मक निकषावर वादातीतपणे पहिल्या क्रमांकावर आहे. याचा सुकाळ इतका वाढला आहे की हळूहळू इतिहासाच्या आधारे केलेले ललित लेखन आणि इतिहासावरचे लेखन यातील सीमारेषा पुसट होऊ लागल्या आहेत. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीच्या चरित्राआधारे लिहिलेल्या कादंबर्‍यांची लाट तर आज तीस पस्तीस वर्षांनंतरही ओसरायचे नाव घेत नाही. आणि असे लेखन करणारे लेखकच काय पण नाटकासारख्या सादरीकरणात त्या त्या व्यक्तिरेखेला साकार करणारे नटही इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून मिरवू लागले आहेत. त्यातच माध्यम उपलब्धतेचा स्फोट झाल्यावर तर त्यांच्याकडून इतिहासतज्ज्ञांना 'मागणी' वाढू लागली आहे. परिणामी गल्लोगल्ली इतिहासतज्ज्ञ दिसू लागले आहेत.
याचवेळी इतिहासातील व्यक्तिरेखांमधे आपले आदर्श शोधणारे गट आणि म्हणून दुसर्‍या बाजूने त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या त्या आदर्शांवर हल्ले करणार्‍या मनःपूत चारित्र्यहननात्मक लेखन करणार्‍या स्वयंघोषित इतिहासकारांची संख्या भूमितीश्रेणीने वाढू लागली आहे. यापूर्वी भौतिक/भौगोलिक वर्चस्वासाठी लढाया झाल्या, वंशश्रेष्ठत्वासाठी युद्धे झाली, भविष्यात अन्न आणि पाण्यासारख्या मूलभूत साधनसामुग्रींसाठी युद्धे होतील असे भाकित काही राजकीय-सामाजिक तज्ज्ञ वर्तवू लागले होते. पण यांनाही मागे सारत कदाचित इतिहासातील व्यक्तिरेखांबाबत, त्यांतील परस्परांच्या आदर्शांबाबत नि त्याबाबत वेगाने विकसित होऊ लागलेल्या मतभेदांवरही युद्धे होऊ शकतात असे कुणी म्हटले तर ती शक्यता अजिबात अतिशयोक्तीची म्हणता येणार नाही. कारण गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत इतिहासातील घटना, व्यक्ती यांच्या संदर्भात झालेल्या हिंसाचारांची प्रकरणे दरवर्षी वाढतच जाताना दिसत आहेत.
इतके सारे लोक इतिहासाबाबत बोलत, लिहीत असताना इतिहासाच्या अभ्यासाच्या निश्चित दृष्टीकोनाचा अभाव मात्र दिवसेंदिवस अधिकच भयावह रितीने विस्तारताना दिसतो आहे. बहुतेक लेखन हे विशिष्ट हेतूने, अनेकदा एखाद्या व्यक्ती अथवा समाजगटाच्या उदात्तीकरणाच्या किंवा चारित्र्यहननाच्या दृष्टीने केले जात असल्याने एका मर्यादित वर्तुळात त्याला आंधळे समर्थन, तर दुसर्‍या वर्तुळात एक शब्दही न वाचता नकार, अशा स्थितीत आपण येऊन पोहोचलो आहोत. अशा वेळी इतिहासाच्या अभ्यासाचे दृष्टीकोन विकसित करणे, मुळात अभ्यास-विषयाचा अपेक्षित निष्कर्षापेक्षा शंका, प्रश्न, जिज्ञासा यांच्या आधारे वेध घेणे; एखाद्या प्रश्नाच्या निर्णायक उत्तरासाठी पुरेसा पुरावा, तर्कसंगती मिळू शकली नाही तर तो अनुत्तरित ठेवण्याचा प्रामाणिकपणा स्वीकारणे हे दुर्मिळ झाले आहे. इतिहास हे अस्मिता आणि विद्रोहाचे हत्यार होऊन बसले असताना अशा खुल्या मनाने इतिहासाकडे बघणे, काढलेले निष्कर्ष हे चूक असू शकतात ही शक्यता मान्य करत ते मांडणे, हे लेखकाच्या अस्थिर मनाचे, 'निश्चित भूमिका घेण्यास घाबरत असल्याचे' किंवा दुटप्पीपणाचे निदर्शक असल्याचा आरोप गल्लीबोळातली अर्ध्या चड्डीतली मुलेही सहजपणे करताना दिसतात.
जगात निश्चित विधान फार क्वचित करता येते, एरवी समोर असतात त्या केवळ शक्यता आणि इतिहास लेखक तुमच्यासमोर मांडतो ती त्याच्या दृष्टीने अधिक संभाव्य अशी शक्यता असते, ही समज आता अस्तंगत झाली आहे. या दृष्टीने इथे निवडलेला वेचा - ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी - अभ्यासनीय आहे.
इरावती कर्वे या मराठी वाचकांना जरी लेखिका म्हणून ठाऊक असल्या तरी त्यांची मूळची ओळख ही समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ ही आहे. त्या शास्त्राच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली शास्त्रीय आणि तार्किक बैठक त्यांच्याकडे असल्याने त्यांनी इतिहासाकडेही या दोन्ही आयुधांच्या साहाय्याने पाहिले आहे. युगान्त हे पुस्तक त्यांच्या लेखिका म्हणून असलेल्या कारकीर्दीतील शिखर मानले जाते.


('युगान्त' या पुस्तकातील एक वेचा 'वेचित चाललो' वर:  http://vechitchaalalo.blogspot.in/2017/01/Yugant.html)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा