गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

वेचित चाललो: 'एक होता कार्व्हर'

'एका अर्वाचीन मराठी पुस्तकाची चाळीसावी(!) आवृत्ती मला परवा मिळाली.'
हे विधान ऐकून बहुतेक वाचक दचकतील. चटकन तुकोबाची गाथा अथवा तत्सम अध्यात्मिक किंवा सुलभ कामसूत्र या दोन टोकांपैकी एखाद्या प्रकारचे पुस्तक असेल असा तर्क करून बहुतेक जण मोकळे होतील. पण मी चटकन 'अर्वाचीन' या शब्दाचा वापर केला आहे हे निदर्शनास आणून देईन. हे पाहून बहुतेकांचा तर्क एखाद्या सेल्फ हेल्प प्रकारच्या पुस्तकाच्या अनुवादाकडे किंवा ’१००१ पाकक्रिया’ सदृश पुस्तकाकडे जाईल. पण हे दोन्ही तर्क चुकले आहेत असे मला सांगावे लागेल. अगदी अभ्यासक्रमाची पुस्तकेदेखील ठराविक काळानंतर बदलत असल्याने त्यांचे पुनर्मुद्रण देखील चाळीस वेळा होत नसावे. गुगल न करता तर्क करून पाहणाया बहुसंख्येला हे पुस्तक ओळखता येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. काही जणांचा तर्क इतस्ततः धावून आला असेल. अगदी एक दोघांनीच कदाचित पुस्तक कोणते याचा तर्क केला असेल.
वाईट म्हणा, चांगली म्हणा मला एक खोड आहे. वाचत असताना पुस्तकातील काही उतार्‍यांवर मी खुणा करून ठेवतो. पुढे मागे संदर्भ म्हणून वापरायचे तर उपयोगात येते. या अधोरेखित करण्याचा आणखी एक फायदा असा की काही काळानंतर आपण जेव्हा ते पुस्तक पुन्हा हाती घेतो तेव्हा त्या अधोरेखितांबाबत आपली आजची भावना, आजचे मत काय हे अजमावून पाहताना मजा येते. बरेचदा असं होतं की तेव्हा महत्त्वाचा वाटलेला मजकूर आज तितका महत्त्वाचा, तितका अर्थपूर्ण वा भावपूर्ण किंवा लेखकाबद्दल प्रभावित करणारा वाटत नाही. कधी कधी तर तो मजकूर चक्क हास्यास्पद वाटतो, नि तेव्हा आपण याला अधोरेखित करावे असे आपल्याला काय दिसले होते याचे कोडे पडते. वर ज्या पुस्तकाच्या चाळीसाव्या आवृत्तीबाबत मी वर उल्लेख केला आहे त्याची दुसरी आवृत्ती - वीस-बावीस वर्षांपूर्वीची - माझ्याकडे अजून आहे. ते पुस्तक वाचताना अधोरेखित केलेला मजकूर मी आज जेव्हा वाचतो तेव्हा मला असं जाणवतं की तो मजकूर आजही मला समर्पक, कालसुसंगत वाटतो, तितकाच महत्त्वाचा वाटतो.
या बाबाची ही 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' संपून हा आपल्या नियत द्रोणागिरीवर कधी टेकणार असा प्रश्न एव्हाना तुमच्या मनात नक्की उमटला असेल. पण थांबा. मला अजून एक शेपूट लावायचे आहे.
तुम्ही जर महाविद्यालयीन किंवा त्याहून मोठ्या वयाचे असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारून पहा. 'एखाद्या शास्त्रज्ञाचे चरित्र वाचून आपल्याला किती महिने/वर्षे झाली?' माझी खात्री आहे की उत्तर महिन्यांमधे नव्हे, वर्षांमधे असेल. याचे सोपे कारण म्हणजे शास्त्रज्ञांची चरित्रे ही बाळबोध लिहायची आणि शाळेतील मुलांना मोटिवेट किंवा प्रोत्साहित करण्यासाठी द्यायची असतात असा आपला समज असतो. शाळा संपली की शास्त्रज्ञांच्या जिज्ञासू वृत्तीचा आपला संबंध संपतो. आईबापांनी एव्हाना "कर्मदरिद्री शास्त्रज्ञ वगैरे होण्यापेक्षा खणखण पैसे वाजवून घेणारा एंजिनियर, डॉक्टर किंवा अलीकडची चूष म्हणजे एमबीए होणे कसे 'डिमांडमधे' आहे." हे आपल्या बबड्या किंवा बबडीला पटवून दिलेले असते आणि हिंदी चित्रपटांतून आपले आदर्श शोधणार्‍या बबड्या/बबडींनी ते खळखळ न करता मान्य केलेले असते. अगदी शाळकरी पोराचे आईबाप देखील 'आमच्या बबड्याचे गीतेचे दोन अध्याय पाठ आहेत.' हे जितक्या आवर्जून आणि कौतुकाने सांगतात, त्याच्या शतांश प्रमाणातही आपल्या पोराने वाचलेल्या शास्त्रज्ञांबाबत बोलत नाहीत. विज्ञानविषयक पुस्तकांबाबत अथवा वैज्ञानिकांच्या चरित्राबद्दल बोलत नाहीत. देशातील भावी पिढीला 'घडवण्याचा' आपला हा दृष्टीकोन पाहता हा देश ज्ञान आणि भौतिक गरजा याबाबत कायमच परावलंबी का आहे याचे आश्चर्य वाटेनासे होते.
आता शास्त्रज्ञ म्हटल्यावर पुस्तक कोणते याबाबत अचूक तर्क करणार्‍यांची संख्या नक्की वाढली असेल. कारण गेल्या सुमारे तीस वर्षांत - आजच्या वेगवान युगात पाच वर्षांची एक पिढी असे मानले जात असल्याने - सहा पिढ्यांपैकी बहुतेक वाचकांनी हे पुस्तक वाचले असेल किंवा त्याबाबत नक्की ऐकले असेल. मी 'एक होता कार्व्हर' या पुस्तकाबद्दल बोलतो आहे. एका आईने आपल्या मुलाला झोपण्यापूर्वी गोष्ट सांगताना 'जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' या शास्त्रज्ञाची गोष्ट सांगितली. त्या गोष्टीचा त्या आईच्या दोनही मुलांवर इतका खोल परिणाम झाला की ती गोष्ट पुस्तक रुपाने इतर मुलांपर्यंत पोचवावी असा आग्रहच त्यांनी धरला आणि त्यातून साकारलं हे अद्वितीय पुस्तक.
'शास्त्रज्ञाचे चरित्र' या शीर्षकाखाली येणारे पुस्तक नीरस, भावहीन आणि मख्ख तपशीलाने भरलेले असते, मुलांना त्या व्यक्ती आणि त्याच्या विषयात अजिबात रस निर्माण होऊ नये याच उद्देशाने लिहिल्यासारखे असते. 'एक होता...' या नियमाला सणसणीत अपवाद आहे याचे कारण ते कोण्या पोटार्थी, किंवा मोले घातले लिहाया' लेखकाने लिहिलेले नाही, एका आईने आपल्या मुलांना सांगितलेली 'गोष्ट' आहे ही. त्यामुळे त्यातील भाषा प्रवाही आणि प्रासादिक आहे, मुलांना गुंगवून ठेवणारी आहे. कार्व्हर यांच्या संशोधन तपशीलासोबत निव्वळ त्यांचे आईवडील कोण, त्यांचे घराणे वगैरे पारंपरिक मार्गाने न जाता, त्यांच्या जन्मापाशी असलेल्या विदारक सामाजिक परिस्थितीसह त्यांच्या पुढील वाटचालीशी निगडित अशा अनेक सामाजिक तपशीलांसह ते उभे आहे. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ झाल्यानंतरही त्यांना सहन करावे लागणारे वर्णभेदाचे चटके त्यांच्याप्रती सहानुभूती निर्माण करण्यासाठी नव्हे तर त्यांनी त्या परिस्थितीत 'विरोधाशिवाय केलेल्या विद्रोहा'ला सहज सोप्या भाषेत समोर ठेवणारे आहे. (आपल्या देशातील पुरोगामी म्हणवणार्‍यांनी आणि स्वतःला वंचितांचा प्रतिनिधी समजणार्‍यांनी त्याच्या अप्रोचचा अभ्यास करायला हवा असे मला राहून राहून वाटत आले आहे.) आणि म्हणूनच हे पुस्तक ज्यांनी वाचायला हवे असा वयोगट 'वाचता येऊ लागल्यापासून मरेपर्यंत केव्हाही.' असाच मी गृहित धरतो.
या पुस्तकातून निवडलेला आजचा वेचा हा खुद्द कार्व्हर यांच्याबद्दल नाही! तो आहे त्यांची सामाजिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची पार्श्वभूमी विशद करणारा. यातले लहान लहान भू-राजकीय तपशील त्यांच्या समोरील आव्हानांचे स्वरूप उभे करतात. यातील सामाजिक भवताल आणि वारसा यांची तुलना भारतातील वंचित वर्गाच्या वाटचालीशीही करून पाहता येईल.
(निवडलेला वेचा बराच मोठा असल्याने विषयाचा हेतू ध्यानात ठेवून हेतूशी सुसंगत नसलेला काही ठिकाणचा तपशील वगळला आहे. वगळलेल्या मजकुराची जागा '...' या चिन्हाने दर्शवली आहे.)


('एक होता कार्व्हर'  या पुस्तकातील एक वेचा 'वेचित चाललो' वर:  http://vechitchaalalo.blogspot.in/2017/02/Carver.html)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा