वेचित चाललो...

वेचित चाललो’ ही विविध प्रकारच्या लेखनातील लक्षणीय वेच्यांची संचयनी आता नव्या देखण्या रूपात, शोधासाठी सोयीच्या विविध अनुक्रमणिकांसह

बुधवार, २९ मार्च, २०१७

वेचित चाललो: तुघलक

'महंमद बिन तुघलक' हे नाव ऐकले की मूठभर भारतीय वगळले (या अपवादांची बांधिलकीही वैचारिक असण्यापेक्षा धार्मिक असण्याची शक्यताच अधिक आहे.) तर बहुतेकांच्या चेहर्‍यावर एक कुत्सित हास्य उमटेल. 'तुघलकी निर्णय' असा वाक्प्रचार वापरला जातो तो प्रामुख्याने माथेफिरूपणे, सारासार किंवा साधकबाधक विचार न करता, संभाव्य परिणामांचा अंदाज न घेतलेल्या निर्णयाबद्दल. आणि याला संदर्भ असतो तो तुघलकाने आपल्या सुलतानी कारकीर्दीत घेतलेल्या दोन निर्णयांचा. पहिला म्हणजे आपल्या राज्याची राजधानी ही दिल्लीहून देवगिरी (त्याचे दौलताबाद असे नामकरण करून) येथे आणणे आणि चामड्याची नाणी सुरू करण्याचा दुसरा! दोनही निर्णय साफ फसले हे त्याच्या आयुष्यातच त्याच्या ध्यानी आले आणि त्याने सरळ ते मान्य करून त्या दोनही चुका, भरपूर किंमत देऊन, दुरुस्तही केल्या. 
.
परंतु तब्बल पंचवीस-सव्वीस वर्षे सुलतान असलेल्या या तुर्की शासकाची एवढीच ओळख आपल्यासमोर येते. आजच्या बलुचिस्तानचा आणि 'खैबर-पख्तुनवा'चा थोडा भाग वगळून सारा पाकिस्तान, दक्षिणेला केरळ तसंच तमिळनाडूचा अगदी थोडा भाग आणि उडिशा, झारखंड, छत्तीसगड वगळता सारा भारत - बांग्लादेशासह! - इतक्या विस्तीर्ण साम्राज्याचा हा सुलतान! शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांतूनही मुघल साम्राज्याचा इतिहास तपशीलाने शिकत असताना भारतातील या तुर्की साम्राज्याबाबत मात्र अगदीच त्रोटक माहिती दिलेली दिसते. 

हा व्यक्ती म्हणून कसा होता, त्याच्यासमोरची आव्हाने कशी होती, त्याने घेतलेल्या या 'तुघलकी' निर्णयांमागची कारणमीमांसा काय होती, ते का फसले याचे विश्लेषण त्याने केले इतपत भानावर असलेला सुलतान जर तो असेल तर त्याची निर्णयपद्धती कशी होती असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कारण 'एक मुस्लिम शासक म्हणजे क्रूरकर्मा, या हिंदू देशाला मुस्लिम करून सोडण्यासाठीच आलेला, त्याच्यात काय गुण असणार?' असे 'संस्कार' आपल्यावर पहिल्यापासून असतात. वस्तुनिष्ठता, चिकित्सा हे गुण या देशात कवडीमोलाचेच असतात. आजचे जग हे ’पोस्ट-ट्रूथ'चे आहे असे ट्रम्प-विजयानंतर अमेरिकेत बोलले जाऊ लागले आहे. भारत मात्र सदैव पोस्ट-ट्रूथच्याच जगातच होता आणि भविष्यातही राहणार आहे. त्यामुळे इथे 'गिव एव्हरी डेविल हिज ड्यू' हे वाक्य फक्त सुभाषितच असते, जे अर्थातच अंमलात आणायचे नसते, 'आपल्या धारणा, पूर्वग्रह, भावना नि अस्मितांच्या चष्म्यातूनच जग पहायचे असते' ही बाळगुटी प्रत्येक भारतीय बाळाला त्याच्या आईबापांनी पाजलेली असते, मोठेपणीही पाजतच राहतात.
.
तुघलकाने हे जे दोन निर्णय घेतले ते खरंच एक काहीतरी वेगळे करण्याची लहर म्हणून (तसं असेल तर तुघलक आजच्या भारताचा शासक म्हणूनही शोभला असता असं वाटून जातं. काहीतरी वेगळं केलं की ते व्याख्येनुसारच योग्य नि फलदायी असतं असा ठाम विश्वास आजही बर्‍याच भारतीयांमधे रुजलेला दिसतो.) की त्यामागे काही विचार होता? दिल्ली ही राजधानी म्हणून त्याला का अयोग्य किंवा गैरसोयीची वाटत होती? दिल्ली त्याच्या साम्राज्याच्या सीमेजवळ तर देवगिरी ही मध्यवर्ती हा भौगोलिक फायदा तर होता. पण त्यापलीकडे आणखी काही विचार होता का जेणेकरून त्याने साम्राज्यातील अनेक व्यक्ती आणि संस्थांसह उचलून दक्षिणेत आणण्याचा खटाटोप करावासा वाटला? त्याला सोने आणि चांदी सोडून चामड्याची नाणी का पाडावीशी वाटली? आज आपण वापरतो त्या चलनाचा कागद तर त्या चामड्यापेक्षाही कवडीमोलाचा असतो हे ध्यानात घेतले तर त्याची ही कृती अगदीच मूर्खपणाची म्हणता येणार नाही. मग चामड्याचे चलन आणण्याचा त्याचा प्रयत्न का फसला? बरं त्याकाळीच काय आजतागायत कुण्याही शासकाने केली नसेल अशी आपली चूक मान्य करून ती सुधारण्याची दुर्मिळ कृती करण्याचे धैर्य नि प्रामाणिकपणा त्याच्यात असेल तर असा शासक 'वेडा महंमद' म्हणून हिणवून सोडून देता येईल का? आज केवळ अस्मिता-विद्रोहाचे साधन म्हणूनच उरलेला इतिहास खरंच समजून घ्यायचा असेल त्याला हे प्रश्न निश्चितच पडायला हवेत. याच प्रश्नांच्या अनुषंगाने कार्नाडांचा तुघलक उभा आहे.
.
तुघलक हे कार्नाडांचे पात्र काळ्या-पांढर्‍या रंगाचे अक्षरशः एकजीव मिश्रण म्हणावे इतके करडे आहे. केवळ भूभाग जिंकणे नि राज्य करणे एवढाच त्याचा उद्देश नव्हता. त्या पलीकडे जाऊन जनतेच्या हिताचा 'विचार' तो करत होता. यात निव्वळ वारशाने मिळालेल्या संस्कार-विचारांपलीकडच्या, (त्याच्या) परंपरेने स्पर्धकच नव्हे तर 'काफिर' मानलेल्या विचारधारांचाही अभ्यास तो करत होता. भिन्न उपासनापद्धती असलेल्यांच्या सहजीवनाबद्दल त्याच्याकडे ठोस उपाय नसले तरी त्या दृष्टीने त्याची धडपड होती. असे असूनही एक सुलतान म्हणून इतिहासात अमर होण्याची त्याची महत्वाकांक्षाही धारदार होती. एकीकडे राज्याकडे दुर्लक्ष होऊ नये या हेतूने अन्य सर्व बंधनापासून मुक्त राहण्याच्या उद्देशाने अविवाहित राहून केवळ राज्यकारभाराकडे लक्ष केंद्रित करत असतानाच आपल्या वैचारिक आणि लष्करी विरोधकांना दडपून टाकण्यासाठी आवश्यक ते निष्ठुर उपाय योजायला तो कमी करत नसे. थोडक्यात मॅकियावेलीच्या व्याख्येनुसार तो एक आदर्श राजा होता. 
.
एका बाजूने त्याने प्रत्येक पाक मुस्लिमाने पाच वेळा नमाज पढलीच पाहिजे अशी सक्ती केली होती, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास नोकर नेमले होते तर दुसरीकडे हिंदूंनी जिझिया कर देऊ नये असा आदेश काढला होता. 'तू हिंदू असलास तरी माणूसच आहेस' असे म्हणणारा मुस्लिम सुलतान अनेक मुस्लिमांना पसंत नव्हताच. त्यातच न्यायव्यवस्था ही इतकी स्वतंत्र असली पाहिजे की खुद्द सुलतानाविरुद्ध तिथे दाद मागता आली पाहिजे असा त्याचा दावा होता. कुण्या विष्णूप्रसादची जमीन सुलतानांनी अन्यायकारकरित्या ताब्यात घेतल्याबद्दल त्याला जमीनीसह पाच हजार दिनार दंड सुलतानांनी द्यावा असा निर्णय त्याने नेमलेल्या काझीनेच दिला होता. सुलतानाचे विरोधक अर्थातच हा सुलतानांनी आपली सहिष्णुता जनतेच्या मनात ठसवण्यासाठी घडवून आणलेला बनाव आहे असा दावा करत होतो. पुढे त्याच्या विरोधात सच्च्या मुस्लिमांनी बंड करावे अशी चिथावणी देणार्‍या इमामुद्दिन या अवलियाचे ते बंड त्याने त्याचीच विश्वासार्हता संपुष्टात आणून कसे मोडले याचा किस्सा पाहता ही शक्यता म्हणून नाकारता येत नाहीच. 

त्याचे व्यक्तिमत्व अशा विरोधाभासाने भरलेले आहे. तो सहृदयी आहे, तो कठोर आहे, त्याचे आपल्या सावत्र आईवर सख्ख्या आईपेक्षाही अधिक प्रेम आहे. पण तीच आई आपल्याविरुद्ध कट करते आहे हे तात्काळ समजावे इतपत बारीक लक्ष तिच्या हालचालीवर ठेवून आहे, तसे सिद्ध होताच तो तिला क्षमा न करता निष्ठुरपणे शिक्षा देतो आहे. तीच गत त्याच्या बालमित्राचीही होते आहे. सच्च्या मुस्लिमांना 'जिहाद' ची हाक देऊन त्याच्या विरोधात बंड करणार्‍यांना तो हिंदू एकनिष्ठ सैनिकांच्या सहाय्याने नामोहरम करतो, त्याचवेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा देखावा करत वास्तवात तो हिंदू दुय्यम नागरिक असल्याची त्यांची जाणीव जिवंत ठेवतो आहे.
.
या नाटकातला खाली निवडलेला प्रवेश त्याचे अंतर्विरोधांनी भरलेले व्यक्तिमत्व पुरेपूर समोर आणणारा. ज्याच्या मनात तुघलकाबद्दल काही पूर्वग्रह नाहीत (हे त्याचा धर्म आणि त्याच्याबद्दल प्रचलित धारणा यामुळे जवळजवळ अशक्यच दिसते) त्याला यात तुघलकाचे व्यामिश्र व्यक्तिमत्व दिसेल. ज्याला ते एकरंगी दिसेल त्याने आपण बव्हंशी एकांगी विचाराचे आहोत हे समजून चालावे. यात तुघलक दिसतो तो धूर्त, सावध राजकारणी. आपल्या विरोधात धर्माच्या नावावर लोकांना चिथावणार्‍या इमामुद्दिनचे आव्हान पेलणारा, नव्हे त्या आव्हानाला आपल्याच फायद्यासाठी वळवून घेण्याइतका पाताळयंत्री. इमामुद्दिनच्या मागे धर्माच्या नावाचे पाठबळ आहे, तेव्हा त्याच्या बाबतीत दंडात्मक कारवाई करण्याने उलट तो अधिकच मोठा होत जाईल हे त्याने पुरेपूर ओळखले आहे. आपल्या विरोधात भाषणे करणार्‍याचे भाषण स्वतःच आयोजित करून तो भावनिक आणि चंचल बुद्धीच्या जनतेच्या मनात त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करून त्याची विश्वासार्हता डळमळीत करण्याचा डाव तो खेळतो. सुदैवाने त्याने टाकलेला हा फासा त्याला अनुकूल पडतो, निदान तो तसा पडला हे इमामुद्दिनच्या मनावर ठसवण्यात तो यशस्वी होतो. 
.
दिल्लीचे लोक या भाषणाला येऊ नयेत म्हणून त्याचे सैनिक सर्वांना धमकावत होते असा आरोप त्याचे विरोधक पुढे करतात. तेव्हा भाषण आयोजित करणे हा कानपूर गाजवून आलेल्या इमामुद्दिनला 'दिल्लीत तुला काही किंमत नाही' हे अप्रत्यक्षपणे सांगून त्याचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी केलेला बनावही असू शकतो... 'असू शकतो' असेच आपण म्हणू शकतो. कारण या संवादात इमामुद्दिन जे आरोप करतो त्यातही तथ्य दिसते, तर खुद्द तुघलकाचे संभाषण विश्वासार्ह, सच्चे, प्रामाणिक भासते. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांच्या झडीमध्ये विरोधकांचे आरोप खरे किं तुघलकाची राज्याप्रती दिसणारी कळकळ खरी यात आपण गुदमरून जातो. एका बाजूने इमामुद्दिनच्या पाठीशी केवळ धर्माचे पाठबळ आहे पण त्याच्याकडे राज्यासंबंधी कोणतीही ठोस योजना नाही. एकप्रकारे आहे ती व्यवस्था उधळून देणे इतकेच त्याचे मर्यादित उद्दिष्ट आहे. कुठल्यातरी पुस्तकात जगण्याच्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे आहेत असे समजणारा खुजा जीव आहे तो. त्याची धर्माप्रती निष्ठा अतूट आहे आणि म्हणून त्याला बाध आणणारे तुघलकाचे वर्तन नि निर्णय निषेधयोग्य असून तो सुलतान असला तरी त्याच्या विरोधात बोलले पाहिजे इतका निर्भय तो आहे. पण दुसर्‍या बाजूने या निर्भयतेला राजकारणाच्या समजुतीची जोड मात्र नाही. म्हणूनच तुघलक धूर्त कोळ्याप्रमाणे त्याच्याभोवती फास आवळत जाताना दिसतो. सत्ता टिकवायची तर धर्माला नाकारता येणार नाही हे तुघलकाला पुरेपूर ठाऊक आहे. पण तरीही त्याच्या राज्यव्यवस्थेच्या व्हिजनमधे धर्माला स्थान नाही. पण हे जाहीर मान्य न करण्याचे भान तो राखतो आहे. जसे इमामुद्दिनला आपल्या धर्माच्या श्रेष्ठ व्यवस्थेबाबत अभंग अशी खात्री आहे तशीच तुघलकाला त्याच्या सर्वसमावेशक राज्याबद्दल. दोघांमधील दिसण्याचे साम्य हा मुद्दा कार्नाडांनी वापरला आहेच तो या साम्याला सूचित करण्यासाठीच असावा. 
.
पण या दोघांत एक महत्त्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे इमामुद्दिन पुरेसा धूर्त नाही. आपल्या भाषण कौशल्याने त्याने जनतेला सुलतानाच्या विरोधात भडकावले आहे नि त्याचा परिणाम कानपूरमधे अनुभवून तो पुढे आला आहे. आपल्या शब्दाची ताकद प्रचंड आहे या भ्रमात तो आहे. परिस्थिती, भूगोल आणि व्यक्ती बदलल्या की धोरण बदलावे लागते याचे भान त्याला नाही. याउलट इमामुद्दिन, शहाबुद्दिन, आइने उल्मुल्क आणि आपली सावत्र आई या आपल्या विरोधकांना संपवण्याचे हत्यार वेगवेगळे असायला हवे याची तुघलकाला अचूक जाण आहे. इमामुद्दिनच्या धर्मनिष्ठेचाच फास बनवून तो त्याच्याच गळ्यात अडकवतो. इमामुद्दिनलाच आपला सदिच्छा दूत म्हणून पाठवण्याची त्याची चाल दुहेरी आहे. आइने उल्मुल्क आणि इमामुद्दिन या दोघांनाही वठणीवर आणण्याची. यात इमामुद्दिनचा बळी जातो, त्यातून आइने उल्मुल्कबाबत जनतेत प्रतिकूल भावना तयार होते आणि या दोघांचेही काटे तुघलकाच्या वाटेतून अलगद दूर होतात.

( 'तुघलकया नाटकातील एक वेचा 'वेचित चाललो' वर:  http://vechitchaalalo.blogspot.in/2017/03/Tughlaq.html)

सोमवार, २० मार्च, २०१७

वेचित चाललो: 'एम.टी. आयवा मारु'

'एम.टी. आयवा मारु' हे नाव वाचलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया बुचकळ्यात पडण्याची झाली. मराठी कादंबरीचे हे कसले नाव, कुठली भाषा ही? एम आणि टी ही तर इंग्रजी मुळाक्षरे असावीत असा तर्क करता येत होता, पण पुढचे दोन शब्द बिलकुल लागेनात. त्यामुळे नावावरून हे आपले काम नाही असे गृहित धरून त्या कादंबरीच्या नादी लागू नये असे ठरवले. कारण तो काळ होता तो 'मृत्युंजय', 'छावा', 'श्रीमान योगी' वगैरे कादंबर्‍या भरात असण्याचा. आवृत्यागून आवृत्या निघणार्‍या या कादंबर्‍या नुसत्या वाचल्याच पाहिजेत असे नव्हे, तर त्यांच्या हार्ड-बाउंड प्रती आपल्या टिचभर दिवाणखान्यातल्या शोकेस मधे ठेवणे ही फॅशन असण्याचा काळ होता. महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यातील एकेका व्यक्तीला वेठीला धरून 'मृत्युंजय' किंवा 'राधेय'च्याच आवृत्या अनेक लेखक अहमहमिकेने बाजारात आणत होते. इतके सारे वाचनीय असताना या असल्या अगम्य नावाच्या कादंबरीच्या वाट्याला जाणार कोण?
पण त्या कादंबरीचे नि आमचे ऋणानुबंध जबर असावेत. प्रत्येक वेळी पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर किंवा प्रदर्शनाला भेट दिल्यावर ही नेमकी समोर येऊन 'हिंमत असेल तर उचल मला' असे आव्हान देत असे. एक-दोनदा उचलून थोडी चाळली, पण त्यातील एक दोन प्रसंगाचे धावते वाचन केल्यावर माझ्या 'मृत्युंजय'संस्कारित मनाला धक्का बसून तो नाद सोडला होता. पण मग भूपात वर्ज्य असलेल्या 'शुद्ध मध्यम'ने जशी कुमारांची पाठ सोडली नाही (अखेरीस 'ये बाबा आत' असे म्हणत कुमारांनी 'चैती भूप' या नवीन रागाची रचना केली) तशीच ही कादंबरी माझ्या नजरेआड व्हायचे नाव घेईना. शेवटी कुमारांचे स्मरण करून तिला एकदाची घरी आणली. दरम्यान एम. टी. म्हणजे मोटर टँकर किंवा मालवाहू जहाज इतपत समजले होते. मग सुरुवातीच्या काही पानांतून 'आयवा मारु' हे नाव जपानी आहे नि त्याचा अर्थ 'प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज' हे समजले. एका दैनंदिनीच्या स्वरूपात लिहिलेली ही कादंबरी वाचायला सुरुवात केली नि एक वावटळ, एक तुफान आपल्याला घेऊन वेडेवाकडे उडवत अनिश्चित दिशेला घेऊन जात आहे अशी भावना निर्माण झाली. अशा वावटळीत पाय जमिनीवर नाहीत, धुळीने आसमंत भरल्याने दृष्टीचा असून उपयोग नाही, दिशांचे भान उरलेले नाही; केवळ ते तुफान नेईल तिकडे निमूट जायचे इतकेच हाती असल्याची जाणीव झाली. मग स्वतःला त्या प्रवाहात सोडून दिले. एक संपूर्ण रात्र या तुफानाने गिळंकृत केली!
कादंबरी सुरुवातीला पकड घेते ती अपरिचित जग समोर आणते म्हणून. जहाजावरचे जग हे तर तुम्हा आम्हाला सर्वस्वी अपरिचित असतेच, पण त्या पलीकडे या जहाजाचा सारा प्रवास पूर्वेकडील देशांतील शिंताव, बतान यासारख्या अपरिचित आणि आज एक बलिष्ठ व्यापारी केंद्र म्हणून उदयाला आलेल्या पण तेव्हा केवळ स्मगलिंगच्या संदर्भातच ज्याचे नाव ऐकू येई त्या हाँगकाँग बंदरातून. जगण्याचे मॉडेल पाश्चिमात्यांकडून घेणार्‍या आणि म्हणून तिकडची बित्तंबातमी राखणार्‍या नि पौर्वात्य जगाबाबत उदासीन असणार्‍या माझ्यासारख्या भारतीयाला सुरुवातीला पकडून ठेवले ते त्यातील नव्या वातावरणाने. एखादी रहस्यकथा, गूढकथा जशी अपरिचित जगात नेऊन तुमचे मनोरंजन करते तशी अपेक्षा प्रथम निर्माण झाली. पण काही पानातच हे रसायन पारंपरिक मराठी साहित्याप्रमाणे अमूलचे फ्लेवर्ड दूध नसून पेल्यात फेसाळणारे, आकर्षक दिसणारे, कडवट चवीचे, मोहात पाडणारे आणि अखेरीस थेट मस्तकात शिरून ते भणाणून सोडणारे तीव्र मद्यस्वरूप आहे हे ध्यानात आले. पण तोवर उशीर झाला होता. 'एकच प्याला' आधीच मस्तकात गेला होता, त्यामुळे अपरिहार्यपणे दुसरा उचलला जाणारच होता.
जहाजावरचे जग, तेथील सर्वस्वी अपरिचित नीतिनियम, त्यावर काम करणारी विविध देशांतील माणसे, त्यांच्या पारंपरिक संस्कृतींचा, विचारांचा जाणारा छेद, त्यातून उमटणारे संघर्ष, जमिनीवरील नीतिमत्तेच्या कल्पनांचा तिथे होत गेलेला पालापाचोळा, व्यावसायिकतेच्या आणि गुंतवलेल्या एक एक पैशाची पुरेपूरच नव्हे तर जास्तीत जास्त किंमत वसूल करण्याच्या लालसेपुढे माणसांना कःपदार्थ मानण्याची भांडवलशाही मालकांची वृत्ती, खलाशांचे हेवेदावे, दूरवर अथांग पाण्याशिवाय काहीच दिसत नसल्याने आसपास माणसे असूनही घेरुन राहणारे एकांताचे भय, मग त्यावर केविलवाणी मात करण्यासाठी जमिनीवर पाय ठेवताच जगण्यातील शक्य ते सर्व ओरबाडून जगण्याची निर्माण झालेली अभिलाषा, आणि या सर्वांपलिकडे व्यापून राहिलेले नीतिच्या रूढ कल्पनांपलिकडे नेणारे लैंगिक आणि अलैंगिक आकर्षण... इतक्या सार्‍या पैलूंना राक्षसी आवेगाने कवेत घेत आयवा मारू धावत जाते, जाताना वाचकाला विचार करण्याची क्षणभर देखील फुरसत देत नाही.
चित्रपटात किंवा कथा/कादंबरीमधे एखादे पात्र लेखकाच्या व्यक्तिमत्वाशी मिळते जुळते असले तर त्याला लेखकाचा 'ऑल्टर ईगो' किंवा 'साहित्यिक प्रतिरूप' म्हटलं जातं. त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून लेखक स्वतः व्यक्त होतो आहे असे समजले जाते. त्याच चालीवर उज्ज्वला उपाध्याय हा 'आयवा मारु'चा ऑल्टर ईगो किंवा समूर्त, सजीव व्यक्तिमत्व आहे, ते 'आयवा मारु' नावाच्या आत्म्याचे 'माध्यम' आहे असे म्हणता येईल. कादंबरीच्या शेवटाकडे जाताना लेखकालाही हे अभिप्रेत होते याचे सूचन मिळते. आणि कदाचित म्हणूनच या कादंबरीची प्रत्यक्ष नायिका असलेल्या 'आयवा मारु'चा उल्लेख स्त्रिलिंगी आहे. (शिवाय विविध देशांतून आलेल्या विविध खलाशांच्या सामायिक संवादाची भाषा असलेल्या इंग्रजी भाषेत शिप म्हणजे जहाज याचा साहित्यिक उल्लेख बहुधा 'she' या सर्वनामाने होतो. हे दुसरे कारण असावे.) तिचे नि 'आयवा मारु'चे व्यक्तिमत्व अनेक अर्थांनी एकसारखे आहे, आवेगी आहे, उद्दाम आहे, वर्चस्व गाजवणारे आहे, आव्हान देणारे आहे, जे हवेसे वाटते त्याकडे आवेगाने झेपावणारे आहे, जे जे आपला वापर करु पाहतात त्यांचा सणसणीत सूड उगवणारे आहे.
ज्या नात्यांच्या आधारे जगण्याचा पाया घालावा नि यथावकाश वाढत्या वयाची वाटचाल करताना त्यावर एक एक वीट चढवत जगण्याची इमारत बांधत न्यावी त्या मूलभूत नात्यांची विकृत बाजू समोर आल्यानंतर, व्यक्तिमत्व घरापासून सुटे होत आपली वाट आणि आपल्या घाटांच्या शोधात बाहेर पडण्याच्या वयातच सणसणीत आघात होऊन जगण्याचा पायाच हादरून जावा आणि मग जगण्याच्या पारंपरिक गृहितकांना तिलांजली देत रिकाम्या झोळीने पण त्या विकृत अनुभवांचे कुबड वागवत असल्यामुळे सरळ जाऊ पाहात असतानाही चाल तिरकीच होत जावी असा अनुभव उज्ज्वलाला येत जातो. ही स्त्री म्हणजे एक वादळ आहे. जगण्याच्या पूर्वार्धात प्रथम परावलंबित्व आणि नंतर असहाय्यता अनुभवणारी ही स्त्री एका टप्प्यावर ते जोखड फेकून देते नि मनस्विनी होते. तिची ती मनस्विता, जगण्याचा शोध घेताना तिची गाठ आयवा मारु'च्या सेकंड लेफ्टनंट दीपक शी पडते आणि तिच्या माध्यमातून 'आयवा मारु'शी. आपल्या देहसौंदर्याची नि स्त्रीत्वाच्या ताकदीची पुरेपूर जाणीव झालेली ती स्त्री मग आपल्या परीने त्या पुरुषसत्ताक समजल्या जाणार्‍या राज्याची अनभिषिक्त राणी होऊन बसते. त्या निसरड्या वाटेवरून जाताना भरकटते आणि 'आयवा मारु'च्या प्राक्तनालाच सामोरी जाते.
साहित्यिक लैंगिकता हा आजही बंडखोर वगैरे विचार मानला जातो. त्यावर आधारित साहित्य हे व्याख्येनुसारच विद्रोही किंवा धाडसी वगैरे मानलं जातं. ऐंशीच्या दशकात खांडेकरी आदर्शवाद, फडकेप्रणित रोमँटिकता, पुलं प्रणित मध्यमवर्गीय जाणीवांचे पट फाडून जेव्हा भाऊ पाध्येंसारख्या लेखकाने समाजाच्या उपेक्षित जगाचे वास्तव लख्खपणे मांडलं तेव्हा होता तो खरा विद्रोह. आज तीस वर्षांनंतरही केवळ विषयनिवडीबद्दल विद्रोहाचे सर्टफिकेट अपेक्षित ठेवणारे लेखक या त्या ऐंशीच्या दशकातल्या लेखनाच्या आवृत्या काढत असतील, नवा काही विचार, नवे काही मूल्यमापन, नवी काही दिशा, नवी मांडणी समोर ठेवत नसतील तर त्यांना बंडखोर, विद्रोही न समजता, केवळ विद्रोहाच्या महामार्गावरचे प्रवासीच म्हटले पाहिजे. त्यांच्यात आणि महाभारतातील एकेका पात्राला वेठीस धरून 'मृत्युंजय'च्या आवृत्तीस्वरूप कादंबर्‍या लिहिणार्‍यांत फार फरक नसतोच.
अशा लेखकांसाठी उज्ज्वला उपाध्याय हे पात्र एक वस्तुपाठ आहे. ते अर्थातच काळे-पांढरे नाही, एकसंध, एकसाची नाही. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्वरूपात ती समोर येते. याला बदल म्हणता येईल किंवा वेगळे पैलू. प्रथम मान खाली घालून जगणारी उज्ज्वला सूडाच्या भावनेने पेटून उठते नि पुरुषी वर्चस्ववादी प्रवृत्तीवर आघात करू लागते. दीपकशी भेट तिला सहजीवनाचे दार उघडून देते तेव्हाही तिचे व्यक्तिमत्व एका बाजूने ते हवेसे वाटणे तर दुसर्‍या बाजूने त्या व्यवस्थेवरच्या सूडभावनेने पेटलेले असे दुभंग होताना दिसते. एकदा देहसौंदर्याच्या नि स्त्रित्वाच्या सहाय्याने पुरुषांना अंकित करणे लीलया जमू लागल्यावर अनंत (हा लेखकाचा ऑल्टर ईगो)च्या बाबतीत हे शक्य होत नाही म्हणताना ती पराभवाच्या भावनेने पेटून उठते. काही करून त्याला अंकित करायचे या पारंपरिक मानसिकतेसोबतच लैंगिकतेचे नवनवे खेळही तिला मोहवत असतात. एकाच वेळी अप्राप्य प्रेम/स्नेह आणि दुसरीकडे प्रमाथी देहभोग आणि चिरफाळत जाणारे नाते, एका बाजूने पुरुषांना - अगदी गोर्‍या युरपियनांसह - सहज नमवण्याच्या ताकदीचा अहंकार तर दुसरीकडे सूडासाठी उगारलेले अस्त्र उलटून आपलाच घात करताना उघड्या डोळ्याने दिसत असतानाही त्याला परत घेता येत नसल्याची हतबलता, ती फरफट!

असे प्रमाथी आणि झपाटून टाकणारे, एकाच वेळी सहानुभूती आणि धिक्काराचे धनी असलेले व्यक्तिमत्व मराठी साहित्यात फारच क्वचित उभे केले गेले असेल. तिचा प्रवास हा एकरेषीय नाही मनस्विता आणि देहस्विता यांच्या हिंदोळ्यावर ती हेलकावे घेताना दिसते. पौगंडावस्थेत आलेल्या अनुभवांतून पुरुषांवर सूडात्मक वर्चस्व गाजवण्याची तिची वृत्ती अधेमधे अचानक एखाद्या गोषाच्या पडद्याप्रमाणे दूर होत कुण्या सेनगुप्ताप्रती निर्माण झालेली वत्सल भावना, माणसांतल पुरुष पाहता पाहता अचानक भेटलेल्या कुण्या संवेदनशील मित्राप्रती निर्माण झालेला ओलावा, पण तेवढ्यावर न थांबता पुन्हा एकवार त्याच्या प्राप्तीच्या जिद्दीने त्या नाजूक नात्याने पुन्हा एकवार देहलालसेच्या दिशेने घेतलेला हेलकावा अशा प्रमाथी आणि परस्परविरोधी भावनांच्या कल्लोळात ती जगते आहे. रोकड्या जगाच्या पसार्‍यात अतिसंवेदनशील व्यक्तीसाठी जे भागधेय लिहून ठेवलेले असते तेच तिच्याही वाट्याला येते. पण हे ओघाने नव्हे, तिने त्याविरूद्ध मांडलेल्या संघर्षाच्या, आकांताच्या अखेरीसच.
अशा वादळी व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब पुरेपूर उमटले आहे असा वेचा शोधणे हे आव्हान होते. ते स्वीकारले खरे पण अपेक्षेप्रमाणे पेलले नाही. अखेर माझ्या मध्यमवर्गीय जाणिवेला अनुसरून उज्ज्वलाचा अनंत सोबतचा एक संवाद निवडला आहे, ज्यात परोक्ष भावाने ’आयवा मारु'देखील उपस्थित आहे. यात अनंतने उच्चारलेले शब्द आणि त्याच्या मनात उमटणार्‍या उज्ज्वलासंदर्भातील स्मृती, त्याचे विचार आणि निरीक्षण यांच्याकडे बारकाईने लक्ष द्या. लेखक वाचकाशी शब्दांतून बोलतो किंवा व्यक्त होतो हे तर खरेच पण तो मांडणीतूनही भाष्य करतो याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.


ता.क. :
’पेंग्विन बुक्स’ तर्फे या अफलातून कादंबरीचा इंग्रजी अनुवाद देखील प्रकाशित झाला आहे. ज्यांनी तिला 'मराठी कल्ट नॉव्हल' किंवा स्वतःचा असा एक पंथ स्थापणारी कादंबरी म्हटले आहे. वाचकांचा एक मोठा गट तिचा चाहता झाला, त्याने तिची पारायणे केली हे खरे असले तरी मराठी लेखकांनी मात्र तिची परंपरा मानली नाही. खुद्द अनंत सामंत यांनीच लिहिलेल्या एखाद्या कादंबरीचा अपवाद वगळता ’आयवा मारु’चा पंथ तिच्यापाशीच उगम पावला नि तिच्यापाशीच संपला असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

---

('एम.टी. आयवा मारु' या पुस्तकातील एक वेचा 'वेचित चाललो' वर: http://vechitchaalalo.blogspot.in/2017/03/AyvaMaaru.html)

बुधवार, १५ मार्च, २०१७

वेचित चाललो: 'रारंग ढांग'

कोणतीही व्यवस्था असो - मग ती राष्ट्र असो, धर्म असो की जात - तिच्या संदर्भात बाबत चिकित्सेला, बदलांच्या आग्रहाला नि मुख्य म्हणजे टीकेला वाव फार कमी असतो. त्यातही तिच्या संदर्भातील जी संरक्षण व्यवस्था असते ती तर जन्मतःच पवित्र असते, परिपूर्ण असते. तिच्यात अंतर्भूत असलेल्या न्यूनांबद्दल, तिने केलेल्या अन्यायाबद्दल तोंड उघडायला परवानगी नसते. कारण मुळात तिच्यात असं काही असू शकतं हेच बहुसंख्येला मान्य नसतं. एरवी अनेक विषयांबाबत एकमेकांच्या जिवावर उठणारे दोघे या मुद्द्यावर मात्र ठामपणे एकत्र येतात. त्यांच्यावर टीका करणारा बहुधा अन्य व्यवस्थेचा समर्थक किंवा तिचा भाग असतो म्हणून तो टीका करू धजतो, कारण त्याच्यापुरता त्याच्या पाठीशी एका गटाचे बळ उभे असते. व्यक्तिगत पातळीवर वस्तुनिष्ठ विश्लेषण, आकलन आणि टीका मात्र कायम आक्रमक विरोधाची, मुस्कटदाबीचीच धनी असते. मान राखून, त्यांच्या चुकांबाबत अधिक क्षमाशील राहून, दंड करण्याबाबत अपवाद करतही टीका शक्य आहे, नव्हे तिच्यात सुधारणा व्हावी म्हणून आवश्यक आहे, हे आपण का मान्य करत नाही हे एक कोडंच आहे. संपूर्ण पावित्र्य किंवा संपूर्ण विध्वंस या दोन टोकांवरच राहण्याचा विकृत आग्रह कशासाठी?
राष्ट्र ही संकल्पना अतिशय पावित्र्याच्या पातळीवर नेऊन ठेवलेली - अलीकडे तर तिचे अनेक देव्हारे, देवळे गल्लोगल्ली उभी राहू लागली आहेत - आणि तिच्यात अंतर्भूत असलेली संरक्षण व्यवस्था किंवा सैन्य ही तर केवळ फुलं वाहण्यासाठीच असते असे 'संस्कार' (संस्कार आणि ब्रेन-वॉशिंग या दोन्हीत गुणात्मक फरक नसतो, केवळ दृष्टीकोनातच असतो.) या देशात तिच्यातील कमतरता, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, कंपूबाजी याबाबत ब्र उच्चारता कामा नये असा अलिखित दंडक असतो. अलीकडे तर थेट 'देशद्रोहा'चे सर्टिफिकेट दिले जाते. अशा परिस्थितीत अगदी राजकारणाबाबत बोटचेपी आणि समाजकारणाबाबत सावध नि सुरक्षित विद्रोहाची माफक भूमिका घेणार्‍या मराठी साहित्य विश्वात याबाबत फार लिहिले जात नाही हे अपेक्षितच आहे. त्यांचा सारा विद्रोह 'सर्वव्यापी' वगैरे असलेल्या हिंसेचे नि लैंगिकतेचे पैलू तपासण्यात जातो, यातून कोणत्याच गटाला न दुखावता विद्रोहाचे मेडल पदरी पाडून घेता येते हा फायदा !
प्रभाकर पेंढारकर लिखित 'रारंग ढांग' आणि दिनानाथ मनोहर यांची 'रोबो' या दोन कादंबर्‍या हे माझ्या वाचनात आलेले दोन सन्माननीय अपवाद. या दोनही कादंबर्‍या प्रामुख्याने पवित्रतेच्या पातळीवर नेऊन ठेवलेली व्यवस्था आणि व्यक्ती यांच्यातील संघर्षाची मांडणी करतात.
'रारंग ढांग' ही कादंबरी एक 'सिविलियन' एंजिनियर आणि बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन ही लष्कराची सह-संस्था यांच्यातील संघर्षाचे चित्र उभे करते आहे. एक तत्त्वनिष्ठ, बुद्धिमान पण त्याचबरोबर एककल्ली भासावा असा विश्वनाथ टोकाचा संवेदनशीलही आहे. तो आपल्या कामाकडे निव्वळ रोजगार म्हणून न पाहता एक बांधिलकी म्हणून पाहतो आहे. व्यवस्थेने ठरवून दिलेल्या उतरंडीबाबत त्याला प्रश्न पडतात.

भारतीय लष्कराची जडणघडण अजूनही ब्रिटिश काळातीलच आहे. जेव्हा अधिकारी हे प्रामुख्याने ब्रिटिश, गोरे लोक तर इतर सर्व 'नेटिव' असत. त्यामुळे अधिकार्‍यांची मेस वेगळी नि इतर 'सिपाही' लोकांची वेगळी ही 'परंपरा' अजूनही चालत आलेली. तेव्हा सिपाही लोक तर बोलूनचालून नेटिव, महामूर संख्येने उपलब्ध असलेले; तेव्हा कामाच्या शिस्तीपुढे त्यांच्या हालअपेष्टांची, गरजांची पर्वा करण्याची आवश्यकताच नव्हती. गुलामासारखे त्यांना राबवून घेणे, तो पडला तर दुसरा आणावा इतके सोपे होते सारे.

आज स्वातंत्र्यानंतर या दोनही काडरमधे भारतीयच असल्याने परिस्थिती इतकी वाईट नसेल कदाचित, पण 'डोण्ट गिव मी रीझन्स, जस्ट गेट इट डन' ही ऑर्डर हाताखालच्या मंडळींना देणे हे अधिकार्‍याला भूषणच असते. त्याच्या हाताखालच्या अधिकार्‍याने उतरंडीत त्याच्या खाली असलेल्याबाबत तेच करणे अपेक्षित असते. ऑर्डर देण्याच्या या उतरंडीत सर्वात तळाशी असलेल्यांचे आयुष्य कसे असते याबाबत बोलणे म्हणजे द्रोह मानला जातो. नेमके याच घटकाचे जिणे डोळे उघडे ठेवून पाहणारा, कान उघडे ठेवून ऐकणारा आणि बुद्धी शाबूत ठेवून त्यावर विचार नि कृती करणारा एखादा अधिकारी येतो तेव्हा त्याची दोन ध्रुवांत होणारी ओढाताण आणि शेवटी आपली बुद्धी आणि सदसद्विवेकबुद्धी जिवंत ठेवून घेतलेला निर्णय आणि त्याचा अपरिहार्य शेवट अशी या कादंबरीची एकुण वाटचाल आहे.
विश्वनाथ हा कादंबरीचा नायक हे एक अस्सल पात्र आहे. हिंदी चित्रपटांतून वा रोमँटिक कादंबर्‍यातून असते तसे सर्वगुणसंपन्न मुळीच नाही. उलट छानपैकी करड्या रंगाचे आहे. त्याचा स्व जिवंत आहे त्याचबरोबर अहंकारही, सदसद्विवेक जिवंत आहे तशीच अधिकाराची जाणीवही, बुद्धिमत्तेसोबत तो एककल्लीदेखील आहे नि त्यामुळेच एका गटात काम करण्यास तो लायक नाही. यात त्या मजुरांच्या झोपेचं त्याने केलेलं विश्लेषण अत्यंत सुखवस्तू मनाने केलेले आहे (हे पेंढारकरांनी जाणीवपूर्वक लिहिले की ते त्यांचेच मत आहे हे ठाऊक नाही.). श्रमजीवींच्या झोपेचे इतके उदात्त वगैरे विश्लेषण त्या कष्टाची जाण आणि अनुभव नसलेले सुखवस्तू मनच करू शकते. असे असूनही, त्याच्यापुरता एक लहानसा का होईना बदल तो घडवून आणतो, त्यासाठी आपले करियर पणाला लावतो आणि निसर्गच सर्वशक्तिमान असलेल्या प्रदेशात माणूसपणाची एक यादगारी निर्माण करून जातो.
अधिकारांच्या उतरंडीत जिला 'मिडल मॅनेजमेंट' म्हणतात ती नेहमीच 'ओझ्याचं गाढव' म्हणून वावरताना दिसते, मग भले ती एखादी आयटी कंपनी असो की 'रारंग ढांग' या कादंबरीतील बीआरओ. वरचे अधिकारी अशक्यप्राय अशी टार्गेटस आखून देतात नि हाताखालच्याने त्यातील समस्यांची, ते पुरे होण्यात असलेल्या अडचणींची कल्पना देऊ केली की 'यू शुड पुश योर सबॉर्डिनेट्स, यू मस्ट बी अ ग्रुप पर्सन, डेलिगेट योर रिस्पॉन्सिबिलिटिज, गेट इट डन फ्रॉम देम, वी मस्ट डिलीवर धिस' म्हणून मोकळे होतात. उतरंडीत सर्वात खाली असलेल्यांना तर काय 'काम करा' म्हटले की करत राहण्याखेरीज गत्यंतर नसतेच. तरीही कामे पुरी होत नाही इतकी ती अवाढव्य असू शकतात. मग वरचे अधिकारी सर्व हाताखालच्यांना 'फायर' करून आपला अधिकार पुन्हा एकवार बजावतात. 'मिड्ल मॅनेजमेंट'वाला काम पुरे न झाल्याने अधिकार्‍यांच्या शिव्या खातो तसंच हाताखालच्यांना क्षमतेपेक्षा अधिक राबवून घेतल्याने त्यांचीही लाखोलीही. वर एखाद्या कामात काही सर्वात तळाच्या थरात काही अघटित घडलेच तर अधिकारी 'पूर्वकल्पना न दिल्याचे' खापर पुन्हा या 'मधल्या'वरच फोडतात नि मोकळे होतात. कादंबरीतील 'बीआरओ'ची परिस्थिती नेमकी अशीच आहे. आणि अशा परिस्थितीतही विश्वनाथसारखा मधला माणूस दोन्ही बाजू समजून घेत असतानाच करारीपणे आपले स्वतंत्र विचार नि कृती दोन्हीशी बांधील राहतो.
इथे निवडलेल्या उतार्‍यामध्ये प्रामुख्याने विश्वनाथ'चे सत्तेबाबतचे विचार येतात. त्याचबरोबर तळाच्या कामगारांची परिस्थितीही त्यात येते. एका बाजूने विंडप्रूफ जॅकेट, सुरक्षित बरॅक, थंडी घालवण्याची 'अधिकृत' सोय म्हणून मद्याची सोय इ. सारे सारे उपलब्ध असलेला विश्वनाथ तर दुसरीकडे पोटामागे पाठ लावून आलेले, कामाच्या ठिकाणच्या टाकाऊ वस्तूंमधून निवार्‍याची जेमतेम सोय केलेले, त्याच भयानक प्रतिकूल वातावरणात दिवस कंठणारे गुरखा मजूर यांच्या जगण्यातील विरोधाभास, पवित्र, टीकेसाठी अनुल्लंघनीय मानल्या गेलेल्या व्यवस्थेची अवस्था दर्शवतो आहे.
संपूर्ण कादंबरी अतिशय चित्रमय आणि ओघवत्या शैलीत लिहिलेली आहे. एखाद्या चित्रपटाची पटकथा म्हणून सहज वापरता येईल इतकी शब्दचित्राच्या स्वरुपात आहे. एक वदंता अशी आहे की हिंदी-मराठी चित्रपट/नाट्य क्षेत्रातील एका दिग्गज दिग्दर्शकाने त्यावर चित्रपट काढण्याची परवानगी मागितली होती, पण बीआरओ किंवा लष्कराने ती नाकारली!

(''रारंग ढांग' या पुस्तकातील एक वेचा 'वेचित चाललो' वर:  http://vechitchaalalo.blogspot.in/2017/03/RaarangaDhaang.html)