बुधवार, १९ जुलै, २०१७

: 'जीएसटी'मुळे बिल झाले पाचपट ! :-काल बिग बझार'ची मासिक फेरी केली. जिन्नस नेहेमीचेच, नेहमी लागतो तेवढ्या वेळातच खरेदी उरकली, काउंटरवरही नेहमीप्रमाणेच सहनशक्तीची परीक्षा दिली. अखेर आमचा नंबर आल्यावर एकाच प्रकारच्या वस्तू गुणाकाराचा वापर न करता एक एक करुन बार कोड वाचतानाही मनाचा तोल ढळू दिला नाही. अखेर ते काम संपले, पैसे देण्यासाठी पत-पत्र सादर केले. आमच्या अधिकोषाने पत-पत्रावर पत शिल्लक आहे सबब माल देण्यास हरकत नाही अशी पोच बिग-बझारच्या कन्येला दिली नि व्यवहार पूर्ण झाला. पत-पत्राचे बिल बाहेर आले आणि...

... आणि प्रिंटर धडाडू लागला. तब्बल एक मीटरहून अधिक लांबीचे बिल बाहेर आले!!! एवढे मोठे आपले बिल? पैसे तर नेहमीइतकेचे खर्च केले होते, तेवढ्याच पैशात जास्त जिन्नस मिळावेत इतके अच्छे दिन आले असावेत अशी समजून करून घेतली. पण...

... बिल हातात आल्यावर सारा उलगडा झाला. बिलाची लांबी फक्त पाचपट झाली होती. आजवर एकाखाली एक असे जिन्नस नोंदवणारे छोटे बिल मिळे. आता प्रत्येक जिन्नसासाठी मूळ किंमत, एसजीएसटी, सीजीएसटी, एकुण आणि एक जिन्नस संपला हे दाखवण्यासाठी एक मोकळी ओळ अशा तब्बल पाच ओळी खर्चल्या होत्या. त्यामुळे आमचे बिल पाचपट झाले होते.

इतर कुणाचे नाही तरी त्या बिलाचा पेपर रोल बनवणार्‍या कंपन्यांचे अच्छे दिन आलेच म्हणायचे. पण मग ते पेपरलेस इकनॉमी वगैरेचे काय होणार याची चिंता मला पुन्हा भेडसावू लागली आहे. (जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती...)

ता.क.: दिशाभूल करणारे सनसनाटी शीर्षक आणि बातमी फुसका बार हे बरोबर जमलं की नाही. आता कोणत्या वृत्तपत्रात जावे मी यावर पोल घेऊ या का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा