सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

उठवळांचे आत्मरंग

पश्चिमेत लॉरेन्स ऑलिव्हिए किंवा लिव उलमनसारख्या प्रथितयश कलावंतांच्या आत्मचरित्रांची जशी परंपरा आहे, तशी ती आपल्याकडे नाही. पण म्हणून दिग्गज कलावंतांची अगदीच टाकाऊ वा उथळ स्वरूपाची आत्मचरित्रंही आजवर प्रकाशित झालेली नव्हती. मात्र, अलीकडे बॉलीवूडमधील नट-नट्यांच्या प्रकाशित आत्मचरित्रांनी ती पायरीसुद्धा ओलांडली आहे. त्यातल्या नवाजुद्दीनने उठवळ स्वरूपाचं आत्मचरित्र लिहून त्या बदलौकिकात भर घातली आहे इतकेच...

AnOrdinaryLife

अष्टपैलू अभिनेता अशी ज्याची ओळख झाली, ज्याच्या संघर्षाच्या मिथक कथा मोठ्या प्रेमाने पसरवल्या गेल्या, त्या नवाजुद्दीन सिद्दिकीवर उथळ आणि उठवळ मांडणीमुळे आत्मचरित्र (अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ - ए मेमॉयर) मागे घेण्याची नुकतीच वेळ आली. नवाजुद्दीनच्या आधी करण जोहर, ऋषी कपूर, आशा पारेख, अनू अगरवाल आदी आजी- माजी कलावंतांची आत्मचरित्रं बाजारात आली, पण त्याचं साहित्य-मूल्य सोडा, पण चरित्र-मूल्य देखील वाचकांच्या मनावर ठसलं नाही. इतकंच नव्हे, तर चित्रपट, अभिनय आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांत दबदबा असणाऱ्या गिरीश कर्नाडांसारख्या दिग्गजाचे ‘आडाडता आयुष्य’देखील अपेक्षाभंग करणारे ठरलं. कर्नाडांनी आपला प्रवास ग्रंथित करताना मूल्यमापनाला, वैचारिक जडणघडणीला फारसे महत्त्वच दिलेले दिसले नाही. निव्वळ कालानुक्रमे नोंदवलेल्या घटनांची ‘बखर’ आणि (आत्म)चरित्र यात मूलभूत फरक असायला हवा. इथे नसिरुद्दीन शहा आणि सई परांजपेंसारख्या सर्वार्थाने अनुभवी म्हणता येतील अशी नट-दिग्दर्शिकेच्या आत्मचरित्रांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. पण हे दोघेही वर्तमानातील अपवाद म्हणावे लागतील अशा स्वरूपातील चरित्रे वाचायला मिळत आहेत.

आत्मचरित्र कुणी लिहावं, कधी लिहावं याचा काही नियम असू शकत नाही; असूही नये. असे असले तरी ‘आत्मचरित्र का लिहायचे आहे?’ याबाबत निदान लिहिणाऱ्याच्या मनात स्पष्टता हवी. आणि मुख्य म्हणजे आपले आयुष्य ग्रथित करताना त्यातील आपल्या दृष्टीने आणि संभाव्य वाचकाच्या दृष्टीने महत्त्वाचे पैलू कोणते याचे भान राखणे आवश्यक असते.

कारण असे लेखन जितके लेखकासाठी असते त्याहून अधिक त्याच्या वाचकासाठी असते. आपल्यासाठी आपल्या आयुष्यातील संघर्षबिंदू तसेच विसाव्याचे क्षण हे कितीही महत्त्वाचे असले, तरी वाचकाच्या दृष्टीने ते त्यांनी यापूर्वी अन्यत्र वाचल्या-अनुभवलेल्या गोष्टींची केवळ एक पुनरावृत्ती असू शकते. थोडक्यात सांगायचे तर तुमचे आयुष्य हे केवळ ‘आणखी एक डेटा पॉइंट’ न ठरता त्यात त्याचे स्वत:चे असे वैशिष्ट्य असणे आवश्यक असते. वैयक्तिक पातळीवरील वैशिष्ट्यांखेरीज इतर सामाजिक, राजकीय, कलात्मक आणि परस्परसंबंध हे अन्य पैलूही याबाबत ध्यानात घ्यावे लागतात.

एरवी ‘का लिहावे?’ पाठोपाठ दुसरा येणारा प्रश्न म्हणजे ‘केव्हा लिहावे?’ हा आहे. आजवर कारकीर्दीची अखेर झाल्यावर, निवृत्तीच्या काळात आत्मचरित्र लिहायचे असते असा समज होता. याचे कारण निवृत्ती नंतर निवांतपणा नि वेळ दोन्ही उपलब्ध असतात हे तर आहेच, त्याचबरोबर वयाबरोबर वाढत जाणारी जाणीव, अनुभव आणि त्यातून येणारी वैचारिक परिपक्वता हे ही एक महत्वाचे कारण असते. ज्या प्रवाहाचे मूल्यमापन करायचे त्याचा भाग असताना ते करण्यापेक्षा त्यातून बाहेर पडल्यावर ते करणे तुलनेने अधिक तटस्थपणे होऊ शकते.

परंतु नवाझुद्दिन, करण जोहर आदिंचा विचार करता हा समज रद्दबातल होतो आहे असे दिसते. करियरच्या एका टप्प्यावर - साधारण परमोच्च बिन्दूवर - हे लिहिण्याचा प्रघात पडू लागलेला दिसतो. त्यामुळे चरित्र नायक वा नायिका तेवढी बदलते, मसाला थोडाफार फरकाने तोच राहतो. त्यात ना मानवी वर्तनाचा नवा कोपरा उजळून निघतो, ना वाचकाचे जगण्याचे भान विस्तारते, ना उन्नत होत गेलेल्या तत्त्वमूल्यांची ओळख होते, ना आत्मचरित्र सांगणाऱ्याच्या चिंतन-मननाची साक्ष पटते. अर्थातच याला कलाबाह्य कारण आहे, आणि ते म्हणजे बाजारपेठ! या बाजारपेठेच्या प्रभावामुळेच जाहिराती, ब्रॅंडिंग वगैरे सोबतच आता आत्मचरित्राचे क्रियाकर्म उरकून घेण्याची पद्धत रूढ होते आहे.

आजची बाजारपेठ अशी आहे की, जिथे वस्तू विकली जात नाही, ती ‘विकावी लागते' हा ठाम समज आहे. चित्रपट असो की पुस्तक, ते बाजारात येताना भल्या-बुऱ्या कोणत्याही मार्गाने त्याची प्रसिद्धी व्हावी, असा बाजारतज्ज्ञांचा प्रयत्न असतो. एक पुस्तक बहुधा एकदाच विकत घेतले जाते, एक चित्रपट एकदाच पाहिला जातो, त्यामुळे ग्राहकाला त्याबाबत फसवणुकीची भावना पुढे निर्माण झालीच, तरी तोवर पुरेशी विक्री होऊन अपेक्षित लाभ साध्य झालेला असतो. इथे रेप्युटेशनचा प्रश्न नसतो. पुस्तकाच्या बाबत दोष दिला गेलाच तर तो चरित्रनायकाला दिला जातो, प्रकाशक आपला फायदा घेऊन पुढच्या सेलेब्रिटीला आत्मचरित्र लिहिण्यास उद्युक्त करण्याच्या कामाला लागलेला असतो. चित्रपटाबाबत नेमके हेच नाते निर्माता/वितरक आणि मुख्य हीरो यांच्यात दिसून येते.

या प्रक्रियेत एकदा का सेलेब्रिटीची लोकप्रियता एन्कॅश करायची म्हटले की, विक्रीसाठी धडाकेबाज जाहिरात करणे अपरिहार्य ठरते, पण त्याहून महत्वाचे असते ते त्यावर वादंग निर्माण होणे! कलाकृती जितकी वादग्रस्त तितके ग्राहकांचे लक्ष त्याकडे सहज वेधले जाणार हे मार्केटिंगचे परिचित तंत्र असते. या तंत्राचा वापर करून माध्यमांनाही हात धुऊन घेता येत असल्याने तेही या प्रसिद्धीला हातभार लावतात. चरित्रनायकाच्या आयुष्यातील संघर्षबिंदू हे असे वादंग निर्माण करणारे हुकमी एक्के ठरतात. वादाची दुसरी बाजू जर दुय्यम, अप्रतिष्ठित असेल तर वादंग निर्माण करण्याची (हे विरोध-विकासाचे तत्त्व राजकारणात अधिक प्रभावी दिसते.) हमखास खात्री असते. नवाजुुद्दीनच्या पुस्तकातील गत आयुष्यातील स्त्रियांबाबत बदनामीकारक उल्लेख असलेले जे उतारे वृत्तपत्रांतून झळकले ते पाहता त्यातही वादंग माजवून पुस्तक ‘खपवण्या’चा हेतू अधिक स्पष्ट होता. पण तसे करताना चरित्रनायकाचा अप्रामाणिकपणा, असंवेदनशीलता आणि उद्दामपणाच प्रकर्षाने उघड झाला.

असं म्हटलं जातं की, बहुतेक आत्मचरित्रे ही स्व-समर्थनार्थ लिहिलेली असतात. फार क्वचितच लेखक दुसरी बाजू समजून घेण्याचा अथवा किमान तशी असू शकते, हे मान्य करण्याचा उदारपणा दाखवत असतो. ज्यांना हे जाणवते ते अनेकदा त्या संघर्षाची धार बोथट करून वादात न पडण्याची भूमिका घेतात. (आशा पारेख यांच्या आत्मचरित्रात ‘मी कुणावर टीका केली नाही’ असे त्यानी अभिमानाने सांगितले आहे.) पण यातून त्या कथनातला प्रामाणिकपणा कमी होतो.

आत्मचरित्र लिहिणाऱ्याचे आयुष्य प्रभावी आणि आदर्शवादी नसले तरीही त्याच्या त्याच्या परिघात समृद्ध असावे, प्रगल्भतेनं जगलेले असावे आणि त्या जगण्याचा तितक्याच प्रगल्भतेनं वेध घेतलेला असावा, अशी माफक अपेक्षा असते. राजकारणी, साहित्यिक, कलाकार सिने नट-नट्यांच्या अलीकडे प्रकाशित अनेक आत्मचरित्रांनी ती पूर्ण केलेली नाही.

‘खुल्लम खुल्ला’ नावाचे आत्मचरित्र लिहिताना ऋषी कपूरने तो ज्या चित्रपट कलेचा एक भाग आहे, त्या सतत विकसित होत गेलेल्या कलेचा स्वत:वर झालेला प्रभाव आणि परिणाम सोडून स्वत:मधल्या अहंगंड-न्यूनगंडांचेच तेवढे दर्शन घडवले आहे. तीच गोष्ट शत्रुघ्न सिन्हाच्या ‘एनिथिंग बट खामोश’या चरित्राबाबतीत, ‘बियाँड दी ड्रीम गर्ल’ या हेमा मालिनीच्या आणि करण जोहरच्या ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्राबाबतही घडली आहे.

यातली बहुतांशी आत्मचरित्रं स्वत:भोवती फिरणारी आहेत. यात ज्या वातावरणात, ज्या काळात, ज्या राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीत संबंधित कलावंत घडला, त्या चित्रपटसृष्टीपलीकडच्या जगाचे दर्शन घडलेले नाहीे. कलाविषयक चिंतन सोडाच, पण स्वत:च्या आयुष्याबद्दलचेही आकलन पूर्णांशाने उमटलेले नाही. त्यामुळे ‘विकत घ्या, वाचा, विसरून जा’ असाच साधारण या चरित्र आणि आत्मचरित्रांचा बदलौकिक राहिला आहे. त्यात भरीस भर म्हणजे, नवाजुद्दिन सिद्दिकीच्या विचारहीन मांडणीने त्या बदलौकिकास अधिकच खालच्या पातळीवर आणले आहे. परिणामी, अनेक उठवळांचे आत्मरंग आत्मचरित्रे म्हणून वाचण्याचे दुर्भाग्य वाचकांच्या नशिबी वारंवार येते आहे.

-oOo-

(पूर्वप्रकाशित: 'दैनिक दिव्य मराठी - रसिक'. दिनांक १९ नोव्हेंबर २०१७)

टीप: दिव्य मराठी - रसिक' चे प्रशांत पवार आणि शेखर देशमुख यांनी या लेखामध्ये उपयुक्त माहितीची भर घातली आहे. त्यांचे आभार.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा