गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

गोमा गणेश, पितळी दरवाजा

`गोमा गणेश, पितळी दरवाजा’ हा किस्सा कोणाकोणाला माहित आहे?

कुणी म्हणतात पेशवाईत सवाई माधवरावांच्या काळातील (अल्पवयीन राजा आणि केवळ आढाव असलेला त्याचा सल्लागार यामुळे प्रशासनात आलेल्या ढिलाईचा फायदा घेऊन कदाचित), तर कुणी राष्ट्रकूट, कुणी कृष्णदेवरायाच्या काळातला. ’पराया माल अपना’ ही काही केवळ अर्वाचीन हिंदुत्ववाद्यांचीच मक्तेदारी आहे असे नाही. पंचतंत्र, इसापनीती, मुल्ला नसरुद्दिन, तेनाली राम, बीरबल आदिंच्या कथांमध्ये देवाणघेवाण होतच असते. त्यात एखादी कथा, एखादा किस्सा नक्की कुठून कुठे गेला हे अस्मितेचा दंश झालेल्याखेरीज इतर कुणीच ठामपणॆ सांगू शकत नाही.

GomaGanesh

तो किस्सा असा होता. एका चतुर व्यक्तीने पितळी दरवाजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेशीवर ठाण मांडले. जणू राजानेच जकात वसुली वा मालाच्या वाहतुकीचा परवाना देण्यास आपली नेमणूक केली आहे अशा आविर्भावात तो तिथे मालाच्या गोण्यांवर शिक्के मारुन त्याबदली व्यापार्‍यांकडून पैसे घेई. अर्थात त्याबाबत त्याने स्वत: कधी काहीच सांगितले नव्हते. पण एकाने शिक्का मारून घेतला म्हणून दुसर्‍याने... असे करत (’मंकीज सी मंकीज डू’ या न्यायाने) हळूहळू साराच माल हा गोमा गणेशच्या शिक्क्याने वेशीतून आत जाऊ लागला. यातून त्याने भरपूर पैसा कमावला.

पुढे राजाला याची कुणकुण लागल्यावर त्याने गोमा गणेशला पकडून आणवले. पण गोमाने आपली बाजू मांडताना असे म्हटले की, ’हा शिक्का मारुन घ्यायलाच हवा अशी मी कुणाला सक्ती केलेली नव्हती. राजाने असा आदेश दिला आहे असेही मी कधी कुणाला सांगितले नव्हते. ज्याला शिक्का मारुन हवा त्याने एक होन द्यावा नि मी शिक्का मारुन घ्यावा इतकेच मी म्हटले होते. मी फक्त ’इथे मालावर शिक्के मारुन मिळतील’ इतकेच लिहिले होते. हे त्याविना माल आत नेता येणार नाही असेही मी कुठले म्हटलेले नाही. ज्या व्यापार्‍यांनी खुशीने शिक्के मारुन द्या म्हटले त्यांना मी ते उमटवून दिले इतकेच.’ गोमा गणेश ने तसा कोणताच गुन्हा केलेला नसल्याने राजाला त्याला मुक्त करावे लागले.

त्याच्या शिक्क्याचा मजकूर होता ’गोमा गणेश, पितळी दरवाजा.’

आज याची आठवण झाली ती ’५९ मिनिटात कर्ज’ योजनेमुळे. यात म्हणे ’कॅपिटा वर्ल्ड’ नावाची एक कंपनी सध्या ’गोमा गणेश’चा कित्ता गिरवते आहे. फरक इतकाच आहे की हा शिक्का ’गोलमाल गणेश’ राजानेच त्यांना बनवून दिला आहे. प्रत्येक अर्जदाराकडून हजार रुपये घेऊन ही कंपनी म्हणे ५९ मिनिटात कर्ज मंजूर करते... म्हणजे ’गोमा गणेश, पितळी दरवाजा’ असा शिक्का असलेली इमेल तुम्हाला पाठवते. तिथून पुढे तुमचे भवितव्य सरकारी बॅंकेच्या अधीन.

एक मिनिट... पण सरकारी बँकेकडे मी थेटही कर्ज मागू शकतोच की. आणि त्या अर्जाची सारी प्रोसेस आताही करायची आहेच. मग कॅपिटा वर्ल्ड’ने नक्की काय केले? तर केले हे की हजार रुपये घेऊन तुमच्या अर्जावर ’गोमा गणेश, पितळी दरवाजा’ हा शिक्का उमटवून दिला आहे. त्याची सक्ती नाही हे खरे, नि त्याचा उपयोग नाही हे ही खरे. पण मधल्या मधे गोमा गणेश मालामाल होऊन जातो आहे.

आणि ही ’कॅपिटा वर्ल्ड’ नामे कंपनी आहे कुठली...? करा तर्क... बरोबर. गुजरातमधील. सरकारी पैसा थेट धाकल्या अंबानींच्या खात्यात टाकण्यासाठी ’शेती कर्जाची पाईपलाईन’ या गोलमाल गणेश राजाने यापूर्वीच तयार केली आहे. तसाच हा ’५९ मिनिटात कर्जा’चा शिक्का आपल्या अहमदाबादच्या भाईबंदांसाठी तयार करुन दिला आहे.

प्रधानप्रचारमंत्री ’न खाऊंगा, न खाने दूंगा’ म्हणत सत्तेवर आले. पण ’... अपने हाथोंसे खिलाऊंगा’ हा उत्तरार्ध त्यांनी तेव्हा आपल्याला सांगितला नव्हता.

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

फितूर सेनापतीचे सैनिक

(’लोकसत्ता’चा ’कडकलक्ष्मीच्या गुदगुल्या’ हा अग्रलेख वाचून झाल्यावर...)

सेनेचे रामंदिर राजकारण हे भाजपच्याच पथ्यावर पडणारे, कदाचित त्यांच्याच संगनमताने चालले आहे.

भाजपने गेली तीसेक वर्षे राममंदिराचा मुद्दा हा 'हर मर्ज की दवा’ म्हणून वापरला. ते अडचणीत असले, निवडणुका जड जाणार असे दिसले की हटकून संघ परिवारातील कुणीतरी- बहुधा सरसंघचालक, राममंदिरावर भाष्य करतो. एखादा खूप प्रभावी विरोधी मुद्दा असला की विहिंप गुरगुर करू लागते.

UddhavToAyodhya
छायाचित्र लोकसत्ताच्या लेखातून.

पण आता त्यांच्या तोंडून तो मुद्दा ऐकला की ’हां, आले हे तोच मुद्दा दळायला घेऊन. करायला काही नको. नुस्ते भकत बसतात.’ अशी तीव्र प्रतिक्रिया हिंदुत्ववादी असलेल्या नि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मंडळींकडून ऐकू येऊ लागली आहे. तिचा आवाज फार वाढण्याच्या आत माघार घेऊन आता सेनेचा मोहरा पुढे करुन तोच मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.

धार्मिक मानसिकतेचा हाच प्रॉब्लेम असतो. एखादा मुद्दा, विचार, परंपरा कालबाह्य झाला आहे याची समजच त्यांना नसते, किंवा ते मान्य करण्याची त्यांची तयारी नसते. एकदा यश देणारे चिरंतन तेच नि तितकेच यश देत राहील अशी त्यांना ठाम खात्री असते. तसे होईनासे झाले की मुळातूनच बदल करण्याऐवजी ते फक्त कर्मकांडांच्या वा मांडणीत बदल करुन आधी मिळाला तितकाच फायदा मिळेल अशी आशा करत राहातात. हे म्हणजे वाचून झालेल्या पुस्तकाचे कवर बदलून नवे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केल्यासारखे आहे, किंवा डिजिटल वीडिओचे नाव बदलून नवा वीडिओ पाहतो आहे अशी बतावणी करण्यासारखे आहे.

हा सारा खटाटोप मनाने हिंदुत्ववादी, पण केवळ केंद्राच्या अपयशी नि भोंगळ कारभारामुळे आता भाजपविरोधी झालेल्या नागरिकांची मते, विरोधकांकडे न जाता संभाव्य जोडीदार पक्षाकडेच जातील, याची खातरजमा करण्याचा प्रकार आहे. गोव्यात वेलिंगकरांची जी भूमिका होती, तीच इथे उद्धव ठाकरेंची आहे. भाजपविरोधी मते आपल्या पारड्यात जमा करुन, निवडणुकीनंतर युती करुन ती पुन्हा भाजपच्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे.

पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत जे घडत असे तोच प्रकार आता भाजप-सेनेबाबत व्हावा अशी सोय केली गेली आहे. पूर्वी काँग्रेसवर नाराज असलेला, पण अनेक वर्षे त्याच मुशीत वाढलेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देई, आणि उलटही. त्यामुळॆ काँग्रेस नि राष्ट्रवादी आघाडी करण्यापेक्षा विरोधी लढले तर अधिक फायदा होई. आणि जिथे कुण्या एकाला बहुमत मिळत नसे, तिथे पुन्हा आघाडी करुन सत्ता वाटून घेता येई. फरक इतकाच की, तेव्हा काँग्रेस हा डिफॉल्ट चॉईस होता आता भाजप आहे, आणि राष्ट्रवादीची भूमिका सेनेने करावी असा त्यांचा प्रयत्न आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीत सेनेला ही नवी भूमिका घेण्याचे ठरले असावे.

यात सेनेचाही फायदाच आहे. चार वर्षे भाजपच्या नावे दुगाण्या झाडल्यानंतर युती करणे हा मुखभंग ठरला असता. त्यामुळे राममंदिर नि हिंदुत्वाची महाआरती सुरु केल्याने निवडणूकपूर्व वा निवडणुकोत्तर युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ’व्यापक हिंदुत्वासाठी’, ’राम मंदिराच्या निर्मितीसाठी’ आम्ही आमचे मतभेद दूर ठेवले अशी बतावणी करत सेना परत भाजपशी पाट लावायला मोकळी असेल. आणि हा खेळ महाराष्ट्रात यशस्वी झाला तर त्याचेच प्रयोग उत्तरेतही लावता येतील. अयोध्येची निवड उद्धव यांनी केली ती नेमकी यासाठीच.

अडचण होईल ती लोकसभेच्या वेळी इंगळासारखे लाल लाल डोळे करुन काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडणार्‍या आणि त्यावेळी ज्याला राजा मानून त्याच्या चरणी निष्ठा रुजू केली, त्याच्यावरच सेनापतीच्या आदेशावरुन विधानसभेच्या वेळी आग ओकणार्‍या तथाकथित सैनिकांची. ’साहेबां’नी पुन्हा मांडवली केली नि निमूटपणे तोफांची तोंडे पुन्हा काँग्रेसकडे वळवून मारा सुरु करावा लागेल; गेले अडीच-तीन वर्षे राजाला विरोध या मुद्द्यावर ज्यांच्याशी सलगी केली, त्यांना पुन्हा एकवार शत्रू मानावे लागेल.

हे सारे पाहताना मला पुन्हा पुन्हा ’झेंडा’ हा चित्रपट आठवत राहतो. या सार्‍या म्होतूर-काडीमोडाच्या खेळात भरडले जातात ते सामान्य कार्यकर्ते. कालपर्यंत आपला साहेब ज्या पक्षाच्या आणि नेत्याच्या नावे डरकाळ्या फोडत होता, आपल्याला ज्यांच्या विरोधात रान पेटवायला सांगत होता, ज्याच्याखातर आपण मित्र, गावकी, भावकी मध्ये अनेक शत्रू निर्माण करुन ठेवले, तोच आता त्याच पक्षाच्या, नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल?

फेसबुकवरच्या सुखवस्तू, पांढरपेशा नि बोलबच्चन ’कार्यकर्त्यां’बद्दल म्हणत नाही मी (फेसबुकवरचे ’सैनिक’ ही संज्ञा मोठी रोचक आहे. :) ) , नेत्याच्या शब्दाखातर दगडापासून तलवारी पर्यंत वाटेल त्याचा वापर करायला नि ते झेलायला तयार असलेल्या, त्यानंतर पदरमोड करुन कोर्टकज्जे करणार्‍या, करियर उध्वस्त करुन घेतलेल्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आहे. वाचाळवीर शाब्दिक खेळ करण्यात वा गैरसोयीच्या मुद्द्यावर सरळ मौन पाळण्यात तरबेज असतात. पण जमिनीवरील कार्यकर्त्याला येईल त्या परिस्थितीला प्रत्यक्ष तोंड द्यावेच लागते.

कार्यकर्ता तत्त्वनिष्ठ असावा, पक्षनिष्ठ असावा की व्यक्तिनिष्ठ हा मोठा कळीचा मुद्दा आहे. कम्युनिस्टांचा अपवाद वगळता तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते कोणत्याच पक्षाला नाहीत. याचे एक कारण असे की कोणत्याही पक्षाला निश्चित अशी तत्त्वेच नाहीत. इथे मी कम्युनिस्टांबरोबर भाजपचा अपवाद करत नाही. कारण आता तिथे परस्परविरोधी विचारांची कोणतीही निश्चित चव नसलेली भेळ झाली आहे. कदाचित दहा वर्षांपूर्वी मी भाजपचा ही केला असता. त्यांची विचारसरणी मला मान्य नसूनही त्यांच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारावरील निष्ठा हा त्यांच्या बांधिलकीचा मुख्य धागा होता हे अमान्य करता येणार नाही.

काँग्रेससारख्या व्यापक छत्रासारख्या पक्षाला बरेच पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पण त्यापलिकडे बहुतेक सारे पक्ष हे नेत्यांची खासगी मालमत्ता असल्याने पक्षनिष्ठा नि नेतानिष्ठा यात काहीच फरक उरलेला नाही. नेत्याने हा पक्ष सोडून त्या पक्षात प्रवेश केल्यावर त्याच्यापाठोपाठ जाणार्‍यांची निष्ठा अर्थातच नेत्याशी असते, पक्षाशी नव्हे; तत्त्व म्हणजे काय, ते कशाशी खातात हे तर त्यांना ठाऊकही नसते.

सेनेची वाटचाल युतीला पोषक वातावरण निर्मितीकडेच होते आहे. इतके दिवस ज्या भाजपला शिंगाला शिंगे भिडवली त्यांचाच राममंदिराचा मुद्दा उचलून त्याआधारे युतीचे समर्थन करण्याची सोय करुन ठेवली जात आहे. गेली दोन-तीन वर्षे साहेबांच्या आदेशावरुन भाजपवर वार करणार्‍या सैनिकांनी आता शमीच्या झाडावर ठेवलेली काँग्रेस-विरोधी शस्त्रे काढून परजायला सुरुवात करावी, म्हणजे आयत्यावेळी स्टार्टिंग-ट्रबल होणार नाही. एकदम यू-टर्न घेण्याचा धोका पत्करण्याऐवजी गाडीची दिशा आतापासून हलके हलके बदलत नेता येईल.

-oOo-


हे वाचले का?

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

वर्ड-क्लाऊड सिंड्रोम

’वर्ड-क्लाऊड सिंड्रोम’ नावाचा एक नवा आजार सोशल मीडिया मुळे उद्भवला आहे. लेखकाचा सूर, मुद्दा, भर कशावर आहे, त्याला काय सांगायचे आहे याकडे साफ दुर्लक्ष करुन लोक पोस्टमधील आपल्याला बोलता येईल असे शब्द फक्त उचलतात (हे पाहून मला ’ब्युटिफुल माईंड’ मधला डॉ. नॅश आठवतो!) नि त्यावर चर्चा वा प्रतिसाद करतात.

WordCloud

कालच मी स्टार ट्रेक’ या मालिकेतील एक - माझ्या मते- मननीय संवाद शेअर केला. हा संवाद अवगुण मानल्या गेलेल्या वा नकारात्मक गुण मानल्या गेलेल्या व्यक्तिवैशिष्ट्यांच्या संभाव्य उपयुक्ततेबद्दल होता. १९६६ ची मालिका कदाचित अनेकांना ठाऊक नसेल म्हणून ’ही कुठली? तर सध्या चालू असलेल्या यंग शेल्डन’मध्ये उल्लेख झालेली.’ असा संदर्भ दिला. झाले तेवढेच वाचून शाळेत निबंधात जसे ’... आणि म्हणून मला माझी आई फार्फार आवडते.’ म्हणून शेवट करावा तसे ’मला यंग शेल्डन आवडते/मी पाहतो/पाहते.’ चे प्रतिसाद पडले. एका मित्रवर्यांनी त्यातून नेमके ’आम्ही स्वत:ला तरुण असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो’ हा निष्कर्षही काढून दाखवला (अर्थात थट्टेने, पण लिहिणार्‍याचा हेतू, लेखनाचा रोख वा सूर बिलकुल ध्यानात न घेता कुठल्याही पोस्टवर आपल्याला अशी भंकस करण्याची परवानगी आहे हा आत्मविश्वास आवडला आपल्याला.)

आज आनंद मोरेने ’लायन किंग’ च्या निमित्ताने वडील/मुलगा संबंधाबद्दल एक सुरेख पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यानेही प्रस्तावनेखातर एका लेखकाच्या वडिलांप्रती न्यूनगंडाचा उल्लेख केला आहे. तिथे खाली तो लेखक कोण, मग त्या लेखकाचा मी फॅन होतो/ते की नाही आणि ’लायन किंग’ मला कसा फार्फार आवडतो, वगैरे चर्चा सुरु झाली आहे.

हे मूळ पोस्टच्या मुद्द्याशी सुसंगत नाही असे सांगितले, तर बहुतेकांचा ’ते कसे काय बुवा? ’लायन किंग’ असे मूळ पोस्टमध्ये लिहिले आहे की. त्याला अनुसरुनच लिहितोय की?’ असा ग्रह होईल याची खात्री आहे. ’इतिहासाच्या अभ्यासाचे सामाजिक बांधिलकीवर परिणाम’ या विषयावर पोस्ट लिहिली असेल तर, खाली इतिहास या शब्दाच्या व्युत्पत्तीवर चर्चा करणारे महाभाग सापडतील. मुद्दा समजून घेणे हा अस्तंगत झालेला प्रकार आहे. सोशल माध्यमांमुळे ’मला हवे तेच मी अर्थ काढणार, मला हवे तेच लिहिणार’ हा एक प्रकारचा सुप्त उद्दामपणा वा बेफिकिरी रुजली आहे.

मला अनेक लोक मी राजकीय मुद्द्यांवर फार बोलतो, किंवा लोकानुनय करणार्‍या/भंकस करणार्‍या पोस्टच लिहितो असा आक्षेप घेतात. मी विस्ताराने लिहावे असा त्यांचा आग्रह असतो. गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा मी तसे लिहितो तेव्हा ते - बहुधा ’एवढं मैलभर लिहिलेलं कोण वाचणार?’ म्हणून - त्या पोस्टवर फिरकत नाहीत. बहुधा जे तुमच्याकडे नाही त्याचा आग्रह धरणे हा ही एक सिंड्रोमच असावा. गंभीर वा मुद्द्याधारित लिहिले तरी त्याचे काय होते याचा माझी कालची पोस्ट आणि आनंदची आजची पोस्ट हा उत्तम वस्तुपाठ ठरावा.

’वार्‍यावरची वरात’ (चला या पोस्टवर आता यावर चर्चा करु) मधला तपकिरीचा फिरता विक्रेता (तपकिरीची उपयुक्तता किंवा आमचे आजोबा कसे तपकीर ओढत यावर एक प्रतिसाद होऊन जाऊ दे.) म्हणतो तसे ’सीरियस माल खपत नाही आमच्या गावात.’ किंवा ’आम्हाला आपले सस्त्यात मजा पाहिजे’ असेच फेसबुक आणि फेसबुकींचे धोरण असते. राजकीय पोस्ट यासाठीच लिहिल्या जातात. मी ही भंकस करत बसतो ते त्यासाठीच. इथे तोच माल खपतो. उरलेला आमचा माल आम्ही खपवायच्या फंदात पडत नाही.

आता यावर ’म्हणजे तुम्हाला हवे तेच प्रतिसाद आम्ही लिहायचे वाटतं’ असा दोष तुमच्या माथी मारणारा प्रतिवाद येणारच आहे. भंकस करण्यासाठी लिहिलेली पोस्ट कुठली आणि गांभीर्याने घेण्याची कुठली याचे तारतम्य विकसित करणे आवश्यक; लेखनातील मुद्दा कोणता हे समजून घेणे, त्याशिवाय त्यातील शब्दांवर, उल्लेखांवर भौगोलिक, वैय्याकरणीय, ऐतिहासिक, अनुवंशशास्त्रीय, रासायनिक अशा आपल्या मनाला वाटेल त्या दृष्टिकोनातून न लिहिणे इतके करणे जमले तर पहा असे म्हणण्याखेरीज फारसे काही करता येण्यासारखे नाही.

-oOo-


हे वाचले का?

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

Punchतंत्र: बेडकांचा राजा

एकदा बेडकांना आपल्याला राजा हवा असे वाटू लागले...

ते देवबाप्पाकडे गेले. ते म्हणाले, 'आम्हाला राजा हवा.' देवबाप्पाने त्यांना एक लाकडाचा ओंडका दिला. त्याला मिरवणुकीने आणून त्यांनी राजा बनवले. हा राजा काही न करता एका जागी पडून असे. थोडक्यात, बेडकांना आपले आहार-भय-निद्रा-मैथुन लिप्त आयुष्य जगण्याची मोकळीक त्याने दिली होती.

पण मग बेडकांना वाटू लागले की ’ह्यॅ: हा कसला राजा. याच्या राज्यात काहीच ’हॅपनिंग’ नाही.’ मग त्यांनी ठरवले की पुन्हा देवबाप्पाकडे जाऊन नवा राजा मागायचा. ते म्हणाले, ’आता आम्हाला असा बाहेरुन आणलेला राजा नको. आमच्या तळ्यातला किंवा निदान आमच्यासारखाच जलजीवी असा एखादा राजा द्या.’ देवबाप्पाने त्यांचे म्हणणे ऐकले. त्याने एका बगळ्याला त्यांचा राजा म्हणून पाठवले.

हिरवट-मळकट रंगांच्या बेडकांना त्याचा पांढराशुभ्र रंग पाहून ’आपला राजा होण्यास याहून लायक कोण असणार?’ असे वाटू लागले. एकमेकाला तसे सांगून ते ’हा राजा भारी आहे.’ म्हणू लागले. हा राजा अधून मधून आकाशातून एखादी लहानशी चक्कर मारुन येई. त्या त्याच्या ’भरारीला’ पाहून बेडूक खूश होत. ’बघा आमचा राजा’, ते म्हणत.

TheKingAndTheSubject
छायाचित्र: Mike Corey

बरेचदा हा राजा एक पाय मुडपून तळ्यात ध्यानस्थ उभा असे. जेव्हा तो तसा उभा असतो तेव्हा तळ्यातील माशांची, बेडकांची संख्या घटते, असे काही चाणाक्ष बेडकांच्या लक्षात आले. त्यांनी इतर बेडकांना सावध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ’तुम्हाला आपल्या समाजाचं नि तळ्याचं काही भलं झालेलं बघवत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा खोड काढत असता. 'खुद्द देवबाप्पाने दिलेला हा राजा असे कसे करेल?’ म्हणून त्यांनी धुडकावून लावले. काहींनी त्याहीपुढे जाऊन तळ्यातले काही मासेच ’दुर्दरभक्षी’ झाले असल्याचा संशय व्यक्त केला. असल्या परप्रांतीयांना ताबडतोब तळ्यातून हाकलून देण्याची मागणी त्यांनी राजाकडे केली. राजाने नेहमीप्रमाणे त्यावर मौन धारण करुन एक लहानशी फ्लाईट पकडून तो शेजारच्या झाडावर जाऊन बसला. राजाची ही भरारी गरुडापेक्षाही भारी होती, असे काही बेडकांनी एकमेकांना पटवून दिले.

आणखी काही महिने गेले आणि बेडकांची, माशांची संख्या आणखी घटू लागली. दरम्यान नवा राजा आपल्या आणखी काही भाईबंदांना घेऊन आला. त्यातला एक त्याचा विशेष लाडका होता. आल्याआल्या त्याने प्रत्येक बेडकाने आपले खाणे प्रथम राजासमोर आणून ठेवले पाहिजे, मग राजेसाहेब त्यातून सर्वांना न्याय्य वाटप करतील असे सांगितले. त्यातून अनेक बेडकांनी चिखलात दडवून ठेवलेले अतिरिक्त खाणे बाहेर येईल नि प्रत्येकाला पोटभर मिळेल असा त्याचा दावा होता.

रोजचे अन्न त्या त्या दिवशीच मिळवून खाणार्‍या बेडकांना ’हां. म्हणजे कुणीतरी जास्त खाते म्हणून आम्हाला हल्ली पोटभर मिळत नाही.’ असा साक्षात्कार झाला. ’बरे झाले राजाने बरोबर कारण शोधून त्यावर उपाय केला ते. खरे तर यामुळे होणार्‍या उपासमारीतून काही बेडकांचे निधन होत आहे. पण याचा फायदा घेऊन काही दुर्दरद्रोही बेडूक 'राजाच त्यांना गट्ट करतो' असा अपप्रचार करत आहेत.’ असे ते म्हणू लागले.

त्या दिवसापासून सर्व बेडूक आपापले अन्न प्रथम राजाकडे आणून देत. त्यानंतर तो देईल तो वाटा घेऊन तो भक्तिभावाने भक्षण करीत आणि म्हणत, ’साठवणखोर आणि दुर्दरद्रोही बेडकांची कशी जिरवली राजाने’. राजाकडून परत मिळणारा वाटा जसजसा कमी होत गेला तसतसे पुरेसे अन्न न मिळाल्याने काही बेडूक दुर्बळ होऊ लागले, काही मेले.

’दीर्घकालीन फायद्यासाठी मेलेल्या बेडकांचे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही,’ अशी गर्जना राजाने केली. अर्धपोटी बेडूक खूश झाले. हे दुबळे बेडूक वेगाने नाहीसे होऊ लागले. ’दुबळ्यांची शिकार अधिक सोपी असते. शिकारी नेहमी अशाच दुबळ्यांवर नजर ठेवून असतात.’ असे चाणाक्ष बेडकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण राजनिष्ठ बेडकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. 'दुर्दरराष्ट्राच्या व्यापक हितासाठी कुणीतरी बलिदान करायला हवे' हे त्यांना पुरेपूर पटले होते. एवढे होऊनही ते साठवणीखोर बेडूक नक्की कोण होते/आहेत हे बेडकांना कधीच समजले नाही.

यानंतर ’तळेच श्रेष्ठ आहे, जमिनीचा मोह धरु नका, तो तुमच्या अध:पाताला कारणीभूत ठरला आहे नि भविष्यातही ठरेल’ असे राजाने बजावल्याने सारे राजनिष्ठ बेडूक जमिनीवर पाऊल ठेवेनासे झाले. पण त्यामुळे जमिनीवरच्या अन्नाचा पुरवठा थांबल्याने, त्यांच्या अन्न संग्रहाला ओहोटी लागली होती. पण या कामचुकारपणाबद्दल राजाने त्यांची कान उघाडणी केली, आणि स्वत:चा राखीव हिस्सा दुप्पट करुन ’व्यापक हितासाठी हे आवश्यक आहे असे बजावले. अन्नाचा हिस्सा कमी झाल्याने राजनिष्ठ बेडूक शारीरिकदृष्ट्या आणि म्हणून मानसिकदृष्ट्या आणखीनच दुबळे होत गेले.

पण काही बंडखोर मात्र ’आपण उभयचर आहोत. पाण्यासोबतच जमिनीवर राहण्यासाठीच आपल्या शरीराची जडणघडण आहे.' असे म्हणत राजाचा सल्ला धुडकावून लावू लागले. हे बेडूक आपण उभयचर असल्याचा फायदा घेऊन जमिनीवरील अन्नही मिळवत असत. दिवसेंदिवस घटत चाललेल्या तळ्यावर अवलंबून राहून जगणे हा मूर्खपणा आहे हे त्यांना पटले होते. आणि नेमक्या अशाच परिस्थितीत 'केवळ तळ्यातच राहा’ म्हणणारा राजा बेडकांच्या विनाशाला कारणीभूत होणार आहे, अशी त्यांची खात्रीच झाली होती. याबद्दल स्वत:ला खरे दुर्दरनिष्ठ म्हणणारे, वास्तवात राजनिष्ठ असणारे त्या बंडखोरांना तुच्छपणे ’अर्बन दुर्दर’ म्हणू लागले. जमिनीवरही जात असलेल्या या बंडखोर बेडकांना असा शोध लागला की साठवणीखोर बेडूक नावाचे कुणी नव्हतेच. उलट जे अन्न बेडूक आणून देत ते राजाचे भाईबंद गट्ट करीत किंवा तळ्याबाहेरील त्यांच्या स्वतंत्र जागेवर कुठेतरी नेऊन साठवण करत असतात.

दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती राजनिष्ठ बेडकांना दिसत होती. पण यातून काहीच मार्ग दिसत नव्हता. त्यातून ते चिरडीला येत होते. राजा यातून काही मार्ग काढेल अशी त्यांना आशा होती. पण तसे काही घडताना दिसत नव्हते. तरीही आपल्या निष्ठेला जागून आपल्या या विपन्नावस्थेचे हुकमी कारण त्यांनी शोधून काढले होते. "खुद्द देवानेच पाठवलेल्या राजाच्या आदेशाची पायमल्ली करून हे 'अर्बन दुर्दर' जमिनीवर जातात म्हणून देवाचा कोप होतो. आणि म्हणून त्याने आपले अन्न-पाणी कमी करण्याची शिक्षा आपल्याला दिली आहे." असे ते म्हणू लागले. राजाच्या नि राजाच्या भाईबंदांच्या अन्न -साठवणुकीबद्दल बंडखोर बेडूक जेव्हा त्यांना सावध करु लागले, तेव्हा हे दुबळे बेडूक आपली उरलीसुरली ताकद एकवटून ओरडत, "मग काय तुम्हाला पुन्हा लाकडाचा ठोकळा आणायचाय का?"

बंडखोर मात्र चिकाटीचे आहेत. त्यांनी आजची नाही तर निदान पुढची पिढी शहाणी व्हावी म्हणून "राजा भिकारी, आमचे अन्न घेतले" अशी घोषणा देत ’राजा चोर आहे’ अशी मोहीम सुरु केली आहे. राजा नि त्याचे भाईबंद पोटभर खातात, आपल्या पुढच्या पिढीसाठी साठवूनही ठेवतात. दुबळे होत जाणारे राजनिष्ठ बेडूक आपले अन्न राजा नि त्याच्या भाईबंदांच्या चरणी अर्पून ’राजाने साठवणीखोर बेडकांची कशी वाट लावली.’ याच्या गोष्टी उपाशीपोटी एकमेकाला सांगत असतात.

दरम्यान ’आपला राजा स्वत: निवडता येतो. किंबहुना राजा असण्याची आवश्यकताही नाही.’ याची अक्कल बेडकांना अजूनही न आलेली पाहून देवबाप्पा गालातल्या गालात हसत असतो.

-oOo-


हे वाचले का?

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

कप के बिछडे हम आज...

एखादा सुरेखसा चित्रपट नुकताच मिळालेला असतो. रात्री जेवणानंतर किचनची कामे पटापट उरकून तुम्ही चित्रपट पाहायला जाऊ असे मनचे मांडे खात असता. सफाई करत असताना नुकत्याच आणलेल्या सहा कपांच्या सेट मधला एक कप तुमच्या हातून निसटतो, सुमारे तीन-साडेतीन फुटावरुन सरळ जमिनीवर आदळतो. आणि दोन तीन भक्कम टप्पे खात पाचेक फुटावर जाऊन विसावतो. इतका मार खाऊन त्या कपाचा कानच फक्त तुटतो.

आता तुमच्यासमोर ’याचे काय करावे?’ हा यक्षप्रश्न उभा राहतो.

BrokenHandleCup
alittlechange.com.au येथून साभार.

हा कप आता बाद झाला म्हणून टाकून द्यावा तर त्याची एक बाजू पाहता ते अवघड दिसते. एकतर नवा आहे, त्यात कानाचा गेलेला बळी वगळता त्यात इतका मार खाऊनही टवकाही न उडालेली बॉडी भक्कम असल्याचा पुरावा देत असते. त्याचबरोबर किचनचे अन्य भागधारक तो बहिरा कप चहा खेरीज अन्य काही द्रवपदार्थ साठवता येत असल्याचा फायदा समोर ठेवून त्याला फेकून देण्यास विरोध करणार याची तुम्हाला पक्की खात्री असते...

पण दुसरीकडे साधा कागद कापतानाही ९० म्हणजे नव्वदच अंशात कापला गेला पाहिजे इतके दुराग्रही असलेले तुम्ही; त्याचा तो तुटका कान तुम्हाला कायमच ’अपुरेपणही लगे’ ची आठवण करुन देत समोर ठाण मांडून बसणार नि कायमचा त्रास देणार हे ही लक्षात येते...

तिसरा पर्याय म्हणजे हातून निसटून पडला त्यावेळीच कानासोबत त्याचे काही तुकडे झाले अशी बतावणी करता यावी म्हणून त्या कपावर बत्ता, हातोडी वा तत्सम वस्तूने प्रहार करुन एक-दोन तुकडे पाडावेत. पण सशाहूनही कोमल हृदयाचे असल्याने तुमच्या हातून असा विध्वंस होणे शक्यच नसते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वैर्‍यासमोरही असे अवघड प्रश्न उभे राहू नयेत हो कधी.

- oOo -


हे वाचले का?

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

वारसदारांचा अपकर्ष !

कर्जाच्या विळख्यात अडकलेले अनिल अंबानी यांची रिलायन्स एनर्जी ही कंपनी अखेर अदानींच्या छावणीत दाखल झाली. ग्राहक विजेची बिलं भरायला रांगेत उभे राहिले, "रिलायन्स'च्या जागी ‘अदानी’ हे नाव त्यांना दिसले! दुसरीकडे केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या त्यांच्या कंपनीला सरकारी आशीर्वादाने राफेल विमानांच्या उत्पादनाचे मिळालेले कॉन्ट्रॅक्ट हा राजकीय वर्तुळात सर्वाधिक वादग्रस्त (अगदी बोफोर्सपेक्षाही) प्रश्न बनला. धीरूभाईंच्या मृत्यूनंतर ज्यांच्याकडे त्यांचा खरा वारस म्हणून पाहिले गेले त्यांचीच उतरती भाजणी सुरू झाली.

राजकारणात असो की व्यावसायिक क्षेत्रात, एका पार्टीच्या दोन पार्ट्या झाल्या की नकळत आपण म्हणजे समाज एका बाजूला झुकतो. अमुक एक हाच खरा वारसदार असे आपण समजू लागतो. पुढे हाच प्रगती करेल नि दुसऱ्या बाजूला माघार घ्यावी लागेल, असा काहीसा आपला होरा असतो. अनेकदा यात त्या त्या व्यक्तीची जाहीर छबी किंवा त्याने उभी केलेली आपली प्रतिमा यांचा मोठा वाटा असतो किंवा आपल्या विचारात संस्कृती वा परंपरा यांच्या रूपाने रुजवलेले पूर्वग्रह असतात.

भारतातील बहुतेक राजकीय पक्ष हे एकचालकानुवर्ती कार्यपद्धती असलेल्या घराणेशाहीवरच चालतात. पक्षाच्या प्रमुख नेत्याचा मुलगा, मुलगी, पत्नी, नातू, अजून शेंबूड पुसता न येणारा पणतू हे त्याचे जन्मसिद्ध वारस मानले जातात. ‘एन. टी. रामाराव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी वा मुलगा हेच त्यांचे वारस असतील. चंद्राबाबू नायडू या त्यांच्या जावयाला पारंपरिक भारतीय मनात असणाऱ्या त्या सहानुभूतीच्या लाटेपुढे टिकाव धरता येणार नाही’ असे म्हणणाऱ्यांना आणि आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना संपूर्ण धोबीपछाड देऊन चंद्राबाबूंनी आपला पक्ष काढला, इतकेच नव्हे तर तीन वेळा मुख्यमंत्रीपदही भूषवले. एन. टी. आर. यांच्या पत्नीचा ‘मूळ’ पक्ष अखेर चंद्राबाबू यांच्या पक्षात विलीन होऊन संपला! एन.टी.आर. यांच्या मुलांना तर राजकारणात बस्तानच बसवता आले नाही. अशीच किमया तमिळनाडूमध्ये जयललिता यांनी अण्णाद्रमुकबाबत साधली. मात्र चंद्राबाबूंनी आंध्रात केलेली किमया राज ठाकरे यांना महाराष्ट्रात साधली नाही.

TheThackreys

‘बाळासाहेबांचा वारस कोण?’ या प्रश्नाचे अध्याहृत उत्तर ‘राज ठाकरे’ हेच होते. उद्धव ठाकरे हे खिजगणतीतही नव्हते कुणाच्या. त्यामुळे बाळासाहेबांनी उद्धव यांना आपला वारस घोषित केले तेव्हा इतकी वर्षे सोबत असलेल्या राज यांच्यावर अन्याय केल्याची भावना अनेकांच्या मनात उमटली होती. राज यांनी वेगळी चूल मांडली तेव्हा ‘मनसे’च कदाचित मोठी होऊन शिवसेनेची जागा घेईल आणि हळूहळू सेनेचे लोक इकडे येऊन मूळ सेना दुय्यम होऊन जाईल, असे बहुतेकांना वाटले. या वाटण्याला राज यांचा करिष्मा आणि उद्धव यांच्याबद्दलची अनभिज्ञता यापलीकडे काहीच आधार नव्हता.

जरी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मिळालेली ‘पुढे चाल’ आणि आयता मिळालेला पक्ष या दोन गोष्टी उद्धव यांना मिळालेल्या असल्या, तरी त्यांनी युती तोडूनही आपल्या आमदार संख्येत केलेली वाढ आणि त्याच वेळी राज ठाकरे यांना निवडणुकीच्या राजकारणातच नव्हे, तर एकूणच राजकारणातच आलेले अपयश पाहता, हा होरा चुकला आहे हे पुराव्यानिशी म्हणता येते. आता एक बाजूला, मोदी लाटेने भारावून जाऊन लोकसभेच्या वेळी त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन आत्मघात ओढवून घेणारे राज ठाकरे आहेत, तर दुसरीकडे भाजप हाच किंवा निदान हाही आपला प्रतिस्पर्धीच आहे हे ओळखून त्याला कायम शिंगावर घेण्याची भूमिका स्वीकारलेले उद्धव ठाकरे आपली भूमी वाचवू पाहत आहेत.

राज यांना सामाजिक वा राजकीय अशी भूमीच निर्माण करता आलेली नाही हे त्यांचे मोठे अपयश आहे. ‘मराठी अस्मिता’ ही हिंदू अस्मितेच्या नि विकासाच्या भूलभुलय्यामध्ये पाचोळ्यासारखी उडून गेली नि राज यांचा मुद्दा संपला. आज नवी भूमिका, नवी भूमी शोधताना ते चाचपडताना दिसत आहेत. इकडे रिलायन्स पॉवर, रिलायन्स एनर्जी या दोन कंपन्यांच्या माध्यमांतून मूळ ‘रिलायन्स’ला टक्कर देऊ पाहणारे अनिल अंबानी यांना तो संघर्ष पेलला नाही. उलट ‘जिओ’च्या माध्यमांतून अभिनव योजना राबवून थोरल्या अंबानींनी ‘RCOMM’च्या अपयशाला अधिकच अधोरेखित केले. त्या त्या क्षेत्रांतले तज्ज्ञ या दोन्ही वारसदारांच्या घसरगुंडीचे आपापल्या परीने मूल्यमापन करतीलच, पण ते करत असताना त्यांच्या या स्पर्धक वारसदारांच्या यशाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यातूनच कदाचित यांच्या अपयशाची कारणे अधिक स्पष्टपणे समजून येतील, अशी शक्यता आहे.

TheAmbanis

धीरूभाईंच्या पश्चात जेव्हा व्यवसायाची दोन बंधूंमध्ये विभागणी झाली, तेव्हाही तरुण आणि तडफदार या विशेषणाने ज्यांचे वर्णन केले जाई, असे धाकटे अंबानी हे थोरल्या भावाच्या सहज पुढे जातील, असा अनेकांचा पक्का समज होता. त्यांच्या फिटनेसबद्दलच्या आग्रहाच्या, हाताखालच्या व्यक्तींसोबत कणखर पण आपलेपणाच्या वर्तनाचे किस्से चर्चिले जाऊ लागले होते. (यात कुठेतरी हिंदी हिरोईन ‘पटवली’ या यशालाही काही जण मोजत असावेत.) त्या तुलनेत “अनफिट’ भासणाऱ्या थोरल्या अंबानींची छबी फारशी प्रॉमिसिंग नव्हती.

पण आज इतक्या वर्षांनंतर गाळात रुतलेला धाकल्या अंबानींचा रथ आणि थोरल्या अंबानींची घोडदौड पाहता सुरुवातीची अपेक्षा पूर्ण चुकीची ठरली आहे. धाकट्या अंबानींची ‘रिलायन्स पॉवर’ ही कंपनी मूळ रिलायन्स इंडस्ट्रीजला पाहता पाहता मागे टाकून एक मोठी ‘कॉन्ग्लमरेट’ म्हणून उभी राहील, असे स्टॉक मार्केटमध्ये बोलले जात होते. सोबतच असलेली रिलायन्स एनर्जी (जी आज अदानींनी ताब्यात घेतली), प्रथम तिरोडकरांना विकलेला टॉवर बिजनेस, मग थोरल्या बंधूंनी विकत घेऊन वाचवलेली आरकॉम आणि तरीही शिल्लक राहिलेले भले थोरले कर्ज, अशा एक एक पायऱ्या ते उतरत गेले आहेत. त्या गाळातून बाहेर पडण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी केलेले साटेलोटे, त्यातून आर्थिक बदनामीसोबतच पदरी पडत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, या दलदलीत धाकले अंबानी खोल खोल रुतत जात आहेत.

आजच्या राजकारणातले विविध ध्रुव पाहिले, तर राज ठाकरेंच्या पक्षाला फारसे स्थान उरलेले नाही, आज त्या पक्षाला उर्जितावस्था यावी, यासाठी राबवायला राज यांच्याकडे कोणतेही धोरण दिसत नाही. धाकल्या अंबानींनीदेखील सत्ताधाऱ्यांशी लगट करून राफेल किंवा रशियन मिसाइल्सची कॉट्रॅक्ट मिळवली असली, तरी ती पार पाडण्यास लागणारे तांत्रिक कौशल्य त्यांच्याकडे आज नाही. मिळवणे नि राखणे यातला फरक मोठा असतो आणि त्यांचा तोल राखण्यास कशी दमछाक होते याचा पुरेपूर अनुभव राज आणि अनिल अंबानी दोघेही आज घेत असतील. त्यांच्या करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याने आता त्यांच्या भावी यशाला अधिकच स्वच्छ नि सुस्पष्ट स्वरुपात समोर यावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्या गाडीला पुढचा सिग्नल मिळणे अवघड असणार आहे

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दै.'दिव्य मराठी’- रसिक.)


हे वाचले का?

भेकड नेते आणि शेंदाड शिपाई

ज्या लोकांना वाटतं किंवा वाटत होतं की महात्मा गांधीजींना मारलच पाहिजे होतं, त्यांना ’जिना आणि माऊंटबॅटन (किंवा त्यांचे पूर्वसुरी) यांना का मारलं नाही?’ असा प्रश्न पडत नाही. याचं एक कारण म्हणजे विचार करणे त्यांच्या रक्तात नसते हे तर आहेच पण त्या पलीकडे मुळात गांधींबद्दल द्वेष असणार्‍यांच्या प्रचाराला बळी पडलेले असतात. या प्रचारकांच्या द्वेषामध्ये एका बनियाने आपल्या सारख्या जन्मजात श्रेष्ठींऐवजी देशातील जनतेचे नेतृत्व करावे ही अहंकाराला बसलेली मोठी ठेच मुख्यत: कारणीभूत असते. आता ज्यांना जिना किंवा एखादा ब्रिटिश अधिकारी ठार मारण्याऐवजी गांधींवर हत्यार चालवणे, त्यांची हत्या करणे अधिक महत्वाचे का वाटत असावे? याचे एक कारण म्हणजे त्यांना परिणामापेक्षा श्रेयाची अधिक आस होती हे नंतर दिसून आले आहे.

ज्यांना असं वाटत होतं किंवा वाटतं ते प्रामुख्याने नक्की काय करावं या संभ्रमात असलेले, सुमार विचारशक्तीचे आणि भेकड लोक असतात. त्यामुळे त्यांचा बळी म्हणून ते नि:शस्त्र म्हातार्‍याची निवड करतात. कुणाला तरी मारल्याने आपण काहीतरी केले इतके समाधान त्यांना हवे असते.

बुश नाही का ९/११ चा राग म्हणून एका देशाचा विध्वंस घडवतो आणि त्याचे नागरिक 'वा रे पठ्ठे’ म्हणून शाबासकी देतात? वास्तविक इराकचा काय संबंध होता? पण काहीतरी केले पाहिजे म्हणून कुणावर तरी गोळ्या झाडायच्या आणि सूड घेतल्याचे समाधान मानायचे. बरं हे करायचे तर मग ज्याला मारला तोच दोषी असा कांगावा करावा लागतो. बुशने 'वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’चा बागुलबुवा उभा केला. पण ९/११ इराकने घडवले का? असा प्रश्न ’वॉर ऑन टेरर’ च्या धुंदीत मग्न झालेल्या बहुसंख्य अमेरिकी नागरिकांनी विचारला नाही. माध्यमांनी या दोन्हींचा संबंध आहे असा संभ्रम निर्माण केला नि काम झाले

SocialMediaTroll
भाष्यचित्रकार : आर. के. लक्ष्मण.

भारतातही म्हातार्‍याला ठार मारायचे त्यातून आपले तथाकथित शौर्य सिद्ध करण्यासाठी तोच गुन्हेगार हे सिद्ध करायचे असा फंडा वापरला गेला.

अमेरिकेत माध्यमांचा वापर करावा लागला. गॉसिप आणि चारित्र्यहनन प्रेमी भारतीय समाजात कुजबूज तंत्र अधिक सोपे नि बिनखर्चाचे होते, ते वापरले गेले. जिना किंवा ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार मारून येणारा बॅकलॅश सहन करण्याची हिंमत या भेकडांत नव्हती. म्हणून (१) स्वातंत्र्य मिळाल्यावर, म्हणजे 'ब्रिटिश सत्ता गेल्यावर' (त्यांच्या राज्यात हिंमत झाली नाही) (२) टार्गेट म्हणून नि:शस्त्र म्हातार्‍याची निवड करुन यांनी आपले शौर्य (?) दाखवले.

आजही यांचे नेते व्यासपीठावरुन गर्जना करणारी, चिथावणारी भाषणे करतात आणि नंतर ’जमाव आमच्या नियंत्रणात राहिला नाही होऽ’ म्हणून रडारड करतात. केल्या कृतीची जबाबदारी घेऊन त्याचे परिणाम भोगण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्यातून क्षणिक भ्रमित कार्यकर्ते खटले अंगावर घेऊन पस्तावतात नि हे नामानिराळे राहून तिथून पळ काढतात आणि आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांमधे आपणच कसे हे केले याच्या गमजा करत बसतात.

यांच्या शौर्याचीच नवी आवृत्ती दोन तीन वर्षांपूर्वी आम्हाला एनएफएआय मध्ये पाहायला मिळाली. काही स्थानिकांनी कबीर कला मंचाचा कार्यक्रम तिथे आयोजित केला होता. आता कबीर कला मंचावर काही शूरवीरांचा(!) आरोप असा की ते नक्षलवादी आहेत. (ते तसे आहेत की नाहीत या दोन्हींबाबत मी अनभिज्ञ आहे. त्यावर चर्चा नको.) त्यामुळॆ त्यांना ’धडा शिकवायला’ म्हणे एका शूर विद्यार्थी संघटनेचे लोक तिथल्या झाडीत लपून बसले. कार्यक्रम संपल्यावर, कला मंचाचे सारे कलाकार आणि सदस्य निघून गेल्याची खात्री झाल्यावर हे शूर मावळे हर हर महादेव म्हणत प्रगटले नि स्थानिक आयोजकांपैकी एक दोघांना मारु लागले आणि लगेच फरारही झाले. दुसर्‍या दिवशी स्थानिक ’राष्ट्रभक्त’ वगैरे म्हणवणार्‍या माध्यमांनी ’धडा शिकवला’ असा मथळा देऊन बातमी केली.

जसे यांच्या पूर्वसुरींनी जिना वा ब्रिटिशांशी पंगा घेण्याचे धाडस केले नाही तसेच इथे ज्यांच्यावर हे आरोप करतात त्या कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे धाडस केले नाही. उगाच एखादा फटका आपल्याला बसला तर डोळे पांढरे व्हायचे. हास्पिटलात भरती व्हायची वेळ यायची.

यांच्या शौर्याच्या पातळीचे एक उत्तम उदाहरण नुकतेच फेसबुकवर पाहायला मिळाले. यांतलेच एक शूरवीर घरबसल्या हातात वर्तमानपत्राची सुरळी घेऊन एका कोळशाला बडवत बसले होते. ते चित्र अत्यंत बोलके होते असे आमचे मत झाले.

-oOo-


हे वाचले का?

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

शर्विलकाचा प्रतिशंखनाद आणि जमाव

आपले सब्जेक्ट्स* कुठेतरी एक पायरी वर चढताहेत, यातून कदाचित आपल्या स्थानाला धक्का बसू शकतो याची जाणीव झालेल्या वर्चस्ववाद्यांच्या चलाख मांडणीचे ट्रम्प यांनी उत्तम उदाहरणच सादर केले आहे. संख्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी नेहमीच आकडेवारीला प्राधान्य देतो. तिच्या अभावी केलेली विधाने, काढलेले निष्कर्ष, केलेले आरोप हे केवळ पूर्वग्रहांचे नि स्वार्थाचे अपत्य असतात. (अर्थात अलीकडे खोटे आकडेही तोंडावर फेकण्याची अहमहमिका सुरु झालेली दिसते. त्यामुळे त्या आकड्यांची विश्वासार्हता हा ही एक कळीचा मुद्दा ठरतो.)

आमच्या गटावर झालेला एक अन्याय हा आमच्यावरील नियमित होत असलेल्या अन्यायाचे उदाहरण आणि तुमच्यावर होत असलेल्या दहा अन्याय, अत्याचारांची उदाहरणे मात्र अपवाद आहेत’ हा चलाख तर्क पुरुषी वर्चस्ववादी, जातीय वर्चस्ववादी, धार्मिक वर्चस्ववादी, प्रांतिक वर्चस्ववादी, भाषिक वर्चस्ववादी कायम करताना दिसतात. परस्परांच्या विरोधात उभे असलेल्या गटांनाही ’चला आपण आकडेवारी जमा करु नि एकदाचा सोक्षमोक्ष लावू कोण शोषक नि कोण शोषित याचा’ असे म्हटले तर दोन्ही बाजू ते अमान्य करतात. कारण पर्सेप्शन हे त्यांचे हत्यार आहे. ते नाहीसे झाले की त्यांच्या गटाच्या राजकारणाला धक्का बसतो.

मला ’असे असावे’ असे वाटते तेव्हा मी ठासून ’असे आहेच’ हे सांगून माझ्यासारख्याच मानसिकतेच्या कमकुवत मनाच्या, अन्य गटाबद्दल (कदाचित त्यातील एका व्यक्तीबद्दल आणि म्हणून सरसकटीकरणाने पूर्ण गटाबद्दल) अढी वा द्वेष असणार्‍यांचा जमाव जमवू शकतो, त्याच्या आधारे माझ्या स्वार्थानुकूल खेळ्या खेळू शकतो हे बहुतेकांना ठाऊक असते. आपण शोषित असल्याचा हा वर्चस्ववाद्यांचा ’शर्विलकाचा प्रतिशंखनाद’ मूठभरांचा असला तरी माध्यमे, हत्यारे अनुकूल झाली की वास्तवाच्या, बहुसंख्येच्या आभासात रूपांतरित करता येतो आणि शोषकांनाच शोषित असल्याचे सर्टिफिकेट मिळून जाते.

आपल्याकडे जात आणि धर्म या दोन्ही हत्यारांचा वापर करुन केलेली ही शोषित असल्याची ओरड आपण अलीकडे अनुभवत आहोतच. आपले दुर्दैव हे की ट्रेवर नोआ सारखे स्पष्टवक्ते आपल्या माध्यमांतून फारसे उरलेले नाहीत. राजकीय, जातीय, धार्मिक, वांशिक, प्रांतिक नि भाषिक गुंडांपुढे शेपूट घालून बसलेले वा सरळ सरळ त्यांची दलालीच करणारे किंवा त्यांनी टाकलेले तुकडे चघळण्यात धन्यता मानणारे, नव्हे ती अभिमानाने मिरवण्याची बाब मानणारे बरेच दिसू लागले आहेत.

(*याची व्याप्ती कायम राखून केलेला अनुवाद माझ्याकडे नाही. जे प्रतिशब्द आहेत ते त्याची व्याप्ती घटवतात. इथे तर ते मला अजिबातच चालणार नाही.)
---


हे वाचले का?

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

ब्रह्मांडाचे वांझ अंडे

CosmicEgg
ब्रह्मांडाच्या अंड्याला
फलित न करु शकलेला शुक्राणु
विश्वाच्या पसार्‍याला रचून ठेवता येईल
इतक्या विस्ताराचे कपाट

कपाटाला पुन्हा विश्वातच जागा
द्यावी लागेल ही कॅच-२२ सिचुएशन
हे सारे आपल्याच जबाबदारीचा भाग
असे समजणारा कुणी मी

क्रोएशियाच्या राजधानीत मिळणारे बेकन
कुर्डुवाडीच्या स्टेशनवर मिळणारे बेसन
राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नावर
नेमके मूग गिळून बसणारे बंडातात्या...

डायनासोरची वंशावळ सांगणारे
आणि ’कृण्वन्तु विश्वमजुरासिकं’ ची
गर्जना करणारे क्रीट काका
त्यांना ’डायनासोर जुरासिक काळात नव्हते’
असं सांगत मोडीत काढणारे
शेरसिंग समीक्षक

पाण्याच्या एका थेंबासरशी
विरघळणारी काळी आई
आणि ’आईन्स्टाईनच्या बैलाला ढोल’
म्हणणारे संशोधक गोमयानंद सरस्वती
रक्ताचा थेंब पाहून भोवळ येणारे
पण इतरांच्या रक्ताचे पाट वाहवू
इच्छिणारे मॅक्डोनल्ड काका

जगाची उसवलेली गोधडी शिवून देणार्‍या
’विश्वमाता टेलर्स’च्या जाधव काकू
रक्तकोमल पहाटेचा रंग नारिंगी झाला म्हणून
मोसंबीच्या संगतीने शोक व्यक्त करणारा श्रीपाद

या सार्‍यांची भेळ म्हणजे आमचा मनुष्य समाज !

 - रमताराम

- oOo -

तळटीप: ’साहित्याचे वांझ(?) अंडे’ या शीर्षकाखाली या कवितेबाबत थोडे विवेचन याच ब्लॉगवर वाचता येईल.


हे वाचले का?

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

’आधार’ जीवा...

सर्वप्रथम व्यक्तिस्वातंत्र्याचा यथायोग्य वापर केल्याबद्दल न्या. चंद्रचूड यांचे अभिनंदन. परंतु याचा अर्थ मी त्यांच्याशी सहमत आहे असा मात्र नाही. (हे दोन्ही एकाच वेळी कसे असू शकते हे काहींच्या चटकन ध्यानात येणार नाही. पण पुढे वाचा.)

AadharFraud

धन-विधेयक म्हणून पास करणे आणि टेलिफोन/बँक सक्तीबाबत त्यांच्या मताशी सहमत. पण सरकारी योजनांबाबत नाही.

जर खासगी बँका कर्ज देताना आपली नियमावली तयार करु शकतात तर सरळसरळ सहानुभूती म्हणून, तुमची जबाबदारी स्वीकारुन सवलती देऊ करणारे सरकार आधारची सक्ती का करु शकत नाही? त्या योजनांचा गैरवापर टाळण्यासाठी, सुसूत्रपणे ती राबवण्यासाठी, प्रत्येक लाभधारकाला युनिकली आयडेन्टिफाय करण्यासाठी आधार चा वापर सक्तीचा केला तर काय चूक आहे? बँका साल्या तुमच्याकडून कर्जावर व्याज घेतात नि वर तुमचे ते घर मॉर्गेज करुन घेतात, तुमच्या सिबिल स्कोर पासून तुमच्या उत्पन्नाचे सत्राशे साठ पुरावे मागतात. तुम्ही ते निमूटपणे त्यांना देता. बँकेला सॅलरी स्लिप, आयटीआरची कॉपी, फोन नं., पत्त्याच्या पुरावा... अशा ढीगभर गोष्टी देता, वर व्याजही देता, ईएमआय चुकला तर दंडही.

इथे कुणी उलट दिशेने तुमचा फायदा करुन देत असताना काही नियम व अटी घालून दिल्या तर तुम्हाला व्यक्तिगत हक्काचा भंग वाटतो? इथे सरकार तुम्हाला काही सवलती देऊ करणार तर तिथे तुमच्या मांजरीचा वाघ होतो?

न्या. चंद्रचूड म्हणतात की यूआयडीएआय ने ग्राहकांच्या माहिती संरक्षणाची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. हे अगदीच मान्य. ती त्यांनी घ्यायलाच हवी. पण दुसरा मुद्दा असा की जर त्याचा वापर केवळ सरकारी सवलत योजनांपुरता राहणार असेल तर त्या माहितीला फक्त सरकारलाच अ‍ॅक्सेस असणार आहे. अन्य कुठेही मी आधार नं देत नसल्याने किंवा सक्ती नसल्याने इतर कुणाही खासगी पार्टीला या माहितीला अ‍ॅक्सेस देणे यूआयडीएआयला बंधनकारक नसल्याने ते सरसकट नाकारु शकतात. आता ही सारी माहिती केवळ सरकारपुरती राहते. (हॅकिंगचा मुद्दा वेगळा आहे. ते बँकेचेही होते. म्हणून आपण कागदी लेजरवर पुन्हा कामाला सुरुवात करा म्हणत नाही.) मग आक्षेप कशाचा आहे.

(व्हॉटअबाउटरी सुरु) आज मी जेव्हा एखादा नवीन मोबाईल नं घेतो तेव्हा जो जाहिरातींचा भडिमार होतो त्याचे काय? मी एका बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले की हटकून इतर बँकांचे फोन सुरु होतात, हे कसे? पहिल्या बँकेकडून माझी माहिती 'विकली' गेल्याखेरीज हे शक्य आहे काय? हीच गोष्ट टेलिफोन कंपन्या, ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्स यांचीही आहे. तुमचा मोबाईल नं तुम्ही कोणत्याही एका आस्थापनाकडे दिलात की त्यासारखाच व्यवसाय करणारे अचानक तुमच्याकडे धावू लागतात.(याला अर्थातच तुमचा अँड्रॉईड फोन आणि त्यावरील फुकट अ‍ॅप तसंच गुगलसमोर नागवे होऊन उभे राहण्यास दिलेली कबुली कारणीभूत होते.)

आज मला नको असलेल्या जाहिरातींचा भडिमार थांबवण्याचे कोणातेही साधन माझ्याकडे नाही. दिवसाला न वाचता वीस-पंचवीस मेसेजेस, ईमेल्स डिलीट करत बसणे हे माझ्या वैयक्तिक आयुष्यावर अतिक्रमण आहे असे आम्ही मानत नाही. (डीएनडी ही भंपक सर्विस आहे. न्हाणीला बोळा नि दरवाजा उघडा ही म्हण सार्थ करणारी.) हे सारे खासगी मंडळींचेच प्रताप आहे. त्याबाबत फार काही कलकलाट होत नाही. त्याबाबत काही करावे असा आवाज आम्ही उठवत नाही. पण सरकारने तुम्हालाच सवलती देण्यासाठी माहिती जमवली की 'सिक्युरिटी' म्हणून कलकलाट? तुमच्या माहिती संरक्षणाची कोणती जबाबदारी टेलिकॉम कंपन्या वा बँका घेतात? उलट त्यांच्या फॉर्म्समध्ये त्यांच्या बाजूने इन्डेम्निटी क्लॉज असतात. मग यूआयडीएआय घेत नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे. तुमच्या डोस्क्यावर व्याजाचा बोजा लादणारे ही जबाबदारी घेणार नाहीत, पण सरकारने मात्र तुम्हाला सवलती द्या नि वर ही जबाबदारीही घ्या हा माज कुठला? (व्हॉटअबाउटरी संपली)

आधारच्या खासगी क्षेत्रातील सक्तीला माझा ठाम विरोध आहेच. तिथे माझी माहिती अधिकच उघड्यावर येते, कोणताही अधिकार नसलेले चेहरा नसलेले, ज्यांची ऑथोरिटी कुठे रेजिस्टर्डही नाही अशा व्यक्तींच्या हाती ती जाते. आणि कुणा-कुणाकडे जाते यावर माझे नियंत्रण नसते. प्रॅक्टिकली बाजारात नागवे उभे राहावे अशी स्थिती असते. विशेषत: टेलेकॉम कंपन्यांच्या बाबत. तुमच्या डेटामधील त्यांना शक्य ते सारे विकून ते पैसे करत असतात हे उघड गुपित आहे.

सरकार गैरवापर करणार नाही का? नक्की करणार. सत्ताधारी याचा वापर करुन घेणार. पण तुमच्याकडे सवलती न घेण्याचा पर्याय आहेच. आधार कार्ड काढूच नका. मग तुम्ही सरकारपासून सेफ. किमान इतका पर्याय तरी तुमच्याकडे आहेच. (अर्थात या दीडशहाण्या सरकारने सक्ती करुन त्याच वेळी नवी आधार कार्ड काढण्याचे पर्याय बंद करुन जो छळवाद केला तो काही भरून येत नाहीच. आणि ज्यांनी आधीच हे कार्ड काढले आहे त्यांना पर्याय नाही. पण त्यांचेही जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहेच. त्याबद्दल फारसे काही करता येणारच नाही.)

आयटी रिटर्न्ससाठी काढावे लागेल. पण त्या पलीकडे कुठेच तो नंबर देऊ नका. म्हणजे फार तर सरकारला तुमच्या उत्पन्नाचे स्रोत कळतील. ते तसेही पॅन आणि रिटर्न्समधून कळतातच. पण त्याचबरोबर तुमच्या प्रॉपर्टीचे कनेक्शनही सरकारला हवे आहे, जेणेकरुन तुमच्या उत्पन्नाचे विविध स्रोत जुळवून तुमचे वास्तविक उत्पन्न त्यांना समजून घ्यायचे आहे. तो त्यांचा हक्क आहेच की.

आम्हाला सरकारी सवलती तर हव्या पण आधार देणार नाही हा बाणेदारपणा मूर्खपणाचा आहे. मला बँकेचे कर्ज हवे, पण मी माझ्या उत्पन्नाचा दाखला देणार नाही, कुठले घर घेणार ते सांगणार नाही असा बाणेदार पण घरकर्ज घेताना दाखवलात तर बँक कर्ज देईल का? 'माय स्कीम माय रुल्स' असे म्हणण्याचा हक्क सरकारला का नसावा?

-oOo-


हे वाचले का?

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

अफवेच्या प्रसाराची साधने

इंदिराजींच्या काळात पहिली अणुचाचणी झाली त्या दिवशी त्या दिवशी भारत हा इच्छा असेल तेव्हा अण्वस्त्रसज्ज होऊ शकतो हा संदेश भारताला बळकट करुन गेला. त्यामुळे इतिहासात तो दिवस कधीच विसरता न येण्याजोगा.

त्याचप्रमाणे आजचा दिवसही कधीच विसरता न येण्याजोगा! जसे अण्वस्त्र हे लष्करीदृष्ट्या अमोघ अस्त्र तसेच 'छद्म' किंवा सोप्या भाषेत अफवा हे सामाजिक/राजकीय दृष्ट्या अमोघ अस्त्र. याची पहिली व्यापक चाचणी आजच्याच दिवशी १९९५ साली झाली. ती कमालीची यशस्वी झाली.

ShivShaktiDazzles

’गणपती दूध पितो आहे.’ अशी भुमका नव्यानेच प्रचलित होऊ लागलेल्या इंटरनेटजन्य माहिती-माध्यमांतून उठली. जो उठतो तो आपल्या घरचा गणपती कसा दूध प्याला याचे रसभरीत वर्णन समाजमाध्यमांवर करु लागला. कुणी फोटो टाकले. नवीनच हाती आलेल्या मोबाईलच्या माध्यमांतून लोक अहमहमिकेने ही अफवा पुढे पसरवू लागले. चॅनेलच्या मंडळींनी आपले बोंडुक घेऊन आमंत्रण दिलेल्या सेलेब्रिटी आणि राजकारणी मंडळींच्या घरी धाव घेतली. तिथून बाप्पांना दूध पाजण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम लाईव्ह सुरू झाला.

या सार्‍या अहमहमिकेमध्ये केवळ केशाकर्षणाने खेचले गेलेल्या आणि मूर्तीला स्पर्श करताच खाली ओघळून तिच्या पायाशी साठलेल्या दुधाच्या थारोळ्याकडे सर्वांनी दुर्लक्षच केले. पण काही सुज्ञांनी केवळ दूधच नव्हे तर पाण्यासह इतरही काही द्रव हाच गुणधर्म दाखवतात हे सप्रमाण सिद्ध केले. इतकेच काय, तर इतर देवांच्या मूर्तीच नव्हे तर माणसांचे पुतळेही ’दूध पितात’ हे सिद्ध केले.

पण बुद्धिहीन झुंडीपुढे सुज्ञांचा आवाज हतबल ठरतो तसेच इथेही झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही 'आमच्या घरचा गणपती दूध प्याला.' म्हणून सांगू लागले. या निमित्ताने राजकारणी, चंदेरी दुनियेतील सेलेब्रिटी, गल्लीबोळातले ’कार्यकर्ते’ यांनी टीव्हीवर चमकून घेतले.

गंमत म्हणजे, 'पटेल आमचेच' म्हणणार्‍यांप्रमाणेच शैव मंडळींनी 'गणपती आमचाच नव्हे का?' अशी बतावणी करत 'शिव-शक्ती डॅझल्स इन इंडिया' अशा हेडलाईन्स छापून मुलाचे थोडे श्रेय वडिलांकडे वळते करण्याचा प्रयत्नही केला.

उपमुख्यमंत्री मा. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे मोजके अपवाद वगळता सारा समाज या चाचणीचा सहज बळी ठरला.

ही चाचणी कमालीची यशस्वी झाली आणि यापूर्वी केवळ सांगोवांगी अफवा पसरवणार्‍या तिच्या कर्त्यांना कमालीचे बळ देऊन गेली. त्या अस्त्राचा वापर करणारे आयटी सेल आज काय काय करामती करतात, त्याचे परिणाम काय काय घडतात हे आपण अलीकडची काही वर्षे पाहातच आलो आहोत.

ही छद्मप्रसाराची चाचणी बुद्धिदात्या गणपतीच्या नावेच व्हावी ही चलाखी अलौकिक आहे, पोखरणच्या विध्वंसक हत्याराच्या निर्मितीलाही 'बुद्ध हसला' चे कवच दिले होते, तसेच* बाबरीच्या विध्वंसाला नेमका ६ डिसेंबर निवडून एका दगडात दोन पक्षी मारण्याइतकेच धूर्तपणाचे.

राजवाडेंनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' यावर बावीस खंड लिहिले आहेत. इथे 'अफवेच्या प्रसाराची साधने' यावर ५६ खंड लिहिले गेले आहेत असे ऐकतो. पण ते खासगी वितरणासाठीच आहेत असे समजते.

-oOo-

* हे 'त्यांना सांगा की' किंवा 'तेव्हा काही नाही बोललात'वाल्यांसाठी.

गणपतींस दूध पिऊ द्या: https://www.loksatta.com/agralekh-news/rumors-on-social-media-1709343/

https://www.jagranjosh.com/general-knowledge/september-21-ganesha-drinking-milk-miracle-1995-science-behind-the-phenomenon-that-shook-the-world-1632131295-1


हे वाचले का?

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

हे चित्र... आणि ते चित्र!

आमच्या एका जुन्या मित्राने पुण्याच्या 'महात्मा फुले मंडई'बाबतच्या काही आठवणी तीन-चार दिवसांपूर्वी शेअर केल्या होत्या. त्यात त्याने 'मंडई विद्यापीठ' असा शब्द वापरला आणि आमच्याही आठवणी जाग्या झाल्या आणि वढाय वढाय असलेल्या मनाने एकावरुन दुसर्‍या अशा उड्या घेत वर्तमानापर्यंत आणून पोचवल्या.

माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले तिला मंडई विद्यापीठ म्हटले जाई. कारण मंडईतील बहुतेक गाळेवाले, मजूर, हळद-कुंकू आदी विकणारे छोटे दुकानदार असे मंडईच्या परिसरातील मंडळींची मुले या शाळेत शिकत. कारण सोपे होते. मंडईपासून चालत वट्ट तीन मिनिटांच्या अंतरावर शाळा. सकाळी पोरगं गाळ्यावर बसलेलं असे. मग बाजार करून बाप साडेदहा-पावणेअकराच्या सुमारास परतून गाळा ताब्यात घेई, पोरगं धोकटी उचलून शाळेत.

त्यामुळे शाळेत अठरा पगड जाती पातींची मुले. कांबळेच्या घरी खेकड्याची आमटी असते ही माहिती खासगीत पुरवून खुसू खुसू हसत त्याची थट्टा करणारा कुणी घाटे असला, तरी कांबळे म्हणजे अमुक आणि घाटे म्हणजे तमुक असा जातींचा हिशोब फारसा होत नसे. वर्गातलं सर्वात दुबळं पोर म्हणून माझी जबाबदारी सार्‍या वर्गाने घेतली होती.

पुढे कॉलेज आणि विद्यापीठ या ठिकाणीही मित्रांमध्ये 'सजातीय' फार कमी असावेत. असावेत म्हणतो कारण मला आजही मोजकी आडनावे वगळली तर मला जात ओळखता येत नाही, ओळखण्याची गरज पडली नाही. ते का आवश्यक आहे हे 'जात-वास्तव माहित पाहिजे बाबा' या तर्काआड लपलेले, जातीयवादी असणारे पण वरकरणी पुरोगामित्वाचा आव आणणारे हे मला पटवू पाहतात. मी ते कानावर पडू देत नाही.

एक वर्गमित्र बारामतीचा होता. विद्यापीठातील सवलतीतले जेवणदेखील खरेदी करण्याइतकी त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. कामा-निमित्त अप-डाउन करणार्‍या कुण्या स्नेह्यांतर्फे, बारामती-पुणे एसटी च्या एखाद्या ड्रायवरकरवी त्याचा डबा रोज घरुन येई. एखादे दिवशी आला नाही तर आमचा डबा शेअर करण्याची अथवा कॅन्टिनमध्ये सोबत चलण्याची मागणी तो नाकारे. अगदी क्वचित तो सोबत आलाच तरी त्याचे ते अवघडलेपण मला स्पष्ट दिसून येई.

पुढे तो डी.एड./बी.एड. करुन एका खासगी संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागला. अशा शाळेत नोकरी मिळवण्यासाठी काही काळ बिनपगारी काम करावे लागले असणार ही शक्यता आहेच. त्याने ते मला कधीच सांगितले नाही. आई-वडील, धाकटी बहीण यांची जबाबदारी त्याच्या खांद्यावरच होती. बहिणीचे शिक्षण कसेबसे पुरे केले नि तिचे लग्नही लावून दिले. दुर्दैवाने काही वर्षांतच विधवा होऊन दोन मुले पदरात घेऊन ती परत आली. वडिलांच्या निधनानंतर स्वतःची दोन नि बहिणीची दोन मुले, तो स्वतः आणि पत्नी, बहीण आणि आई अशा आठ जणांच्या संसाराचा गाडा तो एका शाळामास्तरच्या पगारावर ओढतो आहे, चारही मुलांना शिकवून मोठे केले आहे.

कधी कामानिमित्ताने तो पुण्यात येतो तेव्हा आवर्जून भेटतो. त्याच्या स्वभावात कोणताही वैताग, तणावाचा लवलेश नसतो. सहज हसतमुख जगणारा माणूस आहे तो. तो स्वतःबद्दल बोलतो, वर्गातील इतर मित्रांची चौकशी करतो, कुणाच्या भेटी वा फोन झाले ते सांगतो आणि माझी चौकशी करतो. माझ्या माफक यशाबद्दलचा त्याच्या डोळ्यात जसा दिसतो, तसा निरभ्र आनंद माझ्या घरच्यांच्या नजरेतही मी कधी पाहिला नाही असे नक्कीच म्हणू शकतो. स्वतःबद्दल सांगताना तो चुकूनही कधी त्याची नि माझी तुलना करत नाही...

... याउलट आयटी इंडस्ट्रीतच झालेला एक 'सजातीय' मित्र आहे. पुढे जरी त्यांचे आर्थिक गणित बिघडले असले तरी पदवीपर्यंतचा काळ मुंबईच्या मध्यवस्तीत दोन प्रशस्त फ्लॅट्स मालकीचे असलेल्या बापाच्या पोटी जन्मलेला. चांगलाच सुखवस्तू. दोन भावांतील हुशार म्हणून आणि लहानपणी आजारी असल्याने अधिकच झुकते माप दिला गेलेला. पुढे लग्नानंतर सासरची बाजू भक्कम, पत्नी हुशार आणि उत्तम कमावती.

WhyNotMe

असे असून सतत आपण कमनशिबी आहोत या रडगाण्यातून बाहेर न येणारा, जिथे आहे तिथे कायमच अस्वस्थ असणारा, शून्य चिकाटी असलेला आणि सतत स्वतःची इतरांशी तुलना करत 'पहा मी कसा मागे राहिलो' म्हणत कण्हत बसणारा. चार वेळा सल्ला विचारायला येणारा, दिलेला सल्ला कधीच न मानणारा. आणि नाकारण्याचे कारण हटकून 'तुझं ठीक आहे...' ,'आता तुझंच बघ...' किंवा ’तुझी गोष्ट वेगळी आहे...’ या वाक्याने करणारा. आपले काय या पेक्षा दुसर्‍याचे काय याची सतत चिंता करणारा इसम.

त्याचे असे असते की तो खूप विचार करतो, किंवा करतो असे त्याला वाटते., मग चार पर्याय घेऊन कसा निवडू विचारायला येतो. आपण त्याला अपेक्षित पर्याय निवडला नाही- अगदी व्यवस्थित कारणमीमांसेसह तो स्वीकारू नये असे सांगितले, तरी त्याच्या तोट्याच्या बाजू पुन्हा पुन्हा सांगणारा किंवा त्याला हव्या त्या पर्यायात याहून अधिक चांगले फायदे कसे आहेत हे सांगत राहणारा... म्हणजे खरे तर त्याने निवडलेल्या पर्यायावर तुमच्याकडून केवळ शिक्कामोर्तब अपेक्षित ठेवणारा. जेणेकरुन पुढे तो निर्णय चुकला असे दिसले तरी त्याच्यासोबत त्याची जबाबदारी तुमच्या पण शिरावर असावी अशी आगाऊ तजवीज करून ठेवणारा.

पुण्याच्या सुखवस्तू वस्तीत हजारेक एक चौरस फुटांचे स्व-मालकीचे घर, उच्चशिक्षित कमावती पत्नी, उच्चशिक्षित सासू-सासर्‍यांचा आणि आई-वडिलांचा भक्कम आधार असून 'माझं काहीच कसं नीट होत नाही' म्हणत सतत या नोकरीतून त्या नोकरीत उड्या मारणारा. आणि नोकरी बदलण्यात इतका उतावीळ की चार नोकर्‍या बदलूनही चार पैसेही आर्थिक वाढ मिळवू न शकणारा.

त्याने आमच्या बारामतीच्या मित्राची भेट घ्यायला हवी. पण असे लोक त्याच्या वर्तुळात कसे असतील, त्याच्या वर्तुळात त्याच्यासारखेच एंजिनियर, उच्चवर्णीय, उच्चभ्रू लोक. त्यांचा उत्कर्ष तो पाहणार नि त्याचा आत्मविश्वास पुन्हा दोरी निसटून विहिरीत पडलेल्या पोहोर्‍यासारखा गडगडत राहणार, हे असंच चालणार. अर्थात आमच्या बारामतीच्या मित्रालाही त्याने 'तुझी गोष्ट वेगळी आहे...' म्हणून काहीतरी ऐकवलं असतं हीच शक्यता अधिक आहे.

या मित्रावरुन आणखी एक चुलत-मित्र आठवला. याच्या संपर्कात जेमतेम एक वर्ष होतो. मी स्वतंत्र राहात होतो तेव्हा आमच्या कॉलनीत राहणारा एक प्राणी आमच्या एका मित्राकडे बुद्धिबळ खेळायला येई. हा हुशार वगैरे अजिबात नव्हता. बुद्धी कमी होती असेही नाही, सर्वसाधारण होती. एक दोन विषयांत गटांगळ्या खाऊन, एक सहामाही जास्ती शिकून ५०-५५% टक्क्याने बी.कॉम. झाला आणि 'नोकरीसाठी फक्त ब्राह्मणांना प्रवेश, कोकणस्थांना प्राधान्य' अशी अलिखित पात्रता असलेल्या बँकेत चिकटला.

असे असूनही 'राखीव जागांनी ब्राह्मणांचं कसं नुकसान केलं.' हा विषय त्याच्या बोलण्यात हटकून येई. दोन-तीनदा झाल्यावर माझ्या अंगभूत उद्धटपणाने 'नसत्या तरी तू काय मोठे तीर मारले असतेस लेका. बँकेने चिकटवून घेतले नसते, तर नोकरी मिळवायला चार वर्षे वणवण हिंडला असतास.' म्हणून फटकावला. माझा फटका कदाचित अनाठायी वैय्यक्तिक असेल (तरुणपणी तेवढी समज असते कुठे?) पण मुद्दा पुन्हा तोच. लायकीपेक्षा अधिक मिळूनही 'मी किंवा माझी जात कशी वंचित' हे रडगाणं...

ही दोनही उदाहरणे सजातीयांची असली तरी ती त्यांची मक्तेदारी आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. या ना त्या संदर्भात हे playing the victim किंवा जिणे अभावाचे असल्याचे रुदन बहुतेक जातींमध्येच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसून येते. म्हणून तर ’तुम्ही फार सोसलं आहे...’ किंवा ’इतरांसाठी तुम्ही फार करता. पण त्याची कुणाला जाणीव नसते.’ अशा प्रस्तावनेने सुरुवात करुन बहुतेक भंड-भविष्यवेत्ते मनाने अशा कमकुवत मंडळींकडून दक्षिणा उपटण्याची तजवीज करत असतात.

पण परत मागे जाऊन बारामतीच्या मित्रासोबत आणखी एका उदाहरणाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. मी प्रथम विद्यापीठात शिकवू लागलो, तेव्हा माझ्या वर्गात राजेश पाटील नावाचा एक विद्यार्थी होता. हुशार तर होताच, पण अत्यंत मितभाषी, आपल्या कोषात असलेला दिसे. अर्थात मी शिक्षक असल्याने, मित्र नसल्याने त्याच्या स्वभावाबाबत ठाम विधान करणार नाही. याचा वेश म्हणजे पांढरा शर्ट नि पांढरी पॅंट. त्याला मी अन्य कुठल्या ड्रेसमध्ये पाहिल्याचे मला तरी आठवत नाही. त्याच्या वर्गातील माझे काही विद्यार्थी बोलके होते. त्यांच्याकडून त्याच्याबद्दल समजत गेले.

आमच्या बारामतीच्या मित्राप्रमाणेच त्याची आर्थिक स्थिती नाजूक. त्यामुळे कपड्यांचे मोजके दोन जोड तो वापरायचा. त्याचे गाव बारामतीइतके जवळ नसल्याने - तो खानदेशचा - नाईलाजाने विद्यापीठाच्या विद्यार्थी-भोजनालयात (refectory) जेवायचा. तिथेच गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची जी सोय होती. ती वापरुन त्यातले खर्चाचे थोडे पैसे कमवायचा. चकाट्या पिटणे, कॅंटिनमध्ये टाईमपास हे आपल्यासाठी नव्हे हे त्याने पक्के ठरवून घेतले होते. अभ्यासाचे वर्ग, भोजनालयातले काम आणि नंतर वसतिगृहावर अभ्यास या पलीकडे त्याने वेळ दवडला नाही.

तो  उत्तम गुणांनी उतीर्ण झाला हे वेगळे सांगायला नकोच. पण त्या पुढे तो भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊन जिल्हाधिकारी झाला. त्याचे मोठे नाव झाले. पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्याने आपल्या अनुभवावर आधारित आत्मचरित्र लिहिले, त्याचे शीर्षक होते ’ताई, मी कलेक्टर व्हयनू’. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या अक्षरश: हजारो प्रती खपल्या आहेत. इतक्या वर्षांनंतरही हे पुस्तक कधीच out of print नसते अशी त्याची ख्याती आहे. (बहुतेक पुस्तकांच्या दुकानात आजही उपलब्ध असेल.)

याच्या उलट एक उदाहरण आठवते. हा आणखी एक पाटीलच, पण ज्याला ओ.बी.सी. म्हणतात त्या प्रवर्गातला. घरात वाडवडिलार्जित अशी भरपूर बागायती शेती होती. त्या काळात डाव्या हाताने गिअर टाकावा लागणारी स्कूटर हे खासगी दुचाकी वाहन प्रामुख्याने वापरले जात असे. बाईक हा प्रकार नुकताच कुठे बाजारात आलेला होता. त्याची किंमत पाहता बहुसंख्येला ते परवडत नसे. अशा काळात या विद्यार्थ्याकडे अद्ययावत बाईक होती. त्याचे कपडेही चांगले branded (हा प्रकारही तेव्हा धनकोंसाठीच असे) असत.

हा पाटीलही बुद्धीने वरच्या दहा टक्क्यांत बसेल इतका हुशार. एम.एसी.साठी त्याने ओ.बी.सीं.साठी राखीव जागेवर प्रवेश घेतला होता. खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला असता, तरी पहिल्या दहा टक्क्यांतच त्याला सहज मिळून गेला असता इतके गुण त्याला मिळाले होते. 'तू तसे का केले नाहीस?’ असा प्रश्न त्याला कुतूहल म्हणून त्याला विचारला असता, ’तुम्ही बामणं आमचं चांगलं बघू शकत नाही. आमच्या राखीव जागांवर तुमचा डोळा असतो...’ वगैरे पाच मिनिटे बरसला होता.

त्याचा भर ओसरल्यावर त्याला विचारलं, ’समजा तू तुझी राखीव जागा सोडून खुल्या जागेवर प्रवेश घेतला असतास तर उलट खुल्या प्रवर्गातील - तुझ्या मते आम्हा बामणांची - जागाच कमी झाली नसती का? शिवाय राखीव जागांमधील एक जागा मोकळी होऊन दुर्दैवाने दोन गुण कमी मिळाल्याने प्रवेश न मिळाल्याने बाहेर राहिलेला, तुझ्याच समाजातील एक विद्यार्थी तिथे आत येऊ शकला नसता का? यात आम्हा बामणांचा फायदा होता की तोटा?’

मला नक्की आठवत नाही, पण ओ.बी.सी. राखीव जागांवर प्रवेश घेतलेल्यांना तेव्हा फी माफी नसली तरी भरलेली फी परत मिळत असे. खुल्या जागेवर प्रवेश घेतला असता तर ती त्याला परत मिळाली नसती इतकेच. परंतु एका सहामाहीची फी त्याच्या महिन्याच्या पेट्रोलच्या खर्चाइतकी होती. तेव्हा त्याच्या दृष्टीने ती नगण्यच होती. अशा वेळी आपल्याच गटाच्या एखाद्या गरीब विद्यार्थ्यासाठी ती सोडणे त्याला सहज शक्य होते (प्रशासकीय बाबूगिरीमुळे ती परत मिळवणे हे ही एक दिव्यच असे हा ही एक मुद्दा.) पण त्याची त्याला तयारी नव्हती.

माझा मुद्दा समजल्यावर तो थोडा नरमला. पण तरीही ’मी त्या गटातला असल्याने माझाही हक्क आहेच की. मला फी माफी मिळते तर मी का नाही घ्यायची?’ म्हणत कुरकुरत राहिला. मुद्दा हक्काचा नव्हे तर बांधिलकीचा होता; आपल्याच समाजबांधवाला हातही नव्हे तर केवळ एक बोट धरायला देऊन वर आणण्याचा होता. तो त्याला समजला इतका हुशार नक्कीच होता. पण ते बोटही द्यायची त्याची तयारी नव्हती.

सुखवस्तू बापाच्या पोटी जन्मलेला, सिगरेट आणि दारुवर सहजपणे पैसे खर्च करणारा एखादा दलित वा ओ.बी.सी. मित्र जेव्हा 'तुम्हाला काय जाणवणार आमच्यावरील शतकानुशतकांचा अन्याय...' म्हणतो तेव्हा एकही खिडकी नसलेल्या दहा बाय आठच्या खोलीत पंधराहून अधिक वर्षे काढलेले आमचे पाच जणांचे कुटुंब मला आठवते. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाही ज्याच्याकडे केवळ दोनच पँट्स होत्या, फाटल्या तर त्या रफू करुनच वापराव्या लागत तो माझा भाऊ आठवतो. आणि त्याहीपूर्वी नवी घेणे परवडत नसल्याने ढुंगणावर दोन्हीकडे दोन-दोन बोटे विरलेली चड्डी घालून शाळेत येणारा कुणी ढोरजे मला आठवतो. अकरावीपासून क्लासेसचे नववी-दहावीच्या वर्गांचे पेपर तपासून कमावता झालेलो मी स्वतः आठवतो...

...आणि या सुखवस्तू असूनही बापदाद्यांच्या शोषणाला encash करु पाहणार्‍या आणि आपण तथाकथित उच्चवर्णीय नाही म्हणजेच आपण आपोआपच पुरोगामी, शोषितांचे ठेकेदार वा प्रवक्ते आहोत असे समजू लागलेल्या त्या उद्दामांच्या पेकाटात - शाब्दिक का होईना - सणसणीत लाथ घालतो.

-oOo-

१. राखीव जागांच्या तेव्हाच्या परिस्थितीवर आधारित ही चर्चा नि प्रसंग आहे. पुढे राखीव जागांचे प्रवर्ग झाले. एकदा खुल्या जागेतून शिकलेल्याला पुढील शिक्षणांत वा नोकर्‍यांमध्ये राखीव जागांचा लाभ घेता येणार नाही असा नियम आल्याचे समजले. तेव्हा तसे असते तर खुल्या वर्गातून प्रवेश घेणे त्याला पुढे अडचणीचे ठरू शकले असते हे खरे. हा अजब नियम अजूनही आहे की रद्द झाला माहित नाही.


हे वाचले का?

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

व्हेअर इज वॉली

मार्टिन हँडफर्ड नावाच्या एका ब्रिटिश रेखाचित्रकाराने ’व्हेअर इज वॉली’ किंवा ’चित्रात लपलेला वॉली शोधा’ असा एक खेळ त्याच्या ग्राफिक्सच्या सहाय्याने सुरू केला. त्याच्या पुस्तकाच्या पानावर अनेक पात्रे नि चित्रे असत. त्यात कुठेतरी लाल-पांढर्‍या पट्ट्यांचा टी-शर्ट, गोंड्याची गोल नि लाल टोपी आणि गोल फ्रेमचा चष्मा असलेली ही ’वॉली’ नावाची व्यक्ती लपलेली असे. तुमची दिशाभूल करण्यासाठी यातील एक-दोन वैशिष्ट्यांसह दुसरे एखादे पात्र चित्रांतील पात्रांच्या भाऊगर्दीत मिसळून देणे वगैरे क्लृप्त्या चित्रकाराने वापरलेल्या असत. वरवर पाहता जरी हा लहान मुलांचा खेळ असला तरी मोठेही तो आनंदाने खेळत असत.

हाच खेळ अमेरिकेत ’व्हेअर इज वाल्डो’ या नावाने प्रसिद्ध झाला. (’द बिग बँग थिअरी’ या टेलिविजन सीरिजच्या चाहत्यांना एका एपिसोडमध्ये सस्पेन्ड झालेला शेल्डन वाल्डो शोधत बसलेला पाहिल्याचे आठवत असेल कदाचित.) वॉली ऐवजी अमेरिकन स्थानिक वाटावे* म्हणून त्याचा वाल्डो झाला. पुढे अमेरिकन मंडळींच्या डिजिटल आसक्तीचा परिणाम म्हणून तो डिजिटलही झाला.

WaldoFindsYou

आमच्याकडेही आम्ही हा खेळ खेळतो. अमेरिकन प्रत्येक गोष्ट वर्चुअल वा डिजिटल माध्यमांत नेतात तर आम्ही उलट दिशेने त्याचे कमी खर्चाचे व्हर्शन बनवत असतो. सपाटही नसलेली लाकडाची एक फांदी आणि कागदाच्या बोळ्याला वाहनाच्या ट्यूबमधून कापून काढलेली रबर लावून क्रिकेट खेळण्याचा शोध आमचाच. आमचे सर्व काही होम एडिशनचे असते. प्रोफेशनल आणि बिजनेस एडिशन आम्ही पाश्चात्यांसाठी सोडून दिल्या आहेत. (नमनाला घडाभर तेल म्हणतात ते हे.)

तर सांगत काय होतो, आम्हीही आमच्याकडे हा खेळ आणला. पण ब्रिटिशांमध्ये पुस्तके छापावी लागतात वा अमेरिकन मंडळींकडे गेम विकत घ्यावा लागतो तसे आम्ही काही करत नाही. आम्ही हा सारा ’माईंड गेम’ म्हणून खेळतो. आणि केवळ उदार भूमिकेतून इतरांनाही हा वाल्डो सापडावा म्हणून फेसबुक किंवा व्हॉट्स अ‍ॅप सारख्या फुकट माध्यमांतून आम्ही तो कुठे आहे ते सार्‍यांना सांगतो. आता तुम्ही म्हणाल, म्हणजे इतरांचा खेळ बिघडवणार तुम्ही. पण तसे नाही. हा इतर कुणी शोधलेला वाल्डो जो आहे तो आपणही स्वीकारला की आपल्यालाही पॉईंट्स मिळतात. आणि यातला वाल्डो हा स्वत:देखील हा खेळ खेळू शकतो, आहे की नाही गंमत? आता त्याने दुसरा वाल्डो शोधला नि स्वीकारला की त्याचे पॉईंट्स वाढतात आणि इतर कुणी त्याला वाल्डो म्हणून ’धप्पा दिला’ की कमी होतात.

पण आपण भारतीय असे आहोत की आपले अंतर्गत असे अनेक गट आहेत. आणि प्रत्येकाचा वाल्डो वेगळा. त्यामुळे मग या खेळाची व्हर्शन्स करावी लागतात. ल्युडो किंवा सापशिडी, व्यापार (ई: कित्ती घाटी शब्द आहेत हे, स्नेक्स अ‍ॅंड लॅडर्स किंवा मोनोपॉली म्हणा की.) मध्ये कसे प्रत्येकाची सोंगटी वेगळी असते. इथे प्रत्येकाला आपला गेमच निवडता येतो.

आता असं पहा स्वयंघोषित राष्ट्रवादी खेळाडूंसाठी हा ’व्हेअर इज (शहरी) नक्षलवादी’ नावाने खेळला जातो तर स्वयंघोषित पुरोगाम्यांमध्ये ’व्हेअर इज (छुपा) दक्षलवादी**’ या नावाने. याच दुसर्‍या खेळाचे ’व्हेअर इज (छुपा) मनुवादी’ नावाचे आणखी एक उप-व्हर्शन आहे. (छुपा) दक्षलवादी शोधून कंटाळले की स्वयंघोषित पुरोगामी कधी कधी हा खेळ खेळतात.

पण या दोन व्हर्शन्समध्ये थोडासा फरक आहे. स्वयंघोषित राष्ट्रवादी हा खेळ फक्त पुरोगामी पुस्तके नि माणसे घेऊन खेळतात तर स्वयंघोषित पुरोगामी हा खेळ आपसातच खेळत असतात. (जसे ते आपले विचार वैचारिक विरोधकांच्या व्यासपीठावर न जाता आपल्या-आपल्यात एकमेकांना शिकवतात अगदी तसेच.)

थोडे विषयांतर करुन एक जुना विनोद सांगतो. अमेरिकन, ब्रिटिश आणि भारतीय पोलिसांना एकदा एक लपवलेला बोकड शोधून आणण्याचे आव्हान देण्यात आले. जो कमीत कमी वेळात शोधेल ते पोलिस खाते - म्हणे, जगातले सर्वात कार्यक्षम खाते असे जाहीर करण्यात येणार होते. ’गेट-सेट-गो’ झाल्यावर पाचच मिनिटात भारतीय पोलीस एक वासरू घेऊन हजर झाले. ब्रिटिश आणि अमेरिकन पोलीस काही वेळानंतर बकरा पकडून घेऊन आले. त्याच्या मागे पळापळ केल्याने ते घामाघूम झाले होते. अमेरिकन पोलीसाच्या आधी ब्रिटिश पोलीस हजर झाल्याने ब्रिटिश पोलीस खाते श्रेष्ठ आहे असे जाहीर करावे असा निर्णय न्यायाधीशांनी दिला. याला भारतीय पोलीसांनी ताबडतोब आक्षेप घेतला नि आपण या दोघांच्याही आधी पोचल्याचे निदर्शनास आणून दिले. पण तुम्ही बकरा नव्हे तर वासरू आणले आहे, न्यायाधीश वैतागाने म्हणाले. ’दोन मिनिटे इंटरोगेशन करू द्या. हे वासरू आपण बकरा असल्याचे मान्य करते की नाही पहा.’ भारतीय पोलीस उत्तरला. निष्कर्ष... सांगायलाच हवा का?

गाडी परत आपल्या खेळाकडे आणू. तर मुद्दा असा की हे ’व्हेअर इज (शहरी) नक्षलवादी’ किंवा ’व्हेअर इज (छुपा) दक्षलवादी’ खेळणारे लोक हे या विनोदातल्या त्या भारतीय पोलीसासारखे असतात. उगाच धावाधाव करण्यापेक्षा आपल्याला न आवडणारे एखादे वासरू पकडून आणतात नि हाच बकरा आहे असे घोषित करतात. शिवाय भारतीयांनी हा खेळ वैयक्तिक न ठेवता ग्रुपने खेळण्याचा केल्याने त्यांच्या त्या दाव्याला पुष्टी देणारे पाच-पन्नास लोक ते सहज पकडून आणतात. इथे बहुमत - आवाजी असो की संख्यात्मक- हे काहीही (अगदी गुरुत्वाकर्षणामुळे वस्तु जमीनीपासून उलट दिशेने आकाशाकडे झेपावतात हा दावा देखील) सिद्ध करण्यास पुरेसे असते. आता असे मानणार्‍यांचे पुन्हा बहुमत असल्याने, मी पकडला तो (शहरी) नक्षलवादी किंवा (छुपा) दक्षलवादीच आहे हे सिद्ध झाल्याचे स्वत:च जाहीर करतात. एकुण मोठा मौजेचा खेळ असतो हा.

बाय द वे, तुमचा स्कोर किती झालाय आतापर्यंत? मी अजून ’ॠणा’तच आहे. नाही म्हणजे तुम्ही लोक डांबिस, पहिला प्रश्न हाच विचाराल म्हणून आधीच उत्तर देऊन टाकलं.

- oOo -

*आणि एकुणच अमेरिकन मंडळी हट्टाने इंग्लिश गोष्टी नाकारतात हे दुसरे कारण. अगदी नव्याने तिथे स्थलांतर केलेलेही याला अपवाद नाहीत. एका माजी- पाकिस्तानी आणि अमेरिकन सिटिझन होऊन जेमतेम पाच वर्षे झालेल्या बॉस्टनमधील आमच्या सिस्टिम अ‍ॅडमिनचे उदाहरण घ्या. एकदा बोलता बोलता मी कुठलासा शब्द वापरला तर त्याने मला दुसरा एक शब्द वापरावा असे सुचवले. मी म्हणालो, ’अरे पण मला जे म्हणायचे आहे त्यानुसार तो बरोबरच आहे की. शिवाय दोन्हींचा अर्थ एकच आहे.’ ’नो, बट दॅट इज सो ब्रिटिश.’ तो ताडकन म्हणाला.

** संघविचारांच्या विशेषत: मोदीसमर्थक व्यक्तींसाठी 'दक्षलवादी' हा शब्द मी फेसबुकवर कुठेतरी वाचला. श्रेय ज्याचे असेल त्याला.


हे वाचले का?

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

कन्हैया कुमार, कम्युनिस्ट आणि मी

मी कम्युनिस्ट विचारसरणीचा सहानुभूतीदार नक्की आहे. त्यांच्यातील - सर्वच इझम आणि राजकीय पक्षांत असतात त्यानुसारच असलेल्या - त्रुटींसह मी त्यांना सत्ताधारी म्हणून स्वीकारायला तयार आहे; नव्हे तसं घडावं अशी माझी इच्छा आहे. कारणांबद्दल आता विस्ताराने बोलत नाही. पण हे घडण्याची शक्यता निदान माझा आयुष्यात धूसरच दिसते. याचे मुख्य कारण तत्त्वज्ञानावरची अतिरेकी निष्ठाच त्यांना सत्तेपासून दूर ठेवते आहे.

सत्ताकारणातला व्यवहारवाद नाकारल्याने त्यांना सत्ता मिळणे दुरापास्त झाले आहे. ज्योतिबाबूंना मिळू शकणारे पंतप्रधानपद नाकारून त्यांनी घोडचूक केली असे माझे प्रामाणिक मत आहे. एकदा सत्ता हाती आली की सर्वत्र 'आपले' लोक रुजवून यंत्रणा/व्यवस्था कब्जात घेता येते हे ते विसरले आहेत.

लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या रशियन आणि चीनी बांधवांनी त्या सामान्यांतील अनेकांचा बळी घेणारी रक्तरंजित क्रांती घडवून आणली, सत्ता हाती घेण्यासाठी विसंगतीचे ते तात्कालिक पाप शिरी घेतले. पण इथले आमचे बांधव ती लवचिकता संसदीय राजकारणातही स्वीकारायला तयार नाहीत. 'आम्ही किती छान विश्लेषण करू शकतो, बुद्धिमान आहोत आम्ही. बाकीचे सग्गळे कसे शेवटी संघवाल्यांनाच मदत करतात.' यावर यांचे विचारवंत लेखामागून लेख लिहीत आहेत. संघ-भाजप विरोधाचा एकाधिकार, ते सोवळे फक्त आमच्याच कनवटीला आहे हा अहंकार त्यांना पुरेसा आहे. मग त्यासाठी अनेक वर्षे हाच भाजप-संघाचा भस्मासुर सत्तेत राहिला तरी त्यांना चालेल.

किंबहुना मीच-खरा-विरोधक या त्यांच्या भूमिकेला जिवंत ठेवण्यास ते पूरकच ठरेल. या अहंगंडात केरळ या एकमेव राज्याची सत्ता कशीबशी राखून आहेत. चोवीस वर्षे सत्ता राबवलेल्या बंगाल मध्ये ते पुढच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकले जातील अशी चिन्हे आहेत.

KanhaiyaKumar

हे बदलण्यासाठी, मुख्य म्हणजे संघटन-विस्तार करण्यासाठी ठोस काही करताहेत असे दिसत नाही. अजूनही मोर्चे आणि व्याख्याने ही अनुक्रमे केवळ श्रमजीवी आणि पांढरपेशा वर्गाला अपील होणारी जुनाट हत्यारे कवटाळून बसण्यापालीकडे नव्याने ते काहीच करत नाहीत.

'विचार बदला, देश बदलेल' हा विचार केव्हाच कालबाह्य झाला. इथे लोकांना विचार करायलाच वेळ नाही, तिथे जुना की बदललेला हा मुद्दाच उरलेला नाही. थेट कृती काय करणार असा प्रश्न आता नवी पिढी विचारते. त्यांना हे काय ऑफर करू शकतात हा प्रश्न आहे. नव्या प्रगतीशील (affluent) समाजाच्या आकांक्षांची पूर्ती कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे आधारे कशी करणार याची मांडणी करायला हवी. ती अद्याप होताना दिसत नाही. भाजप जसा साडेचार वर्षांच्या सत्तेनंतरही अजून विरोधकांच्या मानसिकतेतून बाहेर आलेला दिसत नाही, तसेच कम्युनिस्ट अद्याप कार्यकर्त्यांच्या, अभ्यासकाच्या भूमिकेतून बाहेर यायला तयार नाहीत.

सत्तेसाठी नेते लागतात, ते घडवावे लागतात, त्यांची नाळ सामान्यांशी जुळावी लागते, केवळ वरुन खाली नव्हे तर खालून-वर अशीही फीडबॅक सिस्टम असावी लागते. वरच्या तत्त्वाशी विसंगत पण सामान्यांच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान असणार्‍या अनेक गोष्टींना, तत्त्वाला मुरड घालून, अंगीकृत करावे लागते. तरच सत्ता मिळू शकते.

सतत शहाणपणाचे डोस देणारा अगदी आपण मठ्ठ आहोत हे मान्य असलेल्यालाही नकोसा होतो. कधीतरी आपल्याकडूनही त्याने काही घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. संघाची मंडळी त्यांच्या सत्तेला बाधा येणार नाही इतपत गोष्टी लोकमानसातून स्वीकारतात, त्यांच्या राजकारणाचा धार्मिक आधार त्याला सहाय्यभूत होतो.

सत्ताकारणात - भाजप/संघाइतके गटे'च्या फाउस्ट प्रमाणे आत्मा विकून नाही नाही तरी - तत्त्वे पातळ होण्याचा धोका पत्करून हे स्वीकारावे लागते. काँग्रेस, समाजवादी, आप, ममता... अल्फा बीटा गामा सारे पक्ष संघ-धार्जिणे आहेत हे घोकत राहिल्याने आपणच सर्वांत अप्रिय होत असतो, आपले सारे मित्र दूर जात असतात आणि घसरत्या सत्ताबळाच्या, पडत्या काळात तर हे नक्कीच परवडणारे नसते हे समजून घ्यायला हवे.

या आणि अशा कारणांनी कम्युनिस्ट या देशात कधीच सत्ताधारी होऊ शकणार नाहीत. नव्हे संघाला समाजकारण, राजकारण आणि सत्ताकारणात कधीच पर्यायही होऊ शकणार नाहीत, हे कटू वास्तव माझ्यापुरते मी स्वीकारले आहे. तेव्हा निदान या तीन पैकी दोन क्षेत्रात संघ-मोदी यांच्या जाळ्याला हद्दपार करायचे असेल तर प्रथम त्यांचे सत्तेतील स्थान हिरावून घ्यावे लागेल. आणि ते करण्याची कम्युनिस्टांची कुवत आज नाही, कदाचित आणखी पन्नास वर्षे नसेल. त्यामुळे मी त्यांना मतदान करण्याचा प्रश्न आजतरी उद्भवत नाही.

निवडून येण्याची नगण्य शक्यता असल्याने, कम्युनिस्ट उमेदवाराला मतदान करणे हे देशातील बहुसंख्य मतदारसंघात एक पुरोगामी, भाजप-संघ विरोध मत वाया घालवणे आणि पर्यायाने पुन्हा संघ भाजपला बळकट करणारेच ठरणार आहे हे मला पटले आहे. हे जमिनीवरचे वास्तव 'आम्हीच तेवढे संघ-विरोधक'ची स्मरणी घेऊन बसलेल्या त्यांच्या वैचारिक नेत्यांनी समजून घ्यायची गरज आहे.

तेव्हा त्या विचारांबद्दल सहानुभूती असून, त्यांनी सत्तेवर यावे अशी इच्छा असून मी त्यांना मतदान करणार नाही, कारण निवडून येण्याची पुरेशी क्षमता विकसित व्हावी असे संघटन, अशी दृष्टी आज त्यांच्याकडे नाही.

हे झाले कम्युनिस्टांबद्दल. कन्हैयाबाबत माझे मत याहून फारसे आशावादी नाहीच. आजही फार बदलले आहे असे म्हणणार नाही. त्याची भाषणे ऐकून हा लोकांचे लक्ष वेधून घेणारा चांगला वक्ता आहे, पण पाणी फार खोल नाही असे माझे प्रामाणिक मत होते. 'एका बोलबच्चनला पर्याय म्हणून दुसर्‍या बाजूने तसाच उभा केलाय का?' असा प्रश्न मला पडला होता.

जनसंवाद म्हणजे समोरच्याला प्रभावित करणे किंवा घोषणाबाजीतून वैचारिक बधीरता निर्माण करणे या त्याच्या अडीच वर्षांतील मानसिकतेतून कालच्या मुलाखतीमध्ये मात्र तो बाहेर आलेला दिसला. एका परिपक्व आणि विचारी नेत्याची लक्षणे त्याच्यात दिसून आली.

असे नव्या दमाचे तरुण जर कम्युनिस्ट पक्षांची धुरा खांद्यावर घेतील, तर त्यांना नक्की उर्जितावस्था येईल. माझे पन्नास वर्षांचे भाकीत यांनी खोटे ठरवले तर आनंदच होईल. पण तरीही... दिल्ली बहोत दूर है. कारण एकटा कन्हैया पुरेसा नसतो, त्याच्या सोबत भक्कम संघटनही हवे. त्याबाबत काय करणार हे कन्हैया सांगेल तेव्हाच पुढची दिशा अधिक स्पष्ट होईल. कन्हैया आणि त्याच्या सहकारी कॉम्रेडस् ना हार्दिक शुभेच्छा.

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

खुला कोष आणि माहितीची ऐशीतैशी

विकिपीडीया हा खुला माहितीकोश आणि भारत देशाची संकल्पना यात विलक्षण साम्य आहे. दोन्हींची निर्मिती ज्यांच्या भल्यासाठी झाली होती त्यांनीच त्यांची पुरी वाट लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

Widipedia

मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी ज्ञानाच्या क्षेत्रात विकिपीडिया जितका खुलेपणा दाखवतो तो सर्वस्वी मारक ठरतो असे माझे मत आहे. लोकांच्या संदर्भातील नीतिनियम, शासनव्यवस्था, संपत्तीवाटप आदी सामायिक हिताच्या गोष्टींपुरतीच लोकशाहीचा पल्ला मर्यादित ठेवावा लागतो. पृथ्वी गोल आहे की सपाट याचा निर्णय कुठल्याशा वृत्तपत्रात किंवा न्यूज-पोर्टल वर सर्व्हे घेऊन करता येत नसतो. त्याला भूगोल-खगोलाचे ज्ञानच आवश्यक आहे. तिथे "मूठभरांचे मत आम्ही का मानावे. बहुसंख्य लोकांना पृथ्वी त्रिकोणी आहे असे वाटते." म्हणून ती आपला आकार बदलून त्रिकोणी होत नसते.

तरीही माहिती-संकलन म्हणून विकीपीडियाचे स्थान नाकारता येणार नाही.

असे असले तरी भारताशी संबंधित सर्व पाने मी सर्वस्वी अविश्वासार्ह मानतो मी!

याचे कारण आपल्या वृत्तीत आहे. पहिले म्हणजे सर्व उत्तम शोधांची/पर्यायांची आपण स्वार्थासाठी वाट लावतो.  दुसरे, कुठल्या मसण्या जुन्या ग्रंथाचे नाव सांगून 'त्यात हे आम्ही आधीच शोधले होते' म्हणून त्यावर 'मेड इन इंडिया' चे लेबल लावून 'जितं मया'चा शड्डू ठोकतो.

त्या पलीकडे तिसरा पर्याय असतो, तो म्हणजे त्या जुन्या ग्रंथाचा आधार घेऊन पुढचा एखादा महत्वाचा शोध, पाश्चात्त्यांपूर्वी आपणच लावण्याचा. पण निर्मिती बुद्धीचे नि कष्टाचे काम आहे. त्यापेक्षा आयते आपले लेबल लावणे सोपे असते. तद्वतच विकीची सर्व मिळून माहिती नि ज्ञान संकलनाची संकल्पना कितीही उत्तम असली तरी त्याचा वापर ज्ञानाच्या देवाणघेवाणी ऐवजी अज्ञानाला ज्ञानाच्या पंगतीत बसवून ज्ञानाची महतीच कमी करतो आपण. इतर कुणी उंच असेल तर आपली उंची कशी वाढेल हा आपल्यासमोरचा प्रश्न नसतो, त्या उंच माणसाची कशी कमी करता येईल हा प्रश्न आपण सोडवणुकीसाठी घेतो. राजकारणापासून, साहित्यकारणापर्यंत सर्वत्र एकाच माळेचे मणी.

याशिवाय आपण या सार्‍यांमध्ये प्रगतीचा विचार करण्याऐवजी, पुढच्या आवृत्तीत अधिक काय देता येईल, द्यावे अशी मागणी करावी या विचाराऐवजी आहे त्यात काय वाचवता येईल असा 'दात कोरून पोट भरण्याचा' प्रयत्न करतो. इतरांचे उत्पादन, नेता इत्यादींना आमचेच म्हणण्यामागेही नेमका हाच आळस असतो. आपल्याकडे मोबाईलचा शोध लागला नाही, पण मिस्ड कॉलचा शोध लागला हे या संदर्भातील बोलके उदाहरण.

वीकिपीडियाचा असाच गैरवापर विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी भरपूर केला आहे. जगातले सगळे किंवा प्राचीन ग्रेट ते आमचेच असल्या 'माहिती'ने पानेच्या पाने भरली आहेत. 'आपण वापरतो त्या ग्रेगोरियन कॅलेंडर मधील सर्व महिने ही मुळात संस्कृत नावे आहेत' अशी मखलाशी नेहमीप्रमाणे शाब्दिक खेळ करून सिद्ध करणारे पेज अस्तित्वात आहे. असल्या खोटारडेपणाने असंख्य पाने भरलेली आहेत. नेहरू कुटुंबियांच्या पेजेसवर हे पुंड वर्षानुवर्षे धुमाकूळ घालत आहेत. त्यांचे पूर्वज मुस्लिम होते ही माहिती काढून टाकल्यावर पुन्हा पुन्हा भरली जाते.

आज प्रथमच या पुंडाना समोरून तसेच प्रत्युत्तर दिले गेले आहे. आता यात समाधान मानायचे, की आता 'माझे असत्य विरुद्ध तुमचे असत्य' असाच सामना या देशात पाहायला मिळणार आणि वस्तुनिष्ठ अथवा पडताळून पाहता येण्याजोगे खरे किंवा सत्य असे काही शिल्लकच राहणार नाही याची खंत बाळगावी हे समजेनासे झाले आहे. सारे काही 'मतांनी' ठरवायचे, वस्तुनिष्ठतेला हद्दपार केलेला समाज काय लायकीचा असेल याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. या समाजात नि स्त्रीला आपले निष्कलंक चारित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून नाणे काढण्याची सिद्धता मागणार्‍या समाजात काही फरक असेल का? 'तुम्ही या बाजूचे का त्या बाजूचे ते सांगा. याकूबला फाशी देणे योग्य की अयोग्य या प्रश्नाचे उत्तर द्या मुकाट, मुळात फाशीच हवी का नको अशा फालतू तात्विक चर्चा नको.' म्हणणार्‍या स्वयंघोषित वैचारिक गुंडांची संख्या आणखी वाढत जाणार याची भीती वाटू लागली आहे.

रस्त्यावरची झुंड एकाच माणसाला घेरून मारते, हे स्वयंघोषित वैचारिक पुंड पिढीच्या पिढीला... कदाचित आणखी पुढच्या काही पिढ्यांना ठार मारत असतात.

(News: Is Tripura CM Bangla Deshi? - a question asked based on Wiki page information.)

- oOo -

हा लेख ’अक्षरनामा’ या पोर्टलवर ’विकीपीडियाची संकल्पना उत्तम असली तरी त्याचा वापर ‘अज्ञाना’ला ‘ज्ञाना’च्या पंगतीत बसवण्यासाठीच करतो आपण!’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला आहे.


हे वाचले का?

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

बँकांचा सावकारी पाश

(News: In 2017-18 depositors lost 5,000 crores in minimum balance penalties.)

या बातमीच्या अनुषंगाने मागे एकदा झालेली चर्चा आणि त्या दरम्यान एका मित्राने (बहुधा Anand More) उपस्थित केलेल्या मार्मिक प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले. प्रश्न असा आहे की बँक आणि माझ्यासारखे त्यांचे ग्राहक यांचा परस्पर-संबंध समान व्यापाराचे तत्व पाळतो का?

आता हेच पहा. मी बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवलेल्या पैशावर मला ६ ते ९ टक्के या रेंजमध्ये मला व्याज दिले जाते. उलट मी बँकेकडून कर्ज घेतो, तेव्हा त्याची रेंज ८ ते १४ टक्के इतकी असते. (पर्सनल लोन्स तर १६ ते २४ टक्क्यांपर्यंत जातात. पण ते अन्सिक्युअर लोन सध्याच्या मुद्द्याला सुसंगत नाही, तेव्हा ते सोडून देऊ.)

मी जेव्हा बँकेत पैसे ठेवतो तेव्हा व्याजाव्यतिरिक्त इतर कोणताही लाभ मला मिळत नसतो. सिक्युरिटीचा विचार कराल, तर जेमतेम १ लाखांपर्यंत (ते ही इन्शुरन्स कंपनीकडून, बँक काखा वर करणार.) ठेव इन्शुअर्ड. पुढचे भगवान भरोसे. उलट मी कर्ज घेतो तेव्हा कैक पट अधिक व्याज, तारण, इत्यादींचा भडिमार असतो.

BanksStealFromMe
Andy Rash यांनी The Wall Street Journal साठी काढलेले रेखाचित्र

मी जेव्हा एका सहकारी बँकेकडून (आधीचा 'एचडीएफसी'चा अनुभव उत्तम असताना हे का असे विचारू नका.) गृहकर्ज घेतले तेव्हा १०.५ टक्के व्याज, घर तारण (त्या रेजिस्ट्रेशनचा खर्चही तुमचाच), त्यासाठी दरवर्षी इन्शुरन्स (ज्यात बँकेचे नाव बेनिफिशरी म्हणून घालायचे), सहकारी बँक असल्याने काही शेअर्स आणि काही एक रकमेची एफडी को-लॅटरल म्हणून... इतके सारे बँकेने घेतले. हे कमी होते म्हणून वर 'साईट व्हिजिट'ही माझ्याच खर्चाने करावी या हेतूने, 'तुम्ही पुढच्या वेळी जाल तेव्हा आमचा माणूस सोबत येईल' अशी 'ऑफर'ही दिली होती. तेवढे मात्र मी ठाम नाकारले. (झक मारली लोन घेतले असे म्हणावे लागले.)

इतके करूनही माल्ल्या, चोक्सी, नीरव मोदी सारखे लोक यांचे लोन घेऊन याना चुना लावून फरार होतात (असे मोठे मोठे लोन घेणारे स्वत:हून आपल्या दारी चालून येतात या माजामध्ये छोट्या अर्जदारांना `एसबीआय'सारख्या बँका क्षुद्र ढेकूण असल्यासारखी वागणूक देतात.) नि या बँका बाराच्या भावात जातात. तसे झाले की आमच्या सार्‍या ठेवी बुडीत खाती.

बरं हे कमी नाही म्हणून हे सतराशे साठ प्रकारचे दंड करण्याचा अधिकार बँक आपल्याकडे ठेवते. ग्राहकाला उलट दिशेने बँकेला दंड करण्याचा अधिकार आहे का, असल्यास कोण-कोणत्या परिस्थितीत? कधीच नाही!

असा सर्वस्वी विषम व्यवहार अर्थातच दोन्ही बाजूंना समान संधी नि हक्क देणारा नाही. केवळ 'घरात ठेवण्याऐवजी थोडे अधिक सुरक्षित राहतात' या एकाच कारणासाठी माणसे पैसे बँकेत ठेवत असतात.

अशा वेळी ज्यांच्याकडे तुटपुंजे पैसे आहेत, बँकेत ठेवल्याने वा तिच्याशी व्यवहार केल्याने फायदा तर नाहीच, वर वरील कारणांनी नुकसानच आहेत असे लोक बँकेत पैसे का ठेवतील? (नोटाबंदीच्या काळात आमचा नेहमीचा चाट-वाल्याने बँकेत पैसे भरण्याची सक्ती केल्याने आमच्या धंद्यावर कसा परिणाम होतो, आर्थिक नुकसान- टॅक्स चोरी हा वेगळा मुद्दा, कायदेशीर नुकसान - होते हे समजावून सांगितले होते, त्याची आठवण होते.) मग तुम्ही जनधन म्हणा की 'पराया धन' म्हणा, त्या खात्यांमधून सामान्यांचे पैसे दिसणार नसतातच.

हे कमी होते म्हणून की काय, एफआरडीआय विधेयक आणून माल्ल्या-धार्जिण्या आणि सामान्याचा कर्दनकाळ असलेल्या बँकांना वाचवून सामान्यांच्या ठेवी त्यांना आंदण देण्याचा घाट दिवट्या सरकारने घातला होता. सुदैवाने व्यापक विरोधाने तो हाणून पाडला गेला.

भांडवलशाही नि:पक्ष स्पर्धा, चोख व्यापाराचे नियम वगैरे आणते असा मोठ्ठा गैरसमज तिच्या समर्थकांत आहे. 'असे असंतुलित व्यापार असतील तर स्पर्धेच्या नियमांनुसार अधिक आकर्षक, गुणवत्तापूर्ण उत्पादन सादर करणारा अधिक ग्राहक आकर्षित करेल नि हळूहळू इतरांनाही तेच करावे लागेल' हे गृहितक बँकांबाबत साफ चूक असल्याचे दिसून येते. टेलीकॉम क्षेत्रात अलीकडे काही वर्षांत अशी स्पर्धा झाल्याने ग्राहकांचा आर्थिक फायदा झाला होता. (पण माझ्या दुसर्‍या दाव्याला अनुसरून गुणवत्तेची काशी झाली हा मुद्दा सोबतच यायला हवा.) बँका मात्र - कदाचित कोटेरी करून, एकमेकांच्या सोबत राहतात नि ग्राहकांना कोणतेही अधिक फायदे देत नाही. फरक राहिलाच तर व्याजदरातील ०.०१ ते ०.०५ टक्क्याचा. जिला चोराच्या हाताची लंगोटीच काय, लंगोटीचा एका धागाही म्हणता येणार नाही.

माझ्या मते बँका आणि शेतकर्‍यांना नाडणारा सावकार यांच्यात असलाच तर डिग्रीचा फरक आहे. बँका या थोड्या कमी नाडणारे सावकारच आहेत. यातून जो प्रचंड फायदा त्या निर्माण करतात तो त्यांच्या सीईओसह भक्कम पगारवाल्या एग्जिक्युटिव्ज ना. एवढे करूनही, अनेक फ्रॉड पचवून अपवाद वगळता त्या कायम प्रचंड फायद्यात. त्या फायद्याचा हिस्सा शेअर्समार्फत त्यात गुंतवणूक करणार्‍या धनदांडग्यांच्या खिशात (म्हणून सामान्यांनी शेअर्स नाहीत निदान म्युचुअल फंडात गुंतवणूक करून आपला हिस्सा वसूल करायला हवा. पण एफडी नि इन्शुरन्स यात 'सेफ' गुंतवणूक करणारे दिवटे हे ध्यानात घेतील तर ना.). तुमच्या हाती सहा टक्क्यांचा तंबूरा. (ते ही टॅक्सेबल, आणि इन्फ्लेशनचा विचार करता हा कदाचित ऋण परतावा!) थोडक्यात हे 'ट्रिकल डाऊन' ऐवजी 'सक-इट-अप' झाले आणि बँका हे पैसे खेचून वर नेणारे पंप. (कम्युनिस्ट मंडळींनी हा मुद्दा उचलून धरला तर लोक डोक्यावर घेतील त्यांना. काय म्हणता कॉम्रेड?)

ज्या पक्षाचे सरकार बँकांना धार्जिणे धोरण बदलून ग्राहकांनाही समान हक्क देणारे धोरण आणेल, त्या पक्षाला पुढची हजार वर्षे मतदान करायची खुली ऑफर देतो आहे.

'बँक हा धंदा नसून सर्विस म्हणून तिच्याकडे पाहिले, तर या व्यवसायाचे स्वरूप आमूलाग्र बदलून ते ग्राहकांच्या दृष्टीने अधिक उपयुक्त होईल का?' हा एक प्रश्न मला अर्थशास्त्राची समज असणार्‍याना विचारावासा वाटतो.

- oOo -

तळटीप-१:
माझा मुद्दा समानतेच्या, व्यापाराच्या, स्पर्धेच्या तत्वाचा आहे. 'देवाणघेवाण समान व्याजदरावर झाली तर बँक धंदा कसा करणार?' हा प्रश्न विचारू नये. त्यासह व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न पडलेल्याने 'करू नये' हेच त्याचे उत्तर. इस्लामिक बँकिंग नावाचा एक प्रकार असतो, त्याचा अभ्यास करावा.

तळटीप-२:
इस्लामिक या शब्दाने पित्ताचा त्रास झाला तर जुन्या एखाद्या ग्रंथाचा हवाला देऊन 'हे आमच्याकडे आधीच होते'च्या प्रमाणपत्रांच्या पत्रावळी छापणार्‍या विद्वानांकडे जाऊन त्यांचे प्रमाणपत्र आणून त्याला 'हिंदू-बँकिंग' म्हणायला सुरुवात करावी... पाकिस्तानात हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक ऐवजी पाकिस्तानी क्लासिकल म्युझिक म्हणतात तसे.


हे वाचले का?

गुरुवार, २६ जुलै, २०१८

गुगलची घुसखोरी...

मोबाईलवर आपल्या पासवर्डसची फाईल तयार करून ठेवणार एक महान सीए मला ठाऊक आहे. आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे वाढदिवस, कौटुंबिक नाती इत्यादि सारी माहिती हौसेने फेसबुक, Google contacts मध्ये भरून आपल्या सोबत इतरांचाही बाजार उठवणारे महाभाग अनेक आहेत. त्यांच्यासाठी हा अनुभव.

---

Warning

काही महिन्यांपूर्वी अमेजन फायर टीव्ही स्टिक आणली. अलीकडेच 'यंग शेल्डन' ही मालिका संपल्यामुळे 'अमेजन प्राईम व्हिडिओ'वर एखाद्या विनोदी मालिकेचा शोध घेत होतो. त्यातून 'सिटीजन खान' (इंटरनॅशनल चित्रपट पाहणार्‍यांना 'सिटीजन केन' हा प्रसिद्ध चित्रपट आठवत असेल.) या 'ब्रिटीश पाकिस्तान'च्या पार्श्वभूमीवरील मालिकेचा शोध लागला. एक एपिसोड मागील आठवड्यात पाहिला नि विसरून गेलो.

आज You-tubeची साईट ओपन केली तर 'शिफारस’मध्ये 'सिटीजन खान' मधील विनोदी प्रसंग!

तुम्ही म्हणाल यात काय विशेष. पण लक्षात घ्या, फायर स्टिक वापरताना तुम्हाला 'अमेजन'चे लॉगिन वापरायचे असते. त्याच्याशी गुगलचा काही संबंध नाही. शिवाय ही स्टिक थेट टीव्हीला जोडली जाते. कुठेही कम्प्युटरचा संबंध येत नाही.

अतिशहाणपणा करून त्यावर क्रोम ब्राऊजर ओपन करून एखाद्याने काही ब्राऊज केले तरी मी समजू शकतो. पण माझा क्रोमवर मुळीच विश्वास नसल्याने मी तो प्रकार अर्थातच टाळला होता. मग गुगल बाबाजींना माझे प्राईम'वरचे सिलेक्शन मिळाले कुठून?

मी You-tube वर कधीही कुठले विनोदी विडिओ पाहिलेले नाहीत किंवा तसे वीडिओ असणारे काही You-tube चॅनलही सबस्क्राईब केलेले नाहीत. तिथे फक्त बुद्धिबळ, सायन्स फिक्शन, शास्त्रीय संगीत यांचीच चॅनल आहेत. आणि त्या बाहेर मी प्रामुख्याने nature videos पाहतो. म्हणजे ती You-tube वाटचालीच्या आधारे केलेली शिफारस असण्याचाही संभव नाही.

थोडा विचार करता असा पत्ता लागला, की ही स्टिक आणल्या आणल्या एकदा VLC अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी एकदा गुगल प्ले-स्टोअर ओपन केले होते! पण तेवढेच. म्हणजे गुगलचे कोणतेही अ‍ॅप इंस्टॉल केलेले नाही, जेणेकरून ते इंस्टॉल करताना डेटा वाचण्याचे राईट्स घेतले असावेत असे म्हणता येईल. किंवा कुठे गुगल अकाऊंटचे लॉगिन देखील केलेले नाही. म्हणजे त्या एका Play Store कनेक्शनचा हा प्रताप. चक्क बेकायदेशीरपणे माझा अमेजन प्राईम डेटा अ‍ॅक्सेस करणे चालू आहे. वर निर्लज्जपणे त्या डेटावर आधारित You-tube वर शिफारस देणे चालू आहे.

हजारो वर्षांपूर्वी गुगलने ब्राऊजरसाठी प्रथम 'गुगल टूलबार' आणला होता. त्याच वेळी मी त्याला फायर-वॉल बायपास करून, थेट socket कनेक्शन लावून परस्पर इंटरनेट कनेक्ट करताना पकडला होता. तेव्हापासून गुगलवर माझा फारसा विश्वास नाही. क्रोमच्या सुरुवातीच्या versions नी तो अविश्वास अधिकच दृढ केला. आपले दुर्दैव हे की आता अ‍ॅपल वगळता सारेच मोबाईल गुगलच्या 'अँड्रॉईड'वर आहेत. आणि अ‍ॅपलची ती सात तळ्याची तांब्या पितळेची माडी आपल्याला परवडणारी नसल्याने (असभ्य भाषा वार्निंग) गुगल समोर पँट खोलून बसणे ही आपली अपरिहार्यता आहे.

Welcome to फुकट software regime.

- oOo -


हे वाचले का?

गुरुवार, ५ जुलै, २०१८

...तेव्हा तुम्ही काय करता?

एका देहाच्या कुडीत वास्तव्यास असणारी
विविधरंगी व्यक्तिमत्वे, तिच्यावर संपूर्ण
ताबा मिळवण्यासाठी झटू लागतात...
...तेव्हा तुम्ही काय करता?

त्या कुडीत वास्तव्यास असलेला तत्त्वज्ञ
व्यक्ती-समष्टीचे कोडे उलगडून सांगताना
मध्येच थकून झोपी जातो...
...तेव्हा तुम्ही काय करता?

त्या निद्रिस्त तत्त्वज्ञाची प्रतारणा करत
एखाद्या वारयोषितेसारखी तुमची प्रवृत्ती
तुमच्यातल्याच विदूषकाचा हात धरते...
...तेव्हा तुम्ही काय करता?

अजरामर अशा हॅम्लेटच्या भूमिकेऐवजी
तुमच्यातला नट, रंगमंचावरील निश्चल
ठोकळ्याची भूमिका स्वीकारू इच्छितो...
...तेव्हा तुम्ही काय करता?

तुमच्यातील सुरेल-सूर-मग्न संगीत-प्रेमी
षड्ज-पंचमांच्या आधार स्वरांना त्यागून
धर्मस्थळांतील गोंगाटाला शरण जातो...
... तेव्हा तुम्ही काय करता?

सत्तेच्या खेळात निष्णात असलेला
तुमच्यातील राजकारणी, जेव्हा
’इदं न मम’ म्हणत संन्यस्त होतो...
... तेव्हा तुम्ही काय करता?

मनात सदैव बागडत असलेला रोमिओ
आपल्या सद्गुण-सालंकृत सखीऐवजी
एखाद्या स्वार्थ-साधिकेवर लुब्ध होतो...
... तेव्हा तुम्ही काय करता?

देहा-मनाला आत्यंतिक क्षुब्ध करणार्‍या
प्रश्नावर, एखादा लेख लिहित असताना
कागदावर एखादी कविताच उमटते...
...तेव्हा तुम्ही काय करता?

- डॉ. मंदार काळे
 
- oOo -

हे वाचले का?

सोमवार, ७ मे, २०१८

इतिहासाची झूल पांघरलेले बैल

इतिहासातील व्यक्तिरेखांना खांद्यावर घेऊन ’बाय असोसिएशन’ आपणही ग्रेट आहोत हे मिरवण्याची संधी लोक साधू इच्छितात. ती व्यक्तिरेखा आपल्या जातीची आणि/किंवा धर्माची असेल तर तिच्यावर आपला बाय डिफॉल्ट हक्क आहे आणि अन्य जात/धर्मीयांचा नाही असे बजावून तिच्यावर ’रिजर्वेशन’ टाकता येते. त्यातून सामान्यातल्या सामान्याला असामान्यतेच्या भोवती मिरवता येते. जोवर सामान्य असण्यात काही गैर नाही हे मान्य करत नाही, उगाचच श्रेष्ठत्वाची उसनी झूल मिरवण्याचे विकृत हपापलेपण माणसाच्या मनातून जात नाही तोवर हे असेच चालणार. पार्ट्या पाडून, टोळ्या बनवून खेळायला, खेळवायला, हिणवायला आणि माज करायला माणसाला आवडते.

इतिहास उकरून काढून आपली दुकाने चालवणारे जसे धर्मवेडे आहेत तसे जात-माथेफिरूही भरपूर आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षांत घरबसल्या तथाकथित ’खरा इतिहास’ लिहिणार्‍यांची आणि इतिहासकार म्हणून व्याख्याने झोडित हिंडणार्‍यांची एक फौजच तयार झाली आहे. राजकारणात तर इतिहासावरील वाद-विवाद हे अर्थकारणापेक्षा, अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य या मूलभूत गरजांपेक्षाही महत्वाचे झाले आहेत.

जसे देव नि धर्म हे श्रद्धेचे, विश्वासाचे, आचरणाचे विषय आहेत पण देवस्थाने मात्र या गोष्टी विकणारी श्रद्धेची दुकाने, मॉल्स आहेत, तसेच इतिहासाचा अभ्यास हा वेगळा मुद्दा आहे आणि त्यावरची अस्मितेची राजकारणे हा वेगळा. पण देवस्थाने ताब्यात घेऊन त्यांचा प्रचंड पैसा लोककल्याणासाठी वापरा म्हटले की साध्यासुध्या श्रद्धाळूंच्याच भावना अधिक दुखावतात, ज्यांच्या आड दुकानदारी करणारे सुखेनैव जगत राहतात. त्याच प्रमाणे इतिहासावर आधारित अस्मितेच्या राजकारणाला विरोध म्हणजे आमच्या ’वैभवशाली इतिहासा’ला डाग लावण्याचा प्रयत्न हा समज सामान्य करून घेत आहेत तोवर इतिहासाची दुकानदारी करणारेही त्यावर आपली पोळी भाजून घेतच राहणार आहेत.

श्रद्धाळूंनी श्रद्धेच्या बाजाराला विरोध केल्याखेरीज, धार्मिकांनी धर्मवेड्यांना विरोध केल्याखेरीज आणि इतिहासप्रेमींनी इतिहासावर आधारित राजकारणाला विरोध केल्याखेरीज हे कमी होणार नाही. पण दुर्दैव असे की एखादा श्रद्धाळू जसा तर्कानुसार योग्य ते सांगणार्‍या नास्तिकापेक्षा आपल्या धर्माच्या गुंडाला अधिक धार्जिणा होतो, तसाच इतिहासप्रेमीही ’आपल्या जातीला/सोयीचा’ इतिहास सांगण्यावर अधिक मेहेरबान असतो. किंवा असे म्हणून की या दोन छटांमधला फरक त्या त्या व्यक्तींना समजत नसावा. समजुतीपेक्षा, जाणीवेपेक्षा, विचारापेक्षा टोळीची मानसिकता अजूनही बळकट आहे. आपण तांत्रिक प्रगती केली असली तरी मानसिक पातळीवर अजून रानटीच आहोत. संस्कृती नावाचे काही अजून जन्मायचे आहे.

BanHistory

इतिहासातून प्रेरणा वगैरे घेता येते हा भंपकपणा आहे. असं घंटा काही घडत नसतं. नवनवे सार्वजनिक उत्सव निर्माण करून धंदेवाईक ’सामाजिक कार्यकर्ते’ निर्माण करण्यापलीकडे यातून काही साधत नाही.

फारसा प्राचीन इतिहासच नसलेल्या अमेरिकेने जी भौतिक प्रगती अल्पावधीतच साधली तिच्या जवळपासदेखील अन्य देश साधू शकलेले नाहीत हे वास्तव आहे. इतिहासाच्या कर्दमात रुतून गतिरुद्ध होऊन न बसल्यामुळे अमेरिकेन जनतेला- कदाचित अपरिहार्यपणे असेल, भविष्याकडे पाहूनच आपला मार्ग आखावा लागला आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे. 

'आमची आध्यात्मिक प्रगती पहा' म्हणणारे भोंदू, मूर्ख असतात. आध्यात्मिक प्रगती ही केवळ अध्याहृत बाब आहे. तिचे मोजमाप करता येत असल्याने दोनशे पट आहे म्हणणाराही बरोबर नि अधोगती झाली म्हणणाराही बरोबरच असतो. आणि तसाही तिचा व्यवहारात शून्य उपयोग असतो.

भूतकाळात आपल्या अस्मितेची, अभिमानाची स्थाने शोधणारे वर्तमानात संपूर्ण नालायक असल्याची अप्रत्यक्ष कबुली देत असतात. निदान तरुण पिढीने- ज्यांच्यासमोर अधिक व्यापक भविष्य शिल्लक आहे, तरी असल्या भंपक इतिहास-अस्मितेच्या नादी न लागता आपले भवितव्य अधिक चांगले असण्यासाठी आज काय करावे लागेल यावर विचार आणि कृती करण्यात अधिक वेळ खर्च करावा. इतिहासातील व्यक्तिरेखांना उचलून उत्सव साजरे करण्यात नि ’त्यांच्या’ (गट कसाही मोजा) व्यक्तिरेखा कशा कमअस्सल आहेत यावर आपली ऊर्जा नि वेळ खर्च करून वर्तमानाची वाट लावण्यापेक्षा भविष्यासाठी तो खर्च करावा.

इथून पुढच्या आपल्या अभ्यासक्रमांतून इतिहास हा विषय बाद करून फक्त भविष्यकालीन उपयुक्ततेचे विषय शिकवावेत यासाठी इतिहास हा विषयच बाद करून टाकावा. माझ्या मते देशाचे काडीचेही नुकसान होणार नाही. उलट काही पुतळे उभे करणे वाचेल की काही हजार कोटींचा चुराडा होणे वाचवता येईल.

पण तरीही तो अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांना येल अथवा ज्ञानेश्वर विद्यापीठात एक अभ्यासक्रम काढून द्यावा. तिथे किती प्रेरणा घ्यायची ती घ्या म्हणावं. फक्त त्याचं अभ्यासक्रमात कोणतंही क्रेडिट देऊ नये. प्रशासकीय अभ्यासक्रमातूनही तो विषय वगळून टाकावा.

एकुणच इतिहास हा प्रकार खरा वा खोटा नसतोच, तो फक्त सोयीचा वा गैरसोयीचा असतो इतके. सोयीचा तो खरा, गैरसोयीचा तो खोटा. एरवी इतिहास हे खरंतर एक आकलन (perception) असते इतकेच. त्यावरुन भांडणारे सार्वजनिक मूर्ख असतात, स्वार्थी असतात, कुणाचा तरी द्वेष करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करु पाहण्यास हपापलेले असतात इतकेच.

-oOo-


हे वाचले का?