शुक्रवार, ३० मार्च, २०१८

’माझा’ धर्म आणि मी

MyReligion

धर्म ही स्वीकारण्याची, अनुसरण्याची गोष्ट आहे, लादण्याची नव्हे.

माझा धर्म कोणता हे मीच ठरवणार, अन्य कुणी ठरवून कसे चालेल? जर मी ’पास्ताफारियन’ आहे आणि मी ’फ्लाईंग स्पागेती मॉन्स्टर’ या देवाची पूजा करणार आहे तर इतर कुणी त्यावर कसे काय आक्षेप घेऊ शकतील? जन्मजात मिळालेला धर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे असे बंधन जगाच्या पाठीवर कुठेही नाही.

पण बहुतेक माणसे आळशी असतात. वारशाने, अनायासे जे मिळाले तेच श्रेष्ठ मानून चालतात. इथवर ठीक असते. पण इथेच न थांबता पुढे इतरांनीही ते मानावे म्हणून आग्रह धरतात, इतरांचा धर्म मोडून काढायचा प्रयत्न करतात. हा मूर्खपणा तर आहेच, पण इतरांच्या अधिकारांचे उल्लंघनही आहे.

आम्ही बहुसंख्य आहोत म्हणजे आम्ही म्हणू तसे नियम हे बहुमताच्या राजकीय व्यवस्थेबाबत खरे आहे. पण तोच नियम धार्मिक बाबतीत लावता येणार नाही. राजकीय व्यवस्था ही केवळ तेवढ्याच धार्मिक गोष्टींत हस्तक्षेप करु शकेल जिच्या द्वारे तिच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी, सामाजिक परस्परसंबंध, हक्क नि आचारसंहिता, संपत्तीचा विनियोग इत्यादि बाबतीत संघर्ष होऊ शकतो. वैयक्तिक आचारधर्म कुणी कुठला निवडावा आणि अन्य कुणाही व्यक्तीच्या वा व्यवस्थेच्या हक्कांवर गदा येत नसेल तर त्या आचारधर्माने कसे वर्तन करावे याबाबत बोलण्याचा राजकीय व्यवस्थेला अधिकार नसतो/नसावा.

आता लिंगायत समूहाने आमचा एक धर्म आहे असे त्यांच्यापुरते ठरवले, तर त्याला आक्षेप घेण्याचे गैर-लिंगायताला काहीच कारण नसावे... जर त्या नव्या धर्मासोबत येणारे आचारविचार त्याच्या/तिच्या हक्कांवर नव्याने काही ’प्रत्यक्ष*’ गदा येत नसेल तर! वर म्हटले तसे सांपत्तिक बाजू, वारसा हक्क आदि गोष्टी ज्यांच्याबाबत राजकीय शासन उत्तरदायी असते, त्यांनी हस्तक्षेप करणे अपेक्षित असते. राजकीय व्यवस्थेला बदल करावा लागणार नसेल, तर त्याबाबत राजकीय व्यवस्थेने त्याबाबत मंजुरी देणे वा न देणे हे गैरलागूच आहे.

हिंदू, बौद्ध आणि जैन हे तीन स्वतंत्र धर्म आहेत. हिंदूंमधले काही हे मानत नाही. पण त्यांना विचारतो कोण. जोवर बौद्ध नि जैन स्वत:ला स्वतंत्र मानतात तोवर त्या हिंदूंच्या मानण्याला काही अर्थ नाही. (पहिला परिच्छेद पहा.) पण त्यांना एकच कौटुंबिक कायदा राजकीय व्यवस्थेने दिला आहे. तेव्हा राजकीय व्यवस्थेत(!) त्या विशिष्ट संदर्भात वेगळेपण नाही.

थोडक्यात आचारी धर्म नि राजकीय धर्म हे वेगळ्या दृष्टीने पहावे लागतात. लिंगायत/वीरशैव जर राजकीय व्यवस्थेकडे वेगळ्या धर्माची मागणी करत असतील, तर त्यांना राजकीय व्यवस्थेमध्ये नक्की कोणते वेगळे स्थान अपेक्षित आहे हे सांगायला हवे. तसे काही नसेल तर वैयक्तिक पातळीवर ते स्वत:ला वेगळा धर्म म्हणून घोषित करु शकतातच की. त्यासाठी सरकारी अनुमतीची गरजच काय. मला एखादा धर्म स्थापन करायचा झाला तर मी काय प्रत्येक देशाच्या राजकीय नेतृत्वाकडून परवानग्या मागत हिंडणार आहे की काय?

राहता राहिला मुद्दा काँग्रेस शासनाने स्वतंत्र धर्म म्हणून त्यांना अनुमोदन देण्याचा. त्यात आश्चर्य काहीच नाही. राजकीय पातळीवर माणसे स्वच्छपणे जातीय आणि धर्मीय गणिते जमवत असतात. 'तुम्हाला स्मशान हवे की कब्रस्तान?', 'तुम्हाला मंदिर हवे की मस्जिद?' हे प्रश्न ’धर्माधारित मते मागितली” या आरोपातून तांत्रिकदृष्ट्या पळवाट देत असतील तरी ते स्वच्छपणे धार्मिक आधारावर मते मागणेच असते.  

तिथे कायदेशीर असल्याचा दाखला द्यायचा नि कर्नाटकात मात्र नैतिकतेचा आधार घेण्याचा आग्रह धरायचा, याला दुटप्पीपणाच म्हटले पाहिजे. त्याच कर्नाटकातील एक भाजप आमदार पुढची विधानसभा निवडणूक ही ’राम विरुद्ध अल्ला अशी असणार आहे’ हे विधान करतात, तेव्हा आज काँग्रेस ध्रुवीकरण करत आहे म्हणणारे चूप होतेच की. ’आपला तो बाब्या...’ हेच सर्वत्र घडत असते. याचे कारण मुळात तुम्ही-आम्ही सामान्यांनी लाज सोडली आहे. प्रश्न मुद्द्याधारित न सोडवता, व्यक्तीसंदर्भात वा आपल्या-परक्या गटाच्या संदर्भात सोडवत राहिले की असे घडत असते.

आपल्या बाजूच्याने बेताल विधान वा वर्तन केले, तर आपण पार खाली डोके वर पाय करुन, रामदेवासन करुन, एक डोळा मिटून, डावा हात पाठीमागे नि उजवा हात क्षितीज समांतर धरुन वा अशीच अतर्क्य आसने करुन ते बरोबरच दिसावे अशी खटपट करत असतो. दुर्दैव असे, की हा आटापिटा न करता सरळ पाहणार्‍याला तुमचा हा ’दृष्टिकोन’ नसल्याने त्याला ते चूकच दिसत राहते. ’आपल्या’ बाब्याचे' (माझा कुणी बाब्या नसला तरी आपला विरोधक हाच तुमचा बाब्या असा कांगावा करणारे बरेच आजूबाजूला आहेत.) वाटेल ते करुन समर्थन करणे मला जमणार नाही.

तेव्हा काँग्रेसने अमुक केले तर ते कसे बरोबर किंवा ’तेव्हा का नाही’ हा प्रश्न मला विचारु नका. कम्युनिस्टांपासून काँग्रेसपर्यंत, व्हाया समाजवादी, भाजप सारेच चुका करतात आणि त्या चुकाच असतात असे मी म्हणतो.

अमक्याला फाशी योग्य, बरोबरच आहे आणि तमक्याला मात्र गोवले आहे असा दावा - तो ही पुराव्यांशी दूरदूरचा संबंध न येता - करणार्‍या मूर्खांच्या पंगतीत मी बसू इच्छित नाही. 'फाशी देणेच अयोग्य, मग गुन्हेगार कुणीही असो' असे सर्वसाधारण मत मी मांडत असतो. तुम्हाला हे विधान सर्वसाधारण विधान म्हणून अमान्य असेल तर 'ते तसे असावे की केस-टु-केस बेसिसवर विचार करावा' हा तात्त्विक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण तुमच्या सोयीचा म्हणून 'याकूबच्या फाशीबद्दल तुमचे काय मत आहे?' हा विशिष्ट प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो. कारण मूळ सर्वसाधारण विधानातच त्याचे उत्तर अनुस्यूत असते. त्यावरच्या तुमच्या कांगाव्याला मी भीक घालणार नाही.

त्याचप्रमाणे जातीय वा धार्मिक आधारावर राजकारण करणे एकदा गैर आहे असे मी सांगितले की पुन्हा, ’काँग्रेसच्या धार्मिक राजकारणाचे काय?’ किंवा ’ट्रम्प यांच्या धार्मिक राजकारणाबद्दल तुमचे मत काय?’ हे प्रश्न गैरलागू असतात. मी गणिती आहे. मी उत्तराचे सूत्र तुम्हाला दिले आहे. त्यात x ची काय व्हॅल्यू घालून तुम्ही उत्तर काढता याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्हाला गणित नीट सोडवता येते हे गृहित धरले, तर तुमच्या प्रत्येक x व्हॅल्यू साठी माझ्या सूत्रातून येणार्‍या उत्तरापाठीमागे मी ठाम उभा असणार आहे.

तुम्हाला मी काँग्रेसवाला, कम्युनिस्ट वा समाजवादी वाटत असलो तर ती तुमच्या समजुतीची मर्यादा आहे. तुम्हाला एका गटाच्या संदर्भातच माणसाचा विचार करता येतो, तुमची मानसिकता कळपाची आहे आणि एखाद्या खुंटीला लटकल्याखेरीज तुम्हाला जगता येत नाही. पण तो तुमचा दुबळेपणा आहे. त्याला मी जबाबदार नाही. आणि सुधारणा करायची असेल, व्यक्तीला व्यक्ती म्हणून पाहायचे असेल तर सुधारण्याची गरज तुम्हाला आहे, मला नाही.

कोणत्याही गटाचे वा नेत्याचे समर्थन करण्यास मी बांधील नाही. माझी मते ही माझीच असतात. तेव्हा कुठल्या तरी कळपाच्या माणसाने केलेली कृती वा विधान याचा जाब मला विचारण्यात अर्थ नाही.

तरीही इच्छा असेल प्रश्न जरुर विचारा, पण मी काँग्रेसविरोधी, कम्युनिस्टविरोधी वा समाजवादी विरोधी मत दिले तर आश्चर्य वाटू देऊ नका. आपण काय छान वार करतोय या तुमच्या भ्रमाला याने टाचणी लागली तर मला दोष देऊन आगपाखड करु नका.

मी - आणि फक्त मीच - माझ्या मतांना जबाबदार असतो, आणि इतरांच्या कृती वा मतांना मी जबाबदार नसतो.

-oOo-

*जे अप्रत्यक्ष परिणाम होतात त्याला कृती करणारा जबाबदार मानता येत नसतो. उदा. शेजारचा बंड्या शाळॆत पहिला आला, म्हणून दहावा आलेला खंड्या नाराज झाला. कारण बंड्याशी तुलना करुन त्याचे आईवडील त्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत नावे ठेवतात. आता हा खंड्या आणि त्याचे आईबाप यांच्यातील प्रश्न आहे. खंड्याला आनंदी राहण्याचा हक्क आहे नि तो बंड्या पहिला आल्याने हिरावला जातो म्हणून बंड्याने खंड्या पेक्षा जास्त मार्क मिळवू नयेत हा मूर्खपणाचा तर्क आहे. कारण त्यातून बंड्याच्या मूलभूत हक्कावर गदा येते. त्याच्या हक्काचाही विचार निर्णयात असायलाच हवा.


हे वाचले का?

बुधवार, २८ मार्च, २०१८

मास्तरकीचे दिवस

मी गणिताचा मास्तर होतो. राजकारण्याला जशा निवडणुका चुकत नाहीत तशा मास्तरला परीक्षांचे पेपर सेट करणे नि तपासणे हे भोग टळत नाहीत.

अशाच एका पेपरमध्ये एका टॉपरच्या पेपरमध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला - जे पूर्ण चूक होते - मी शून्य मार्क दिले. ती माझ्याकडे विचारणा करायला आली. मी ते गणित कसे सोडवायचे ते दाखवून रीत आणि उत्तर दोन्ही समजावून दिले आणि तुमचे दोनही चुकले हे पटवून दिले. ते मान्य करुनही तिचा तर्क होता, ’पण इतके लिहूनही शून्य मार्क कसे काय देऊ शकता तुम्ही?’ मी म्हटलं, ’अहो तुम्हाला गीतेतले श्लोक लिहायला सांगितले, तुम्ही मनाचे श्लोक लिहून ठेवले... कसे मार्क देणार?’

AnswerSheet

आपल्या परीक्षा व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी मास्तरांना चांगलेच जोखून ठेवले आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत नसले तरी पानभर काहीतरी लिहून ठेवायचे असा त्यांचा बाणा असतो. (काही मंडळी तर सरळ प्रश्नच पुन्हा उतरवून काढत) फूटपट्टी घेऊन बसलेले मास्तर लांबीनुसार मार्क देतात.

'मार्क देणार्‍या’ अशी ख्याती असलेल्या एका मॅडमच्या क्लासमध्ये असावे म्हणून लोक चक्क एक सेमिस्टर ड्रॉप घेत असत. पहिल्या सेमिस्टरला इमाने इतबारे अभ्यास करून विषय सोडवणारे आमच्यासारखे ६०-७० मध्ये रेंगाळत. तर आमच्याबरोबर असताना फेल झालेला प्राणी या मॅडमच्या कृपेने ७० ते ९० मार्क मिळवून पास होई. या बाईंची ख्याती म्हणजे त्याही लांबी पाहून मार्क देत. आम्ही दोघे मिळून एक पेपर शिकवत असताना, ’इतकं लिहिलं मुलांनी तर शून्य मार्क कसे द्यायचे हो.’ असं त्यांनी मला म्हटलंही होतं.

पुढे आयटी इंडस्ट्रीत आल्यावरही काहीसा हाच अनुभव आला. अजिबात टंगळमंगळ न करता दिवसभरात आपले काम व्यवस्थित संपवून वेळच्या वेळी घरी जाणार्‍यांचा भाव बॉस लोकांसमोर कमी असे. तर अमुक एक ’रात्री उशीरापर्यंत बसून काम करतो’ हे त्यांच्या दृष्टिने फार डेडिकेशन वगैरेचे लक्षण असे. त्यामुळे अनेक चलाख लोक दिवस इंटरनेटवर टाईमपास कर, मधे बाहेर जाऊन कामे करुन ये किंवा हॉटेलमध्ये जाऊन टाईमपास कर, टेबल टेनिस खेळ असे उद्योग करुन संध्याकाळी उशीरा बसून काम करत. त्यांचे appraisal अर्थातच चांगले होई.

गुणवत्तेपेक्षा व्हॉल्यूम किंवा आकाराला महत्त्व देणारा दृष्टिकोन किंवा एकुणच योग्यायोग्यतेची पारख करण्याची कुवत कमी असणे हे दोन आपल्या समाजाचे दोष आहेत. आमच्या आयुष्यातील पहिला डेक/टेप विकत घेताना आमच्या वडिलांना मोठ्या आकाराचा डेक हवा होता. त्याच्या आवाजाची क्वालिटी खराब आहे त्या मानाने लहान डेकचा आवाज उत्तम आहे हे पटवताना माझ्या नाकी नऊ आले होते.

... आता हेच पहाना, एका मागून एक चुकीची उत्तरे देणारा माणूस, ’अहो दिवसाला अठरा तास काम करतो’ या दाव्यावर काही जणांकडून पूर्ण मार्क घेऊन जातो. मग भले त्यातील बारा तास स्वस्तुतीपाठाची आवर्तने का असेनात. :)

आणि आम्ही उत्तराच्या लांबीपेक्षा खोलीला अधिक महत्त्व देणारे... मास्तर म्हणून नालायक ठरलो (स्वगत: शिकवणेही अत्यंत वाईट होते हे का सांगू तुम्हाला?) यात काय आश्चर्य.

- oOo -


हे वाचले का?

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

देवबाप्पा, डार्विन आणि शेल्डन

SheldonAndPastor

विषयसंगतीमुळे हा लेख ’वेचित चाललो...’ वर हलवला आहे. हा लेख इथे वाचता येईल.

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, २१ मार्च, २०१८

'नर्मदासे सीख’ च्या निमित्ताने...

समाजाचा मोठा भाग हा दुसर्‍या भागातील लोकांच्या दुरवस्थेबद्दल बहुधा उदासीन असतो. एकतर समाज म्हणून आपण आधीच नियतीवादी आणि त्यामुळे अक्रियाशील. स्वत:च्या उन्नतीसाठी वा समस्या-निवारणासाठी आपण फारसे नेमके काही न करता, बुवा-बाबांचे मठ आणि कुठल्या कुठल्या देवळांची वाट धरणारे, त्यातून आपल्या कुठल्याही समस्येचे निवारण होते असे समजणारे. अशा समाजात परदु:ख फारसे त्रास देत नाही. तिथे मग त्याच्या निवारणासाठी धडपड करणारे (भले तुमच्या मते चुकीच्या वा परिणामकतेच्या बाबतीत उणा असलेल्या मार्गाने का होईना) हे मूर्ख असतात असे समजणारे, अमेरिकन मॉडेल आदर्श मानणारे लोक आता ’सामाजिक बांधिलकी’ या शब्दालाही चॅलेंज देऊ लागले आहेत.

स्वार्थ साधला की आपोआप समाजाचे हित होते’ असले कुण्या खांद्यावर घेऊन प्रसिद्ध केलेल्या तथाकथित विचारवंताचे विधान आपापल्या झेंड्यावर मिरवणारे; आणि त्याच वेळी जात-धर्मादि कळपात पुन्हा पुन्हा घुसून आपल्या तथाकथित वैयक्तिकतावादाचे थडगे बांधणारे, आपल्या स्वार्थाला आता तात्त्विक अधिष्ठान देऊ पाहात आहेत. त्यात सध्या ’विकास, विकास, विकास’ अशी गर्जना करु लागलेला कळप तर आपल्याला न पटणार्‍या गोष्टींना, आपल्या स्वार्थाआड येणार्‍या गोष्टींना, काहीही न समजता, कळता थेट विकासविरोधी, प्रगतीविरोधी ठरवून, आपले निखळ स्वार्थी आयुष्य जगण्यास मोकळा होतो.

गेल्या तीन-चार वर्षात देशप्रेम/देशद्रोह हा द्वि-पर्यायी दृष्टिकोन दृढ होऊ लागल्यापासून विकासविरोधीच्या जोडीला आता देशद्रोही हे आणखी एक विशेषण चिकटवण्याची सोय झाली आहे. ’मग आम्ही टॅक्स नाही का भरत?’ या एक रुपयावर सारे जग खरेदी करु पाहणारे प्रामुख्याने नागरी लोक आपल्याच शहरातील बहुसंख्य समाजाच्या हिताऽहिताबद्दल उदासीन असतात. इतकेच नव्हे तर आम्हीच काय ते देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे, आणि बाकी सगळे फुकटे असा मूर्ख आविर्भावही त्यांच्या उक्ती-कृतीतून दिसून येत असतो.

MedhaPatkar

अशा वेळी आयुष्याची बत्तीस वर्षे खर्च ज्या व्यक्तीने एखादा लढा लढवला, ज्यातून व्यवस्थेत आवाजच नसलेल्या अनेकांना आवाज मिळवून दिला, त्यांच्यातून त्यांच्यासाठीच नेतृत्व निर्माण केले, त्यातून तथाकथित प्रगतीचा वरवंट्याचा वेग कमी केला; ’तिला देशद्रोही ठरवून फाशी दिले तरी उत्तम’ इतक्या तीव्र मताचे लोक माझ्या आसपास मी पाहतो आहे. अशा संवेदनाशून्य मंडळींची प्रजाती वेगाने आपले हातपाय पसरते आहे.

’पण विकासासाठी कुणीतरी त्याग केलाच पाहिजे’ म्हणणारे हे नमुने, ’तुम्ही काय त्याग केलात?’ या प्रश्नाला ’मग आम्ही टॅक्स नाही भरत?’ हा एक रुपया वापरुन पुन्हा खिशात ठेवतात. या देशातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या प्रमाणात अप्रत्यक्ष कर भरतच असतो हे दाखवून दिले, तरी त्यांचे रडगाणे गोलपोस्ट बदलून पुढे चालत राहतेच. मूलत: असंवेदनशीलता हे याचे कारण असल्याने त्यांच्याशी फारसा संवाद होणे वा रुजवात घालणे शक्यच नसते.

पण प्रशासकीय मंडळींच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. प्रशासन हे व्यवस्थेचे कार्यकारी अंग असते. विविध धोरणे, योजना यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. तेव्हा सर्वसामान्यांशी त्यांचा अपरिहार्यपणे संबंध येतो. अनेकदा उत्तम योजनांचे अंमलबजावणीतील ढिसाळपणाने तीनतेरा होतात. त्यात पुन्हा प्रशासनातील व्यक्तींचा स्वार्थ, सत्तेची मुजोरी, जनतेच्या बाजूनेही हक्काहून अधिक स्वार्थ साधण्याची होणारी चलाखी आदि अनेक अडथळे सामील होतात. मग अपयशाचे, चुकांचे खापर फोडण्यासाठी अपरिहार्यपणे’ ’मी सोडून इतर...’ गटातील एखादा निवडून आरोप-प्रत्यारोप होतात. एकदा हे सुरु झाले की तो विसंवाद कार्यातील अडथळा बनून राहतो. तेव्हा ही कोंडी फोडण्यासाठी मग तिसर्‍या बाजूला पुढे यावे लागते.

तीसहून अधिक वर्षे चालू असलेले ’नर्मदा बचाव आंदोलन’, आंदोलक आणि प्रशासन यांच्यात वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष हा स्वतंत्र देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष असावा. आणि इतक्या वर्षांनंतरही अनेक गावांचे पुनर्वसनच नसणे, बुडिताची रेषा नक्की कुठवर येणार इ. मूलभूत प्रश्नांबाबत गोंधळ सुरु आहेत.

दुसरीकडे सरदार सरोवरात अपेक्षेइतके पाणी नसल्याने जुलैपासून वीजउत्पादन ठप्प झाले आहे. मागील आठवड्यात शेतकर्‍यांनी पाणी उचलू नये म्हणून सरकारने निमलष्करी दलाचे पाचशे जवान धरण आणि कालवा परिसरात उभे केले आहेत. धरणाने पाणी अडवल्याने नदीमुखापाशी प्रवाहाचा वेग कमी झाल्याने, समुद्र उलट दिशेने काही किलोमीटर आत घुसल्याने आणखी शेतकरी आणि मासेमार (ज्याची शक्यता आंदोलनाच्या तज्ज्ञांनी आधी वर्तवूनही ’या प्रगतीविरोधकांचे काय ऐकायचे?’ या माजात दुर्लक्षिलेली) उध्वस्त झाले आहेत. असे नवनवे प्रश्न समोर येत आहेत.

TheDam

’झाले ना धरण, आता जुनी मढी का उकरता?’ म्हणणार्‍या अडाण्यांनी रोजचे वृत्तपत्र वाचले तरी समजेल की हे का करावे लागते. पुनर्वसन प्रलंबित, कालव्यांसारखी अनेक कामे अजूनही पुरी झालेली नसताना, नव्या समस्या रोज उभा राहात असताना याचे लोकार्पण वगैरे करणे हा विनोद आपण निवडणुकीच्या निमित्ताने आपण प्रत्यक्षात उतरवलेला पाहिला. तीन राज्यांशी संबंधित असणार्‍या या धरणाच्या या तथाकथित लोकार्पणाच्या कार्यक्रमाला तीनपैकी दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रणच नसल्याचा प्रकारही आपण याचि देही पाहिला. (त्या राज्यांत निवडणुका नव्हत्या हे साधे कारण.)

चीनच्या राष्ट्राध्यक्षांना वाहती साबरमती दाखवण्यासाठी पाणी सोडणारे, गुजरातच्या निवडणुकांआधी पाणी सोडण्यास म.प्र.ला भाग पाडणारे आणि आता म.प्र. च्या निवडणुका येताच उलट दिशेने या धरणाचे पाणी म.प्र. मधील नद्यांना वळवण्याचा निर्णय घेणारे सरकार आपण पाहिले. मुळात सिंचन आणि वीजनिर्मिती या उद्देशाने उभे केलेल्या धरणाचे पाणी अनेक उद्योगांकडे वळवल्याचे माहिती-हक्काच्या प्रश्नामार्फत उघडकीस आले. थोडक्यात गरज, विज्ञान, तंत्रज्ञान या पेक्षा राजकीय नेते, धंदेवाईक कंत्राटदार आणि उद्योगधंदे यांच्या हितासाठी उभे केलेले आणि जमिनीवरच्या माणसाला पायात चिणणारे हे धरण भारताच्या व्यवस्थेच्या अवस्थेचे भयावह प्रतीक होऊन राहिले आहे.

हे सारे लिहितो म्हणजे मी मेधा पाटकर आणि त्यांचे आंदोलन यांच्या बाजूचा आहे नि त्यांचे सारेच मला पटते असा अर्थ नाही. (जे मला सतत ’तुही बाजू कंची’ विचारतात हे त्यांच्यासाठी. तसंच ’सारखे सारखे तटस्थ काय, कधीतरी भूमिका घ्या’ म्हणणार्‍या आणि तटस्थता नि वस्तुनिष्ठता, मूल्यमापनसिद्धता यातील फरक माहीत नसलेल्यांसाठीही!) अमेरिकेत मोठी धरणे डि-कमिशन केली जातात म्हणजे ती अव्यवहार्य आहेत या त्यांच्या मताशी मी सहमत नाही.सदर विषयाचा माझा अभ्यास त्यांच्यापेक्षा कैकपट कमी आहे हे मान्य आहेच. पण माझे मत माझ्याच कुवतीवर सिद्ध झालेले असावे, उसनवारीचे नसावे असा माझा प्रयत्न असतो. आणि त्यांच्याशी असहमतीचे इतरही मुद्दे आहेत. पण ते सध्या सांगत बसत नाही.

कोणत्याही समस्येचे प्रश्नाचे अनेक पैलू असतात नि त्या बाबत साधकबाधक विचार, अभ्यास आणि मुख्य म्हणजे अलीकडच्या काळात सोन्याहून मूल्यवान झालेला डेटा, या गोष्टी सोबत घेऊनच निर्णयाकडे जावे लागते. मेधाताईंना परवा भेटलो तेव्हा त्यांच्या समोर पडलेला रिपोर्टस्‌, निकाल, पुस्तके आदिंचा ढिगारा पाहून ज्यासाठी त्यांच्या बाजूने त्यांचे विचार नि निर्णय हे अशाच मार्गाने घेतले असावेत असे म्हणायला फारसा प्रत्यवाय उरला नाही.

केवळ ’माते नर्मदे’ वाचून, बहुसंख्य वेळा तर त्याचे नुसते नाव ऐकून, ’त्यात दत्तप्रसाद दाभोळकरांनी मेधाताईंचा भंपकपणा (हा शब्द कदाचित दाभोळकरांचा नसतो, सांगणारा त्याच्या वैयक्तिक द्वेषाला त्या विधानात मिसळून देत असतो) कसा उघड केला आहे’ वगैरे दावे करणारे शहरी पाहिले की हसावे की रडावे कळेनासे होते. तसेही एक पुस्तक वाचून, किंवा त्याच्याबद्दल केवळ ऐकूनच त्याच्या शपथा खात आपली आयुष्यभराची भूमिका निश्चित करुन टाकणारे, त्या आधारे एखाद्या व्यक्ती, इझम, ऐतिहासिक वा राजकीय नेत्यावर आगपाखड करण्याइतके क्षुद्र आहोतच आपण.

अपेक्षेप्रमाणे फेसबुकवरच ’आम्ही टॅक्स भरतो’ जमातीच्या एका शहाण्याने केवळ एक फोटो पाहूनच ’सरकारचे कुणी प्रतिनिधी नव्हते ना?’ असा कुत्सित प्रश्न विचारला. अशा अलौकिक पूर्वग्रहदूषित जीवांचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. सुखात जगतात बिचारे. अर्थात विचारशून्य, पूर्वग्रहप्राधान्य आयुष्य जगणारा माणूस हा जनावराहून खालच्या दर्जाचा समजावा हे आमचे प्रामाणिक मत. ते असो.

पण ही झाली पार्श्वभूमी. वर म्हटले तसे तिसर्‍या बाजूने या दोन बाजूंना समोरासमोर आणावे लागते. तसे ते कामांच्या संघर्षाच्या निमित्ताने समोरासमोर असतातच, पण सर्वसामान्य जनतेच्या समोर त्यांच्यात खुली चर्चा, वाद-विवाद घडावा जेणेकरुन ’आम्ही टॅक्स भरतो’ जमातीला दोन्ही बाजू ऐकायला मिळतील असा उद्देश असतो. ’अफार्म’ आणि 'भवताल मासिक’ या दोघांनी मिळून तो योग जुळवून आणला होता. ’थंडा करके खाओ’ किंवा ’समस्येकडे दुर्लक्ष करा, आपोआप लोक कंटाळून सोडून देतील.’ या नव्या-जुन्या सत्ताधार्‍यांच्या सोप्या भूमिकेला अनुसरुन नव्या सत्ताधार्‍यांनीही आधी येतो येतो म्हणून ऐनवेळी नकार देत या चर्चेला एकतर्फी आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला. (त्यांची नावे मी सांगणे औचित्याचे ठरणारे नाही. आयोजकांना आवश्यक वाटले तर ते जाहीर करतील.)

परंतु सुदैवाने निवृत्त जलसंपदा सचिव विद्याधर रानडे, केंद्रीय जल आयोगाशी संबंधित असलेले आर. एस. गायकवाड यांच्या उपस्थितीने सरकारी/प्रशासकीय बाजू मांडली गेली. तर आंदोलनाच्या वतीने मेधा पाटकर, मीरा संघमित्रा यांनी बाजू मांडली. त्रयस्थ अभ्यासक पण तरीही ज्यांची भूमिका आंदोलनच्या भूमिकेला पूरक होती असे सौम्या दत्ता आणि सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी राज कचरु आणि तिसरी बाजू मांडण्यासाठी जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे आणि ’मेरी’चे माजी महासंचालक दि.मा. मोरे हजर होते.

Protesters

बरीच वर्षे मी नर्मदा बचाव आंदोलनाबाबत ऐकत वाचत आलो आहे. हे लोक प्रगतीविरोधी आहेत या मतापासून माझीही सुरुवात झालेली आहे. विचाराचे इंद्रिय विकसित झाल्यापासून आणि माध्यमस्फोटातून भरपूर माहिती मिळवता येऊ लागल्यापासून हे मत बदलत आले आहे. (’आमचे मत एकदा ठरले की ठरले, ब्रह्मदेव आला तरी त्यात बदल संभवत नाही’ असे म्हणणार्‍या बालकांना या निमित्ताने एक गोड गोड पापा.) ’धरणेच नकोत असे हे म्हणतात’, हे माझ्या आसपासच्या, माझ्यावर प्रभाव टाकू शकणार्‍यांचे मत उचलून माझी सुरुवात झाली. तिथून मग पुनर्वसनाची समस्या, नोकरशाहीची उदासीनता आणि उद्दामपणा, शहरात बसून ठाम मते बनवणार्‍यांचा निर्बुद्ध अहंकार हे पाहात मी पुढे गेलो आहे.

निव्वळ धरण हवे की नको हा एकच सोपा प्रश्न यात नसतो. धरण हवे असेल तर का हवे?, ’हवे असेल तर कुठे हवे’, ’त्याचे लाभधारक कोण नि किती?’ ’त्याची उद्दिष्टे कोणती?’, ’त्याचा निव्वळ अभियांत्रिकी पातळीवरुन अभ्यास करावा की अन्य काही घटकही त्यात असावे लागतात?’, ’मोजली जाणारी किंमत रुपयांपलीकडे आणखी कशा कशा स्वरुपात चुकवावी लागते, तिचे मोनेटायजेशन अथवा मूल्यनिर्धारण कसे करावे?’ ’मूळ उद्दिष्टे भरकटून वा हेतुत: अन्य उद्दिष्टांकडे जर लाभ वळवले तर काय परिणाम होतात?

उदा. जसे जायकवाडी धरणाने सिंचनाची ऐशीतैशी करुन बीअर फॅक्टरीज चालवल्या, तसेच इथेही अनेक खासगी कंपन्यांकडे पाणी वळवले. तर जे नदीमुखाशी समुद्र आत घुसल्याने बाधित झाले ते मूळ प्रस्तावाशी निगडित बाधितांच्या यादीत नव्हते, त्यांचे काय करायचे?

संख्याशास्त्राचा विद्यार्थी असल्याने, ’या सार्‍या प्रक्रियेत जे एस्टिमेट्स काढले जातात ते कसे काढले जात असावेत?’ हे कुतूहलही कायम माझ्या डोक्यात होते. याशिवाय जैववैविध्य हा बहुसंख्येने वृत्तपत्रात वाचलेला, ऐकलेला पण तिला न समजलेला शब्द इथे कितपत संदर्भ राखून आहे, आणि निव्वळ पर्यावरणाद्यांच्या अभ्यासाचा विषय या पलीकडे या जैववैविध्याला व्यावहारिक बाजू आहे की नाही?’ असेल तरी कुठली?, ते नाहीसे झाल्याने वा बाधित झाल्याने व्यावहारिक नुकसान होते का? होत असेल तर नक्की कशा प्रकारचे?’ असे आणखी काही प्रश्न मला सतावत होते.

या आणि अशा अनेक प्रश्नांच्या आधारे विविध बाजूंनी नर्मदा प्रश्नाकडे पाहण्याची संधी ’आम्ही टॅक्स भरतो’ जमातीला उपलब्ध झाली होती. पण अपेक्षेप्रमाणे त्यांना एका पुस्तकाचे नाव नि आपले पूर्वग्रह पुरेसे वाटत असल्याने त्याच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. त्यात त्यांच्या लाडक्या सरकारच्या प्रतिनिधींनी आणि त्या पुस्तकाच्या त्यांच्या लाडक्या लेखकानेही पाठ फिरवल्याने त्यांना आपलेच बरोबर असे स्वत:ला नि इतरांना पटवून देता आले असेल (कळपात असले की आपण बरोबरच असतो!) ’सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ असे प्रार्थनेत म्हणणार्‍यांनी उत्तरार्ध मात्र ’माझ्या प्रगतीसाठी त्यांनी त्याग करायलाच पाहिजे’ असा बदलून घेतला असल्याने त्याबाबत आणखी काय ऐकायचे असा त्यांचा प्रश्न असावा. आम्ही का बघावे, आमचा काय संबंध हे जोडीला असतेच.

प्रत्येक वक्त्याने जी मांडणी केली ती विस्ताराने सांगणे शक्य नाही. पण काही मुद्द्यांच्या आधारे धावता आढावा घेऊ शकेन.

मेधाताईंची मांडणी नव्याने सांगण्याची गरज नाही. वर्षानुवर्षे त्या त्यावर बोलत आल्या आहेत. तसं पाहिलं तर माझी अपेक्षा होती की ही मांडणी हा पूर्वपक्ष घेऊन तिचा प्रतिवाद करणारे सरकारच्या बाजूने कुणीतरी बोलावे. पण तसे न होता, दुसर्‍या बाजूने केवळ धरणांचे फायदे सांगण्यात धन्यता मानली गेली. या धरणासंबंधी मुख्य प्रश्न हे पुनर्वसनासंबंधी होते, पुढे ते मोठ्या धरणांतून निर्माण होणार्‍या पर्यावरणीय समस्यांबाबत होते. अशा वेळी एका बाजूने मिथेनची समस्या पुढे केल्यावर, तसे नाही असे मोघम विधान करणे किंवा पुनर्वसनातील समस्या समोर ठेवल्यावर नियमावली वाचून दाखवणे असे समांतर वा निरर्थक प्रतिवाद आले. मुद्द्याला मुद्दा भिडणे फार क्वचित झाले.

रानडे यांची मांडणी सरकारच्या बाजूची असल्याने त्याबाबत उत्सुक होतो. त्यांनी धरणांची आवश्यकता, त्यातून मिळणारे फायदे यांची उत्तम मांडणी केली. दुसरी बाजू मांडण्याचे मुख्य काम त्यांनीच केले. पण ते प्रतिवादस्वरुप न होता, दुसरी बाजू मांडणारे होते. आता हे ही पुन्हा फारसे नवीन नव्हतेच. धरणांचे फायदे आम्ही शाळेत शिकलो होतोच. पण तरीही मेधाताईंच्या मांडणीसोबत ही दुसरी बाजू आली हे उपयुक्तच ठरले.

फक्त त्यांच्या बोलण्यात असलेला इतरांबद्दलचा कंटेम्प्ट, निरादर खटकला. सौम्या दत्त यांनी मोठ्या धरणातील बायोवेस्ट मुळे निर्माण होणारा मिथेन, त्यातून निर्माण होणारी आर्द्रता आणि बाष्पीभवनाची समस्या याला उत्तर देण्याचा प्रयत्न रानडे यांनी केला पण त्यांची उत्तरे मला एकतर असमाधानकारक वाटली, अनेकदा तर ’असं नसतं’, ’असं म्हणता येणार नाही’ अशी मोघम वाटली. बाष्पीभवनाचा वेग काही पाण्याच्या एकुण साठ्यावर नव्हे तर सर्फेस एरियावर अवलंबून असतो हे शाळेतल्या मुलालाही ठाऊक असणारे कारण त्यांनी सौम्या दत्तांना दिले. पण मोठे धरण, मोठा साठा म्हणजे सर्फेस एरियाही बहुधा अधिक असणारच की हे साधे त्यांना समजले नसावे का?

सुरेश शिर्के यांनीही धरणाच्या बाजूने बोलणे अपेक्षित होते, पण त्यांना स्वत:बद्दल बोलण्यातून फारसा वेळ उरला नाही. त्यांच्या बोलण्यातून जलविद्युत ही सर्वात स्वस्त वीज असल्याने आवश्यक आहेच हा एक मुद्दा ठासून सांगण्यापलीकडे फार काही हाती लागले नाही. पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब वापरला तर किती वीज निर्माण होईल हा हिशोब त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पण नुकतेच ऊर्जा मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे सध्या भारताची गरज पुरी झालेली आहे तेव्हा पुढच्या आठ वर्षात नव्या योजनेची गरज नाही. असे असताना उगाच पाणी मिळते आहे त्या प्रत्येक थेंबाला अडवण्याची उठाठेव का करावी हा प्रश्न राहतो.

आणि वीज निर्माण होईल हो, पण त्यावर विविध स्वरूपात होणार खर्च किती? त्याचा हिशोब कसा करायचा? सरकारशी संघर्ष करणार्‍यांचा मुख्य मुद्दा तोच नाही का? शिवाय इथे मुद्दा ऊर्जेचा आहे, सिंचन हा वेगळा मुद्दा आहे. सिंचनासाठी आवश्यक पाणी साठवणे आणि ऊर्जेसाठी साठवणे यासाठी कदाचित वेगवेगळे उपाय असावेत.

सर्वात प्रभावी मांडणी होती ती सौम्या दत्त यांची. कदाचित एका सायंटिस्टच्या भूमिकेतून ती असल्याने, जरी आंदोलकांच्या भूमिकेशी सुसंगत असली तरी, अधिक नेमकी होती. पंधरा मिनिटात आठ मुद्दे सहजपणे ठसवून आपले मत मांडणे याला दाद द्यायला हवी. सौम्या दत्ता यांनी धरणातील पाणीसाठ्यात मुरलेल्या बायोवेस्ट - मुख्यत: झाडे नि पालापाचोळा - यातून निर्माण झालेला मिथेन वातारणासाठी घातक असल्याचे प्रतिपादन केले. रानडे यांनी हे मत अमान्य केले पण त्याचा साधार प्रतिवाद केला नाही.

जलविद्युत ही दावा करतात तशी खरोखरच स्वस्त वीज आहे का? असा प्रश्न दत्त यांनी उपस्थित केला. निव्वळ खर्च झालेल्या पैशाबरोबरच, प्रदूषण, विस्थापन, सामाजिक हानी आदि अन्य घटकांचा विचारही त्यात केला गेला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. हे मला तत्त्वत: मान्य झाले. एकुणच गुंतवणूक ही केवळ पैशामध्ये मोजण्याची चूक आपण सर्वच जण करत असतो. वेळ, ऊर्जा आणि इतर घटकांवरचा परिणाम मोजण्याचे, त्याचे मूल्यनिर्धारण करण्याचे भान आपल्याकडे नसते.

याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न रानडे आणि शिर्के यांनी केला. पैकी शिर्के यांनी केवळ ’माझ्या अनुभवातून सांगतो’ म्हणून हे चूक आहे असे ठामपणे सांगितले. तर रानडे यांनी सध्या फारच फेमस असलेल्या ’तिकडे पण बघा की’ चा वापर केला. त्यांनी औष्णिक ऊर्जानिर्मितीतून होणार्‍या प्रदूषणाचा मुद्दा काढला. हा योग्यच आहे असे माझे मत झाले. सौर ऊर्जा ही अद्याप पुरेशी सक्षम नाही, दिवसाचा मर्यादित काळच उपलब्धता, त्याला लागणारी जागा ही तेवढ्याच ऊर्जेसाठी लागणार्‍या जलविद्युत केंद्रापेक्षा कित्येक पट अधिक आहे हे मांडले. हा मुद्दाही योग्य आहे.

परंतु एवढ्याने जलविद्युत स्वस्त ठरत नाही असे मला वाटते. कारण प्रश्न जागेचा असेल, तर एक महत्वाचा मुद्दा असा की सौर पॅनेल्सना स्वत:ची स्वतंत्र अशी जागा आवश्यक नसते. जवळ जवळ प्रत्येक निवासी इमारतीच्या छतावर सौर पॅनेल बसवणे शक्य आहे. (अर्थात याची एफिशिएन्सी ही एकजिनसी उत्पादनापेक्षा खूप कमी होईल हे मान्यच.) तीच गोष्ट पवनऊर्जेची. रानडे असेही म्हणाले की पवनऊर्जेला जागा नाही का लागत? हा मुद्दा मात्र मला साफ अमान्य झाला. माणसांचा अधिवास असलेली जागा त्यांना विस्थापित करुन ताब्यात घेणारा जलविद्युत प्रकल्प आणि वस्ती नसलेल्या डोंगरावरची जागा व्यापणारे पवनऊर्जा प्रकल्प हे सारखेच हे मान्य करण्याची माझी तयारी नाही. शिवाय सौर ऊर्जा आणि पवन-ऊर्जा या दोन्ही प्रकारांत विस्थापनासारखी समस्या उद्भवत नाही. माणसांची, जनावरांची, झाडझाडोर्‍याची परिसंस्था उध्वस्त होत नाही. तेव्हा या दोन्ही बाजूंचे व्यवस्थित मूल्यनिर्धारण करुनच ते ठरवायला हवे. सध्या तरी जलविद्युत आवश्यक आहे हे मी मान्य केले, पण स्वस्त आहे हा दावा मात्र तूर्त अनिर्णित ठेवला.

NarmadaBasin

पुनर्वसनाबाबतच्या प्रश्नाला गायकवाड सरांनी परत नियमावली वाचून दाखवली हे अजिबातच पटले नाही. ते तर सर्वांना ठाऊक आहेच. तीसहून अधिक वर्षे आंदोलन करणारे, न्यायालयीन लढे लढणारे यांना ते माहीत नाही असे थोडेच आहे. समस्या त्याच्या अंमलबजावणीची आहे हे वर्षानुवर्षे समोर आले आहेच. चर्चेला उपस्थित असणारे प्रकल्पबाधितांचे प्रतिनिधी यामुळे नाराज झाले नि त्यांच्या रोषाचा सामना गायकवाड यांना करावा लागला.

दि.मा. मोरे यांनी २०१३ मध्ये पारित केलेल्या पुनर्वसन विधेयकाचा आवर्जून उल्लेख केला. ज्याबाबत फारसे बोलले गेलेले नाही, अगदी ज्या काँग्रेस शासनाने ते पारित केले त्या शासनालाही त्याचे महत्त्व फारसे उमगलेले दिसत नाही. (अर्थात रस्त्याच्या कडेला खडी-डांबर पसरल्याचेही श्रेयही बॅनर लावून घेण्याचा प्रघात त्या काळात नव्हता.) मोरे आणि प्रदीप पुरंदरे यांनी दोन्ही बाजूतील पटणारे असे मांडत मध्यममार्गाची मांडणी केली, जी बव्हंशी माझ्या मूल्यमापनाशी जुळणारी होती असा दावा मी करु शकतो.

हा सारा खटाटोप ज्यांच्या समस्यांबाबत चालू होता त्या प्रकल्पबाधितांचे चार प्रतिनिधीही थोडक्यात उत्तमपणे आपली बाजू मांडून गेले. महाराष्ट्रातून नूरजी भाई, म.प्र.मधून एक महिला (नाव विसरलो. :( ) गुजरातमधून देवरामजी आदिंनी आपली बाजू मांडली. सामान्यपणे गावाखेड्याकडून आलेली माणसे शहरात बुजतात, त्यात स्टेज-फ्राइट तर शहरातही दहातील नऊ जणांना असते. या चार जणांचे भाषण म्हणजे आत्मविश्वासाचा उत्कृष्ट नमुना होता. देवरामजींनी तर अतिशय निर्भिडपणे शहरी दुटप्पीपणावर प्रहार केले. वर उल्लेख केलेल्या सद्यस्थितीचे अनेक तपशील या चौघांनी मांडले. अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला की साध्यातला साधा माणूसही कसा वाघाच्या छातीचा होतो याचे हे दर्शन सुखावणारे होते.

यातही एक आवर्जून उल्लेख करण्याजोगा मुद्दा म्हणजे केवळ टीका करण्यापलीकडे जाऊन जे साध्य झाले त्याबाबत नूरजीभाईंनी त्या त्या वेळच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना आवर्जून धन्यवाद दिले. म.प्र. आणि गुजरात यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुनर्वसनापासून सर्व प्रक्रिया अधिक सुलभ झाल्या याचा उल्लेख या लोकांनी - आणि मेधाताईंनीही - न चुकता केला. सतत पार्ट्या पाडून घरबसल्या वादंग लढवणार्‍यांसाठी हा उत्तम वस्तुपाठ ठरावा.

या सार्‍या प्रकारात संयोजनाने मात्र पूर्ण भ्रमनिरास केला. उद्दिष्टाच्या पातळीवर हा ’डिबेट’ अथवा वादविवाद असेल अशी माझी अपेक्षा होती. तिथे त्याची व्याख्यानमाला झाली. दोन स्वतंत्र विरोध भूमिका एकाच व्यासपीठावरुन मांडण्यापलीकडे त्यातून काही साध्य झाले नाही.

या कार्यक्रमाची भाषा अथवा संवाद माध्यम काय असावे याबाबत आयोजकांनी विचारच केला नसावा असे दिसले. हा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर घेत आहोत की महाराष्ट्रापुरता याबाबत गोंधळ असावा. केंद्रातील काही पदस्थ, सरदार सरोवर प्रकल्पाशी संबंधित अधिकारी आणि अर्थातच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी येणार म्हटल्यावर कार्यक्रम हिंदी भाषेतून व्हावा ही अपेक्षा होती. अनेक उपस्थितांनी तसे गृहित धरले असावे असे दिसले. असे असता बहुतेक वक्त्यांनी मराठीतून आपले म्हणणे मांडल्याने म.प्र., गुजरात मधून आलेल्या अनेक प्रतिनिधींना दिवसभर न कळणार्‍या भाषेतील अगम्य पोपटपंची ऐकल्याचा अनुभव आला असणार.

शिवाय सूत्रसंचालक म्हणून निवडलेले पहिले दोघेही हिंदी भाषेबाबत इतके चाचपडत होते, की त्यांना का निवडले होते असा प्रश्न पडला. पुढचा प्रश्न असा की सूत्रसंचालक म्हणजे ’हां आता तुम्ही बोला. आता तुम्ही बोला’ या पलीकडे त्याला काही काम असते की नाही? तेवढेच जर अपेक्षित होते तर अधिक सहज हिंदी बोलू शकणारा/री एखादी व्यक्ती निवडून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिच्याच हाती देण्यास काय हरकत होती?

कार्यक्रमाची पूर्वप्रसिद्धीही फारशी झाली नसावी. याचे कदाचित एक कारण म्हणजे सरकारच्या बाजूने अखेरपर्यंत कोण येणार, की येणार नाही याबाबत शिल्लक असलेला संभ्रम हे असावे. त्यामुळे निमंत्रण पत्रिकाही कुण्या वक्त्याच्या नावाशिवाय असल्याने नक्की कोण नि काय बोलणार याबाबत आमंत्रितांना ठाऊकच नसल्याने त्या विषयाबाबत उत्सुक असणार्‍या अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली असावी.

सोमवार हा कामाचा दिवस, त्यातही आठवड्याचा पहिला दिवस असल्याने बहुतेकांच्या कामाचे नियोजन करण्याचा, मीटिंग्सचा दिवस असल्यानेही स्थानिक उपस्थिती कमी झाली असावी. प्रेक्षकांत अमराठी प्रकल्पबाधितांची संख्या त्यामुळे अधिक दिसली. म्हणजे पुन्हा ’माहितगारांना माहिती देणे’ हेच यातून साधले का? त्यात संवादाची भाषा मराठी असल्याने या अमराठी मंडळींची झालेली कुचंबणा पाहता ते तरी कितपत साध्य झाले असा प्रश्न शेवटी उरला.

’धरणे म्हणजे या देशाची तीर्थक्षेत्रे आहेत’ हे नेहरुंचे विधान उद्धृत करुन ’असलेच तर’ ते पाप नेहरुंच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. पण हे विधान केल्यानंतर तीनच वर्षांनी नेहरुंनी ही ’विनाशाची महाकाय केंद्रे झाली आहेत’ हे केलेले विधान लोक सोयीस्करपणे विसरुन जातात, हे मीरा संघमित्रा यांनी निदर्शनास आणून दिले. आपली चूक कबूल करणारा, ती सुधारुन घेण्याची इच्छाशक्ती असणारा नेता मिळणे ’मीच बरोबर तुम्ही साफ चूक’ अशा मानसिकतेने जगू लागलेल्या समाजात आता दुर्मिळच झाले आहे. अशा देशात ही तीर्थक्षेत्रे उद्योगधंदे नि कंत्राटदारांच्या ’तीर्था’ची सोय करणारी म्हणूनच उभारली जात असतील तर नवल नाही.

-oOo-


हे वाचले का?

रविवार, ११ मार्च, २०१८

स्ट्रँड, पॉप्युलर आणि पुस्तक-व्यवहार

मुंबईच्या प्रसिद्ध ’स्ट्रँड’ पाठोपाठ पुण्यातील ’पॉप्युलर बुक हाऊस’ बंद होत असल्याची बातमी वाचायला मिळाली*.

मी मुंबईकर नसल्याने स्ट्रँडचा अनुभव नाही, पण जे वाचायला मिळते आहे त्यावरुन पारंपरिक पुस्तकविक्रीचे मॉडेल कालबाह्य झाल्याने अव्यवहार्य होऊन ते बंद करावे लागले असे दिसते. पॉप्युलरच्या सुनील गाडगीळांनीही हाच सूर आळवला आहे. स्ट्रॅण्ड बंद होण्याची दिलेली कारणे कितपत खरी हे तपासून पाहण्यासाठी माझ्याकडे पुरेसा डेटा नाही. पण पॉप्युलर बाबत मी थोडेफार बोलू शकतो.

PopularBookHouse

दोन वेळचे अन्न मिळवण्याची भ्रांत होती तोवर पुस्तक विकत घेणे हा प्रकार संभवत नव्हता. खासगी क्लासेसमधून काही वर्ग घेणे सुरु केले, त्यांचे पेपर तपासून देण्यातून काही प्राप्ती होऊ लागली, तेव्हा दोन-तीन महिन्यांतून एखादे पुस्तक विकत घेणे परवडू लागले. तेव्हा पुस्तके विकत घेण्याचे ठिकाण होते ’पॉप्युलर बुक हाऊस’. त्याच्या शिवाय पुण्यात रसिक साहित्य आणि डेक्कनवरचे दीक्षितांचे ’इंटरनॅशनल बुक हाऊस’. बाकीची दुकाने प्रामुख्याने शालेय पुस्तकेच विकत असत. ’इंटरनॅशनल’ मध्ये पुस्तकांवर हवी तेवढी धूळ फ्री मिळत असल्याने तिथे मी फारसा पाऊल ठेवत नव्हतो.

विद्यापीठातून परत येताना डेक्कन जिमखान्यावरुन बस बदलावी लागत असल्याने थेट अप्पा बळवंत चौकात 'रसिक’ला जाण्यापेक्षा तिथल्या तिथे पॉप्युलरमधे जाणे सोयीचे होता. इंटरनॅशनलच्या गलथान कारभाराच्या तुलनेत भरपूर लाईट्स आणि स्वच्छता असल्याने पावले तिकडेच वळत. (अर्थात उपलब्ध पुस्तकांची तुलना केली तर इंटरनॅशनल अधिक सोयीचे. पण तेव्हा मी प्रामुख्याने समकालीन पुस्तकेच अधिक वाचत असल्याने फार फरक पडत नव्हता.)

पुस्तकांच्या जाहिरातीसाठी ईमेल बुलेटिन वापरणारे गाडगील पहिलेच असावेत. ’या आठवड्यात आलेली पुस्तके’ अशा सब्जेक्ट लाईनची ईमेल दर आठवड्याला येई. इतकेच काय पण अमुक एक सीडी वा पुस्तक हवे आहे नि ते उपलब्ध नसेल तर ते मागवून घेऊन फोन करणारे दुकान असल्याने सोयीचेही ठरले.

काळ पुढे गेला तसे गाडगीळांनी बिजनेस मॉडेल हळूहळू बदलत नेले. दुकानाची मागची बाजू प्रथम इंग्रजी पुस्तकांनी भरली. मग काही रॅक्स केवळ महाविद्यालयीन उपयोगाची तांत्रिक पुस्तके आली. यथावकाश संगणकासंबंधी पुस्तके अवतीर्ण झाली. त्यांनी तर काही काळ इतका धुमाकूळ घातला की इंग्रजी साहित्याच्या पुस्तकांनाही एक रॅक रिकामी करुन देऊन माघार घ्यावी लागली. या सार्‍या प्रकारात मराठी पुस्तकांसाठी एका कोपर्‍यातील दोन रॅक्स तेवढ्या उरल्या होत्या. मग सीडीज आल्या. दुकानाच्या डोक्यावर खेळण्यांचे दुकान सुरु झाले. एकुणात पुस्तकांच्या दुकानाचा पुस्तके आणि इतर अनेक गोष्टींचा मॉल झाला.

यातून दुकानाचा फोकस पुरा नाहीसा झाला. दुकानात सगळ्या प्रकारची पुस्तके आहेत, पण एखाद्या प्रकारचे नेमके हवे असलेले पुस्तक नाही हा प्रकार वारंवार घडायला लागला. आजच्या गुगलच्या नि व्हॉट्स अ‍ॅपच्या जमान्यात माणसांच्या माहितीचा विस्तार वाढला पण खोली कमी झाली आहे, अगदी तसेच ’पॉप्युलर’चे घडले. सर्व प्रकारची पुस्तके मिळतात म्हणून कोणत्याही पुस्तकाची गरज असलेल्या लोकांची पावले तिकडे वळू लागली, पण हवे ते पुस्तक मिळण्याची शक्यता कमी आहे हे ध्यानात आल्यावर पर्यायांच्या शोधात निघाली. महाविद्यालयीन गरजेची नि संगणकाची पुस्तके घेण्यासाठी लोक कॅम्प गाठू लागले. एकदा एक मराठी पुस्तक हवे होते म्हणून तिथे गेलो असताना, एरवी आवर्जून पुस्तके मागवून देणार्‍या गाडगीळांनी ’आम्ही मराठी पुस्तके फारशी ठेवत नाही’ असे किंचित आढ्यतेखोर स्वरात उत्तर दिल्यावर मी तिकडे जाणे बंद केले. माझी खात्री आहे मराठी पुस्तके नेण्यासाठी जाणारे अशाच कारणांसाठी दूर गेले असावेत.

पुढे अनेक प्रकाशकांनी आपापल्या बुक गॅलरीज काढल्या, अर्धा किलोमीटरवरील इंटरनॅशनलचे ’बुकगंगा इंटरनॅशनल’ होऊन त्याने कात टाकली, इंग्रजी पुस्तके डिस्काउंटसह ऑनलाईन खरेदी करुन घरपोच मिळू लागली, सीडी या प्रकाराला जवळजवळ घरघर लागली, प्रचंड इंटरनेट डेटाबेस मुळे संगणक शिकण्यासाठी कुणीही पुस्तक वाचेनासे झाले... एक एक करुन पॉप्युलरचा ग्राहक नाहीसा होत गेला.

थोडक्यात सांगायचे तर ’If you try to please everyone, you end up displeasing everyone.’ हे पॉप्युलरला तंतोतंत लागू पडणारे आहे. न बदलणे हे स्ट्रँडच्या पतनाचे कारण असेल तर फार बदलणे, वारंवार बदलणे आणि आपली ओळखच निर्माण न करणे हे पॉप्युलरच्या पतनाचे कारण आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.

तेव्हा गाडगीळांनी दिलेल्या कारणाशी मी सहमत नाही. एखाद्या नवशिक्या कवीने जसे आपल्या कवितेत ’फेसबुक, ट्विटर, जागतिकीकरण’ वगैरे शब्द घुसवून आपली कविता नव्या जगाची, नव्या जाणीवेची वगैरे असल्याचा दावा करावा तसे काहीसे करण्याचा प्रयत्न ’पॉप्युलर’ने केला नि तो अपरिहार्यपणे फसला असे म्हणावे लागेल. स्ट्रॅण्ड आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून लयाला गेले, पॉप्युलरचे मात्र ’गाढवही गेले नि ब्रह्मचर्यही’ अशी स्थिती झाली आहे.

असे असले तरी पुस्तक खरेदीच्या सुरुवातीच्या काळात हवी असलेली पुस्तके, सीडीज आवर्जून आणून देणारे गाडगीळ आणि पॉप्युलरबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच. तेव्हा ते बंद होणार म्हणून वाईट हे वाटणारच. पण बदल हवा म्हणताना बदलांचा अतिरेकी हव्यासही तुमच्या पतनास कारणीभूत होतो हे सांगण्यासाठी ही पोस्ट.

-oOo-


हे वाचले का?

शनिवार, १० मार्च, २०१८

राजकीय मिथकांची निर्मिती आणि संघर्ष

दुसर्‍या महायुद्धात जर्मन सेनेची रशियात वेगाने सरशी होत होती, लवकरच त्या स्टालिनग्राडवर येऊन धडकतील अशी चिन्हे दिसू लागली होती. स्टालिनग्राड पडणे म्हणजे रशियाची निर्णायक पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु होणे असाच अर्थ काढला जात होता. मेजर कुऽनिग नावाच्या जर्मन स्नायपरची दहशत रशियन सैन्याने घेतली होती. फासे पलटायचे तर काही चमत्काराची गरज होती. पण कम्युनिस्ट रशियामध्ये चमत्कारांच्या अपेक्षेला स्थान नव्हते.

आपल्या आजोबांनी शिकवलेल्या अजोड नेमबाजीच्या बळावर शिकार करणार्‍या वासिली या एका मेंढपाळाला कोमिसार दानिलोव हा अधिकारी हेरतो, त्याला लाल सैन्यात दाखल करुन घेतो. इथून पुढे वासिलीने मारलेल्या प्रत्येक जर्मन सैनिकासाठी एक एक हेल्मेट वाढवत स्टालिनग्राड मध्ये पोस्टर्स लावली जातात.त्या पोस्टरवरील दररोज वाढत जाणारी हेल्मेट्सची संख्या पाहून जनतेच्या आणि सैन्याच्या मनात नवी उमेद निर्माण होते. मेजर कुऽनिगची दहशत हळूहळू कमी होत जाते. केवळ पंधरा-वीस हेल्मेट्सची पोस्टर्स युद्धग्रस्त स्टालिनग्राडला युद्धसंन्मुख करतात आणि जर्मनीच्या भावी पतनाची नांदी गातात.

EnemyAtTheGates
वासिली झाईत्सेव नावाचे मिथक आकार घेते आहे. (डावीकडून: कोमिस्सार दानिलोक, अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव आणि वासिली)

ही कथा आहे ‘एनिमी अ‍ॅट द गेट्स’ या चित्रपटाची. स्टालिनग्राडच्या वास्तविक युद्धात हजारे सैनिक मरतात, त्यांची कुटुंब उध्वस्त होतात. प्रत्यक्ष रणभूमीवर एखाद्या सैनिकाने मारलेल्या शत्रू-सैनिकांची संख्या वासिलीने मारलेल्या जर्मनांच्या संख्येपेक्षा अधिकही असेल. किंबहुना एखाद्या स्नायपरने दुरुन टिपलेल्या एखाद-दोन शत्रू सैनिकांपेक्षा एखादे ठाणे काबीज करणार्‍या फूट-सोल्जरची कामगिरी अधिक निश्चित, अधिक निर्णायक असते. पण देशाचा हीरो असतो तो वासिली! कारण केवळ माणसे किती मारली, किती भूमी जिंकली, यापेक्षा ती जिंकणार्‍या सैनिकांना मिळालेल प्रेरणा ही त्यांचे शौर्य जागवते, लढण्यासाठी साध्य आणि बळ दोन्ही पुरवते, आणि म्हणून अधिक महत्त्वाची ठरते.

शत्रूच्या एखाद्या बलाढ्य आणि अजेय अशा नेत्याची भीती आपल्या अनुयायांच्या मनातून काढून टाकण्यासाठी मिथकांची निर्मिती करणे, आपल्या साध्याला, संघर्षाला एक काल्पनिक आयाम देणे, हे साधन इतिहासात अनेक ठिकाणी वापरले गेलेले दिसून येईल. विजापूरचा महाकाय नि अजेय अफजलखान चालून येतो आहे हे ऐकून भयकंपित झालेल्या आपल्या सहकार्‍यांना प्रेरित करण्यासाठी, भवानी मातेचा दृष्टांत वापरणारे शिवाजी महाराज आठवा. संख्याबळ अतिशय तोकडे असताना, पराभवाचीच शक्यता दिसत असताना, दैवी दृष्टांताचा दावा करुन आणि सर्व सैनिकांच्या ढालीवर ‘क्रॉस’ चे चिन्ह लावून मिल्वियन ब्रिज ची लढाई जिंकणारा आणि सम्राट होण्याकडे पहिले पाऊल टाकणारा कॉन्स्टंटाईन आठवा. हेच तंत्र कोमिसार दानिलोवने वासिलीचे मिथक निर्माण करताना वापरले आहे.

इतिहासात अशा मिथकांच्या निर्मितीचे अनेक किस्से विखुरलेले दिसतात. एकतर ती थेट उचलून आपल्या फायद्यासाठी वापरली जातात किंवा त्यातील निवडक व्यक्तींना, घटनांना घेऊन वर्तमानात त्यांची मिथके तयार केली जातात, त्यांचा वापर साधन म्हणून केला जातो. ज्यांच्या इतिहासात अशी मिथके तयार करण्याजोगे कुणी सापडत नाही, ते आधीच स्वयंसिद्ध असलेल्या, विशिष्ट कर्तृत्व वा गुणवैशिष्ट्यांबाबत यापूर्वीच प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींचे मिथकांत रूपांतर करुन आयता हक्क सांगू लागतात. मग ते अर्वाचीन इतिहासातले शिवाजी महाराज असोत की पौराणिक ग्रंथातले प्रभू राम असोत. याचसाठी देशोदेशीचे इतिहासप्रेमी म्हणवणारे लोक इतिहास उकरित बसतात, त्या आधारे जनतेच्या अस्मितेला चेतवून त्यांच्यावरील आपल्या सत्तेची मांड घट्ट करत जातात.

असा एखादा त्राता, असे एखादे मिथक उभे करुन फक्त जमिनीवरच्या लढायाच जिंकल्या जातात असं नाही, मतांच्या लढायाही जिंकता येतात. भाजपची मातृसंघटना असलेला संघ इतिहासातील व्यक्तींना अशा मिथकांमध्ये रुपांतरित करण्याबद्दल ख्यातकीर्त आहेच. त्याशिवाय दक्षिणेतील द्रविड पक्ष असोत, शिवाजी महाराजांवर एकाधिकार सांगू पाहणारी शिवसेना असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारुन त्यांच्या सावलीत आपल्या सत्तेची रोपे रुजवू पाहणारी कांशीराम-मायावतींची बसपा असो, हे सारे अशा प्रतीकांच्या अथवा मिथकांच्या सहाय्याने मतांची आणि सत्तेची गणिते जमवू पाहणारी मंडळी आहेत. पण अशी मिथके, असे त्राते हे फक्त भूतकाळातूनच निर्माण करता येतात असे मुळीच नाही, ‘वासिली झाईत्सेव’ सारखी वर्तमानातली साधी सुधी माणसे देखील परिणामकारक प्रचारतंत्राच्या आधारे मिथकात रुपांतरित करता येतात.

NaMoSweeping

२०१३ मध्ये नरेंद्र मोदी नावाचे एक मिथक भाजप आणि त्याच्या मातृसंघटनेने जन्माला घातले. गुजरात नावाच्या राज्यातल्या नेत्रदिपक प्रगतीच्या बातम्या अचानक भारतभर प्रसृत होऊ लागल्या. आपण त्याचा स्वत: अनुभव घेऊन आल्याचे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक अचानक आसपास दिसू लागले. समाजमाध्यमांतून या तथाकथित प्रगतीचे फोटो पाहायला मिळू लागले. हे मॉडेल फक्त देशभरात लागू करायचा अवकाश, ‘अहा, देश किती छान’ म्हणायला आपण मोकळे होऊ असा ठाम दावा गल्लोगल्ली ऐकू येऊ लागला. कृतीच्या पातळीवर हे विकासाचे दावे, तर वैयक्तिक पातळीवर बाल नरेंद्राने पकडलेल्या मगरीच्या दंतकथा नरेंद्र कॉमिक्स मधून आम्हाला सांगितल्या जाऊ लागल्या. तुमचा आमचा हा त्राता किती जमिनीवर वावरणारा आहे (यथावकाश ते जमीन सोडून जवळजवळ विमानवासीच होऊन गेले, पण ते नंतर) हे सांगण्यासाठी जमिनीवर उकिडवे बसून खराट्याने जमीन झाडणारा नरेंद्र मोदी नावाचा कार्यकर्ता आम्हाला दाखवला गेला. पाहता पाहता नरेंद्र मोदी नावाचे मिथक उभे राहिले. त्या मिथकाने कोणता इतिहास घडवला हे आता सर्वज्ञात आहे.

त्या मिथकाच्याही पूर्वी संजय जोशी नावाचे एक मिथक गुजरातमध्ये निर्माण केले गेले होते, ज्याने गुजराथमध्ये भाजपचे सरकार आणण्यास मोठा हातभार लावला होता. पण ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांच्या वर्चस्वलढ्यात, अन्य दोन देवांच्या पंथातील लोकांनी बलात्काराचा आरोप करुन नामोहरम केलेल्या ब्रह्मदेवासारखे नव्या मिथकाच्या राज्यात ते पूर्णपणे भग्न करुन राजकीय पटलावरुन नाहीसे केले गेले. वर्चस्वाची अंतर्गत लढाई देवांसारख्या सर्वव्यापी मिथकांना चुकली नाही, ती जमिनीवरच्या माणसांना कशी टाळता येणार?

SunilDeodhar
सुनील देवधर

आज त्रिपुराच्या निकालांनतर सुनील देवधर नावाचे एक नवे मिथक आकाराला येते आहे. या नव्या शिलेदाराने त्रिपुरामध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी २ टक्क्यांरुन बेचाळीस टक्क्यांवर कशी नेली याच्या सुरस कहाण्या, सर्व निकाल अद्याप जाहीरही झालेले नसतानाही, माध्यमांतून भराभर प्रसृत होऊ लागल्या. किती वर्षे ही व्यक्ती तिथे गेली, जमिनीवर लोकांशी कशी समरस कशी झाली, निरलस कार्य वगैरे गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या.

पण त्यांनी स्वत:च आपल्या मुलाखतीतून सांगितल्यानुसार काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते (कित्येक आमदारच तिकडून इकडे आले), सीपीएमचे कार्यकर्ते, तृणमूलचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आल्याने त्यांना फायदा झाला. भाजपच्या २% मतांच्या शेअरमध्ये बाहेरुन आलेल्यांनी सोबत आणलेल्या अनेक टक्क्यांची जोड मिळून बेचाळीस टक्के झाले, हा साधा सोपा हिशोब माध्यमांतल्या प्रचंड कलकलाटाने झाकून टाकून टाकण्यात आला. आणि सुनील देवधर नावाचा नवा ‘वासिली झाईत्सेव’ जन्माला घालण्यात आला. आता हे मिथक पुढच्या निवडणुकांसाठी आपल्या अंगावरील या झुलीसह सामील होईल. ते जिथे जाईल तिथे मेजर कुऽनिग प्रमाणे त्याच्या आधी त्याची ख्याती पोचवून, प्रतिस्पर्ध्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांना ‘त्राता’ आल्याचे भासवून त्यांना बळ दिले जाईल.

कर्नाटकच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत*. मोदी आणि शहा या बिनीच्या शिलेदारांनी रणशिंग फुंकले आहे. कदाचित या निवडणुकांचे प्रभारी म्हणून वाजत गाजत सुनील देवधर तिथे जातील, तेव्हा त्रिपुराच्या निवडणुकीच्या निमित्ताने तयार केलेले मिथक त्यांच्या सोबत असेल.

मिथके उभी करण्याबरोबरच विरोधकांच्या मिथकांचा ध्वंस करणे हा ही युद्धाचा भाग असतो. त्यातून त्या प्रतीकांच्या तथाकथित ताकदीबाबत त्याच्या अनुयायांमध्ये संभ्रम आणि दहशत निर्माण करता येते, त्यांना खच्ची करत नेता येते. समोरच्याकडे बंदूक असली तरी ती चालवणारे हात जेव्हा संभ्रमाने कंपित होतात तेव्हा आपल्या विजयाची शक्यता वाढत असते. 

 चित्रपटात जरी स्पष्ट म्हटले नसले, तरी मेजर कुऽनिग हे जर्मन सेनेच्या मुखंडांनी निर्माण केलेले मिथकच असण्याची शक्यता अधिक आहे. त्या मेजर कुऽनिगला तोड म्हणून वासिलीला उभे करणे आणि मेजरची जनमानसातील दहशत नाहीशी करणे म्हणजे त्या मिथकाला उध्वस्त करणे आहे. तालिबानी मंडळींनी बमियानमध्ये बुद्धमूर्तीचा विध्वंस करणे म्हणजे ‘हा तुमचा देव/प्रेषित म्हणजे केवळ एक जड असे प्रतीक आहे; आम्ही ते उध्वस्त करतो आहोत, बघू तो आमचे काय वाकडे करतो ते’ असे आव्हान देणे आहे. राजकारणात मोदींनी आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या नेहरुंसारख्या अध्वर्यूंवर सातत्याने खर्‍याखोट्या आरोपांची राळ उडवून देत त्यांचे जनमानसातील स्थान खच्ची करत नेणे, म्हणजे तालिबानने बुद्धमूर्ती उध्वस्त करत बौद्धांना दिले, तसेच आव्हान काँग्रेस कार्यकर्त्यांना देणे असते.

अशा प्रसंगी प्रतिवाद अथवा प्रतिरोध परिणामकारक झाला नाही, तर त्याचा परिणाम म्हणजे त्यांचा आत्मविश्वासाचे खच्चीकरण होत असते. नुकतेच त्रिपुरामधील कम्युनिस्टांची दोन दशकांची सत्ता उलथल्यानंतर उन्मादाने उखडलेला लेनिनचा पुतळा हे ही विरोधकांच्या मिथकाला उध्वस्त करत नेण्याचे आणखी एक उदाहरण आहे.

अनेकांना खरंतर मिथकांची, प्रतीकांची, खोट्या त्रात्यांच्या निर्मितीची गरज नसते. त्यांच्याकडे खरोखरचे हीरो अथवा प्रतीके असतात. पण ’अतिपरिचयात्‌ अवज्ञा’ या न्यायाने त्यांना त्याची किंमत उरलेली नसते, किंवा त्यांचे महत्व न समजण्याइतकी त्यांची बौद्धिक, वैचारिक अधोगती झालेली असते. अशा करंट्यांची कशी वेगाने घसरण होत जाते हे काँग्रेसच्या उदाहरणावरुन सिद्ध होते आहे.

-oOo-

*ताजा कलम: हा लेख लिहून पुरा होईतो, प्रसिद्ध करेतो सुनील देवधर यांना तेलंगणमध्ये प्रभारी म्हणून पाठवले जाण्याशी शक्यता वृत्तपत्रांतून वाचायला मिळते आहे. सत्ताधारी टीआरएस आणि विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस ही दोन काँग्रेसबाळेच तिथे प्रमुख पक्ष असल्याने देवधरांच्या फोडाफोडीच्या कामाला सुपीक जमीन उपलब्ध आहे असा भाजपच्या धुरिणांचा कयास असावा. त्यांच्या गाठीला असलेले त्रिपुराचे तथाकथित श्रेय त्यांच्या शब्दाला अधिक वजन प्राप्त करुन देणार आहे.

---

( हा लेख ’अक्षरनामा’ या पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे. : https://www.aksharnama.com/client/article_detail/1869 )


हे वाचले का?

मंगळवार, ६ मार्च, २०१८

नक्षलवादी उजवे आणि सनातनी डावे

लेनिनच्या रशियाने भारताला केलेली मदत उल्लेखून ’लेनिनचा’ पुतळा पाडला म्हणून निषेध करणारे आणि लेनिनने कित्ती लोक मारले, त्याचा पुतळा फोडला म्हणून काय झालं? हा प्रश्न विचारणारे दोघेही चकले आहेत. कदाचित हेतुत: तसे करत असतील तर संकुचित आहेत, स्वार्थी आहेत असे म्हणावे लागेल.

पुतळा फोडणे ही कृती फोडणार्‍याच्या मनातील हिंसेची अभिव्यक्ती आहे. 'आम्हाला न पटणारे सगळे आम्ही हिंसेने उखडून टाकू, हा आमचा अधिकार आहे', असे ते मानतात, असा याचा अर्थ असतो. इथे नक्षलवाद्यांची आठवण होते. आम्हाला मान्य नसलेली व्यवस्था आम्ही हिंसक मार्गानेही उलथून टाकू, त्यात त्या व्यवस्थेशी निगडित असलेल्या कुणाचीही हत्या करणे समर्थनीय आहे, तो आमच्या दृष्टिने स्वीकारार्ह मार्ग आहे असे ते मानतात. लेनिनचा पुतळा उखडणारे वैचारिकतेच्या दुसर्‍या टोकाला असूनही तोच डीएनए शेअर करतात हे वारंवार सिद्ध झाले आहे.

SaffronIsNewRed

भारताला मदत केलेल्या रशियाचा नेता ’म्हणून’ त्याचा पुतळा फोडणे अनिष्ट नाही हो; कुणाचाही पुतळा फोडणे हे अनिष्टच समजायला हवे. ती हिंसक कृती म्हणजे कायदा हातात घेणे आहे, आपणच निर्माण केलेल्या व्यवस्थेला आव्हान देणे आहे. लेनिनला मानणार्‍यांच्या वैचारिक व्यत्यासाचे प्रतिनिधी असलेल्या गोळवलकरांचा पुतळा असता, आणि तो व्यवस्थेअंतर्गत नियम पाळून बसवलेला असला, तर लेनिन समर्थकांनी तो फोडल्याच्या घटनेचाही निषेध करायला हवा.

तिथे मग ’त्यांनी नाही का लेनिनचा फोडला’ म्हणून समर्थन करणे अयोग्य आहे. हातातील पहारीचा रंग बदलला म्हणून त्या कृत्याची नृशंसता नाहीशी होत नाहीच. 'आमच्या रंगाच्या पहारी तरी कमी आहेत, त्यांच्या बघा किती जास्त आहेत’ हा तर्क हिंसेला विरोध असल्याचा निदर्शक मानतच नाही मी. आपल्या हिंसेचे समर्थन करणाराच असतो तो.

आमचे तत्वज्ञान, आमची व्यवस्था शंभर टक्के बरोबर, आमचे नेते सर्वज्ञ, आमच्या पोथीत सारे ज्ञान आहे असे समजणारे डावे, उजवे सारेच सनातनी असतात. बहुपर्यायी आयुष्याला नाकारुन दुराग्रहाने एकसाचीकरणाचा आग्रह धरतात. आपला सोडून अन्य पर्याय शंभर टक्के चुकीचे आहेत, ते उखडून टाकण्यास सर्व उपलब्ध मार्ग वैध आहेत असे मानणारे अतिरेकीच असतात. भले व्यवस्था त्यांना धार्जिणी असेल, त्यांच्या क्रांतींचा रंग लाल, भगवा, हिरवा, निळा कुठलाही असेल.

निषेध ’कायदा हातात घेण्याबद्दल, व्यवस्थेशी द्रोह करण्याबद्दल’ असायला हवा. पुतळा कुणाचा यावरुन निषेध करायचा की समर्थन करणॆ हे संकुचित दृष्टिकोनाचे मानले पाहिजे.

’आम्हाला सोयीची असेल तेव्हाच व्यवस्था चांगली, गैरसोयीची असेल तेव्हा धाब्यावर बसवली तरी ते न्याय्य’ असे समजणार्‍या डाव्या, उजव्या, मध्यममार्गी, अस्मितावादी, पुरोगामी अशा सर्वांचा ठणठणीत निषेध करायला हवा.

’त्यांनी’, ’तेव्हा’ केले ते कसे चालते असे म्हणत एकमेकांच्या पाठीमागे लपत एकमेकांची सोय पाहणार्‍या, वरकरणी विरोधी मतांच्या मंडळींचा तर डब्बल निषेध करायला हवा.

-oOo-


हे वाचले का?

सोमवार, ५ मार्च, २०१८

शनिवार, ३ मार्च, २०१८

’परवा आमचा पोपट वारला’

’परवा आमचा पोपट वारला’ असा निरोप अतुल पेठेंकडून मिळाला होता. म्हणून रीतीप्रमाणे चार जणांना सोबत घेऊन काल त्यांना भेटायला गेलो. आता चार लोक औपचारिक प्रश्न विचारतात तसे आम्ही विचारु म्हटलं नि थोडावेळ बसून निघू असा प्लान होता.

AamachaaPopat

पण कसलं काय. एक तासाहून अधिक काळ पार धरुन अख्खी ष्टोरीच ऐकवलीन्‌ या माणसानं. नतद्रष्ट तर इतका की तासभर हसवत ठेवलं आणि. बरं दिसतं का सांगा बरं हे? प्रसंग काय नि आपण वागतो काय. पेठेंसारख्या ’सुलझा हुआ’ आदमी असं वागेल अशी अग्गदी कल्पना नव्हती होऽ. पोपट झाला म्हणून काय झालं, शेवटी एक फ्यामिली मेंम्बरच तो, शिवाय नावाने थेट जुन्या राज्यकर्त्यांच्या वंशावळीशी नाते सांगणारा, साधासुधा नव्हे. मऽग?

अगदीच ताळतंत्र सोडलन् हो या माणसानं. शिट्या काय वाजवतो, त्यावर गाणी काय म्हणतो आणि कुठली कुठली पात्र आणून समोर उभी करतो. या एका माणसाच्या अंगी नाना कळा आहेत हे ठाऊक होतेच, पण म्हणून काय सभ्य माणसांची नक्कल करायची, आं? पण त्यांच्या पोपटाच्या अंगीही नाना कळा! कोणत्या ते मी का सांगू, जा आणि विचारा पेठेंनाच. एक तासाभराचा वेळ मात्र काढून जा बरं.

पण हा पोपट गातो बाकी झकास (आता ते गाणे नक्की पोपट म्हणतो की पेठेच म्हणतात हा एक थोडा संभ्रमाचा मुद्दा शिल्लक आहे, पण सध्या तो राहू द्या) आणि गाणी तरी अशी निवडतो की म्हणजे प्रसंगाला एकदम साजेशी. अगदी स्वत:च्या मरणाच्या आधीदेखील भैरवी गाऊनच प्रस्थान ठेवतो लेकाचा, मरताना देखील रागप्रहराचे हिशोब चुकू देत नाही. बरं त्या पोपटाच्या आयुष्यातील सारी पात्रे केवळ आवाजातून उभी करायची म्हणजे पोपटाचा व्हर्सटाईल गळाच हवा. त्यासाठी मेहनतही हवी. (प्रॅक्टिस म्हणून सध्या पेठेंनीही पेरु नि मिरचीचा रतीब लावला आहे का याची हळूच चौकशी करायला हवी.)

पंचाईत अशी झाली की पेठेंनी ही पोपटाची सारी बखर साभिनय सांगून आमची हसून हसून पुरेवाट केली. त्या गडबडीत ते समाचाराचे काम राहूनच गेले. आणखी एक म्हणजे आमच्यातल्या वस्तुनिष्ठ विश्लेषकाला हलकेच गंडवल्यामुळे, त्यातील दोष नोंदवायचे राहून गेले. त्यामुळे आता पुन्हा एकदा जाणं आलं. येताय का पुढच्या वेळी सोबत. बघू तुमच्यासारखी मंडळी सोबत असल्यावर तरी पेठे वात्रटपणा थोडा कमी करतात का ते.

- oOo -

’परिवर्तन’ या जळगावच्या प्रसिद्ध कलासंस्थेच्या कृपेने हा पोपट आता यू-ट्यूबच्या दांडीवर जाऊन बसलाय.



हे वाचले का?

शुक्रवार, २ मार्च, २०१८

खरा इतिहास, खोटा इतिहास

अमका इतिहास हा ’खोटा इतिहास’ आहे नि अमका इतिहास ’खरा इतिहास’ आहे हे अनेक लोक छातीठोकपणे सांगतात तेव्हा मला प्रचंड न्यूनगंड येतो. मुद्रित माध्यमांचा शोध लागून दस्तावेजीकरण चालू झालेल्या काळातील, किंवा एका दिवसांतच एका देशातून दुसर्‍या दूरवरच्या देशात पोचता येईल इतकी अत्याधुनिक विमानसेवा सुरु झालेल्या काळातील; काही घटना, उक्ती/उद्धृते यांच्याबद्दल ठामपणे सांगणे मला अवघड जाते. तिथे प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास यांच्याबाबत ठामपणे खरे-खोटे करणारे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माच्या प्रेषिताहून महान असतात असे माझे नम्र मत आहे.

आता हेच बघाना, एका विज्ञानविषयक वीडिओ बघत असताना एकदम ठेच लागली. त्यात एक खगोलशास्त्रज्ञ असं म्हणाली, "Albert Einstein had said, 'Not only is the universe stranger than we imagine, it is stranger than we can imagine'"

अनेकदा माणसं उद्धृत करण्याच्या ओघात मूळ माणसाची वाक्यरचना - हेतुत: वा अनवधानाने -बदलून टाकतात, त्या भरात त्याचा अर्थही अनेकदा छटा बदलतो. म्हणून नेमके वाक्य काय हे शोधण्यासाठी गुगल केले तर काय काय सापडले पहा.

Haldane

1. The Universe is not only queerer than we suppose, but queerer than we can suppose. - J.B.S. Haldane

2. “My own suspicion is that the universe is not only queerer than we suppose, but queerer than we can suppose.” - J.B.S. Haldane

3. 'Not only is the universe stranger than we imagine, it is stranger than we can imagine' - Arthur Eddington. (In fact Eddington's Wiki page suggests that his statement may have been derived from that of Haldane.)

4. "Not only is the universe stranger than we think, it is stranger than we can think." - Werner Heisenberg (in 'Across the Frontiers').

5. "I have no doubt that in reality the future will be vastly more surprising than anything I can imagine. Now my own suspicion is that the Universe is not only queerer than we suppose, but queerer than we can suppose." - J.B.S. Haldane
(Ref: Possible Worlds and Other Papers (1927), p. 286)

माझ्या मते हाल्डेनला श्रेय देणार्‍या पहिल्या दोन वाक्यातही फरक आहे. पहिले वाक्य ठाम आहे, तर दुसर्‍यामध्ये ’शक्यता’ व्यक्त केली आहे. विज्ञान आणि भाषा या दोन्हींची वा दोन्हींपैकी एकाची बर्‍यापैकी समज असणारे हे दोन्ही एकच आहेत म्हणण्याचे धाडस करणार नाहीत. इतिहासवाले काय म्हणायचे ते म्हणू देत.

तर आता मूळ मुद्द्याकडे येतो हे जे 'खरा इतिहास' नि 'खोटा इतिहास'वाले हुशार लोक आहेत त्यांनी आपली 'इतिहासाच्या अभ्यासाची साधने' वापरुन मूळ विधान कुणाचे आणि वरच्या पाठभेदांपैकी नक्की कुठले याचा निर्णय एकदाचा करुन टाकावा आणि या सदैव संभ्रमग्रस्त जिवाला निदान या एका जाळ्यातून मुक्त करावे.

- oOo -


हे वाचले का?

गुरुवार, १ मार्च, २०१८

ठणाठणा वाजे बीन

'एखाद्या कामाची पद्धतशीरपणे लहान लहान कामांत विभागणी करुन ते पार पाडणे, वा एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करुन त्याचे उत्तर शोधणे हे आपले कौशल्य आहे' हा माज उतरवायचा असेल तर एक करा. घरी एक 'बीनबॅग' आणा!

नाही, माझे डोके पूर्ण ताळ्यावर ठेवूनच मी लिहिले आहे हे.

---

बॅग येते. तुम्ही बीन्स स्वतंत्रपणे मागवता. 'बीन्स भरताना दारे खिडक्या घट्ट लावून घे' अशी अनुभवजन्य ताकीद मित्राने तुम्हाला दिलेली असते. तुम्ही तो सल्ला तंतोतंत पाळता. थोड्या चुकार बीन्स वगळता - त्यांच्यावर बारीक नजर ठेवून तुम्ही लगेचच ताब्यात घेता - अगदी व्यवस्थितपणॆ बॅगमध्ये त्या भरता. खुश होऊन अजिबात गोंधळ न होता काम पार पाडल्याबद्दल स्वत:लाच शाबासकी देता.

काही दिवस जातात...

SpilledTheBeans

सफाईसाठी तुम्ही बॅग उचलता, तर पाठीमागे एक दोन बीन्स इकडे तिकडे पळताना दिसतात. अख्खी बॅग उलथीपालथी करुन एक एक वीण तपासून कुठे फट दिसते का ते पाहता. काही सापडत नाही. असतील भरताना बॅगला बाहेरुन चिकटून राहिलेल्या म्हणून तुम्ही दुर्लक्ष करता.

असे तीनचार दिवस जातात. मग पुन्हा दोन चार बीन्स कुठेतरी दिसतात. मग तुम्ही तर्क करता, कदाचित भरताना निसटून कुठेतरी बेडखाली वा पुस्तकांच्या कपाटाखाली गेल्या असतील, त्या पंख्याच्या वार्‍याने बाहेर आल्या आहेत. तुम्ही भरताना पुरेपूर काळजी घेतलेली असते, त्यावेळी बीन्स निसटू न दिल्याबद्दल स्वत:लाच दिलेली शाबासकी तुम्ही आता काढून घेता आणि बीन्सच्या लपण्याच्या सार्‍या जागा अगदी बारकाईने तपासता. एकही बीन सापडत नाही. आपण आपल्याला दिलेली शाबासकी परत द्यावी का या संभ्रमात तुम्ही पडता.

पुन्हा दोन तीन दिवस जातात नि एक-दोन बीन्स पुन्हा वाकुल्या दाखवत हजर होतात. पुन्हा एकदा कसून तपासणी होते. यावेळी एक एक वीण अक्षरश: भिंग लावून चेक केली जाते. सर्व काही आलबेल दिसते. मग बीन्सची रिकामी पिशवी कपाटावर टाकलेली असते, त्याला चिकटून असलेल्या उडत आल्या असतील असा नवा तर्क डोक्यात येतो नि एक जास्तीची शाबासकी तुम्ही आपल्याला देऊन टाकता. ताबडतोब त्या पिशवीची रवानगी कचरापेटीत होते.

चार पाच दिवस जातात नि पुन्हा तीन-चार बीन्स ’आम्ही आऽलो. पकड... पकड आम्हाला.’ असं म्हणत नुकत्याच चालू लागलेल्या पोरासारख्या इतस्तत: धावू लागतात. कशाबशा पकडून त्यांची रवानगी कचर्‍यात होते...

... एक-दोन, एक-दोन बीन्स सापडत राहतात, कचर्‍यात जात राहतात. तर्क संपल्याने य:कश्चित माकडाकडून पराभूत होऊन गर्वहरण झालेल्या भीमासारखे पराभूत होऊन तुम्ही ’त्या कुठून येतात’ याचा शोध थांबवलेला असतो.

- oOo -

#बीनबजा
#बीनबुलाएमेहमान


हे वाचले का?