शनिवार, ३ मार्च, २०१८

’परवा आमचा पोपट वारला’

’परवा आमचा पोपट वारला’ असा निरोप अतुल पेठेंकडून मिळाला होता. म्हणून रीतीप्रमाणे चार जणांना सोबत घेऊन काल त्यांना भेटायला गेलो. आता चार लोक औपचारिक प्रश्न विचारतात तसे आम्ही विचारु म्हटलं नि थोडावेळ बसून निघू असा प्लान होता.

AamachaaPopat

पण कसलं काय. एक तासाहून अधिक काळ पार धरुन अख्खी ष्टोरीच ऐकवलीन्‌ या माणसानं. नतद्रष्ट तर इतका की तासभर हसवत ठेवलं आणि. बरं दिसतं का सांगा बरं हे? प्रसंग काय नि आपण वागतो काय. पेठेंसारख्या ’सुलझा हुआ’ आदमी असं वागेल अशी अग्गदी कल्पना नव्हती होऽ. पोपट झाला म्हणून काय झालं, शेवटी एक फ्यामिली मेंम्बरच तो, शिवाय नावाने थेट जुन्या राज्यकर्त्यांच्या वंशावळीशी नाते सांगणारा, साधासुधा नव्हे. मऽग?

अगदीच ताळतंत्र सोडलन् हो या माणसानं. शिट्या काय वाजवतो, त्यावर गाणी काय म्हणतो आणि कुठली कुठली पात्र आणून समोर उभी करतो. या एका माणसाच्या अंगी नाना कळा आहेत हे ठाऊक होतेच, पण म्हणून काय सभ्य माणसांची नक्कल करायची, आं? पण त्यांच्या पोपटाच्या अंगीही नाना कळा! कोणत्या ते मी का सांगू, जा आणि विचारा पेठेंनाच. एक तासाभराचा वेळ मात्र काढून जा बरं.

पण हा पोपट गातो बाकी झकास (आता ते गाणे नक्की पोपट म्हणतो की पेठेच म्हणतात हा एक थोडा संभ्रमाचा मुद्दा शिल्लक आहे, पण सध्या तो राहू द्या) आणि गाणी तरी अशी निवडतो की म्हणजे प्रसंगाला एकदम साजेशी. अगदी स्वत:च्या मरणाच्या आधीदेखील भैरवी गाऊनच प्रस्थान ठेवतो लेकाचा, मरताना देखील रागप्रहराचे हिशोब चुकू देत नाही. बरं त्या पोपटाच्या आयुष्यातील सारी पात्रे केवळ आवाजातून उभी करायची म्हणजे पोपटाचा व्हर्सटाईल गळाच हवा. त्यासाठी मेहनतही हवी. (प्रॅक्टिस म्हणून सध्या पेठेंनीही पेरु नि मिरचीचा रतीब लावला आहे का याची हळूच चौकशी करायला हवी.)

पंचाईत अशी झाली की पेठेंनी ही पोपटाची सारी बखर साभिनय सांगून आमची हसून हसून पुरेवाट केली. त्या गडबडीत ते समाचाराचे काम राहूनच गेले. आणखी एक म्हणजे आमच्यातल्या वस्तुनिष्ठ विश्लेषकाला हलकेच गंडवल्यामुळे, त्यातील दोष नोंदवायचे राहून गेले. त्यामुळे आता पुन्हा एकदा जाणं आलं. येताय का पुढच्या वेळी सोबत. बघू तुमच्यासारखी मंडळी सोबत असल्यावर तरी पेठे वात्रटपणा थोडा कमी करतात का ते.

- oOo -

’परिवर्तन’ या जळगावच्या प्रसिद्ध कलासंस्थेच्या कृपेने हा पोपट आता यू-ट्यूबच्या दांडीवर जाऊन बसलाय.



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा