सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

कन्हैया कुमार, कम्युनिस्ट आणि मी

मी कम्युनिस्ट विचारसरणीचा सहानुभूतीदार नक्की आहे. त्यांच्यातील - सर्वच इझम आणि राजकीय पक्षांत असतात त्यानुसारच असलेल्या - त्रुटींसह मी त्यांना सत्ताधारी म्हणून स्वीकारायला तयार आहे; नव्हे तसं घडावं अशी माझी इच्छा आहे. कारणांबद्दल आता विस्ताराने बोलत नाही. पण हे घडण्याची शक्यता निदान माझा आयुष्यात धूसरच दिसते. याचे मुख्य कारण तत्त्वज्ञानावरची अतिरेकी निष्ठाच त्यांना सत्तेपासून दूर ठेवते आहे.

सत्ताकारणातला व्यवहारवाद नाकारल्याने त्यांना सत्ता मिळणे दुरापास्त झाले आहे. ज्योतिबाबूंना मिळू शकणारे पंतप्रधानपद नाकारून त्यांनी घोडचूक केली असे माझे प्रामाणिक मत आहे. एकदा सत्ता हाती आली की सर्वत्र 'आपले' लोक रुजवून यंत्रणा/व्यवस्था कब्जात घेता येते हे ते विसरले आहेत.

लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या रशियन आणि चीनी बांधवांनी त्या सामान्यांतील अनेकांचा बळी घेणारी रक्तरंजित क्रांती घडवून आणली, सत्ता हाती घेण्यासाठी विसंगतीचे ते तात्कालिक पाप शिरी घेतले. पण इथले आमचे बांधव ती लवचिकता संसदीय राजकारणातही स्वीकारायला तयार नाहीत. 'आम्ही किती छान विश्लेषण करू शकतो, बुद्धिमान आहोत आम्ही. बाकीचे सग्गळे कसे शेवटी संघवाल्यांनाच मदत करतात.' यावर यांचे विचारवंत लेखामागून लेख लिहीत आहेत. संघ-भाजप विरोधाचा एकाधिकार, ते सोवळे फक्त आमच्याच कनवटीला आहे हा अहंकार त्यांना पुरेसा आहे. मग त्यासाठी अनेक वर्षे हाच भाजप-संघाचा भस्मासुर सत्तेत राहिला तरी त्यांना चालेल.

किंबहुना मीच-खरा-विरोधक या त्यांच्या भूमिकेला जिवंत ठेवण्यास ते पूरकच ठरेल. या अहंगंडात केरळ या एकमेव राज्याची सत्ता कशीबशी राखून आहेत. चोवीस वर्षे सत्ता राबवलेल्या बंगाल मध्ये ते पुढच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकले जातील अशी चिन्हे आहेत.

KanhaiyaKumar

हे बदलण्यासाठी, मुख्य म्हणजे संघटन-विस्तार करण्यासाठी ठोस काही करताहेत असे दिसत नाही. अजूनही मोर्चे आणि व्याख्याने ही अनुक्रमे केवळ श्रमजीवी आणि पांढरपेशा वर्गाला अपील होणारी जुनाट हत्यारे कवटाळून बसण्यापालीकडे नव्याने ते काहीच करत नाहीत.

'विचार बदला, देश बदलेल' हा विचार केव्हाच कालबाह्य झाला. इथे लोकांना विचार करायलाच वेळ नाही, तिथे जुना की बदललेला हा मुद्दाच उरलेला नाही. थेट कृती काय करणार असा प्रश्न आता नवी पिढी विचारते. त्यांना हे काय ऑफर करू शकतात हा प्रश्न आहे. नव्या प्रगतीशील (affluent) समाजाच्या आकांक्षांची पूर्ती कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे आधारे कशी करणार याची मांडणी करायला हवी. ती अद्याप होताना दिसत नाही. भाजप जसा साडेचार वर्षांच्या सत्तेनंतरही अजून विरोधकांच्या मानसिकतेतून बाहेर आलेला दिसत नाही, तसेच कम्युनिस्ट अद्याप कार्यकर्त्यांच्या, अभ्यासकाच्या भूमिकेतून बाहेर यायला तयार नाहीत.

सत्तेसाठी नेते लागतात, ते घडवावे लागतात, त्यांची नाळ सामान्यांशी जुळावी लागते, केवळ वरुन खाली नव्हे तर खालून-वर अशीही फीडबॅक सिस्टम असावी लागते. वरच्या तत्त्वाशी विसंगत पण सामान्यांच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान असणार्‍या अनेक गोष्टींना, तत्त्वाला मुरड घालून, अंगीकृत करावे लागते. तरच सत्ता मिळू शकते.

सतत शहाणपणाचे डोस देणारा अगदी आपण मठ्ठ आहोत हे मान्य असलेल्यालाही नकोसा होतो. कधीतरी आपल्याकडूनही त्याने काही घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. संघाची मंडळी त्यांच्या सत्तेला बाधा येणार नाही इतपत गोष्टी लोकमानसातून स्वीकारतात, त्यांच्या राजकारणाचा धार्मिक आधार त्याला सहाय्यभूत होतो.

सत्ताकारणात - भाजप/संघाइतके गटे'च्या फाउस्ट प्रमाणे आत्मा विकून नाही नाही तरी - तत्त्वे पातळ होण्याचा धोका पत्करून हे स्वीकारावे लागते. काँग्रेस, समाजवादी, आप, ममता... अल्फा बीटा गामा सारे पक्ष संघ-धार्जिणे आहेत हे घोकत राहिल्याने आपणच सर्वांत अप्रिय होत असतो, आपले सारे मित्र दूर जात असतात आणि घसरत्या सत्ताबळाच्या, पडत्या काळात तर हे नक्कीच परवडणारे नसते हे समजून घ्यायला हवे.

या आणि अशा कारणांनी कम्युनिस्ट या देशात कधीच सत्ताधारी होऊ शकणार नाहीत. नव्हे संघाला समाजकारण, राजकारण आणि सत्ताकारणात कधीच पर्यायही होऊ शकणार नाहीत, हे कटू वास्तव माझ्यापुरते मी स्वीकारले आहे. तेव्हा निदान या तीन पैकी दोन क्षेत्रात संघ-मोदी यांच्या जाळ्याला हद्दपार करायचे असेल तर प्रथम त्यांचे सत्तेतील स्थान हिरावून घ्यावे लागेल. आणि ते करण्याची कम्युनिस्टांची कुवत आज नाही, कदाचित आणखी पन्नास वर्षे नसेल. त्यामुळे मी त्यांना मतदान करण्याचा प्रश्न आजतरी उद्भवत नाही.

निवडून येण्याची नगण्य शक्यता असल्याने, कम्युनिस्ट उमेदवाराला मतदान करणे हे देशातील बहुसंख्य मतदारसंघात एक पुरोगामी, भाजप-संघ विरोध मत वाया घालवणे आणि पर्यायाने पुन्हा संघ भाजपला बळकट करणारेच ठरणार आहे हे मला पटले आहे. हे जमिनीवरचे वास्तव 'आम्हीच तेवढे संघ-विरोधक'ची स्मरणी घेऊन बसलेल्या त्यांच्या वैचारिक नेत्यांनी समजून घ्यायची गरज आहे.

तेव्हा त्या विचारांबद्दल सहानुभूती असून, त्यांनी सत्तेवर यावे अशी इच्छा असून मी त्यांना मतदान करणार नाही, कारण निवडून येण्याची पुरेशी क्षमता विकसित व्हावी असे संघटन, अशी दृष्टी आज त्यांच्याकडे नाही.

हे झाले कम्युनिस्टांबद्दल. कन्हैयाबाबत माझे मत याहून फारसे आशावादी नाहीच. आजही फार बदलले आहे असे म्हणणार नाही. त्याची भाषणे ऐकून हा लोकांचे लक्ष वेधून घेणारा चांगला वक्ता आहे, पण पाणी फार खोल नाही असे माझे प्रामाणिक मत होते. 'एका बोलबच्चनला पर्याय म्हणून दुसर्‍या बाजूने तसाच उभा केलाय का?' असा प्रश्न मला पडला होता.

जनसंवाद म्हणजे समोरच्याला प्रभावित करणे किंवा घोषणाबाजीतून वैचारिक बधीरता निर्माण करणे या त्याच्या अडीच वर्षांतील मानसिकतेतून कालच्या मुलाखतीमध्ये मात्र तो बाहेर आलेला दिसला. एका परिपक्व आणि विचारी नेत्याची लक्षणे त्याच्यात दिसून आली.

असे नव्या दमाचे तरुण जर कम्युनिस्ट पक्षांची धुरा खांद्यावर घेतील, तर त्यांना नक्की उर्जितावस्था येईल. माझे पन्नास वर्षांचे भाकीत यांनी खोटे ठरवले तर आनंदच होईल. पण तरीही... दिल्ली बहोत दूर है. कारण एकटा कन्हैया पुरेसा नसतो, त्याच्या सोबत भक्कम संघटनही हवे. त्याबाबत काय करणार हे कन्हैया सांगेल तेव्हाच पुढची दिशा अधिक स्पष्ट होईल. कन्हैया आणि त्याच्या सहकारी कॉम्रेडस् ना हार्दिक शुभेच्छा.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा