गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

भस्मासुराच्या भस्मासुरांचा उदय

मी मूळचा शक्यताविज्ञानाचा (Statistics) विद्यार्थी. त्यामुळे आमच्या मते निष्कर्षाआधी त्याला आवश्यक डेटा महत्वाचा. आणि त्याहून महत्वाचा असतो त्याचा प्रदूषणविरहित स्रोत नि त्याचा अभ्यासविषयाशी असलेला संबंध.

’भारतात आधी पूल बनवावेत की पुतळा?’ याची कल-चाचणी अमेरिकेत घेऊन उपयोग नाही (तिथले मूठभर भारतीय उत्साहाने पुतळ्याच्या बाजूने मतदान करतील म्हणा.) तो भारतात करायला हवा. तसेच भारताने आणखी मिराज विकत घ्यावीत की F-16 याची कल-चाचणी केवळ संरक्षण तज्ज्ञांमध्येच व्हायला हवी, लॉलिपॉप अथवा आईसफ्रूट चोखत बसलेला खंडूही मतदान करु शकतो अशा एखाद्या इन्टरनेट पोर्टलवर करुन उपयोगाची नाही. (करोडो प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगांचीही आपल्याला बरोब्बर माहिती आहे असा माज भारतीय माध्यमांना असतो म्हणा. पण ते सोडा.)

त्यामुळे भारताने बालाकोट मध्ये केलेल्या हल्ल्याच्या प्रत्यक्ष नुकसान आणि त्या नंतर राजकीय वा डावपेचात्मक परिणामांची माहिती १. त्या निर्णयाशी संबंधित व्यक्तींकडून आलेली २. भारत-पाक या दोन देशांशिवाय अन्य ठिकाणी असलेल्या त्रयस्थ माध्यमांतून- आणि ती ही एकाहून अधिक ठिकाणी - स्वतंत्र स्रोतामार्फत - प्रसिद्ध झालेली असावी असे किमान दोन निकष होते. आज दोन दिवसांनंतरचे चित्र कसे दिसते. (नवी माहिती येईल तसे हे बदलूनही घ्यायला हवे हे ही नोंदवून ठेवतो.)

BalakotOnRepublic

भारतीय राजकीय नेतृत्व आणि संरक्षण क्षेत्रांकडून जी अधिकृत माहिती दिली गेली त्यात ’जैश-ए-महंमद’चे तळ उध्वस्त केले आणि त्यांची भरपूर हानी झाली’ एवढीच माहिती आहे. बळींच्या संख्येचा त्यात कुठेही उल्लेख नाही वा नुकसानीचा कोणताही तपशील नाही. त्रयस्थ आंतरराष्ट्रीय माध्यमांतूनही कुठे याबाबत माहिती नाही. ३०० बळी वगैरे शोध हा फक्त भारतीय माध्यमांचा आहे.

आता ते म्हणू शकतील, की ही माहिती या हल्ल्याशी संबंधितांनीच आम्हाला ’ऑफ द रेकॉर्ड’ दिली आहे. पण मग डेविल्स अड्वोकेट बनून उलट दिशेने ’मी या बावळट माध्यमांना तोंडघशी पाडण्यासाठी मुद्दाम खोटी माहिती पुरवली’ असे मलाही एखाद्या संबंधित अधिकार्‍याच्या कारकुनाने सांगितले आहे', असा दावा एखादा करु शकतो. Your word against mine! काहीच सिद्ध होत नाही. तेव्हा केवळ अधिकृत पातळीवरील माहिती गृहित धरता येते आणि त्यात नुकसानीच कोणताही नेमका तपशील नाही!

कालपासून ’इम्रान यांनी याचना केली’, ’इम्रान/पाक यांचे लोटांगण’ अशा सनसनाटी पण स्वत:चा मूर्खपणाच जाहीर करणार्‍या बातम्या अनेक मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून दिसू लागल्या होत्या. यांना माध्यमांत कुणी बसवले असा प्रश्न पडलेला आहे मला.

एकतर वर्षानुवर्षे भारत आपण आक्रमक नव्हे, केवळ आपले संरक्षण करत आहोत असा दावा करत आलेला आहे. त्याचा फायदा म्हणून आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूने - कदाचित नाईलाजाने - राहते. अगदी परवाच्या हल्ल्यातही भारताने ’हा गैर-लष्करी हल्ला होता नि केवळ 'जैश-ए-महंमद'ची ठाणी उध्वस्त करण्यापुरता होता (थोडक्यात पाकिस्तान विरोधात नव्हता)’ अशी भूमिका घेतली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी ’यात विशेष काही नाही’ असे भासवत हा काही दोन देशांमधल्या युद्धाचा मुद्दा नाही असेच संकेत दिले होते. त्यामुळेच कदाचित, त्यांनी आपले अन्य कार्यक्रम रद्द न करता पार पाडले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदनच करायला हवे.

या उलट आपला मूर्ख मोदी-लाचार मीडीया मात्र ’मोदी कसे रात्रभर जागले’, ’त्यांनी स्वत: ऑर्डर दिली’ वगैरे हेडलाईन्स देत त्यांना पुन्हा पुन्हा ओढून आणत होते. त्यात आपल्या धन्याने दिलेले संकेत ध्यानात न घेता नेमके उलट करतो आहोत याचे भान त्यांना नव्हते. (येडियुरप्पासारखा सत्तालोलुप तर त्याहीपुढे गेला.)

नेमका याच गोष्टीचा फायदा इम्रान यांनी उचलला आहे असे दिसते आहे. त्यांनी अशाही परिस्थितीत चर्चेचे केलेले आवाहन, अभिनंदन यांचा आपल्याला चांगली वर्तणूक मिळते आहे याचा जाहीर केलेला वीडिओ यातून आता ’आपण शांततेचे प्रयत्न करत आहोत नि भारतीय आक्रमक आहेत’ असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. थोडक्यात वर्षानुवर्षे ज्या भूमिका दोन देशांनी घेतल्या होत्या, त्याच्या नेमके उलट चित्र रंगवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला आपली माध्यमे आपल्या युद्धखोर रिपोर्टिंगने आणि ’इम्रान लाचार झाले’ वगैरे अडाणी मूल्यमापनाने मदतच करत आहेत.

एकुणात हा स्ट्राईक भरपूर नुकसान करुन युद्धाला आमंत्रण देण्यापेक्षा, आपली कारवाई पाकिस्तान विरोधात नव्हे तर केवळ त्यांच्या हद्दीतील दहशतवादी संघटनांना धाक बसवण्यासाठी आहे हे दर्शवण्यासाठी होता. आम्ही मनात आणू तर तुम्हाला इथे बसून नष्ट करु शकतो हा त्यांना इशारा देतानाच, पाकिस्तानने त्यांना आवर घालावा, अन्यथा आमच्यात इतकी क्षमता आहे की तुमच्या एफ-१६ना न जुमानता तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही हवे ते करु शकतो इतका सज्जड इशारा देण्यासाठी होता. त्याची तीव्रता केवळ इशारा देण्याइतकीच ठेवली होती. यातून हा पाकिस्तान-विरोधात नाही हे ही ठसवले होते, इतकी काटेकोर भूमिका तयार करताना भाजप/संघ मंडळींची नेहमीची युद्धखोरी आड येऊ दिली नाही, यासाठी मोदींचे आभारच मानले पाहिजेत. (त्याउलट ते निवडणुकीतील यशासाठी युद्ध करतील असा आचरट तर्क देणारेही दिसले. ही वैचारिक दिवाळखोरी काही केवळ भक्तांची मक्तेदारी नाही हे दिसले.)

पण या सार्‍यावर दोन निवस नंगा नाच करत भारतीय माध्यमांनी भारताची युद्धखोर, युद्धास सज्ज अशी भूमिका निर्माण करुण पूर्ण पाणी फिरवले. असल्या बेजबाबदार माध्यमांच्या नि ’घरबसल्या युध्दखोर’ भक्तांच्या आततायीपणामुळे स्ट्राईक्सच्या निर्णय आणि अंमलबजावणीशी संबंधित असलेल्यांच्या सारा शहाणपणा मातीत गेला आहे. नेता देश घडवत नसतो, सामान्य माणसे घडवत असतात. आणि सामान्य माणसे जोवर खुजी आहेत, संकुचित मानसिकतेची आहेत तोवर नेता काही साध्य करु शकत नसतो.

परकीय माध्यमांनी हल्ल्याच्या ठिकाणी इतकी हानी झाली असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. ते खोटारडे आहेत नि भारतावर ’जळतात’ वगैरे शाळकरी समज आपण करुन घेऊ या. पण ज्या नव्या सरकारच्या मुत्सद्देगिरीने थेट अमेरिकेचे सरकार नमते, इम्रान लाचार वगैरे होतो त्या ’पावरबाज’ नेत्याने आंतरराष्ट्रीय माध्यमे अशी प्रेषित-द्रोही कशी काय राहू दिली बुवा?

समजा आपली माध्यमे म्हणतात तशी ३५० माणसे मारली. परदेशी सोडाच, आपल्याही माध्यमांनी सॅटेलाईट इमेजेस, फोटो वा अन्य मार्गाने त्याची कोणतीही सिद्धता दिलेली नाही. तसे का करत नाहीत ही मंडळी? एकाच वेळी सार्‍यांची तोंडे बंद होतील. भारताचे आयआरएस उपग्रह ५ बाय ५ मीटरपर्यंत अचूक इमेज घेऊ शकतात. अमेरिकेसह अनेक देश आपल्या उपग्रहांच्या इमेजेस वापरतो (माझी माहिती किमान दहा वर्षे जुनी आहे. आता अ‍ॅक्युरसी अधिक वाढली असेल.) आणि त्यांना दिवस आहे की रात्र याने फरक पडत नसतो. असे असताना ३५० माणसे मारल्याच्या सोडा हल्ल्याचे नुकसान दाखवणार्‍या कोणत्याही इमेजेस - आपल्या देशाने वा अन्य देशाने - प्रसृत केलेल्या नाहीत.

सरकार-पक्षाच्या ’आयटी सेल’ला न झालेल्या विकासाच्याही इमेजेस बनवता येतात, सिंगापूरच्या प्रगतीला गुजरातची म्हणून खपवण्याची आयडिया लढवता येते. आपल्या माध्यमांनी त्यांनाच याचा ठेका द्यायचा ना. ज्या अर्थी त्यांनी असे काहीही केलेले नाही, त्याअर्थी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने तसे न करण्याच्या सूचना त्यांना दिल्या असणार. यातून खुद्द सरकारला या हल्ल्याची व्याप्ती फुगवून सांगण्यात रस नाही हे सिद्धच होते. आणि माध्यमांनी ग्राफिक्सचा वापर करुन अशा इमेजेस बनवल्याच, तर या दिशाभूल करणार्‍या माहितीमध्ये नकळत लष्करालाही अडचणीत आणणार आहेत हे विसरता कामा नये.

शिवाय या दाव्याला पाकिस्तानी लष्कराने साफ खोडून काढलेले दिसते. त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना घटनास्थळाची सफर करुन आणली. तिथे या मृत्युतांडवाचा मागमूस दिसत नाही. म्हणजे हल्ला झाल्यापासून दिवस उजाडेतो (वाटते उजाडल्यावरच फोटो काढता येतात असे बालकांनाच वाटू शकते.) पाकिस्तानने तो सारा परिसर एकही मृतदेह सापडू नये इतका साफ केला? पाकिस्तानचे लष्करी सहाय्यक दल भलतेच कार्यक्षम दिसते! आणि इतकी माणसे मेली, तर त्यांच्या कुटुंबियांचे काय झाले असेल? आंतरराष्ट्रीय माध्यमांना त्यांच्यापैकी एकही सापडू नये. बरे ते सगळे अकार्यक्षम आहेत, निदान आपल्या रिपब्लिक टीवी, झी टीवीने तरी त्यांच्या शोध घेऊन कोण कुठे ते आम्हाला सांगू नये?

पुन्हा मूळ मुद्दा अधोरेखित करतो. या स्ट्राईकचा उद्देश नि व्याप्ती ही आपली मारक-क्षमता सिद्ध करणे एवढीच होती. तो डावपेचांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक भाग होता. लष्कराच्या प्रतिनिधीनेही ’उद्दिष्ट सफल झाले; इतकी मोघम प्रतिक्रिया दिली होती. सुषमा स्वराज, एस. एस. अहलुवालिया या मंत्र्यांच्या प्रतिक्रियाही त्याला पूरकच होत्या.

अशा वेळी या हल्ल्याचे यशापयश किती माणसे मारली यावरुन मोजणारे बिनडोक आहेत इतकेच. आपण आधी बेताल दावे करायचे आणि लष्करी नि मुलकी अधिकार्‍यांना पुरावे देण्याच्या मागणीला सामोरे जाण्याच्या खिंडीत अडकवायचे हे स्वत:ला देशभक्त समजणार्‍या देशद्रोह्यांचेच पाप आहे.

त्यातही माध्यमे हातात असलेल्या मद्यधुंद मर्कटांच्या लीला तर अगाधच होत्या. भस्मासुर जसा आपल्या निर्मात्याच्याच डोक्यावर हात ठेवू बघू लागला तसे आता मोदीप्रेमी माध्यमांचे झाले आहे. मोदींना काय म्हणायचे आहे हे तेच ठरवू लागले आहेत. उलट मोदींना त्याच्या सुसंगत भूमिका घ्यावी लागते की काय, असे मला वाटू लागले आहे. थोडक्यात ज्या टोळक्याच्या जिवावर मोदी सत्ता-स्वार झाले ते टोळकेच आता खोगीर टाकून मोदी-स्वारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भस्मासुराच्याही डोक्यावर हात ठेवू पाहणारा भस्मासुर त्याने स्वत:च जन्माला घातला आहे.

- oOo -

संबंधित लेखन: बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली


हे वाचले का?

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

भ्रमनिरास आणि अहंकाराची निरगाठ

माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर एखाद्या संकल्पनेने, एखाद्या विचारव्यूहाने, एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे इतका झपाटून जातो की’ ’बस्स, हेच काय ते एक सत्य’, ’हाच काय तो अंतिम सत्याचा/विकासाचा मार्ग’, ’हाच काय तो देवबाप्पाने आमच्या उत्थानार्थ पाठवलेला प्रेषित’ म्हणून भारावलेपणे तो त्याची पाठराखण करत राहतो.

GA_Antim

पण - माझ्या मते- जगातील कोणतीही विचाराची चौकट, व्यवस्था, व्यक्ती ही सर्वस्वी निर्दोष असू शकत नाही, ती कायमच यशस्वी होईल अशी खात्री देता येत नाही. माणूस भानावर असेल, डोळस असेल, तर हे सहज दिसूनही येते. देव-असुर, बरोबर-चूक, पवित्र-अपवित्र, तारक-मारक अशा द्विभाजित जगात राहणार्‍यांना हे बहुधा ध्यानात येत नाही. त्याला अर्थातच एका कळपात राहण्याची, एकट्याने उभे राहण्याच्या भीतीची जोडही असतेच.

पण डोळसांचा अनेकदा भ्रमनिरास होतो. सारे आयुष्य ज्याच्यामागे गेले, त्यातील न्यूने अनेकदा खूप खोलात शिरल्यावर दिसू लागतात. म्हणूनच बहुधा वेद, कुराण, बायबल, मॅनिफेस्टो न वाचलेलेच त्यात सर्व ज्ञान आहे, किंवा जगण्याची निर्दोष अशी चौकट ती एकच आहे असे अज्ञानमूलक दावे करतात. पण त्यांचे असो.

ज्यांचा भ्रमनिरास होतो, अशी मंडळी अनेकदा इतरांकडे तर सोडाच, पण स्वत:शीही त्याची कबुली देत नाहीत. पण त्यांच्या वर्तणुकीतून ते सहज दिसू लागते. कधी नव्हे इतके आक्रमक होऊन ते त्यांच्या श्रद्धास्थानांवरचे आक्षेप धुडकावून लावू लागतात. (खोडून काढतात असे मी म्हटलेले नाही!) चर्चेपेक्षा आक्षेपांची मुस्कटदाबी करणे ते अधिक हिरिरीने करतात. कारण साधक-बाधक चर्चेत त्यातील काही आक्षेप - खरे आहेत हे त्यांनाही ठाऊक असल्याने - ठळक होतील, अशी त्यांना भीती असते.

दुसरे असे की इतका काळ ज्याचा हिरिरीने पुरस्कार केला त्यातील न्यूने मान्य केल्याने त्यांच्या स्वत:च्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील अशीही त्यांना भीती असते. चारचौघात त्यांचे हसे होईल, ही आणखी एक भीती त्यांना वेढून राहते. शिवाय कायम गटांच्या स्वरुपातच विचार करु शकणार्‍या समाजात सद्य गटातून हाकलले जाण्याची आणि अन्य गटांनी जवळ न करण्याची एक भीती असतेच.

मुद्दा या भीतींपासून दूर होण्याचा असतो. स्वच्छ नजरेने पाहिले, तर आपल्या संकल्पनेतील, विचारव्यूहातील, श्रद्धास्थानातील न्यूने सहज दिसतात. मोकळ्या मनाने ती मान्य केली, की माणूस त्यांची चिकित्सा करु शकतो, त्यांत सुधारणा करु शकतो. पण ’आम्ही काय बुवा, सामान्य माणसं. आम्हाला कसं जमणार.’ या सर्वस्वी आळशी, स्वार्थलोलुप तर्काच्या खाली ही शक्यता बहुतेक मंडळी दडपून टाकतात.

रुढार्थाने डावे म्हटले जातात अशा मंडळींनी असे सिंहावलोकन केल्याची, आपल्या मार्गावरील न्यूने, दोष यांचे मूल्यमापन केल्याची, क्वचित त्यांचा त्याग केल्याचीही उदाहरणे आहे्त. प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी ’एका माजी कम्युनिस्टाचे मनोगत’ लिहिले. पु.य. देशपांडे यांच्यासारखी व्यक्ती (विष्णूपंत चितळे आणखी एक नाव) तर थेट अध्यात्माचा मार्ग स्वीकारती झाली.

उजव्या मंडळींत हे प्रमाण एकुणच नगण्य असावे. माझ्या पाहण्यात तरी असे कुणी नाही. फारतर विशिष्ट संघटनेपासून दूर होतील, पण विचारांतच न्यून आहे हे मान्य केलेले जवळजवळ नाहीतच. उजवी मंडळी लगेच खूष होऊन म्हणतील ’आमच्या विचारांत न्यून नाहीच मुळी. म्हणून कुणाला सापडत नाही.’ नेमके हेच विधान आत्मसंतुष्टतेचा पहिला दोष घेऊन उभे आहे. स्व-विचाराची परखड चिकित्सा हा गुण उजव्यांमध्ये दुर्मिळच आहे. 'माझा विचार मी त्यातील दोषांसकट स्वीकारला आहे’ अशी नितळ दृष्टी तिथे नसतेच. दोषच नाहीत असा दुराग्रह सतत दिसतो.

पुय आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्ममार्गी झाले, त्याच्या उलट मीनाताईंच्या निधनानंतर उद्वेगाने बाळासाहेब ठाकरेंनी सार्‍या रुद्राक्षमाळा काढून ठेवल्या होत्या (ही दोन उदाहरणे दिल्यावर आमच्या एका अति-उजव्या तरुण मित्राने फक्त पुयंबद्दल कुतूहलाने चौकशी केली होती. ) अर्थात ते राजकारणाशी संबंधित असल्याने त्यांना अन्य कारणाने त्या पुन्हा चढवाव्या लागल्या होत्या. परंतु हे विचारांमुळे नव्हे तर उद्वेगाने, वैयक्तिक दु:खाची प्रतिक्रिया म्हणून घडले होते हे लक्षात ठेवायला हवे.

मला स्वत:ला धर्माधिष्ठित विचार असो, समाजवादी विचार असो, त्याही पुढे जाणारा कम्युनिस्ट विचार असो की सामाजिक विचार सरळ फाट्यावर मारुन आर्थिक व्यूह मांडणारी भांडवलशाही असो; या सार्‍यांच्या मुळाशी स्वप्नाळू (utopian) अशी गृहितके दिसतात. व्यावहारिक, भौगोलिक, सामाजिक, पर्यावरणीय, आर्थिक, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अन्य विचार/व्यवस्थेचे सह-अस्तित्व यामुळे या गृहितकांच्या आधारे त्यांनी मांडलेला कार्यकारणभाव कसा निसटतो याचे विवेचन अभ्यासकांनीही फारसे केलेले दिसत नाही... अपवाद मार्क्सबाबाचा. (पण त्याबद्दल लवकरच 'अन्यमुखे बोलवीन'.)

अशा वेळी ’वेदांत सगळे ज्ञान आहे’ असे विधान करणारा, एका प्रश्नातच त्या दाव्याची वासलात लागते हे ही मान्य नसलेला, काही साधक-बाधक विचार करील नि आपल्या विचारांतील कच्चे दुवे शोधून काढील हे अशक्यच आहे.

विचारांचे सोडून देऊ. निदान व्यावहारिक आयुष्यात तरी आपण आपली चूक मान्य करुन पुढे जाऊ शकतो का हा माझ्यापुढचा प्रश्न आहे. एका संस्थळावर मी ’असा मी, तसा मी... आता मी’ या शीर्षकाखाली एक लेखमाला लिहावी म्हणून लेख टाकला होता. हेतू हा की आपल्या जुन्या धारणा, आपली निवड, आपले विचार नक्की केव्हा नि कोणत्या आधाराने बदलले याचा धांडोळा घेता यावा. इतरांच्या अनुभवाशी तो ताडून पाहता यावा.

पण बुद्धिजीवी म्हणवणार्‍या, नॅनो-टेक्नॉलजी पासून सायक्लोट्रॉनच्या निर्मितीमधील आव्हाने अशा असंख्य विषयांवर तोंड वाजवणार्‍यांपैकी एकाही महाभागाने आपले अनुभव लिहिले नाहीत... यात कदाचित त्यांना ते बदलांचे आयाम शोधता आले नसावेत किंवा आपण बदललो हे सांगण्याची लाज वाटली असावी. उलट मला ’और आन्दो.’ असे प्रतिसाद मिळाले. मग मी आत्मचरित्र लिहितो आहे की काय अशी शंका मलाच यायला लागली नि तो प्रयोग बंद केला.

त्यामुळे गेल्या काही वर्षांत एक एक बाजू पकडून घनघोर लढाया करणार्‍यांनी आपल्या विरोधाची आक्रमकता वाढली आहे का, आपण उत्तर देण्यापेक्षा आक्षेपाची मुस्कटदाबी करत आहोत का याकडे बारकाईने पाहिले तर कदाचित त्यातील काहींना वास्तविक आपला भ्रमनिरास झाला आहे पण तो मान्य करण्याची आपली तयारी नाही हे ध्यानात येईल. ग्रेसच्या भाषेत सांगायचे तर ’आपल्या अहंकाराची वीण उसवून जऽरा सैल केली’ तर सतत त्रासदायक ठरणारे हे जोखड उतरवून ठेवल्यावर हलके वाटते याचा अनुभव घेता येईल.

अशांसाठी हा एक उतारा...

---

श्याम: असं कसं शक्य आहे काकाजी? आता लोक काय म्हणतील? परवा मी कॉलेजमधल्या मित्रांना भेटून त्यांचा निरोप देखील घेऊन आलो.

काकाजी: कशाबद्दल?

श्याम: मी त्यांना सांगितलं, की मी चाललो घर सोडून.

काकाजी: कुठे?

श्याम: आचार्य नेतील तिथे.

काकाजी: पण आचार्य कुठे जाणार आहेत?

श्याम: मला कुठे ठाऊक आहे!

काकाजी: त्यांना तरी कुठे ठाऊक आहे! विचार ते आल्यावर.

श्याम: पण मी दोस्तांना तोंड कसं दाखवू?

काकाजी: अरे, पण दोस्तांना तू परत आलास तर आनंद होईल की दु:ख?

श्याम: त्यातलं काहीच होणार नाही.

काकाजी: मग त्यांची चिंता कशाला?

श्याम: चेष्टा करतील ते माझी.

काकाजी: त्यांना घेऊन जा एखाद्या हॉटेलात. चांगली मुर्गीबिर्गी खाऊ घाल त्यांना. आणि म्हणावं- दोस्त, आपला बेत फिरला. कबूल कर, की मी गाढव होतो म्हणून. आपला गाढवपणा कबूल करावा. मझा असतो त्यात देखील. शतरंज खेळताना नाही आपली मूव्ह चुकत एखादवेळी- म्हणून काय गाढवपणालाच चिकटून बसायचं?

---

(तुझे आहे तुजपाशी, पृ. ७९-८०)


हे वाचले का?

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

काँग्रेस आणि पर्यायांच्या मर्यादा

(एका चर्चेत विरोधकांच्या वा चॅनेल्सच्या मते ’काँग्रेसने स्वीकारलेला ’सॉफ्ट हिंदुत्वाचा’ आणि काँग्रेसच्या मते 'हिंदुत्वाच्या राजकीय बाजूला वगळून स्वीकारलेल्या हिंदुपणाचा' प्रवास राजकीयदृष्ट्या लाभ देईलही पण वैचारीकदृष्ट्या मागे घेऊन जाणारा नाही का?’ असा एक प्रश्न उपस्थित झाला. त्याला दिलेला हा प्रतिसाद.)
---

अगदी बरोबर. याच कारणासाठी मला तो पटलेला नाही. पण...

राजकीय पक्षाला राजकीय सत्ता हवी असते आणि ती वैचारिकतेवर कधीच मिळत नाही हे ढळढळीत सत्य आहे. वैचारिक मंडळींमध्ये आपसातच इतका अंतर्विरोध असतो, की कितीही नेमकी वैचारिक भूमिका घेतली तरी वैचारिक मंडळी सर्व एक होऊन मतदान करत नसतात. वैचारिक मंडळी नेहमीच मूठभर असतात, आणि ही मंडळी कायम काँग्रेसच्या विरोधातच उभी राहिली आहेत. मग सत्ताही नाही नि वैचारिक मंडळींत स्थानही नाही अशी सर्व गमावणारी भूमिका काँग्रेस का घेईल?

SlightlyBetter

अगदी अलीकडे ’दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने काँग्रेसला मत द्यावे, कारण इतरांना मत दिल्याने एकतर सावळा गोंधळ सरकार येईल (ज्याने पुन्हा भाजपला परतण्याच्या - पूर्वी काँग्रेस परते तसा - मार्ग मोकळा होईल) किंवा हे सगळे चार-दोन खासदारांचे पक्ष - पक्ष म्हणून वा सदस्य फुटून - पुन्हा भाजपचेच सरकार आणतील’ असे मत मांडले होते. त्यावर ’ते तुम्हाला भाजपचा बागुलबुवा दाखवून वैट्टं सरकारच आणतात’ असे उत्तर वैचारिक(?) वर्तुळातून आले होते.

एकतर आपण राजकीय पर्याय उभे करु शकत नाही. जे आहेत ते आपल्या अपेक्षेहून दुय्यमच असणार हे ध्यानात घेत नाही. ’पुंडांमधला गुंड' (lesser of the evil) निवडावाच लागतो. निवड तशी करायची आहे हे मान्य करुन पावले टाकावी लागतात. काँग्रेसला निवडणे म्हणजे त्यांना धुतल्या तांदुळाचे असल्याचे प्रमाणपत्र देणे नाही हे आपण ध्यानात घेत नाही. राजकीय सत्ता नसेल तर तुमच्या वैचारिक भूमिकेला अफाट लोकसंख्येमधील तुमच्या मूठभर वर्तुळाखेरीज तसेही फारसे कुणी विचारत नाही. सामान्य मतदार तर नाहीच नाही.

भाजपाने असंख्य तडजोडी नि तत्त्वच्युतीचे मासले दाखवून सत्ता मिळवली आणि त्या सत्तेच्या आश्रयानेच गावोगावी शाखा वाढल्या, विविध आस्थापनांतून अनेक मंडळी त्या विचारधारेचे, संघटनेचे सहानुभूतीदार अथवा समर्थक झाले. मोर्चे, आंदोलने व्याख्याने, लेख यांतून इतका व्यापक विस्तार होऊ शकेल का याचा विचार ज्याने-त्याने करावा.

मध्यंतरी कॉ. पानसरेंचा म्हणून सांगितलेला एक किस्सा कानावर आला होता. ते म्हणाले की, ’अडचण आली की मदतीला लोक आमच्याकडे धावतात नि मतदानाची वेळ आली की काँग्रेसलाच मतदान करतात.’ हे का घडते याचा विचार होणे आवश्यक आहे. कारण वैचारिक, बुद्धिमान मंडळी ही आपली सहानुभूतीदार, मदतनीस आहेत पण ’आपली’ नाहीत हे लोकांचे मत असते. त्यांची ’आपले’पणाची व्याख्या ही जात-धर्मांच्या मार्गानेच जाते हे कटू सत्य आहे. हा मार्ग बदलण्यासाठी सत्ता मिळवायची की आधी मार्ग बदलायचा याचा निर्णय वैचारिकांना घेण्याची गरज आहे... भाजप/संघाने त्यांचा निर्णय आधीच केला आहे.

अशा परिस्थितीत माझ्या मते वैचारिकताच अधिक गोंधळलेली आहे, त्यांच्याकडे प्रश्न नि आक्षेप भरपूर आहेत पण उत्तरे नाहीत. जी आहेत ती अव्यवहार्य, utopian आहेत ही समज त्यांच्यात नाही, अशी स्थिती आहे. त्या तुलनेत निदान राजकीय पक्ष भाजपच्या उजव्या भस्मासुराला राजकीय सत्तेपासून दूर ठेवण्याची लढाई - आपल्या कुवतीतच - लढत आहेत. याउलट वैचारिक मंडळी ’त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जायचे नाही हां, गेलात तर तुम्ही छुपे संघी’ अशी अस्पृश्यता खेळत एक एक व्यासपीठ उजव्यांच्या ओटीत कायमचे टाकत चालले आहेत. अशा परिस्थितीत माझ्या मते राजकीय सॉफ्ट हिंदुत्व ही वैचारिक तडजोड असली, तरी तिच्यासमोर मान तुकवून चालावे लागेल.

पोलिस खात्यातील मंडळी मोठे मासे पकडण्यासाठी खिसेकापू, वाहनचोर वगैरे छोट्या गुन्हेगारांचे खबर्‍यांचे वर्तुळ बनवून त्या फायद्यासाठी त्यांच्या छोट्या चोर्‍यांकडे कानाडोळा करतात तसेच हे. कारण मोठे सावज पाडायचे तर एकाच वेळी अनेक लहान सहान सावजांवरही हत्यारे खर्च करत बसल्याने हे ही नाही नि ते ही नाही अशी परिस्थिती होऊन बसू शकते. (यावर लगेच ’काँग्रेसची चोरी छोटी नाही’ म्हणून फटकारणारे ’वैचारिक’ प्रतिसाद येतील पाहा. विचार कितीही करता येत असला , तरी उदाहरण, मुद्दे, ध्वन्यर्थ यातील फरक अनेकांना अजूनही समजत नाही. याला पुरोगामी म्हणवणारेही अपवाद नाहीत हे दुर्दैव.)

काँग्रेसचा कारभार धर्मनिरपेक्ष अथवा पुरोगामी असेल, पण तिचा कार्यकर्ता आणि डीएनए तसा कधीच नव्हता. समाजवादाची भूमिका नेहरुंची असली, तरी बहुसंख्य नेते नि कार्यकर्ते हे- सनातनी नसले, तरी धर्मनिष्ठच होते. राहुल गांधींनी राजकीय सोयीसाठी का होईना हे वास्तव मान्य केले आहे हे उत्तम झाले. सत्ताकारणात त्याचा आधार घेतला, तरी धोरण व्यवहारात त्याचा परिणाम होऊ दिला नाही तरी माझ्या दृष्टीने खूप झाले.

दुर्दैवाने भारत हा वैचारिक, सेक्युलर बहुसंख्येचा कधीच होणार नाही हे वास्तव आहे (तसे कोणताच देश होणार नाही) सत्ताकारण, राजकारण करणार्‍यांना वैचारिकतेपेक्षा मतांची, निवडून येण्याची चिंता करत असताना हे वास्तव नजरेआड करताच येणार नाही. वास्तव मान्य करणे म्हणजे त्याला शरण जाणे असे समजण्याचे कारण नाही. वाटचालीमध्ये एखादा डोंगर आडवा आला नि त्याला लंघून जाता येत नाही असे दिसले, तर चार पावले मागे घेऊन वाट बदलून त्याला वळसा घालून जाणे श्रेयस्कर नसले तरी शहाणपणाचे असते.

आयुष्यात निवडीसाठी नेहमीच ’योग्य पर्याय’ उपलब्ध असतो असे नाही, समोर आलेल्या प्रश्नाला ’एक आणि एकच’ बरोबर उत्तर असतेच असे नाही. (ते फक्त शाळेतल्या परीक्षेत नि काहीच विषयांमध्ये असते) त्यातल्या त्या कमी नुकसानीचा आणि अपेक्षेच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा कम-अस्सल पर्याय निवडावाच लागतो, प्रश्नाच्या अनेक संभाव्य उत्तरांपैकी एक निवडावेच लागते. ते प्रश्नाचे दहापैकी दहा गुण मिळवून देणारे कधीच नसते, दिलेल्या वेळात लिहून संपेल नि दहाच्या शक्य तितके जवळ जाणारे गुण मिळवून देईल असे उत्तर निवडावे लागते.

मी दहापैकी दहा गुणच मिळवेन अशी जिद्द धरणारा आणि तसे उत्तर सापडेतो विचार करत बसणारा वेळ संपल्यावर दहापैकी शून्य गुण मिळवून बाहेर पडेल. तर पहिले सुचेल ते उत्तर लिहून मोकळे होणारा पाचांच्या आत राहण्याची शक्यता अधिक. माणसाच्या निर्णयशक्तीचा कस लागतो तो वेळ नि गुण यांचे गुणोत्तर बसवण्यात.

बहुतेक सामान्य माणसे काहीही विचार न करताही हे गणित बसवत असतात. आपण वैचारिकतेचे बडिवार माजवणारेच बहुधा टोकाला जाऊन अपयशी ठरत असतो.

- oOo -


हे वाचले का?