मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

विकास म्हणजे...

पंतप्रधान म्हणजे देशाचा सीईओ नव्हे, जो फक्त कंपनी प्रॉफिट वाढवून दाखवले की कार्यक्षम म्हणून गणला जावा. (आजचे पंतप्रधान तर सीईओपेक्षा अडानी-अंबानींचे ’सेल्स-एग्जिक्युटिव’च अधिक भासतात.) देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हितासाठी त्याने काम करणे अपेक्षित असते. आणि सामान्यांचा विचार म्हणजे त्यान दोन हजार रुपयांचे दान देणे, त्यांचे पाय धुणे नव्हे. मुळातच त्यांना उचलून पैसे देण्याची गरज लागू नये, त्यांचे पाय धुण्याची आवश्यकताच राहू नये यासाठी धोरणे आखावी लागतात. त्यासाठी त्यांना आवश्यक ते मूलभूत नि कौशल्य-शिक्षण देण्याची सोय करावी लागते. 

शाळा ही संस्था आहे, धंदा नव्हे. तेव्हा ’तोट्यात चालतात’ म्हणून शाळा बंद करणारा सीईओच असतो, नेता नव्हे. शाळा बंद करणारा, उचलून पैसे देण्याची गरज सतत जिवंत ठेवू पाहणारा सीईओही नव्हे तर ’मालक’ बनू पाहात असतो. पाय धुतले, दोन हजार दिले म्हणून आनंदी होणार्‍यांनी त्याने त्याच्यासमोर आपण सतत असे हात पसरावेत ही परिस्थिती शिल्लक ठेवली आहे याचे भान ठेवायला हवे. 

खूप पैसे निर्माण केले, खूप रस्ते बांधले, खूप पूल नि उद्योग उभे केले की विकास झाला ही व्याख्या फक्त सुखवस्तू, मूलभूतच नव्हे तर चैनीच्या गरजाही भागलेल्यांचीच असू शकते. अमेरिकन मॉडेलची केवळ वरवरची माहिती असणारे नि ’अगदी तस्से इथे करा बुवा.’ म्हणणारे सुशिक्षित अडाणी खूप पैसे निर्माण करण्याच्या नि उपभोगाच्या नवनव्या कल्पनांनीच झपाटलेले असतात. त्यांनाच विकासाचे हे मॉडेल हवेसे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा