बुधवार, २२ मे, २०१९

’काँग्रेस-भाजप एकाच माळेचे मणी’ पार्टी

’काँग्रेस नि भाजप एकाच माळेचे मणी’ म्हणणार्‍यांचाही काँग्रेसच्या घसरणीत मोठा वाटा आहे हे त्यांना नाकारताच येणार नाही.

पूर्वी काँग्रेस सत्ताधारी असल्याने त्यांच्यावर अधिक आक्रमक टीका केली हे समजण्याजोगेच आहे. पण हे करत असतानाही ’भाजप नि काँग्रेस या दोघांचेही आम्ही विरोधक आहेत, पण काँग्रेसपेक्षा भाजप हा अधिक मोठा विरोधक आहे. आणि म्हणून जेव्हा अन्य सर्व पर्याय कुचकामी असतील*, अपरिहार्य असेल तेव्हा तेव्हा आम्ही भाजपपेक्षा काँग्रेसला साथ देऊ’ अशी निसंदिग्ध प्रतवारी त्यांनी लावायला हवी होती. तसे न केल्याने भाजपच्या साथीने काँग्रेसच्या नावे सतत (सकारणही, ते चुकीचे होते असे मला मुळीच म्हणायचे नाही!) शंख करत असताना त्यांच्या जागी कोण? याचे उत्तर न शोधता, त्याचा नीट पुरस्कार न करता करत असतील,आणि त्याचा फायदा भाजपच्या पारड्यात पडला असेल तर, ती तर त्यांची ती राजकीय अपरिपक्वताच म्हणावी लागेल.

NotWithCongOrBJP

कम्युनिस्ट असोत की हिंदुत्ववादी, त्यांच्या क्रांतिबिंतीच्या कल्पना अशाच भाबड्या असतात. त्यांना सद्य-व्यवस्थेचे वाईट ते सारे दिसते (कम्युनिस्टांबाबत त्याचे विश्लेषण, विवेचन व्यवस्थित शास्त्रशुद्धही असते.) ती का बदलायला हवी याची कारणमीमांसा ते व्यवस्थित करतात. (बरीचशी योग्यही असते.) पण ’तिच्या जागी कोणती दुसरी व्यवस्था हवी.’ त्यावरचे त्यांचे उपाय अतिशय भाबडे, एकांगी आणि दुराग्रहीच असतात. जुन्या व्यवस्थेतले सारे दोष महत्वाचे मानताना त्यांच्या नव्या व्यवस्थेतले संभाव्य दोष दाखवले, तर एकतर ते मान्यच करत नाहीत किंवा ते बिनमहत्वाचे आणि आपल्या स्वप्नाळू व्यवस्थेत हे धोके वास्तवात येणारच नाहीत अशी त्यांची भाबडी आशा असते. इतर व्यवस्थांचे मूल्यमापन करत असताना एक परिणामकारक घटक म्हणून गृहित धरलेल्या माणसांच्या स्वार्थलोलुपतेला ते स्वत:ला अभिप्रेत व्यवस्थेच्या मूल्यमापनात मात्र स्थान देत नाहीत. आपल्या सर्वगुणसंपन्न व्यवस्थेमध्ये माणसे गुणी होऊन स्वार्थ विसरतील असा त्यांचा होरा असावा.

असाच भाबडेपणा लोकपाल नावाच्या तथाकथित नव्या व्यवस्थेबाबत अनेकांनी केला. तेव्हा काँग्रेसचे घर उध्वस्त केले म्हणून आपली पाठ थोपटून घेणारे, स्वत: सत्ताकारणापासून पळ काढत ती जमीन (त्यांना सोबत घेण्याचे पाप करुन) भाजपला दान करणारे, आज त्याच काँग्रेसला ’भाजपला तुम्ही रोखू शकला नाहीत हे तुमचे पाप.’ म्हणून आगपाखड करत आहेत. हे भलतेच विनोदी आहे. इजिप्तच्या जस्मिन क्रांतीमध्ये हुकूमशहा जाऊन मुस्लिम ब्रदरहुडची सत्ता आली, तेव्हा जसे आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना त्या जनतेची झाली असेल तशीच यांची झाली आहे, फक्त त्या पापात आपण वाटेकरी आहोत हे मान्य करण्याची यांची तयारी नाही.

आणि जर त्यांना ’काँग्रेस भाजपपेक्षा बरी’ हे मान्य नसेल, जर हे दोघेही खरोखरच एकाच पातळीवरचे आहे म्हणत असतील, जोवर त्यांची लाडकी एखादी उच्च, तात्त्विक नैतिक वगैरे पार्टी निवडून येत नाही, तोवर भाजप येवो की काँग्रेस, त्यांच्या दृष्टीने फरक काहीच नाही ना. मग त्यांनी त्यातल्या त्यात काँग्रेस हरल्याचा आनंद व्यक्त करावा की, चिडचिड कशाला उगाच.

मला तर ही मंडळी मोदींपेक्षा काही वेगळी दिसत नाहीत. जे चांगले घडेल ते आमचे किंवा त्यात आमचा वाटा आहे, नि वाईट घडले की ते काँग्रेसचे पाप किंवा त्यांच्या काळापासूनचे म्हणून बोंब मारायची असेच यांचे धोरण दिसते.

दुसरीकडे समाजवादी नीतिशपेक्षा आम्ही कित्ती नैतिक' वगैरे दावा करणारे कम्युनिस्ट राजकारणाला पूर्ण नालायक आहेत हे सिद्ध होते आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल बोलत नाही मी, त्यांच्या भारतीय राजकारणाबद्दल बोलतो आहे. २०१४ लोकसभेला नगण्य जागा मिळवूनही नीतिशकुमार भाजपाशी पाट लावून आज निम्म्या(!) म्हणजे १७ जागा लढवतो आहे, त्यातील १२-१४ खासदार निवडूनही येतील. नीतिशचे राजकारण नि:संशय अनैतिक आहे. पण त्याने त्याचा पक्ष तरतो आहे हे वास्तव विसरता कामा नये. 'समाजवादी साथी फॅसिझमची माती खाती' म्हणणारे वीर कम्युनिस्ट बंगालमध्ये आज शून्य खासदारांवर येऊ घातले आहेत.

राजकारणात सत्ताकारण अर्थातच महत्त्वाचे असते. नैतिकता नि विचारश्रेष्ठतेचे डिंडिम फक्त व्याख्यानात किंवा पुस्तकांतून मिरवता येतात. त्याचा ना मिरवणार्‍याला प्रत्यक्ष उपयोग ना जनतेला. त्याचा प्रचार-प्रसार व्यापक पातळीवर करता आला, तर जनता तुमच्या विचारांशी सुसंगत विचार करेल हे खरे, पण त्याला व्यापक नियोजन हवे (आवडत नसले तरी- संघ ते पद्धतशीर करतो हे अमान्य करता येत नाही.) निव्वळ झटका आल्यासारखी चार-दोन व्याख्याने, एक-दोन आंदोलने केल्याने हे होईल हा समज भाबडेपणाचा असतो.

जनतेच्या दृष्टीने १०० टक्के बिनकामी तत्त्वनिष्ठेपेक्षा, ५० टक्के पण काही बदल घडवण्यास कामी येणारी तत्त्वनिष्ठा अधिक मोलाची. मग त्याला कुणी माती खाणे म्हणाले तरी, अस्तित्व टिकवून धरत अनुकूल परिस्थिती येईतो तग धरणे - त्यात जमेल तितके आपल्या विचाराने वागणे - नि तशी मिळाली की ५०% हून टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करणे हे माझ्या मते अधिक परिणामकारक असते. `आमची तत्त्वनिष्ठा आम्ही सोडणार नाही, त्यासाठी हजार वर्षे सत्तेशिवाय राहू.’ म्हणणार्‍याने मुळात सत्ताकारणाच्या वाट्याला जाऊ नये. उगाच अशी चिडचिड होण्यापलिकडे पदरी काही पडत नसते.

मी २०१४ च्या पूर्वी भाजपचा मतदार होतो, २०१४ पासून टीकाकार झालो, २०१९ ला नाईलाजाने का होईना काँग्रेस आघाडीला मतदान केले. अजूनही त्यांचा समर्थक नाही. ... आणि जरी विरोधकांनी कितीही तात्पुरती बेडकी फुगवली तरी, एग्जिट पोल हे संभाव्य निकाल असण्याची शक्यता, नसण्यापेक्षा कित्येक पट अधिक असते हे मी संख्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खात्रीने सांगू शकतो. आज दुसर्‍यांदा मोदी सरकार येते आहे. तेव्हा बाकी सार्‍या शंका सोडून काँग्रेसलाच मतदान करेन असे निश्चित केले आहे.

- oOo -

* अर्थात डिपॉजिटदेखील वाचवू न शकणार्‍या यांच्या तथाकथित उमेदवाराला देखील आपण निवडून वगैरे येणार अशी मूर्ख खात्री असते, त्यामुळे अशी अपरिहार्यता वगैरे कधी नसतेच त्यांच्या दृष्टीने. तो काँग्रेसच्या उमेदवाराची मते खाऊन त्याला खड्ड्यात घालतो नि वर ’हे काँग्रेसचेच पाप’ म्हणून चोराच्या उलट्या बोंबाही मारतो.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा