मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

विचार आणि सत्ता

विचार नि विश्लेषण कितीही दर्जेदार, व्यापक हितकारी वगैरे असले, तरी जोवर त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोवर त्यांना सुविचाराच्या वहीत लिहून ठेवलेल्या संदर्भहीन सुविचाराइतकेच महत्व असते... किंवा ज्यावर कधीही प्रश्न न विचारता त्यातील मजकूर शिरोधार्य मानायचा असतो अशा धर्मग्रंथांसारखे! अंमलबजावणी करायची तर सत्ता हवी, आणि सत्ता हवी असेल तर आपले सोवळे उतरवून थोड्या तडजोडीला तयार असावे लागते.

CoomunistFlag

हे शहाणपण ’काँग्रेस, भाजप दोघेही वैट्टं वैट्टं’ हा जप करत बसलेल्या आणि राजकीय ताकद शून्य झालेल्या समाजवाद्यांना किंवा बुद्ध्यामैथुन करत बसलेल्या समाजवादी आणि कम्युनिस्टांना यायला हवे. जिवंत राहिला तर माणूस बळ वाढवून नंतर शत्रूशी लढू शकेल. त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांपैकी एकच प्रचंड ताकदवान होऊ नये यासाठी प्रसंगी दुय्यम प्रतिस्पर्ध्याला बळ द्यावे लागते. नाहीतर मार्टिन निमॉयलरच्या त्या कवितेत म्हटल्याप्रमाणे "When they came for me, no one was there to speak for me" अशी स्थिती व्हायची.

कम्युनिस्ट जर परस्परांत लढून काँग्रेस भाजप दोघेही जातील नि आपल्याला संधी मिळेल या भ्रमात असतील, तर ते तद्दन मूर्ख आहेत. मुळात कम्युनिजम रुजण्यास परिस्थितीच अनुकूल नाही. ग्रांथिक पोपटपंची करुन ती होणारही नाही. त्यासाठी मार्क्सने केले तसेच सद्यस्थितीचे आकलन करुन घेऊन त्यावर डावा विचार उभारायला हवा. सध्या पुस्तकी कम्युनिस्ट परकीय लेखकांनी मार्क्सवादावर लिहिलेली पुस्तके वाचून इथल्या मंडळींच्या नावे बोटे मोडण्यापलिकडे काहीही करत नाहीत. वास्तवाचा नि त्यांचा फक्त इतरांवर आगपाखड करण्यापलिकडे काही संबंध दिसत नाही.

सर्वसामान्य माणसाकडे गमावण्याजोगे बरेच काही आहे. हा समाज बूर्ज्वा विचार नि जीवनपद्धतीवरच पोसला जातो आहे. ९२ नंतर 'अफ्लुअन्स'ची आस प्रत्येकाला आहे. जुन्या समाजव्यवस्थेच्या गृहितकांवर बांधलेले विचार नि त्यावर आधारित व्यवस्था मला आजच्या व्यवस्थेने दिलेले फायदे नाकारायला लावणार असेल, तर सामान्य माणसाची तसे करण्याची तयारी नाही. त्या मानसिकतेवर बोटे मोडणार्‍या कम्युनिस्ट विचारवंताचे जगणॆही बूर्ज्वाच असेल तर आज बूर्ज्वा काय नि श्रमाधारित व्यवहार कुठला याची नव्याने व्याख्या केलेली काय वाईट. जुन्या पोथीला नि चौकटींना चिकटून बसायचे असेल तर धर्म नि धर्मग्रंथ जोडीपेक्षा यात फरक तो काय राहातो?

दुसरे असे की भाजप नि काँग्रेस गेले तर आपण तिसरा पर्याय आहोत हे लोकांना पटवावे लागेल. त्यांनी रिकामी केलेली राजकीय भूमी भरुन काढण्यासाठी तितकेच व्यापक राजकीय संघटन उभे ठेवावे लागेल. पर्याय उभा न करता समोरची इमारत पाडण्याने नव्या भस्मासुराला ती भूमी आंदण देण्यापलिकडे काही साधत नाही. अण्णा आंदोलन आणि महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीत सेनेने केलेल्या या चुकीची कम्युनिस्ट पुनरावृत्ती करतील इतकेच.

हाच काहीसा प्रकार ब्राह्मणवादाविरोधात उभ्या असलेल्या बहुजन चळवळीच्या बाबत घडतो आहे. विद्रोहाच्या प्रेमात पडून पर्याय न उभारता केवळ प्रतिकारावर भर दिल्याने चोख पर्यायी व्यवस्था उभीच केली जात नाही. ’संविधानावर आधारित’ हे पुस्तकी उत्तर दिले जाते. याचा अर्थ काय हे सर्वसामान्य माणसाला समजत नाही. आमच्या जगण्याचे बंध, परस्पर-संबंध यांची रूढ चौकट सोडून संविधानानुसार जगायचे म्हणजे काय, हे त्यांना ध्यानात येणे शक्य नाही. वारशाने आलेले व्यवस्था, विचार, कर्मकांडे हे त्यांना समजतात, त्यांचा वांझपणा, घातकपणा तुम्ही उकलून समजावून दाखवलात तर त्यांना पटेलही; पण ते नाहीत तर दुसरे काय, या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. आणि ’संविधान अनुसरा’ या उत्तरावर ते बुचकळ्यात पडण्यापलिकडे काही घडणार नसतेच.

थोडक्यात व्यवस्था ही ज्या माणसांसाठी रुजवायची आहे, त्या माणसांची मानसिकता, त्यांच्या गरजा समजून नवी व्यवस्था त्यांच्या आयुष्यात सारता यायला हवी, धर्मग्रंथासारखी कुण्या देवाचा शब्द म्हणून नव्हे. देव, धर्मादि जुन्या अवस्था अनेक अर्थांनी नुकसानकारक असल्या, तरी त्यांची कोणती गरज भागवतात जेणेकरुन त्या व्यवस्थांनीच दुय्यम ठरवलेले समाजघटकही त्यांना सुखासुखी सोडण्यास तयार होत नाहीत, याचा विचार करायला हवा. 'ते मूर्ख अडाणी असतात म्हणून’ असे उत्तर देणारा स्वत:च मूर्ख असण्याची शक्यता अधिक.

आखाड्यात खेळलेल्या मल्लाचे लंगोट ’बघा किती मळले आहेत’ असे आखाड्यात कधीही न उतरलेल्या भिकंभटाने म्हणावे तसे कम्युनिस्टांचे झाले आहे. आम्ही फक्त माती नसलेल्या स्वच्छ आखाड्यातच लढू असा त्यांचा आग्रह आहे. तसा तो कधीही होणार नाही हे वास्तव मान्य करुन, कदाचित आखाडा साफ करण्यापेक्षा ती माती आपल्या अंगाला लागली तरी चिकटणार नाही असा उपाय शोधून आखाड्यात उतरायलाच हवे. आखाड्याबाहेर बसून कमेंटरी करत बसल्याने हाती काही लागणार नाही.

शहरातील सगळेच ट्रॅफिक सिग्नल हिरवे होईपर्यंत मी गाडी गराजबाहेर काढणार नाही, कारण सिग्नलला फुकट इंधन जळते असे म्हणून चालत नाही. गाडी कायमची गराजमध्ये पडून राहील. त्याऐवजी झटपट स्टार्ट होईल अशी गाडी बनवण्याकडे लक्ष द्यायला हवे. त्यातून सिग्नलला गाडी बंद करता येईल नि इंधन वाचेल. एक फरक लक्षात घ्यायला हवा की गाडी आपली आहे, त्यात हवे ते बदल करुन तिला अधिकाधिक कार्यक्षम करुन आपले उद्दिष्ट साध्य करु शकतो. रस्ते नि सिग्नल ही सामायिक मत्ता आहे, त्यातील बदल करण्यासाठी सर्व भागधारकांमध्ये जागृती करणे, बदल करण्यासाठी आवश्यक ती सहमती निर्माण करणे, सगळे सिग्नल सतत हिरवे ठेवणॆ योग्य कसे हे त्यांना पटवणे(थोडक्यात आपले विचारदारिद्र्य उघड करणे) वगैरे अधिक कष्टाचे काम आहे आणि निर्दोष आहे असेही नाही. त्यापेक्षा आपल्या गाडीमध्ये बदल करणे हा कमी ऊर्जा, साधने वापरुनही यशाची शक्यता अधिक देणारा पर्याय आहे.

हे एका फटक्यात सुचले तसे लिहिले आहे. कदाचित काही अंतर्गत विसंवाद दिसेल, काही तपशीलांत चूकही असेल. त्याअर्थी हा साधकबाधक नव्हे तर तात्कालिक विचार म्हणायला हरकत नाही. पण एकुण भावना महत्वाची आणि टीका करणारा प्रत्येक जण विरोधक, शत्रू नसतो किंवा प्रत्येक प्रश्न हा आरोप नसतो इतके ध्यानात घेण्याइतपत खुलेपणाने वाचता आले तर उत्तम.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा