गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

देवळे आणि दांभिकता

गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिराबाहेरील हा फलक काल कुणीतरी शेअर केला त्यावरुन हा जुना अनुभव आठवला.

काही वर्षांपूर्वी एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने तिरुनेलवेलीला गेलो होतो. आमचे चार प्राध्यापक आणि मी नव-प्राध्यापक अशी टीम होती. आता आलोच आहे तर कन्याकुमारी, शुचीन्द्रम मंदिर वगैरे करावे असा बूट निघाला. मी भाविक वगैरे नसलो तरी इतरांबरोबर मंदिरात जाण्यास माझी ना नव्हती... आजही नसते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उत्तरीय पांघरून मंदिरात प्रवेश करु नये वगैरे सूचना होत्या. (आमच्या एका चावट प्राध्यापकाने, ’हा नियम स्त्रियांनाही लागू आहे का?’ असा प्रश्न विचारला. प्रश्न चावटपणे विचारला असला तरी माझ्या मते वाजवी आहे. )

पण काढलेले शर्ट्स ठेवण्याची व्यवस्था कुठेही दिसत नव्हती. तिथल्या कर्मचार्‍याला विचारले, तर तो म्हणाला ’हातावर टाकून घेऊन जा.’ कमरेचे कातड्याचे बेल्ट काढावेत का? असा प्रश्न विचारल्यावर, ’त्याची गरज नाही. फक्त वरचे कपडे काढून जा.’ असे उत्तर मिळाले.

हा प्रकार मला समजला नाही. म्हणजे उत्तरीयाने इंद्रमहाराजांना विटाळ होतो, पण अधरीयाने- त्याच प्रकारच्या कापडापासून बनवलेल्या तर सोडाच, अगदी जनावराच्या कातड्याने बनवलेल्या बेल्टने होत नाही. बरं ते उत्तरीय धडावर असेल तरच विटाळ होतो, हातावर असले तर होत नाही... ही गंमत मला कळली नाही. बेल्ट हा कातड्याचा असला तरी अधरीय म्हणून त्याचे वर्गीकरण करुन देवस्थान समितीने बहुधा त्याला exemption दिले असावे.

HypocracyAtTemples

माझ्या मते मूळ नियम हे आरोग्याशी निगडित असावेत. दक्षिणेतच अनेक मंदिरे अशी आहेत, जिथे व्यवस्थित आंघोळ करुन त्यांच्याकडून उपलब्ध करुन दिलेले धूतवस्त्र नेसूनच देवळात प्रवेश करता येतो. असे नियम समजण्याजोगे आहेत. देव या संकल्पनेशी पावित्र्याच्या कल्पना जोडल्या आहेत आणि त्यामुळे आरोग्याचा मुद्दा त्याला जोडून आला तर ते अगदीच वाजवी आहे. (स्वयंघोषित पुरोगाम्यांनी हे ’त्यांच्या दृष्टिकोनातून’ पाहाणॆ जमत नसेल तर सोडून द्या. तुमच्या दृष्टिने पुरोगामित्व हा झेंडा अथवा इझम आहे, जीवनपद्धती अथवा विचार नव्हे. )

पण त्यात भक्तांसाठी सोयी कराव्या लागतात, खर्च होतो. नफा कमी होतो. आणि त्या सोयीसाठी पैसे आकारावेत तर आध्यात्मिक पर्यटकांचा आकडा घटतो, (म्हणजे पुन्हा उत्पन्न घटते.)

त्यापेक्षा मोगलांचे मांडलिकत्व पत्करुन सुखासीन जीवन जगणार्‍या त्याच्या राणा प्रतापांच्या वंशजांनी, 'राणाजींनी केलेली 'चितोड परत मिळेपर्यंत गवताच्या गादीवर झोपेन’ म्हणून केलेली प्रतिज्ञा आपण पाळतो, असे स्वत:ला नि इतरांना पटवण्यासाठी पिसांच्या गादीखाली चार गवताच्या काड्या ठेवल्यासारखे हे कर्मकांड उरले आहे. ’उत्तरीय नाही’ एवढे कर्मकांड ठेवून मूळ हेतू शिंक्यावर टांगून ठेवलेला सोपा उपाय.

पण देवळाचे देवस्थान, आणि देवस्थानांचे 'आध्यात्मिक टूरिझम' झाले की असले कोलांटउड्या मारणारे नियम करुन पर्यटकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. देव नि श्रद्धा या व्यक्तीच्या आयुष्यात काही एक स्थान राखून असल्या, तरी देवस्थाने ही चोख धंदेवाईकच असतात, त्यांच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहायला शुचीन्द्रम मंदिराच्या त्या नियमाने मला शिकवले.

आमच्या गणितात इन्टिग्रेशन आणि डेरिवेटिव'चे काही मूलभूत नियम माहित झाले, की अवघड गणितेही सटासट सुटतात, हे जसे लक्षात आले तसे ’श्रद्धा, भक्ती वेगळी नि देवळे, देवस्थाने वेगळी. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा हवा’ हा मूलभूत नियम समजला नि पुढे अनेक बाबतीत त्याने उमज पडण्यास मदतच केली.

प्रशांत दामलेंच्या ’गेला माधव कुणीकडे’ मध्ये त्यांचे पात्र कुठे अडचणीत आले की ’मी कुठे काय, हा बघ.’ म्हणून आपल्या अंगावरची समस्या मित्राकडे टोलवून देत असते. अगदी तसेच अलिकडे मुद्द्यांना हेत्वारोपाने किंवा तसे दुसर्‍या धर्म/जात/गाव/देश यांच्याकडे बोट दाखवून ’त्यांच्याकडे नाही बघत तुम्ही’ किंवा ’त्यांना नाही बोलत तुम्ही’ म्हणून उडवून लावायचा सोपा उपाय वापरला जाऊ लागला आहे. अशा ’आमच्याच बाबतीत बोलता’ म्हणणार्‍या सर्वधर्मीय, सर्वस्थानीय, सर्ववर्गीय, सर्वजातीय... वगैरे गटाच्या लोकांसाठी:

कुणी म्हणेल, ’त्यांच्या चर्चमध्ये/ मशीदीमध्ये/ घरात ते काहीही नियम करतील, तुम्हाला पटत नसेल तर जाऊ नका.’ हे मला पुरेपूर मान्य आहे. त्याचबरोबर हास्यास्पद नि दांभिक निर्णयांना फाट्यावर मारण्याचा माझा नियमही असल्याने मी तिथूनच बाहेर पडलो, आणि ख्रिश्चन असल्याने त्या मंदिरात 'प्रवेश बंद' असलेल्या आमच्या अन्य प्राध्यापकाबरोबर मस्त भटकलो.

मंदिर/ चर्च/ मशीद ही खासगी प्रॉपर्टी आहे, त्यांनी तिथे नाकात बोट घालूनच प्रवेश केला पाहिजे असे नियम करण्याचा त्यांचा त्यांचा अधिकार मला मान्यच आहे. त्याचे समर्थन ते बाहेरच्यांसमोर करत असतील, तरीही माझी हरकत नाही. फक्त ते त्याला वैज्ञानिक आधार वगैरे आहे असे ते म्हणू लागले, नि इतरांनीही ते मान्य करावे असा अट्टाहास करु लागले, तर त्याच्याशी निगडित प्रश्नांची उत्तरे देण्यास ते बांधील आहेत. विशेषत: खाली डोकं वर पाय करुन प्रत्येक परंपरेत वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे आहे असल्या बतावण्या करणार्‍यांना तर हे प्रश्न विचारले जाणारच. तिथे ’मी कुठे काय, हा बघ.’ म्हणून पळ काढू देणार नाही मी.

- oOo -

जाताजाता:

’आमचे सारे ग्रेट', 'त्यांना सांगा की, आम्हालाच बोलता...’ जमातीच्या लोकांसाठी माझ्या घरात येताना 'खाली डोके वर पाय करुन चालावे लागेल’ असा नियम आहे. ज्यांना तो पाळायचा नाही, त्यांनी माझ्या घरात पाऊल न टाकण्याचे स्वातंत्र्य आहेच. आणि 'हा नियम इतरांसाठी का नाही? असा प्रश्न विचारणार असाल तर ’स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगळे नियम करणार्‍या देवस्थानांना विचारा की. तिथे नाही तुम्ही विचारत.’ असा तुमचाच तर्क तुम्हाला उलट फेकून मारेन. 😆

-oOo-


संबंधित लेखन

1 टिप्पणी: