शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

हैद्राबाद येथील व्यवस्थापुरस्कृत हत्या आणि माथेफिरु समाज

हैदराबाद एन्काउंटर खरे की फेक, एकुणातच एन्काउंटर हा प्रकार योग्य की अयोग्य, हे दोनही मुद्दे मी जरा बाजूला ठेवतो. माझा मुद्दा जे घडले त्याबद्दल आनंद व्यक्त करणार्‍यांबद्दल, त्याचे ’सेलेब्रेशन’ करणार्‍यांबद्दलचा आहे.

SweetsForKillers

गुन्हा घडलाय हे निर्विवाद. एका स्त्रीवर अत्याचार झाला आहे आणि तिचा अत्यंत नृशंस पद्धतीने खून झाला आहे हे ही उघड आहे. याचा अर्थ कुणीतरी हा गुन्हा केला आहे हे ही नक्की.

प्रश्न असा की हे गुन्हेगार कोण?

१. जे मारले गेले त्यांनीच तो गुन्हा केला होता याची तथाकथित एन्काउंटरचे फेसबुकवर समर्थन करणार्‍यांनी नक्की कशी खात्री करुन घेतली होती?

म्हणजे 'हे गुन्हेगार नव्हते' असा दावा मी करतो आहे, असा अपलाप करुन कांगावा करत येणार्‍यांना सीनियर के.जी.त जाण्यासाठी शुभेच्छा.

याची दोन कारणे. १. दावा ज्याने केला त्यानेच सिद्ध करायचा असतो. आणि २. प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही विरोधी मत असणारे हा बिनडोक तर्क आहे. प्रश्न हा फक्त प्रश्नच असतो, विरोधी दावा नसतो.

’आमुच्या मुखे आला किंवा हजारो लोकांना वाटते म्हणजे तो दावा स्वयंसिद्ध, तो खोडून काढण्यास पुरावे देण्याची जबाबदारी तुमची’ असा उफराटा तर्क करता येत नसतो. केला नि पुन्हा त्याच सामान्यबुद्धीच्या बहुसंख्येला पटला तरी तो खरा नसतो. ’वास्तव’ हे बहुसंख्येच्या मतदानाने सिद्ध होणारी बाब नसते.

२. पोलिसांनी सांगितले म्हणजे हे तेच गुन्हेगार असणार असा तुमचा दावा असेल तर आजवर पोलिसांच्या प्रत्येक दाव्यावर आपण विश्वास ठेवला होता असे शपथपत्र लिहून देऊ शकाल काय?

आणि तसे नसेल तर पोलिस नि न्यायालयांच्या बाहेर आपण नक्की कशाच्या आधारे हेच गुन्हेगार होते हे मान्य केले हे जरा सांगाल काय?

३. 'निदान काहीतरी तर झाले ना? उगाच फाटे का फोडताय?’ म्हणणार्‍यांना प्रश्न.

उद्या असाच एखादा गुन्हा घडला नि नेमके तुम्ही त्या गुन्ह्याच्या आसपास होतात. याचा फायदा घेऊन म्हणा की दिशाभूल झाल्याने म्हणा, पोलिसांनी तुम्हाला आरोपी म्हणून पकडले नि फेसबुकी कालव्याच्या दबावाने तुमचा एन्काउंटर केला तर तो ही न्याय्यच असेल? तेव्हा तुमच्या आजच्या तर्काप्रमाणेच आम्ही ’काहीतरी तर झाले ना? का फाटे फोडताय?’ असे स्वत:लाच बजावून सांगू. चालेल ना?

३.१. आणखी पुढचे म्हणजे स्वसंरक्षणार्थ झालेल्या मारामारीच्या धुमश्चक्रीत तुमच्या हातून तिसर्‍याच व्यक्तीचा खून झाला. ती व्यक्ती समजा एखाद्या समाजाची अध्वर्यू, एखाद्या सत्तापिपासू पक्षाची कार्यकर्ती, एका मोठ्या गटाची वंदनीय वा नेता होती. यामुळे भरपूर गदारोळ झाला म्हणून पोलिसांनी तुमचा एन्काउंटर केला तर तुम्हाला तो न्याय्यच वाटेल? इथे तुमच्या हातून गुन्हा घडला आहे हे निर्विवाद, मग कशाला चौकशी वगैरे, टाका टपकावून असा तुमचा तर्क लागू पडतो आहे हे निदर्शनास आणून देतो.

३.२ ’अनवधानाने घडलेला गुन्हा नि हेतुत: केलेल्या गुन्ह्याची तुलना कशी करता?’ या प्रश्नाला सोपे उत्तर आहे. तुमचा गुन्हा अनवधानाने झाला आहे हे तुम्ही म्हणताय. ज्यांचा माणूस मेला ते तुम्ही हा गुन्हा हेतुत:च केला आहे असे म्हणत आहेत. आणि ते संख्येने अधिक आहेत. मग बहुमताच्या पॉप्युलर न्यायाने त्यांचे बरोबर आहे ना? थोडक्यात मी ही हेतुत: केलेल्या गुन्ह्यांचीच तुलना करतो आहे असा माझा दावा आहे.

३.३ आता जसे ’इतक्या लोकांना वाटते आहे की त्यांनीच प्रियांका रेड्डींवर अत्याचार नि खून केला. ते काय चूक आहेत का?’ म्हणून हेच ते चौघे, मारा त्यांना असे जितक्या ठामपणॆ म्हणत आहात, तितक्याच ठामपणॆ तो गटही तुम्ही आमचा माणूस हेतुत: मारला म्हणून तुम्हाला ताबडतोब ठार मारण्याची मागणी करत आहेत असे समजा.

३.४ हैद्राबादमध्ये बलात्कार नि खून हे दोन्ही हेतुत: झाले आहेत हे उघडच आहे. पण तुम्ही केलेला खूनही हेतुत:च केलेला आहे असे पोलिसांनी - बहुमताला खूष करण्यासाठी - नोंदवले आहे. माध्यमांकरवी आलेल्या बातम्यांमधून माहिती घेतलेल्या, तिसर्‍याच गावात बसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही तुम्ही हेतुत:च खून केला असेच वाटते आहे. माझ्या न्यायप्रियतेचे प्रदर्शन घडवण्यासाठी ’तुम्हाला ताबडतोब फाशी द्यावी’ अशी मागणी करणारी पोस्ट मी फेसबुकवर टाकली आहे.

तुम्ही आज तथाकथित एन्काऊंटरचे समर्थन ज्या मुद्द्यांवर करत आहात ते सारे मुद्दे इथे तंतोतंत लागू आहेत हे निदर्शनास आणून देतो. अजूनही ’द्या फाशी, करा एन्काउंटर’ असाच तुमचा निर्णय आहे का?

४. ’मग काहीच करायचे नाही का?’ या प्रश्नाला ’काहीतरीच करुन काहीतरी केल्याचा कांगावा नक्की करायचा नाही.’ एवढेच उत्तर तूर्त तरी माझ्याकडे आहे.

---

सोयीच्या वेळी न्यायव्यवस्थेचा आदर करा म्हणून कांगावा नि आमचे डोके भडकले की 'कॉल द डॉग मॅड अ‍ॅंड शूट हिम’देखील चालेल (परत पहिल्या मुद्द्यातील कंस पाहा.) वृत्तीने वागणार्‍यांना त्यांच्या देवाने लवकर सद्बुद्धी द्यावी.

काहीतरी वाईट घडलंय नि त्याबद्दल मला कित्ती कित्ती राग आलाय याचा प्रदर्शन करण्यासाठी न्यायव्यवस्थाबाह्य हत्येचे समर्थन करणे खुनाइतकेच घोर पातक समजतो मी. कारण त्याने व्यवस्थेला धाब्यावर बसवणार्‍यांना बळ मिळत असते.

ता.क.:
ते गुन्हेगार आहेत या गृहितकावर आधारलेले नसतील तरच प्रतिसाद ध्यानात घेतले जातील. कोणताही तपास झालेला नसतानाही, ज्यांना घरबसल्या त्याची बालंबाल खात्री आहे (आणि असे म्हटल्यावर ’म्हणजे नाहीत असे म्हणताय का?’ असा मूर्ख प्रश्न सुचतो, ’अजून माहित नाही’ असा तिसरा पर्याय असूच शकत नाहीत इतके बायनरी समजुतीचे असतात.) त्यांना फेसबुकभूषण पदवी द्यावी अशी शिफारस आयटीसेल कडे करण्यात येईल.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा