शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

कर्तव्यच्युत पेस्टकंट्रोलयोध्याप्रत...

(कविवर्य वा. रा. कांत याची क्षमा मागून)

झुरळांची माळ पळे, अजुनि मम घरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?

पेरिता फडताळी तू थेंब त्या द्रवाचे
कोण्या छिद्रात असे कोण बैसलेले
हलकट ते झुरळ लपे छान सुशेगात

त्या वेळी, ओट्यावर, आणि तयाखाली
स्वर्णिमा*च जणू पसरे, भर दिवसा काली
फिरत असे, टिच्चून ते, माझिया घरात

हातांसह स्प्रेगनने तुवा लढताना
हर्बलाचे करडे कळे, मळुनि लावताना
मिशीधारी झुरळ तुज, खिजविते खलात**

तू गेलास, सोडुनि ती माळ, काय झाले,
सरपटणे ते तयांचे, अजुनि उरे मागे
स्मरते ती, पलटण का, कधि तुझ्या मनात?

- चिं. ता. क्रांत (ऊर्फ मंदार काळे)

---

*स्वर्णिम अर्थात सोनेरी रंगाचे झुरळ
**खल आणि बत्ता जोडीतील

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

सामूहिक नेतृत्वाची पिपाणी आणि त्रात्याचा शंख

नोटाबंदीसह अनेक निर्णयांचे फटके खाऊनही भारतीय जनतेने मोदींना पुन्हा भरघोस मतांनी का निवडून दिले याचे कोडे भारतीय बुद्धिजीवींना अजूनही उलगडलेले नाही. याचे कारण ते ’काय योग्य नि काय अयोग्य’ या मूल्यमापनातून, विचारांच्या व्यूहातून बाहेर येऊन, निकषांआधारे विचार करण्याऐवजी, जमिनीवरचे वास्तव - भले ते त्यांच्या दृष्टीने तर्कसंगत नसेल - त्याची दखल घेऊन, त्याआधारे भारतीय राजकारणाचा विचार करत नाहीत ही त्यांची समस्या आहे. कोरोनाच्या साथीमुळे जगण्याची सारी उलथापालथ होऊनही जनतेचा मोदींवरील विश्वास अद्यापही कमी झालेला नाही, असे अहवाल अलिकडेच प्रसिद्ध झाले आहेत. भले ते भाट माध्यमांचा म्हणून खोडून टाकता येतील, पण आसपास कानोसा घेतला तर या पडत्या काळाचा ज्यांना फटका बसला आहे, ते ही यातून बाहेर पडण्यासाठी मोदींकडे आशेने पाहात आहेत असे दिसून येते. संकटकाळी माणसाची श्रद्धा कमी होण्याऐवजी अनेकदा वाढते असा अनुभव असतो. आकाशातल्या बापाबद्दल हे जसे खरे आहे तसेच राजकीय, सामाजिक नेतृत्वाबाबतही.

सर्वसामान्यांना चेहरा समजतो. श्रद्धेपासून राजकारण, समाजकारण, शिक्षण सर्वच क्षेत्रात त्यांना त्राता हवा असतो. काय योग्य नि काय अयोग्य हे चोख सांगणारा, शक्य झाल्यास त्यातले योग्य ते स्वत: करण्याची जबाबदारी घेणारा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करणार्‍या नेत्याच्या शोधात जनता असते. आणि जेव्हा सक्षम पर्याय दिसत नाही, तेव्हा निरुपायाने म्हणा की बुद्धी कुंठित झाल्याने म्हणा, माणूस पुन्हा जुन्या देवालाच शरण जातो. त्यामुळे रोजगाराची वानवा, गुंडगिरीचा बोलबाला असूनही बंगालची गादी ज्योतिबाबूंनी तीन दशकांहून अधिक काळ भोगली, आणिबाणीतल्या दमनशाहीला माफ करुन जनतेने इंदिरा गांधींना पुन्हा भरभरुन यश दिले आणि भारतातील सर्वाधिक गरीब राज्य असलेल्या ओदिशामध्ये नवीन पटनाईक वीस वर्षे राज्य करत आहेत.

परंतु अपवादात्मक परिस्थितीत अशा संकटकाळाचा फायदा उठवून या नेत्याची, त्रात्याची गढी उध्वस्तही केली जाऊ शकते. त्यासाठी एक सर्वंकष आणि बळकट विरोधाचा झंझावात उभा करावा लागतो. पण इतके पुरेसे नसते. इतिहासात डोकावून पाहिले तर एका चेहर्‍याला पर्याय म्हणून पुन्हा एका चेहर्‍यालाच उभे करावे लागते असे दिसून येते. भारतात स्वातंत्र्यापासून राजकीय सत्तेची मिरासदारी मिरवणार्‍या कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी झालेला पहिला सर्वंकष प्रयोग हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यांचा झंझावातच कॉंग्रेसविरोधी वातावरण निर्माण करण्यातला मुख्य स्रोत होता. पुढे संघाने/भाजपने राममंदिराच्या मुद्द्याआड सुरु केलेल्या जनमतप्रवाह-बदलाच्या कार्यक्रमात रथयात्रा निघाली तेव्हा तिचा चेहरा अडवानींचा होता. दहा वर्षे सत्ता राबवलेल्या आणि तरीही सर्वसामान्यांना आपला वाटेल असा एक नेमका चेहरा निर्माण न करु शकलेल्या कॉंग्रेसला सत्तेतून खेचण्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनालाही अण्णा हजारेंचा चेहरा मुखवटा म्हणून धारण करावा लागला. अलिकडचे उदाहरण म्हणजे आंध्रप्रदेशात अजेय मानल्या गेलेल्या चंद्राबाबूंसमोर आक्रमपणे उभ्या राहिलेल्या जगनमोहन रेड्डींना नेत्रदिपक म्हणता येईल असे यश मिळाले.

भारताबाहेरही पाहिले तर भारतावर दीर्घकाळ सत्ता गाजवलेल्या ब्रिटनमध्येही राजेशाहीचा अवशेष अजूनही राखून ठेवला आहे तो ’राजा हा देवाचा प्रतिनिधी असतो’ या जुन्या अधिष्ठानाचे ’संसद ही राणीची प्रतिनिधी असते असे नवे रूप समोर ठेवण्यासाठीच. नावापुरता का होईना, पण राणीचा तो चेहरा लोकशाहीचा जप करणार्‍या ब्रिटिशांना अजूनही आवश्यक वाटतो. लोकशाहीचा डिंडिम जिथे सतत वाजत असतो त्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनामध्येही अध्यक्षीय पद्धत आहे. म्हणजे संपूर्ण देश प्रथम एक चेहरा निवडतो आणि तो चेहरा मग आपले सहकारी निवडतो. हे सहकारी जनतेमधून निवडून आलेले असले पाहिजेत असे बंधन नसते.

भारताचा दीर्घकाळ सहकारी असलेल्या (सोविएत) रशियाकडेही पाहता येईल. ग्लासनोस्त आणि पेरेस्रोईकाचा गोर्बाचेव्ह-येल्त्सिन काळ हा ’कम्युनिस्टांचा बालेकिल्ला ढासळला’ म्हणून अन्य लोकशाही जगाच्या दृष्टीने रशियाचा ’सुधारणा-काळ’ मानला गेला असला, तरी खुद्द रशियाच्या दृष्टीने राजकीय अस्थिरतेचाच काळ होता. त्या काळात निर्माण झालेली राजकीय घुसळण अखेर पुन्हा एकवार पुतीन यांच्यासारख्या बाहुबलीच्या हाती सत्ता सोपवूनच शांत झाली.

सोविएत युनिअनच्या अस्तानंतर ’आता रशियाची महासत्ता म्हणून कुवत उरणार नाही.’ अशी भविष्यवाणी उच्चारणार्‍या बुद्धिजीवींना त्याच रशियाने युक्रेनच्या तोंडून क्रायमियाचा घास हिसकावून घेत शांतपणे आंचवलेला पाहण्याची वेळ आली. रशियातच आणखी मागे जायचे झाले तर ’सर्वहारांची सत्ता’ म्हणवणत कम्युनिस्टांनीही लेनिन आणि स्टालिन यांची निरंकुश सत्ताच देऊ केली होती. कम्युनिस्ट क्यूबामध्ये कास्त्रो निरंकुश सत्ताधारी होता, तर पूर्वाश्रमीच्या कम्युनिस्ट युगोस्लावियामध्ये मार्शल टिटो.

हे योग्य की अयोग्य याचा तार्किक उहापोह बुद्धिजीवींनी करायचा तितका करावा. पण त्यांच्या दुर्दैवाने एका मुख्य चेहर्‍याभोवतीच सत्ता फिरत असते हे वास्तव नाकारता येत नाही. त्याअर्थी मनुष्याच्या प्राणीप्रेरणा अजून पुसल्या गेलेल्या नाहीत हेच खरे. कळपाचा एक नेता असतो, एका विशिष्ट भागात एखाद्या अल्फा नराची एकहाती सत्ता असते, तसेच माणसातही आहे. जिथे वास्तवात तसा चेहरा सापडत नाही तिथे भूतकाळातले वीर आणून मिरवले जातात. तो ही उपाय पुरेसा नसला तर अनेकदा खर्‍या खोट्या प्रचाराच्या आधारे निर्माण केले जातात. ते ही पुरेसे झाले नाही, तर धार्मिक, पौराणिक ग्रंथातल्या काल्पनिक त्रात्याची आरास मांडली जाते. अशा नेता-केंद्रित सत्तेच्या अधिपत्याखाली लोक खरेच निश्चिंत होतात की चिडीचूप हा वादाचा मुद्दा आहे. पण निदान एका कुठल्या व्यवस्थेनुसार, निदान एका दिशेने गाडं चालू लागतं हे नाकारता येत नाही. त्यात मिळणार्‍या यशाची टक्केवारी ही त्या नेत्याच्या स्वत:च्या आणि त्याने निवडलेल्या सोबत्यांच्या कुवतीवर अवलंबून राहते.

केंद्रात मोदींसमोर उभा करण्यासाठी विरोधकांना चेहरा नाही हे वास्तव आहे. त्यातल्या सर्वात मोठ्या, भाजपविरोधातील एकमेव राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसलाही नाही. ’राहुल गांधी हे मोदींना टक्कर देण्याइतके सक्षम आहेत?’ या वाक्यातले अखेरचे प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. या प्रश्नावर चॅनेल्सच्या चर्चा अनेक शतके चालतील. पण त्यांना बाजूला सारायचे तर कोणता नवा नेता पुढे आणणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. ’कॉंग्रेस पक्षातील अन्य कोणता नेता देशव्यापी प्रभाव राखून आहे?’ या प्रश्नाला आजतरी उत्तर नाही. जे नेते आहेत ते बव्हंशी स्थानिक राजकारण करणारे आहेत. त्यामुळे एकाचा उदय इतर राज्यांतील नेत्यांना न रुचणारा असणार आहे. शिवाय केंद्रातील सत्तेच्या मृगजळापेक्षा, यशाची अधिक शक्यता असलेल्या राज्यातील सत्तेच्या वर्तुळात राहण्याचा त्यांचा कल आहे. इतके पुरेसे नाही म्हणून की काय, प्रत्येक राज्यात अद्याप एका नेत्याचा असा प्रभाव नाही.

महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये एक सोडून तीन-तीन माजी मुख्यमंत्री नांदत आहेत. आणखी एका मुख्यमंत्र्याची पुढची पिढी बाह्या सरसावून सज्ज आहे. अशा वेळी परस्पर रस्सीखेच चालू असताना, यातला कुणीही एक इतरांपेक्षा मोठा होणे अवघड असते. तिथे त्यांच्यापलिकडे आणखी पाचवा नेता या चौघांच्या एकत्रित बळापुढे उभाही राहणे शक्य नाही, आणि हायकमांडने उभा करावा इतके त्यांचे बळ उरलेले नाही.

मोदींच्या बळकट पंजामध्ये विसावलेल्या भाजपला ही समस्या नाही. मोदी सांगतील तो नेता असणार हे त्यांच्या सैनिकांनी निमूट मान्य केले आहे. असे असून, २०१९च्या निवडणुका आणि नंतरच्या सत्तेच्या खेळात चुका करूनही फडणवीस यांचा चेहरा मोदींनी बदललेला नाही हे इथे नमूद केले पाहिजे. एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून आपली ओळख राहावी याची काळजी ते स्वत: आणि त्यांना धार्जिणी माध्यमे कटाक्षाने घेताना दिसतात.

महाराष्ट्रात सारे माजी कॉंग्रेसी मुख्यमंत्री आपापल्या मतदारसंघ, फारतर जिल्ह्याच्या बाहेर फारसे सक्रीय नाहीत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचे नेते म्हणून कुणी ओळखत नाही. विरोधी पक्षात असताना अथवा आज राज्यात सत्तेची भागीदारी असतानाही यांची उपस्थिती कुठेही जाणवत नाही. निवडणुकीच्या तोंडावर ’दोन तुजला दोन मजला’ करत तिकिटांच्या वाटपाचा खेळ खेळायचा इतपतच यांची कुवत शिल्लक राहिलेली दिसते. एरवी सत्तेत नसताना अथवा असतानाही धडाडीने कुठे धावलेले दिसलेले नाहीत.

केंद्रातील हायकमांड अधिक बलवान होती, तेव्हाही विधानसभेच्या एका कालावधीमध्ये किमान दोन मुख्यमंत्री देणार्‍या कॉंग्रेसची आजची स्थिती अन्य राज्यांतही तितकीच वाईट आहे. सध्या मागच्या पिढीचे राज्यातील स्थानिक क्षत्रप त्या-त्या राज्यातील राजकारण हाती ठेवून आहेत. गेहलोत, कमलनाथ, कॅ. अमरिंदरसिंग, भूपिंदर हुडा यांच्या राजकीय दबावाला सोनिया आणि राहुल गांधी झुगारुन देऊ शकले नाहीत, राज्यात आवश्यक तेव्हा नव्या पिढीला पुढे आणू शकले नाहीत. कारण कालबाह्य राजकारण करणार्‍या या जुन्या मुखंडांना बाजूला सारून नव्या दमाचे नेतृत्व पुढे आणावे एवढा त्यांचा वचक उरलेला नाही.

एकुणात कॉंग्रेसींना गांधी घराणे हे केवळ आपला मुखवटा म्हणून किंवा विविध राज्यांतील स्थानिक कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांचे मध्यस्थ म्हणूनच हवे आहे. त्यांनी सत्तेतला वाटा मागू नये असा कॉंग्रेसच्या जुन्या पिढीचा आग्रह दिसतो. सोनिया गांधींचा राजकारणात उदय होत असताना, ’त्या पंतप्रधान झाल्या तर मागच्या ’इच्छुकां’ची पंचाईत होईल’ हे ध्यानात आल्यावर त्यांच्या परदेशी असण्याचा मुद्दा भरपूर गाजवला गेला. त्यात भाजपसारखे विरोधक तर होतेच, पण त्यांना कॉंग्रेसी बड्या इच्छुकांची छुपी सदिच्छाही सोबत होती. त्या मुद्द्यावर तेव्हा कॉंग्रेसशी फारकत घेणार्‍या शरद पवारांना त्यांच्याच नेतृत्वाखालील कॉंग्रेससोबत पुढे दहा वर्षे सत्ता वाटून घेताना तो मुद्दा आड आला नाही. कारण आता सोनिया गांधी पंतप्रधान नव्हे तर केवळ कॉंग्रेसचा ’चेहरा’, त्या पक्षाचे सुकाणू म्हणूनच काम करत होत्या. (आणि एव्हाना त्यांना स्वबळाचा पुरेसा अंदाजही येऊन चुकला होता.)

कॉंग्रेसींना आज तीच अपेक्षा राहुल गांधींकडून आहे. ते एकांड्या शिलेदारासारखे भाजपविरोधात उभे असले, तरी त्यांच्या पक्षातील मागच्या पिढीला कानाआडून येऊन तिखट होऊ शकणारा हा नेता नको आहे. त्यांनी सभा घ्यावात, भाजपकडून होणारी चौफेर टीका झेलावी, त्यांना प्रत्युत्तरे द्यावीत, आरोप सहन करावेत आणि हे सारे करुन सोनियांप्रमाणेच पंतप्रधानपद मात्र अन्य कुणाकडे द्यावे, नि स्वत: केवळ अध्यक्ष म्हणून राहावे असे संकेत हे ज्येष्ठ देताना दिसत आहेत. आपापल्या राज्यात कॉंग्रेस बळकट व्हावी म्हणून राहुल गांधींनी जबाबदारी घ्यावी नि त्या स्थानिक सत्तेचा मलिदा पुन्हा एकवार आपल्या हाती ठेवावा इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.

केंद्रात पक्ष सत्तेवर येतो का, बळकट होतो का याची तितकी फिकीर त्यांना नाही. किंबहुना केंद्र बळकट झाले की आपली गादी गुंडाळून सद्दी संपवण्याची ताकद केंद्रीय नेत्यांना येईल याची भीतीच त्यांना अधिक आहे. म्हणून राहुल गांधी हे ’गांधी’च राहावेत, कॉंग्रेसचे प्रमुख नेते होऊ नयेत असा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्यामुळॆ दहा तोंडांनी भाजपकडून कॉंग्रेसवर नि राहुल गांधींवर होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देण्याची तसदी यांच्यापैकी कुणीही घेताना दिसत नाही. उलट या मार्गे त्यांची राजकीय उंची फार वाढणार नाही याची परस्पर सोय होत असल्याने ते आपापल्या गढ्यांमध्ये उलट निश्चिंत आहेत.

आणि याच कारणाने अनेक ज्येष्ठांनी लिहिलेल्या पत्रांत पुन्हा एकवार ’सामूहिक नेतृत्वा’ची पिपाणी वाजवण्यात आली आहे. थोडक्यात राहुल गांधींनी सेनापती होऊन युद्ध करावे. त्यातून सत्ता हाती आलीच तर त्यांनी दूर व्हावे नि मग आम्ही ’अनुभवी’ लोकांचे मंडळ निर्णयप्रक्रिया ताब्यात घेईल असा याचा अर्थ आहे. कॉंग्रेसच्या राजकारणाचे स्वरुप आता केवळ दरबारी, गढीवरचे उरले आहे याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचे दोन पर्याय संभवतात. पहिला म्हणजे ज्येष्ठांनी मागणी केल्याप्रमाणॆ सामूहिक नेतृत्वाचा. लेखनाच्या सुरुवातीला विशद केल्याप्रमाणॆ नेत्याला नेत्याचाच पर्याय उभा राहू शकतो, तोच लोकांना समजतो हे ध्यानात घेतले आणि कॉंग्रेसी नेत्यांच्या परस्पर सहकार्याचा आणि सहमतीच्या इतिहासाचा विचार केला तर हा पर्याय फारसा फलदायी होईल याची शक्यता फार कमी आहे. दुसरा पर्याय म्हणजे एका चेहरा समोर ठेवून त्याच्या पाठीशी सर्व पक्ष भक्कमपणे उभा करण्याचा. ऐतिहासिक दृष्टीने यात यशाची शक्यता अधिक असली, तरी योग्य चेहर्‍याची उपलब्धता, त्याची निवड आणि तो पर्याय असल्याबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यास आवश्यक असलेले पाठबळ हे कळीचे मुद्दे आहे.

सद्यस्थितीत गांधी घराणॆ नको म्हटले तर देशव्यापी पक्षाला सक्षम असा अन्य नेता कुठला या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर द्यावे लागणार आहे. सध्या चर्चेचे गुर्‍हाळ ’नेता कोण?’ यापेक्षा ’अध्यक्ष कोण?’ या दुय्यम प्रश्नाभोवती फिरते आहे. आणि यात मनमोहन सिंग, मुकुल वासनिक यांच्यासह ए. के. अ‍ॅंटनी यांची नावे आहे. पैकी मनमोहन सिंग याच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे नेतृत्वहीन झालेल्या कॉंग्रेसची सत्ता मोदी-भाजपने हिसकावली हे वास्तव ध्यानात घेता ते पुन्हा एकवार तात्पुरते, जागा भरण्यापुरते अध्यक्ष राहणार आहेत.

थोडक्यात अध्यक्षाचे नाव बदलले तरी सत्तेचे वर्तुळ तेच राहणार हे उघड आहे. अ‍ॅंटनींना अध्यक्ष करणे हे हिंदी भाषक पट्ट्यातील भाजपच्या बळकट सत्तेला उपकारकच ठरणार आहे. त्यांचा चेहरा केवळ केरळपुरता उपयुक्त आहे, एरवी त्यांचे केंद्रातील स्थान गांधी घराण्याचीच कृपा आहे.

केंद्रातील सत्ता गमावून साडेसहा वर्षे झाली. जेमतेम दहा जागा वाढण्यापलिकडे २०१९मध्ये फारशी प्रगती झालेली नाही. दुसरीकडे मोदी-भाजपने आपली सत्ता अधिक बळकटच केली आहे. ज्या राज्यांमधून सत्ता मिळाली तिथे ती टिकवणे अवघड झाले आहे. काही ठिकाणी तोंडाशी आलेला सत्तेचा मागे राहूनही भाजपने लीलया हिरावून नेला आहे. तेव्हा आता ’अध्यक्ष कोण?’ या मर्यादित प्रश्नापलिकडे जाऊन ’नेता कोण?’ या मुख्य प्रश्नाला भिडण्याची गरज आहे. ’चाळीस गेले चार राहिले’च्या स्थितीतले ज्येष्ठ आणि राज्यापुरते स्वार्थ केंद्रित केलेल्या कॉंग्रेसी नेत्यांना याचे भान येण्याची गरज आहे.

अशा वेळी ज्यांच्या बाजूने आणि विरोधात असे दोन तट पडलेले दिसत आहेत, त्या राहुल गांधींसमोर काय पर्याय आहेत हेही पाहावे लागेल. सत्ताबाह्य असल्याचा अपवाद वगळला तर आजची त्यांची स्थिती आणि इंदिरा गांधी यांची सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला असलेली स्थिती बरीचशी सारखी आहे. दोघांचाही संघर्ष मुख्यत: पक्षातील ज्येष्ठांशी आहे. इंदिरा गांधींनी स्वतंत्र चूल मांडून नव्या पिढीला नवा तंबू देऊ केला. मूळ कॉंग्रेसमध्ये राहिलेल्या आणि नेहरु-गांधी घराण्याला अजूनही मुख्य आधार मानणार्‍या काही दुबळ्या मनाच्या नेत्यांच्या आधारे हळूहळू मूळ कॉंग्रेसला क्षीण करत नेऊन जुन्यांची सद्दी त्यांनी संपुष्टात आणली.

आज ते धाडस राहुल गांधी दाखवतील का असा प्रश्न आहे. त्यांना ते जमेल का हा प्रश्न त्या पुढचा. किंवा सध्याच्या कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारुन ते अंतर्गत विरोधकांना प्रसंगी गमावण्याचा, त्यातून कॉंग्रेस दुबळी होण्याचा धोका पत्करुन नेस्तनाबूद करु शकतील. त्यानंतर ते भाजपला टक्कर देऊ शकतील की नाही हे त्यांच्या कुवतीवर अवलंबून राहील. पण निदान वर बसलेल्या ज्येष्ठांनी ज्यांची राजकीय प्रगतीची वाट बंद केली आहे, असे राजकीयदृष्ट्या तरुण नेते त्यांच्यासोबत जातील आणि कदाचित नवी फळी उभी राहील. उलट दिशेने पाहिले यातून वाईटात वाईट इतकेच घडेल की जेमतेम पन्नास खासदार असलेली कॉंग्रेस आणखी खाली घसरेल. त्यांचे नेतृत्व प्रभावहीन ठरून कायमस्वरुपी संपून जाईल. पिढ्यांच्या रस्सीखेचीची सध्याची स्थिती पाहता ही शक्यता आजही आहेच. त्यामुळे गुंतवणुकीच्या भाषेत हा ’हाय-रिस्क हाय-रिटर्न गेम’ खेळण्याचे धाडस ते दाखवतात, की पुन्हा अंतर्गत रस्सीखेचीचेच राजकारण करत कॉंग्रेस रडत-खुरडत चालत राहील, याचा निर्णय पुन्हा राहुल गांधींनाच घ्यावा लागणार आहे.

सामूहिक नेतृत्वाची पिपाणी बलवान नेत्याच्या शंखनादापुढे निष्प्रभ ठरते याला इतिहास साक्षी आहे. राहुल गांधींबरोबरच कॉंग्रेसच्या गढीवर लोडाला टेकून बसलेल्या ज्येष्ठांनाही हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे.

-oOo-

पूर्वप्रसिद्धी: अक्षरनामा’ २६ ऑगस्ट २०२०

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

बुद्धिबळातील मार्शल-आर्ट
चित्रातील बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिल्यावर बहुतेकांच्या मनात  चित्रात दाखवलेल्या माणसाप्रमाणेच  'हा काळी मोहरी असलेला येडाय काय?' असा भाव प्रथमदर्शनी उमटेल. आपला वजीर नि हत्ती दोघेही खुशाल पांढर्‍याच्या प्याद्यांसमोर नि वजीराच्या पट्ट्यात आणून काय आत्महत्या करायची आहे का असा समज होईल.

पण गंमत पहा. हा डाव काळ्याचाच आहे! कसा ते बघा. 

१. आता काळ्याची खेळी असेल तर वजिराने एच-२ प्यादे मारले की डाव संपतो. 

एक पर्याय म्हणजे  घोडा एफ-३ मधे आणला की तरी एका खेळीनंतर डाव संपतो. पांढर्‍याचे जी-२ प्यादे पाठीमागे राजा असल्याने ब्लॉक आहे. राजा फक्त एच-१ मधे जाऊ शकतो. पण काळ्याने हत्ती अथवा वजिराने एच-२ प्यादे मारले की मात होते. 

आणखी एक शक्यता म्हणजे घोडा एफ-३ मध्ये आणून राजाला शह देतानाच पांढर्‍या वजीरावर नेम धरता येतो. काळ्या वजीरामुळे जी-२ प्याद्याला हा घोडा मारता येत नाही.

२. पांढर्‍याची खेळी असेल तर त्याला प्रथम १ मधे उल्लेख केलेल्या तीनही शक्यता बंद कराव्या लागतील. बारकाईने पाहता निव्वळ एफ-३ वर हल्ला करून भागत नाही. मूळ धोकादायक असलेल्या वजीर वा हत्तीला ठारच मारावे लागते. 

किंवा एफ२ मधील प्यादे एक किंवा दोन घरे पुढे सरकवून पांढर्‍या राजासाठी ती जागा मोकळी करुन घेता येईल. पण याचाही उपयोग नाही. कारण घोडा प्रथम ई-२ मध्ये येऊन पांढर्‍या राजाला एच-१ मध्ये जाण्यास भाग पाडेल. मग काळा वजीर किंवा हत्ती एच-२ प्यादे मारुन मात पुरी करेल.

आणखी एक पर्याय म्हणजे एफ-१ मधला पांढरा हत्ती हलवून राजाला एक जागा निर्माण करणॆ. पण याने फारसा फायदा नाही. प्रथम वजीर एच-१ प्यादे मारुन शह देईल. पांढरा राजा एफ-१ मध्ये आला की वजीर एच-१ मध्ये जाऊन मात पुरी करेल.

३. काळ्याचा हत्ती ठार मारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जी-२ प्याद्याने मारणे, पण ते काळ्या वजीराने  ब्लॉक केले आहे. तेव्हा हे शक्य नाही. 

४. वजीर ठार मारायला तीन पर्याय आहेत.

अ. एफ-२ (हत्तीपुढच्या प्याद्याने) ठार मारणे. पण इथे काळ्याला एक सोपी खेळी आहे घोडा ई-२ ->शह. पुन्हा राजाला फक्त एच-१ हीच जागा शिल्लक आहे.  (एफ-२ रिकामी झाली असली तरी तिथे एफ-८ मधील काळ्या हत्तीचा जोर आहे.) तो तिकडे सरकला की काळ्याचा ई-८ मधील हत्ती पांढर्‍याच्या ई-१ हत्तीचा बळी घेऊन बॅक-रँक* मात देतो.  (*राजा शेवटच्या पट्टीत तीन प्याद्याआड अडकून पडला आहे. काळ्याचा हत्ती वा वजिरासारखा सरळ हल्ला करणारा मोहरा तिथे येऊन शह देतो. पांढर्‍याला मध्ये घालण्यास उपलब्ध मोहरा नसल्याने मात होते.)

ब. एच-२ प्याद्याने वजीर मारणे. हा तर सरळ सरळ आत्मघात आहे. कारण आता एच-२ मधल्या काळ्या हत्तीला एच पट्टी आंदण दिल्याने अ. पर्यायातील घोड्याची खेळी सरळ मातच देते.

क. वजीराने ठार मारणे. 
पण यानंतर  काळा पुन्हा तीच घोड्याची खेळी करतो आहे. राजा एच-१ ला गेला की पांढर्‍याचा वजीर पडतो. इथे हत्तीने नव्हे तर पुन्हा घोड्यानेच त्याचा बळी घ्यायचा आहे. यामुळे हत्ती जिथला तिथे राह्तो नि एच-२ प्याद्याला घोडा मारणे शक्य होत नाही.(एफ-२ ने तर नाहीच नाही कारण पुन्हा अ. मधे सांगितल्याप्रमाणे मात होते.) पुन्हा राजा जी-१ मधे सरकतो. 

इथे काळ्याचा घोडा एफ-१ मधल्या पांढर्‍या हत्तीचा बळी घेऊ शकतो, पण त्यातून त्याच्या एच-२ हत्तीचा बळी जाईल. तेव्हा त्यापेक्षा काळा घोडा परत ई-२ मधे येऊन शह देत स्वतःला मोकळा करून घेईल नि त्याचवेळी शह बसल्याने पुढची खेळी हत्तीला वाचवायला मदत करेल. 

किंवा आणखी एक पर्याय म्हणजे आधी एच-३ मधील काळा हत्ती हलवून घोड्याच्या जोरावर एच-५ मध्ये नेऊन सी-५ मध्ये बसलेल्या पांढर्‍या हत्तीला आव्हान देईल. यात एकतर हत्तींची देवाणघेवाण होत काळा घोडा एच-मध्ये सुरक्षित पोचेल, किंवा पांढर्‍याने हत्ती बचावल्यास पुढच्या खेळीत काळा घोडा योग्य त्या ठिकाणी हलवून सुरक्षित करता येईल.

किंवा काळ्या घोड्याने ई-४ मध्ये येऊन सी-५ मधील पांढर्‍या हत्तीवर नेम धरता येईल. पुन्हा एकतर हत्तींची देवाणघेवाण होईल किंवा पांढर्‍या हत्तीने उलट घोड्यावर हल्ला केला तर एच-३ हत्ती मदतीला नेऊन दोघांची एकाच वेळी सोडवणूक करता येईल.

बॅक-रँक मात शक्यता टाळण्यासाठी पांढर्‍याचा मागचा हत्ती फारसा हलू शकत नसल्याने पटावरची स्थिती एक घोडा अधिक असलेल्या काळ्याला अधिकच अनुकूल होऊन जाते.  पांढर्‍याला हाच त्यातल्या त्यात बरा पर्याय उरतो.

इंटरनेट कृपेने शोधाशोध करता हा डाव १९१२ मध्ये खेळला गेला असे दिसते.  काळा वजीर थेट पांढर्‍या वजीराच्या आणि दोन प्याद्यांच्या समोर आणून ठेवणारी मार्शलने केलेली अखेरची खेळी पुढे ’सुवर्णवर्षाव खेळी’ म्हणून ओळखली गेली. या खेळीनंतर काही प्रेक्षकांनी सोन्याची नाणी उधळली अशी दंतकथा सांगण्यात येते. पण खुद्द मार्शलच्या पत्नीने मात्र एक पेनी (सर्वात लहान नाणे) देखील उडवले गेले नसल्याचे सांगितले. पण डच जर्नालिस्ट, लेखक आणि बुद्धिबळ खेळाडू असलेल्या टिम क्रोबेने या खेळीला जगातील पहिल्या तीन बुद्धिमान खेळ्यांमध्ये स्थान दिले आहे.

या सार्‍या शक्यता पाहून पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळणार्‍या लेविट्स्कीने राजीनामा दिला.

---

ज्यांना शक्यतांचा विचार करायला आवडतो, त्याआधारे भविष्याचा वेध घ्यायला नि त्यावर नियंत्रण राखायला आवडते त्यांच्यासाठी बुद्धिबळ हा खेळ खूप काही शिकवू शकतो.  शक्यतांकडे पाहण्याची चिकाटी असली की वरकरणी इतरांना हरता दिसणारा डावही जिंकता येतो. 

ज्यांना मोहर्‍यांचे काळे नि पांढरे रंगच फक्त दिसतात आणि ज्यांच्यात 'भविष्य हे नियत आहे किंवा इतर कुणाच्या हाती आहे' असे समजण्याची शरणागत वृत्ती असते ते खरे दुर्दैवी. त्यांनी आपला पेशन्सचा डाव मांडावा. पत्ते येतील तशी रांग लागेल. चारही रांगा पुर्‍या करता आल्या नाहीत तर  बॅड'लक’ म्हणून पत्ते गोळा करायला मोकळे. 

-oOo- 

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

अक्कल का कुंऑं

(एक जुनी आठवण: संदीप खरे यांच्या कवितेवरील एका स्तंभाच्या निमित्ताने झालेले कवित्व आणि तर्कांचे फवारे. सत्यघटनेवर आधारित.)


१.

आम्ही: लोकसत्ताने 'सकाळ'च्या मुखभंगाची बातमी उथळपणे पहिल्या पानावर छापली. एरवी याहून कितीतरी महत्त्वाच्या बातम्या पूर्ण जाहिरातीच्या पानाआड लपतात.

ते: 'सकाळ'ची बाजू घेऊ नका.

आम्ही: आं? एकावर टीका करणे म्हणजे थेट दुसर्‍याची बाजू घेणे? अमेरिकेचे का हो तुम्ही?


२. 

बातमी: सकाळ'ने आणि संदीप खरेंनी कोलटकरांच्या पत्नी/प्रकाशकाच्या परवानगीविना त्यांची कविता छापली
ते: संदीप हा दुय्यम कवी आहे/त्याला मी कवी मानतच नाही.

आम्ही: आं? म्हणजे फक्त तो कवी असेल तरच त्याला रसग्रहणाची परवानगी असते, परवानगीविना इतरांची कविता छापता येते काय? नसल्यास मूळ बातमीचा नि या प्रतिसादाचा परस्परसंबंध काय?


३. 

शहाणेंचे वकील : संदीप खरे 'चोर' आहे.

ते: संदीपला आम्ही कवी मानतच नाही.

आम्ही: आं? म्हणजे कवी नसलेले सगळे चोर असतात? आफत आहे. मी ही कवी नाही.


४. 

संदीप खरे: जुने विस्मृतीत जाऊ पाहणारे उत्तम साहित्य पुन्हा नव्या वाचकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न होता.

ते: कसलं काय, फुकटात स्वतःला प्रसिद्धी हवी होती फक्त.

आम्ही: आं? म्हणजे आजवर अनेक समीक्षकांनी रसग्रहणात्मक, समीक्षणात्मक, टीकात्मक लिहिले ते ही फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठीच? (यात 'ते' स्वतः देखील आले हे विशेष)

ते: पण त्यांचा अधिकार होता म्हटलं.

आम्ही: मग संदीप खरेंचा नाही हे कुणी ठरवलं?

ते: अर्थात आम्हीच.

आम्ही: आं? (हे ठरवण्याचा अधिकार तुमचा 'हे' कुणी ठरवलं हा प्रश्न विचारण्याचं आम्हाला सुचलंच नाही, पहिल्यापासून ढ'च आम्ही. )


५. 

ते: कॉपिराईट कायदा महत्त्वाचा आहे म्हटलं.

आम्ही: अगदी सहमत.

ते: दोन्हीकडून बोलू नका.

आम्ही: आं? आम्ही कधी नाही म्हणालो? 'संदीप खरेंना चोर म्हणू नका', 'त्यांचा हेतू वाईट म्हणू नका', 'त्यांच्या कविता आम्हाला आवडतात' यातले (अर्थात वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून आलेल्यापैकी) नक्की कुठले वाक्य कॉपिराईट कायद्याला आमचा विरोध आहे वा सकाळ, खरे यांची चूक नाही अशा निष्कर्षाप्रत जाते?

ते: आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अक्कल आहे का?

आम्ही: आं? (आवाज बंद)

-oOo-

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

त्याला खुर्ची आवडते

(कवी सौमित्र यांची क्षमा मागून)


ह्याला खुर्ची आवडते, त्याला खुर्ची आवडते
आघाडीत विसंवाद झाला की मन म्हणते,
’आधीच खुर्ची माझ्यापासून फार दूर नाही,
सत्तेचं ह्याचं गणित खरंच मला कळत नाही.’

खुर्ची म्हणजे ऊब सारी, खुर्ची म्हणजे परिमळ
खुर्चीविना राहायचे म्हणजे व्हायची नुसती परवड
म्हणे- खुर्ची नियत खराब करते, खुर्ची जबाबदारी
पण खुर्चीसोबत मिळते ना चोख जहागिरदारी

खुर्ची करी आपली कामे, खुर्ची म्हणजे सर्व सुखात
गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं केंद्रात.
दरमहा संधी येते, दरमहा असं होतं
खुर्चीवरुन निसटून पडून लोकांमध्ये हसं होतं

हा आवडत नसला तरी खुर्ची त्याला आवडते
ह्याने लवकर सोडावी म्हणून तो ही झगडतो
रूसून मग तो निघून जातो, टीका करतो पत्रांत
ह्याचं त्याचं भांडण असं कोरोनामयी दिवसात.

... मंदार काळे

गुरुवार, १६ जुलै, २०२०

इतिहासाचे अवजड ओझे (’मॅन इन द आयर्न मास्क’च्या निमित्ताने)

पारंपरिक शेती करणारा शेतकरी जमिनीचा पोत राखण्यासाठी आलटून-पालटून पिके घेत असतो. जमिनीतील रसद्रव्ये शोषून घेणारे खादाड पीक घेतल्यानंतर त्याचे पुनर्भरण करणारे दुसरे पीक घेतो. किंवा एक हंगाम तिला विश्रांती देण्यासाठी एखादे दुय्यम पीक घेतो. डोक्याला भरपूर ताप देणारे, विचाराला चालना देणारे, प्रश्नांना व विश्लेषणाला जन्म देणारे पुस्तक वाचून झाल्यावर, चित्रपट वा मालिका पाहून झाल्यावर डोक्याला विश्रांती देण्यासाठी मी ही कार्टून पाहतो. कधीकधी ’आऽणि ते सुखाने नांऽदू लाऽगले’च्या समेवर संपणार आहे याची खात्री आहे अशी गुलगुलीत प्रेमकथा असलेले चित्रपट पाहतो. विपश्यना, ध्यान, स्तोत्रपठण या सर्वच प्रकारात जो काही काळ डोके बंद (आमच्या संगणकाच्या भाषेत फक्त रॅम वापरायची प्रोसेसर नाही.) करण्याचा उद्देश असतो, तोच मी यातून साध्य करतो.

पण हा नेहमीच यशस्वी होतो असे नाही. करमणूक म्हणून वात्रट 'किंग ज्युलियन'च्या करामती पाहताना प्रत्येक एपिसोडमध्ये लेखकांनी आपल्या जगण्याच्या एकेका पैलूवर मार्मिक भाष्य केले आहे असे ध्यानात येते, संगणकपूर्व जमान्यातील डिस्ने चलच्चित्रपटात दिलेला ट्रॉली इफेक्ट किंवा लाईट सोर्स इफेक्ट दिसतो ('स्नोव्हाईट’ मध्ये घाबरलेला बुटका दार उघडून हळूच थरथरत्या हाताने कंदील आत सरकवतो तेव्हा दाराची सावली आणि त्याची स्वत:ची जमिनीवर पडलेली सावलीही तशीच थरथरते) नि मग इतरत्रही असे तपशील शोधण्यासाठी आमचा डोक्यातला प्रोसेसर पुन्हा चालू होतो नि सगळं मुसळ केरात जातं.

’डार्क’ या कालप्रवासावरील एका अत्यंत गुंतागुंतीच्या मालिकेचा अखेरचा सीझन पाहण्याची पूर्वतयारी म्हणून मेंदूचे ’क्युरेटिंग’ करत होतो. ’सीरिज म्हणून बकवास आहे हे आधीच समजल्याने आपले डोके चालू होणार नाही.’ असा विचार करुन छान जुन्या लोकांची गोष्ट-बिष्ट सांगणारी 'व्हर्साय' ही नेटफ्लिक्स वरील मालिका बघितली. नेहमीप्रमाणे आमची गाडी घसरली आणि त्यातील ’मॅन इन द आयर्न मास्क’ या उपकथानकात अडकून पडली.

चौदाव्या लुईने एका माणसाला सुमारे सदतीस वर्षे तुरुंगवासात ठेवले होते. त्याचा चेहरा कायम(?) लोखंडी पिंजर्‍याने जखडलेला होता. ही व्यक्ती कोण हे अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहिले. पण या रहस्याला अनेक फाटे फुटले. वोल्तेअर, अलेक्झांडर दुमास यांच्यासारखा तत्त्वज्ञ आणि लेखकांनी यात उडी घेतली. या दंतकथेमध्ये कुठतरी व्हॅटिकनचा संबंधही सांगितला जातो. त्यामुळे याबाबतचे रोममधे प्रचलित असलेले समज, हॉलंड-नेदरलॅंडसमध्ये प्रचलित असलेल्या वदंता, फ्रान्समध्ये चौदाव्या लुईला ’लुई द ग्रेट’ मानणार्‍यांमध्ये असलेला समज आणि त्याला ’टायरन्ट’ म्हणजे क्रूरकर्मा समजणार्‍या गटामध्ये सांगितली जाणारी कथा... अशी अनेक प्रतिबिंबे दिसून येतात. या सार्‍याचा सांगोपांग वेध घेणार्‍या दोन लेखांचे दुवे खाली दिले आहेत.

यातले कोणते परिपूर्ण नि कोणते भासमान या प्रश्नाचे उत्तर बहुतेक माणसे आपापल्या पूर्वग्रहांनुसारच शोधत असतात. पण ते तसे आहे हे बहुतेकांना मान्यच नसते. कारण एक काहीतरी बरोबर असते नि बाकी सारे चूक, आपल्या गटाला सोयीचे ते बरोबर नि गैरसोयीचे ते चूक अशी त्यांची पक्की खात्री असते. थोडक्यात पर्यायांपैकी एकाच बाजूला ते उभे असल्याने त्यांना त्याच्याकडे तटस्थपणे पाहाणे शक्य होत नसते. पण ज्यात त्यांचा स्वार्थ कुठेही गुंतलेला नाही, असे वरील उदाहरणाप्रमाणे एखादे तटस्थ प्रकरण समोर ठेवले, तर इतिहासाची एकच आवृत्ती तंतोतंत खरी मानणे हा किती मूर्खपणा आहे हे कदाचित समजू शकेल.

ज्या पृथ्वीवर तुम्ही उभे आहात तिचा आकार तुम्हाला पुरा दिसू शकत नाही. मग पायाखालच्या जमिनीला पृथ्वीचे प्रातिनिधिक रूप समजून तुम्ही पृथ्वी सपाट आहे असे समजू लागता. अंतराळात गेलात तर तिचा आकार तुम्हाला पूर्णपणे दिसू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला जमिनीचा आधार सोडावा लागतो. आर्किमीडिज ’मला पृथ्वीबाहेर उभे राहण्यास जागा द्या. मी पृथ्वी उचलून दाखवतो.’ म्हणाला त्याचा ध्वन्यर्थ हा आहे.

पण अशा एखाद-दुसर्‍या कथा/घटना यांबाबतच हे खरे असते असे नाही. एकुणच इतिहास हा रुजवलेलाच असतो. लिखित इतिहास हा एका बाजूने जेत्यांनी लिहिलेला असतो त्यामुळे त्यांना धार्जिणा असतो असा एक समज आहेच. पण दुसरीकडे इतिहासाच्या धर्म, वंश, देश, विभागीय अशा आवृत्त्या असतात. त्यांचा परस्परांना छेद जात असतो. अमका इतिहास खरा आणि तमका इतिहास खोटा हे आपापल्या गटानुसार लोक ठरवत असतात. दलितांमध्ये प्रचलित असलेला, ब्राह्मणांना गैरसोयीचा मौखिक इतिहास खोटा आहे असे ब्राह्मण समजत असतात. त्यांच्याकडे लिखित माध्यमांतून लिहिलेला, त्यांच्या जमातीला सोयीचा इतिहास हाच खरा, असे त्यांचे गृहितक असते. उलट दिशेने आता कोणत्याही अभ्यासाशिवाय, केवळ ब्राह्मणी इतिहास खोडून काढण्यासाठी घरबसल्या लिहून काढलेला इतिहास ’खरा इतिहास’ आहे असे ’मानणारे’ अब्राह्मणी समाजात भरपूर सापडतात. इस्लामचा मूळ पुरुष इस्माईल हा अब्राहमचा अनौरस पुत्र असल्याची कथा ’खरा इतिहास’ मानून ख्रिस्ती नि ज्यू मंडळी त्या धर्माचे दुय्यमत्व- आणि पर्यायाने आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व, सिद्ध होते असे मानतात. इतिहासातील सोयीचा काळ निवडून अमक्या देशातील तमका भूभाग हा आमचाच आहे असा दावा करत एखाद्या देशातील राज्यकर्ते त्यावर बळाने वा अन्य मार्गाने ताबा मिळवू पाहतात.

या ’मॅन इन द आयर्न मास्क’बाबत पाहिले तर व्हॅटिकन आणि हॉलंड, ऑस्ट्रियाच्या राज्यकर्त्यांनी धूसरतेवर आपल्या स्वार्थाचा रंग चढवून प्रसारित केलेल्या आवृत्त्या, वास्तवाच्या जवळ जाऊन अनुभवसिद्ध असल्याचा दावा केलेली, पण तरीही परमुखे ऐकलेलीच अशी वोल्तेअरची आवृत्ती, लेखकाचे स्वातंत्र्य अंतर्भूत असलेली अलेक्झांडर दुमासची आवृत्ती, पुढे याच नावाच्या चित्रपटातून दिसलेली अन्य एक ललित आवृत्ती... या पलिकडे तपशीलांचे फरक दाखवणार्‍या कदाचित असंख्य मौखित आवृत्त्या... कोणती खरी, नि कोणती खोटी याचा निवाडा वस्तुनिष्ठपणे करणे अशक्यच. विचाराने आळशी असलेले लोक, स्वार्थानुकूल किंवा ’खरी असावी असे वाटते’ म्हणून आहेच असे मानून पुढे जातात.

एकुण इतिहासाबाबतही हे तितकेच खरे आहे. असे असले तरी ऐतिहासिक पात्रांचे हीरो होतात, सैतान होतात, लेखणीच्या फटकार्‍यासरशी अपयशाच्या कथा देदिप्यमान विजयात रूपांतरित करुन रुजवल्या जातात, तुम्हाला आजवर शिकवलेला इतिहास खोटा आहे असे म्हणत नवे राज्यकर्ते, नव्याने बळ मिळालेले समाजघटक आपल्या सोयीचा नवा इतिहास ’खरा’ म्हणून शिकवू लागतात. या उलथापालथीमध्ये अतिशय सातत्य आहे.

वाईट इतकेच की एखादा देश त्या इतिहासाच्या कर्दमात रुतून बसतो. आपल्या यशाच्या कहाण्या इतिहासात शोधतो. त्यातल्या खर्‍या खोट्या मुद्द्यांवर त्या देशातील लोक एकमेकांची डोकी फोडतात. आमच्या नेत्याला चार पदव्या लावण्याऐवजी तीनच पदव्या लावून तुम्ही आमच्या समाजाचा अपमान केला आहे म्हणून गल्लीतल्या टिनपाट ब्रिगेड, संघटना, सेना यांचा सडकछाप नेता तावातावाने एखाद्या अभ्यासू लेखकाला शिव्या घालतो, त्याच्या लेखनावर बंदी घालण्याची मागणी करतो. लेखकाला दोन मिनिटाचे फुटेज न देणारी चॅनेल्स नि वृत्तपत्रे या सडकछाप नेत्याची वक्तव्ये पुन्हा पुन्हा दाखवून या निमित्ताने समाजात कलागत लावून पुढच्या काही दिवसांची टीआरपीची बेगमी करु पाहतात. भूतकालभोगी, आळशी, निर्मितीक्षमतेला शून्य किंमत देणार्‍या समाजाचे हे चित्र आहे.

इतिहास हा केवळ दृष्टीकोन असतो. अगदी अभ्यासकाने अभ्याससिद्ध म्हटलेला इतिहासातही त्याच्या स्वत:च्या दृष्टिकोनांचे, निवडलेल्या चौकटींचे, तो ज्या समाजगटाचे प्रातिनिधित्व करतो त्या गटाच्या हिताचे रंग मिसळलेले असतातच. इतिहास हा खरा किंवा खोटा नसतोच. तो फक्त सोयीचा वा गैरसोयीचा असतो इतकेच!

इतिहासातून प्रेरणा वगैरे मिळते हे बनेल दावे आहेत; त्याभोवती आपल्या स्वार्थाचे उत्सव, मतपेटीची गणिते जमवू पाहणार्‍यांनी रुजवलेले. अक्षरश: अगणित पुतळे नि स्मारके उभारणे, ’खरा इतिहास कुठला नि खोटा कुठला’ प्रकारच्या वांझोट्या लढाया गल्लीबोळातल्या अर्ध्या चड्डीतल्या पोराटोरांनी लढवत जातीय नि धार्मिक अस्मितांच्या कर्णकटू पिपाण्या वाजवणे एवढेच साधले आहे. यापलिकडे इतिहासाने या देशात काहीही निर्माण केलेले नाही.

त्यामुळे आपल्या भूतकालभोगी देशाला इतिहासाच्या चिखलातून बाहेर काढून, आपल्या पुढच्या पिढीला रचनात्मक, निर्मितीक्षम कामाकडे  वळवायचे असेल, तर शालेय अभ्यासक्रमातून इतिहास हा विषय वगळला पाहिजे. मुले सज्ञान झाल्यावर, विचाराची किमान पातळी विकसित झाल्यावर, महाविद्यालयातच इतिहासाचे शिक्षण दिले, तर शालेय जीवनात मेंदूत इतिहासज्वर चढून बसल्याने वास्तविक जगाला त्या दूषित दृष्टीने पाहून लागलेल्या मुलांचा बुद्धिभ्रंश काही प्रमाणात तरी कमी होईल. आणि इतिहासाचे अवजड ओझे वागवत चिणून पडलेली तरुणांची क्रिएटिव्हिटी, निर्मितीक्षमता जरा मोकळा श्वास घेऊन भविष्याचा वेध घेऊ शकेल.

-oOo-

1. Versailles: What is the true story of the Man in the Iron Mask?

2. Who Was the Real Man in the Iron Mask? (National Geographic)


शनिवार, ११ जुलै, २०२०

कला, कलाकार आणि माध्यमे


How I Make a Living with MUSIC!:

दोन-एक आठवड्यांपूर्वी यू-ट्यूवबर एक चलच्चित्र लघुपट (Animation short-film) पाहात होतो. सोबत डिस्ने स्टुडिओजच्या ’मोआना’ या चित्रपटातील एका गाण्याची शिफारस दिसली. टेलर डेव्हिस नावाच्या एका कलाकाराने हे गाणे व्हायलिनवर वाजवलेले होते. कारोलिना प्रोशेंको या छोटीमुळे मी नुकतेच व्हायलिनवर वाजवलेली गाणी ऐकू लागलो होतो. त्यामुळे साहजिकच हे गाणेही ऐकले... पाहिलेही!

कारोलिनाचे सादरीकरण प्रामुख्याने पथ-प्रदर्शन (किंवा पथ-सादरीकरण) स्वरुपात होते. तिची अंगभूत लय वगळता त्यात सादरीकरणाची दृश्य बाजू नाही. तंत्राचा वापरही नाही. पण टेलरचे वादन हे केवळ वादन नव्हते, तर तंत्राचा पुरेपूर वापर करुन केलेले आखीव सादरीकरण होते. पुढे तिची आणखी काही गाणी ऐकली नि पाहिली. प्रत्येक गाण्यासाठी एक पार्श्वभूमी, विशिष्ट वेशभूषा यांची निवड होती. त्याशिवाय दृश्य रेकॉर्डिंग आणि संपादन तंत्राचा पुरेपूर वापरही होता. एका वैय्यक्तिक (सोलो) सादरीकरणाला अशी तांत्रिक अंगाची जोड देऊन श्राव्य अंगाबरोबर दृश्य अंगाची जोडही दिलेली होती.

पण गायनाला सादरीकरणाची जोड पाश्चात्त्य संगीतात काही नवीन नाही. बहुतेक प्रसिद्ध गायक त्यांचे सादरीकरण हे स्टेज-शोजच्या माध्यमांतूनच करत आले आहेत. त्यामुळे त्यांना गायकांना गाण्याबरोबर सादरीकरणाकडेही लक्ष द्यावे लागते. त्यांना नृत्य-दिग्दर्शकाची सोबत लागते, नेपथ्य लागते, झगमगते दिवे, नाट्यमय प्रवेश वगैरे क्लृप्त्या लढवाव्या लागतात. एकुणात सारा नटवा मामला असतो. पण इथे फरक आहे तो माध्यमांचा. प्रत्यक्ष सादरीकरणापेक्षाही दृश्य माध्यमांतून जाण्याचा, आणि निवडलेल्या माध्यमांचे नवे आयाम ध्यानांत घेऊन सादरीकरणाला नवे वळण देण्याचा.

हे पाहात असताना दहा-एक वर्षांपूर्वी पाहिलेल्या ’Jota de Saura’ (English title: Beyond Flamenco) या चित्रपटाची आठवण झाली. कार्लोस सॉरा अतारेस या स्पॅनिश दिग्दर्शकाने ’जोटा’ या स्पेनमधील पारंपरिक संगीत-नृत्याला दृश्य माध्यमांच्या आयामांची जोड दिलेली होती. चालू असलेल्या नृत्याचे पडद्यावर प्रक्षेपण, त्यासाठी नृत्यकलाकारांभोवती वापरलेले पडदे, त्यांच्यावर प्रक्षेपित होणार्‍या दृश्यांची संगती, विसंगती तसंच प्रक्षेपणाच्या वेगातील आणि काळातील फरक, दिव्यांचा चित्रपटीय अथवा नाटकाच्या पद्धतीचा वापर, आणि मुख्य म्हणजे कॅमेर्‍यांची सर्वस्वी नवी भाषा, या सार्‍यांच्या मिलाफातून त्या नृत्याला अनेक नव्या आयामांसह सादर करुन एक अलौकिक अनुभव समोर ठेवला होता. ज्याचे वर्गीकरण ’माहितीपट’ असे केले गेले असले तरी मला ते सयुक्तिक वाटले नाही. ही फिल्म कथाप्रधान नाही त्यामुळे रूढार्थाने हा चित्रपट नाही. तसेच माहिती देण्याच्या दृष्टीने न बनवल्याने, निवेदनाचाच काय शब्दांचाही वापर नसल्याने माहितीपटही नाही. कथा नसलेला, पण पटकथा असलेला असा अपवादात्मक चित्रपटच म्हणायला हवा. (याने त्यापूर्वी फ्लामेंको या प्रसिद्ध नृत्यप्रकारावर दोन आणि फार्दोस, आयबेरिया या प्रकारावरही असे ’माहितीपट’ बनवले होते.) पण हा झाला नृत्याला दृश्य माध्यमांत नेण्याचा, नवे आयाम देण्याचा प्रयोग. गाडी वळवून परत डेव्हिस आणि वैय्यक्तिक सादरीकरणाकडे नेतो.

फार पूर्वी वाचलेल्या कार्व्हरच्या चरित्रामध्ये त्याचे एक वाक्य मनात रुतून बसले होते, ते द्रष्टेपणाचे होते असे मला लगेचच जाणवू लागले. त्याच्या टस्कगी इन्स्टिट्यूटमधील रस्त्याची जागा बदलण्याबाबत ते म्हणाले होते, ’लोक आपला रस्ता सोडत नसतात. त्यांनी आपल्या रस्त्याने जावे असे वाटत असेल तर आपला रस्ताच त्यांच्या पायाखाली सरकवावा लागतो.’ किंवा असे म्हणू या की, ’आता महंमद पर्वताकडे येत नसतात, पर्वतालाच महंमदाकडे जावे लागते. आता रसिक राजा आहे. It's a buyer's market! तो कार्यक्रमासाठी थिएटरमध्ये येण्याची तसदी घेत नाही, त्याच्यासमोर आलेल्या पर्यायातून तो निवड करतो. याचसाठी नव्या व्यवस्थेत कलेआधी कलाकारच रसिकांपर्यंत पोचतो आहे!

पथ-प्रदर्शनाच्या माध्यमातून कारोलिन जशी थेट स्वत:च प्रेक्षकांसमोर जाऊन उभी राहते, त्याचप्रमाणे टेलर डेव्हिस ही यू-ट्यूब, पेट्रिऑन यांसारख्या माध्यमांतून तिच्या कलेला अपेक्षित श्रोत्या/प्रेक्षकांपर्यंत पोचते आहे. वास्तविक पथ-प्रदर्शन हा काही अलीकडचा शोध नव्हे. ज्यांना स्ट्रगलर्स म्हटले जाते असे उदयोन्मुख कलाकार सुरुवातीच्या धडपडीच्या काळात या तंत्राचा वापर अनेक दशके करत आले आहेत. परंतु बर्‍यापैकी प्रस्थापित होऊनही त्या प्रकाराला सोडचिठ्ठी न देणे आता दिसू लागले आहे. कारण भांडवलशाही व्यवस्थेत पर्यायांचा मारा व्याप्तीने नि वेगाने इतका मोठा असतो की ’नजरेआडचा कानाआड’ (’Out of sight is out of mind’) या न्यायाने तुम्ही सोडलेली जागा इतर कुणी बळकावून, वर त्याआधारे पुन्हा तुमच्या वरच्या पायरीला धडका देण्यास सुरुवात करु शकतो. त्यामुळे विक्रेत्याच्या भूमिकेतील कलाकाराला सतत अपेक्षित ग्राहकाच्या (इथे श्रोते/प्रेक्षक) समोर राहणे आवश्यक ठरते.

माझा स्वत:चा भर माझे लेखन वा विचार शब्दांमधून व्यक्त करुन ब्लॉगमार्फत सादर करण्याकडे आहे. परंतु फेसबुकसारख्या समाज-माध्यमांत लिहिलेल्या फुटकळ पोस्टला जेवढा वाचक असतो, त्याच्या दशांशाने अभ्यासपूर्वक लिहिलेल्या ब्लॉग-पोस्टला नसतो. कारण पुन्हा तेच. वाचक तुमच्या ब्लॉगकडे यायची तसदी घेत नसतात. तुमचा ब्लॉगच तुम्हाला त्यांच्या डोळ्यांसमोर सरकवावा लागतो. पथ-प्रदर्शन, यू-ट्यूब चॅनेल्स यांच्यामार्फत कारोलिना आणि टेलर नेमके हेच साधत असतात. ज्यांना ही तंत्रे अवगत नसतात, त्यांची गुणवत्ता सादरकर्त्यांहून सरस असली तरीही ’विकली’ जात नाही. ’बोलणार्‍याची माती विकली जाते, न बोलणार्‍याचे सोनेही विकले जात नाही’ ही म्हण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये तंतोतंत अनुभवण्यास मिळते ती अशी.

ज्याप्रमाणे सिनेमा म्हणजे कॅमेर्‍यातून पाहिलेले नाटक नव्हे, त्याचप्रमाणे डिजिटल माध्यमांतले सादरीकरण म्हणजे सादर केलेल्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड करणे नव्हे. माध्यमबदलाचे भान राखणे हे यात अत्यंत महत्वाचे ठरते. त्याचे स्वत:चे असे जे आयाम आहेत ते ध्यानात घेऊनच कलाकाराला तिथे शिरकाव करुन घ्यावा लागतो.

मराठीमध्ये ’भारतीय डिजिटल पार्टी’ अर्थात भाडिपा हे एक चटकन नजरेत येणारे उदाहरण. मुळात मराठी नाट्यक्षेत्रातील तरुण मंडळींनी हे माध्यम आपलेसे केले. हे करत असताना नाटकाचा प्रेक्षक आणि यू-ट्यूबवरचा प्रेक्षक आणि मुख्य म्हणजे व्याप्ती यांत असलेला फरक याचे भान त्यांनी राखले आहे. त्यामुळे त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवरचे कार्यक्रम आणि नाटकांच्या वर्ण्यविषयांत चांगलाच फरक आहे. आमच्या मित्रांपैकी अनेक ’रसिक’ मित्र त्यांच्या या चॅनेलवरील कार्यक्रमांबाबत नाराजी व्यक्त करतात. पण जे भाडिपावाल्यांना समजले ते त्यांना समजले नसावे, किंवा समजूनही ’माझेच खरे’ या दुराग्रहापासून त्यांना दूर जाता येत नसावे. भाडिपाच्या मंडळींनी डिजिटल माध्यम हा टीआरपीचा खेळ असतो हे पुरेपूर ओळखलेले दिसते. त्यामुळे रसिक म्हणून मिरवणार्‍या मर्यादित वर्तुळाबाहेरही आपल्याला पोहोचावे लागणार आहे याचे भान त्यांना असावे. त्यासाठी विषयांमध्ये सुलभता आणत प्रेक्षकवर्गाची व्याप्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्याचसोबत टीव्ही चॅनेल्समध्ये असलेले ’एम्बेडेड मार्केटिंग’चे (कार्यक्रमातच एखाद्या उत्पादनाची जाहिरात सरकवून देणे) तंत्र वापरुन जाहिरातीमार्फत आर्थिक लाभाचा एक स्रोत त्यांनी निर्माण केला आहे.

पण भाडिपाचे कार्यक्रम हे सामूहिक सादरीकरण आहे. भारतात हिंदी आणि इंग्रजी विनोदवीरांनी डिजिटल माध्यमांचा बर्‍यापैकी वापर केलेला दिसतो. (ध्रुव राठीसारख्याने तर एक समकालीन घडामोडींचा एक विश्लेषक आणि भाष्यकार म्हणून इथे आपले स्वतंत्र स्थानच निर्माण केले आहे.) पण मराठी कलाक्षेत्रात याची जाणीव कितपत रुजली आहे? या प्रश्नाचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नाही.

एरवी मराठी जगात चित्रपट संगीतांवर आधारित कार्यक्रम होतात, गझलगायनाचे कार्यक्रम होतात. यात खरेतर एकदा पार्श्वसंगीत बसवले की ते वाजवणारे कलाकार प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहण्याची आवश्यकता नसते. कराओके तंत्राचा वापर करुन त्या संगीताचा वापर करुन एकटा गायक आपला कार्यक्रम सादर करु शकतो. पण एखादा गजलगायक असा कार्यक्रम कधी करताना दिसत नाही. रागसंगीतातही अनेक गायक इलेक्ट्रॉनिक तानपुरा अथवा मोबाईलवरील त्याचे अ‍ॅप वापरतात. परंतु तरीदेखील मागे तानपुरा घेऊन त्यांचे विद्यार्थी बसतात. पण ते त्या विद्यार्थ्यांना मैफलीचा सराव व्हावा म्हणून. पण ते अपरिहार्य नाही. तसेच इलेक्ट्रॉनिक तालमाला अथवा अ‍ॅप वापरुन तबलजीच्या साथीविना एकटा गायक गाणे सादर करु शकतो. असा प्रयोग फारसा होताना दिसत नाही. सुमारे दशकभरापूर्वी हजारभर कार्यक्रम झालेल्या ’आयुष्यावर बोलू काही’ या संदीप-सलील द्वयींच्या कवितेवरील कार्यक्रमाचा एक ठळक अपवाद. कोणत्याही साथसंगतीखेरीज, आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या पार्श्वसंगीताचा वापर करून ते दोघेच हा कार्यक्रम सादर करीत असत. हे तंत्र पुढे फारसे कुणी प्रचलित केले नाही. हे जमले, तर कारोलिन अथवा डेव्हिसप्रमाणे या गायक/वादक कलाकारांना स्वतंत्रपणे नवी माध्यमे, व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीरपणे वापरणे सुलभ होईल असा माझा होरा आहे. आपल्याकडे काही प्रमाणात हौशी कवितावाचकांनी, अगदी स्वान्त सुखाय स्वरुपाचे गाणार्‍या गायकांनी वा वादकांनी यू-ट्यूब चॅनेल वगैरेंचा वापर केला असला तरी त्याचा चोख व्यावसायिक वापर अजूनही बराच दूर आहे. (सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे जाहीर कार्यक्रम बंद झाल्याने काही कलाकारांनी डिजिटल व्यासपीठांकडे मोर्चा वळवलेला असला तरी तो तात्कालिक आणि ’सिनेमा म्हणजे चित्रित नाटक’ या दृष्टीकोनाप्रमाणेच जाही कार्यक्रमाचे कॅमेर्‍यामार्फत प्रक्षेपण इतक्या माफक विचाराने केलेला आहे. )

पण या तंत्राचा नकारात्मक परिणाम म्हणजे सहकलाकारांची आवश्यकता संपुष्टात येते. यातून सुटे झालेले पेटी किंवा संवादिनीवादक स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम करु शकत असले तरी त्यांचे प्रमाणही नगण्यच आहे. पूर्वी गोविंदराव पटवर्धन, नंतर अप्पा जळगांवकर आणि अलिकडे डॉ. अरविंद थत्ते वगळले तर इतर कुणाचे स्वतंत्र पेटीवादनाचे फार कार्यक्रम झाल्याचे दिसत नाही. त्याहून वाईट परिस्थिती असेल तरी तबला अथवा एकुणच तालवाद्य वादकांची. झाकीर हुसेन यांच्यासारखा जागतिक कीर्तिचा तबलावादक, अनिंदो चॅटर्जींसारखे आणखी एक-दोघे यातच ही यादीही संपेल. तंतुवाद्ये, संवादिनी सारखी वाद्ये जी गायनाशी संगत करतात, त्यांना तेच सादरीकरण स्वतंत्रणे करण्याचा पर्याय आहे. ते कारोलिनप्रमाणे अथवा टेलर डेव्हिसप्रमाणे नवी व्यासपीठे शोधून आपली कला रसिकांपर्यंत पोचवू शकतील. पण तालवाद्यांना निव्वळ माध्यम नव्हे तर सादरीकरणाचेच नवे आयाम शोधावे लागणार आहेत. ते कुठले असतील हे आजतरी अंदाज करता येण्याजोगे नाहीत.

पण त्यासाठी कलाकारांनी आपल्या मानसिक चौकटीतून, बंदिस्त विचारातून बाहेर यायची तयारी ठेवायला हवी. केवळ वैयक्तिक कलेला नवे माध्यम अशा दृष्टीने न पाहता, नव्या माध्यमाच्या नव्या संधींकडेही लक्ष द्यायला हवे. टेलर डेव्हिसने वापरलेले परस्पर-सहकार्याचे, त्रयस्थ व्यासपीठाचा वापर करण्याचे तंत्र, सहकलाकारांशिवाय वैय्यक्तिक सादरीकरणाचे आत्मसात केलेले तंत्र (ज्यातून प्रयोग सुटसुटीत होऊन मर्यादित अवाकाशात, फारशा नेपथ्याशिवाय सहजपणे सादर करता येऊ शकेल) नव्या दर्जेदार पण वाहून नेण्यास सोप्या कॅमेर्‍यांचा वापर, उच्च-तांत्रिक स्टुडिओंवर अवलंबून न राहता संगणकावर सहज वापरता येण्याजोग्या एडिटिंग संगणक-प्रणालींचा वापर यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केले तर हे शक्य आहे.

पण नुसते माध्यम निवडून काम झाले असे म्हणता येत नाही. त्यातून आर्थिक प्राप्तचे मार्गही शोधणे गरजेचे आहे. टेलर डेव्हिसच्या चॅनेलवर या दृष्टीने उपयुक्त असे दोन व्हिडिओ सापडले. (पैकी पहिला लेखाच्या सुरुवातीला दिला आहे. तर दुसरा शेवटी.) पहिल्यामध्ये तिने आपण या माध्यमांतून पैसे कसे मिळवतो याची कल्पना दिली आहे. तर दुसर्‍यामध्ये पॅट्रिऑन सारख्या व्यासपीठांच्या मार्फत आपल्या कलेला रसिकांपर्यंत पोहोचवून अर्थप्राप्तीचा स्रोत कसा निर्माण करता येतो याची माहिती दिली आहे. या दोन पलिकडे डिजिटल माध्यमांनी अनेक पर्याय निर्माण केले आहेत. इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट, साऊंडक्लाऊड सारख्या शेअरिंग साईट्स वगैरे अनेक व्यासपीठे कलाकारांना उपलब्ध झाली आहेत. त्यांचाही वापर करुन कलाकार आपल्या कलेला प्रेक्षक अथवा श्रोते आणि अर्थप्राप्तीचा स्रोत निर्माण करु शकतो.

टेलर डेव्हिसच्या अनुभवातून तांत्रिक बाजूचे महत्व अधोरेखित होते तर दुसरीकडे कारोलिनच्या माध्यमांतून त्या माध्यमांचे सार्वजनिक असणॆ, किमान खर्चिक असणे. नाट्यगृह अथवा एखादे सभागृह भाड्याने घेऊन त्यात कार्यक्रम सादर करणे हे खर्चिक काम आहे. ते बहुतेक सामान्य कलाकाराच्या आवाक्याबाहेर जाते. त्यात पुन्हा सहकलाकार असतील तर सारा आतबट्ट्याच्या व्यवहार होतो. याउलट कारोलिनाला उपलब्ध असलेल्या ’नाक्यावरील सादरीकरणा’चा पर्याय जर उपलब्ध करुन दिला तर कलाकारांची मोठी सोय होईल. आठवड्यात एका दिवशी कमी वर्दळीचे पण बाजारपेठेलगतचे काही रस्ते जर नो-ड्राईव्ह झोन म्हणून जाहीर केले तर तिथे कलाकारांना आपली कला सादर करता येऊ शकेल. इथे कार्यक्रम-पूर्व आर्थिक गुंतवणूक नगण्य असल्याने प्राप्ती फारशी झाली नाही, तरी प्रत्यक्ष आर्थिक नुकसानही मर्यादित राही. (आणि रस्त्यावर गाणारा फक्त भिकारीच असतो हा भिकार समजही पुसता येईल.) नाट्यगृहांसाठी आग्रह धरण्यापेक्षा कलाकारांच्या संघटनेने अशा नुक्कड-कलाकारीला उपयुक्त जागांची मागणी केली तर तरी सर्वांच्या दृष्टीने सोयीची तर होईलच, पण नाट्यगृहांमध्ये होणारी बुकिंगमधील ’घराणेशाही’देखील टाळता येईल. (अर्थात तोच प्रकार पुढे सोयीच्या दिवशी, मोक्याच्या जागांसाठी होऊ शकेल कदाचित. पण तो टाळण्याचे उपायही योजून ठेवावे लागतील.)

टेलर डेव्हिस आणि कारोलिना या काही विशेष नव्हेत की त्यांच्या क्षेत्रातील दिग्गजही. पण अकरा वर्षांच्या कारोलिनने आजवर दोनशेहून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत, तर टेलर ही पहिल्या दहा कव्हर आर्टिस्टसमध्ये गणली जाते. त्यांची उदाहरणे ही केवळ माझ्यासमोर आली म्हणून ती घेतली इतकेच. इतर कलाकार आणखी काही पर्यायही वापरत असावेत. हे लिहून होईतो नवे काही निर्माणही झाले असतील. कारण या ० आणि १ ने सुरुवात केलेल्या माध्यमाचा वेग, पल्ला आणि उपयुक्तता अमर्याद आहे.

-oOo-

Patreon Video - Taylor Davis

गुरुवार, ९ जुलै, २०२०

खुनी सुरा

भरचौकात एका सुर्‍याने
एका माणसाची हत्या केली
पोलिसाच्या हाताने मग
त्या सुर्‍याला अटक केली.

सुरा धरणारा हात म्हणे,
’खून करणारा सुराच,
त्याच्यावर माझे काहीच
नियंत्रण राहिले नाही*.’

कलम धरलेल्या हाताने
सुरा धरलेल्या हाताचा
युक्तिवाद मान्य करत
त्याला निर्दोष मुक्त केला.

दशकांनंतर निकाल आला
सुरा संपूर्ण दोषी ठरला
’मरेपर्यंत वितळवण्याची
शिक्षा हवी’ जमाव गर्जला.

’असे समाजविघातक सुरे
अशांतीचे दूत असतात.’
म्हणत कलमवाल्या हाताने
त्यावर शिक्का उमटवला.

सुर्‍याच्या शिक्षेसाठी मग
सुरा बनवणारा हात आला
’नव्यांसाठी हा कच्चा माल’
म्हणून जुना घेऊन गेला

समारंभपूर्वक त्याने मग
सुरा भट्टीत झोकून दिला
’शांतिदूत हा’ बघ्यांनी-
त्यावर पुष्पवर्षाव केला

वितळल्या सुर्‍यांमधून
अनेक नवे तयार केले.
सुरा धरणार्‍या हातांनी,
मोल मोजून घरी नेले.

त्या सुर्‍याचे रक्त आता
नव्यांमधून वाहात आहे
सुरा धरणारे हात मात्र
त्यामुळे निश्चिंत आहेत.

- मंदार काळे

*भारतात एका अतिशय गाजलेल्या खटल्यातील युक्तिवाद.

(प्रेरणा:  कुसुमाग्रजांची ’खुनशी सुरे’ ही कविता)

शनिवार, ४ जुलै, २०२०

मी एक मध्यमवर्गीय पुरोगामी(?)

संघ-भाजपने मुस्लिम/कॉंग्रेसने (सामाजिक/राजकीय) देशाचं/धर्माचं वाटोळं केलं म्हणायचं, ब्राह्मणांनी दलितांच्या आरक्षणाच्या नावे बेंबीच्या देठापासून बोंब मारायची, दलित विचारवंत म्हणवणार्‍यांनी सगळ्या सामाजिक समस्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेमुळे आहेत म्हणायचे, पुस्तकी-फेमिनिस्टांना सगळे काही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाप दिसते, कम्युनिस्ट संघाची वाढ हा समाजवाद्यांचा गुन्हा म्हणून पाच मैलाचा लेख लिहितात... आणि  ’स्त्री जात तेवढी निमकहराम’ म्हणणार्‍या 'पुण्यप्रभाव’मधल्या सुदामसारखे यच्चयावत पुरोगामी ’मध्यमवर्ग तेवढा निमकहराम’चा जप करत असतात.

डावी असोत वा उजवी, माणसं शत्रूलक्ष्यी मांडणीच्या मानसिकतेतून बाहेरच यायला तयार नाहीत. मूळ व्याधीचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधण्याऐवजी हा जो खापरफोडेपणा सर्वव्यापी झाला आहे, तीच आपल्या समाजाच्या प्रगतीमधील प्रचंड मोठी धोंड आहे असे मी मानतो.

पुरोगाम्यांच्या उठसूठ मध्यमवर्गीयांच्या नावे खडे फोडण्याला कंटाळून मी अनेक गटांपासून दूर झालो. बरं शिंचे हे ’मध्यमवर्गीय’ म्हणताना नक्की कुठला गट वा वर्ग हे प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे असते. त्या वर्गाच्या नावे शंख करणार्‍या चार-पाच पुरोगाम्यांना ’मध्यमवर्गीय म्हणजे नक्की कोण रे?’ असा प्रश्न विचारुन जरा खोलात नेण्याचा प्रयत्न केला. बहुतेकांना कुणीतरी ’ते’ लोक इतकेच समजले आहे असे दिसते.

छानपैकी फ्लॅट, गाडी वगैरे बाळगणारे, मुलांना उत्तम विद्यापीठात शिकवणारे मध्यमवर्गीयांच्या नावे शंख करताना पाहून हसायला येते. अरे बाळा, इतरांचे सोड. किमान तू तरी बाहेर पड की यातून. कम्युनिस्टांचे ते डी-क्लास का काय म्हणतात ते होऊन मग बोल. उगा लोहिया वा मार्क्सची जपमाळ ओढून त्यातून बाहेर पडल्याचा आव कशाला? कदाचित सगळ्यांनी एकसमयावच्छेदेकरुन (हा सावरकरांचा, पुरोगाम्यांच्या सैतानाचा लाडका शब्द बरं का... आणि हो ते ही शिंचे मध्यमवर्गीय. :) ) मध्यमवर्गीय होणे ही डी-क्लास होण्याची नवी व्याख्या असावी.

एका डाव्या पत्रकाराने मजेशीर पळवाट काढली. ती म्हणे, ’अरे मध्यमवर्गीय असणे ही मानसिकता आहे. आर्थिक स्थितीचा काही संबंध नाही.’ हे म्हणजे ’तुमची खरी श्रद्धा असेल तर फळ मिळेल, अन्यथा फळ मिळत नाही’ टाईपचे आर्ग्युमेंट झाले. कारण यात तुम्हाला फळ मिळाले नाही की खरी श्रद्धा नाही असे जाहीर करण्याची सोय आहे. (एक आवाज: रमताराम, तुम्ही पाखंडी आहात. टीप: पाखंड शब्दाचा हा चुकीचा वापर आहे, पण सश्रद्ध म्हणवणारे तो तसाच वापरतात. ) आधी ब्राह्मणांच्या नावे दोषारोप करुन मुद्दा अंगाशी आल्यावर ’मी ब्राह्मणांबद्दल नव्हे, ब्राह्मण्यवादी मानसिकतेबद्दल बोलत होतो.’ म्हणून शेपूट सोडवण्यासारखे आहे. (एक आवाज: रमताराम मनुवादी आहेत) किंवा ’संघ प्रामाणिकपणे समजावून घेतलात तर तुम्हाला समजेल’ म्हणत, जोवर तुम्ही संघ श्रेष्ठ म्हणत नाही तोवर तुमचे प्रयत्न प्रामाणिक नाहीत असे म्हणण्याची सोय करून ठेवली आहे. (एक आवाज: रमताराम अर्बन नक्षलवादी आहेत.) विधानातच, व्याख्येतच मेख मारुन कार्यकारणभाव हा वर्तुळाकृती तर्कात बांधून टाकलेला असतो.

पु.ग. सहस्रबुद्धे (हे उजवे राष्ट्रवादी विचारवंत, अर्थात विचारवंतात उजवे असूच शकत नाहीत असे समज असणारे सो-कॉल्ड डावे त्यांना तसे मानणार नाही हा मुद्दा अलाहिदा) यांच्या 'नरोटीची उपासना’ या लेखाची मला राहून राहून आठवण होते. चितोड स्वतंत्र होईतो गवतावर झोपू ही प्रतिज्ञा सुखासीन आयुष्यात गादीखाली गवताच्या चार काड्या ठेवून सिद्ध होते असे मानणार्‍या चितोड राजघराण्याती मुघल मांडलिकांचे उदाहरण त्यांनी दिले होते. तसेच हे मध्यमवर्गीय पुरोगामी. लेखनात, तोंडाने मध्यमवर्गीय ताडन केले की यांचे डावेपण सिद्ध होते.

प्रत्येक विचाराचा, धर्माचा एक देव नि एक सैतान असतो. तसे मार्क्स वा लोहियांच्या जोडीला मध्यमवर्ग असला की उरलेले छान मध्यवर्गीय उबदार आयुष्य जगायला मोकळे असे असावे बहुधा. अमेरिकेत राहून वर्षाला एक सत्यनारायण घातला की ’आपल्या मुळांना विसरला/ली नाही हां’चे सर्टिफिकेट पदरात पाडून घेणार्‍यांसारखे वर्षातून एकदा मध्यमवर्गीयांवर आगपाखड करणारा लेख वा व्याख्यान झोडले की उरलेले मध्यमवर्गीय आयुष्य सुखाने व्यतीत करता येते. वर पुन्हा धार्मिकांच्या ’खरा धार्मिक सत्प्रवृत्त असतो. तो अमुक सत्प्रवृत्त नाही म्हणाजे तो _खरा_ धार्मिक नाही.’ या तत्वाचा व्यत्यास म्हणजे, ’मी मनाने मध्यमवर्गीय नाही. आर्थिक स्थितीचा वृत्तीशी काही संबंध नाही.’ हा उफराटा तर्क द्यायला तयार.

आता मी ’मध्यमवर्गीय... फख्र है’ नावाचे नाटकच लिहिणार आहे, मध्यवर्गीय समाज हा एकुणात व्यवस्थेचा कणा असतो हे सिद्ध करणारे. मध्यमवर्गीयांच्या नावे खापर फोडणारे ’अ‍ॅण्टी-मध्यमवर्गीय-वर्ग-द्रोही’ असतात, छान मध्यमवर्गीय आयुष्य जगतात. जगोत बापडे. हे हायक्लासही होऊ नयेत वा डी-क्लास.

विचाराने आम्ही पुरोगामी आहोत असा आमचा समज आहे. पण धर्मांपासून मार्क्सापर्यंत सर्वांचे ठेकेदार असतात, जे तुम्ही ’खरे इकडचे की छुपे तिकडचे’ याचा निवाडा - फुल टाईम - करत असतात. या सर्वगटीय ठेकेदारांचे ’आम्ही छुपे तिकडचे आहोत’ यावर एकमत आहे असे आम्हाला सगळीकडच्या आतल्या गोटातून समजले आहे. तेव्हा आता आम्ही आपले ज्ञानोबावादी, ’जो जे वांच्छिल तो ते लाहो’ म्हणणारे. ’फक्त मलाच लाहो, त्याला न लाहो’ म्हणण्यासारखा क्षुद्रपणा दाखवला नाहीत तरी पुरे, एवढी माफक अपेक्षा ठेवणारे. :)

-oOo-

मंगळवार, २३ जून, २०२०

अगायायायायफोन

काही महिन्यांपूर्वी एका कार्यशाळेमध्ये आम्ही एका चित्रपटाचा शो आयोजित केला होता. मर्यादित लोकांसाठी असल्याने थिएटर नव्हते. तेव्हा सरळ लॅपटॉपवरुन प्रोजेक्टरला जोडावे असा प्लान होता. प्रोजेक्टर असो वा बाह्य मॉनिटर वा टीव्ही, वाटेल त्याला एक एचडीएमआय केबल जोडली की तो लॅपटॉप बिचारा निमूट चित्रपट वा गाण्याचा नळ सोडून पाणी वाहतं करतो असा अनुभव आमचा. पण आमचा माज साफ उतरला कारण दिग्दर्शक महाशयांचा लॅपटॉपचा धर्म वेगळा होता...

साहेब आले ते अ‍ॅपल घेऊन. त्यांच्या त्या लॅपटॉपने आधी आमच्या प्रोजेक्टरकडे बघून नाक मुरडले नि ’पोरगी नकटी आहे, मी सोयरिक करणार नाही’ म्हणून जाहीर केले. मग एक यूएसबी फ्लॅशडिस्क ऊर्फ पेनड्राईव्हवर घेऊन तो प्रोजेक्टरला जोडू असे ठरले. तो प्रयोग सुरु झाला नि महाशय यूएसबीला नाके मुरडू लागले. मग दुसरा एक समंजस लॅपटॉप आणून तिला थोडा मेकप केला. आता साहेब राजी झाले. राजी झाले, अक्षता पडल्या.

पण आता दादला नांदवायलाच तयार नाही. आता काय झाले बाबा? म्हणून दादापुता केला तर म्हणे, ’ही आधी दुसर्‍या घरी नांदून आलेली दुसरेपणाची बाईल मला दिलीत. ही माझ्या स्टेटसची नाही.’  मग पुन्हा नाकदुर्‍या काढणे सुरु झाले. पार्टिशन बदलून पाहा, जीपीटी काय एम्बीआर काय,  सगळी पोथी वाचून झाली... नवरदेव रुसला तो रुसलाच. मग म्हटले बाबा तुला थेट नांदवायची नसेल तर ’निळ्या’ पडद्याआडूनच ’कुबूल है, कुबूल है, कुबूल है’ म्हणतोस का?  ’लॉंग डिस्टन्स’ रिलेशन्स चालेला का? तर म्हणे, ’आमच्यात ती पद्धत नाही. आमची रीतभात काही लक्षात घ्याल की नाही. तुम्ही एक गावचे उंडारबक्ष लोक, आम्ही खानदानी आहोत. खानदानी नसलेल्यांना आमच्या ओसरीवर देखील प्रवेश देत नाही आम्ही.’

आता याच्यासाठी खानदानी बाईल कुठून शोधायची या विवंचनेत आम्ही. एखाद्या अत्यंत महत्वाच्या सरकारी ठेक्याच्या फाईलवर सही करण्यासाठी बक्कळ पैसे घेऊन वर ऐन सहीच्या वेळी पोरासाठी नवा मोबाईल मागणार्‍या साहेबासारखा हा अडूनच बसला. सही झाली की काम सुरु करायचे म्हणून भरपूर व्याजाने बाजारातून पैसे उचलून बसलेला ठेकेदार जसा जेरीला येईल तसे आम्ही घायकुतीला आलो. मी हरलो. मग काही तरुण मंडळी, नवरदेवाची समजूत घालायला पाठवली. म्हटलं बाबांनो तुमची भाषा त्याला समजते का पाहा. ती ही हात हलवत परत आली. अखेर दीडेक तास रुसल्यावर - बहुधा त्याच्याकडचीच वर्‍हाडी मंडळी कंटाळल्याने - नवरदेव एकदाचा बोहोल्यावर चढला. आणि चि. अ‍ॅपल लॅपटॉपचा चि.सौ.कां. स्कॅनडिस्क फ्लॅशड्राईव्हशी विवाह पार पडला. आणि मधला वेळ भरुन काढण्याचे कौशल्य पुरेपूर वापरलेल्या आमच्या तरुण मित्रांच्या कृपेने सहनशक्ती जबर असलेल्या आमच्या सुमारे दहा टक्के प्रेक्षकांना अखेरीस तो चित्रपट पाहता आला.

एक प्रश्न असा होताच की आपण ही जी काय धोंड गळ्यात बांधून घेतली आहे ती चारचौघांपेक्षा नाक जरा लांब असलेली म्हणून, एक्स्लुसिव म्हणूनच, आणि तसे ते मिरवण्यासाठीच हे त्या दिग्दर्शकाला ठाऊक नसावे का? की आपलेही नाक सामान्यांपेक्षा अंमळ मोठे कसे आहे आणि तुमच्या सामान्यांच्या तंत्रज्ञानाचे आपले जमत नाही हे त्यालाही ठसवायचे होते? यापूर्वी या नखरेलपणाचे, इतरांशी फटकून वागण्याचे प्रकार त्याच्या अनुभवाचा भाग नव्हते का? मग तसे असेल तर आपल्यासाठी जे काही विशेष तंत्रज्ञान हवे त्याची मागणी - आढ्यतेने म्हणून का होईना -  त्याने आधीच नोंदवायला काय हरकत होती. माझ्या अंदाजाने इतरांपेक्षा वेगळेपण मिरवण्यासाठी हा जाच तो सहन करत असावा. किंवा खड्ड्यात पडूनही ’मीच उडी मारली, खड्डा किती खोल आहे हे पाहण्यासाठी’ ची मखलाशी करत ’तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करण्याचा हा प्रकार असावा.

तुमच्या घराला चोरी, दरोडे वा अन्य गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही एखाद्या सुरक्षा तंत्रज्ञान कंपनीला तुम्ही आपले घर सुरक्षित करण्याचा ठेका दिला. आणि त्यांनी तुमच्या घराभोवती सात तट बांधून पन्नास कुत्री, दहा बंदूकधारी उभे करुन पाच पन्नास बंकर खोदून ठेवले. तुम्हाला घरात डांबून बसवले, आतला बाहेर जाणार नाही, बाहेरचा कुणीही आत येणार नाही याची चोख तजवीज केली. आता तुम्ही चोख सुरक्षित आहात हे खरे, पण तुमच्या स्वातंत्र्याचे काय? ’बाहेरुन तुमचा मित्र, नातेवाईक जरी येऊ पाहिल, तर त्याला हाकलून लावणारी ही सुरक्षा व्यवस्था काय कामाची?’ असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही?

मी माझ्या प्राचीन डेस्कटॉप पासून कालबाह्य लॅपटॉप पर्यत सर्वांवर वाटेल त्या प्रकारची कामे केली. म्युजिक फाईल कन्वर्शन्स केली, व्हिडिओ एडिटिंग केले. हवी ती सॉफ्टवेअर आणून वापरली. क्वचित पायरेटेडही. पण आमच्या या  बाबाजींनी कधीच काही तक्रार केली नाही. कधी सो-कॉल्ड सुरक्षितता भेद झाला नाही. अर्थात फायरवॉल, अ‍ॅंटिव्हायरस, सुरक्षित ब्राउजर, नियमित मेंटेनन्स वगैरे बाबींची काळजी मी घेत असतो हा मुद्दा आहेच. पण म्हणजे हे सारे उपलब्ध आहेच, ते केवळ वापरण्याचे कष्ट नकोत म्हणून दुप्पट खर्च करुन मलाच स्थानबद्ध करणारी ब्याद मी विकत का घ्यावी... तर फॅशन वा चारचौघांपेक्षा वेगळॆ काहीतरी माझ्याकडे आहे, आम्ही एलिट वगैरे आहोत हे मिरवण्यासाठी!

याचे भावंड म्हणजे आयफोन. तो तर भांडवलशाही प्रॉपगंडा मशीनरीचा ’चालता-बोलता*’ प्रचारकच.   इतर स्पर्धकांपेक्षा मी कित्त्ती कित्त्त्ती ग्रेट हे केवळ प्रॉपगंडा मशीनरीच्या साहाय्याने इतके पसरवले की दर सहा आठ महिन्यांनी येणारे प्रत्येक नवे व्हर्शन विकत घेण्यासाठी खुळचट जमाती रात्रीपासून रांगा लावतात म्हणे. बरं साहेबांची किंमत सर्वसामान्य सर्व-फीचर उपयुक्त फोनपेक्षा अडीचपट आणि फीचर्स मध्ये असंख्य बंधने. (हा निदान दिसायला तरी बरा आहे. चॉकलेट दिलं नाही म्हणून कोपर्‍यात  बसलेल्या किरकिर्‍या पोरासारखे फायरिंग असलेली, भरपूर पेट्रोल पिणारी, टू-स्ट्रोक आणि दिसायलाही अनाकर्षक असणारी यामाहा आरएक्स-१०० हे प्रकरणही असलेच. कुण्या चलाख माणसाने बहुधा त्याची ती टुकार बाईक विकण्यासाठी निर्माण केलेले फालतू प्रेस्टिज मिरवणारे.)

हे सारे आठवलेच मुळी आज वाचलेल्या या बातमीमुळे. या आयायायायायाफोनमध्ये म्हणॆ गुगलच्या अ‍ॅंड्रॉईडमध्ये असणारी दहा फीचर्स आता अंतर्भूत केली आहेत. ही कुठली ते पाहिली तर ती इतकी मूलभूत आणि वापर सुटसुटीत करणारी आहेत की ही नसलेला फोन लोक आजवर का वापरत असावेत, असा प्रश्नच मला पडला. वर तो श्रेष्ठत्वाचा टिळा लावून मिरवतातही, हा तर कळस आहे.

सेलिंग पॉईंट एकच, म्हणे हा अधिक सिक्युअर आहे. वर म्हटले तसे याची सिक्युरिटी म्हणजे तुम्हालाच तुरुंगात घालून तुम्ही इथे सुरक्षित आहात म्हटल्यासारखी आहे. An apple a day keeps doctor away अशी एक म्हण आहे. ती बदलून आता An apple in hand keeps everyone away अशी करायला हवी.  आणि सुरक्षिततेचे म्हणाल तर खुद्द अ‍ॅपल तुमच्या सुरक्षिततेचे कसे धिंडवडे काढते हे सॅमी कामकार या तंत्रज्ञाने दाखवून दिले आहेच.  त्यामुळे माझ्या मते आयफोन विकत घेणे म्हणजे स्वतःच्या खुनाची सुपारी स्वतःच देण्यासारखे आहे.

या वर-नाक्या नवरदेवाची खिल्ली उडवणारे दोन स्टॅंड-अप कमेडियन्सचे व्हिडिओ आमच्या दोघा मित्रांनी पाठवले. ते इथे जोडतो आहे.

हा पहिला व्हिडिओ आहे वीर दास याचा. हा त्यातील तंत्रज्ञानाची खिल्ली उडवणारा. त्यात तो याला नवा धर्म म्हणतो ते अगदी तंतोतंत पटणारे आहे. प्रश्न न विचारता, चिकित्सा न करता त्याचे श्रेष्ठत्व विनातक्रार मान्य करणे; एवढेच नव्हे तर इतर धर्मांना दुय्यम म्हणून हिणवण्यात हिरिरीने सहभाग घेणे हे धर्माचे नि धार्मिकांचे व्यवच्छेदक लक्षण असते. आयफोनधारींमध्ये (आणि शाकाहारींमध्ये, विशेषत: विगन मंडळींमध्ये ) ते प्रतिबिंबित झालेले दिसते.हा दुसरा त्याच्या मागे धावणार्‍या, न परवडणारा तो पांढरा हत्ती दाराशी आणून बांधण्याचा आटापिटा करणार्‍या प्रवृत्तीवर भाष्य करणारा.इतके सगळॆ झाल्यावर ’त्याची नवी लाट येते आहे. सावध राहा.’ भावनेच्या पुरात वाहून जात पैशाचा चुराडा करु नका.’ हा धोक्याचा इशारा देऊन ठेवतो. तुमचा साधा फोनही उत्तम प्रकारे सिक्युअर करता येतो. इंटरनेटवर थोडी शोधाशोध केलीत तर सहज सापडेल. उत्तम फायरवॉल, मॅलवेअर शोधक अ‍ॅप, व्हिपीएन वगैरे वापरा. तितके पुरेसे आहे. उगाच देवळात देव आहे की दगड हे माहित नसूनही त्याची सहामाही वारी करणार्‍यांच्या मूर्ख जथ्याचा भाग होऊ नका.

हे हास्यास्पद वाटत असेल तर ही बातमी नजरेखालून घाला. हा अपवाद आहे हे मान्य आहे. पण असा अतिरेक धार्मिक बाबतीतच घडतो असे नव्हे. भांडवलशाहीच्या जगात कृत्रिमरित्या मोठ्या केलेल्या एखाद्या वस्तूच्या मालकीसाठी या थराला माणसे जाऊ शकतात, हे या निमित्ताने मान्य झाले तरी खूप आहे.

---

आमच्या एका कविमित्राने आयफोनच्या या माथेफिरु वेडावर एक कविता लिहिली आहे...

आयफोन
थोड्या आधी आला असतात तर मिळाला असता साहेब
अटळ भांडवली देणगी असणारी लाचार भावनांची बत्तिशी दाखवत सेल्समन म्हणतो.
अशा वेळी मी तरी शांत बसावं की नाही?
पण मी घेईन तर आयफोनच म्हणत
दुसऱ्या दुकानाकडे माझी स्वातंत्र्यपूर्व काळातली सायकल मारू लागतो
तेव्हा सायकलच्या त्या जुन्या, दरिद्री चाकांखाली
अनेक बत्तिशा, अनेक सेल्समन चिरडले जातात
आणि मी मात्र पृथ्वीच्या गाभ्यातले रहस्य गवसल्यासारखा
सायकलचे पॅडल मारतो…
जोरात….अजून जोरात.
माझी मस्ती आता इतकी वाढलेय की आता आयफोन जरी आला चाकाखाली
तरी मी थांबणार नाहीये…
- उत्पल व. बा. 

रविवार, १४ जून, २०२०

अण्वस्त्रस्पर्धा आणि नग्न महासत्ता

इस्रायलच्या एका व्हिसलब्लोअरवर लेख लिहित होतो. जगाच्या डोळ्यात धूळ फेकून राबवलेल्या अणुकार्यक्रमांमधून इस्रायलने म्हणे १५० न्यूट्रॉन बॉम्ब बनवण्याइतके इंधन जमा केले आहे!

प्रश्न पडला: काय करायचे हो या १५० बॉम्ब्सचे? सांगा ना. नाही म्हणजे आमच्या डिस्नेच्या ’डकटेल्स’मधला अंकल स्क्रूज जसा आपले पैसे रोज मोजून खुश होतो तसे आहे का हे? की खरंच काही कामाचे आहेत इतके बॉम्ब?

नाही, मी शांततावादी भूमिकेतून नाही, सध्या निव्वळ गणिती मूल्यमापनाच्या आधारे हा प्रश्न विचारतो आहे. इस्रायलची सारी शत्रू-शेजारी राष्ट्रे- अगदी सगळी इस्लामिक राष्ट्रे धरली तरी, उध्वस्त करायला असले ते पन्नास बॉम्ब्स सहज पुरतील. मग उरलेल्या शंभरेक बॉम्ब्सचे काय लोणचे घालायचे का हो? कशासाठी निर्माण केले ते? का जमवले?

उत्तर एकच, माणूस हा हपापलेला प्राणी आहे. उपयुक्ततेचा विचार न करता तो हपापलेपणे गरजेच्या कित्येक पट जमवत राहतो... जमवत राहतो. पैसा मिळतो म्हणून जमवत राहतो. मग खूप पैसा झाला, की त्या पैशातून - एकावेळी एकातच राहाता येत असूनही- एकाहुन अधिक घरे बांधतो. त्याचे काय करायचे? द्या भाड्याने नि आणखी पैसा मिळवा आणि त्या पैशातून आणखी घरे बांधा... आणखी पैसे मिळवण्यासाठी! या सार्‍या मिळवलेल्या पैशातून किती उपयुक्ततामूल्य अथवा भोगमूल्य खरोखरच वापरले जाते हो? आणि जितके मिळवले ते सारे भोगण्याइतकी माणसाची भोगक्षमता तरी असते का हो? का जो पदार्थ जेमतेम काही रुपयांचा असतो गुळगुळीत टाईल्स, कडक इस्त्रीचे वेटर, झगमग दिवे लावलेल्या होटेलमध्ये जाऊन कैकपट पैसे देऊन खाल्ला तर त्याचे उपभोगमूल्य वाढले अशी स्वत:ची समजूत करुन घ्यायची... जमवलेल्या पैशातून आपण काहीतरी अधिकचे मिळवले असे समाधान करुन घेता यावे म्हणून?

केवळ आपल्याकडे अधिक आहे याचे वांझ समाधान मिळवण्यापलिकडे यातून काय साधते?

चंदूलालने दीड-दोन कोटी खर्च करुन कुठेतरी कोकणात निसर्गरम्य ठिकाणी म्हणे फार्महाऊस बांधले. त्याच्या मेन्टेनन्सला दोन माणसे ठेवून त्यावर नियमित खर्च केला. वर्षातून आठवडाभर तिथे राहण्यासाठी हा सारा जामानिमा. एरवी ते पडीक. मग इतर मित्रांना वा परिचितांना कधीतरी जाण्यास मुभा देऊन थोडा टेंभा मिरवायचा. किंवा सरळ त्याचे एरवी भाड्याने देण्याचा धंदाच करायचा... म्हणजे आणखी पैसे मिळवायचे. ते खरं रे बाबा, पण त्यातले स्वत: भोगलेस किती... आठ दिवस!

या आठ दिवसांचे भोगमूल्य काढ बरे. काही हजारात काम होईल. त्यापेक्षा तूच असा एखादा चंदूलाल शोधून त्याच्या फार्महाऊसवर जा ना बाबा सुटीला. उगाच कोटभराचे मृगजळ कशाला उभारून ठेवायचे त्यासाठी? तर ’स्वत:च्या फार्महाऊसवर सुटी घालवतो’ या अस्मितेच्या झेंड्यासाठी हा खर्च! अर्थात कुणाच्या लहरीखातर तीन-चार हजार कोटींचे पुतळे नि त्याहून चौपट खर्च करुन जेमतेम तीन-चारशे किलोमीटर धावणारी रेल्वे उभे करण्याइतके पैसे खर्च करणार्‍या या श्रीमंतांच्या देशात कोटभर रुपये काहीच नाहीत म्हणा.

माणसे असली अव्यवहार्य वर्तणूक करतात म्हणून मूर्ख ठरतात. सिंह अथवा वाघाने ’चला हा हरणांचा जथा सापडला आहे तर भरपूर शिकार करुन साठवून ठेवू.’ असा विचार केला आहे का कधी? एक जनावर मारले, ते खाऊन पोट भरले की दिली ताणून असा त्यांचा खाक्या असतो. त्याने जर बरीच जनावर मारुन साठा केला, तर जिवंत सुटलेल्या हरणांची संख्या खूप कमी होईल. त्यातून त्यांच्या नव्या पिढीची संख्या कमी होईल. यातून हळूहळू सिंहाला शिकारीला उपलब्ध असणारी हरणे कमीकमी होत जातील. आणि भविष्यात या सिंहाला नाही, तरी त्याच्या पुढच्या पिढ्यांना अन्नाचा तुटवडा भासू लागेल. शिवाय एकाच वेळी भरपूर शिकार केली, तरी ते अन्न साठवून ठेवण्याचे तंत्र त्याला माहित नसल्याने त्यातून मिळालेले बहुतेक मांस हे सडून वाया जाईल. किंवा शिळे मांस खाऊन त्याला पोटाचे विकार होतील.

अर्थात हा सारा विचार, हा सारा तर्क करण्याइतकी सिंहाची बुद्धी परिपक्व आहे की नाही हा मुद्दा आहेच. सध्याच्या शास्त्रीय ज्ञानानुसार तरी तशी ती नाही असे म्हणता येईल. पण हेतूने नसले तरी कृतीने सिंह गरजेपेक्षा अधिक जमवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही एवढे मात्र नक्की. म्हणून त्याच्याकडून गरजेहून अधिक शिकार होत नाही. म्हणूनच हरणांची वीण वाढू शकते, आणि त्यांच्यावर पोसल्या जाणार्‍या सिंहांचीही. स्वत:ला अक्कल आहे असा माणसाचा दावा असेल तर हे साधे गणित त्याच्या डोक्यात सहज शिरायला हवे. सिंहाच्या कृतीपेक्षा माणसाची कृतीमागे विचाराचे पाठबळ अधिक दिसायला हवे.

माणसाने आपल्या उपभोगक्षमतेच्या कैकपट संपत्ती वा उपभोग्य वस्तू जमा करुन श्रीमंतीचा टेंभा मिरवणे आणि एखाद्या देशाने - म्हणजेच त्याच्या संचालक मंडळाने - गरजेच्या कैकपट अधिक शस्त्रास्त्रांचे भांडार जमा करुन महासत्तेचा झेंडा मिरवणे हा सारख्याच पातळीवरचा मूर्खपणा म्हणायला हवा... फारतर व्याप्तीचा फरक आहे म्हणू या.

याहून कहर म्हणजे ’माझ्या देशाकडे १५० अ‍ॅटमबॉम्ब आहेत. लै भारी का नाय’ अशी फुशारकी रोजगाराची भ्रांत असलेल्या देशातील कुणी जयसिंह, गुटखा चघळता चघळता किंवा ’हर फिक्र को सिगरेट के धुएं में उडाता हुवा’ मारत असतो. महासत्ता म्हणजे नक्की काय. त्यात देशातील प्रत्येकाला पोटभर अन्न मिळेल इतपत रोजगार, परवडेल अशा दरात अत्याधुनिक आरोग्यव्यवस्था वगैरे जीवनावश्यक बाबींना स्थान असते की नसते? असे प्रश्न या ’जयसिंहा’च्या मनात कधी उमटत नसतात... कारण खूप अण्वस्त्रे असणॆ म्हणजे महासत्ता हे समीकरण त्याच्या डोक्यात रुजवणार्‍या हिंसापिपासू, सत्तापिपासू शासनकर्त्यांनी त्याच्या मेंदूची वैचारिक लोबॉटमी करुन टाकलेली असते.

आज या महासत्तेच्या वेडामुळे पृथ्वीवरील संपूर्ण लोकसंख्या किमान पाच-पंचवीस वेळा समूळ नष्ट करता येईल इतकी अण्वस्त्रे जगभर, विशेषत: इतरांच्या अण्वस्त्रांबाबत कांगावा करणार्‍या अमेरिका नि इस्रायलसारख्या देशांकडे, जमा झाली आहेत. पण या संपूर्ण लोकसंख्येला किमान गरजांसह जगवता येईल इतके अन्न नि आरोग्यव्यवस्था मात्र कोणत्याच देशाकडे नाही. कोरोनाच्या उद्रेकानंतरची ’महासत्ता’ अमेरिकेची स्थिती पाहता हे अधिकच अधोरेखित होते. त्या महासत्तेच्या दाव्याला नजरेला दिसूही न शकणार्‍या एका य:कश्चित विषाणूने पुरे नग्न केले आहे.

आणि तरीही माणसे मारणार्‍या शस्त्रांची स्पर्धा करत ’महासत्ता’ म्हणून मिरवणार्‍या सत्ताधार्‍यांची आणि त्यांच्या अर्धपोटी भाटांची संख्या काही कमी होत नाही.

-oOo-

रविवार, ७ जून, २०२०

रंगार्‍याचा ब्रश

रंग लावण्याचा ब्रश हा परावलंबी असतो. भिंती(!)वर रंग लावण्याचे काम त्याचे असते खरे, पण रंग कोणता लावायचा ते डब्यात कोणता रंग आहे यावरुन ठरते. ’जा मी हा केशरी रंग लावणार नाही. लाल किंवा हिरवा आणलास तरच लावेन’ असे ब्रश कधी रंगार्‍याला सांगू शकत नाही. रंगार्‍याने निवडलेला रंग भिंतभर पसरवण्याचे काम तो इमानेइतबारे करत असतो. रंगार्‍याने आज लाल रंगाशी सलगी केली की ब्रश त्याचे फटकारे भिंतीवर मारतो. तो ओतून देऊन रंगार्‍याने ’केसरिया बालम’ निवडला की ब्रश त्या रंगाने भिंत रंगवून काढतो. थोडक्यात रंगार्‍याचा रंग बदलला की ब्रशचा रंग बदलतो, आणि त्याच्या भिंतीचाही!

ब्रशचा मालक असलेल्या रंगार्‍याच्या निष्ठा मात्र ब्रशइतक्या घनतेच्या नसतात, त्या तरल असतात. रोख पैसे मोजणार्‍या कुणाही घरमालकाच्या भिंतींना तो निवडेल तो रंग लावण्याची त्याची तयारी असते. त्यातही एका खोलीत एक रंग, दुसर्‍या खोलीत दुसराच अशी निवड असली तरी बिनतक्रार आपले काम करत राहतो. शिवाय रंग व्यवस्थित बसला नाही तर ब्रशच्या नावे खडे फोडून रंगारी तो फेकून देतो आणि नवा ब्रश आयात करतो. रंगार्‍याने घरमालक, आणि म्हणून रंग बदलला की जुना ब्रश हमखास फेकून दिला जातो.

ब्रश हा वापरुन घेऊन फेकून देण्याची गोष्ट आहे तर रंगांचा आधार असलेला प्रायमर किंवा पुट्टी हे रंगाला कायमस्वरूपी आधार देणारे. त्यामुळे रंग कुठलाही असला तरी त्याखालच्या प्रायमरला विसरायचे नाही. तो नसेल तर सारे रंग गळून पडतात नि भिंत बोडकी होते. पण तो रंगाच्या प्रसिद्धीमध्ये पार लपून गेलेला असतो. ब्रश निदान काही काळापुरता मिरवून घेतो. प्रायमरला तेवढे फुटेजही मिळत नाही. जेवढ्या काळापुरता तो भिंतीवर दिसतो त्या काळात कुणी त्याच्याकडे ढुंकून पाहात नसते. पण तरीही तो प्रायमर निरपेक्ष भावनेने सर्व भिंतींशी आणि रंगांशी सलगी राखून असतो, यांच्यापैकी कुणीही त्याला कसलीही प्रसिद्धी, कुठलेही exposure देत नसून!

रोख पैसे मोजणार्‍या घरमालकाच्या लहरीवर, रंगार्‍याच्या स्वार्थावर आणि प्रायमरच्या निस्वार्थ वृत्तीवर जग चालले आहे. ब्रश हा मर्यादित आयुष्य असलेला, त्या मार्गावरचा केवळ एक प्रवासी आहे इतकेच! प्रायमरची बांधिलकी भिंत आणि रंगाशी, रंगार्‍याची रंग लावण्याबद्दल मिळणार्‍या दामाशी, घरमालकाची त्याच्या घराशी. यात ब्रशला कुठेच स्थान नाही. तो या सार्‍या निर्मितीमागचे प्रासंगिक, नैमित्तिक कारण वा हत्यार आहे इतकेच. श्रेयाच्या वाटणीत त्याला कुठेच स्थान नाही. रंग पक्का बसला , पोपडे न निघता दीर्घकाळ टिकला तर प्रायमरच्या दर्जाला दाद मिळते. कोणत्याही ओरखड्याखेरीज रंगाचा सफाईदार थर बसला तर ते श्रेय रंगार्‍याचे. रंगाची निवड कुणाला आवडली तर घरमालकाची प्रशंसा... ’वा: ब्रशने काय सुरेख काम केले हो.’ अशी दाद कुणी दिलेली ऐकली आहे का?

हे एकदा ध्यानात घेतले की रंगांच्या अस्मितेचे खेळ खेळण्याचा मूर्खपणा ब्रश करत नाही. पण बहुतेक ब्रश इतके सुज्ञ असत नाहीत. स्वत:चा चॉईस नसलेल्या, रंगार्‍यानेच त्यांच्यासाठी निवडलेल्या रंगांच्या अस्मितेच्या लढाया ते खेळत राहतात. आणि लढता लढता विदीर्ण होऊन नष्ट होतात. मात्र रंगार्‍याला त्याचे सोयरसुतक नसते. शांतपणे जुना ब्रश फेकून देऊन तो नवा घेऊन येतो. घरमालकाला तर त्याचीही फिकीर नसते. खिशात चोख रोकडा असल्याने तो तर रंगारीही बदलू शकतो.

हे झालं रंगकामाबद्दल...

... धर्म, उद्योग आणि राजकारणाचे तरी याहून काय वेगळे असते हो!

सोमवार, १ जून, २०२०

बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली

७ जून १९८१ रोजी इस्रायलने इराकवरील ’ओसिरॅक’ अणुभट्टीवर हल्ला करुन ती उध्वस्त केल्याचे जाहीर केले. ’या अणुभट्टीमध्ये अण्वस्त्रांना आवश्यक असणारे इंधन बनवले जात आहे’ असा इस्रायलने आरोप केला होता. (२००३ मध्ये असंख्य संहारक अस्त्रांच्या पर्वतावर बसलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी इराक सर्वसंहारक अस्त्रांची निर्मिती करत असल्याचा आरोप करत त्या देशावर हल्ला केला होता हे जाताजाता नोंदवून ठेवतो.) ’भविष्यात एक अण्वस्त्रसज्ज शेजारी निर्माण झाल्याने आमच्या राष्ट्राचे सार्वभौमत्व धोक्यात येईल. त्याविरोधात ’pre-emptive strike करण्यात आला, धोक्याला अंकुर फुटताच आम्ही तो खुडून टाकला’ असा दावा इस्रायलने केला. या हल्ल्याला ’ऑपरेशन ऑपेरा’ असे नाव देण्यात आले होते.

’अणुभट्टी उध्वस्त केली’ असे इस्रायलने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात तिचे बाह्य नुकसानच झाले होते. गाभ्याला फारसा धक्का लागला नव्हता. फ्रेंच तंत्रज्ञांनी नंतर तिची डागडुजी करुन ती पुन्हा कार्यान्वित झाली.

ज्या इराकच्या अणुभट्टीवर हल्ला झाला त्या इराकने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सही केलेली होती. त्यांचा अणुकार्यक्रम ’आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगा’च्या देखरेखीखाली चालू होता. या हल्ल्यानंतर तिची पाहणी करण्यास नियुक्त केल्या गेलेल्या तज्ज्ञांच्या मते या स्वरुपाच्या अणुभट्टीतून अण्वस्त्र तयार करता येईल या दर्जाचे इंधन तयार होण्यास काही दशकांचा कालावधी लागला असता. कारण अणुभट्टी उत्पादक फ्रेंच कंपनी आणि इराक सरकार यांच्यातला करार हा ’शांततापूर्ण अणुकार्यक्रमा’अंतर्गत असल्याने या अणुभट्टीचा आराखडाच त्यादृष्टीने बनवला होता. पण या हल्ल्यानंतर- निदान वरकरणी का होईना, शांततामय अणुकार्यक्रम राबवणार्‍या, अणुऊर्जा आयोगाशी सहकार्य करणार्‍या इराकने आपल्या अणुकार्यक्रमाशी संबंधित सर्व केंद्रे भूमिगत केली. आणि सद्दाम हुसेन सारख्या महत्वाकांक्षी नेत्याच्या मनात लवकरात लवकर अण्वस्त्रे बनवण्याची जिद्द निर्माण झाली. आखाती देशांत एक प्रकारे सुप्त अण्वस्त्रस्पर्धेचे बीज रुजवले गेले.

याउलट इस्रायलने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत कायमच ’नरो वा कुंजरो वा’ भूमिका स्वीकारुन आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना टाळले आहे. इस्रायल निर्मितीच्या वेळी ज्याप्रमाणे जगभरातील ज्यू त्या-त्या देशांत शोषित असल्याचा मुद्दा - जे वास्तव होते - कामी आला होता. त्यातून इस्रायल निर्मितीच्या काळी शेजारी राष्ट्रांच्या आणि त्यातील नागरिकांच्या हक्कांची सर्रास केलेली पायमल्ली आणि त्यांच्यावर अत्याचार दुर्लक्षणीय ठरले होते. त्याच धर्तीवर, पुढे-मागे आपला अण्वस्त्र कार्यक्रम उघड झालाच (आणि लवकरच तो झालाही) तर त्याला एक कारण तयार ठेवावे या हेतूने ’शेजारी राष्ट्रे अण्वस्त्र निर्मिती करत असल्याची’ हाकाटी उठवून ठेवणे हा एक हेतू होता. दुसरा, वर म्हटले त्याप्रमाणे धोक्याचा अंकुरच खुडण्याचा अधिकार राखून आहोत असे जाहीर करणे हा होता.

पण थोडे बारकाईने पाहता एक तिसरा हेतूही दिसतो आणि तो भलताच रोचक आहे. इराकने ती अणुभट्टी उशीरा का होईना पुन्हा कार्यान्वित केली असली तरी हा तिसरा हेतू मात्र साध्य झाला! आणि या तिसर्‍या हेतूचे प्रतिबिंब अलीकडेच भारताच्या इतिहासातही दिसून आले हा योगायोग(?) मोठा विस्मयकारक आहे. ’ओसिरॅक’वर हल्ल्यानंतर तीनच आठवड्यांनी इस्रायलच्या संसदेच्या, म्हणजे ’नेसेट’च्या निवडणुका झाल्या ! सामान्यपणे संसदेची मुदत संपत असताना, निवडणुका जाहीर झालेल्या असताना, विद्यमान शासनाने काळजीवाहू भूमिका पार पाडणे, कोणतेही मूलभूत पातळीवरचे धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित नसते. ’तत्कालिन शासनाने तो संकेत धुडकावून हा हल्ला घडवून आणला, तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच’ असे म्हणता येईल.

इस्रायलच्या निर्मितीची मूळ संकल्पना मांडणार्‍या ’झिओनिस्टां’मध्ये ’हॅगनाह’ म्हणून एक लढाऊ गट होता (जो पुढे इस्रायल निर्मितीनंतर इस्रायली सैन्यदलात रूपांतरित केला गेला.) जो सशस्त्र लढ्याचा सूत्रधार होता. असे असले तरी, इस्रायलच्या निर्मितीचे हे प्रमुख सूत्रधार सशस्त्र मार्गाचा वापर हा केवळ प्रतिकारापुरता करण्याच्या मताचे होते. पण झिएव जाबोटिन्स्की या ’रिव्हिजनिस्ट झिओनिस्टा’च्या मते ज्यूंच्या राज्याच्या निर्मितीसाठी सशस्त्र प्रतिकार हाच एकमेव मार्ग होता. या जाबोटिन्स्कीच्या शिकवणुकीला मानणारा एक गट हॅगनाहमधून फुटला आणि ’इरगन’ या नावाने वावरु लागला. या इरगनच्या नावावर पुढे अनेक दहशतवादी कारवायांची नोंद झाली. १९४६ साली किंग डेव्हिड हॉटेलवरचा बॉम्बहल्ला आणि कुप्रसिद्ध ’दैर यासिन हत्याकांड’ याच गटाने घडवून आणले होते.

इस्रायलच्या स्वातंत्र्यापूर्वी तेथील सत्ताधारी ब्रिटिशांविरोधात या गटाने केलेल्या कारवायांमुळे पुढे या गटाला इस्रायली सैन्यात सामावून घेण्यास प्रथम बराच विरोध झाला होता. पण यथावकाश हॅगनाहप्रमाणेच हा गटही सैन्यात सामील झाला आणि ’हेरत’ या पक्षाची स्थापना करुन त्याने राजकीय रंगमंचावरही पाऊल ठेवले. हाच पक्ष आजच्या ’लिकुड’ या आजच्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये परिवर्तित झाला आहे. या ’इरगन’ दहशतवाद्यांचा वरिष्ठ वर्तुळातला एक महत्वाचा नेता होता मेनॅचम बेगिन. हाच बेगिन १९७७ मध्ये संसदीय मार्गाने देशाचा पंतप्रधान म्हणून निवडला गेला! ’ओसिरॅक’ हल्ल्याच्या वेळी हाच देशाचा पंतप्रधान होता आणि १९८१ची निवडणूक लिकुड पार्टी याच्याच नेतृत्वाखाली लढवत होती.

इस्रायल हा धर्माच्या आधारे उभा राहिलेला देश. शेजारी मुस्लिम राष्ट्रांशी सतत कुरबुरी, युद्धे, चकमकी यांच्यामार्फत हळूहळू आपली भूमी विस्तारत नेणारा. त्यामुळे भारतातील मुस्लिमद्वेष्ट्यांचा लाडका. पण असा देशही सुरुवातीची तीन दशके समाजवादी विचारांच्या सत्ताधार्‍यांच्या हाती होता. इस्रायलच्या स्थापनेनंतर तेथील संसदेत मापाई/लेबर पार्टी आदि डाव्या भूमिकेच्या पक्षांचा कायम वरचष्मा राहिला आहे. या राजकारणाची सूत्रे अश्केनाझी या नावाने ओळखल्या जाणार्‍या, प्रामुख्याने युरपमधून इस्रायलमध्ये आलेल्या ज्यूंच्या गटाकडे होती. एवढेच नव्हे, तर सुरुवातीच्या काळात इस्रायलमध्ये आलेल्या ज्यूंच्या वस्त्या - किबुत्झ - या समाजवादी रचनेच्या प्रतीक मानल्या जात असत. पण या समाजात राहणारे लोक एकत्र मात्र धर्माच्या आधारावर आले होते. 

१९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत या डाव्या वर्चस्वाला शह देण्यासाठी इरगनच्या राजकीय अवताराने कंबर कसली होती. जेमतेम चार वर्षांपूर्वी बहुतेक सर्व उजव्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेली लिकुड पार्टी प्रामुख्याने बेगिन यांच्या करिष्म्याच्या आधारे निवडणूक लढवत होती. एकीकडे त्यांच्या इरगनच्या इतिहासाच्या आधारे देशासाठी प्राण देण्यासही तयार असलेला कट्टर देशभक्त अशी बेगिन यांची प्रतिमा निर्माण केली जात होती. तर दुसरीकडे नम्र, श्रद्धाळू असा त्यांचा चेहरा रंगवला जात होता. सर्वसामान्य श्रद्धाळू ज्यूंना त्यांच्याशी आपली नाळ जुळल्यासारखे वाटू लागले. अनेक वर्षांच्या शासनकर्त्यांवर नाराज झालेले नागरिकही या नव्या बलशाली नेत्याकडे आशेने पाहू लागले होते. याउलट विरोधी अलाइनमेंट आघाडीतर्फे त्यांच्यावर एकाधिकारशाही आणू इच्छिणारा आणि अतिरेकी मताचा नेता अशी टीका करण्यात येत होती.

या आता इथे बेगिन यांच्याऐवजी मोदी एवढा बदल करुन पाहिला तर हा सारा घटनाक्रम भारतात २०१४ मध्ये घडला आहे असे दिसून येईल. अलाइनमेंट आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेली लेबर पार्टी मूळच्या मापाई पक्षाचा वारसा सांगणारा मध्यममार्गी पक्ष आहे हे लक्षात घेतले, तर भारतातील ’मध्यममार्गी-समाजवादी’ कॉंग्रेस आणि अलाइनमेंट पक्षाच्या इतिहासातील साम्यही दिसून येते.

दुसरीकडे अलाइनमेंट आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या लेबर पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. १९७३ योम किप्पूर युद्ध जिंकूनही देशाच्या युद्धसज्जतेबद्दल अनेक आक्षेप घेतले गेल्यामुळे अध्यक्ष गोल्डा मायर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर निसटत्या बहुमतासह लेबर पार्टीचे नेते ठरलेल्या राबीन आणि त्यांच्या पत्नीवर निवडणुकीच्या तोंडावर परकीय चलनांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाला. त्यामुळे ऐनवेळी शिमॉन पेरेस यांच्या नेतृत्वाखाली १९७७ची निवडणूक लढवावी लागली. याशिवाय पक्षाचा प्रमुख आर्थिक आधारस्तंभ असलेला अशर याड्लिन याच्यावर लाचखोरीच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याची वेळ आली. त्याच्या गुन्ह्यांचे धागे अब्राहम ओफर या गृहनिर्माण मंत्र्यापर्यंत पोचल्याचे दिसून आले. या घटनाक्रमाचा ताण सहन न होऊन ओफर यांनी आत्महत्या केली. या सार्‍या प्रकरणांचा फायदा घेत अलाइनमेंट म्हणजे मूर्तिमंत भ्रष्टाचार असा प्रचार लिकुड पार्टीने केला. आपल्याकडे 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा वगैरे मुद्द्यांच्या आधारे कॉंग्रेसची मूर्तिमंत भ्रष्टाचारी पक्ष अशी प्रतिमा उभी करणारे मोदी बेगिन यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत होते.

या सार्‍याचा परिणाम म्हणून ’लेबर पार्टी’चा अनेक दशकांचा असलेला वरचष्मा मोडून काढत बेगिन यांच्या नेतृत्वाखाली लिकुड पार्टीने १९७७ मध्ये मोठा विजय मिळवला. मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल पन्नास टक्क्याहून अधिक मते अधिक घेत ३२ जागांवरुन ४३ जागांवर झेप घेतली. स्वबळावर सत्तास्थापन करता येईल इतके बळ त्यांना मिळवता आले नाही, तरी इतर काही पक्षांच्या मदतीने त्यांनी आवश्यक बहुमत मिळवून सत्ता हस्तगत केली. (भारतातील मोदींचा विजय मात्र निर्विवाद होता हा फरक नोंदवून ठेवायला हवा.) निकालाच्या दिवशी रात्री त्यांनी लिकुड पक्षाच्या मुख्यालयात केलेल्या भाषणात त्यांनी ’हा विजय म्हणजे ज्यूंच्या (इस्रायलच्या नव्हे!) इतिहासातील एक निर्णायक वळण आहे’ असा उल्लेख केला. तो दावा पुढे खराही ठरला.

समाजवादी दृष्टीकोनाकडे झुकलेल्या उच्चभ्रू अश्केनाझी ज्यूंची इस्रायलवरील पकड त्यांच्या कार्यकाळात ढिली होत गेली. मध्यपूर्व आशिया, उ. आफ्रिकेतून आलेल्या मिझ्राई तसंच स्पॅनिश/लॅटिन वंशाच्या सेफर्डिक आदि इतर गटांना अधिक वाव मिळू लागला. विशेषत: ’प्रोजेक्ट रिन्यूअल’ च्या माध्यमातून गरीब आणि मागास वस्त्यांच्या पुनरुत्थानाचे कार्यक्रम राबवले गेले. या वस्त्यांमध्ये सेफर्डिक आणि मिझ्राई ज्यू बहुसंख्य होते.

मोदींच्या सत्तारोहणानंतर ’गोवंश हत्या बंदी’ कायद्याच्या आधारे मुस्लिमविरोधी गटांना अप्रत्यरित्या बळ दिले गेले. खाटिक-काम करणार्‍यात मुस्लिमांची मोठी संख्या असल्याने, मोदींच्या मातृसंघटनेने हे हत्यार अनेक दशके काळजीपूर्वक मुस्लिमविरोधी धार करुन तयार ठेवलेले होते. विभागीय असमतोल उत्तर भारतीयांकडून पश्चिमेकडे, बव्हंशी गुजरातकडे झुकला. इतकेच नव्हे तर आपल्या देदिप्यमान विजयाच्या बळावर पक्षात पक्के बस्तान बसवत मोदींनी एक एक करुन जुन्या पिढीचे सर्व नेत्यांना राजकीय विजनवासात पाठवून सर्वस्वी नव्या पिढीच्या हाती सत्तेची सूत्रे देऊ केली आहेत. मोदीपूर्व काळात शेठजी-भटजींचा म्हणून हिणवल्या जाणार्‍या भाजपने आज सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातील नागरिकांमध्येही आपले बस्तान बसवले आहे.

आपल्या या भाषणात बेगिन यांनी ज्यूंना पूज्य असलेल्या तोराह या पवित्र ग्रंथांतील अवतरणांचा वापर केला. इतकेच नव्हे तर अब्राहम लिंकन यांच्या प्रसिद्ध ’गॅटिसबर्ग अड्रेस’चा उल्लेख करत एकप्रकारे आता यादवी संपून जणू इस्रायल हा एकसंध देश झाल्याची द्वाही फिरवली. मागील सरकारांनी देश विखंडित करुन ठेवला आहे आणि तो एकसंघ नि बलशाली करणारा त्राता मीच आहे हा मोदींचा दावा याच पातळीवरचा.

या नव्या पंतप्रधानाने आपल्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री म्हणून मोशे दायान या प्रसिद्ध लष्करी अधिकार्‍याला पाचारण केले. १९४८चे अरब-इस्रायल युद्ध, ५६ सालचा सुएझ पेचप्रसंग, आणि ६७च्या प्रसिद्ध ’सिक्स-डे वॉर’मधून इस्रायलच्या लढवय्येपणाचे प्रतीक म्हणून समोर आला होता. वास्तविक दायान हे पूर्वीच्या विरोधी लेबर पार्टीच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. पण तरीही लष्करी नेता हा पक्षातीत मानून बेगिन यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. मनमोहनसिंग यांच्या काळात लष्करप्रमुख असणार्‍या जनरल व्ही.के.सिंह यांच्याबाबतह मोदी यांनी हाच कित्ता गिरवला. २०१४ मध्ये आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त केले होते. अर्थात सिंह यांची लष्करी कारकीर्द दायान यांच्याप्रमाणे देदिप्यमान तर नव्हतीच, उलट लष्करी कार्यकालात एक-दोन प्रसंगात ते वादग्रस्त ठरले होते. याशिवाय मोदी यांनी अजित डोवल या वास्तविक आयपीएस केडरच्या, पण भारतीय गुप्तचर खात्याचे संचालक म्हणून काम केलेल्या अधिकार्‍याच्या देदिप्यमान कामगिरीच्या कथा प्रसृत करत त्याला ’राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ म्हणून आपल्या जवळच्या वर्तुळात सामील करुन घेतले.

बेगिन यांची आर्थिक नीती ही समाजवादी दृष्टीकोनाच्या जोखडातून देशाच्या अर्थव्यवस्थेला मुक्त करुन खुल्या बाजाराकडे नेणारी होती. बेगिन यांनी यासाठी पुरोगामी पक्षाचे नेते सिम्हा एर्लिच यांची अर्थमंत्री म्हणून वर्णी लावली. इस्रायलच्या अर्थव्यवस्थेला खुल्या अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याचे श्रेय एर्लिच यांना दिले जाते.

मोदींच्या हाती सत्ता येण्यापूर्वी दोन दशके भारतात खुल्या अर्थव्यवस्थेने आधीच बस्तान बसवले होते. त्यामुळे त्याचे श्रेय जरी मोदींना घेता आले नसले, तरी आपल्या प्रचंड प्रॉपगंडा मशीनरीच्या माध्यमातून ’या काळात खरे तर फार काही बदलले नाही’ अशी हाकाटी पसरवून दिली. त्यासोबत त्यांनी आपण आता या नव्या अर्थव्यवस्थेचे दूत आहोत अशी द्वाही फिरवली. मनमोहनसिंग यांनी सुरुवात करुन केलेल्या धोरणांचे पुढचे टप्पे मात्र त्यांनी आक्रमकपणे राबवले आहेत. यात बॅंकांचे एकत्रीकरण करुन मोठ्या नि तुलनेने स्थिर बॅंकांची निर्मिती, शासनाच्या अखत्यारितील उद्योगधंदे या ना त्या प्रकारे खासगी मालकीकडे हस्तांतरित करुन एकप्रकारे उत्पादन-व्यवहार आणि रोजगार-निर्मिती यांतील सरकारची जबाबदारी कमी करत नेली आहे.

पंतप्रधान बेगिन यांची चार वर्षांची मुदत संपत येत असताना मात्र परिस्थिती बदलत होती...

बेगिन यांनी १९७९ मध्ये इजिप्तशी शांतता करार केला. याबद्दल त्यांना आणि इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. इरगनची पार्श्वभूमी, बलवान नेता अशी प्रतिमा असलेल्या या नेत्याने केलेल्या या करारान्वये इजिप्तचा सायनाय वाळवंटाचा प्रदेश सोडून इस्रायली सेनेला माघारी यावे लागले. जिंकून घेतलेला प्रदेश सोडणे हे सैन्यदलांना रुचणारे नसते. सामान्य जनतेला अशा प्रकारची कृती नेत्याच्या दुबळेपणाची निदर्शक वाटत असते. लाहोरहून परतावे लागलेल्या भारतीय सैन्याच्या त्या माघारीबाबत तत्कालिन सेनाधिकार्‍यांपैकी काही आणि सरकारच्या विरोधातील काही संघटना आजही खडे फोडत असतात. सायनायचा प्रदेश या करारान्वये परत मिळवूनही सादात यांच्यावर रोष असलेल्या त्यांच्याच माथेफिरु सैनिकांनी ओसिरॅक हल्ल्यानंतर चारच महिन्यांत त्यांची हत्या केली.

पण मुलकी सत्तेत असणारेच अशा निर्णयांना आंतरराष्ट्रीय, राजकीय, आर्थिक, धोरणात्मक आणि लष्करी अशी विविध अंगे असतात, आणि भूभाग जिंकून घेतला की आपला झाला ही मध्ययुगीन रीत नेहमीच चालते असे नाही, याची जाणीव राखून असतात. विरोधकांनाही याची जाणीव नसते असे नाही. ज्याबद्दल कृतीची कणभर जबाबदारी आपल्यावर नसते, त्याचे खापर सरकारपक्षावर फोडण्यास, त्यातून त्यांचे जनमानसातील स्थान डळमळीत करुन स्वत:ची राजकीय भूमी वाढवण्यास त्यांची अर्थातच ना नसते.

पण बेगिन यांच्या सरकारवरील रोषामागे शांतता करार हे एकच कारण नव्हते. भ्रष्टाचाराचे आरोप हा ही एक मुद्दा होता. एका पाहणीनुसार चाळीस टक्क्यांहून अधिक जनतेने ’देशाची स्थिती समाधानकारक नाही. सबब हे सरकार बदलायला हवे’ असे मत नोंदवले होते. पण अजूनही सुमारे पन्नास टक्के जनता ’बेगिन हेच पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व अधिक सक्षमपणे करु शकतात’ या मताची होती. त्यामुळे निर्वाणीचा उपाय म्हणून बेगिन यांनी आपल्या जाज्ज्वल्य राष्ट्रवादाच्या मेडलला पुन्हा एकदा पॉलिश करायचा निर्णय घेतला.

राष्ट्रवाद हा अनेकदा अंतर्गत अस्मितेपेक्षाही शत्रूलक्ष्यी अधिक असतो. आपला समाज, आपले अनुयायी आपल्या पाठीशी राहायला हवे असतील तर कायम बाहेरचा बागुलबुवा जिवंत असावा लागतो. महाभारतात दुर्योधन म्हणतो, ’पांडव आहेत म्हणून माझे नव्याण्णव भाऊ माझ्या पाठीशी आहेत. अन्यथा कौरव साम्राज्यातला आपापला वाटा मिळवण्यासाठी ते माझ्याच विरोधात उभे राहू शकतात.’ जगभरातला महायुद्धोत्तर जपानचा कदाचित एकमेव अपवाद वगळला, तर हा शत्रूलक्ष्यी राष्ट्रवादाच्या मांडणीचा नियम त्या त्या देशांतील नेत्यांनी तंतोतंत ओळखलेला दिसतो. जनतेच्या मनात शत्रूला धडा शिकवणारा नेता हा आपोआपच अंतर्गत कामांसाठीही लायक समजला जातो. या दोन गोष्टींना लागणारे शहाणपण, कौशल्य वेगवेगळे असले तरी जनतेला त्याची फारशी फिकीर नसते किंवा त्यातील फरक समजण्याइतकी वैचारिक कुवत बहुसंख्येत असत नाही. (महायुद्धोत्तर काळात ब्रिटनमध्ये झालेला चर्चिलचा पराभव हा एक अपवाद.) त्यामुळे असा नियंत्रित युद्धाचा खेळ खेळून ढासळत्या प्रतिमेचा सत्ताधारी सहजपणे पुढच्या निवडणुकीत जनमत आपल्या बाजूने वळवू शकतो.

शांतता करार केल्यामुळे इजिप्तशी लष्करी संघर्ष उभा करणे बेगिन यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नव्या शत्रूची निवड केली. आणि ज्याची निवड केली तो असा देश होता की ज्याच्याशी इस्रायलच्या सीमा जोडलेल्या नाहीत. दोघांच्या मध्ये ’तटस्थ’ असलेल्या जॉर्डनची पाचर होती. यामुळे जो हल्ला ते करणार होते त्यातून ताबडतोब लष्करी संघर्ष उभा राहण्याची शक्यता कमी होती. तो उभा राहितो निवडणुका पार पडणार होत्या. शिवाय इराक या राष्ट्राविरोधात युद्ध नव्हे, केवळ एका नेमक्या टार्गेटविरोधात ’सर्जिकल स्ट्राईक’चा निर्णय घेत, युद्धाची शक्यता आणखी कमी केली. या सार्‍या साधकबाधक विचाराअंती दोनच वर्षांपूर्वी ’कॅंप डेविड’मध्ये सादत यांच्याबरोबर शांततेचे गाणे गाणार्‍या नेत्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपला थेट संघर्ष नसलेल्या इराकवर नियंत्रित हल्ला केला.

१९७७ मध्ये ज्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना तत्कालीन लेबर पार्टी/अलाइनमेंट आघाडी करत होती त्याच प्रकारची परिस्थिती बेगिन यांच्यासमोर १९८१ मध्ये होती. प्रथमच मिळालेली सत्ता गमावण्याचा धोका त्यांच्यासमोर होता. याची प्रचिती निकालानंतर आलीच होती. कारण १९७७ मध्ये २४ टक्के मते मिळवणार्‍या अलाइनमेंट आघाडीने १९८१ मध्ये तब्बल ३६ टक्क्यांवर झेप घेतली होती. परंतु बेगिन यांच्या पक्षानेही ३३ वरुन ३७ टक्क्यांवर जात अलाइनमेंटपेक्षा अर्धा टक्का मते आणि एक जागा जास्त मिळवली आणि जिवावरचे बोटावर निभावले. या अर्ध्या टक्क्याचे श्रेय ’ऑपरेशन ऑपेरा’ला दिले तर ते फारचे चुकीचे ठरणार नाही. या जेमतेम विजयाच्या जोरावर लिकुड पार्टीने प्रतिस्पर्धी अलाइनमेंट आघाडीच्या आधी सत्ता स्थापनेची संधी घेतली आणि आघाडीचे सरकार स्थापन केले. बेगिन यांनी पुन्हा एकवार पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

बेगिन यांच्याप्रमाणेच नरेंद्र मोदी यांनी भारतातील मध्य-डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या कॉंग्रेसची सद्दी मोडून काढत उजव्या विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाचे स्वबळावरील पहिले सरकार स्थापन केले होते. बेगिन यांच्याप्रमाणेच त्यांनी समाजवादी परंपरेतील अनेक प्रघात, व्यवस्था मोडीत काढल्या आणि नव्या व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल केली होती.

पण यादरम्यान त्यांनी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले. नोटाबंदीसारखा निर्णय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देणारा ठरला. बेरोजगारीचा अधिकृत डेटा देण्याचा प्रघात बंद करणे, पत्रकार परिषदा न घेतल्याने जनताविन्मुख असल्याचा आरोप होऊ लागले. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटीज वगैरे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट जमिनीवर काहीच दिसत नव्हते. बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती ठरणार असे आरोप होऊ लागले होते. राष्ट्रवादाच्या डरकाळ्या फोडणार्‍या बेगिन यांनी जसा इजिप्तबरोबर शांतता करुन सायनायचा जिंकलेला प्रदेश परत दिला, तसेच पाकव्याप्त काश्मीर जिंकून घेतील अशा गर्जना मोदींच्या वतीने त्यांचे समर्थक करत असताना, प्रत्यक्षात मोदी पंतप्रधान होताच जून २०१४ मध्ये बांग्लादेशबरोबर करार करुन सीमेजवळच्या वादग्रस्त भूभागापैकी ५१० एकर घेण्याचे मान्य करुन उरलेली तब्बल १०,००० एकर जमीन बांग्लादेशला देऊन टाकली. १९७६ मध्ये कच्चतिवू बेटांवरचा हक्क सोडून ते बेट श्रीलंकेला देऊन टाकल्याच्या ’देशद्रोही’ कृत्याबद्दल जनता कॉंग्रेसला कधीही माफ करणार नाही म्हणणारे मोदींच्या पक्षाचे ’मार्गदर्शक’ इथे मात्र मूक राहिले.

इतकेच नव्हे तर २०१६ मध्ये झालेल्या पठाणकोट तळावरील आत्मघातकी अतिरेकी हल्ल्याने बलशाली नेता या त्यांच्या इमेजला जोरदार धक्का बसला. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन हजारहून अधिक सैनिकांचा ताफा पुलवामामधून जात असताना जैश-ए-महंमदच्या आत्मघातकी अतिरेक्याने स्फोटकांनी भरलेली एक कार त्यावर आदळून स्फोट घडवून आणला. यात तब्बल चाळीस सैनिकांचा मृत्यू झाला. मोदी पंतप्रधान झाले की ते पाकिस्तानला जरबेत ठेवतील, अतिरेकी कारवाया संपुष्टात येतील या दाव्यांना हल्ल्यांनी साफ उध्वस्त केले. योम-किप्पूर युद्धानंतर गोल्डा मायर यांना ज्या प्रकारच्या आरोपांना सामोरे जावे लागले होते, तशाच स्वरुपाचे आरोप मोदी यांच्यांवर होऊ लागले होते. इतक्या प्रचंड संख्येने जवान एकत्र आणणे ही अतिशय गंभीर अशी डावपेचात्मक चूक होती. त्याबाबत चौकशी व्हावी अशी ओरड सुरु झाली. या हल्ल्याची सूचना मिळूनही मोदी यांनी तातडीने हालचाल केली नाही असा आरोप झाला. हा हल्ला झाल्याची सूचना मिळूनही मोदी यांनी त्याचें चालू असलेले डॉक्युमेंटरीचे चित्रीकरण तातडीने थांबवून दिल्लीला धाव घेतली नाही असा आरोप करत विरोधी पक्षांनी टीकेचा भडिमार केला. या आणि अशा अनेक कारणांनी सरकार अप्रिय होऊ लागले होते.

पण असे असूनही बेगिन यांच्याप्रमाणेच पंतप्रधान म्हणून मोदी यांनाच देशातील बहुसंख्य नागरिकांनी पहिली पसंती दिली होती. त्यामुळे २०१९ मधील मोदींसमोरील परिस्थिती ही १९८१ मधील बेगिन यांच्यासमोरील स्थितीसारखीच होती. त्यामुळेच बहुधा त्यांनीही बेगिन यांच्याप्रमाणेच निर्णय घेतला. इस्रायलच्या संघर्षाचा विचार करता इस्रायलच्या शेजारी राष्ट्रांच्या लढ्याला ज्यू वि. मुस्लिम अशी किनारही असल्याने बेगिन यांना एकाहुन अधिक शत्रू निवडण्याची मुभा होती. मोदींसमोर पाकिस्तानखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. परंतु तो पारंपरिक शत्रू, आणि दोन्ही देशांची सीमा काय अशांतच नव्हे तर युद्धसंमुख असल्याने, प्रत्यक्ष हल्ला हा सहजपणे व्यापक युद्धामध्ये परिवर्तित होणार हे सांगायला कुण्या तज्ज्ञाचीही गरज नव्हती.

त्यामुळे ज्याप्रमाणे बेगिन यांनी इराकविरोधात नाही, फक्त अणुइंधन निर्माण करणार्‍या अणुभट्टीवरच हल्ला केला तसेच ’हल्ला पाकिस्तानात तरी पाकिस्तानविरोधात नाही’ असा मध्यममार्ग काढण्यात आला. यातून आम्ही पाकिस्तानविरोधात कारवाई केलेली नाही असा देणारा तर्क आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठेवता येईल अशी तजवीज करण्यात आली. आणि निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी हा हल्ला केला असा देशांतर्गत विरोधकांचा आरोप खोडून काढता यावा यासाठी निवडणुका घोषित होण्याच्या थोडे आधीच हा हल्ला उरकण्यात आला. जैश-ए-महंमद संघटनेच्या बालाकोट येथील अतिरेक्यांच्या तळावर हा हल्ला केला गेला असे जाहीर करण्यात आले. चार शक्तिशाली बॉम्ब या तळांवर टाकून ते उध्वस्त केले गेले असे अधिकृत पातळीवर जाहीर करण्यात आले.

खुद्द लष्कराने मात्र ’उद्दिष्ट साध्य झाले.’ अशी मोजकी प्रतिक्रिया दिली. पुढे ’माणसे ठार मारणे हे हल्ल्याचे उद्दिष्टच नव्हते.’ अशी धूसर पण वास्तवाकडे तिकडे अंगुलिनिर्देश करणारी प्रतिक्रिया दिली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैनिक वा नागरिक ठार झाला नसल्याचे स्पष्ट केले. मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी ’माणसे मारणे हे आमचे उद्दिष्टच नव्हते, केवळ पाकिस्तान आणि अतिरेक्यांना इशारा देणे एवढेच होते.’ असे स्पष्टपणे म्हटले. उपग्रहांतून मिळालेली माहिती आणि स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलेल्या पाहणीतून बॉम्ब टाकल्याचे पुरावे दिसून आले, तरी एक जुनी इमारत उध्वस्त होण्यापलीकडे काही हानी झाली नसल्याचे, तसंच मनुष्यहानी झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे जाहीर करण्यात आले. पण मोदींकडे एक हुकुमाचा एक्का होता आणि तो म्हणजे भारतीय माध्यमे!

त्यांनी तीनशेपासून सहाशेपर्यंत अतिरेकी ठार झाल्याच्या बातम्या पसरवल्या. सोबत कम्प्युटर ग्राफिक्स, स्टुडिओ ड्रामामार्फत हा हल्ला प्रचंड होता आणि पाकिस्तानचे कंबरडे मोडल्याचे सामान्य भारतीयाच्या मनात ठसवून दिले. पहाटे झालेल्या हल्ल्यातील इतके मृतदेह उजाडेपर्यंत पाकिस्तानने साफ केले का? पाकिस्तान इतका कार्यक्षम देश आहे हे तुम्हाला मान्य आहे का? वगैरे प्रश्न मोदी समर्थकांनी नेहमीप्रमाणे हेत्वारोपाने उडवून लावले. मोदींनी खेळलेला हा डाव कमालीचा यशस्वी ठरला. दोलायमान स्थिती असलेले सरकार उलट नेत्रदिपक विजयासह, मागील निवडणुकीहून अधिक बहुमताने निवडून आले.

पण देशांतर्गत राजकारणातील आपली इमेज सुधारण्यासाठी असे नियंत्रित वा उकरुन काढलेले युद्ध वा हल्ले करणारे बेगिन वा मोदी हे काही अपवाद नाहीत. ’देश संकटात आहे’ची जाणीव त्या देशातील आपले सत्तास्थान डळमळीत झाले आहे याची जाणीव झालेल्या प्रत्येक बहुतेक नेत्यांना होत असते. २००१ मध्ये झालेल्या ९/११च्या प्रसिद्ध अतिरेकी हल्ल्यानंतर आपली ढासळती इमेज सुधारण्यासाठी ’इराक हा देश अतिसंहारक शस्त्रांची निर्मिती नि साठवणूक करीत असल्याचा’ आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी २००३मध्ये त्या देशावर हल्ला करुन त्याचा विध्वंस केला. ९/११मुळे क्षुब्ध झालेल्या अमेरिकेतील नागरिकांना जवळजवळ दोन वर्षांनंतर सूडाचे समाधान दिले. वास्तविक हल्ले अल-कायदा या संघटनेने केल्याचे जाहीर केले गेले होते आणि या संघटनेचे धागे इराकपेक्षा अमेरिकेचा मित्रदेश सौदी अरेबियाशी अधिक जोडले गेले होते. पण बळी पडला तो इराकचा. पुढे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना अमेरिकेच्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे आढळून आले. पण इराकचा विध्वंस व्हायचा तो होऊन गेला होता... आणि बुश यांना २००४ मध्ये अध्यक्षपदाची दुसरी संधीही मिळून गेली होती!

’अंधारात हरवलेली अधेली उजेडात शोधून सापडत नाही’ अशी एक म्हण आहे. पण बेगिन, बुश, मोदी यांच्यासारख्यांनी यांनी ती यशस्वीपणे शोधून दाखवली आहे.

-oOo-

१. अश्केनाझ हा ज्यूंच्या प्राचीन इतिहासातील एक महत्वाचा नेता. हा प्रत्यक्ष नोहाचा वंशज मानला जातो. त्याच्या वंशावळीतले आपण आहोत असे मानणारे ते अश्केनाझी.

२. India-Bangladesh land boundary bill passed by RS again

(पूर्वप्रसिद्धी: ’द वायर-मराठी’ )

रविवार, २४ मे, २०२०

राष्ट्रवादाचा ‘तंत्र’मार्ग

यापूर्वीच्या निवडणुका आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुका यांत एक महत्त्वाचा फरक आहे; तो म्हणजे यांत झालेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये एका बाजूने वृत्तवाहिन्या येतात, तसेच इंटरनेटच्या माध्यमांतील संकेतस्थळे, फेसबुक आणि ट्विटरसारखी समाजमाध्यमे, मोबाइल व त्यावरील व्हॉट्सअ‍ॅपसारखी संवादी माध्यमे या साऱ्यांचा समावेश होतो. या सर्व माध्यमांतून मोदींच्या खऱ्या-खोटय़ा यशोगाथांचा, काँग्रेसच्या खऱ्या-खोटय़ा पापांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक सूत्रबद्ध यंत्रणा उभी करण्यात आली होती. जी कमालीची यशस्वी ठरली. यात अधिकृत माध्यमांमधील प्रतिनिधी होते, तसेच समाजमाध्यमांमध्ये मोदींचा किल्ला लढवणारे स्वयंसेवकही. ही यंत्रणा उभी करण्यामागचे मेंदू व हात आणि त्या यंत्राचे इतर भाग यांचा आढावा रोहित चोप्रा यांनी ‘द व्हर्च्युअल हिंदू राष्ट्र’ या पुस्तकात घेतला आहे.

स्वत: चोप्रा हे भारतातील इंटरनेटच्या उगमकाळीच रेडिफसारख्या अग्रगण्य माहिती-तंत्रज्ञान कंपनीमध्ये काम करत होते. त्यातून त्या इंडस्ट्रीच्या विकासाचे विविध टप्पे त्यांना अनुभवता आले. आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या आधारे त्यांनी ‘तंत्रज्ञान आणि भारतीय राष्ट्रवाद’ या विषयावर एमरी विद्यापीठाला प्रबंध सादर केला. त्या प्रबंधातील महत्त्वाचे मुद्दे घेऊन, अभ्यासकाचा दृष्टिकोन राखून- पण भाषा वगळून, काही भर घालून हे पुस्तक सिद्ध झाले आहे.

स्वप्नाळू गृहीतके...

मोदींच्या पूर्वी अथवा समकालीन वापरात ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’सारखे भांडवलशाहीविरोधी आंदोलन, टय़ुनिशियामधून सुरू झालेला आणि इतर अरब राष्ट्रांत पसरलेला ‘अरब स्प्रिंग’ हा उठाव, २०१७ मध्ये वॉशिंग्टनमध्ये निघालेला महिला मोर्चा आदी चळवळींचा उगम हा इंटरनेटच्या माध्यमातून झालेला दिसतो. निव्वळ राजकीय प्रचारासाठी मोदींसह रशियाचे पुतिन आणि अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इंटरनेटचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे.

पण यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना या नव्या माध्यमांत मानवी धारणांवर प्रभाव पाडण्याची काहीएक जादूई शक्ती आहे असा गैरसमज झालेला दिसतो; पण ते तंतोतंत खरे मानण्याचे कारण नाही, असे चोप्रा बजावतात. याला ते ‘लिबर्टेरिअन टेक्नो-युटोपिया’ असे म्हणतात. याशिवाय हा समज इंटरनेटच्या मूळ व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वाशी विसंगत आहे, असे निदर्शनास आणून देतात. किंबहुना अशा स्वप्नाळू गृहीतकांमधून बाहेर येण्यासाठीच तंत्रज्ञानाच्या सामाजिक-राजकीय परिणामांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा, असे प्रतिपादन ते करतात. त्यांच्या प्रबंधातून आणि या पुस्तकातूनही मांडलेला अभ्यास मोदींची, भाजपची धोरणे, वाटचाल नापसंत असलेल्याने केलेला आहे हे उघडच आहे. पण तो वैयक्तिक भाग बाजूला करूनही पुस्तकाने अभ्यासकाची शिस्त बऱ्यापैकी पाळलेली दिसते.

या अभ्यासाला दोन महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला म्हणजे, एकूणच हिंदुराष्ट्रवादाचा इतिहास, त्याची लक्षणे नि अनुषंगे. दुसरा इंटरनेटच्या उदयानंतर त्या माध्यमांतील हिंदुराष्ट्रवादी व्यक्ती नि संघटनांची वाटचाल. चोप्रा यांनी इंटरनेट माध्यमातील आणि त्यापूर्वीचे हिंदुराष्ट्रवादी- जे या व्यापक ‘हिंदू प्रोजेक्ट’चा भाग आहेत त्यांना ‘हिंदू-उजवे’ (हिंदू राइट) अशी संज्ञा वापरली आहे. मराठीमध्ये यांस हिंदू-अस्मितावादी म्हणता येईल. यात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशी तीनही अनुषंगे अंतर्भूत होतात.

‘हिंदू’ ओळख पुनर्स्थापित करताना...

‘हिंदू’ ही ओळख पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न देश नि परदेशातील अनेक हिंदूंनी, संघटनांनी सुरू केला. त्यात एका बाजूने ज्ञानाची मक्तेदारी पाश्चात्त्यांकडून हिसकावून घेण्यासाठी अर्वाचीन पाश्चात्त्य ज्ञान हे मूळ भारतीयच होते हे ठसवून सांगत असतानाच, दुसरीकडे उलट दिशेने ‘नासा’सारख्या पाश्चात्त्य ज्ञानाच्या प्रतीकाकरवी त्याला पाठिंबा मिळाल्याचे दावे, असे दुहेरी आणि परस्परविरोधी भासणारे प्रयत्न केले जातात. त्याचसोबत ताजमहाल, कुतुबमिनार यांसारखी मुस्लीम सत्तेची प्रतीकेही मूळची हिंदू असल्याचे ‘शोध’ प्रसृत करणे हा त्याचाच भाग. याशिवाय हिंदूंचा देदीप्यमान इतिहास, श्रेष्ठ हिंदू संस्कृतीचे डिंडिम, कॅन्सरमुक्तीपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रांत असलेले श्रेष्ठत्व, पाश्चात्त्यांबद्दलचा राग, त्यांनी आमचे ज्ञान पळवून आपले म्हणून खपवल्याचे दावे, भारत हा सांस्कृतिकदृष्टय़ा हिंदू असल्याचे आग्रही प्रतिपादन.. ही त्याची अन्य लक्षणे आहेत.

दुसऱ्या बाजूने दलित-मुस्लीम-पुरोगामी-बुद्धिजीवींना सातत्याने हिणवणे, देशद्रोही, देशाशी अप्रामाणिक असल्याचा, देशविरोधी कटकारस्थाने केल्याचे आरोप करून धुरळा उडवून देणे हा आक्रमक भागही येतो. ‘लिबटार्ड’, ‘सिक्युलर’ वगैरे शेरेबाजी; विरोधी नेत्यांना त्यांचे पूर्वज अन्य धर्मीय असल्याचे हिणवणे हा चारित्र्यहननाचा भागही. हा दुसरा शत्रुलक्ष्यी भाग इंटरनेटच्या माध्यमातून अधिक वेगाने प्रसारित झालेला दिसतो.

हिंदुराष्ट्रवादाच्या इंटरनेट अवताराची तुलना चोप्रा यांनी ब्रिटनमधील गोऱ्या-कॉकेशन राष्ट्रवादाशी, अमेरिकी राष्ट्रवादाशी आणि अगदी भारताशी निगडित असलेल्या, आज प्रभावहीन झालेल्या काश्मिरी आणि शीख राष्ट्रवादाच्या इतिहासाशी करत आपल्या अभ्यासाला तुलनात्मक विचारासाठी पार्श्वभूमीही उपलब्ध करून दिली आहे.

प्रचार-माध्यम

पुस्तकाच्या शीर्षकात असलेला ‘व्हर्च्युअल’ हा शब्द प्रामुख्याने इंटरनेटच्या जगासंदर्भातच वापरला जात असला, तरी चोप्रा यांनी एकुणात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा विचार केला आहे. त्यामुळे त्यांनी यात वृत्तवाहिन्यांच्या भूमिकेचा, प्रभावाचा अभ्यासही समाविष्ट केला आहे. इंटरनेट असो वा वृत्तवाहिन्या, ही एका बाजूने स्वतंत्र माध्यमे आहेत, तर दुसरीकडे रेडिओ, मुद्रित साहित्यासारख्या जुन्या माध्यमांना मिळालेले नवे आयाम. या दोन्ही भूमिकांना तपासण्याचा चोप्रा यांचा प्रयत्न आहे.

हस्तलेखनाला मुद्रणाच्या साहाय्याने प्रतींमध्ये रूपांतरित केले गेले ते खऱ्या अर्थाने पहिले माध्यम. शब्द हा त्याचा गाभा. त्यातून पुढे पुस्तके, वर्तमानपत्रे आदी तज्ज्ञांच्या आधिपत्यांखालील माध्यमे अवतरली. पुढे ऑडिओ कॅसेट हे पहिले माध्यम असे आले की, ज्यात सर्वसामान्य व्यक्ती वैयक्तिक पातळीवर एका लहानशा, सहज वाहून नेता येण्याजोग्या यंत्राच्या साहाय्याने आपले म्हणणे मांडू शकत होती, इतरांपर्यंत पोहोचवू शकत होती. त्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची वा अवजड यंत्रसामग्रीची गरज नव्हती. रामजन्मभूमी आंदोलनाच्या उदयकाळात आणि आधीही वर उल्लेख केलेल्या मुद्दय़ांच्या आक्रमक प्रचाराच्या कॅसेट तयार करून भाजप आणि संघ परिवाराने परिणामकारकरीत्या त्यांचा प्रचार-माध्यम म्हणून वापर करून घेतला होता.

ज्याप्रमाणे ऑडिओ कॅसेटचा वापर भाषण आणि प्रचारसाहित्याच्या प्रसारासाठी केला गेला, त्याचप्रमाणे मनोरंजन माध्यमांचा वापरही केला गेला. सध्या टाळेबंदीच्या काळात पुनप्र्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेने दूरदर्शनवर तोवर असलेला अधार्मिक कार्यक्रमांचा संकेत मोडून नवा पायंडा पाडला. मग प्रामुख्याने खासगी वाहिन्यांच्या उदयानंतर नफा हे एकमेव उद्दिष्ट असलेल्या वाहिन्यांनी धार्मिक, पौराणिक, पारंपरिक मालिकांचा धडाका लावला. यातही हिंदुराष्ट्रवाद्यांच्या ‘हिंदू’ ही ओळख ठळक करत नेण्याच्या प्रयत्नांचा अप्रत्यक्ष सहभाग होताच.

वेब १.० आणि वेब २.०

यानंतर आलेल्या इंटरनेटच्या इतिहासाचे वेब १.० आणि वेब २.० असे दोन भाग चोप्रा यांनी कल्पिलेले आहेत. यात पहिल्या प्रकारात संकेतस्थळे आणि दोन व्यक्तींमधील थेट संवाद प्रस्थापित करणारी ईमेल, मेसेंजर आदी माध्यमे येतात, तर दुसऱ्या प्रकारात समाजमाध्यमांचा समावेश होतो. पहिला भाग हा केवळ माहितीशी निगडित आहे. इथे व्यक्तींना या माहितीच्या स्रोताकडे यावे लागते. तर दुसरा भाग आहे तो इंटरनेट ऑनलाइन संवाद आणि माहितीनिर्मितीचा. या दुसऱ्या प्रकारात तज्ज्ञांची सद्दी मोडीत निघून सर्वसामान्य व्यक्तीही मजकूर, ज्ञान, माहिती यांची निर्मिती करते आणि तिची व्याप्ती कित्येक पट अधिक होते. शिवाय ही माध्यमे मोबाइलसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तीपर्यंत पोहोचतात.

व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अनियंत्रित माध्यमांतून सिद्ध करता न येणारे दावे सुरक्षित संवादाच्या माध्यमातून पसरवता येतात. हे माध्यम ‘जाळ्यांचे जाळे’ आहे, असे चोप्रा म्हणतात. यातील प्रसारणावर चित्रपट वा नाटक यांसारख्या माध्यमांवर असलेली कोणतीही बंधने वा नियंत्रणे नसतात. त्यामुळे हे माध्यम प्रचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. भाजप आणि हिंदू-उजवे या माध्यमांचा वापर पुरेपूर करून घेतात. हे माध्यम साधारणपणे जुन्या काळातील ऑडिओ कॅसेटसारखे आहे.

संवादातून हिंसेकडे...

इंटरनेटवरील संवाद अथवा देवाणघेवाणीतून विसंवाद नि सामाजिक तणाव अधिक निर्माण होतो का? व्यक्ती आणि गटांना बांधिलकी निर्माण करण्यास कितपत साहाय्यभूत ठरतो? यातून विशिष्ट विचारसरणी आणि विशेषत: राजकीय विचारसरणीचे प्रक्षेपण करणे शक्य होते का? आणि होत असेल तर असा कृत्रिमरीत्या निर्माण केलेला प्रभाव दीर्घकाळ राहतो की तात्कालिक? अशा अभ्यासादरम्यान नव्या चौकटी, नवे दृष्टिकोन, भाषा निर्माण होतात का? आणि या इंटरनेट विश्वाला समोर ठेवून केलेल्या अभ्यासातून काढलेले निष्कर्ष बाहेरील वास्तविक जगाला लागू करता येतील का?.. या प्रश्नांना समोर ठेवून चोप्रा यांनी अभ्यासाची मांडणी केली आहे. किंबहुना त्यांच्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे अशा प्रश्नांच्या गटाला समोर ठेवूनच गुंफले आहे.

भारतातील राजकीय संघर्ष हा एका बाजूने सेक्युलॅरिझमचे समर्थक, काँग्रेस अथवा ‘आप’चे समर्थक, पुरोगामी यांची भारतीय समाज व राज्य यांच्याबद्दलची कल्पना आणि हिंदुराष्ट्रवादी व मोदी-समर्थक यांची कल्पना यांच्यातील आहे, असे चोप्रा यांचे म्हणणे आहे. या आणि अशा विविध मुद्दय़ांचा ऊहापोह करताना ते अमेरिका वा पाश्चात्त्य जगातील अशाच समांतर मुद्दय़ांचा उल्लेख करतात. अमेरिका, ब्रिटन आणि भारत या तीनही ठिकाणी नेता, नेता-समर्थक आणि इंटरनेट सैनिक यांचा शाब्दिक आक्रमकपणा वास्तविक जगात हिंसेला उत्तेजन देतो. भारतात तर धर्म, वर्ग, जात, सामाजिक पत यांच्या विषमतेतून हिंसा झिरपते आणि त्यातून घडणाऱ्या मन बधिर करणाऱ्या घटनांनी वृत्तपत्रांची पाने भरलेली दिसतात. अख्लाकची हत्या, दलितांना जाहीरपणे फटके देणे, गोमांस असल्याच्या, गाईंना खाटकाकडे नेत असल्याच्या संशयावरून मारहाण/ हत्या आदी घटनांमध्ये बळी पडणारे प्रामुख्याने मुस्लीम, दलित वा निम्नवर्गीयच दिसतात. पण हे मुद्दे मांडत असतानाच, या प्रचाराला भारतीय नागरिक, हिंदू अनुकूल होत गेले यामागची कारणे तपासताना चोप्रा यांनी त्यापूर्वीच्या काँग्रेस शासनाच्या धोरणांचा, चुकांचा आढावाही घेतला आहे.

भाजपला माध्यमांचे महत्त्व विरोधकांच्या आधी ओळखल्याचा फायदा मिळाला हे खरेच आहे. पण केवळ प्रथम-प्रवेशाचा फायदा पुरेसा होतो का? आज मोदी-भाजप राजकारणात आणि हिंदुराष्ट्रवादी इंटरनेटवरील राजकारण आणि समाजकारणात आपापल्या प्रतिस्पध्र्यापेक्षा कैक योजने पुढे दिसतात, ते कसे? हा प्रश्न कळीचा आहे, आणि चोप्रा यांनी त्याचा वेध घेण्याच्या दृष्टीने पुढील विवेचन उलगडत नेले आहे. इंटरनेट उदयानंतर खासगी, सार्वजनिक आणि राजकीय संवादात झालेले लक्षणीय बदल आणि भारतीय राजकारण आणि समाज यांच्यात झालेली उलथापालथ यांचा वेध घेतला आहे. मोदींच्या सामाजिक, राजकीय विजयामागे कोणती यंत्रणा होती? तीत सहभागी प्रमुख व्यक्ती कोण नि त्यांच्या भूमिका कोणत्या होत्या, याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले आहे.

मिस्ड कॉल अभियान

या साऱ्या यंत्रणेच्या उभारणीमध्ये राजेश जैन या उद्योगपतीची प्रमुख भूमिका होती. जैन हे वैचारिकदृष्टय़ा उजवे म्हणता येणार नाहीत. पण तत्कालीन काँग्रेस सरकारची लोककल्याणकारी धोरणे ही देशाच्या आर्थिक प्रगतीला मारक आहेत, असे त्यांचे मत होते. मोदी यांचे तथाकथित ‘गुजरात मॉडेल’ पाहता त्यांनी आपले वजन मोदींच्या पारडय़ात टाकले. त्यांनी प्रथम ‘डिजिसेंट्रल’ नावाची कंपनी स्थापन करून तिच्या अंतर्गत काही संकेतस्थळे चालू केली. जैन यांनी आरिआना हफिंग्टन यांचे माध्यम प्रारूप राबवले. एक तर इंटरनेट हे माध्यम नवा उद्योग उभा करण्याच्या दृष्टीने कमी खर्चीक, त्यात तज्ज्ञ माध्यमकर्मीना बाजूला सारून हौशी लेखकांना जागा दिली की छापील नावासाठी ते फुकट लिहिण्यासही तयार होतात. यातून ही संकेतस्थळे किमान खर्चात चालवता येतात. ‘हिंदू-प्रोजेक्ट’चे स्वयंसेवक अशा – खरे तर त्यांच्याचसाठी निर्माण केलेल्या – व्यासपीठाचा फायदा न उठवतील तरच नवल!

पण जैन यांचे याहून मोठे योगदान म्हणजे ‘मिस्ड कॉल अभियान’. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या मार्फत अण्णा हजारे यांनी केलेल्या भ्रष्टाचारविरोधी उपोषणाची इंटरनेटवरील संपूर्ण बाजू जैन यांनी सांभाळली होती. पैसे खर्च न करता आम्हाला पाठिंबा द्या, एक मिस्ड कॉल द्या, असा प्रचार त्यांनी केला. यातून त्या फोन क्रमांकाच्या आधारे त्याच्या मालकाचा पाठिंबा आंदोलनाला आहे, असा दावा तर करता येतच होता; वर हजारो नागरिकांचा आयता डेटाबेसही – टेलीकॉम कंपनीला एक पैसा न देता – तयार होत होता. पुढे हेच तंत्र त्यांनी मोदींच्या प्रचाराच्या वेळी, भाजपच्या सदस्यत्व अभियानाच्या वेळी वापरले. त्यांच्या इंटरनेट स्वयंसेवकांनी विविध दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह या मिस्ड कॉलचे जोगवे मागत ते यशस्वीही केले. इतकेच नव्हे तर अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी तयार झालेला डेटाबेसही त्यांनी मोदींच्या प्रचाराला वापरला, असा आरोप अनेकांनी केला. तो अर्थातच सिद्ध करता येण्याजोगा नाही. पण यानिमित्ताने अण्णांच्या आंदोलनामागचे सूत्रधारही ‘हिंदू-प्रोजेक्ट’शी या ना त्या प्रकारे संबंधित होते, याकडे चोप्रा यांनी लक्ष वेधले आहे.

त्यांच्या भाषेत ‘हिंदू-उजवे’ अथवा हिंदुराष्ट्रवाद्यांच्या या ऑनलाइन प्रोजेक्टचा असा सांगोपांग आढावा घेत असतानाच काही त्रुटीही राहून गेलेल्या दिसतात. मोदीपूर्व, इंटरनेटपूर्व हिंदुराष्ट्रवाद्यांच्या इतिहासामध्ये हिंदू महासभेचा उल्लेख नाही. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या पुस्तिकेच्या आधारे हिंदुत्वाची ओळख निर्माण केली गेली, असा ओझरता उल्लेख केला असला तरी त्याची कारणमीमांसा केलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वास्तव जगात निर्माण केलेल्या संघटनात्मक जाळ्याचा वेध घेणे सोडाच, पण उल्लेखही चोप्रा यांनी केलेला दिसत नाही.

-oOo-

'द व्हर्च्युअल हिंदू राष्ट्र’ लेखक : रोहित चोप्रा प्रकाशक : हार्पर कॉलिन्स

(हा पुस्तक परिचय दै. लोकसत्ता’च्या २३ मे २०२० च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. संपादना-साहाय्याबद्दल लोकसत्ताचे प्रसाद हावळे यांचे आभार.)