मंगळवार, २३ जून, २०२०

अगायायायायफोन

काही महिन्यांपूर्वी एका कार्यशाळेमध्ये आम्ही एका चित्रपटाचा शो आयोजित केला होता. मर्यादित लोकांसाठी असल्याने थिएटर नव्हते. तेव्हा सरळ लॅपटॉपवरुन प्रोजेक्टरला जोडावे असा प्लान होता. प्रोजेक्टर असो वा बाह्य मॉनिटर वा टीव्ही, वाटेल त्याला एक एचडीएमआय केबल जोडली की तो लॅपटॉप बिचारा निमूट चित्रपट वा गाण्याचा नळ सोडून पाणी वाहतं करतो असा अनुभव आमचा. पण आमचा माज साफ उतरला कारण दिग्दर्शक महाशयांचा लॅपटॉपचा धर्म वेगळा होता...

साहेब आले ते अ‍ॅपल घेऊन. त्यांच्या त्या लॅपटॉपने आधी आमच्या प्रोजेक्टरकडे बघून नाक मुरडले नि ’पोरगी नकटी आहे, मी सोयरिक करणार नाही’ म्हणून जाहीर केले. मग एक यूएसबी फ्लॅशडिस्क ऊर्फ पेनड्राईव्हवर घेऊन तो प्रोजेक्टरला जोडू असे ठरले. तो प्रयोग सुरु झाला नि महाशय यूएसबीला नाके मुरडू लागले. मग दुसरा एक समंजस लॅपटॉप आणून तिला थोडा मेकप केला. आता साहेब राजी झाले. राजी झाले, अक्षता पडल्या.

पण आता दादला नांदवायलाच तयार नाही. आता काय झाले बाबा? म्हणून दादापुता केला तर म्हणे, ’ही आधी दुसर्‍या घरी नांदून आलेली दुसरेपणाची बाईल मला दिलीत. ही माझ्या स्टेटसची नाही.’ मग पुन्हा नाकदुर्‍या काढणे सुरु झाले. पार्टिशन बदलून पाहा, जीपीटी काय एम्बीआर काय, सगळी पोथी वाचून झाली... नवरदेव रुसला तो रुसलाच. मग म्हटले बाबा तुला थेट नांदवायची नसेल तर ’निळ्या’ पडद्याआडूनच ’कुबूल है, कुबूल है, कुबूल है’ म्हणतोस का? ’लाँग डिस्टन्स’ रिलेशन्स चालेला का? तर म्हणे, ’आमच्यात ती पद्धत नाही. आमची रीतभात काही लक्षात घ्याल की नाही. तुम्ही एक गावचे उंडारबक्ष लोक, आम्ही खानदानी आहोत. खानदानी नसलेल्यांना आमच्या ओसरीवर देखील प्रवेश देत नाही आम्ही.’

आता याच्यासाठी खानदानी बाईल कुठून शोधायची या विवंचनेत आम्ही. एखाद्या अत्यंत महत्वाच्या सरकारी ठेक्याच्या फाईलवर सही करण्यासाठी बक्कळ पैसे घेऊन वर ऐन सहीच्या वेळी पोरासाठी नवा मोबाईल मागणार्‍या साहेबासारखा हा अडूनच बसला. सही झाली की काम सुरु करायचे म्हणून भरपूर व्याजाने बाजारातून पैसे उचलून बसलेला ठेकेदार जसा जेरीला येईल तसे आम्ही घायकुतीला आलो. मी हरलो. मग काही तरुण मंडळी, नवरदेवाची समजूत घालायला पाठवली. म्हटलं बाबांनो तुमची भाषा त्याला समजते का पाहा. ती ही हात हलवत परत आली. अखेर दीडेक तास रुसल्यावर - बहुधा त्याच्याकडचीच वर्‍हाडी मंडळी कंटाळल्याने - नवरदेव एकदाचा बोहोल्यावर चढला. आणि चि. अ‍ॅपल लॅपटॉपचा चि.सौ.कां. स्कॅनडिस्क फ्लॅशड्राईव्हशी विवाह पार पडला. आणि मधला वेळ भरुन काढण्याचे कौशल्य पुरेपूर वापरलेल्या आमच्या तरुण मित्रांच्या कृपेने सहनशक्ती जबर असलेल्या आमच्या सुमारे दहा टक्के प्रेक्षकांना अखेरीस तो चित्रपट पाहता आला.

एक प्रश्न असा होताच की आपण ही जी काय धोंड गळ्यात बांधून घेतली आहे ती चारचौघांपेक्षा नाक जरा लांब असलेली म्हणून, एक्स्लुसिव म्हणूनच, आणि तसे ते मिरवण्यासाठीच हे त्या दिग्दर्शकाला ठाऊक नसावे का? की आपलेही नाक सामान्यांपेक्षा अंमळ मोठे कसे आहे आणि तुमच्या सामान्यांच्या तंत्रज्ञानाचे आपले जमत नाही हे त्यालाही ठसवायचे होते? यापूर्वी या नखरेलपणाचे, इतरांशी फटकून वागण्याचे प्रकार त्याच्या अनुभवाचा भाग नव्हते का? मग तसे असेल तर आपल्यासाठी जे काही विशेष तंत्रज्ञान हवे त्याची मागणी - आढ्यतेने म्हणून का होईना - त्याने आधीच नोंदवायला काय हरकत होती. माझ्या अंदाजाने इतरांपेक्षा वेगळेपण मिरवण्यासाठी हा जाच तो सहन करत असावा. किंवा खड्ड्यात पडूनही ’मीच उडी मारली, खड्डा किती खोल आहे हे पाहण्यासाठी’ ची मखलाशी करत ’तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करण्याचा हा प्रकार असावा.

तुमच्या घराला चोरी, दरोडे वा अन्य गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही एखाद्या सुरक्षा तंत्रज्ञान कंपनीला तुम्ही आपले घर सुरक्षित करण्याचा ठेका दिला. आणि त्यांनी तुमच्या घराभोवती सात तट बांधून पन्नास कुत्री, दहा बंदूकधारी उभे करुन पाच पन्नास बंकर खोदून ठेवले. तुम्हाला घरात डांबून बसवले, आतला बाहेर जाणार नाही, बाहेरचा कुणीही आत येणार नाही याची चोख तजवीज केली. आता तुम्ही चोख सुरक्षित आहात हे खरे, पण तुमच्या स्वातंत्र्याचे काय? ’बाहेरुन तुमचा मित्र, नातेवाईक जरी येऊ पाहिल, तर त्याला हाकलून लावणारी ही सुरक्षा व्यवस्था काय कामाची?’ असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही?

मी माझ्या प्राचीन डेस्कटॉप पासून कालबाह्य लॅपटॉप पर्यत सर्वांवर वाटेल त्या प्रकारची कामे केली. म्युजिक फाईल कन्वर्शन्स केली, व्हिडिओ एडिटिंग केले. हवी ती सॉफ्टवेअर आणून वापरली. क्वचित पायरेटेडही. पण आमच्या या बाबाजींनी कधीच काही तक्रार केली नाही. कधी सो-कॉल्ड सुरक्षितता भेद झाला नाही. अर्थात फायरवॉल, अँटिव्हायरस, सुरक्षित ब्राउजर, नियमित मेंटेनन्स वगैरे बाबींची काळजी मी घेत असतो हा मुद्दा आहेच. पण म्हणजे हे सारे उपलब्ध आहेच, ते केवळ वापरण्याचे कष्ट नकोत म्हणून दुप्पट खर्च करुन मलाच स्थानबद्ध करणारी ब्याद मी विकत का घ्यावी... तर फॅशन वा चारचौघांपेक्षा वेगळॆ काहीतरी माझ्याकडे आहे, आम्ही एलिट वगैरे आहोत हे मिरवण्यासाठी!

याचे भावंड म्हणजे आयफोन. तो तर भांडवलशाही प्रॉपगंडा मशीनरीचा ’चालता-बोलता*’ प्रचारकच. इतर स्पर्धकांपेक्षा मी कित्त्ती कित्त्त्ती ग्रेट हे केवळ प्रॉपगंडा मशीनरीच्या साहाय्याने इतके पसरवले की दर सहा आठ महिन्यांनी येणारे प्रत्येक नवे व्हर्शन विकत घेण्यासाठी खुळचट जमाती रात्रीपासून रांगा लावतात म्हणे. बरं साहेबांची किंमत सर्वसामान्य सर्व-फीचर उपयुक्त फोनपेक्षा अडीचपट आणि फीचर्स मध्ये असंख्य बंधने.

हा निदान दिसायला तरी बरा आहे. चॉकलेट दिलं नाही म्हणून कोपर्‍यात बसलेल्या किरकिर्‍या पोरासारखे फायरिंग असलेली, भरपूर पेट्रोल पिणारी, टू-स्ट्रोक आणि दिसायलाही अनाकर्षक असणारी यामाहा आरएक्स-१०० हे प्रकरणही असलेच. कुण्या चलाख माणसाने बहुधा त्याची ती टुकार बाईक विकण्यासाठी निर्माण केलेले फालतू प्रेस्टिज मिरवणारे.

हे सारे आठवलेच मुळी आज वाचलेल्या या बातमीमुळे. या आगायायायायायाफोनमध्ये म्हणॆ गुगलच्या अँड्रॉईडमध्ये असणारी दहा फीचर्स आता अंतर्भूत केली आहेत. ही कुठली ते पाहिली तर ती इतकी मूलभूत आणि वापर सुटसुटीत करणारी आहेत की ही नसलेला फोन लोक आजवर का वापरत असावेत, असा प्रश्नच मला पडला. वर तो श्रेष्ठत्वाचा टिळा लावून मिरवतातही, हा तर कळस आहे.

सेलिंग पॉईंट एकच, म्हणे हा अधिक सिक्युअर आहे. वर म्हटले तसे याची सिक्युरिटी म्हणजे तुम्हालाच तुरुंगात घालून तुम्ही इथे सुरक्षित आहात म्हटल्यासारखी आहे. An apple a day keeps doctor away अशी एक म्हण आहे. ती बदलून आता An apple in hand keeps everyone away अशी करायला हवी. आणि सुरक्षिततेचे म्हणाल तर खुद्द अ‍ॅपल तुमच्या सुरक्षिततेचे कसे धिंडवडे काढते हे सॅमी कामकार या तंत्रज्ञाने दाखवून दिले आहेच. त्यामुळे माझ्या मते आयफोन विकत घेणे म्हणजे स्वतःच्या खुनाची सुपारी स्वतःच देण्यासारखे आहे.

या वर-नाक्या नवरदेवाची खिल्ली उडवणारे दोन स्टँड-अप कमेडियन्सचे व्हिडिओ आमच्या दोघा मित्रांनी पाठवले. ते इथे जोडतो आहे.

हा पहिला व्हिडिओ आहे वीर दास याचा. हा त्यातील तंत्रज्ञानाची खिल्ली उडवणारा. त्यात तो याला नवा धर्म म्हणतो ते अगदी तंतोतंत पटणारे आहे. प्रश्न न विचारता, चिकित्सा न करता त्याचे श्रेष्ठत्व विनातक्रार मान्य करणे; एवढेच नव्हे तर इतर धर्मांना दुय्यम म्हणून हिणवण्यात हिरिरीने सहभाग घेणे हे धर्माचे नि धार्मिकांचे व्यवच्छेदक लक्षण असते. आयफोनधारींमध्ये (आणि शाकाहारींमध्ये, विशेषत: विगन मंडळींमध्ये ) ते प्रतिबिंबित झालेले दिसते.

हा दुसरा त्याच्या मागे धावणार्‍या, न परवडणारा तो पांढरा हत्ती दाराशी आणून बांधण्याचा आटापिटा करणार्‍या प्रवृत्तीवर भाष्य करणारा.

इतके सगळॆ झाल्यावर ’त्याची नवी लाट येते आहे. सावध राहा.’ भावनेच्या पुरात वाहून जात पैशाचा चुराडा करु नका.’ हा धोक्याचा इशारा देऊन ठेवतो. तुमचा साधा फोनही उत्तम प्रकारे सिक्युअर करता येतो. इंटरनेटवर थोडी शोधाशोध केलीत तर सहज सापडेल. उत्तम फायरवॉल, मॅलवेअर शोधक अ‍ॅप, व्हिपीएन वगैरे वापरा. तितके पुरेसे आहे. उगाच देवळात देव आहे की दगड हे माहित नसूनही त्याची सहामाही वारी करणार्‍यांच्या मूर्ख जथ्याचा भाग होऊ नका.

हे हास्यास्पद वाटत असेल तर ही बातमी नजरेखालून घाला. हा अपवाद आहे हे मान्य आहे. पण असा अतिरेक धार्मिक बाबतीतच घडतो असे नव्हे. भांडवलशाहीच्या जगात कृत्रिमरित्या मोठ्या केलेल्या एखाद्या वस्तूच्या मालकीसाठी या थराला माणसे जाऊ शकतात, हे या निमित्ताने मान्य झाले तरी खूप आहे.
---

आमच्या एका कविमित्राने आयफोनच्या या माथेफिरु वेडावर एक कविता लिहिली आहे...

आयफोन
थोड्या आधी आला असतात तर मिळाला असता साहेब
अटळ भांडवली देणगी असणारी लाचार भावनांची बत्तिशी दाखवत सेल्समन म्हणतो.
अशा वेळी मी तरी शांत बसावं की नाही?
पण मी घेईन तर आयफोनच म्हणत
दुसऱ्या दुकानाकडे माझी स्वातंत्र्यपूर्व काळातली सायकल मारू लागतो
तेव्हा सायकलच्या त्या जुन्या, दरिद्री चाकांखाली
अनेक बत्तिशा, अनेक सेल्समन चिरडले जातात
आणि मी मात्र पृथ्वीच्या गाभ्यातले रहस्य गवसल्यासारखा
सायकलचे पॅडल मारतो…
जोरात….अजून जोरात.
माझी मस्ती आता इतकी वाढलेय की आता आयफोन जरी आला चाकाखाली
तरी मी थांबणार नाहीये…

- उत्पल व. बा.



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा