मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

'लंगोटाची उपासना' ऊर्फ 'भूतकालभोग्यांची आस, आभास आणि अट्टाहास'

तुम्ही जन्माला येता, त्यानंतर सुरुवातीची एक दोन वर्षे तुमचे जन्मदाते/पालक तुम्हाला तुम्हाला लंगोटात लपेटून टाकतात. तुमचे नियंत्रण नसलेल्या उत्सर्जितांनी तो लंगोट खराब झाला, की बदलण्याचे कामही तेच करत असतात. सोबत तुम्हाला आहार देणे, आरोग्याची काळजी घेणे इत्यादि जबाबदार्‍याही त्या पालकांनीच स्वीकारलेल्या असतात. 

थोडक्यात तुम्ही तुमचे पालक आणि तो लंगोट यांच्यावर संपूर्णपणे अवलंबून असता. त्यावेळी समाजाच्या दृष्टीने तुमची ’त्या आई-बापाचे मूल’ याहून कोणतीही वेगळी ओळख नसते. कारण अजून तुम्ही खूप लहान असता. स्वत:च्या पायावर उभे राहणे, स्वत:ची ओळख निर्माण करणे याला आवश्यक असणारे शारीर बळ, कुवत आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी अजून काही काळ जावा लागतो. तुमच्या आयुष्यातील सर्वस्वी परावलंबी काळाचा आधार म्हणून त्या लंगोटाचे स्थान असते.

ManInADiaper
cartoonresources.com येथून साभार.

भूतकाळात कधीतरी तो तुम्हाला साहाय्यभूत झाला होता, त्याने तुमचे लज्जारक्षण केले होते हे खरे. पण वाढल्या वयाने, शरीराने त्याच्याशिवाय अनेक पर्याय दिलेले असतात. आमचा सनातन लंगोट आहे म्हणून अट्टाहासाने केवळ लंगोटावर बाहेर हिंडू लागलात तर... क्षणभर हास्यास्पद वाटेल खरे. पण विचार करुन पाहा की आसपासचे सारेच लंगोटधारी(!) असतील तर...?

...तर बहुसंख्येच्या न्यायाने लंगोट हा माणसाचा अधिकृत पेहराव ठरेल. पुढे जाऊन कदाचित लंगोटाचे कापड, त्यावरील नक्षी अथवा पॅटर्न आणि अर्थातच त्याचा रंग यावरुन लोकांचे गट बनतील.

’अरे ते हिरवा लंगोटवाले सगळ्या लंगोट उत्पादक कंपन्या ताब्यात घेऊन, आपले लाल रंगाच्या लंगोटांचे उत्पादन बंद वा कमी करुन आपल्याला नागवे करण्याचा कट करत आहेत.’ असे व्हॉट्स अ‍ॅप मेसेज फिरवले जातील. ’लाल लंगोटवाले क्षमस्व’ असे बोर्ड सोसायट्यांमध्ये लागतील किंवा वधू-वर सूचक मंडळांमधे अपेक्षांच्या यादीत दिसू लागतील. बिल्डर मंडळी ’या बिल्डिंगमधे आम्ही एकही हिरवा लंगोटवाला येऊ दिलेला नाही.’ हा सेलिंग पॉईंट न चुकता संभाव्य ग्राहकाला सांगतील.

इतकेच काय तर लंगोट स्वच्छ करण्याच्या पद्धतीनुसार जातीही तयार होतील. केवळ नदीत धुणारे एका जातीचे, दगड-धुपाटणे वापरणारे दुसर्‍या जातीचे तर नळ-बादली संयोगाने हे कार्य पार पाडणारे मध्यमवर्गीय, वॉशिंग मशीनवाले भांडवलशाही लंगोटधारी आणखी चौथ्या जातीचे. शिवाय हिरव्या लंगोटांमध्ये फुला-फुलाची नक्षीवाले एका जातीचे, निव्वळ एकरंगी लंगोटधारी दुसर्‍या जातीचे, पोल्का डॉट्स अथवा ठिपक्यांची नक्षीवाले त्यातल्या त्यात मॉडर्न अशी विभागणी होईल. थोडक्यात लंगोटाभोवती अशी समाजव्यवस्था आकाराला येईल...

सर्वच क्षेत्रातील आपले वजन कमी होताना पाहून ज्येष्ठ लंगोटधारी प्राचीनत्वाच्या आधारे आपले स्थान राखण्याचा अट्टाहास करतील. आपल्या लंगोटाचे, त्याच्या रंगाच्या अस्मितेचा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी ही ज्येष्ठ मंडळी, ’आपण लंगोटातच जन्मलो होतो, नागवेपणाचे अश्लील वर्तन आपण जन्मवेळीही केले नव्हते’ असे प्रतिपादन करु लागतील. आता ही मंडळी ज्येष्ठ गटात मोडत असल्याने बहुधा त्यांना लंगोटाशिवाय पाहिलेली त्यांची मागील पिढी अस्तित्वात असण्याचा संभव नसेल. तेव्हा ’चश्मदीद गवाह’ नसल्याने पुढच्या पिढीच्या मंडळींना तो दावा नाकारणे अवघड असेल.

एखादा सुज्ञ तर्काचा किंवा वारंवारतेच्या नियमाचा आधार घेऊन म्हणू लागला की, ’आज जन्मणारे सारेच लंगोटाशिवायच जन्माला येतात. सबब तुम्ही स-लंगोट जन्माला येणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे.’ तर त्याला आपला-लंगोट-गट-द्रोही म्हणून झाडून टाकण्याची सोय असेल. किंवा हे ज्येष्ठ लंगोटधारी "आपण चारचौघांसारखे अथवा सामान्य व्यक्ती नाही, प्रेषित आहोत. म्हणून ’त्याने’ खास आपल्याला स-लंगोटच या भूतलावर पाठवले." असा दावा करुन पुढच्या पिढीतील विचार-आळशी गटात आपले स्थान दैवी आधाराने बळकट करण्याची खटपट करतील... किंवा अन्य-लंगोट-गटातील आपल्यासारखाच एखादा असे अवास्तव दावे करत असेल तर त्याच्याकडे बोट दाखवून, "त्याला चॅलेंज करत नाही तुम्ही. तिथे तुम्ही शेपूट घालता." म्हणत आपली शेपूट सोडवून घेतील.

आता विविध गटांचे लंगोटांचे रंग, पॅटर्न, नक्षी आणि कापड वेगवेगळे असले, तरी अकलेचे पोत सारखेच असल्याने प्रत्येक गटात असे लोक सापडत राहणारच. त्यामुळे असल्यामुळे हा प्रतिवाद हुकमी वापराचे हत्यार म्हणून ज्येष्ठांनी आपल्या भात्यात कायम ठेवलेला असेल...

हा सगळा कल्पनाविस्तार हास्यास्पद, कदाचित बीभत्सही वाटतो ना? खरंतर तो तसा मुळीच नाही. असे प्रकार विविध संदर्भात आपण आपल्या आयुष्यात कायमच करत आलेलो आहोत. कधीकाळी एखादी गोष्ट आपल्या आयुष्याचा भाग होती, आपल्यासाठी उपयुक्त होती, आपला आधार होती म्हणून तिची गरज संपल्यावर, ती कालबाह्य झाल्यावरही तिच्याभोवतीच जगणे विणत बसणे हा आपल्या अनुभवाचा भाग नाही?

इतके पुरेसे नाही म्हणून या ना त्या निकषावर त्यात विभागणी करत टोळ्या जमवून एकमेकाच्या जिवावर उठणे, द्वेषाची शेती पिकवणे हे आपण नेहमीच पाहात नाही? आपल्या गावचा, जातीचा, धर्माचा माणूस वृत्तीने आपल्याहून सर्वस्वी वेगळा असला, तरीदेखील ’समानशील’ असलेल्या अन्य धर्मीयापेक्षा अधिक जवळचा वाटतो की नाही? तिथे आपले तसे वाटणे, हे एकाच रंगाचे लंगोट वापरण्याचा धागा जोडण्याइतकेच हास्यास्पद नाही का?

कधीकाळी धर्म, जात वगैरे संकल्पना कदाचित समाजाची व्याप्ती निश्चित करत असतील, विशिष्ट गटाची व्यक्ती म्हटले की तिचे राहणीमानान व आचार-विचार याबाबत आपल्याला किमान तर्क करता येत असतीलही. आज संवाद, प्रवास वगैरे सर्वच क्षेत्रातील सीमा ओलांडून दोन व्यक्ती सहजपणे परस्पर-संवाद अथवा भेट घेऊ शकतात. माहिती-वहनातील क्रांतीमुळे एखाद्या भौगोलिकदृष्ट्या दूर असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती आपल्याला सहज मिळवता येत असते. समाजमाध्यमांच्या आणि डेटाच्या आधारे केल्या जाणार्‍या विश्लेषणातून तर एखाद्या व्यक्तीचे पुरे व्यक्तिमत्व आता घरबसल्या तयार करता येते. अशा वेळी लंगोटाच्या रंगासारख्या, त्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्याचे कोणत्याही अर्थी निदर्शक नसलेल्या जात-धर्मादि निकषाच्या आधारे आपण आपले व्यवहार करत असू, तर आपण मूर्ख नाही?

पुलंच्या ’बटाट्याची चाळ’मध्ये जिन्याची कुंडली मांडून त्याच्या दुरवस्थेची कारणमीमांसा करणार्‍या अण्णा पावशेंसारखे, समोरच्या बादलीतले पाणी गरम आहे की नाही हे त्या बादलीची कुंडली मांडून ठरवतो, की त्याला स्पर्श करुन पाहण्याचा, अनुभवाचा मार्ग निवडतो? आणि एखादा खरोखरच कुंडली मांडून पाहात असेल, तर तो फक्त आणि बादलीचीच का बरे, ती बादली भरणार्‍या नळाच्या तोटीची, चौकात नगरपालिकेने बसवलेल्या चावीची, ती फिरवून पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍याची वगैरे इतर घटकांची का मांडत नाही? या प्रत्येकाचा प्रभाव त्यावर आहे नि त्यांचा ’हात’ त्या पाण्याला लागलेला आहेच ना... असा प्रश्न कधी पडला होता का?

जगात ज्येष्ठ असतात, मध्यमवयीन असतात, तरुण असतात, किशोरवयीन असतात, बालके असतात तशीच अर्भकेही. लंगोट हे त्यातील अर्भकाचे वस्त्रप्रावरण आहे. बालक-वर्गात पोचल्यावर ते मूल अर्धी चड्डी, शर्ट, बुशकोट, टी-शर्ट वगैरे वस्त्रे वापरु लागते. मुलगी असेल तर तिला याहून अनेक प्रकारची परिधाने उपलब्ध होतात. (विभागणीची सुरुवात इथपासूनच होते!) जरी कौतुक म्हणून, फॅशन म्हणून क्वचित मोठ्यांसारखी पॅंट ते वापरत असले तरी त्याचा मूळ पेहराव हा अर्धी चड्डी हाच असतो. 

यथावकाश शाळेची चार वर्षे गेली, त्याने किशोरवयान पदार्पण केले की शाळेच्या गणवेषापासून ते मूल अधिकृतपणे संपूर्ण लांबीची पॅंट वापरु लागते. पुढे तारुण्यात पदार्पण केले की बालपणाच्या उलट दिशेने मूळ पेहराव पॅंट, पण अपवाद म्हणून, फॅशन म्हणून वा भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात सोयीस्कर म्हणून, अधून मधून अर्धी चड्डीदेखील वापरते. हे सारे पेहराव मूळ लंगोटाप्रमाणेच कापड या एकाच वस्तूचे विविध आविष्कार असतात. त्या अर्थी पेहराव, संरक्षण अथवा लज्जारक्षण हा मूळ हेतूचे भान न सोडताही त्या कपड्याची भूमिती आपण खळखळ न करता बदलतो. काही मूठभर प्राचीन मनाचे लोक वगळता, "तुम्ही अमुक पेहरावच का केलात, आमच्या गटातील तुमच्यासारख्याने असाच पेहराव केला पाहिजे" असा आक्षेप कुणी तुमच्यावर घेत नाही.

AdviceOnDiaper
cartoonstock.com येथून साभार.

थोडक्यात पेहरावामध्ये वयानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार, पर्यावरणानुसार बदल करण्याने कुठलीही बाभळ बुडते असे आपल्याला वाटत नाही. पण हीच बाब आचार-विचारांबाबत मात्र भयंकर गुन्हा का वाटते? कुण्या जाहिरातीमध्ये ’माय डॅडी स्ट्रॉन्गेस्ट’ म्हणणार्‍या त्या छोट्या मुलीसारखे लहानपणी आपले वडील जगातले सग्गळ्यात शक्तिशाली पुरुष आहेत असे समजणारी मुले वाढत्या वयानुसार ती कल्पना हास्यास्पद म्हणून सोडून देतातच ना? मग तीच बाब आचार-विचारांच्या बाबत इतकी भयंकर का वाटते? विज्ञान-तंत्रज्ञानादि बाबी नगण्य अवस्थेत असताना जगलेल्या पिढीला आजच्या स्थितीला सुसंगत समाजव्यवस्था वा आचार-विचारांची चौकट मांडता आली आहे असा अट्टाहास आपण का करतो? 

हा आक्षेप अडचणीचा वाटू लागला की आपल्या चौकटींची कालबाह्यता मान्य करण्याऐवजी उलट आजच्यापेक्षा तेव्हा या गोष्टी अधिक प्रगत होत्या असा स्वत:लाही न पटणारा उफराटा दावा कोणत्याही शेंडा-बुडख्याशिवाय अट्टाहासाने का लादू बघतो? ’लेट इट गो’ असं म्हणणं इतकं अस्वस्थ का करतं आपल्याला? जोडीदार निवडल्यावर आई-बापांचं घर सोडून सहजपणे वेगळा संसार थाटणार्‍या शिक्षित, नागरी समाजातील व्यक्तींची त्याहून कैक शतके जुन्या गोष्टींना सोडण्याची तयारी का नसते? आपली ओळख निर्माण करण्याऐवजी ती भूतकाळातून उसनी घेण्याचा अगोचरपणा का करावासा वाटतो?

तुमच्या आयुष्यातील प्राचीनत्वाची आस ही त्या लंगोटासारखी असते. मग मानवी सहजीवनाच्या आदिकाळात, म्हणजे मानवी संस्कृतीच्या अर्भकावस्थेत असताना माणसाने स्वसंरक्षणार्थ काही उपाय केले, समाजधारणेसाठी, त्याच्या नियमनासाठी काही चौकटी आखून दिल्या. आज भौगोलिक, सामाजिक, आर्थिक रचनेत आमूलाग्र बदल होऊनही, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचा वेग कल्पनातीत वाढल्यानंतरही त्याच वापरत राहणार या अट्टाहासाला काय अर्थ आहे?

काळाच्या त्या प्राचीन तुकड्यात माणसाची बुद्धी विकसित होत होती, जाणीवेला जनावरांपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ आयाम मिळू लागले होते. जनावरांपेक्षा विकसित झालेल्या बुद्धीमुळे त्या भयाचे आकलनही अधिक तीव्र झाले होते. परंतु मर्यादित बौद्धिक, शारीरिक व तांत्रिक वकुबामुळे त्यांची जाणीव जागी झाली असली तरी अजूनही अनेक प्रकारचे धोके, अनामिक, अनाकलनीय धोक्यांपासून सुटकेची अथवा निराकरणाची पुरेशी माहिती वा साधने उपलब्ध नव्हते. अशा वेळी माणसाने काल्पनिक आधारांची निर्मिती केली. ज्याच्यापर्यंत पोचता येत नाही अशा कुण्या अनाम नियंत्रकासमोर माणूस लीन झाला. त्याने आपले धोके, आपली भीती, आपले क्लेष दूर करावे म्हणून त्याला साकडे घालू लागला. ही कृती म्हणजे आपल्या शिरावरील भीती, ताण-तणाव दुसर्‍या कुणाच्या शिरी देऊन आपण तणावमुक्त होण्याचीच होती.

असे असूनही हे कृत्रिम आहे, काल्पनिक आहे याचे भान, ती जाणीव मनाच्या तळाशी कुठेतरी जिवंत असतेच. मग तिला आणखी खाली चिणून टाकण्यासाठी बहुमताचे गाठोडे तिच्या डोक्यावर दाबले जाते. शिरीष कणेकर त्यांच्या ’फिल्लमबाजी’च्या शेवटी म्हणतात तसे ’आमच्या जगण्यातला अंधार त्या थिएटरच्या अंधारात आम्ही मिसळून टाकला.’ अंधार व्यापक झाला की, तो सार्‍यांनाच भोगायचा आहे या एका सह-अनुभूतीच्या भावनेने माणसे काहीशी तणावमुक्त होत असावीत. त्यासाठी बहुमताचा आधार उपयोगी पडत असावा. आणि ते बहुमत निर्माण करताना गाडं घसरत जातं. कारण आता कायम आपल्या बाजूच्या गटाची संख्या राखणे, वाढवणे गरजेचे होऊन बसते. 

आदिम काळात शिकार, आहार, आणि त्यासाठी भूमी, त्याचबरोबर स्त्री (पुन्हा पुनरुत्पादनासाठी ही भूमीच), यांच्यासाठी टोळ्या लढत असत. संघर्षाचे हे आयाम जगण्याच्या मूलभूत गरजांशी जोडलेले होते. आज बहुसंख्येची आस नि अट्टाहास असणारे बिनगरजेच्या गोष्टींवरही संघर्ष उभे करतात, माणसांचे जिणे हराम करतात, त्यांचे जीवही घेतात. हे सारे फक्त ’भला तेरी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ पातळीवरच्या उथळ असूयेनेच. बहुसंख्येची आस, त्यासाठी लटकी प्रतीके आणि त्यातून उभे राहणारे द्वेष, संघर्ष, हिंसेचे थैमान यातून प्रचंड भौतिक प्रगती केलेला आधुनिक मानव, समाजव्यवस्थेच्या आदिम काळी टोळ्यांत राहणार्‍यांपेक्षा खुजाच दिसू लागतो.

सुमारे साठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध राष्ट्रवादी विचारवंत पु. ग. सहस्रबुद्धे यांनी ’नरोटीची उपासना’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. नरोटीची, म्हणजे करवंटीची उपयुक्तता आतील पौष्टीक असे खोबरे आणि चविष्ट पाण्याचे धारण करणारे आवरण अथवा भांडे म्हणूनच असते. जेव्हा श्रीफलाची पूजा करताना त्याला हळद-गंध वाहताना त्यांचा स्पर्श जरी नरोटीला होत असला तरी ती स्वत: पूजावस्तू नसते. तिच्या आतील जीवनरसाची ती पूजा असते. हे विसरुन केवळ ’नरोटीची पूजा करायची असते’ एवढे कर्मकांडच ध्यानात ठेवल्याने भारताचा अध:पात होतो आहे असे त्यांचे म्हणणे होते. याचप्रमाणे ती आयुष्याच्या केवळ उगमापाशी, तात्कालिक उपयोगाची वस्तू आहे हे ध्यानात न घेता, कालबाह्य झाल्यावरही ’लंगोटाची उपासना’ करणारे केवळ वयाने, शरीराने वाढूनही जाणीवेने अर्भकाच्याच पातळीवर राहतात असे म्हणायला हवे.

-oOo-

पूर्वप्रसिद्धी: ’अक्षरनामा’ २५ जानेवारी २०२१


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा