शनिवार, १० जुलै, २०२१

माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे

माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’ << मागील भाग
---

माध्यमांवरील या लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले एक वाक्य इथे संदर्भासाठी पुन्हा उद्धृत करतो आहे

दूरदर्शनच्या काळात अतिशय व्यापक असलेले मनोरंजनाचे क्षेत्र ’खपेल ते विकेल’ बाण्याच्या खासगी वाहिन्यांनी ऐतिहासिक-पौराणिक, विनोदी, कौटुंबिक आणि पोलिसी-कथा या चार विषयांत बंदिस्त करुन ठेवले.

खरंतर जेव्हा हे ध्यानात आले तेव्हापासूनच मी माध्यमांच्या वाटचालीकडे अधिक बारकाईने पाहू लागलो. पण या निरीक्षणाबाबत थोडे विस्ताराने लिहायला हवे. या चार विषयांपलिकडे असतेच काय?’ असा प्रश्न कदाचित या मनोरंजनाच्या आहारी गेलेल्यांना पडू शकेल. त्यासाठी थोडे मागे जाऊन ’दूरदर्शन’ या सरकारी माध्यमाकडे पाहता येईल. खासगी माध्यमे नव्हती तेव्हा टेलिव्हिजन मनोरंजनावर दूरदर्शनची एकहाती सत्ता होती. त्या वेळी त्यावरुन सादर झालेल्या कार्यक्रमांकडे नजर टाकली तर आजच्या तुलनेत त्यातील प्रचंड वैविध्य- आणि गुणवत्ताही सहज दिसून येते.

सर्वात पहिली मला आठवते ती ’कथासागर’ नावाची मालिका. या मालिकेत देशोदेशींच्या प्रथितयश लेखकांच्या कथांवर आधारित एपिसोड्स सादर केले जात. टॉलस्टॉय, चेकोव्ह, ओ हेन्री, हॅन्स अँडरसन वगैरे नावे आम्ही प्रथम यातच वाचली. जेन ऑस्टिनच्या प्रसिद्ध ’प्राईड अँड प्रिज्युडिस’ वर आधारित ’तृष्णा’ ही मालिका सादर झाली. रशियन लेखक अन्तोन चेकोव्हच्या कथांवर आधारित ’चेकोव्ह की दुनिया’ दूरदर्शनने आमच्यासाठी आणली होती.

याच धर्तीवर पुढे हिंदी, उर्दू नि बंगाली कथांवर आधारित 'किरदार' नावाची मालिका प्रसारित झाली. (ही यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.) शरत्‌चंद्र चॅटर्जी, मुन्शी प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू, श्रीलाल शुक्ल वगैरे प्रसिद्ध भारतीय लेखकांच्या कादंबर्‍यांवर आधारित श्रीकांत, शेषप्रश्न, नीम का पेड यांसारख्या मालिका चालू होत्या. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या चिंतनाचा सर्वात संहत आविष्कार असलेल्या ’गोरा’ या कादंबरीवर आधारित मालिकाही दूरदर्शनने सादर केली होती. (ही देखील यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.) एका गावाचे सात-आठ वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रण करणारी, आर.के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारित, ’मालगुडी डेज’ प्रचंड लोकप्रिय ठरली. (जिला मी मराठी भाषेतील मालगुडी डेज म्हणतो त्या ’सारे प्रवासी घडीचे’ या जयवंत दळवींच्या कादंबरीकडे मराठी निर्माता दिग्दर्शकांनी दुर्लक्षच केले आहे.)

राजकीय उपहासाचा दुर्मिळ आविष्कार असलेल्या ’राग दरबारी’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीवरही मालिका सादर होत असे. एवढेच कशाला औद्योगिक घराण्यांतील राजकारणावर आधारित ’शांती’ ही मालिकाही तिथेच प्रसारित झाली. एका सर्कसमधील लोकांच्या जीवनाभोवती फिरणारी ’सर्कस’ नावाची मालिका ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस प्रसारित झाली. आज ’किंग खान’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. ’पृथ्वीवरील स्वर्ग’ असे ज्याचे वर्णन केले जाई, त्या काश्मीरच्या पार्श्वभूमीवरील ’गुल गुलशन गुलफाम’ सारखी मालिका प्रसारित होई. आज खासगी वाहिन्यांवरुन प्रसिद्ध होणार्‍या अशा धर्तीच्या मालिका अथवा कार्यक्रमांची नावे आठवतात?

Nukkad

महानगराच्या रस्त्याच्या एका कोपर्‍यावरचे सारे आयुष्य कोणत्याही अभिनिवेश वा तत्वाची चौकट न घेता केवळ साक्षीभावाने टिपत जाणारी ’नुक्कड’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. त्यातील कादरभाई या भूमिकेने प्रकाशझोतात आलेला अवतार गिल पुढे चित्रपटांतून चमकत राहिला. याशिवाय जावेद खान (करीम), सुरेश चटवाल (दुखिया) यांनीही पुढे हिंदी चित्रपटांतून आपले बस्तान बसवले. पवन मल्होत्राचा हरी, समीर खक्करचा खोपडी नावाचा दारुडा, अजय वढावकरने साकारलेला गणपत हवालदार, किरकोळ दुरुस्तीचे दुकान चालवणारा आणि ’टीचरजी’वर जीव जडवून बसलेला दिलीप धवनने साकारलेला गुरु, अशी पात्रे प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली. जगण्याशी निगडित असलेले अगदी किरकोळ पातळीवरचे व्यवसाय करणारे, कृषिप्रधानतेला मागे सारुन पुढे आलेल्या नव्या व्यवसायप्रधान जगातले बलुतेदार म्हणता येतील अशी ही माणसे. समाजव्यवस्थेच्या परिघावर राहणारी आणि तरीही तिचा पाया असणारी.

’और भी ग़म है ज़मानेमें’ या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एका सामाजिक प्रश्नाचा उहापोह केला जाई. याचा अलिकडे सादर झालेला अवतार म्हणजे आमीर खान या प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने सादर केलेला ’सत्यमेव जयते’. आमीर खान सादर करतो म्हणून लोक तो प्रथम पाहू लागले हे खरे असले, तरी हा कार्यक्रम मात्र लोकप्रिय झाला, त्याबाबत माणसे जागरुकतेने बोलत हे मान्य केले पाहिजे. असे असूनही बहुतेक माध्यमे चार खपाऊ विषयांपलिकडे असे नवे प्रयोग करण्यास नाखूष असतात हे दुर्दैवी आहे. त्या काळात चित्रपटही सामाजिक विषयांशी बांधिलकी राखून होते, त्यांची गाडी रोमान्स आणि हिंसा यांच्या डबक्यात अडकून पडलेली नव्हती. पुढे चित्रपटांनी शेक्सपिअरलाही अंडरवर्ल्डमध्ये नेऊन ठेवले आणि भूतकालभोगी माणसांकडून टीआरपी गोळा करण्यासाठी मालिकाही पाठ फिरवून पौराणिक-धार्मिक विषयांकडे पळत सुटल्या.

’फूल खिलें है गुलशन गुलशन’ नावाचा कार्यक्रम पूर्वी चित्रपटांतून बालकलाकार म्हणून भूमिका केलेली तबस्सुम सादर करत असत. कलाकारांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये ’कसं वाटतंय?’ ’अमुक अनुभव कसा वाटला?’ सारखे सबगोलंकार प्रश्न नसत. मार्मिक प्रश्न, हलकेफुलके किस्से यातून स्वत: तबस्सुमही त्या कार्यक्रमाच्या अविभाज्य भाग होऊन राहात. साबिरा मर्चंट यांचा ’व्हॉट्स द गुड वर्ड’ आणि सिद्धार्थ बसू (पुढे ’कौन बनेगा करोडपती’चे निर्माते) यांची ’क्विझ टाईम’, ’मास्टरमाईंड इंडिया’ सारख्या मुलांसाठी असलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धाही दूरदर्शन आयोजित आणि प्रसारित करत असे. ’यूटीव्ही डिजिटल’ या प्रसिद्ध चित्रपट वितरण संस्थेचे संस्थापक (आणि यू-मुम्बा या मुंबईच्या कबड्डी संघाचे मालक) रॉनी स्क्रूवाला हे ही असाच एक कार्यक्रम सादर करत असत असे स्मरते (दुर्दैवाने कार्यक्रमाचे नाव आठवत नाही).

आज किती खासगी वाहिन्या शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला आव्हान देणारे, त्यांच्या जिज्ञासेला उद्युक्त करणारे कार्यक्रम सादर करतात? कौन बनेगा करोडपतीची लोकप्रियता त्यातून मिळणार्‍या माहितीसाठी अधिक होती की कोणी किती रक्कम जिंकली या रोकड्या अहमहमिकेचे साक्षीदार होण्यासाठी?

प्रासंगिक विषयांवर दूरदर्शनवर ’वर्ल्ड धिस वीक’ सारखा कार्यक्रम सादर होई. ज्यात रोजच्या बातम्यांमधील विषयांपलिकडे विविध क्षेत्रातील त्या आठवड्यातील घडामोडी अधोरेखित केल्या जात. आज स्वतंत्र वाहिनी असलेली एनडीटीव्ही तेव्हा केवळ निर्माता कंपनी होती. तिच्यामार्फत प्रणोय रॉय आणि अप्पन मेनन हा कार्यक्रम सादर करत असत. अप्रासंगिक विषयांवर ’सुरभि’ नावाने असाच कार्यक्रम सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे सादर करत. पुढे माफक अभिनेता म्हणून ओळख निर्माण केलेला शेखर सुमन त्या आठवड्यातील घडामोडींवर ’मूव्हर्स अ‍ॅंड शेकर्स’ नावाचा खुसखुशीत कार्यक्रम सादर करे. जगातील बहुतेक प्रथितयश वाहिन्यांवरुन आजही अशा स्वरुपाचे कार्यक्रम सादर होत असतात. उदाहरण द्यायचे तर सीबीएस या अमेरिकन चॅनेलवर जॉन ऑलिव्हर ’लास्ट वीक टुनाईट’सारखे कार्यक्रम आजही सादर करतात. त्यांना त्यांचा असा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. भारतीय माध्यमांनी मात्र या प्रकाराकडे पाठ फिरवलेली आहे.

चलच्चित्रे अथवा अ‍ॅनिमेशनच्या जगात कधी हिरव्या कधी जांभळ्या रंगाच्या चित्रविचित्र राक्षसांना केवळ लाडू खाऊन ढिशूम करणार्‍या बालिश हीरोंपेक्षा कैकपट अधिक चांगल्या मालिका सादर झाला. यात भारतीय परंपरेतील ’पंचतंत्र’ होते; एका छोट्या मुलीची स्वप्न-दुनिया चित्रित करणारी लुईस कॅरल या लेखकाची जगभर लोकप्रिय झालेली ’अ‍ॅलिस इन वंडरलॅंड’ होती; जंगलात लांडग्यांच्या टोळीत वाढलेल्या माणसाच्या पिल्लाचे जग समोर आणणारी एव्हरग्रीन ’जंगल बुक’ होती; बहुसंख्येला आज आठवणारही नाही अशी योहाना स्पायरी या स्विस लेखिकेच्या कादंबरीवर जपानी अ‍ॅनिमेटर्सनी बनवलेली ’हायडी, द गर्ल ऑफ आल्प्स’ ही एका पोरक्या मुलीची संवेदनशील कथाही होती. फिल्म्स डिव्हिजनने निर्माण केलेल्या ’अनेकतामें एकता’सारख्या बोधपटांचाही त्यात समावेश होता.

मराठी भाषेत चिं.वि.जोशींच्या चिमणराव गुंड्याभाऊ पासून फक्त मुलांसाठी असणार्‍या किलबिल, मध्यमवयीनांसाठी असणारा ’गजरा’, शेतकर्‍यांसाठी ’आमची माती आमची माणसं’ थ्रिलर प्रेमींसाठी श्वेतांबरा अशा वेगवेगळ्या आवडी असलेल्या गटाच्या माणसांसाठी कार्यक्रम सादर केले जात. हे ’Horses for courses’ तत्व सोडून देऊन खासगी वाहिन्या आता ’Courses for masses’ या तत्वाला चिकटून राहू लागल्या आहेत.

अर्थात हे कार्यक्रम सादर होत असताना वर उल्लेख केलेल्या चार प्रकारांतील कार्यक्रम सादर होत नसत असे नाही. ’बुनियाद’सारखी कौटुंबिक मालिका घराघरांत पोहोचलेली होती. ’ये जो है ज़िंदगी’ सारखी मालिका लोकांना हसवत होती. मराठीमध्ये ’तिसरा डोळा किंवा ’एक शून्य शून्य’ सारख्या डिटेक्टिव अथवा उकलकथा चित्रित करणार्‍या मालिका सादर होत होत्या.

BharatEkKhoj

पण त्याचवेळी प्रबोधन ही आपली जबाबदारी मानत असलेले ते माध्यम ’मिले सुर मेरा तुम्हारा’ किंवा ’सारा भारत ये कहे’ सारखी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी गाणी प्रसारित करत असे. त्याच संकल्पनेच्या रुजवणुकीसाठी पं. नेहरुंच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित ’भारत एक खोज’ ही मालिका प्रसारित होत होती. ऐतिहासिक पात्रांना घेऊन, अस्मिता कुरवाळून टीआरपीची चिल्लर गोळा करणार्‍या आजच्या मालिकांशी त्या मालिकेच्या पटकथेशी तुलना करुन पाहता येईल. मूळ पुस्तक केवळ आधार म्हणून, निवेदनाचा धागा म्हणून घेत संपूर्ण भारतभरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा पट अभ्यासून ती पटकथा साकार झाली होती. देशभरातील कथा, गीत, संगीत, इतिहास, पुराणकथा या सार्‍यांना एका सूत्रात बांधणारी दुसरी कलाकृती माझ्या पाहण्यात नाही.

राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना आता अस्तंगत होऊन तिची जागा राष्ट्रभक्तीने घेतली आहे. बांधिलकीच्या भावनेपेक्षा समर्पणभावी निष्ठा अधिक महत्वाची मानली जाऊ लागली आहे. यात निष्ठा ठेवणारा दुय्यम नि निष्ठाविषय श्रेष्ठ ठरत असतो. एकात्मतेमध्ये वैविध्याला वाव राहातो, भक्तीमध्ये लीनता, शरणभाव आणि म्हणून एकसाचीकरण असते हे ध्यानात न घेता हे विसरुन लोक ’लोटांगण घालिता’ जगू लागले आहेत.

सुरुवातीची काही दशके दूरदर्शनने धार्मिकतेचा बडिवार कटाक्षाने टाळला होता. धार्मिकतेचा बडिवार आणि संस्कृतीचा उत्सव यातील फरक बिनचूक ओळखून ती सीमा न ओलांडण्याचे धोरण राबवू शकणारे सुज्ञ नि जागरुक लोक त्या मॅनेजमेंटमध्ये होते. (’प्रॉफिट ही भगवान है’ म्हणणारे त्यात येऊन बसलेले नव्हते.) पण शहाबानो प्रकरणानंतर राजीव गांधींवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप होऊ लागला आणि तोल सांभाळण्यासाठी म्हणून दुसर्‍या बाजूला त्यांनी हिंदू तुष्टीकरणासाठी ’रामायण’, ’महाभारत’ यांसारख्या मालिकांना उत्तेजन दिले. मराठी साहित्याच्या क्षेत्रात शिवाजी सावंत यांच्या ’मृत्युंजय’ या कादंबरीने जे घडले तेच या दोन मालिकांमुळे घडले. त्या कादंबरीच्या यशानंतर महाभारतातले सापडेल ते पात्र पकडून त्यावर कादंबर्‍या लिहिण्याची जशी लाटच आली, तशाच प्रकारे खासगी वाहिन्यांनी रामायण, महाभारत यांचा धागा उचलून वाटचाल सुरू केली. भारतीय चॅनेल माध्यम गुणवत्तावादाकडून जमाववादी होण्याकडे वाटचाल सुरू झाली.

दर्जेदार, अभिनव कार्यक्रमापेक्षा लोकानुनयी लेखनाचे, कार्यक्रमांचे रतीब घालणे सुरू झाले. हिंदी चित्रपट जसे जागा, माणसे, घटनाक्रम बदलून एकाच कथानकावर अनेक चित्रपट निर्माण करुन गल्ला भरतात, तसेच मोजक्या तपास-कथांच्या आवृत्त्या काढत सीआयडी या मालिकेने एक दशकांहून अधिक काळ धुमाकूळ घातला. पात्रांचे व्यक्तिमत्व, स्वभाव बदलत कथानक वाटेल तसे फिरवत नेणारी एक मराठी मालिका तेच साध्य करुन गेली. यातून सोकावलेले प्रेक्षकही आता आपल्याला हवे तेच दाखवायला हवे असा आग्रह धरु लागले. त्यांना खुश करण्यासाठी कथानकाचे सातत्य, संगती वगैरे सरळ धाब्यावर बसवून लोकांना आवडेल त्या दिशेला कथानक वळवणारे निर्माते नि वाहिन्यांनी बस्तान बसवले. मग मेलेले पात्र जिवंत होण्यासारखे चमत्कारही घडू लागले. भंपकपणा सार्वत्रिक होऊ लागला.

लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बालिश कार्यक्रम सादर केले जात असले तरी त्यांचे जगणे, त्यांचे भावविश्व केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या कार्यक्रमांचाही आता अभाव दिसतो. दूरदर्शनवर कॉलेज-जीवनाकडे एका प्रिन्सिपलच्या नजरेतून पाहणारी चुनौती नावाची मालिका सादर झाली होती. पण हा अपवाद म्हणायला हवा. भारतीय शास्त्रीय अथवा रागसंगीताचा अध्वर्यू मानला गेलेला अमीर खुस्रो आणि उर्दू शायरीचा बादशहा मानला गेलेला मिर्ज़ा ग़ालिब यांच्यावर संस्मरणीय अशा चरित्रमालिका प्रसारित होत असत. या विषयप्रकाराला हात घालण्याचे धाडस त्यानंतर कोणत्या चॅनेल-माध्यमांनी केले?

यादी आणखी लांबवता येईल. पण मुद्दा असा की केवळ एक वाहिनी, तुटपुंज्या सरकारी साहाय्यावर, जाहिराती वगैरे तत्सम उत्पन्नाच्या आधाराशिवायही कार्यक्रमांच्या स्वरुपांचे, विषयांचे इतके अमाप वैविध्य आणि दर्जाही राखू शकत होती. विविध प्रकारच्या प्रेक्षकांसाठी काही ना काही देऊ करत होती. आज प्रचंड पैसा, जाहिरातीचे हुकमी उत्पन्न, तंत्रज्ञानाचा मोठा आधार, मोबाईलने प्रचंड वाढलेली ग्राहकसंख्या, कॉपी-कॅट मंडळींना इंटरनेटमुळे वेगाने उपलब्ध होणारा, त्यावर ’मेड इन इंडिया’चा शिक्का मारुन खपवता येणारा तयार माल... इतक्या सार्‍या संपन्नतेनंतरही गुणात्मक बाजूने मनोरंजनाचा दर्जा मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक गरीब होत चालला आहे. ही विसंगती डोळ्यांत भरणारी आहे.

Brahmaand

या नव्या नि जुन्या दोनही वाहिन्यांमध्ये अजिबात न दिसणारा एक विषय आहे तो म्हणजे विज्ञान. विज्ञान आणि विज्ञान काल्पनिका (सायन्स फिक्शन) हा विषय भारतीय मनोरंजन माध्यमाला संपूर्ण वर्ज्य आहे असे दिसते. डॉ. जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली फार पूर्वी प्रसारित केलेल्या ’ब्रह्मांड’ आणि प्रा. यशपाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक गिरीश कार्नाड सादर करील असलेल्या ’टर्निंग पॉईंट’ या दोन दूरदर्शनवरीलच मालिकांचा अपवाद. दूरदर्शने ’इंद्रधनुष’ नावाची विज्ञान-काल्पनिकाही सादर केली होती. त्यात जुजबी पातळीवर का होईना कालप्रवासाची संकल्पना वापरली होती. ही दोन-तीन उदाहरणे वगळता विज्ञानाधारित चित्रपटांचा, मालिकांचा भारतीय मनोरंजन माध्यमात संपूर्ण अभाव आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

अर्थात यात आश्चर्य काहीच नाही. कारण ’खपते ते विकते’ या मंत्रानुसारच ते व्यवसाय करतात, आणि मुळात भूतकालभोगी भारतीय समाजच विज्ञानाबद्दल सर्वस्वी उदासीन आहे. त्यांचा आवडता विषय आहे इतिहास ! तो घडून गेलेल्या घटनांची जंत्री मांडत असल्याने विचारशून्य पाठांतराला सोयीचा. बरे सुदूर भूतकाळात काय घडले यावर मतभेद व्यक्त करुन आपण म्हणतो तोच ’खरा इतिहास’ असे म्हणत आपापल्या जाती-धर्माच्या, राजकारणाच्या सोयीचा इतिहास खपवणेही शक्य होते. बोनस म्हणून अस्मितेचे टेंभेही त्यातून आयते मिळत असल्याने तो आणखी लाडका होऊन बसतो. विज्ञानाची वस्तुनिष्ठता आपल्या बहुसंख्येला नकोशीच असते आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्या माध्यमांतूनही पडलेले दिसले तर नवल नाही.

भारतीय मनोरंजन माध्यमे सध्या फक्त नफा आणि म्हणून टीआरपी या दोन गोष्टींचाच, सर्वस्वी धंदेवाईक विचार करतात. तिथे कलेला, कलाकाराला, सर्जनशीलतेला स्थान नाही. तिथे कार्यक्रम हे उत्पादन असते, क्रयवस्तू असते, कलानिर्मिती नसते. म्हणूनच केवळ शब्दांतून बोल बोल बोलणारी, किमान हालचाली करणारी पात्रे, पार्श्वभूमीवर ढणाणा वाजवणारे तथाकथित पार्श्वसंगीत आणि अधूनमधून झटका आल्यासारखा एकच दृश्य उगाचच तीन बाजूने दाखवणारा, पण एरवी बव्हंशी स्थिर असणारा कॅमेरा एवढ्यावर मालिकांचे रतीब सुरु आहेत. हे पाहिल्यावर पुलंच्या ’एका रविवारची कहाणी’ मधील रामा गड्याचे ’घरच्या कपड्यात करीयाचा ता सोसल’ हे विधान आठवून जाते. (सोशल नाटक म्हणजे काय तर ज्याला वेगळी ड्रेपरी लागत नाही ते, ही त्याची व्याख्या.)

एक स्थळ, समकालीन कपडे कपडे-पट म्हणून (त्यामुळे अनेकदा अभिनेते स्वत:च ते घेऊन येतात), कॅमेरा एवढे साहित्य पुरते. जाहिरातींच्या अधेमध्ये एपिसोड दाखवायचा असल्याने अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात जेमतेम सोळा-सतरा मिनिटे एपिसोड. त्यात पुन्हा 'ब्रेकनंतर' काय याची झलक जाहिरातींआधी आणि त्या ब्रेकनंतर 'आधी काय घडले' याची एक झलक वगळली तर बारा-पंधरा मिनिटांचा हा कार्यक्रम होतो. त्यात पुन्हा सनसनाटीपणा आणण्यासाठी कॅमेर्‍याच्या करामती आणि पार्श्वसंगीताला वाव दिलेला असतो तो वेगळा. थोडक्यात जेमतेम दहा मिनिटे ही पॅसेंजर गाडी चालू असते. बरे लेखनामध्ये लेखक सोडून चॅनेल-संबंधी इतर मंडळीही भर घालणार. टीआरपी वाढवण्यासाठी काय करावे याचे ’ग्यान’ त्यांनी द्यायचे नि लेखकाने त्यानुसार लिहायचे. अनेकदा तर लेखक नावाचा कुणी वेगळा असायचीही गरज नसते. निर्माता, त्यात भूमिका करणारा एखादा कलाकारच चार दोन एपिसोड खरडून काढतो. दहा मिनिटांमध्ये बोलण्यासाठी असे किती संवाद लागतात हो. आठ-दहा वाक्ये नि दोन प्रसंग लिहिले की काम भागते. उरलेली जागा कॅमेरा नि संगीत भरून काढतात. शेवटी काय जाहिरातींच्या मध्ये दाखवायला काहीतरी असले म्हणजे झाले.

समाजाच्या मनोरंजनाच्या अपेक्षेचा महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) समोर ठेवूनच त्यांचे उत्पादन चालू असते. रुचिभिन्नतेला ते खिजगणतीत धरत नाहीत. मग अशी भिन्न रुची असलेले प्रेक्षक नव्या माध्यमांकडे वळत आहेत. ओटीटी (Over the Top) अर्थात इंटरनेटवरुन मनोरंजनाचे माध्यम अशा प्रेक्षकांचे आधार होऊ लागले आहेत. हे प्रेक्षक हळूहळू तिकडे सरकू लागले आहेत. चॅनेलची मंडळी हे प्रेक्षक गमावतील असे दिसते वाटू शकते. पण असे होणार नाही. कारण ही मंडळी त्या माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या कार्यक्रमांच्या आवृत्त्या इकडे तयार करत राहतीलच. तिकडचे इंग्रजीतले कार्यक्रम इकडे हिंदी वा स्थानिक भाषांत, त्या त्या पार्श्वभूमीवर सादर झाले, तर इथल्या काही प्रेक्षकांचीही सोय होईल. इंग्रजीच्या अडचणीने जे प्रेक्षक मूळ कार्यक्रम पाहू शकत नाहीत, त्यांना आपणही प्रसिद्ध कार्यक्रमाचे रसिक असल्याचे मिरवता येईल... प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद वाचून त्याबाबत माफक चर्चा करणार्‍या वाचकांसारखेच. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपी-कॅट चॅनेल निर्मात्यांना ’आपल्याला अशी मालिका हवी’ म्हणण्यासाठी ओटीटी माध्यमांच्या रूपाने नवा स्रोत उपलब्ध झालेला असेल.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा