मंगळवार, २१ जून, २०२२

व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?

’व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?’ हा प्रश्न अनेकांकडून- विशेषत: हवी ती मुलगी भाव देत नसल्यामुळे व्यथित झाल्यामुळे स्वत:ला गुड बॉईज समणार्‍यांकडून, विचारला जात असतो. परवा फेसबुकवरच कुणाच्या तरी प्रतिसादात वाचला आणि काही काळापूर्वी पाहिलेल्या एका मालिकेची आठवण झाली.

GoodGirlBadBoy
www.shutterstock.com येथून साभार.

स्टार्स हॉलो नावाचे एक लहानसे शहर. अशा ठिकाणी असते तसे साधारण कम्युनिटी लाईफ, शहरीकरणातून आलेल्या व्यक्तिकेंद्रित आयुष्याचा प्रवाह तितकासा बलवान झालेला नाही. इथे लोरलाय नावाची एक स्त्री आपल्या मुलीसह राहते आहे. ही रोरी १६ वर्षांची अतिशय गोड मुलगी, आसपासच्या सर्वांची आवडती. अमुक बाबतीत, अमुक व्यक्तीबाबत इतके सहानुभूतीने वागण्याची वा सक्रीय मदतीची काय गरज होती?’ या प्रश्नावर ’यू नो, इट्स रोरी’ हे उत्तर पुरेस व्हावे इतके तिचे ते व्यक्तिमत्व घट्ट होऊन गेलेले.

सगळ्यांशीच चांगले वागणारी, आपल्याबद्दल कुणाचे वाईट मत असू नये यासाठी आटापिटा करणारी माणसे 'खरोखरच सहृदयी असतात की संघर्षाला, मानसिक ताणाला घाबरुन तसे वागत असतात, पडते घेऊन संघर्ष टाळतात?' असा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. रोरीच्या बाबत ती सहृदयी असल्याचे - ते ही तिच्या आईने तसे म्हटल्यामुळे - सुरुवातीला झालेले मत पुढे तिचे आजी-आजोबा तिला ज्या प्रकारे मॅनिप्युलेट करतात, ते पाहता बदलले. इतकेच नव्हे तर पुढे इतरांपुढे सतत पडते घेण्याची तिची वृत्ती चांगुलपणापेक्षाही भित्रेपणाची अधिक दिसू लागली.

अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा सतत चांगुलपणाचा ताण असहय होऊन सोयीच्या ठिकाणी तिचा स्फोट होतो नि माफक बंड करुन पुन्हा मूळ पदावर येतो. अशा व्यक्तिंना सुरक्षित वातावरणाची आस असते. वयाच्या सोळाव्या वर्षी मातृत्वाला सामोरे गेलेल्या नि पुढचे सारे आयुष्य इतर कुणाच्याही मदतीखेरीज कणखर उभ्या राहिलेल्या तिच्या आईने ते तिला दिले आहे. पण त्याचमुळे कदाचित तिला संघर्षाची सवय नाही.

शहर लहान असले तरी अमेरिकेतील. त्यामुळे टीनएजर असून बॉयफ्रेंड नाही ही ’माथा आळ लागे’ अशी गोष्ट. तसा रोरीलालाही एक बॉयफ्रेंड आहे, डीन. रोरी अभ्यासातही हुशार, उच्चशिक्षण हे फक्त हार्वर्ड युनिव्हर्सिटीत घेणार हे तिने फार लवकर ठरवून टाकले आहे. त्या तुलने डीन अभ्यासात सर्वसाधारण. रिटेल स्टोअरमध्ये काम करता करता शिक्षण घेणारा. हार्वर्ड सोडा पण कुठल्याही प्रथितयश खासगी शिक्षणसंस्थेऐवजी कम्युनिटी कॉलेजमध्येच शिकण्याची आपली कुवत असल्याची खूणगाठ बांधलेला. अतिशय सौम्य प्रकृतीचा नि सर्वांना मदत करण्यास तत्पर. पण त्याने आपल्या या मैत्रिणीसाठी एक एक पार्ट जमवून कार तयार केली आहे.

या गावात जेस नावाच्या एका मुलाचा प्रवेश होतो. हा जेस अत्यंत उद्धट नि माणूसघाणा. त्याच्या दुर्वर्तनाने कंटाळून त्याच्या आईने मामाकडे राहून काही सुधारला तर पाहावे म्हणून सक्तीने इथे पाठवल्याने उद्दामपणाची भर पडलेली. लवकरच त्या छोट्या शहरात परस्परांशी बव्हंशी सौहार्दाने राहणार्‍या बहुसंख्य लोकांमध्ये तो अप्रिय होतो. पण रोरी सगळ्यांशीच चांगले वागावे अशा वृत्तीची. त्यामुळे आपल्या आईचा अपमान केलेल्या जेसशीही ती औपचारिक का होईना पण चांगुलपणानेच वागते. सतत इतरांमध्ये चांगले शोधण्याचा आव आणत प्रत्यक्षात त्याच्या/तिच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी धागा शोधणार्‍या रोरीला जेसमध्ये असे धागे सापडतात.

रोरी शालेय हुशारीच्या जोडीला पुस्तकातील किडा. इंग्रजी भाषेतील बहुतेक प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचली आहे. हा जेस एकलकोंडा. इतर कुणाशी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो पुस्तके वाचतो. ही गोष्ट पुस्तकी किडा असलेल्या रोरीचे लक्ष वेधून घेते. वाचणारे विचारी वा बुद्धिमान असतात असा खुद्द वाचणार्‍यांचा स्वत:चा गैरसमज अनेकदा असतो (आणि ते नसतात असे वाचनाचा कंटाळा असणार्‍यांचे ठाम मत असते. एकुणात आम्हीच बरोबर ही वृत्ती सार्‍यांचीच.) त्यामुळे ’देअर इज सम गुड इन एव्हरी मॅन’ या उक्तीनुसार जेसमध्येही काही चांगले असावे असा समज रोरी करुन घेते.

त्यातच तिचा बॉयफ्रेंड डीन हा फारसा वाचत नाही. एरवी त्याचे अनेक गुण या एका गोष्टीमुळे जेसच्या तुलनेत धूसर होतात. रोरी जेसकडे अधिकाधिक लक्ष देऊ लागते. डीन हा सौम्य प्रवृत्तीचा... रोरी जेसकडे आकर्षित झाली आहे हे लक्षात येऊनही तिला समजून घेतो, ’ती बुद्धिमान आहे, स्वत:च यातून ती बाहेर येईल’ असे समजून तो कोणताही आततायीपणा करत नाही. उलट जेस हा आक्रमक, ’मला हवे ते मिळाले तर ठीक नाहीतर जग गेले उडत’ अशा वृत्तीचा. रोरी लक्ष देत नाही म्हणून तो थेट दुसर्‍या मुलीला घेऊन हिंडतो, अनेकदा मुद्दाम तिच्यासमोरच या ’तात्पुरत्या-प्रेयसी’ची चुंबने घेतो, तिला मिठीत घेतो, तिच्या मनात असूया निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

’दुसर्‍याकडे आहे ते खेळणे आपल्याला हवे’ ही बालपणीची वृत्ती पौगंडावस्थेवतही बरीचशी शिल्लक असते, फक्त खेळण्याचे स्वरूप बदलते इतकेच. त्याला अनुसरून रोरी आपल्याकडे आकर्षित होईल हा जेसचा आडाखा अचूक ठरतो. अनेकदा बेफिकिरीला बेडरपणा समजण्याची चूक केली जाते तशीच रोरीने केली असावी. त्यातच एरवी कोणतीही जबाबदारी न घेणारा जेस अपवादात्मक प्रसंगी आपल्या मामाचे काही काम करुन टाकतो. त्यामुळे ’देअर इस सम गुड इन हिम’ या रोरीच्या सोयीच्या दाव्याला अधिक बळकटी येते, इतरांसमोर त्याचे समर्थन करण्याची सोय झाली असा रोरीचा समज होतो.

अशा ’बॅड बॉईज’कडे लौकिकार्थाने गुड गर्ल्स असणार्‍या मुली आकर्षिक होण्याचे मुख्य कारण असते ती आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी आणि आव्हान स्वीकारण्याची वृत्ती. आधीच गुणी असलेल्या बॉयफ्रेंडसाठी काही केल्याचे श्रेय त्याच्या गर्लफ्रेंडला मिळत नसते.

यावरुन आठवले. आमच्या एका निर्व्यसनी, व्यासंगी, शाकाहारी, संगीतप्रेमी, आयटीमध्ये बक्कळ पगाराची नोकरी, एकुलता एक मुलगा वगैरे लौकिकार्थाने सर्व डिझायरेबल वर-गुण असलेल्या एका मित्राला नकार देताना एका मुलीने म्हटले होते, ’तुझ्याकडे सगळेच गुण आहेत. म्हणजे तुझी बाजू नेहमीच वरचढ ठरणार.’ मला तेव्हा हसू आले असले, तरी तिचे म्हणणे चुकीचे नव्हते. सोबत आयुष्य काढायचे असेल तर काहीवेळा - कदाचित- चुकीची वा दुय्यम असूनही तिची निवड वा बाजू स्वीकारली जायला हवी, ही तिची अपेक्षा अनाठायी नव्हती... फक्त ती स्वीकारली जाणार नाही हे तिचे गृहितक चुकले होते.

उलट जेससारख्या बॅड बॉयमधील दुर्गुण आपल्या प्रेमाने/प्रभावाने नष्ट वा कमी करुन, इतरांकडून दुर्लक्षित केलेले नि फक्त मलाच दिसलेले सद्गुण अधिक ठळक करुन, तो बॅड बॉय नव्हे तर ’अ बॉय मिस अंडरस्टुड’ आहे नि मीच त्याला सर्वात आधी समजून घेतले, वळणावर आणले हे श्रेय मिरवायची इच्छा असते. एका सर्वसाधारणपणे चांगल्या बॉयफ्रेंडपेक्षा ही ट्रॉफी अधिक अभिमानाने मिरवता येते कारण तिच्यासाठी अधिक कष्ट घेतलेले असतात, ती आपली निर्मिती असते.

अर्थात यात यशाचे प्रमाण किती असणार हे त्या मुलीच्या चिकाटीवर आणि त्या मुलाचे ’बॅड बॉय’ असणे परिस्थितीवश किती नि मूळ स्वभावात किती या दोन्हींवर अवलंबून राहाते. कारण माणूस आहे तसा स्वीकारणे सोपे असते. याउलट त्याला आपल्याला अपेक्षित अशा व्यक्तिमत्वाकडे ढकलत नेण्यासाठी स्वीकारण्यामध्ये संघर्ष अधिक तीव्र असतो. ’त्याला सामोरे जाण्याची इच्छा नि कुवत आपल्याकडे आहे का’ याचा अदमास घेण्याइतपत समज रोरीच्या वयात असत नाही. त्यामुळे असे आव्हान स्वीकारणे ही अंधारात घेतलेली उडीच ठरण्याची संभाव्यता अधिक असते.

दुसरीकडे एकदा जवळ आले की या ’बॉयफ्रेंड’च्या (आपल्याकडे लगेचच त्याचा नवराही होतो, हातून निसटण्याची असुरक्षिततेची भावना आपल्याकडे अधिक आहे.) बेफिकीरीला बेडरपणा, क्रौर्याला शौर्य, हट्टीपणाला लीडरशिप क्वालिटी, एकांगीपणाला दृढनिश्चयीपणा वगैरे समजले जाऊ लागते आणि कदाचित बॅड बॉयला 'गुड बॉय-टॉय'मध्ये परिवर्तित करु इच्छिणारी ही प्रेयसी त्याला न बदलता स्वत:चे दृष्टिकोनच बदलून घेऊ लागते. अर्थात तिचा पुढे भ्रमनिरास झाला नाही तर, तिला पूर्वी अपेक्षित असलेल्या पद्धतीने नसले तरी ते नाते टिकून राहू शकते. पण रोरीसारख्या हुशार मुलीबाबत हे संभवत नसते.

जेसला पुस्तकात रस असणे हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा केवळ एक भाग आहे. त्या एका गुणाच्या आधारे त्याचे सारे व्यक्तिमत्व बदलता येत नसते. जगाला फाट्यावर मारण्याची वृत्ती, गर्लफ्रेंड ही एक 'मिळवण्याची गोष्ट' आहे हा समज, अंगभूत उद्धटपणा हा केवळ रोरीने त्याचा स्वीकार करण्याने बदलत नाहीतच. उलट डीनचे तिच्या आयुष्यात रस घेणे, तिच्या आवडी समजून घेणे, या गुणांच्या तुलनेत जेसचे तिने त्याच्यासाठी कॉलेजला जाऊ नये वा त्याला हवे तसे वागाचे या (एरवी त्याच्या दृश्य प्रवृत्तीशी सुसंगत) आग्रही वृत्तीचे चटके रोरीला बसत राहतात. आणि मागे सोडून आलेल्या डीनचे गुण प्रकर्षाने दिसू लागतात.

आता लगेच इथे ’रोरीचा निर्णय चुकला, डीन कित्ती गुणी’ असा निवाडा द्यायचा नसतो. डीनच्या सामान्य आर्थिक, सामाजिक आणि बौद्धिक स्थितीमुळे रोरीच्या आजोबांनी त्याला आधीच नाकारलेले असते. हार्वर्डला जाऊ इच्छिणार्‍या मुलीला तिचे आयुष्य पुढे सरकेल तसतसा डीनही लोढण्यास्वरूपच होणार हा तर्क करण्यास फार बुद्धिमान असण्याची गरज नाही. त्याचं ’गुड बॉय’ असणं रोरीला आयुष्याची सोबत करण्यास पुरेसं नसतंच. किंबहुना म्हणूनच पहिला बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड हा ब्रेक-अप करण्यासाठीच असतो अशी खूणगाठ अमेरिकन टीन-एजर बांधून ठेवत असतात. विशीच्या आत असलेल्यांच्या आयुष्याची दिशा अद्याप निश्चित झालेली नसते. आणि ती जसजशी ठळक होत जाते, तसतसे दोघांचे मार्ग भिन्न होण्याची संभाव्यता वाढत जाते. अशा वेळी दूर होणे दोघांच्या हिताचे असते.

हे डीनला समजते नि तो समजूतदारपणे स्वत:च दूर होतो. पण जेस मात्र हट्टाने रोरीचा मार्ग वळवून आपल्या दिशाहीन मार्गाला मिळावा म्हणून आततायीपणा करत राहतो. ’देअर इज सम गुड इन एव्हरी मॅन’ या उक्तीला, रोरीच्या समजाला न नाकारताही असे म्हणता येईल की लौकिकार्थाने गुड बॉईज नि बॅड बॉईज म्हटल्या जाणार्‍यांमध्ये हा एवढा फरक नक्की दिसतो. आणि हे रोरीसारख्या ’गुड गर्ल्स’नी समजूनच बॅड बॉईजच्या दिशेने पाऊल टाकायचे असते.

---

चित्रपटाच्या तुलनेत मालिकेमध्ये व्यक्तिमत्व विस्ताराला वाव असतो. अर्थात प्रत्येक ठिकाणी तो घेतला जातो वा घेणार्‍याला जमतोच असेही नाही. रोरीचे कथानक तसे ’रन ऑफ द मिल’ असले (खरंतर साहित्यापासून दृश्यकलांपर्यंत सर्वत्र चांगुलपणा हा अवास्तव समजण्याच्या प्रघात असल्याने तसे म्हणता येईल का शंका आहे.) तरी ही तीन व्यक्तिमत्वे नीट उभी करणे, त्या संदर्भात रोरीच्या व्यक्तिमत्वातील संभ्रमासह विविध कंगोरे उभे करणे ’गिल्मोर गर्ल्स’च्या लेखक-दिग्दर्शकाला शक्य झाले.

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, २० जून, २०२२

बिटविन द डेव्हिल अँड द डीप सी

तीन-चार महिन्यांपूर्वी हिजाबचा मुद्दा तापवला जात होता, तेव्हा पुरोगामी विचारांच्या मंडळींची चांगलीच कोंडी झाली होती. ’हिजाब घालण्याचे स्वातंत्र्य’ यात स्वातंत्र्य हे मूल्य आहे म्हणून ती बाजू घ्यावी, तर हिजाबसारख्या मागास पद्धतीची भलापण केल्याचे पाप पदरी पडते. आणि हिजाब विरोधकांचे म्हणणे योग्य म्हणावे, तर एका समाजाबाहेरच्या गटाने त्या समाजावर लादलेल्या निर्णयाचे समर्थन केल्याचे (आणि व्यक्ति-स्वातंत्र्याला विरोध केल्याचे) पाप पदरी पडते.

आज ’अग्निपथ’ योजनेच्या निमित्ताने देशभरात ज्या घडामोडी चालू आहेत, त्यांनी साधकबाधक विचार करणार्‍यांची पुन्हा एकवार कोंडी केली आहे. ’तुम्ही आमच्या बाजूचे की विरोधकांच्या?’ हा एक प्रश्न, आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी सार्‍या जगालाच दिलेली ’तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर दहशतवाद्यांच्या बाजूचे समजले जाल’ ही घोषणावजा धमकी पुन्हा एकवार अनुभवायला मिळते आहे. आता भारतातील संवादविश्वामध्ये सुज्ञ विचाराला स्थान नाही, इथे फक्त बाजू घेऊन वादच होऊ शकतात हे पुन्हा पुन्हा दिसून येते आहे.

AgnipathProtests

लष्करी भरतीची तयारी करणार्‍या उमेदवारांनी ’अग्निपथ’ या योजनेच्या विरोधात जो वणवा पेटवला आहे, तो पाहता सारासारविवेक जिवंत असलेल्या कुणालाही हतबुद्ध होण्याचीच वेळ येते आहे. जे लोक देशाच्या फौजेचा भाग होऊ पाहात आहेत, त्यांचे हे वर्तन अश्लाघ्य म्हणावे असेच आहे. काही भाबड्या नि भाबडेपणाचे सोंग घेतलेल्या काही धूर्त व्यक्ती अशी मखलाशी करतात की, फौजेत जाणारे देशभक्तीचे मूर्तिमंत पुतळे असतात. यातले काही तसे असतीलही. पण या इच्छुकांचे सद्य वर्तन पाहता, इतर अनेकांच्या दृष्टीने फौजेतील नोकरी हा एक आर्थिकदृष्ट्या स्थिर रोजगार आहे हे पुन्हा एकवार दिसून येते आहे. देशाच्या संपत्तीचे एवढे प्रचंड नुकसान करणे, त्या आंदोलनांच्या निमित्ताने समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, ही कुठली देशभक्ती आहे? आणि जर हे केवळ रोजगारेच्छुकच असतील तर मग त्यांना इतर रोजगारेच्छुकांहून अधिक सहानुभूती का मिळावी, ती ही त्यांचे वर्तन असे हिंसक होत असताना?

दुसरीकडे असा प्रश्न उभा राहतो की मग त्यांच्याकडे अन्य उपाय काय आहे? आणि हा प्रश्न खरोखर हतबल करणारा आहे. कारण दुर्दैवाने सामोपचाराचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला दिसत नाही. २०१४ पासून जी जी शांततामय आंदोलने झाली, विरोध झाले, निषेध झाले त्यांच्याकडे ढुंकून न पाहण्याचे सरकारचे धोरण आहे. जवळजवळ वर्षभर तळ ठोकून बसलेल्या शेतकरी आंदोलकांशी साधा संवाद साधण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. अखेर निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या, तेव्हा सत्ताकारणाला सर्वोच्च प्राधान्य देणार्‍या सरकारातील पक्षाने माघार घेतली. त्या अजून वर्षभर पुढे असत्या, तर पुढले वर्षभर सरकारने त्या शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले असते, असे ठामपणे म्हणता येते.

ज्या आंदोलनाने आमच्या सत्तेला काडीचाही धक्का बसत नाही अशी आंदोलने, व्याख्याने, लेख, टीका यांच्याकडे लक्ष देण्याचे काहीही कारण नाही असेच सरकारचे धोरण आहे. अगदी देशाचे पंतप्रधान स्वत:ला कोणत्याही प्रकारे जनतेला उत्तरदायी मानत नाहीत. ते कोणतीही पत्रकार परिषद घेत नाहीत. मुलाखतीही फक्त आपल्या भाट मंडळींना देतात. त्याही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारख्या तयार केलेल्या असतात. संसदेतील कामकाज बव्हंशी मंत्र्यांवर सोडून दिलेले असते. विरोधकांनी कितीही नेमके मुद्दे काढले, साधार व वस्तुनिष्ठ टीका केली, तरी त्याला काडीचे महत्त्व न देता, संसदेतील संख्याबळाच्या आधारे- आणि अर्थातच पदाच्या आधारे, आपण हवे तेच निर्णय घेणार हे त्यांनी दाखवून दिले आहे.

ज्या माध्यमांनी साधकबाधक (खरेतर बाधकच!) मूल्यमापन करावे ती माध्यमे सरकारच्या भलामणीचे अजेंडे राबवतात, विरोधकांच्या देशद्रोही वर्तनावर चर्चा घडवून आणतात. न्यायालयांतूनही बहुतेक वेळा सरकारला अनुकूल असेच निर्णय मिळताना दिसतात. कारण सरकारकडे असणार्‍या निष्णात वकीलांच्या फौजेसमोर तितक्याच तोलामोलाचे वकील उभे करणे सामान्यांच्या कुवतीबाहेरचे असते. अशा स्थितीत सरकारच्या निर्णयाला विरोध सामान्यांनी नोंदवायचे कसे?

की सरकारच्या भाटांना वाटते तसे सरकारी निर्णय हे नेहमीच बरोबर असतात अशी श्रद्धा बाळगून चालायचे? असे मानणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण नव्हे का? एखाद्या व्यक्ती वा संस्थेशी, गटाशी आपण प्रत्येकवेळी सहमत होत असू, तर आपण विचारच करत नाही असा याचा अर्थ नाही का? आई, बाप, भाऊ, बहीण, जोडीदार, मुले या सार्‍यांशी आपण कधी ना कधी असहमत होतच असतो, वाद घालतच असतो, संघर्ष करतच असतो. आणि हे सारे तर आपल्या जगण्याचा, निरीक्षण नि मूल्यमापनाचा भाग असतात. याउलट ज्यांच्याबद्दल केवळ माध्यमांतूनच समजते अशा व्यक्ती, संघटना वा संस्थेशी आपण कायमच सहमत होत असू, तर ते आपल्या बुद्धिहीनतेचे, निदान लाचारीचे निदर्शक नाही का?

दोन भिन्न व्यक्तींच्या मूल्यमापनात सापेक्षता असते हे मान्य असले, तरी केवळ निवडणुकीत निवडून आलो म्हणजे सदा-सर्वदा आम्हीच बरोबर असतो असा ’हम करे सो कायदा’ योग्य नव्हे. ही लोकशाही नव्हे. लोकशाही म्हणजे निवडून आलेल्या मंत्रिमंडळाला सर्व हक्क स्वाधीन करणारी व्यवस्था नसते. त्यात सत्ता ही जनतेला उत्तरदायी असते. जनतेच्या आक्षेपांना तिने उत्तरे देणे अपेक्षित असते. सामान्य जनता सरकारला प्रश्न विचारु शकेल, न पटलेल्या निर्णयाचा फेरविचार करायला लावण्याइतपत विरोध करु शकेल, अशी रिव्हर्स फीडबॅक सिस्टम त्यात असायला हवी. ती तर नाहीच, उलट प्रश्नकर्त्यांवरील, आक्षेपकर्त्यांवरील हेत्वारोपांचे, बदनामीचे, त्यांच्यावर राळ उडवून देण्याचे प्रोजेक्ट्च सोशल मीडिया, चॅनेल-माध्यमांतून राबवले जातात. ही हुकूमशाही असते. एक बाजू सतत बरोबर नि दुसरी बाजू थेट शत्रू ही मांडणी हुकूमशाहीचीच असू शकते.

या सगळ्याची गोळाबेरीज असलेली ’दर पाच वर्षांनी तुम्ही आम्हाला मतदान करावे हे स्वातंत्र्य आम्ही तुम्हाला दिले आहे. एरवी आम्हाला कोणतेही प्रश्न विचारु नका, आम्ही कुणालाही उत्तर देण्यास बांधील नाही, आणि आम्हाला विरोध करणारे सगळे देशद्रोही, दुष्ट, आमचा द्वेष करणारे आहेत’ ही मांडणी एकतर्फी आहे. अशा परिस्थितीत सरकारला झुकवण्यासाठी हिंसा हा एकच मार्ग उरला आहे अशी खूणगाठ या फौजेतील रोजगारेच्छुक तरुणांत झाली असेल तर ती कशी खोडून काढायची?

ProtestersBurnBogie

दुसरीकडे २०१४ नंतर सुरु झालेला गोराक्षसांचा नंगानाच, लिंचिंग, हैद्राबाद एन्काउंटरनंतर विचारशून्य बहुसंख्येने पोलिसांची केलेली भलामण, आणि अलिकडे सत्ताधार्‍यांच्याच राज्यातील क्षत्रपांनी सुरु केलेली बुलडोझर न्यायव्यवस्था, यांतून या ’झटपट न्याया’चे आधीच विकृत आकर्षण असलेल्या समाजातील या तरुणांच्या ’शांततामय मार्गाने न्याय मिळत नाही, कायदा हातातच घ्यावा लागतो’ या विचारशून्य दाव्याला बळच मिळते आहे.

म्हणजे एकीकडे कित्येक कोटींचे नुकसान करणारे थैमान घालणारे हिंसक फौजेच्छुक आणि त्यांना दुसरा मार्गच शिल्लक न ठेवलेले सरकार यांच्यात बाजू तरी कुणाची घ्यायची? आणि बाजू घेतली नाही तर तुमचे ऐकणार कोण? आणि न घेता दोन्ही (किंवा अधिक) बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ’हे सारे तळ्यात-मळ्यात लेखन आहे’ किंवा ’यांचं जेव्हा पाहावं तेव्हा कुंपणावर’ अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते. डोळ्यावर पट्टी बांधून जगणार्‍यांच्या जगात डोळे उघडे ठेवून वावरणे हा गुन्हा असतो याचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो.

सप्तमातृकांचे शिल्प साकारणार्‍या सुनंद नावाच्या शिल्पकाराची दुर्गाबाईं भागवतांनी सांगितलेली गोष्ट लहानपणी वाचली होती. आक्रमक सनातन धर्मीय आणि आक्रमक बौद्ध या दोहोंच्या सापटीत सापडलेला, त्याच्यावर सोडलेल्या हत्तीपासून आकांताने पळणारा तो शिल्पकार एका विहिरीत पडतो. पडता पडता विहिरीच्या भिंतीतून आलेल्या झाडाची एक फांदी त्याच्या हाती लागते. तिला धरून लटकत असतानाच एक सर्प शांतपणे त्या फांदीवरुन सरपटत त्याच्या दिशेने येताना त्याला दिसतो. वर मधमाशांचे पोळे असलेले झाड हत्ती संतापाने गदागदा हलवतो आणि त्यातून उधळलेल्या माश्यांच्या संतापाच्या डंखाचे वारही चोहोबाजूंनी सुनंदवर होऊ लागतात. साधकबाधक विचार करणार्‍यांची स्थिती सध्या काहीशी तशीच झालेली आहे.

- oOo -

१. इथे ’व्यक्ति-स्वातंत्र्याचे अग्रदूत’ असे बिरुद स्वत:च स्वत:ला लावून घेणारी अमेरिकेची संयुक्त संस्थाने आठवतात. तिथे पोलिस तुमच्यावर अचानक हल्ला करुन अटक करु पाहतात वा झडती घेऊ पाहतात, तेव्हा ते ’You have right to remain silent. एकही शब्द न उच्चारण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला दिले आहे.’ असे तुम्हाला सांगत असतात.


हे वाचले का?

गुरुवार, २ जून, २०२२

हनुमान जन्मला गं सखे

अमेरिकेमध्ये जसे ’खटला जॉनी डेप जिंकेल, की त्याची भूतपूर्व पत्नी एम्बर हर्ड?’ हा सध्या राष्ट्रीय प्रश्न होऊन बसला आहे, तद्वत ’हनुमानाचे जन्मस्थान कोणते?’ हा विषय भरतभूमीमध्ये सांप्रतकाळी महत्वाचा होऊन बसला आहे. किष्किंधा, अंजनेरी यांच्या वादात आता सोलापुरातील कुगावनेही उडी घेतली आहे. तीनही ठिकाणी ’हनुमानाचा जन्म आमच्या गावी झाला’ अशी श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. ते तसे मान्य झाल्याने वाढलेल्या भक्ति-पर्यटनामध्ये त्यातील काहींचे आर्थिक हितसंबंधही गुंतलेले असतील, हे ही त्यांच्या ’श्रद्धे’चे कारण असू शकेल. पण अशा माणसांना वगळून आपण ज्यांची खरोखर तशी श्रद्धा आहे अशांचीच बाजू ध्यानात घेऊ.

HanumanTempleRamboda
श्री भक्त-हनुमान मंदिर रम्बोदा, श्रीलंका.

विषय एका धर्मांतर्गत असल्याने सध्या शास्त्रार्थावर निवाडा अवलंबून आहे. तरीही ज्याच्या गैरसोयीचा निवाडा होईल, ती बाजू तो मान्य करेलच असे अजिबात नाही. श्रद्धेची हीच गंमत असते. निवाडा आमच्या बाजूचा असला तर ’सत्याचा विजय’ आणि गैरसोयीचा झाला की ’आमच्या श्रद्धेच्या क्षेत्रात न्यायालयाने ढवळाढवळ करु नये.’ हा उत्तरार्ध अगदी स्थावर मालमत्तेचा, व्यावसायिक बाजूचा आणि सामाजिक हितसंबंधांचा प्रश्न असला तरी दिला जातो. इथे तर निखळ श्रद्धेचा प्रश्न आहे. (त्यामागच्या अर्थकारणाचा असला तरी तो इथे ऐरणीवर येण्याची शक्यता नाही. श्रद्धेचे कव्हरच मुळी ते झाकण्यासाठी असते.)

अयोध्या विवादाचा निवाडा करताना ’जनभावनेचा आदर’ अशी संज्ञा निकालपत्रामध्ये वापरली आहे, असे मध्यंतरी वाचण्यात आले. ते जर खरे असेल तर इथे निवाडा करताना नक्की कोणाच्या ’जनभावनेचा आदर’ करायचा? एका गावच्या गटाच्या श्रद्धाभावनेचा आदर करायचा, तर इतर दोघांच्या भावनेचा अनादर होतो. बरं इथे अयोध्येसारखा जमीनमालकीचा प्रश्न नसल्याने न्यायालयांनाही यात काही स्थान नाही. त्यामुळे न्यायालयावर सोपवून द्यावा हा पर्यायही नाही. तीनही बाजूंना मान्य असणारा लवाद- धर्मांतर्गतच नेमून त्याचा निवाडा करावा लागेल.

इथे एकाच धर्मांतर्गत विवाद आहे. जिथे एकाहुन अधिक धर्म असतात, तिथे निवाडा कसा करावा? त्यातील एका धर्माने राजकीय सत्ता ताब्यात घेऊन, आपली बाजू आपल्या सोयीच्या निवाडाव्यवस्था उभ्या करुन, आपल्या बाजूने निवाडा करवून घेणे हा जगभरात प्रस्थापित असा मार्ग आहे. अडचण फक्त लोकशाही सरकारांची असते. कारण तिथे निवाडा कुठल्याही बाजूचा झाला, तरी पराभूत बाजू शासनावर पक्षपाताचा आरोप करत दबाव आणते आणि निवाडाव्यवस्थेमार्फत नव्हे तर शासनाच्या अधिकारात तो निवाडा आपल्या बाजूला फिरवण्याचा प्रयत्न करते. पण हे सारे प्रकार पहिले म्हणे अयोध्येसारखे स्थावर अथवा जंगम मालमत्तेच्या मालकीबाबत असतील, आणि दुसरे म्हणजे हा निवाडा एका देशांतर्गत असला तरच उपयुक्त ठरतात.

उद्या इब्राहिम/अब्राहम/एब्राहम हा फक्त आमच्याच धर्माचा असा विवाद जगभरातील बिब्लिकल (ज्यांना अब्राहमिक धर्म असेही म्हटले जाते) धर्मांच्या अनुयायांमध्ये निर्माण झाला, आणि ’पाकिस्तानशी युद्ध करुन काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका बुवा.’ म्हणणार्‍या आपल्याकडील सुखवस्तूंसारखा या तीनही धर्मियांमधील बर्‍याच जणांनी निवाड्याचा आग्रह धरला तर...? इथे वादाचा मुद्दा कोणत्याही स्थावर जंगम मालमत्तेच्या मालकीबाबत नाही, आणि हा कोणत्याही एका देशाच्या अंतर्गत मामला नाही. तीनही धर्मांना मान्य असणारा लवाद स्थापून त्यामार्फतच याचा निवाडा करावा लागेल. तो ज्या दोन बाजूंच्या विरोधात जाईल त्या तो मानण्यास तरीही तयार होणार नाहीत याची संभाव्यता बरीच जास्त आहे.

कारण धर्मगटाच्या अंतर्गतही उपगट असतात, त्यांच्यात राजकीय रस्सीखेच चालू असतेच. निवाडा विरोधात गेला, की त्या धर्मातील असे असंतुष्ट गट उठून निवाडाप्रक्रियेत सामील असलेल्या आपल्याच नेत्यांवर धर्मद्रोहाचा आरोप करतील. 'ते आमच्या धर्माचे प्रतिनिधीच नव्हेत, अन्य धर्माला आतून सामील आहेत', 'त्यांचे कुणीतरी नातेवाईक कसे मूळचे अन्यधर्मीय आहेत' वगैरे खर्‍याखोट्या आरोपांची राळ उडवून देतील.

सामान्यांनाही निवाडा वगैरे कळत नसतो. पुरावे, साधकबाधक विचार, तर्कपद्धती, पडताळापद्धती समजत नसते. त्यांना फक्त 'आपली बाजू हरली' एवढेच समजते. मग ते संतापाने पेटून कुणाचा तरी बळी घेतल्याखेरीज शांत बसणार नसतात. निवाडा प्रक्रियेत सामील असणार्‍या स्वधर्मीयांचे सामाजिक खच्चीकरण करुन ते आपला सूड उगवतात, नि ’ते नकोत मग कोण?’ म्हणत ती आग पेटवणार्‍यांच्या हातावर धार्मिक/राजकीय सत्तेचे उदक सोडून पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला लागतात.

जे एकाहून अधिक धर्मगटांचे, तेच एका धर्माअंतर्गत जाती वा पंथांचे, नि तेच एका लोकशाही राष्ट्रातील एकाहुन अधिक धर्मगटांचे. आमची बाजू बरोबर असा निवाडा झाला नाही, तर तो आम्हाला मान्यच नसतो. तो पक्षपाती असतो. निवाडा करणारे न्यायव्यवस्थेचा कितीही सूक्ष्म अभ्यास असलेले असोत, त्यांचा निवाडा चुकलेला असतो नि आमचा निवाडाच बरोबर असतो याची - पुलंच्या भाषेत - महापालिकेत उंदीर मारायच्या विभागात काम करणार्‍याला बालंबाल खात्री असते.

लोकशाही राष्ट्राअंतर्गत धार्मिकांचे हक्क हा असाच गुंतागुंतीचा मामला असतो. कारण मुळात धर्म ही देखील राष्ट्रेच आहेत. त्यामुळे जमिनीच्या तुकड्याने निश्चित होणारा देश जेव्हा एक राष्ट्र म्हणून उभे राहतो, तेव्हा त्याचा या राष्ट्रांच्या अधिकारक्षेत्राशी छेद जातोच. मग परस्परांच्या अधिकाराचा नि कार्यक्षेत्राचा प्रश्न निर्माण होतो. तिथेही खरेतर वर उल्लेख केलेल्या एकाहुन अधिक धर्मांमधील समस्यांच्या निवाड्यासाठी करावा लागेल तसा एक लवाद परस्परसहमतीने नेमणे आवश्यक आहे. सामायिक अधिकारक्षेत्राच्या क्षेत्रात त्याच्याद्वारे निवाडे केले गेले पाहिजेत.

पण तसे कधीच घडताना दिसत नाही. लोकशाही राष्ट्रांत दंडव्यवस्था न्यायव्यवस्थेसोबतच असल्याने तिची कुरघोडी अधिक असते. त्या बदल्यात धार्मिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढलेला असतो. आणि म्हणून धर्माला प्राधान्य हवे म्हणणारे राजकीय व्यवस्थाच ताब्यात घेऊन, आपल्या धर्माला झुकते माप देणारी व्यवस्था निर्माण करतात. बहुतेक संघटित धर्म हे जमिनीच्या तुकड्याने वेढलेली राष्ट्रे नसली, तरी एक सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशानेच निर्माण झालेल्या व्यवस्था आहेत.एवढेच नव्हे तर संघटित धर्मांना अर्थकारणाचे मोठे अधिष्ठान नि उद्दिष्ट दोन्ही आहे. राजकीय सत्ता ताब्यात घेण्याने ते ही साध्य होत असते. त्यांच्या पूर्वीचे प्राकृतिक धर्म हे नैतिकतेच्या नि समाजधारणेच्या उद्दिष्टावर अधिक आधारलेले होते.

हनुमानाच्या जन्मस्थानाच्या विवादावरुन मी जे 'उड्डाण' केले तो थेट धर्म, राजकीय सत्ता यांच्यावर उतरलो. विवाद धर्मांतर्गत असो वा आंतर-धर्मीय, त्याला आर्थिक आणि राजकीय सत्तेचे छुपे हेतू जोडलेले असतात. सामान्यांना श्रद्धेच्या हरभर्‍याच्या झाडावर चढवून विवाद निर्माण करणारे आंबराया मात्र आपल्या नावावर करुन घेत असतात. हे जोवर ध्यानात येत नाही, तोवर श्रद्धासिद्धतेचे तर्कशून्य विवाद निर्माण होतच राहणार आहेत, आणि सामान्यांना प्रत्येक विवादामध्ये उगाचच आपण कुठल्याशा श्रेष्ठ साध्यासाठी लढतो आहोत असा भ्रमही होतच राहणार आहे.

अयोध्येच्या निवाड्यानंतर ’आमची श्रद्धा खरी असल्याने आमचा विजय झाला.’ अशी धूर्त वा भाबडी- पण तर्कशून्य प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती. आता मला असा प्रश्न पडला आहे, की अंजनेरी, किष्किंधा आणि कुगाव यांच्यापैकी कोणाही एका बाजूने निवाडा गेला तर इतर दोन ठिकाणी असलेल्या भक्तांची श्रद्धा खोटी म्हणायची का? आणि तशी असेल तर निवाड्याने श्रद्धा खरी की खोटी हे ठरवता येते हे मान्य आहे का? नसेल तर वादंगाचा नि निवाड्याचा खटाटोप कशाला? ’वार्‍यावरची वरात’ मध्ये पु.ल. उपहासाने म्हणतात ’असेल असेल, शेक्स्पिअरचे एक थडगे इंग्लंडमध्ये नि एक अमेरिकेत असेल.’ तसंच 'हे ही हनुमानाचे जन्मस्थान असेल नि ते ही' असे म्हणून दोनही-तीनही ठिकाणी श्रद्धायज्ञ (आणि जोडून अर्थयज्ञ) यथासांग चालू ठेवावा असे का करत नाहीत हे लोक?

आजच कुण्या धर्मपंडिताने हनुमानाच्या विविध ’अवतारांबद्दल’ लिहिले आहे. (सर्वप्रथम वैष्णवांनी चलाखीने वापरलेली ही अवतार-कल्पना भलतीच उपयुक्त आहे. साईबाबांच्या जयंतीला एका चौकात लावलेल्या फ्लेक्सवर साईबाबांच्या अवतारांचा उल्लेख होता. त्यात एका जन्मात ते दत्त होते असे म्हटले होते. काही काळाने सोयीचे काही देव, संत यांची माळ लावून त्यांचेही दशावतार तयार होतील.) त्यातील एक-एक अवतारात त्याचा जन्म या तीन ठिकाणी झाला असे म्हणून हे गणित सर्वांच्या सोयीने का सोडवू नये?

या तीन व्यक्तिरिक्त गेल्या वर्षी कर्नाटकातील गोकर्ण आणि राज्यातील तिरुपतीतील अंजनाद्री शिखरावर हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करण्यात आला होता. आणखी दोन अवतारांमध्ये हनुमानाचा जन्म या दोन ठिकाणी झाला होता असे जाहीर करुन त्या गावांतील श्रद्धाळूंच्या जनभावनेचा आदरही साधता येईल. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या सार्‍याच राज्यांतील श्रद्धाळूंना गुण्यागोविंदाने अंजनीसुताची भक्ती करणे शक्य होईल.

मुळात पुराणकथांना पुरावे मानण्याची चूक आपण करत आहोत, तोवर वादंगांना तोटा नाही आणि त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणार्‍यांनाही. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेल्या त्या वज्रांगानेच प्रकट होऊन या सार्‍यांची टाळकी आपल्या गदेने शेकून काढली तरच कदाचित हे शहाणे होतील. कदाचित आपल्या सोयीचा नसलेला दावा करणारा हा एक तोतया आहे म्हणून त्याच्यावरही खटले भरायला ते कमी करणार नाहीत.

- oOo -

1. https://www.theweek.in/theweek/current/2021/04/29/karnataka-scholars-rubbish-claims-that-hanuman-was-born-in-tirupati.html
2. https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/hanumans-place-of-birth-karnataka-and-andhra-pradesh-engage-in-epic-battle/articleshow/82023239.cms


हे वाचले का?