शनिवार, १७ एप्रिल, २०१०

मैफल

शीर्षकावरून एखाद्या गाण्याच्या मैफलीबद्दल वाचायला मिळेल असे वाटले ना? नाही तसे काही नाही. गाण्याचे आपले ऋणानुबंध छान जुळले असले तरी सूर एवढे जुळलेले नाहीत की अधिकाराने त्यावर काही लिहावे.

आज सकाळीच वपुंच्या महोत्सव मधील जिंदादिल माणसाची आठवण आली. आयुष्यातील छोट्या छोट्या आनंद साजरा करणारा, आपल्या आनंदाच्या झाडाची चार फुले इतरांच्या अंगणातही पडावीत म्हणून त्या अनुभवाला कोणाबरोबर तरी शेअर करणारा साधासुधा माणूस. एक दिवस वपुंना घेऊन चहा पाजायला घेऊन गेला 'आजचा आनंद' साजरा करण्यासाठी; आनंद कुठला तर भर रस्त्यावरील पाण्याच्या डबक्यात आपली तहान भागवणार्‍या मांजराच्या पिलाचे पाणी पिऊन होईपर्यंत थांबून राहणारा एक कारवाला दिसला म्हणून. म्हटले आपण इतके संवेदनशील तर नाही पण निदान आजची मैफल जी फक्त आपल्याला अनुभवायला मिळाली तिचा आनंद तरी शेअर करूया.

आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे पहाटे ८ वाजता उठून आम्ही चहा आणि वर्तमानपत्राचा लुत्फ घेत होतो तर परिचित असा 'टीट टीट' आवाज ऐकू आला. खिडकीतून डोके बाहेर काढून समोरच्या वठलेल्या बदामाच्या फांदीवर बसलेल्या त्या आमच्या मित्राला दर्शन दिले आणि सुप्रभात म्हटले. हा आमचा मित्र रोजच भेटतो आम्हाला. सदैव वटवट करीत असल्याने त्याचे नावच मुळी 'वटवट्या' (Ashy Wren Warbler) ठेवले गेले आहे. याशिवाय शेंडीवाला बुलबुल (Red Whiskered Bulbul), ठणठणीत तब्येतीचे भारद्वाज हे ही रोजचेच.या शेंडीवाल्याच्या (Red Whiskered Bulbul) घरट्यात डोकावण्याचा प्रमादाबद्दल डोक्यावर याच्या चोचीचे फटकारेही खाल्ले आहेत एकदा.

पण आज मात्र पूर्ण मैफल होती. पहिला जास्वंदीच्या झाडावर भेटला तो इटुकला पिटुकला "शिंजीर", झळझळीत चॉकलेटी पाठ नि पिवळे-पांढरे पोट, चोच किंचित पुढे वाकलेली. त्या चोचीचा उपयोग उलटे लटकून फुलातून रसपान करताना नेमका कोन साधण्यासाठी होतो. त्याच्या बरोबर तसाच पिटुकला (अगदी नवजात बालकाच्या मुठीइतका छोटा) "फुलचूष" (Flower-pecker) आणि त्याचा जोडीला चक्क आज "बया"बाई पण होत्या. हे दोन पक्षी आमच्या जुन्या घरी नेहमी भेटायचे. तिथे पुढे आणि मागे पाऊलभर जमिनीचा तुकडा होता, त्यात मी काही आवडती फुलझाडे लावली होती. कुंपण म्हणून वापरलेल्या कर्दळीच्या फुलांवर या दोघांचा फार जीव. मस्तपैकी उलटे लटकून कर्दळीची कोवळी फुले खाणे ही त्यांच्या सुखाची परमकल्पना असावी.


शिंजीर.हा फुलचूष नाही पण त्याचा भाईबंद असलेला जांभळा सूर्यपक्षी (purple sunbird)

तिथे शेंडीवाल्या बुलबुलाचा भाईबंद असलेला 'शिपाई बुलबुल' (Sipahi Bulbul) आणि लालबुड्या (Red Vented Bulbul) हे ही दर्शन द्यायचे. पण गेल्या काही वर्षात यांचे दर्शन झालेले नाही. (आणखी एक प्रकार हा हिरव्या बुलबुलचा, जो एकदोनदा दिसला, पण फार दोस्ती झाली नाही). आता नव्या घरी (फ्लॅट असल्याने) झाडे लावणे वगैरे इल्ले. पण सुदैवाने मागच्या इमारतीमध्ये खास जागा ठेवून झाडे लावल्यामुळे ह्या आमच्या मित्रमंडळीची सोय झाली आहे.

हे दोन दोस्त भेटले म्हणून खूष होतोय तर पलिकडच्या सुबाभूळाच्या झाडावर मि. टीट (Tit) यांनी दर्शन दिले त्यांच्या पलिकडे वरच्या फांदीवर श्री दयाळ (Magpie Robin) यांनी 'ट्विट' करून आपणही आले असल्याची वर्दी दिली. टीट हा शिंजिरापेक्षा थोडा मोठा, करड्या रंगाचा पक्षी, याची ओळख म्हणजे साहेबांचे दोन्ही गाल हे अगदी खास पावडर लावल्याप्रमाणे पांढरे, त्यावर डोळ्यावर भुवईप्रमाणे दिसणारी जाडसर काळी रेघ. या रेघेमुळे साहेबांचा चेहरा उगीचच जरा रागीट दिसतो.

श्री दयाळ हे तुलनेने प्रेमळ, सुरेख तजेलदार निळा रंग, त्यातून दोन्ही पंखाखाली निघणारी पांढरी रेघ; एखाद्या ऐटबाज पण गततारूण्य सौदर्यवतीच्या सौंदर्यावर वयाची मोहोर उठविणार्‍या पांढर्‍या बटेची आठवण करून देणारी. याचा एक भाईबंद आहे त्याचे मराठी नाव आत्ता आठवत नाही पण इंग्रजी नाव Indian Robin, हा जरा तुलनेने गरीब पक्षी, मळकट राखाडी रंगाचा नि बुडाखाली बुलबुलसारखा पण अगदी फिकट भगव्या रंगाचा पॅच असलेला.

हे दोन्ही रॉबिन ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे क्रिकेट्च्या बॅट्चा दांडा जसा मूळ भागाला वेगळा चिकटवलेला असतो तशी चिकटवल्यासारखी दिसणारी शेपूट, जी सतत वरखाली हलत असते. वर उल्लेख केलेले शिंजीर, वटवट्या हे देखील याच शेपूटहलव्या पंथाचे.

याशिवाय अतिपरिचयात् अवज्ञा झाल्याने दुर्लक्ष झालेल्या आणि मध्यंतरी अचानक गायब झाल्याने चर्चेत आलेल्या चिमण्याही अनेक दिवसांनंतर दिसल्या. आश्चर्य म्हणजे आज त्यांच्यावर वृद्धत्वाची कळा दिसली. आमच्या लहानपणी वचवच करून डोके उठविणार्‍या नि सतत कार्यमग्न दिसणार्‍या तजेलदार चितकबर्‍या रंगाच्या या बाया आज उदासवाण्या दिसल्या. बिलकुल आवाज न करता अतिशय संथपणे त्यांचे खाणे शोधणे चालू होते. रंग देखील जाणवण्याइतपत फिकट होता, ह्या त्याच का अशी शंका घ्यावी इतका. काय झाले यांना कुणास ठाऊक.हॉर्नबिल ऊर्फ शिंगचोच्या

ही मैफल आज रंगलेली. पण मैफलीचे काही उस्ताद आज भेटले नाहीत. पण काही वळणावर त्यांनी दर्शन दिले आहे. यात ठिपक्यांचा मुनिया, फक्त त्यांच्या प्रवासाच्या मोसमात दिसणार्‍या गुलाबी रंगाच्या भोरड्या (आमच्या आजूबाजूचे प्लॉट रिकामे होते तेव्हा तेथील झुडपांवर दिसायच्या, आता त्या जागी काँक्रीटचे जंगल झाल्यानंतर कधी दिसल्या नाहीत), सदैव ट्रॅक ट्रॅक करीत राहणार्‍या सातबाया (किंवा सातभाई/बैरागी. खरेतर वटवट करीत असल्याने सातबाया हे नाव अधिक समर्पक आहे. :) ), पुणे विद्यापीठात दिनचर्या चुकून सकाळी ८ वा. दर्शन दिलेले "शृंगी" घुबड (याने एखाद्या भोचक म्हातारीप्रमाणे मान आधी आडवी हलवून मग पुढे झुकवून माझ्याकडे नीट पाहून घेतले, काय ऐट होती लेकाच्याची) पुणे विद्यापीठाच्या जुन्या कँटिनसमोरच्या 'अ‍ॅलिस पार्क' मधील अजस्र झाडांवर भेटलेला "शिंगचोच्या" (hornbill), बयेच्या खोप्यातून तिची अंडी पळवून गट्ट करताना पाहिलेला "टकाचोर" हे काही मैफलीतील सोबती, कुठेतरी भेटतात, जुन्या आठवणी जागवतात. मग मी ही अशी मैफल जिवाभावाच्या मित्रांबरोबर साजरी करतो.

(ऋणनिर्देशः दयाळाचा सोडून इतर सर्व फोटो "http://www.cse.iitk.ac.in/~amit/birds" इथून साभार. दयाळाचा फोटो विकीवरून)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा