गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

लिहिन म्हणतोय एक कविता...

जालावरच्या चंद्राच्या, ढगांच्या, त्याच्या/तिच्या, पाना-फुलांच्या, आईच्या थोरवीच्या, विरहाच्या/प्रेमाच्या, त्यागाबिगाच्या शाळकरी कविता वाचून आम्ही लै म्हणजे लैच वैतागलो होतो. एकदोन ठिकाणी त्याची चेष्टा केल्यावर आम्हाला च्यालेंज कम विचारणा झाली की मग तुम्हाला काय पाहिजे कवितेमधे. आता कवितेबद्दल लिहायचे तर लेखात लिहून चालणार नाही, त्याला कविताच लिहायला पाहिजे. मग आम्ही जालीय कवितेत दिसणारे वर्ण्यविषय - जिथे सामान्यपणे कवि थांबतात - नि त्यांच्या विस्तारातून पुढे जाऊन जिथे पोचणे शक्य आहे असे विषय यावर एक कविताच लिहीली. मग लक्षात आले अरे देवा, आपलेही पाय मातीचेच. पण आता काळंबेंद्र असलं तरी आपलंच पोर ते, आपल्याला चांगले म्हटलेच पाहिजे. तर ती ही कविता.

पहिल्या दोन ओळीत जालीय कवितात आढळणारे वर्ण्यविषय, नि तिसर्‍यात ओळीत हे विषय आणखी पुढे नेऊन कुठवर भिडविता येतील असे काही - सुचवलेले -विषय अशी ढोबळमानाने रचना आहे.


लिहिन म्हणतोय एक कविता...

तळपणार्‍या सूर्याची, शांत-शीतल चंद्राची
भुरभुरणार्‍या पावसाची, भिजणार्‍या पक्ष्यांची

हरवलेल्या वाटेची, 
वाटेवरल्या काट्यांची 
आणि काट्यांमधे सुरक्षित फुलांचीही


लिहिन म्हणतोय एक कविता...

प्राण्यांची, पक्ष्यांची, कोसळणार्‍या प्रपातांची
डुलणार्‍या झाडांची, झाडांच्या सावल्यांची

सावलीतल्या वाटसराची, 
वाटसराच्या श्रांत पायांची 
आणि पायातील विदीर्ण भेगांचीही


लिहिन म्हणतोय एक कविता...

एक कविता तिची, एक कविता त्याची
एक कविता दोघांची, दोघांच्या प्रेमाची

प्रेमातील हळवेपणाची, 
हळवेपणातील रुसव्याची 
आणि रुसव्यातील ओलाव्याचीही


लिहिन म्हणतोय एक कविता...

एक कविता दुराव्याची, एक कविता ओलाव्याची
एक कविता सुखाची, एक कविता दु:खाची

सुखदु:खाच्या नात्याची, 
नात्यामधल्या गुंत्याची 
आणि गुंत्यामधल्या स्नेहाचीही


लिहिन म्हणतोय एक कविता...

एक कविता विद्रोहाची, एक त्यातील अंगाराची
एक कविता जाळणारी, एक कविता पोळणारी

पोळण्यातल्या घावांची, 
घावांच्या वेदनेची 
आणि त्यावरल्या फुंकरीचीही


लिहिन म्हणतोय एक कविता...

कविता निवडक शब्दांची, उपमांची, उत्प्रेक्षांची
विशेषणांच्या खैरातीची, गुळगुळीत कल्पनांची

कल्पनेच्या विस्ताराची, 
विस्ताराच्या भासाची 
आणि भासातील संतुष्टतेचीही


लिहिन म्हणतोय एक कविता...

आणिन काही शब्द ताजे, काही नवे काही जुने
काही वृत्ते, काही अलंकार, यमकांची शब्दफुले

शब्दफुलांच्या हारांची, 
जमून आलेल्या सुरांची 
आणि न जमलेल्या कवितेचीही

लिहिन म्हणतोय एक कविता...- oOo -

मूळ रेखाचित्राखाली Cruse किंवा Cruste अशी सही आणि २०१३ असे साल नमूद केलेले आहे. हे रेखाचित्र माझ्याकडे कुठून आले याचा संदर्भ दुर्दैवाने माझ्याकडे नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा