मंगळवार, ११ मे, २०१०

मी आणि माझा (?) पक्ष

मंडळी आमच्यासमोर एक प्रश्न आहे सध्या. आमच्या एक मित्रवर्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला परवा की 'मी कोणत्या राजकीय पक्षाचा समर्थक आहे?' आणि 'तुझे नेहमीचे विचारजंती संदिग्ध उत्तर नको, एका पक्षाचे नाव सांग' असे दटावले. आता आली पंचाईत. नेमके उत्तर द्यायचे तर आधी ते आम्हाला माहित हवे ना. मग आम्ही आमचे विचारजंती डोके खाजवून विचार करू लागलो की याचे उत्तर काय द्यावे.

बरेचदा 'तुमच्यासारखे कम्युनिस्ट' अशी प्रेमळ शिवी 'घरे-बाईरे' मिळत असते, तर म्हटले मग आपण बहुधा कम्युनिस्ट पार्टीचे समर्थक असू. एक निश्चित तत्त्वज्ञानाच्या आधारे उभा असलेला/ले पक्ष हा एक गुण म्हणावा. तसेच पक्षीय फाटाफुटीपासून - अपवाद मूळ कम्युनिस्ट पक्षापासून फुटून झालेली मार्क्सवादी पक्षाची स्थापना - दूर असलेला, आपल्या अयाराम-गयाराम राजकीय संस्कृतीमधे या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधे असलेले पक्षांतराचे अत्यल्प प्रमाण ही दुर्मिळ गोष्ट. बंगालमधे इतकी वर्षे राखलेले शासन/वर्चस्व हे ही भक्कम पक्षबांधणीचे निदर्शक म्हणायला हरकत नाही. चला हे चांगले झाले, मग आपण कम्युनिस्ट-समर्थक व्हायला हरकत नाही. पण मग पुन्हा विचारजंती डोके चालू लागले. जरा मागचा इतिहास आठवला. एका तत्त्वज्ञानाआधारे पक्ष उभा असला तरी प्रसंगी त्यापलिकडे जाऊन तथाकथित यशस्वी नेत्यांप्रती दाखविलेली निष्ठा नि त्यामुळे एकाच मुद्यावर घेतलेल्या उलटसुलट भूमिका, ऐन महत्त्वाच्या प्रसंगी कचखाऊपणा गाखवून आपल्याच कार्यकर्त्यांचा केलेला तेजोभंग (उदा. तेलंगण), एकाच तत्त्वज्ञानाआधारे प्राकृतिक जीवनातील सर्व समस्यांची उकल करता येईल असा अनाठायी विश्वास, भावी वर्गविहीन समाजात सारे आलबेल असेल असा - परंपरावाद्यांना शोभणारा - भाबडा आशावाद, एकीकडे धर्म/श्रद्धा यातून येणार्‍या पारलौकिक श्रद्धांचा धिक्कार करताना रुजवलेला हा नवा - एक प्रकारे - पारलौकिकच आशावाद, कला/साहित्य यांचे मूल्यमापनसुद्धा स्वीकृत तत्त्वज्ञानाशी सुसंगत असावे असा दुराग्रह हे सगळे 'गुण' कसे दुर्लक्ष करता येतील? छे, आपण नाहीच कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक.

मग आम्ही वळलो आपल्या 'ग्रँड ओल्ड पार्टी' अर्थात काँग्रेसकडे. जग जेव्हा दोन टोकाच्या विचारसरणीमध्ये विभागले गेले होते तेव्हा प्रवाहपतित न होता स्वीकारलेला मध्यममार्ग, देशांतर्गत बाबतीत संपत्ती निर्माण वा परंपरा जतन अशा दोन परस्परविरोधी नि टोकाच्या मार्गांचा साधलेला समन्वय, त्यातून संथ गतीने पण निश्चित दिशेने टाकलेली पावले, केलेले प्रयत्न; गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान स्वीकारूनही सबल देशाच्या निर्मितीचे नेमके प्रयत्न, जागतिक पातळीवर एक जबाबदार देश म्हणून प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली देशाची इमेज, सामाजिक धोरणातही एकांगीपणा टाळून समन्वयाची घेतलेली भूमिका हे मला दिसलेले काही श्रेयस्कर मुद्दे. चला बरेच चांगले दिसताहेत. पण थांबा. राजकारणाची बाजू पाहिली तर त्यात रुजवलेली आयाराम-गयाराम संस्कृती, विधिनिषेधशून्य राजकारणाचा उद्गाता पक्ष अशी रास्त इमेज, पक्षांतर्गत संस्थानिकांमुळे राजकारणात रुजवलेली सरंजामशाही, गैरसोयीचे निर्णय टाळण्यासाठी कालापव्यय हा रामबाण उपाय वापरून जन्माला घातलेली सुस्त नोकरशाही व्यवस्था, प्रशासन, न्यायसंस्था नि पोलिस/सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर करण्याचा पाडलेला अनिष्ट पायंडा इ. अनेक गोष्टी आठवल्या नि म्हटले इथेही आपले जमणार नाही.

मग आम्ही म्हटले की देशाच्या राजकारणाबद्दल बोलताना देशप्रेम हा एक महत्त्वाचा मुद्दा समजायला हवा. अनेक वंश-संस्कृतींचे, परंपरांचे लोक उदरी घेऊन राहणार्‍या या देशात राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी या सर्वांना बांधणारा एक समान धागा निर्माण करायला हवा. धर्म/जात/प्रांत/भाषा इ. घटकांमुळे विखंडित झालेल्या समाजाला सांधून घेणारा हा धागा तसाच बळकट असायला हवा. केवळ राष्ट्रप्रेम वा एखादे तत्त्वज्ञान हे समाजाला दीर्घकाळ एकत्र ठेवू शकत नाही. यासाठी 'हिंदुत्त्वा'ची नवी व्याख्या करून देशातील सर्वांना बांधणारा एक बळकट धागा देणारा भाजपा अथवा पूर्वाश्रमीचा जनसंघ हा ही एक 'सशक्त' पर्याय आमच्यासमोर होता. सुसंस्कृत नेतृत्व, परंपरेचे गुणगान करतानाही बदलत्या काळाचे राखलेले भान, स्वातंत्र्यपूर्व नि स्वातंत्र्योत्तर काळातही काळात काँग्रेस, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट यांच्या तुलनेत दुय्यम असलेल्या पक्षाने देशात खर्‍या अर्थाने पहिले गैरकाँग्रेसी सरकार स्थापन करण्यापर्यंत मारलेली भरारी, त्यानंतर अनेक परस्परविरोधी भूमिका घेणार्‍या पक्षांचे शासन पूर्ण कार्यकाल यशस्वीपणे चालवून संयुक्त शासनकल्पनेची रोवलेली मुहूर्तमेढ, रा स्व. संघासारख्या संलग्न संघटनांच्या सहाय्याने केलेली केडर बेस्ड पक्षबांधणी, नि त्याच्या माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमासारख्या (व अन्य प्रासंगिक) सामाजिक कामांना पुरवलेले पाठबळ इ. काही उल्लेखनीय गोष्टी. पण मग हिंदुत्त्वाची व्यापक व्याख्या कागदावरच राहून त्याची पुन्हा हिंदु परंपरांशी घातलेली सांगड, 'पार्टी विथ डिफरन्स' चा दावा करत उत्तरप्रदेश, झारखंड, कर्नाटक इथे केलेल्या विधिनिषेधशून्य राजकीय तडजोडी, राजकारणातील गुंडगिरीबद्दल भरपूर गदारोळ करूनही उत्तर भारतात त्याच गुंडांच्या आधारे मिळवलेले राजकीय यश, धार्मिक बाबतीत फार गुंतल्यामुळे नेमक्या सामाजिक धोरणाचा अभाव, हिंदुत्त्वासारख्या व्यापक तत्त्वज्ञानाचा अंगीकार केल्याने स्थानिक पातळीवरील समस्यांकडे पाहताना उडणारा उद्दिष्टांचा संघर्ष अशा अनेक गोष्टी समोर येताचा आम्ही भाजपावरही फुली मारली.

पुढचा पर्याय होता समाजवादी पक्षांचा. पण आता मोठा प्रश्न असा की कोणता समाजवादी पक्ष निवडावा, मुलायमसिंहांचा, लालूप्रसाद यादवांचा, बहेनजी मायावतींचा, झोपाळू देवेगौडांचा कि स्वतः एकेकाळी विक्रमी मतांनी निवडून आलेल्या पण आज २००९ च्या लोकसभेत एक खासदार सुद्धा निवडून आणू न शकणार्‍या रामविलास पासवानांचा. एके काळी राममनोहर लोहिया, एम. एन. रॉय, एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, जयप्रकाश नारायण, प्रधान मास्तर वगैरे दिग्गजांनी जागवलेल्या नि जगवलेल्या समाजवादी चळवळीचे काप गेले नि भोके राहिली अशा अवस्थेत स्वतःला समाजवादी म्हणवणार्‍या या संधिसाधूंच्या पक्षांचे समर्थक असणे म्हणजे धडावर डोके नसल्याची कबुली देण्यासारखेच आहे.

आता समाजवादी पक्षांचा उल्लेख करताना प्रादेशिक पक्षांचा अंतर्भाव केलाच आहे तर आपल्या महाराष्ट्रापुरता शिवसेनेचा विचार करायला काय हरकत आहे? एक मराठी माणूस म्हणून विचार करता आज मुंबईत मराठी माणूस शिल्लक आहे याचे श्रेय फक्त आणि फक्त शिवसेनेचेच हे शिवसेनाविरोधक सुद्धा अमान्य करू शकत नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातीविरहित राजकारण करणारा एकमेव पक्ष अशी ओळख. अनेकदा प्रतिकूल स्थिती येऊनही मुंबईवर राखलेले वर्चस्व आणि तत्त्वज्ञानाच्या मर्यादेत सर्व सामाजिक/भौगोलिक विभागात केलेला उत्तम पक्षविस्तार हे ही खास दखल घेण्याजोगे. पण मूळ उद्दिष्टाची प्रादेशिक व्याप्ती नि त्यामुळे पक्षविस्तारावर पडणार्‍या स्वाभाविक मर्यादा, आक्रमक आंदोलनाचे शस्त्र वापरताना भान सुटून काही वेळा गुंडगिरीकडे वळणारे कार्यकर्ते, पक्षाचा विस्तार सर्व समाज घटकात होऊनही निश्चित सामाजिक भूमिका वा विधायक कार्यात परिवर्तित करण्यात सातत्याने येणारे अपयश यामुळे शिवसेनेलासुद्धा संपूर्ण समर्थन देणे अवघड झाले आहे.

आता नव्याने उभा राहिलेला नि वेगाने वाढणारा मनसे हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तरूण चेहरा, शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात दाखवलेली तडफ पुन्हा दाखविणारा, धडाडीचे कार्यकर्ते नि काम पुरे करतात असा सर्वसामान्यामधे जागवलेला विश्वास. इथेही पुन्हा मर्यादित उद्दिष्टामुळे विस्तारावर येणारी मर्यादा आहेच. शिवाय अजून राजसाहेबांनी आश्वासन दिलेली महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट आम्हाला तरी पहायला मिळाली नाहीये. त्यामुळे अजून तरी आम्ही मनसे समर्थक आहोत असे म्हणता येत नाही.

आता असे झाले आहे बघा. म्हणजे एखादे सनसनाटी विधान, शिवतीर्थावरच्या लाखालाखाच्या सभा, एक तत्त्वज्ञान, सामाजिक न्यायाची बतावणी, आक्रमकता, महान देशाची महान परंपरा वगैरे गप्पा, डोक्यावर गांधीटोपी घालून सुजनत्वाचा केलेला दावा, समतेच्या उद्घोष, लोहिया नि रॉय यांचे नामस्मरण या गोष्टी आम्हाला कधीच पुरेशा वाटल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला आता एक पक्ष निवडणे अवघड झाले आहे. म्हणून आम्ही आता तुमच्या दारी आलोय.

नाही आमची वरील मते तुम्हाला पटणार नाहीत हे माहीत आहे आम्हाला. पण आम्ही आमची मते तुम्हाला सांगण्यासाठी हे लिहिलेलेच नाही. आम्ही जरा विदा गोळा करू म्हणतोय. आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाचे समर्थन करायचे की नाही याचा निर्णय करताना वा एकाच पक्षाची निवड करताना कसा विचार करता? कुठले मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, कुठल्या निकषांच्या आधारे तुमचा निर्णय होतो. 'केल्याने देशाटन, पंडितमैत्री...' वगैरे आम्ही वाचले होते. आता आमचा प्रश्न देशाटन केल्याने काही सुटणार नाहीये, म्हणून मग जालटनाचा वा पंडितमैत्रीचा आधार घेतो आहे. तुमच्या विचारांच्या/निकषांच्या आधारे आमचा प्रश्न सुटतोय का ते पाहू या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा