बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - १

एक मार्केटिंग एग्जिक्युटिव एका ग्राहकाशी फोनवर बोलतो आहे. ग्राहकाला हव्या असलेल्या उत्पादनाच्या शिपिंग बद्दल बोलणे चालू आहे. एग्जिक्युटिव त्या ग्राहकाला ’नेक्स्ट डे डिलिवरी’ बद्दल पटवू पाहतो आहे. या ताबडतोब डिलिवरीसाठी वीस डॉलर किंमत आहे पण ग्राहकाला अजिबात घाई नाही. सराईत एग्जिक्युटिव त्याला त्याबद्दल १५ डॉलर एग्जिक्युटिव डिस्काउंट देऊ करतो. (यावरून तो सिनियर/मॅनेजर लेवलचा आहे हे लक्षात येते). अखेर ’नेक्स्ट डे डिलिवरी” साठी त्या ग्राहकाला राजी करण्यात तो यशस्वी होतो. त्यांचे संभाषण चालू असतानाच कॅमेरा आजूबाजूला फिरत त्या ऑफिसच्या परिसराचे दर्शन घडवतो. त्यावरून एका उच्चभ्रू अमेरिकन शहरातील पब्लिक मार्केट नावाच्या मोठ्या इंडस्ट्रीयल भागात हे ऑफिस आहे हे लक्षात येते. अखेर कॅमेरा येऊन स्थिरावतो तो त्या एग्जिक्युटिववर, टॉड अँडरसनवर. कॅमेर्‍याकडे पाठमोरा असलेला टॉड फोन खाली ठेवतो नि आपल्या संगणकावर आल्ट+टॅब दाबून अपुरा राहिलेला पेशन्सचा गेम खेळू लागतो. टॉडच्या समोर दोन-तीन क्युबिकलच्या पलिकडे असलेल्या भिंतीवर कंपनीचे नाव दिसते. टॉडच्या क्युबिकलमधे त्याच्या समोरच एक वीकली चार्ट लावलेला आहे, त्याच्या डाव्या बाजूला थोडे मागे एक कमोडिटी लिस्ट आहे. त्याच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला एका जुन्या प्रकारच्या स्कूटरचे मॉडेल ठेवले आहे, काही नोट्स/चिट्ठ्या समोरच्या सॉफ्ट-बोर्डवर चिकटवून ठेवलेल्या दिसतात. टॉडच्या समोर साताठ क्युबिकल्समधे त्याच्याप्रमाणेच कानाला मायक्रोफोनसहित हेडफोन लावलेले आणखी काही एग्जिक्युटिव्स बसलेले आहेत. त्या सर्वांच्या मागे, टॉडच्या बरोबर समोरच्या दिशेला त्या ऑफिसमधे प्रवेश करण्याचा दरवाजा आहे, या दरवाजाच्या बाजूलाच सर्व क्युबिकल्समधून दिसतील अशा ठिकाणी वेगवेगळ्या वेळ दाखवणारी तीन घड्याळे शेजारीशेजारी लावली आहेत. हे दृष्य आहे ’वेस्टर्न नॉवेल्टी’ नावाच्या कंपनीच्या ’ऑर्डर फुलफिलमेंट डिपार्टमेंट’च्या ऑफिसमधले.

आता कॅमेरा जागा बदलून टॉडच्या समोरच्या बाजूला जातो. टॉडच्या पाठीमागे एक केबिन दिसते. त्यातून टॉडचा बॉस - डेव - उठतो नि दारातून बाहेर झुकून टॉडला हाक मारतो. टॉडला आत बोलावून तो केबिनचे दार लावून घ्यायला सांगतो. त्याला एक महत्त्वाचा निर्णय टॉडला सांगायचा आहे. ’वुई आर रिस्ट्रक्चरिंग अवर डिपार्ट्मेंट’ तो प्रस्तावना करतो. ’रिस्ट्रक्चर हाऊ?’ या टॉडच्या प्रश्नावर ’ऑफशोअर द होल डिपार्टमेंट’ तो शांतपणे उत्तर देतो. टॉडच्या चेहर्‍यावर एक हास्य उमटते. त्याला वाटते त्याचा बॉस त्याची थट्टा करतोय. पण अर्थातच तसे नाही. टॉड चिडतो, तो म्हणतो आपली सर्व प्रॉडक्टस ही १००% या देशाच्या संस्कृतीशी नाळ जोडलेली आहेत, एखाद्या परक्या देशातील एग्जिक्युटिव त्यांचे मार्केटिंग कसे करू शकतील? उदाहरण म्हणून तो डेवच्या टेबलवर असलेल्या - अमेरिकेचा राष्ट्रीय चिन्ह असलेल्या - गरूडाची अमेरिकन ध्वजांकित प्रतिकृती उचलून दाखवतो. ’जमेल त्यांना, त्यासाठीच तर त्यांना ट्रेनिंग द्यायचे आहे, खास करून उच्चारांचे’ डेव सांगतो. आता मात्र हे आउटसोर्सिंग अटळ आहे हे टॉडला समजते. गेली चार साडे-चार वर्षे तो तिथला इन-चार्ज आहे. त्यामुळे तो तेथील सर्वांचा बॉसच नाही तर मेंटॉर सुद्धा आहे. तो विचारतो ’हे मी सर्वांना सांगावे अशी तुमची इच्छा आहे का?’. ’ते काम मी स्वत: करेन’ असे आश्वासन डेव त्याला देतो. अटळ ते समजून थोडा विषण्ण झालेला टॉड केबिनच्या काचेतून बाहेर नजर टाकतो. अचानक मागे वळतो, त्याच्या चेहर्‍यावर काळजी दाटून आली आहे. ’याचा अर्थ मलाही घरी जावे लागणार असा आहे ना?’. डेव नकारार्थी उत्तर देतो. किंचित आश्वस्त झालेला टॉड उसळून विचारतो, ’माझी सारी टीम गेल्यानंतर कंपनीला माझा काय उपयोग? कंपनीला माझीही गरज नाही’. ’बरोबर.’ निराकार चेहर्‍याने खांदे उडवून डेव उत्तर देतो. ’कंपनीला तुझी’ ’इथे’ गरज नाही, पण इंडियामधे आहे...’ टॉड अवाक होतो. ’..तिथे जे पर्यायी ऑफिस सेट-अप केले जात आहे तेथील एग्जिक्युटिवना ट्रेनिंग देण्यासाठी.’ डेव खुलासा करतो. ’पण त्यानंतर...?’ टॉड विचारतो. ’कंपनी वेगाने विस्तारते आहे, तुझ्यासाठी काहीतरी निघेलच... आणि हो... नोकरी तर तू केव्हाही सोडू शकतोस.’ डेव शांतपणे सांगतो. ’पण विचार कर. तू अजून तुझे स्टॉक-ऑप्शन्स वापरलेले नाहीत. नोकरी सोडल्यावर तुझे पेन्शन, मेडिकल बेनेफिटस सुद्धा नसतील. तू ही या बाहेर बसलेल्यांप्रमाणेच - जे पुढच्या वीस मिनिटात बेरोजगार होणार आहेत - घटत चाललेल्या जॉब-मार्केटमधे असशील... नोकरीच्या शोधात.’ अतिशय थंडपणे पुढील विदारक चित्र तो टॉडसमोर उभे करतो. टॉड उसळतो ’मी जाऊन त्या लोकांना ट्रेनिंग देऊ जे माझाच जॉब हिरावून घेतायत? अशक्य!. मला जमणार नाही.’ डेव सांगतो की टॉडच्या पोजिशनचा माणूस तिथे ’हाफ-ए-मिलियन रुपीज’ किंवा अकरा हजार डॉलर वार्षिक पगारावर मिळू शकतो, कंपनी टॉडला त्याच्या आठपट रक्कम मोजत असते. ’इथल्या प्रत्येक माणसासाठी मी तिथे आठजण रिक्रूट करू शकतो’ छ्द्मीपणे हसत डेव सांगतो. या ’पटी’च्या हिशोबाला टॊडला भविष्यात पुन्हा एकदा सामोरे जावे लागणार असते.

ही आहे सुरवात ’आउटसोर्सड’ची. माझ्या एका दोस्ताने हा चित्रपट पहाच असा आग्रह धरला तेव्हा मी प्रथम साशंक होतो. या प्रसंगातून तर माझी शंका खरीच ठरेल असे वाटू लागले होते. वाटले होते की हा चित्रपट म्हणजे पाश्चात्त्य माध्यमांनी आउटसोर्सिंग विरोधात चालवलेल्या प्रचाराचा पुढ्चा अंक असेल. पण सुदैवाने तसे घडले नाही. हळूहळू चित्रपट जसजसा उलगडत गेला तशी ही शंका मावळली नि एक नितांतसुंदर चित्रपट पाह्यला मिळाल्याची जाणीव झाली. एका मॉडर्न विषयावरसुद्धा एक संवेदनशील, अप्रचारकी चित्रपट निघू शकतो हे या चित्रपटाने दाखवून दिले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अर्थात संस्कृती श्रेष्ठत्त्वाच्या गंडाने पछाडलेल्या दोन्ही बाजूंकडील व्यक्तींना हा चित्रपट आवडणार नाहीच. याउलट जे माणसाकडे माणूस म्हणून पाहू शकतात, जगण्याचे एकाहून अधिक मार्ग असतात हे समजून घेतात, प्रत्येकाच्या काही चांगल्या काही वाईट बाजू असतात हे ज्यांना ठाऊक असते अशां सर्वांना आपण स्वीकारलेली जीवनपद्धती ही आपल्यापुरती - कदाचित- उपयुक्त असेल परंतु तीच श्रेष्ठ असे न समजता इतर पर्यायांकडे स्वीकृतीच्या नजरेने पाहता आले नाही तरी आस्थेच्या नजरेने पाहिले तरीही सहजीवन कितीतरी सुसह्य होऊ शकते हे ठसवणारा हा चित्रपट आवडून गेला नाही तरच नवल. अर्थात हा चित्रपट इंग्रजी असला तरी तो टॉडच्या दृष्टिकोनातून पाहिला जात असल्याने फक्त एक बाजूच समोर येते आहे. भारतीय बाजूला झुकते माप देणारा, खरेतर केवळ ती बाजू दाखवणारा चित्रपट असला तरी जसे टॉड आस्थेवाईकपणे भारतीय जीवनपद्धती अनुभवू पाहतो, येथील जगण्याशी जुळवून घेऊ पाहतो तसे भारतीय मन पाश्चात्त्यांच्या बाबतीत करते का असा प्रश्न राहतोच. नुसते मॅक्डोनल्डसमधे बर्गर खाणे, वीकेंडमधे विविध होटेल्समधे ’डिनर’ला जाणे, आई-वडिलांची (सासू-सासर्‍यांची हे लिहितसुद्धा नाही, यावर बहुतेकांची प्रतिक्रिया इंग्रजीत ज्याला ’फ्राउनिंग’ म्हणतात तशी होईल हे ठाउक आहे मला.) जबाबदारी टाळण्यापुरता व्यक्तिवाद जोपासणे (आणि एरवी इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निर्लज्ज गॊसिप करणे), मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळवणे म्हणजे ’करियर’ करणे अशी अर्धवट नि सोयीची अमेरिकन जीवनपद्धती स्वीकारून एरवी ’आपली संस्कृती श्रेष्ठ’ असा देखावा निर्माण करण्यासाठी त्यातील केवळ कर्मकांडांचे उपचार करणे अशी ’संकरित’ स्वार्थी जीवनपद्धतीच आपण स्वीकारली आहे. जसा एखादाच टॉड जसा एखादाच अमेरिकन असतो तसा एखादाच भारतीय असे करू शकतो. उरलेले क्षुद्र जीव संस्कृती श्रेष्ठत्त्वाच्या शाब्दिक लढाया करीत राहतात.

पुढच्या प्रसंगात मुंबई एअरपोर्ट्वर उतरलेला टॉड दिसतो. तिथे अनेक लोक येणार्‍या पाहुण्यांच्या नावाच्या पाट्या घेऊन उभे आहेत. त्या गर्दीतच एक ड्रायवर त्याला नेण्यासाठी गाडी घेऊन आलेला आहे, टॉड त्याच्या अगदी समोर जेमतेम एक फुटावर उभा आहे. आपल्याला नेण्यासाठी कोणी आले आहे का ते तो शोधतोय. कोणीही आलेले दिसत नाही हे पाहून तो ’कॅब’ पकडावी म्हणून तो पुढे जातो आणि इतका वेळ टॉड समोर असल्याने झाकून गेलेली त्या ड्रायवरच्या हातातली पाटी दिसते ’Mr. Toad'. आपली हसून हसून पुरेवाट होते. इकडे टॉड एअरपोर्टमधून बाहेर येतो. पांढरे ड्रेस घातलेले टॅक्सी-चालक त्याला गराडा घालतात नि त्याला कोण नेणार यावर भांडू लागतात. यातच दूरवर एका कूल - कॅब ला टेकून शांतपणे उभा राहिलेला एक ड्रायवर - जो खाकी कपड्यात आहे! - त्याला दिसतो. भांडणार्‍या टॆक्सीवाल्यांमधून कशीबशी सुटका करून घेत टॉड त्याच्याकडॆ धावतो. ’तू मला रेल्वे स्टेशनवर सोडू शकतोस का?’. ड्रायवर होकारार्थी मान हलवतो. तो टॉडची बॅग उचलत असताना टॉड त्या कॅबचे दार उघडून आत शिरू लागतो. इतक्यात तो ड्रायवर ती बॅग उचलून शेजारच्या रिक्षात ठेवतो (आता तो ड्रायवर खाकी ड्रेसमधे का होता हे उलगडते). ते पाहून टॉड धावत जाऊन रिक्षात बसतो नि त्याला रिक्षा नको आहे, गाडी थांबव म्हणून ओरडू लागतो. एवढ्यात भांडणार्‍या टॅक्सी ड्रायवर्सचा गराडा पडतो. आता मात्र ’थांबू नको, गाडी पळव, लवकर पळव’ असे टॉड ओरडू लागतो. अखेर तो सीएसटीवर सुखरूप पोहोचतो. तिथे मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस मधे आपली सीट शोधत असता त्याला एक आगंतुक गाठतो नि त्याच्याशी गप्पा मारू पाहतो. आणखी एका संभाव्य धोक्याची जाणीव होऊन टॉड सावध होतो. तेवढ्यात गाडी सुरू होते, आसपास लोकांची धावती गाडी पकडण्याची कसरत चालू होते. टॊडला याची सवय नसल्याने तो साहजिकच तो भांबावतो. पण तो आगंतुक त्याची बॅग आत फेकतो नि चालती गाडी पकडायला त्याला मदतही करतो. प्लॅटफॉर्मवरून तो टॉडला टा-टा करीत असतानाच गाडी वेगाने दूर जाऊ लागते.

या पहिल्या प्रसंगात पुढीच चित्रपटाचा टोन दिसून येतो. टॉडला ठकवू पाहणारे रिक्षा आणि टॅक्सीवाले जसे भेटतील तसेच या नव्या जगाच्या वेगाशी जुळवून घ्यायला मदत करणारेही भेटणार आहेत याची सूचनाच दिग्दर्शक या प्रसंगातून देऊन ठेवतो. आता घारापुरी स्टेशनमधून बाहेर येणारा टॉड दिसतो. बाहेर येताच त्याला बर्फाचे गोळे विकणारा दिसतो. खूष होऊन तो चक्क शंभर रुपये देऊन तो गोळा खरेदी करतो. गोळा खात असतानाच एक व्यक्ती - मि. पुरोहित नरसिंहा विराजनारायण या भक्कम नावाची - व्यक्ती त्याला विचारते ’आर यू मि. टोड?’ ’मि. टॉड .’ टॉड दुरूस्ती करतो. झालेल्या गोंधळाबद्दल माफी मागून पुरू त्याला घेऊन निघतो. जाताना गोळे विकणारा (सिद्धार्थ जाधव) आपल्या अफाट इंग्रजीत त्याला पुन्हा या असे सांगतो. ही पुन्हा अस्सल भारतीय पद्धत, आवर्जून ’पुन्हा या’ म्हणत निरोप घेण्याची, पण त्यातच ’एका गोळ्याला शंभर रुपये देणारं गिर्‍हाईक’ असल्याने त्याला एक गंमतीशीर असा स्वार्थाचा रंग पण आलेला.

आता पुरूच्या गाडीतून टॉडचा प्रवास सुरू होतो. हवापाण्याच्या गप्पा सुरू होतात. मुंबईच्या तुलनेत घारापुरी स्वच्छ आहे असे पुरू सांगतो. त्याचवेळी एका भिंतीवर नैसर्गिक रंगकाम करणारा एक जण टॉड दिसतो. अशा लहानलहान प्रसंगातून, विरोधाभासातून त्याला त्या परिसराची ऒळख होऊ लागते. त्यांच्या संभाषणातूनच टॉड ’एग्जिक्युटिव वाईस प्रेसिडेंट ऒफ मार्केटिंग ऎंड ऒर्डर फुलफिलमेंट’ या पदावर असल्याची माहिती आपल्याला कळते. पुरू प्रभावित होतो, तो म्हणतो ’धिस इज वेरी इम्प्रेसिव’, ’नॉट अ‍ॅज मच अ‍ॅज इट साऊंड्स’ टॉड खुलासा करतो. तो म्हणतो ’All I do is sell kitsch to some rednecks. And now I am going to train some shmucks' . त्याचा सगळा वैताग त्याच्या प्रतिसादातून बाहेर पडतो. पंचाईत अशी होते की त्याचा अर्थ न समजून बिचारा पुरू त्याला kitsch , redneck” आणि ’shmucks’ या शब्दांचा अर्थ विचारतो नि वर ते आपल्या टिपणवहीत टिपून ठेवतो. अर्थात टॉड शेवटच्या शब्दाचा अर्थ त्याला सांगत नाहीच. पुरू हा एक गंमतीशीर माणूस आहे. त्याने ’फ्यूचर कॉल सेंटर मॅनेजर’ असा हुद्दा लावून आपली बिजनेस कार्डस सुद्धा छापून घेतली आहेत. हाच माणूस इथल्या कॉल सेंटरचा इन-चार्ज होणार आहे हे टॉड ला समजते. गोर्‍या साहेबासमोर नम्रता दाखविण्याचा, त्याला खूष करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो आहे. पण तो लाचार नाही. आपल्या हातून काही चूक होऊ नये, हाती आलेली ५ लाख रू. ची नोकरी जाऊ नये या दृष्टीने तो काळजी घेतो आहे इतकेच. बोलता बोलता स्तुती करण्याच्या ओघात तो टॉडला सांगतो की बहुतेक परदेशी प्रवासी बर्फाचा गोळा खाऊन आजारी पडतात. तू खूप स्ट्राँग आहेस. यथावकाश तो बर्फाचा गोळा टॉडला त्याचा प्रताप दाखवतोच.

मुख्य रस्त्यापासून थोडे दूर जाताच गाडी दोन्ही बाजूनी झाडांनी वेढलेल्या रस्त्यावरून धावू लागते. यावेळी सतारीचे बोल ऐकू येऊ लागतात. चित्रपटात अशा समर्पक संगीताचा वापर जागोजाग केलेला आहे. टॉड अमेरिकेत असताना वापरलेले संगीत, तो मुंबईत उतरल्यानंतर रिक्षातून मुंबईच्या रस्त्यावरून जात असताना वापरलेले पंजाबी ढंगाचे उडते संगीत, तर घारापुरीच्या रस्त्यावरून जाताना ऐकू येणारे हे शांत सतारीचे स्वर यातून त्या त्या ठिकाणची जीवनपद्धती सूचित केली जाते.

टॉडचे बुकिंग येथील घारापुरी पॅलेस होटेलमधे झालेले आहे. पण पुरू सांगतो की ती जागा अतिशय एकाकी आहे. त्याऐवजी मी तुम्हाला ’आंटीज गेस्टहाऊस' मधे नेतो. आंटी तुझी तुझ्या आईप्रमाणे काळाजी घेईल. वाद घालू पाहणार्‍या टॉडच्या विरोधाला न जुमानता तो त्याला आंटीज गेस्ट हाऊसला नेतोच. एका लहानशा बंगलीवजा दुमजली घरात हे आंटीचे गेस्ट हाऊस आहे. आंटी ही तिथली सर्वेसर्वा. ही आंटी फर्डे इंडियन-इंग्लिश बोलते. तिच्या ’व्हॉट इज युअर गुड नेम?’ या अतीव ब्रिटीश वळणाच्या ('गुड नेम?’) प्रश्नाने अमेरिकन टॉड बुचकळ्यात पडतो. अखेर पुरू त्याची ऒळख करून देतो. आत जाऊन बसत नाहीत तो आंटी आपल्य देशी पद्धतीने त्याचे आईवडील काय करतात, त्याचे लग्न झाले आहे का, नसल्यास त्याला गर्ल-फ्रेंड आहे का, त्याला पगार किती मिळतो वगैरे प्रश्नांची सरबत्ती करते. व्यक्तिवादी समाजात वावरलेला टॉड चांगलाच बावरून जातो. चाचरत चाचरत तो सांगतो की त्याची एक गर्लफ्रेंड होती परंतु त्यांचा नुकताच ब्रेक-अप झालेला आहे. ’का?’ हा प्रश्न आंटी विचारणार हे ओघाने आलेच. ’शी वाँटेड टू स्टार्ट अ फॅमिली अँड आय वॉज नॉट रेडि फॉर दॅट’ टॉड सांगतो. ’बट व्हाय, यू आर ओल्ड इनफ टू बी ए ग्रँड्फादर.’ हा टिपीकल आंटीचा शेरा! टॉड कसनुसं हसतो. काय करणार बिचारा. पुढे एका प्रसंगात ही आंटी बिचार्‍या एकाकी टॉडला एखाद्या छानशा इंडियन मुलीशी भेटवण्याची ऑफर देते. त्याने नकार देताच तो ’होमो’ आहे का अशी विचारणाही बिनदिक्कत करते तर दुसरीकडे ’अगदी हाडांचा सापळा आहेस. भरपूर खाल्ले पाहिजेस तू.’ असा प्रेमळ दम देऊन भरपूर खायलाही देते. एकदा ही आंटी धोब्याकडून आलेल्या त्याच्या अंडरवेअरला सुद्धा इस्त्री करून ठेवते. आश्चर्यचकित झालेल्या टॉडला विचारते ’तुझी आई इथे असती तर तिने नसती केली का?’ अशी पृच्छा करते. एकुण ही आंटी भलतीच प्रेमळ नि सर्वांची काळजी करणारी आहे, एक प्रेमळ पण मॉडर्न आजीबाई.

तेवढ्यात चहा नि खाणे येते. खाण्यासाठी आणलेले फरसाण डाव्या हाताने खाणार्‍या टॉडला पाहून आंटी आणि पुरू अस्वस्थ होतात. त्यांची नेत्रपल्लवी चाललेली पाहून टॉडला काहीतरी गडबड आहे याची जाणीव होते. अखेर पुरू सांगतो ”डाव्या हाताने खाऊ नको कारण तो हात आम्ही... अशुद्ध .. हो अशुद्ध समजतो’. टॉडपुन्हा बावरलेला. ते पाहून अंकल - आंटीचा नवरा - उठतो आणि डाव्या हाताचा उपयोग सप्रयोग समजावतो. हा अंकल फक्त या एकाच प्रसंगापुरताच हालचाल करतो. एरवी तो दिसतो तो आरामखुर्चीवर बसून आराम करताना किंवा खाताना. एकुण हा अंकल आंटीच्या जिवावर जगतो आहे हे लक्षात येते. भारतीय नवर्‍यांची जगण्याची ही ही एक पद्धत! रोजच्या जगण्यातले हे छोटे छोटे तपशील टॉड हळू हळू आत्मसात करू लागतो. त्याच्या खोली लावलेला कालीचा फोटो असो, की बक्कळ चार चमचे घालून केलेली कॉफी असो, एक एक गोष्ट त्याला इथल्या जगण्याची ओळख करून देऊ लागते. एकदा आंटीच्या बागेत चहा घेत बसलेल्या टॉडला तेथील बोगनवेलीच्या झाडावर दिसतो तो शमेलिऑन, भारतात जवळजवळ सर्वत्र आढळणारा सरडा. आपल्या परिसराशी एकरूप होण्यासाठी रंग बदलणार्‍या या सरड्याबद्दल या नव्या परिसराशी जुळवून घेण्याची वेळ आलेल्या टॉडला विशेष कुतूहल वाटते.
गेस्ट हाउसच्या दारातून आत येताना डाव्या बाजूला कुंपणाची दगडी भिंत आहे. ही बरीच उंच आहे. पलिकडे काय आहे ते या बाजूने दिसू शकत नाही. परंतु बरेचदा गेस्ट हाउस मधे शिल्लक राहिलेले अन्न एका ट्रे मधे भरून त्या भिंतीवर ठेवले जाते. पलिकडून ते काढून घेऊन ट्रे पुन्हा त्या भिंतीवर ठेवण्यात येते. पलिकडील जगाचा नि त्या गेस्ट हाउसचा - त्यातील गेस्टस चा - एवढाच संबंध. पुढे आंटीने दिलेले भरपूर खाणे न संपवता आल्याने अनेकदा टॉडही आपले अन्न पलिकडच्या जगासाठी त्या भिंतीपलिकडच्या जगासाठी ट्रे मधे घालून भिंतीवर ठेवू लागतो. गोर्‍या माणसाला खाता येणार नाही इतके मिळावे तर भिंतीपलिकडच्या जगाचे निव्वळ उरलेल्या अन्नातही भागावे असा एक अर्थ यातून दिसू शकतो. अखेर कुतूहल अनावर होऊन तो त्या भिंतीवर चढून पलिकडे डोकावतो. त्याला दिसतो एक धोबीघाट, एका विहिरीभोवती वसलेला. आजूबाजूला असलेल्या जुनाट कळकट चाळवजा इमारतींच्या गॅलर्‍यांमधे लोंबकळणारे कपडे, नि धोबीघाटावर नित्य कलकलाट करीत धुणे धुणारे धोबी. त्यातला एक - कदाचित त्यांचा नेता वा सुपरवायजर - पिवळा टी शर्ट घातलेला धोब्याचे लक्ष भिंतीवरून डोकावणार्‍या टॉडकडे जाते. अन्न शेअर करणारे दोघे एकमेकांना प्रथमच भेटतात, ते ही भिंतीच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या जगात राहूनच. यथावकाश त्या भिंतीचे बंधनही दूर होते, तो भाग पुढे येईलच.

पहिल्या दिवशी सकाळी ऑफिसकडे जाताना पुरू टॉडकडून त्याला पाच लाख पगार दिला जाणार असल्याची खात्री करून घेतो, नि स्वत:वरच खूष होतो. त्यातच तो सांगतो की या नोकरीमुळेच त्याला भाग्यश्री सहस्रबुद्धे नावाच्या त्याच्या जुन्या मैत्रिणीशी लग्न करता येईल. चांगली नोकरी नसल्याने इतके दिवस रखडलेले हे लग्न आता सुरळितपणे पार पडणार असल्याने स्वारी खुषीत आहे. त्या भरातच ती ऐश्वर्या राय पेक्षाही सुंदर असल्याचा दावा तो करतो नि आपण गालातल्या गालात हसतो.

गाडी ऑफिसपाशी पोचते. ’हे आपले ऑफिस’ पुरू सांगतो. टॉड इकडेतिकडे पाहतो. एका एकमजली अर्धवट बांधलेल्या बांधकामाखेरीज तिथे काहीच नाही. ऑफिसला बाहेरून रंग दिलेला नाही. दुसर्‍या मजल्यावरचे पिलर्स पुरे झालेत पण स्लॅबचा नि भिंतींचा पत्ता नाही. बांधकामाच्या ठिकाणी वापरला जाणारी शिडी (जिला ते लोक ’घोडा’ म्हणतात) तशीच तिथे उभी. वरच्या चार पिलर्सला जोडणारे चार बांबू नि त्यावर प्लास्टिकचे निळे कापड टाकलेले. त्याच्या जवळच लावलेला एकुलता एक ए. सी. खालच्या मजल्याला खिडक्या नाहीतच आणि आत जाण्यासाठी पार्टिशनचे वाटावे असे एक दार नि त्यावर ’Fulfilment' असे कंपनीचे नाव असलेला एक फ्लेक्स टांगलेला. ’इथे हवी तशी जागाच उपलब्ध नव्हती, म्हणून आम्हाला स्वत:च हे बांधकाम करावे लागले’ पुरू स्पष्टीकरण देतो. परंतु आत प्रवेश करताच टॉडला दिसते एक सुसज्ज ऑफिस. अजून एखाद दुसरी चुकार वायर लोंबते आहे हे खरे पण एकुण ऑफिस उत्तम बनवलेले. दहा ते पंधरा सर्विस एग्जिक्युटीव ना बसण्यासाठी क्युबिकल्स नि त्या सर्वांवर एकाच वेळी नजर ठेवता येईल अशी एक सुपरवायजर्स केबिन, मॅनेजर पुरू नि व्हीपी असलेल्या टॉड यांच्यासाठी. टॉड प्रथमच समाधानी दिसतो. थोडे पुढे येताच त्याला दिसते मागचे दार नि त्यातून डोकावणारी एक गाय. ती जिथे उभी असते त्या व्हरांड्यातही साधी टेबल्स टाकलेली नि प्रत्येक टेबलवर दोन दोन एग्जिक्युटिव्ज ना बसायची सोय केलेली. हे सारे पाहत असतानाच सकाळचा बर्फाचा गोळा आपली करामत दाखवू लागतो. न राहवून तो गेस्ट हाऊसला परतण्याचा निर्णय घेतो.

अवघडलेला टॉड घाईघाईने गेस्ट हाउस कडे परतत असताना वाटेत एक पोरगं उगाच भुकेला आहे एक रुपया द्या म्हणून त्याच्या मागे लागते. पोटावर हात धरून चाललेला टॉड ’नो नो, नॊट अ गुड टाईम(!)’ म्हणून टाळू पाहतो. पण ते पोरगं त्याचा पिच्छा सोडत नाही. अखेर त्याला पैसे देण्यासाठी पोटावरून हात काढताच ते पोरगं त्याचा कमरेला लावलेला मोबाईलच पळवून नेतं. (पण ते पोरगं चोर नसतंच, फिरंग्याची गंमत करावी एवढाच त्याचा उद्देश असतो. काही काळाने ते तो फोन परत आणून देतं. पुढेही टॉडची नि त्याची ही गंमत चालू राहते.) हातघाईच्या स्थितीत असलेला टॉड धावतच आपल्या खोलीत शिरतो. पण हाय रे दैवा. त्याच्या टॉयलेट मधील टॉयलेट बोल त्याच्या देखतच एक गवंडी बाहेर आणताना दिसतो. दुसरा गवंडी सांगतो ’नीचे नीचे... डाउनस्टेर्श.. बाथरूम.. नो प्रॉब्लेम’. बिचारा धावतच जिना उतरतो नि खालच्या मजल्यावरील टॉयलेटमधे घुसतो. घाईघाईने पँटचा पट्टा काढत असताना एकीकडे नजरेनेच तो टॉयलेट पेपर वगैरे शोधत असतो. पण त्याला ते सापडत नाही. एवढ्यात त्याचे खाली लक्ष जाते. तिथे कमोड ऐवजी इंडीयन पद्धतीचा टॉयलेट दिसतो. हतबुद्ध झालेल्या टॉडच्या चेहर्‍यावर हळूहळू काही समजल्याचे भाव दिसतात. सावकाशपणे तो आपला डावा हात वर आणतो नि त्याकडे पाहतो नि एक सुस्कारा सोडतो.या ’अशुद्ध डाव्या हाता’च्या प्रसंगाप्रमाणे इतरही अलिकडचे पलिकड्चे काही प्रसंग असे छानपैकी जुळवून घेतलेले दिसतात. पुढेही अनेक वेळा पूर्वार्धातील अनेक प्रसंगांची सावली उत्तरार्धातील प्रसंगांवर पडलेली दिसते. त्यामुळे कथानकाला एक प्रकारचा बांधीवपणा आलेला आहे. कोणताही प्रसंग उपरा वाटत नाही, त्याचा कुठे ना कुठे सांधा जोडून घेतलेला दिसून येतो.

(क्रमशः)

1 टिप्पणी:

  1. सुरेख विश्लेषन. आउटसोर्सस्ड माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक. यावर नंतर एनबीसीने टिव्ही सिरीयल बनविण्याचादेखील प्रयत्न केला होता. दुर्दैवाने सिरीयल तितकी ग्रीप पकडु शकली नाही पण जितके भाग दाखविता आले तेही छानचं होते.

    उत्तर द्याहटवा