सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - ३

...टॉडला पुढे सलमानची भूमिका देऊन त्याचे ज्युनियर्स ’साजन के घर आयी...’ वर नाचायलाही लावतात. तो पठ्ठ्याही त्या ठेक्यावर मस्तपैकी नाचून बिचून घेतो. (पुढे चालू)

गेस्ट हाऊसमधे प्रवेश करणार्‍या टॉडला एकदा भिंतिपलिकडून हाक येते. भिंतीवरून पलिकडचा एक धोबी टॉडला त्याच्या घरी बोलावत असतो. हो ना करता टॉड जायला तयार होतो. भिंतीवरून उडी मारून तो पलिकडे जातो. ही भिंत देखील एक मेटॅफर आहे. या भिंतीपलिकडचे जग नि अलिकडचे जग वेगळे आहे, त्या दोन जगांना वेगळे करणारी ही भिंत! आल्या आल्या पहिल्याच दिवशी भिंतीआडच्या त्या जगात तो डोकावला होता. पण तो त्या जगात कधीच शिरला नव्हता. टॉडचे ही भिंत ओलांडून जाणे हे एक प्रकारचे पलिकडच्या जगात प्रवेश करणे आहे.
कसे दिसले त्याला हे जग? जेमतेच त्याच्या उंचीची दाटीवाटीने वसलेली बैठी घरे. भिंती कळकटलेल्या, त्या कधी कुडाच्या, कधी पत्र्याच्या तर कधी निव्वळ पुठ्ठ्याच्या, अरूंद गल्ल्या, त्याच्या मधोमध वाहणारे गटार. त्याच्या बाजूलाच उघड्यावर आंघोळीपासून, कपडे धुणे, भांडी घासणे, जेवणखाण इ. अनेक प्रकारची कामे करणारे लहानथोर, वृद्ध, त्या एवढ्याश्या खुराड्यात जगणारी माणसं. टॉडला हे जग अगदी नवीन आहे. इंडियाचा परिचय त्याला त्याच्या एम्प्लॊईजनी करून दिला होता, त्यापलिकडचा भारत तो आता पाहत होता. अनेक गल्लीबोळातून तो धोबी त्याला आपल्या घरी घेऊन जातो. घर एवढेसे, त्यामुळे दारासमोर बाहेरच बैठक मारली जाते. त्या धोब्याची वृद्ध आई त्याच्यासाठी भरड तांदुळाचा दोन तीन चमचे भात नि त्यावर चमचा दोन चमचे करी वाढते. त्याच्यासाठी खास केलेले - एकमेव - उकडलेले अंडे त्यावर ठेवते (आता आपल्याला ही वृद्धा आपण आधीही पाहिली असल्याचे आठवते. आधीच्या प्रसंगात टॉड ऑफिसमधून परतत असता, एका अंडी विकणारीशी शिल्लक राहिलेले एकमेव अंडे स्वस्तात देण्यासाठी हुज्जत घालताना दिसलेली असते, तीच ही). धोब्याची पत्नी वरून लटकणार्‍या एका वायरला मिक्सरची वायर झटक्यात जोडते नि मिक्सर चालू होतो. ती वायर कुठून आलेली आहे हे कुतूहलाने पाहणार्याला टॉडला वरच्या एका मुख्य वाहिनीवरून आलेली दिसते (या ’तंत्राचा’ वापर पुढे तो करून घेतो.). धोब्याची पत्नी एका खोलगट तव्यातून त्याच्यासाठी जाडसर उत्तप्पा भाजते. तयार झालेला उत्तप्पा उलथून तो टॉडला वाढते. त्यावर वोक्सवॅगन कंपनीचा लोगो उमटलेला दिसतो.
एकीकडे मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपला स्वत:चा लोगो लहानग्या वासरावर चरचरून उमटवणारे अमेरिकन तर दुसरीकडे तवा घेण्याची ऐपत नसल्याने वोक्सवॅगन गाडीच्या स्टेपनीचा पत्राच तव्याऐवजी वापरल्याने कोण्या दुसर्‍याचा लोगो प्रत्यक्ष आपल्या अन्नावर उमटला तरी त्याबद्दल फारशी फिकीर करण्याच्या स्थितीत नसलेला तो धोबी. आणखी एक विरोधाभास टॉडच्या समोर असतो. त्याचवेळी त्याच्याशी नित्यनेमाने पळवापळवीचा खेळ खेळणारं ते पोरगं त्याच घरचं आहे हे त्याला समजते. टॉडचा पळवलेला मोबाईल ते त्याला परत देतं. आता तो मोबाईल छान नक्षीदार स्टिकरने सजवलेला असतो. टॉड समाधानाने हसतो.

टॉड आता घारापुरीमधे चांगला रुळलाय. येथील आचारविचार, इथली माणसे, जीवनपद्धती हळू हळू त्याला उमगू लागली आहे. ’आपला जॉब हिरावून घेणारे’ ही ओळख आता पुसट झाली आहे. अशातच एक दिवस त्याचा बॉस डेव अचानक येऊन थडकतो. त्याला स्टेशनवर रिसीव करायला गेलेल्या टॉडल दिसतो तो बर्फाचा गोळा खाणारा डेव. तो हसतो, डेवला गोळा खाण्यापासून मुळीच परावृत्त करत नाही की त्याच्या परिणामाबाबत त्याला सावध करण्याचा प्रयत्नसुद्धा करीत नाही. निव्वळ पैसे वाचवण्यासाठी आपली चांगली नोकरी घालवून परागंदा व्हायला लावणार्‍या डेववर एक छोटासा का होईना, सूड घेण्याची संधी तो का सोडेल?

डेवला घेऊन टॉड ऑफिसमधे प्रवेश करतो. त्याला दिसतात पाणी उपसणारे त्याचे कर्मचारी, त्यात आघाडीवर मॅनेजर पुरू. पुरू त्याला सांगतो मागे असलेल्या शेताला पाणी देताना ओसंडून वाहिलेले पाणी इथे शिरले आहे. आपल्याकडची काही वर्कस्टेशन्स बंद पडून फक्त आठच काम करताहेत. हे सांगत असतानाच इलेक्ट्रिक बोर्डवर स्पार्किंग होते नि उरलेली वर्कस्टेशन्सही धराशायी होतात. डेवच्या आगमनाच्या वेळीच हे घडल्याने आपल्याला वाटते आता संपला खेळ. पण थांबा, हा टॉड काय करतोय ते पाहू या. संतापलेल्या डेवला तो आश्वासन देतोय की लवकरच सर्व काही ठीक होईल. तो सर्वांना सांगतो की आपण सर्व टर्मिनल्स गच्चीवर हलवतोय. पुढच्या वीस मिनिटात सर्व काही चालू व्हायला हवे. तोवर मी जाऊन ’टेक्निकल कन्सल्टंट’ ला घेऊन येतो.

इथे पाण्यावर त्रिकोणी आकाराच्या चीज सारखा दिसणारा स्पंज तरंगताना दिसतो. यावरून आपल्याला आयटेम नं फोर झीरो थ्री (अमेरिकन मंडळी स्पोर्ट्स इवेंट्सना जाताना घालतात ती टोपी) आठवते.

सर्व कर्मचारी गच्चीवर मशीन्स जोडत असतानाच टॊड त्याच्या शेजारी असलेल्या त्या धोब्याला घेऊन येतो नि हा आपला ’कन्सल्टंट’ अशी ओळख करून देतो. कुत्सित नजरेने ’हा तुझा कन्सल्टंट?’ असे विचारणार्‍या डेवला ’हो’ असे ठाम उत्तर देतो. टॉडच्या विश्वासाला हा कन्सल्टंटही जागतो. वरून जाणार्‍या मुख्य वाहिनीवरून तो खालच्या मशीन्सना वीजपुरवठा चालू करून देतो. डेव अवाक होतो.
मशीन्स चालू होतात, सेंटरचे काम सुरळीत चालू होते. मि. मनमीत पुन्हा एकदा एलिझाबेथशी कोर्टिंग करताना सापडतात. टॉड बजावतो ’मॅरेज प्रपोजल इज नॉट स्मॉल टॉक. इफ शी बाईज् समथिंग एवरी फाईव मिनट अँड यू क्लॉक इट अ‍ॅज अ सेपरेट इन्सिडन्स देन इट्ज ए डिफरन्ट स्टोरी.’ मनमीतला मोकळे कुरणच मिळते. परिणामी एमपीआय प्रथमच सहाच्या खाली जातो. सर्वजण जल्लोष करतात. इतक्यात एका कॉलवर सुपरवायजरी डिमान्ड होते. एक संतप्त अमेरिकन ग्राहक आउटसोर्सिंगला जोरदार शिव्या देत असतो आणि मला अमेरिकन सर्विसच हवी असा आग्रह धरून बसलेला असतो. त्याला अमेरिकन ईगलची प्रतिकृती हवी असते आणि त्यासाठी एका देशी कंपनीशी व्यवहार करायची तयारी नसते. सुपरवायजर म्हणून टॉड तो फोन घेण्यासाठी उठतो, पण तोवर आशाने त्या फोनचा ताबा घेतलेला असतो. ती त्या ग्राहकाला सांगते की आम्हाला तुमचा राग समजू शकतो. तो उसळून म्हणतो ’मुळीच नाही. मागच्या महिन्यातच माझा जॉब गेला. मी तिथे बावीस वर्षे रक्ताचं पाणी केलं तो जॉब आज मेक्सिकोत गेला आहे. माझ्या भावाची नोकरीसुद्धा गेली आहे.’ ती त्याला आश्वासन देते. ’तुमच्या सारख्या आग्रही ग्राहकांसाठी आम्ही एका अमेरिकन कंपनीबरोबर टाय-अप केले आहे. ही कंपनी आमच्या कंपनीप्रमाणे कोणतेही काम आउट्सोर्स करत नाही. त्यांची सर्व उत्पादने १००% अमेरिकन असतात. मी तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नि वेब-साईट अ‍ॅड्रेस देते त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. फक्त एकच करावे लागेल तुम्हाला...’ ती थांबते. अधीर झालेला ग्राहक विचारतो ’पण किमतीचे काय?’ ’...तुम्हाला फक्त २१२ डॉलर जास्त द्यावे लागतील.’ ती सांगते. पलिकडील आवाज शांत होतो. काहीवेळाने तो ग्राहक वेस्टर्न नॉवेल्टीचा ईगल खरेदी करण्यासाठी ऑर्डर नोंदवतो.

इथे नोकरी गमावलेल्या आणि त्यामुळे कधी नव्हे ते काटकसरीने पैसे खर्च करण्याची वेळ आलेल्या त्या ग्राहकाबद्दल क्षणभर सहानुभूती वाटते. नोकरी गेल्याने कमी पैशात आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करायची असेल तर शेवटी अपरिहार्यपणे त्यांच्याकडेच जावे लागते ज्यांनी त्याची नोकरी हिरावून घेतली आहे. सार्‍या जगाला स्पर्धात्मक व्यापार शिकविणार्‍या, त्यासाठी राजनैतिक, कूटनितिक, लष्करी मार्गाने विविध देशांवर दबाव आणून त्यांचा व्यापार-उदीम खुला करण्यास भाग पाडणार्‍या अमेरिकेच्या नागरिकांनाच त्या व्यवस्थेचा फटका बसावा हा काव्यगत न्याय म्हणता येईल. स्वत:च्या फायद्यासाठी, आपल्या कंपन्यांना पलिकडील मार्केटमधे प्रवेश करता यावा म्हणून जी ज्या भिंती पाडल्या त्यातून पलिकडचेही इकडे येऊ शकतात हे अमेरिका समजू शकली नाही त्याचे हे फळ. सारे जग हे फक्त अमेरिकेच्या फायद्यासाठीच आहे, जे आपण करू तेच बरोबर या भ्रमात राहून जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेत इतरही लोक येतात हे सोईस्करपणे विसरली त्याचा हा परिणाम होता. इथे जीएंच्या’ ’प्रवासी’ मधल्या आंधळ्या शिकार्‍याची गोष्ट आठवली. डोळस माणसांवर सूड घेण्यासाठी त्याने केलेला आरशांचा व्यूह एक कुत्रे सहज पार करून जाते - बरोबर त्या प्रवाशालाही सहिसलामत बाहेर काढते - तेव्हा हताश होऊन तो म्हणतो. ’माझंच चुकलं. मी सगळं जग माणसांचं गृहित धरलं. त्यांच्यासाठी अगदी चिरेबंद व्यूह निर्माण केला, एकादी लहानशी फटसुद्धा ठेवली नाही. पण या विश्वात माणूस एकटा नाही हे मला सुचलं नाही. म्हणूनच एका यक:श्चित कुत्र्याने आज माझा पराभव केला.’ म्हणूनच आज ओबामाकाका स्वदेशीचा नारा देतात, सिटी बँक सारख्या जायंट बँका वाचवण्यासाठी सरकारी खजिना खुला करतात तेव्हा मोठी गंमत वाटते आणि एकेकाळी खुली अर्थव्यवस्था म्हणजे चिरेबंद व्यवस्था, प्रोटेक्शनिझम सर्वात घातक मानणारी अमेरिका घड्याळाची निदान काही चक्रे उलटी फिरवू लागल्याचे जाणवते.

एमपीआय सहाच्या खाली आणण्याबद्दल जवळच्या ’लोटस कोर्ट’ मधे पार्टी अ‍ॅरेंज केली जाते. पार्टीपूर्वीच डेव हे सेंटर बंद करून चीनमधे हलवण्यात येणार असल्याचे सांगतो. तिथे एका अमेरिकनाच्या पगारात मला वीस माणसे कामावर ठेवता येतील, तो सांगतो. पुन्हा एकवार हा पटींचा हिशोब टॉडला वेटाळून राहतो. ही बातमी इथल्या कर्मचार्‍यांना देण्याचे काम टॉडवरच येते. लोटस मधे पार्टीच्या मूड मधे असलेल्या एम्प्लॉईजना तो सांगतो ’ऑल योर जॉब्स हॅव बीन आउटसोर्सड्. यू विल गेट वन मंथ्स सर्वंट्स पे.’ त्यांच्या मधे कुजबूज सुरू होते. त्यातून ’एक महिन्याचा पगार... नॉट सो बॅड’ असा आशाचा आवाज ऐकू येतो. या पैशात काय चैन करता येईल याची चर्चाही चालू होते. इतक्यात मनमीत उठतो नि न्यू जर्सी येथील एलिझबेथ वॉटसन हिच्याशी आपली एंगेजमेंट निश्चित झाल्याचे जाहीर करतो. सगळॆ जल्लोष करतात, त्याचे अभिनंदन करतात. 'ओ टॉड भैया, नौकरी गयी तो गयी, की फर्क पैंदा’ तो टॉडला म्हणतो. पार्टी सुरू होते.

या सर्वापासून अलिप्त आहे तो फक्त पुरू. सगळॆ जल्लोष करीत असताना खिन्न झालेला तो एकटाच बार टेबलपाशी उभा आहे. सर्वांच्या प्रतिक्रियेने गोंधळ्लेला टॉड त्याला विचारतो नोकरी गमावूनही हे सगळे खूष कसे? पुरू म्हणतो ’खूष होतील नाहीतर काय. तुम्ही दिलेल्या ट्रेनिंगच्या बळावर आठ्यवड्याभरात बहुतेक सगळ्यांना दुसरी नोकरी मिळेल, वर एक महिन्याचा फुकट पगार. त्यात आणखी चैन करता येईल. ’ ’व्हॉट अबाउट यू?’ टॉड विचारतो. ’मॅनेजमेंट इज डिफरंट, अँड आय अ‍ॅम नॉट यंग एनिमोअर’ धास्तावलेला पुरू सांगतो. त्याच्या लग्नाबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते हे ही टॉडला समजते. विकल होऊन पुरू सांगतो तिला दुसर्‍याबरोबर पाहण्यापेक्षा मरण पत्करेन मी किंवा भारताबाहेर स्थलांतर करेन.’ पण कदाचित टॉडचीही नोकरी जाईल हे ऐकून तो टॉडचेच सांत्वन करतो. तू एक चांगला बॉस आहेस असे सांगतो. आशा ’हॉलिडे इन गोवा’ चे पुढचे प्रकरण लिहिण्यासाठी टॉडला घेऊन जाते.टॉडला डेव सांगतो की वेस्टर्न नॉवेल्टी ला टेक-ओवर करण्यात आले आहे. नवी कंपनी चार हजार जॉब्ज शांघायला आउटसोर्स करणार आहे. तिथे तुझी आम्हाला गरज आहे. पण टॉडला आता या प्रकाराचा उबग आला आहे. तो नकार देतो. डेव त्याला मोठे पॅकेज, अधिक पर्क्स देऊ करतो, पण तो आपल्या निर्णयावर आता ठाम असतो. हे संभाषण चालू असताना आजपर्यंत न आलेली सुपरवायजर केबिनची काच आणून बसवली जात असते. टॉड असताना त्याचे एम्प्लॉई आणि तो यांच्यात नसलेली ही भिंत तिथे डेव बसताच त्याच्या नि टॉडच्या मधे उभी राहिलेली असते. (यात भारतीयांच्या कामातील वेगाला हळूच चिमटाही काढला आहे.) टॉड स्वत: ऐवजी पुरूची शिफारस करतो आणि पुरू एक नवा टॉड बनून पत्नी भाग्यश्रीसह शांघायकडे प्रयाण करतो.
टॉड आता अमेरिकेत परतलाय. आल्याआल्या तो प्रथम आपल्या आईला फोन करून भेटायला येत असल्याचे सांगतो. घरात येताच आणलेल्या ग्रोसरीतले अंडे काढून क्षणभर त्याच्याकडे पाहतो. (कदाचित त्याला भिंतीपलिकडील जगात आपल्या धोबी मित्राकडे खाल्लेल्या त्या अंड्याची आठवण होत असावी.) कॉफी करून टेबलवर ठेवतो. तीन चमचे साखर घालून झाल्यावर क्षणभर थांबतो पण (आंटीच्या गेस्ट हाउसवर प्यायलेल्या कॉफीची आठवण होऊन) लगेच चवथा चमचा कॉफीमधे घालतो. ती पिता पिताच त्याला समोरची जॉर्ज वॉशिंग्टनचे चित्र असलेली प्लेट दिसते.
’हॉलिडे इन गोवा’च्या दुसर्‍या प्रकरणाची आठ्वण म्हणून आणलेली टिकली तो त्या वॉशिंग्टनच्या माथी लावतो. जणू अमेरिका आता भारताचे सौभाग्य मिरवणार असे तो सूचित करतो आहे. हे करत असतानाच त्याचा मोबाईल खास बॉलिवूड रिंगटोन वाजवू लागतो.'

(समाप्त)
ता.क.: कथानकाचा विषय लक्षात घेता बरेचसे संवाद मूळ इंग्रजीत तसेच ठेवले आहेत. फक्त वाचनाच्या सलगतेसाठी देवनागरीमधे लिहिले आहेत.

1 टिप्पणी:

  1. एक बहारदार चित्रपट.. आणि त्याचे रसग्रहणही तितकेच वाचनीय.. काही प्रसंगातून करून दिलेली भारतीयत्वाची जाणीव (चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारे) कधी कधी आत्मभिमान सुखावते तर कधी सलते. परदेशी दिग्दर्शकाने शेकडो बाबींचा बारकाईने केलेला अभ्यास पदोपदी जाणवतो. फारच सुंदर लिहिलेत!!चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याची अनुभूती मिळवून दिलीत याबद्दल आभार!

    उत्तर द्याहटवा