सोमवार, २१ एप्रिल, २०१४

विकासाचे वारकरी


फेसबुकवर एका पोस्टमधे  सद्यस्थितीवर भाष्य करणारे एक मार्मिक वाक्य वाचण्यात आले. <<कितीही छान ड्रायविंग करणारा माणूस मिळाला तरीही त्याचा खून मारामाऱ्यांमधे सहभाग असल्याची आशंका असेल तर आम्ही त्याला नोकरीवर ठेवत नाही>> कसं आहे, गुंडगिरी घरात घ्यायची नसते. घरापासून दूर गुंडगिरी करणारे जेव्हा त्याला तात्विकतेचा, अस्मितेचा मुलामा देत असतात तेव्हा ती अवदसा आपल्यावर येऊन आदळू नये म्हणून आम्ही आधीच जोरजोराने ओरडा करून त्याच्या त्या तथाकथित तात्विक, भावनिक मुद्द्याला समर्थन देत त्या गुंडांना अप्रत्यक्षपणे 'आम्ही तुमच्या बाजूचे आहोत हं. खळ्ळ् खटॅक् आमच्यावर करू नका. इतर कुणावरही करा, पण आमच्यासारख्या 'आपल्या' लोकांवर करू नका.' अशी भेकड विनंती करत असतो. आपल्यापुरते आपल्याला सुरक्षित करून घेत असतो. 

आमची विकासाची स्वप्ने ही इतर कोणाच्या स्वार्थत्यागावरच नव्हे तर गरजांच्या बलिदानावर उभी राहिली तरी चालतात. मुळात असा काही त्याग कुणी करत आहे हेच आम्हाला मान्य नसतं, घरबसल्या आपल्याला जगातला सग्गळा कार्यकारणभाव उलगडत असतो, त्यातून आपणच किती लायक आहोत हे सिद्ध होते हे उमजणे उघडच आहे. मग मागे राहिलेल्यांना, त्या विकासाची किंमत चुकवलेल्यांना निर्लज्जपणे 'ते कमी लायक होते म्हणून मागे राहिले' हे स्पेन्सरचे विधान डार्विनच्या नावे खपवून त्याला वजन आणण्याचा आपण प्रयत्न करतो. धरण बांधताना उठलेल्या गावांतून घर, शेजार, कष्टाने उपजाऊ बनवलेली जमीन हे सारे गमावलेला शेतकरी पुढची वीस पंचवीस वर्षे हक्काची जमीन नि नुकसानभरपाई मिळवण्यासाठी एक दोन पिढ्यांचा संघर्ष करत पिचून मरतो. त्या धरणाच्या बॅकवॉटर्सजवळच्या आधीच बळकावलेल्या जमिनीवर राजकारण्यांचे उद्योजकांचे फार्म-हाउसेस उभी राहतात. त्यांच्या ओळखी काढून तिथे कधी मधी 'श्रमपरिहारा'साठी जाणारे मध्यमवर्गीय 'विकासाचे वारकरी' 'या शेतकर्‍यांना कितीही दिलं तरी कमीच पडतं. आता विकास करायचा म्हणजे थोडाफार त्याग करावाच लागतो.' चे गळे काढतात. 'फोxxxनो, तुम्ही काय त्याग केलात?' या प्रश्नावर 'आम्ही टॅक्स नाही का भरत.' हा सर्वत्र वापरलेला एक रुपया काढून दाखवतात. हा एक रुपया तो आपल्या सार्‍याच मागण्यांसाठी, तर्कांसाठी वापरतात, वापरून झाल्यावर पुन्हा खिशात ठेवतात, पुन्हा वापरण्यासाठी. या एकाच रुपयात जगातले सारे काही खरेदी करण्याची इच्छा ते बाळगून असतात. वर तो टॅक्स आम्ही भरायचा नि इतरांना सगळ फुकट मिळतं हा गळा काढणेही आहेच वर.

मार्क्सबाबाला या मध्यमवर्गीयांची एवढी चीड का असावी हे आता हळू हळू ध्यानी येऊ लागले आहे. पोलिस भ्रष्ट आहेत ही यांची तक्रार, आमच्या तक्रारींची दखल घेत नाहीत. वकील सार्‍यांना लुटायलाच बसले आहेत, डॉक्टर्स रुग्णांना फसवून पैसे काढण्याचेच धंदे करायला बसले आहेत, राजकारणी तर एकुण एक भ्रष्ट, शेतकर्‍यांचे लाड फार झालेत; झोपडीपट्ट्या म्हणजे देशाला कलंक, सगळ्या उठवून जागा मोकळ्या करून घेतल्या पाहिजेत(अरे मुड्द्यांनो तिथे राहणार्‍या माणसांनी जायचं कुठे. का त्यांनाही नष्ट करायचं? आणि ते 'तिथे' राहून त्या अभावाच्या ठिकाणी तुटपुंज्या कमाईत गुजराण करणार नसतील तर तुमच्या सार्‍या लहान सहान सेवा इतक्या स्वस्तात तुम्हाला मिळतील का हा विचार कधी केला आहे का?); सरकारी बाबू तर भ्रष्टपणाचे मूर्तिमंत उदाहरणच, शिवाय कामचुकारही. 


शेवटी या कूपमंडूकांचे आदर्श कोण ते खासगी उद्योजक नि संस्था. पण पंधरा वर्षे इंडस्ट्रीत काढल्यावर नि त्या निमिताने त्यांच्याकडे बारकाईने पाहिल्यावर हे अधिकच भयानक असतात असा अनुभव आहे. इथेही भ्रष्टाचार, प्रचंड राजकारण, पैसे देऊन कामे मिळवण्याचे उपद्व्याप, पैसे देऊन इंड्स्ट्रियल अ‍ॅवॉर्डस मिळवण्याचे प्रकार, आउटसोर्सिंगच्या नि कंत्राटी कामांच्या नावाखाली कोणत्याही जबाबदारी विना राबवून घेत कामगारांचे केलेले शोषण, काम झाले की सरळ हाकलून देणे हा सारा प्रकार अधिक भयावह आहे. फक्त आज माझ्या डोक्यावर मागच्या पिढीपेक्षा लवकर आलेले छप्पर, दारी उभी असलेली चारचाकी, बेष्टं इग्लिश मीडियममधे - ते ही घरून पिक-अप ड्रॉप साठी येणारी बस असलेली, वाटलं काय तुम्हाला - शिकणारी पोरं (पण त्यांना संध्याकाळी 'शुभंकरोती' वगैरे 'प्रेयर्स' म्हणायची ष्ट्रिक्टं सवय लावलीये बरं का, शेवटी आपली संस्कृतीच श्रेष्ठ नै का?), निरनिराळ्या हाटिलात चित्रविचित्र नावाचे पदार्थ चाखत 'ओबामा काय म्हणाला नि नॅन्सी पॉवेल का गेली?' या विषयावर चर्चा करणारे 'विकासाचे वारकरी' डोळ्यावर डॉलर्स बांधून* हे पहायचेच नाकारतात. सुपातले जात्यात असलेल्यांना 'तुम्ही वेगळे आम्ही वेगळे' म्हणातात तसे. जोवर आपण जात्यात जात नाही तोवर शहाणपण येत नाही हेच खरं.

* हा वाक्र्पचार वीणा गवाणकरांच्या 'एक होता कार्व्हर' मधून साभार.

1 टिप्पणी: