रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

स्वागत २०१४ च्या दिवाळी अंकांचे - २: अनुभव

दीप्ती राऊत यांची 'जातीच्या जोखडात' ही डायरी विलक्षण हादरवून सोडणारी. अगदी क्वचित येणारं एखादं मूल्यमापनात्मक वाक्य वगळता, 'जसं पाहिलं तसं' नोंदवत गेल्याने नोंदींच्या पक्षपातीपणाचा/झुकलेपणाचा आरोप टळतो आणि मूळ घटनांमधील रखरखीत वास्तव थेट तुमच्या मनावर आघात करते.

मयुरेश प्रभुणे यांची मंगळ मोहिमेबद्दल माहिती सांगणार लेख अभ्यासपूर्ण विस्तृत नि सांगोपांग.

मधु मंगेश कर्णिक यांचा 'सहा मैलाचा रस्ता' गेली अनेक वर्षे तुडवत असलेल्या हजार मैलांच्या रस्त्याच्या पुढचे सहा मैल इतकेच. भूतकाळातल्या मुद्दलावरचे हे व्याज म्हणून देणे द्यायचे इतकेच. तसंच काहीसं अवचटांबद्दलही म्हणता येईल. सध्या त्यांनी कॅन्सरवर लेखन सुरु केलेले आहे. परंतु लेखनात नवे काहीच नाही. माहिती जमा करून लेख/पुस्तके छापून काढणे या परंपरेतला आणखी एक लेख इतकेच.

लोकसभा निवडणुकांच्या अभूतपूर्व निकालांनंतर त्याचे विश्लेषण करणारे लेख जवळजवळ प्रत्येक दर्जेदार दिवाळी अंकात आहेतच. अनुभव'ने सुहास पळशीकर यांनी लिहिलेला 'काँग्रेस पीछेहाटीनंतरचे पेच' हा लेख प्रकाशित केला आहे.  लेखाचा विषय हा निव्वळ निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करणे नसून एका मोठ्या काळाच्या तुकड्यावर काँग्रेस या चळवळीचे पक्षांत रूपांतर होणे, नि त्या पक्षाचे प्रभावक्षेत्र संकुचित होत जाणे याची कारणमीमांसा नि दुर्लक्षित परिणाम याचा उहापोह करणे असा आहे. त्यामुळे यात मोदी अथवा भाजप का जिंकले यापेक्षा काँग्रेस का हरली आणि आता काँग्रेसपुढे काय प्रश्न, काय पर्याय दिसतात याचा वेध घेणे हा मुख्य उद्देश दिसतो. या मूळ धाग्याला अनुलक्षून, योग्य तिथे आकडेवारीचा आधार घेत,  आजच्या भाजपेतर राजकारणाच्या काळात नेमकी त्याच परिस्थितीत पोचली जिथे पूर्वी काँग्रेसेतर काळात विरोधी पक्ष होते या निष्कर्षाप्रत पळशीकर पोचतात.  मुळात 'डिफॉल्ट चॉईस' (हा शब्द माझा) असलेला काँग्रेस पक्ष विविध कारणाने एक एक समाजघटकांचा पाठिंबा का नि कसा गमावत गेला नि स्वतःचा असा चेहराच नसल्याने 'जो सगळ्यांचा तो कुणाचाच नाही' च्या पातळीवर कसा पोचला याचे विवेचन अतिशय मार्मिक.  इंदिरापूर्व काँग्रेस, इंदिराजींची काँग्रेस, राजीव गांधींची काँग्रेस आणि सरतेशेवटी राजीवोत्तर काँग्रेस या टप्प्यात काँग्रेसने काय कमावले नि काय गमावले याचा धांडोळा घेत लेख घेतो आणि आजच्या काँग्रेसच्या मुख्य समस्यांवर येऊन पोचतो. निव्वळ एका घराण्याच्या पुण्याईवर, एकखांबी तंबूसारखा उभ्या राहिलेल्या काँग्रेसची ही अवनती नव्याने त्याच प्रकारे राजकारण उभे करू पाहणार्‍या भाजपाने अवश्य अभ्यासायला हवी.

मला स्वतःला प्रवासवर्णनं वाचायला आवडत नसल्याने डॉ. आनंद नाडकर्णींच्या दुबई भेटीवरील लेख उडी मारून ओलांडला.

'सखा शरच्चंद्र' हा विख्यात बांगला लेखक शरच्चंद्र चटर्जी यांच्यावरील विश्वास पाटील यांचा लेख हा त्यांच्या लेखनाचा नि जीवनाच्या प्रवासात जुळणारे धागेदोरे सापडतात का ते तपासण्याचा दावा करतो.  हा दावा जरी फारसा सिद्ध झालेला नसला तरी त्या निमित्ताने शरच्चंद्रांच्या लेखनाचा एक विस्तृत आढावा घेतला गेला आहे ही जमेची बाजू. 'देवदास','श्रीकांत' आणि 'चरित्रहीन' या शरच्चंद्रांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबर्‍या. त्यांचा वेध घेताना त्यातून दिसणार्‍या स्त्रीजीवनाचा आढावाही यथोचितपणे घेतला आहे. (मध्यंतरी कुणीतरी 'शरतबाबूंच्या स्त्रिया' असा लेख कुण्या प्रसिद्ध लेखकाने लिहिल्याचा उल्लेख - बहुधा जीएंच्या एखाद्या पत्रांतून - वाचला होता. आता तो उल्लेख नक्की कुठे  पाहिला नि त्याचा तो लेखक कोण हे पारच विस्मृतीत गेले आहे. :( ) लेखकाचे जीवन नि त्याचे त्याच्या साहित्यात उमटलेले प्रतिबिंब या प्रकारची समीक्षा म्हणा वा परिशीलन  म्हणा मी यापूर्वी जेव्हा जेव्हा वाचले तेव्हा ते लिहिणार्‍या समीक्षकांची चौफेर उधळलेली कल्पनाशक्ती पाहून खूप मनःस्ताप झालेला होता. हा लेख कल्पनाविस्ताराहून दूर  राहिल्याने कोणतेही नवे 'फिक्शन' निर्माण करत नाही हे सुदैव. या सार्‍या वाचनीयतेमधे मला धक्कादायक वाटला तो 'शेषप्रश्न' या कादंबरीचा अनुल्लेख. कदाचित त्यात  शरतबाबूंच्या आयुष्याला जोडणारे काही सापडले नसावे हे कारण असावे का? मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली कादंबरी. त्यातील 'कमल'ची व्यक्तिरेखा लेखात उल्लेख केलेल्या  अन्य स्त्रियांच्या शेजारी उभी करून पाहिली तर कदाचित सर्वात स्वतंत्र नि स्वयंभू अशी व्यक्तिरेखा. शरतबाबूंच्या स्त्रियांवर लिहिताना तिचा अनुल्लेख करणे म्हणजे टॉलस्टॉयवर लिहिताना अना कारेनिनाला वगळणे आहे. हा एक दोष वगळता लेख आवर्जून वाचावा असा.

डहाके सरांचा व्हॅन गॉग' (याचा नेमका उच्चार गोव् च्या जवळ जाणारा असावा असे ऑडिओ डिक्शनरीज वरून दिसते, मी डहाकेसरांनी जसा दिला तसा वापरतो आहे) वरील लेख माहितीपूर्ण. त्याच्या चित्रांचा आस्वादक अंगाने घेतलेला आढावा वाचण्यासारखा. सर्वात दाद द्यावी ती लेखापेक्षा काम्पोजिटरला. गॉगची चित्रे आणि मजकूर यांची एकत्र मांडणी अतिशय देखणी. इथे 'अक्षर'मधे ग्राफिक्स नॉवेलच्या लेखामधील चित्रांची काम्पोजिटरने लावलेली वाट प्रकर्षाने जाणवली.

डॉ. भरत केळकर यांचा 'मी डॉक्टरः युद्धभूमीवरचा' हा लेख एका नव्या दृष्टीकोनाला मांडणारा. 'डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स' या संघटनेचे सदस्य म्हणून यादवीग्रस्त सीरियाच्या युद्धभूमीवर आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. विषय अतिशय संवेदनशील असूनही लेखकाने फारच वरवर मांडला आहे असे दिसते. एकाच लेखात स्वतःचा परिचय, संघटनेचा परिचय,  यादवी युद्धाची पार्श्वभूमी, लेखकाची संवेदनशीलता असे अनेक पैलू मांडावे लागल्याने सारेच काही थोडे थोडे आल्याने लेख पुरेसा खोल उतरत नाही. डॉक्टरांनी या विषयावर अधिक विस्ताराने लिहायला हवे असे वाटून गेले.

मंझूर एहतेशाम यांच्या 'छत्री' या छोट्याशा कथेने इतालो काल्विनोच्या कथांची आठवण करून दिली. ग्यानरंजन यांची 'कुंपणा पलीकडे' यापूर्वीच नॅशनल बुक ट्रस्टच्या अनुवादित कथांच्या पुस्तकातून वाचलेली नि आवडलेली. इतर दोन अनुवादित कथा अगदीच बाळबोध नि प्रचारकी पातळीवरच्या.

शिफारसः
१. जातींच्या जोखडात - दीप्ती राऊत.
२. सखा शरच्चंद्र - विश्वास पाटील.
३. काँग्रेसः पीछेहाटीनंतरचे पेच - सुहास पळशीकर
४. मंगल' यश: मेड इन इंडिया - मयुरेश प्रभुणे.
५. छत्री - मंझूर एहतेशाम (अनु. मनोहर सोनवणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा