गुरुवार, ३ सप्टेंबर, २०१५

'खिडक्यां...'तून डोकावलेली माणसं

('खिडक्या, अर्ध्या उघड्या' या गणेश मतकरी यांच्या कादंबरीच्या निमित्ताने)

दोन चार ओळींच्या वॉट्स अ‍ॅप टेक्स्ट मेसेजमधे किंवा फेसबुक पोस्टमधे जीवनाचे सार अनुभवू पाहणार्‍या पिढीला कादंबरीसारखा व्यापक पट असलेले साहित्य वाचण्यात कितपत रुची उरणार आहे हा प्रश्न आताच चर्चिला जाऊ लागलेला आहे. अभिरुचीमधला बदल, विखंडित अथवा 'फ्रँगमेंटेड' जीवनशैली; इंग्रजी भाषेच्या माध्यमातून खुले झालेले नव्या साहित्याचे भांडार; बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, आणि बहुआयामी महानगरी जीवनाकडे वाटचाल करत असताना जगण्याचे बदललेले संदर्भ यामुळे तरुणांची अभिरुची बदलते आहे. तर मध्यमवयात जगण्याचा वेग अचानक वाढल्याने होणारी दमछाक साहित्यासारख्या आवडींबाबत दिला जाणारा वेळ घटवत नेते आहे.

दिवसाचे चोवीस तास वाढवून अठ्ठेचाळीस करण्याचा शोध माणसाला अजून लागलेला नसल्याने आहे तोच वेळ या अनेक पैलूंना नाईलाजाने वाटून द्यावा लागतो आहे. या अतिरिक्त विभागणीमुळे प्रत्येक गोष्टींसाठी मिळणारा वेळ कमी कमी होत जातो आहे. अशा वेळी कादंबरी वाचनास आवश्यक असलेला सलग वेळ (नि सलग काळही) मिळणे दिवसेंदिवस दुरापास्त होत जाते आहे.  त्यामुळे कमीत कमी शब्दात आपला आशय पोचवण्याचे आव्हान लेखकांसमोर उभे राहते आहे. या परिस्थितीमधे कथेचे अल्पाक्षरी सामर्थ्य नि कादंबरीचा मोठा पट या दोन्हीचा एकत्रित वापर करुन उभी राहिलेली 'खिडक्या...' ही नव्या घाटांच्या शोधांचे एक दार उघडून देणारी ठरावी.

अनेक वाचकांच्या - बर्‍याच समीक्षकांच्याही - पूर्वग्रहांच्या परिणामामुळे अनेकदा लेखनाची पार्श्वभूमी हीच थेट त्या लेखनाला श्रेष्ठ वा कमअस्सल ठरवण्यास पुरेशी असल्याचा समज दिसून येतो. पुलंचे लेखन हे केवळ मध्यमवर्गीय जाणीवांचे म्हणून संकुचित असे म्हणण्याची फॅशन 'पुरोगामी' म्हणवू पाहणार्‍या लेखकांमधे आहे. सामाजिक जाणीवेचे लेखनच काय ते अस्सल, त्यातून त्याला अनाकलनीयतेचे किंवा प्रक्षोभाचे अस्तर असले तर ते व्याख्येनुसारच श्रेष्ठ ठरते. या सार्‍या गदारोळात पैसा वा करियर प्रधान आयुष्य हे मूल्य स्वीकारून त्याआधारे जगणार्‍यांना तर आपण 'चंगळवादी' म्हणून केव्हाच झाडून टाकलेले असते.

नव्वदीच्या दशकात आपल्या देशाने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यातून रोजगाराची नवी क्षेत्रे खुली झाली. 'गरजा भागवण्यासाठी रोजगार' ही माफक कल्पना धुडकावून देत अनेकांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना नवी क्षितीजे प्रदान केली. पण त्या औद्योगिक व्यावसायिक व्यवस्थेचे बोट धरून तथाकथित विकसित जगाची जीवनशैलीदेखील इथे अवतरली.  यातून पाश्चात्त्य जीवनशैली आणि व्यवस्था यांना रोल मॉडेल समजून आपली प्रगती साधू इच्छिणार्‍यांचा एक नवाच वर्ग उदयाला आला. भरपूर उत्पादन, भरपूर वापर या मूलमंत्राच्या आधारे पैसा निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट...  नव्हे संपूर्ण समाजाच्या हिताचा एकमेव मार्ग समजला जाऊ लागला. भारतात यापूर्वी रुजलेल्या अंत्योदयाच्या नेमक्या उलट असा  हा  'टॉप डाऊन अप्रोच'  यशाचा मार्ग मानला जाऊ लागला.

समाजातील एका समूह/गटाचे वर्तमान हे अन्य समूहांचे भविष्य असू शकते. अधिकाधिक प्रगतीची आस (किंवा हाव) असलेल्या भारतीय समाजाचे भविष्य हे कदाचित अमेरिकन समाजव्यवस्थेमधे पाहता येईल तर भारतातील समाजात ब्राह्मण वा तत्सम तथाकथित उच्च जातींच्या पावलावर पाऊल टाकत उरलेला समाज प्रगती साधू इच्छितो. थोडक्यात समाजातील एक गट दुसर्‍या गटाचे 'रोल मॉडेल' म्हणून काम करत असते. आता जर एका गटाचे वर्तमान हे अन्य गटाचे भविष्य ठरू पहात असेल, तर पहिल्या गटाच्या जगण्याचा वेध घेण्यातून दुसर्‍या गटाच्या भविष्यात डोकावण्याची संधी आपण घेत असतो. त्यातून या दुसर्‍या गटाला भविष्यातील संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना जशी मिळू शकते तशीच निवडलेल्या साध्याकडे पोचण्याचे पर्यायी मार्ग आगाऊच तपासणे शक्य होते.

'खिडक्या...' कथा-कादंबरीच्या सीमेवरील पुस्तकाची पार्श्वभूमी आहे ती अशा नागरी... नव्हे महानगरी, ज्याला upwardly mobile किंवा ऊर्ध्वगामी म्हणता येईल अशा समाजाची.  हा मूळचा भारतीय संस्कृतीच्या मुशीतला असला तरी याच्या प्रगतीच्या वाटा पाश्चात्त्य घाटाच्या आहेत. भौतिक प्रगतीच्या वाटेवर जे मिळवता येते ते मिळवलेच पाहिजे या अट्टाहासाने सतत 'आगे बढो' चा मंत्र जपत जगत असतानाच मागे सुटत जाणार्‍या गोष्टींबाबत त्याची खंत अजून जिवंत आहे. जगण्याच्या नव्या चौकटी स्वीकारत असताना जुन्या चौकटीचे फायदेही त्यांना अजून खुणावताहेत. त्याचबरोबर आर्थिक प्रगतीच्या मार्गावर सामील होणार्‍या वाटा म्हणून अपरिहार्यपणे किंवा त्या प्रगतीच्या पहिल्या फळीच्या यशाचे इंगित ही त्यांच्या या जीवनशैलीतच असेल असे गृहित धरून त्यांची जीवनशैली स्वीकारताना त्यातील संभाव्य धोके त्यांना संभ्रमित करताहेत. हा समाज निव्वळ मित्रांना जमवून चकाट्या पिटण्यापासून, बिजनेस मीटिंगपर्यंत बर्‍याच कारणासाठी 'सीसीडी'चा आधार घेणारा, एक सिगरेट आणि कटिंग चहाच्या बळावर गप्पांच्या मैफली जमवणार्‍या समाजापासून पासून दूर चाललेला.  त्यांचे जगणे बाहेरच्यांना वाटते तसे खरंच चैनीचे, सुखाचे असते का? या नव्या जगातली आव्हाने कोणती, त्यात उपलब्ध असलेल्या यशाच्या संधी कोणत्या नव्या तडजोडींना अपरिहार्य ठरवत असतात?  याचा प्रश्नांचा वेध घेणे आवश्यक ठरते आहे.  

'खिडक्या...'मधे निवेदनशैलीचा वापर केल्याने आपल्यासमोर त्यांचे जगणे उलगडते ते त्या त्या व्यक्तीच्या निवेदनातून, त्याअर्थी आपल्या दृष्टीने त्या समाजाकडे त्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाच्या खिडक्यांतूनच पाहतो आहोत. पण यामुळे कदाचित घटनांपेक्षा पात्रे मोठी होताना दिसतात. या कारणासाठी कथा म्हणून वा कादंबरी म्हणून या लेखनाकडे पाहण्याऐवजी मला यातील पात्रे सुटी करून पहायला अधिक आवडतील.

व्यावसायिक जगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली आणि कदाचित काही पुरुषांच्या दृष्टीनेही यशाचे रोल मॉडेल म्हणून पाहिली जाणारी सानिका त्या व्यावसायिक जगात प्रगती व्हायची असेल तर 'धंदेवाईक' व्हावे लागते या व्यवस्थेच्या मूलमंत्राला सामोरे जाताना आपल्या मनातील आदर्शवादी वारशाचे काय करायचे अशा पेचात सापडलेली. निर्णयाचे पुरेसे स्वातंत्र्य मिळाल्याचा पुरेपूर वापर करुन घेत यशाचे नवनवे सोपान सर करत असतानाच नकळत त्या कैफात कदाचित नात्याचे भान हरवून एकतर्फी निर्णय घेण्याचे एक पाऊल टाकणारीही.

लिव-इन म्हणजे 'लग्नाशिवाय लैंगिक संबंधांची सूट' हे आपल्या मनात इतके घट्ट रुजून बसले आहे ( 'लग्न म्हणजे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची सामाजिक अनुमती' या गृहितकाचीच ही दुसरी आवृत्ती!) की लिव-इन सारख्या नात्यामधील सैलसर बंधाचे संभाव्य धोके जेव्हा व्यक्त केले जातात तेव्हा ते बहुधा लैंगिक वा नात्याच्या संबंधांबाबतच व्यक्त केले जातात.  'दोघांमधे नात्यापेक्षा वैयक्तिक यशापयश, हित/अहित अधिक प्राधान्य घेऊन जाऊ शकते का?' असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहत नाही. सानिका जेव्हा 'एक संधी, एक ऑपर्चुनिटी' म्हणून परदेशात जाण्याचा निर्णय एकतर्फी, सुश्रुतशी विचारविनिमय न करता घेते तेव्हा त्यांचे नाते या संधीपुढे दुय्यम मानते आहे असे आहे का? की तितके स्वातंत्र्य त्या नव्या व्यवस्थेत अभिप्रेतच आहे? याउलट बाजूने 'जर त्यांचे कायदेशीर लग्न झाले असते तर कदाचित तिने असाच विचार केला असता का? लग्नाऐवजी लिव-इन असा बदल झाला 'म्हणून'(!) व्यावसायिक नि कौटुंबिक बाबतीत तिचे प्राधान्यक्रम उलट झाले असे म्हणता येते का? '  प्रत्येकाच्या पूर्वग्रहांनुसार या प्रश्नाचे उत्तर वेगळे येऊ शकेल. पुरुषांच्या बाबतीत 'व्यावसायिक बांधिलकीपुढे कुटुंबहित दुय्यम मानणे' हे बव्हंशी भूषणास्पद, त्याच्या कामावरील निष्ठेचे निदर्शक मानले जात असताना, या नव्या व्यवस्थेत तरी सानिकासारख्या स्त्रीच्याबाबत तोच न्याय आपण लावणार आहोत का असा प्रश्नही विचारता येऊ शकतो.

अमेरिकेला जाण्याचा निर्णय सानिकाने 'परस्पर घेतल्याबद्दल तिला फैलावर घ्यायला हवे होते का? असा प्रश्न सुश्रुत  स्वतःला विचारतो, तेव्हा त्यातील 'फैलावर घेणे' हा शब्दप्रयोग सूक्ष्म उच्चाधिकाराची जाणीव दाखवतो. 'नोकरी केली नाही तर काय स्वैपाकपाणी करायचं? या प्रश्नामागेही जुन्या जाणीवेचे काही पीळ निदान नेणीवेच्या पातळीवर अजूनही मूळ धरून असल्याचेच दिसून येते. 'संबंध संपवण्याची धमकी द्यायला हवी होती का?' अशी शक्यता तो क्षणभर पडताळून पाहतो तेव्हा तो स्वतःही या नव्या व्यवस्थेला 'तुलनेने सहज बाहेर पडण्याची सोय असलेली' म्हणून पाहतो आहे का असा प्रश्न पडतो. गाडी रिफ्लेक्सेसवर चालवायची असते म्हणणारा सुश्रुत आयुष्यात अनपेक्षित वळण आल्यावर मात्र नियंत्रण हरवल्याची भावना निर्माण होऊन अस्वस्थ होतो. असे सुश्रुत तुमच्या आमच्या आसपास अनेक दिसतात. याउलट वारशाने मिळालेल्या समाजव्यवस्थेच्या नीतीनियमांमुळे आपल्या आसपासच्या सानिका मात्र त्यांच्या त्यांच्या सुश्रुतलाच नेमक्या दिसू शकतात... कदाचित त्यांनाही दिसत नसाव्यात.

एका बाजूला आपली सदसद्विवेकबुद्धी आणि व्यावसायिक अपरिहार्यता यांच्या रस्सीखेचीत जिथे काही हस्तक्षेप करायला हवा नेमकी त्याच क्षणी किंकर्तव्यमूढ झालेली सानिका, तर दुसर्‍या बाजूला आपला वापर करून घेतला जात आहे हे ठाऊक असूनही कर्तव्याला, आपल्या त्या क्षेत्रात असण्याच्या मूळ हेतूला सुसंगत असा निर्णय लख्ख मनाने घेणारी स्वरूपा.  धडाडी नि निर्णयक्षमता इ. बाबत ती जवळजवळ सानिकाचे प्रतिरूप आहे. पण सानिकाला जसे दोन सहकार्‍यांचे, सुश्रुतचे पाठबळ आहे तसे स्वरूपाला नाही. ती स्वयंपूर्ण आहे, कोणत्याही आधाराशिवाय उभी आहे. वैयक्तिक आयुष्यात नि व्यावसायिकही!  तिच्या निर्णयांचे जे काही परिणाम होतील ते तिचे तिलाच भोगावे वा निस्तरावे लागतात. निर्णयस्वातंत्र्याची ती किंमत तिला चुकवावीच लागते.

पण अनेकदा अशी झटपट निर्णय घेण्याची वृत्ती अंगाशी येऊ शकते तशी स्वरुपाबाबत तिच्या लग्नाच्या निर्णयाबाबत, प्रेमेंद्रबाबत आणि सानिकाबाबत आलीही. पण बॅकफायर झालेला निर्णय धकवून नेण्याची धमकही स्वरूपामधे आहे. याउलट तिच्यासारखीच सेल्फ-मेड वुमन असलेली सानिका जरी पार्टनरशी सल्लामसलत न करता सहा महिने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेऊन टाकण्याइतकी स्वातंत्र्य घेत असली तरी त्या नात्यातून मिळणार्‍या आधाराची तिला गरज आहे असे दिसते. सतत फोनवरून अपडेट्स देत/घेत सुश्रुतशी 'कनेक्टेड' राहण्याची तिची धडपड दिसून येते. अनंत कुटुंब आणि करियर यांच्या ओढाताणीत फरफटत जाणारा, जणू सर्वसामान्यांचा प्रतिनिधी. आगाशेच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख कुठे येत नाही. कदाचित इथे नेत्रदीपक व्यावसायिक यश मिळवणार्‍यांचे कौटुंबिक आयुष्य अनुल्लेखनीय, बिनमहत्त्वाचे असावे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो.

स्वरूपा ही कर्तव्यापुढे नव्यानेच उजाळा मिळालेली जुनी मैत्री हरवण्याचा धोका पत्करते तर आगाशेही धंदेवाईकतेला कर्तव्य मानून तिथे अडथळा ठरू शकणार्‍या सानिकाला - तात्पुरते का होईना - दूर करण्याचा निर्णय घेतो. भिन्न कारणासाठी का होईना हे दोघे एकाच निर्णयाप्रत पोहोचतात. वरवर पाहता स्वरूपाचा निर्णय स्वार्थप्रेरित नसल्याने अधिक स्पृहणीय भासू शकतो. पण आपल्या संस्थेबद्दल, कामाबाबत बोलताना स्वरूपाच्या व्यक्तिमत्त्वात दंभ अथवा अहंकारही दिसतो. तर प्रेमेंद्र वा अनिरुद्धच्या संदर्भात ती काहीशी 'प्लेईंग द विक्टिम' स्वरूपाचे बचावाचे भाषण करते आहे असा भास होतो. पण असे असूनही ती कधीकाळी घडलेल्या घटनेतून मनात ठेवलेली अढी, पोसलेला द्वेष 'यात काही अर्थ नसावा, कदाचित आपले मूल्यमापन चुकले असावे का? आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपयशातून आलेल्या कडवटपणाचा हा अस्थानी झालेला परिणाम होता का?' असा विचार शांतपणे करू शकते, त्यानुसार निर्णय घेऊ शकते.

सानिकाने काही निर्णयस्वातंत्र्य मिळवले तरी सदसद्विवेकबुद्धीचा वारसा तिच्या मानगुटीवर अजून बसलेला आहे. आगाशेप्रमाणे प्रसंगी तिला झुगारून देऊन व्यावसायिक यश मिळवावे इतके निर्ढावलेपण तिच्यात नसले तरी कदाचित दोष न येता लाभाचा वाटा मिळत असेल तर काही तडजोडींकडे दुर्लक्ष करण्याची बोटचेपी मानसिकता मात्र तिच्यात विकसित झालेली आहे.

एनजीओ'चा 'धंदा' करणारा प्रेमेंद्र हा धूर्त राजकारणी. एस.एन.ए. ला एक्स्पोज करणारे सारे पुरावे हाती असूनही तो स्वतः ते जाहीर करत नाही. ते स्वरूपाकरवी घडवून आणतो. स्वरूपा नि सानिका यांच्यात पूर्वी असलेल्या शीतयुद्धाच्या सहाय्याने माध्यमे याची चांगली मसालेदार ब्रेकिंग न्यूज बनवतील नि हा विषय चांगला गाजवत राहतील हा एक उद्देश आणि स्वतःच्या राजकारणी वर्तुळामधील स्थानाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये या हेतूने स्वतः नामानिराळा राहून सारी सूत्रे हलवतो. 'ग्रेटर कॉमन गुड' या निकषावर एस्.एन्.ए. ला एक्स्पोज करण्याच्या निर्णय घेताना आपण एका नव्या स्पर्धेत खेचले जात आहोत याची पूर्ण जाणीव स्वरूपाला असते. इथे जिंकणंही हरण्याइतकंच नामुष्कीचं आहे हे ठाऊक असूनही स्वच्छ मनाने तो निर्णय ती घेते, या पार्श्वभूमीवर प्रेमेंद्रचा बोटचेपेपणा नि दुसर्‍याला वापरून घेण्याची स्वार्थी वृत्ती अधिकच ठळक होत जाते.
हातपाय पसरू पाहणार्‍या नव्या जगाला जागा करून देताना काढता पाय घेणार्‍या जुन्या व्यवस्थेचा अवशेष म्हणून जोशीकाकू डोकावतात. परदेशस्थ मुलाची आई, तिकडेच जन्मलेल्या आणि आता पौगंडावस्थेत असलेल्या नातवंडांची इथे बसून काळजी करत राहणार्‍या. बँजोच्या आधाराने आपल्या जुन्या जगाला चिकटून बसण्याचा अट्टाहास जोपासू पाहणार्‍या. घरात असलेले हे मांजर आई नि मुलगा दोघांसाठीही सोयीचे कारण बनलेले. पण त्याचा मृत्यू हा आपल्या जगाचा मृत्यू आहे हे नाईलाजाने मान्य करून नव्या व्यवस्थेसमोर मान तुकवणार्‍या.

एका गरजेच्या क्षणी आपले म्हणावे असे कुणी आसपास नसताना विसंवादातून संवाद निर्माण होत त्यांना सुश्रुतचीच मदत घ्यावीशी वाटते, तर त्याचा परिणाम म्हणून सुश्रुतलाही कोणत्याही नात्याबाहेरचे असे संवाद करण्याजोगे एक माणूस सापडते. अतिरेकी व्यक्तिवाद अंगवळणी पडला असल्याने आईवडिलांशी असलेल्या संवादाचा झरा आटलेला असताना, जोडीदाराबद्दलच्या नात्याबद्दल साशंकता असताना अचानक असे तिसरे माणूस मन मोकळे करण्यास सापडणे म्हणजे जुन्या खिडक्या आपणहून बंद केल्या असता एखादी नवीच खिडकी किलकिली व्हावी तसे काहीसे.

या सार्‍या पात्रांच्या मांदियाळीमधे ठसठशीत उभे असलेले आणि खर्‍या अर्थाने या उच्च मध्यमवर्गीय, ऊर्ध्वगामी समाजाचा प्रतिनिधी म्हणता येईल असे पात्र म्हणजे निरंजन आगाशे. बालपणी ऐकलेली एखादी हळवी नर्सरी र्‍हाईम मनात कुठेतरी जपून ठेवणारा आणि तरीही व्यवहाराची गरज म्हणून चाणाक्ष, धूर्त होऊ शकणारा. एकीकडे इन्स्टॉलेशन सारख्या अर्वाचीन कलाप्रकारात रस घेणारा तर दुसरीकडे धंदेवाईक निर्ढावलेपण रुजलेला. सगळं काही ५% माहित करून घेऊन तज्ज्ञाची ऐट मिरवणारा, कामात झोकून देण्याऐवजी 'गेटिंग थिंग्स डन' (आणि कदाचित त्यामुळे 'ऑनर द कमिटमेंट अँड  शूट द क्वालिटी' प्रकारचा) वर विश्वास असलेला, प्रत्यक्ष उत्पादक कामाऐवजी ओवरसियर च्या भूमिकेत अधिक रमणारा , एक टिपिकल 'मॅनेजर' मटिरियल! मनातल्या भारद्वाजाला  खोल गाडून त्यावर गगनचुंबी इमारत उभी करण्याची महत्त्वाकांक्षा असलेला. पण कामाच्या ठिकाणी सापडलेल्या त्या राजबिंड्या भारद्वाजाच्या मृत्यूमधेच गुदमरणार्‍या शहराचा मृत्यू पाहणारा, त्याची कारणे ठाऊक असलेला आणि तरीही त्यापैकी काही कारणांचे पितृत्व मिरवणारा. सीसीडी मधे भेटलेल्या तरुणाचे अनकरप्ट असणे, जीवनसंमुख असणे जाणून त्याचा हेवा करणारा पण तरीही मेलेला भारद्वाजही आपल्याला लकीच ठरला पाहिजे याची पुरेपूर खबरदारी घेणारा. अधेमधे नॉस्टॅल्जिया, सदसद्विवेकबुद्धी जागृत होत असली तरी तिला धिक्कारून आपल्या 'आणखी उंच जाण्याच्या' आपल्या जीवितहेतूची स्वतःला वारंवार आठवण करून देणारा. 'त्यांना कुणीतरी स्केपगोट लागेल, तो त्यांना मिळेल अशी व्यवस्था होईल' (आणि आपल्यावर कोणताही गुन्हा सिद्ध होणार नाही) असे निर्ढावलेपणे किंवा व्यावसायिक  जगात म्हणतात तसे 'प्रोफेशनली'  सांगणारा आणि तसे घडवून आणणारा आगाशे.  खिशात पैसे आहेत म्हणून ज्यांना वेळ देऊ शकणार नाही अशा महागड्या ब्लू रे डिस्क्स सहज टाईमपास म्हणून वा शोकेसची सजावट म्हणून विकत घेणारा,  ज्यातून केवळ स्वामित्त्वाचीच भावना कुरवाळता येते त्या कृतीसाठी आवश्यक असणारे पैसे मिळवण्यासाठी पुन्हा वेळ गहाण टाकून भविष्यात खरेदी केलेल्या डिस्कचाही वेळ आजच हिरावून घेणारा, गटेच्या फाउस्टसारखा.
उलट अनंत. आपण व्यावसायिक क्षेत्रात आहोत म्हणजे आपण प्रोफेशनल आहोत, तसे दिसलो पाहिजे, इतरांना भासले पाहिजे म्हणून आपल्याभोवती एका कृत्रिम प्रोफेशनल, प्रॅक्टिकल माणसाचा डोलारा उभा करणारा पण गोष्टी हाताबाहेर जात आहेत असे दिसताच त्याचा धीरोदात्त पणाचा बुरखा हटकून गळून पडणारा. आपल्या मुलाच्या काळजीने नव्हे तर सानिकाला दूर पाठवायचे या हेतूने आगाशेने आपल्याऐवजी सानिका हा बदल सुचवल्याचे समजल्यावर फसवणूक झाल्याची भावना बाळगणारा. इतर दोघांपेक्षा तो मागच्या जगात अधिक अडकलेला आहे तर आगाशेने नवी व्यवस्था पुरेपूर आत्मसात केलेली, सानिका मात्र एक पाऊल दारात नि एक दाराबाहेर अशा त्रिशंकू अवस्थेत अडकलेली दिसते.

'खिडक्या...'मधे एक गोष्ट मात्र निसटली असे वाटते. निवेदनात्मक शैलीमधे परस्परांबद्दल बोलताना पर्स्पेक्टिव निर्माण करण्याचा फायदा घेतलेला दिसत नाही. अर्थात शक्य आहे म्हणून तसे करायलाच हवे असे मात्र नाही हे मान्यच करायला हवे. कादंबरी म्हणून पाहता राम्या नि रोहनच्या 'सबमिशन' या प्रकरणासारखेच अखेरचे 'फ्लाईट' हे प्रकरण नसते तरी चालले असते. 'सबमिशन' हे काहीसे उपरे वाटते तर 'फ्लाईट' सुसंगत असले तरी अनावश्यक. 'प्रलय' पाशी थांबले असते तरी चालले असते.
-----oOo-

२ टिप्पण्या: