शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

होडी

मूळच्या तीन धार्मिकांच्याक कथेला फेसबुक मित्र अरविंद विनायक परांजपे यांनी चौथ्या माणसाची - एका अधार्मिकाची - जोड दिली होती. धर्मग्रंथांची पाने फाडून तो होडी तीराला लावतो इथवरचा भाग त्यांचा.  तो धागा पकडून केलेला हा विस्तार. पटतोय का बघा.

--- 

चार मित्र होडीने जात असतात. एक ख्रिस्ती, एक मुस्लिम, एक हिंदू, आणि एक निधर्मी. पहिले तिघेही आपापल्या धर्माचे ग्रंथ हाती घेऊन बसलेले असतात. अशा खुल्या सागरात काही विपरीत घडले तर आपलाच देव सर्वांचे रक्षण करू शकतो असा दावा करत ते परस्परांशी वाद घालत असतात. निधर्मी माणूस मात्र शांतपणे मोबाईलवर पेशन्स खेळत बसलेला असतो. इतक्यात सोसाट्याचा वारा सुटतो. समुद्र खवळतो. लाटाच्या थपडांनी होडीच्या तळाची एक फळी पिचते आणि त्याला एक छिद्र पडते. होडीत पाणी शिरून होडी बुडू लागते. तिघे धर्मनिष्ठ आपापल्या देवाचा धावा करतात, तिन्ही देव not reachable असतात.
चौथा निधर्मी मात्र क्षणभर विचार करतो, तिघांच्या हातातले त्यांचे धर्मग्रंथ खेचून घेतो आणि त्यांचे कागद फाडून फाडून होडीचं भोक बुजवतो. पाण्याने भिजून लगदा झाले की तो बोळा काढून नवा बोळा लावत राहतो. अखेर पुस्तकांची सर्व पाने संपतात तेव्हा होडी सुखरूप तीराला लागते.
.
.
.
.
.
तीरावर उतरताच आपल्याच देवाने या निधर्मी माणसाला प्रेरणा देऊन आपला जीव वाचवला असा दावा करत ते तिघे पुन्हा भांडू लागतात.
.
.
.
.
.
पण मुळात असा निधर्मी माणूस सोबत घेतला म्हणूनच आपल्यावर हे संकट आले, त्यालाही अखेर धर्मग्रंथांचाच आधार घेऊन जीव वाचवावा लागला यावर मात्र तिघांचे ताबडतोब एकमत झालेले असते.
.
.
.
.
.
चौथा माणूस तीरावर उतरल्याक्षणीच आपल्या कामाला चालता झालेला असतो.
---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा