सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

परिवर्तनाचा वाटसरू (दिवाळी अंक परिचय)


दोन-अडीच वर्षांपूर्वी 'गुजरात मॉडेल' हा शब्द आज पंतप्रधान असलेल्या मोदींच्या दृष्टीने परवलीचा बनला होता. केंद्रातील सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना, 'आम्ही नुसतेच बोलत नाही, हे पाहा करून दाखवले!' असे म्हणत गुजरातमधील खर्‍या-खोट्या प्रगतीच्या तपशिलांचा भडिमार तेव्हा भारतीय नागरिकांच्या तोंडावर केला जात होता. त्यातील तथ्य-मिथ्याबद्दल राजकारणातील दोन बाजू आणि त्यांचे पगारी तसेच बिनपगारी समर्थक यांच्यात सतत धुमश्चक्री होत होती, होते आहे. पण हे गुजरात मॉडेल म्हणजे नक्की काय, त्याचा त्या राज्यावर नक्की परिणाम काय झाला, जगण्याच्या विविध पैलूंबाबत त्याने काय बदल घडवले, परिस्थिती नि माणसे कशी आणि किती बदलली याचा साक्षेपी वेध अद्यापपर्यंत कुणी घेतलेला दिसत नाही. कदाचित हीच कमतरता भरून काढण्यासाठी सामाजिक-राजकीय विषयांना वाहिलेले एक महत्त्वाचे पाक्षिक 'परिवर्तनाचा वाटसरू' त्यांच्या दिवाळी अंकात 'बदलता गुजरात' हे सूत्र घेऊन त्या राज्याची विविधांगी वेध घेते आहे. (याच मालिकेतील आणखी काही लेख पुढील अंकातून येणार आहेत असे सांगण्यात आले आहे.) तोच त्या अंकाचा महत्त्वाचा भाग मानायला हवा.

जरी हे फीचर त्या अंकाचा गुरुत्वमध्य असले, तरी त्यात आलेले सगळे लेख काही सारख्या अथवा उत्तम दर्जाचे आहेत असे मात्र म्हणता येत नाही. उना आंदोलनातून पुढे आलेल्या जिग्नेश मेवानी या नेत्याची मुलाखत हा त्यातील सर्वांत आवर्जून वाचण्याजोगा लेख. २०१४च्या सत्तांतरानंतर देशाच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात बरीच उलथापालथ होते आहे. त्यातून काही नवे तरुण नेतृत्व उभे राहताना दिसते. गोवंशहत्याबंदी कायद्याचे हत्यार हाती घेऊन धुमाकूळ घालणार्‍या स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांनी जेव्हा आपल्याच समाजातील काही घटकांना लक्ष्य केले, तेव्हा त्यातून उफाळलेल्या विद्रोही प्रतिक्रियेचा चेहरा म्हणून जिग्नेश मेवानी समोर आला आहे. एका बाजूने नवे विरोधी राजकीय नेतृत्व हे सत्ताधार्‍यांइतकेच कृतीपेक्षा घोषणाप्रधान असताना जिग्नेश यांचा जो चेहरा समोर येतो आहे, तो अधिक आश्वासक दिसतो. आजच्या वास्तवाची जाण, व्यवहार्यतेचे भान आणि आजवरच्या विद्रोहाचे, इतिहासाचे नेमके आकलन असलेला नेता म्हणून जिग्नेश या मुलाखतीद्वारे समोर येतो. सतत विद्रोहाच्या पोकळ डरकाळ्या फोडणार्‍या किंवा आपल्या सत्तातुरतेला समाजाच्या उत्थानाचे अस्तर लावून हिंडणार्‍या स्वार्थी नेत्यांच्या प्रभावळीतून असा भानावर असलेला नेता जर वंचितांसमोर येत असेल तर ते स्वागतार्हच म्हणावे लागेल.

या विभागातील पहिले पान गुजरातमधे राहून तथाकथित गुजरात मॉडेलचे वास्तव अधिक जवळून पाहिलेले आणि पुरस्कारवापसी अभियानातून बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीविरोधात प्रथम आवाज उठवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्यिक, समीक्षक गणेश देवींना देण्यात आले असले तरी जेमतेम दोन पानांच्या त्या मजकुरातून नव्याने काही मिळाले नाही. एक सर्वसाधारण आढावा इतकेच त्याचे स्थान म्हणावे लागेल.


ईप्सिता चक्रवर्तींनी पाटीदार आंदोलनासंदर्भात घेतलेली घनश्याम शहांची मुलाखत फारच त्रोटक वाटली. त्यातील एक मुद्दा मात्र आवर्जून नोंद करण्याजोगा आणि तो म्हणजे 'सरसकट आर्थिक निकषांवर आरक्षण' किंवा 'गरिबांसाठी आरक्षण' या मुद्द्याचा त्यांनी आकडेवारीनिशी केलेला प्रतिवाद. असे आरक्षण अंतिमतः पुन्हा उच्चजातीयांनाच साहाय्यभूत ठरते आणि आरक्षणातील सामाजिक न्यायाचा मूळ हेतूच बाधित होतो हे पुरेसे स्पष्ट होते. (किंबहुना अलीकडे देशभरात उच्चजातीयांनी चालू केलेल्या आरक्षण मागणी आंदोलनाचा मूळ हेतू असे घडावे हाच आहे असे म्हणता येऊ शकते.) परंतु यात हार्दिक पटेलसारखे तरुण - अगदी नवथर म्हणावे इतके तरुण - नेतृत्व, त्यामागची संभाव्य कारणे, जुन्या नेतृत्वाने पुढे न येणे अथवा कालबाह्य होणे; कदाचित महाराष्ट्रा मराठा आंदोलनातही जुन्या नेतृत्वाने कटाक्षाने दूर राहणे याच्याशी लागणारी संभाव्य संगती इ. बाबतीत अधिक ऊहापोह व्हायला हवा होता असे वाटले.

गुजरातमधील निवडणुका; त्यांचा इतिहास; दीर्घकाळ सत्तेवर मांड ठेवून असलेल्या भाजपाचे, तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे मतपेटीमार्फत मिळालेले यशापयश या सर्वांचा आकडेवारीसह घेतलेला लेखाजोखा दर्शन देसाईंच्या लेखात सापडतो. सामाजिक घटना, राजकीय भूकंप, शह-काटशह, नैसर्गिक आपत्तींचे परिणाम अशा विविध घटकांचा मतपेटीवर झालेला परिणाम त्यांनी रोचकपणे मांडला आहे. ज्यांना बेफाट विधाने करण्यापेक्षा आकडेवारीच्या नि अर्थनिर्णयनाच्या आधारे केली जाणारी मांडणी अधिक आवडते, त्यांनी तो आवर्जून वाचावा.

Communal Violence, Forced Migration and the State: Gujarat since 2002 या संजीवनी बाडीगर-लोखंडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा काही अंश शैलेश जोशी यांनी अनुवादित केला आहे. २००२ साली झालेल्या धार्मिक दंगलींनंतरच्या जगाचा मागोवा घेणारे हे पुस्तक नक्कीच एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे याची चुणूक त्या प्रस्तावनेच्या या भागातून पुरेपूर मिळते आहे. तात्कालिक कारणाचा दोष नक्की कुणाचा हा प्रश्न वादग्रस्त असला, तरी नंतरच्या परिणामांबाबत तेवढी संदिग्धता मुळीच नाही. सदर घटनेतून मुस्लिम समुदायाचे झालेले घेट्टोकरण आणि त्यानंतर सामाजिक राजकीय बदलांतून झालेले औद्योगिक फेरबदल इत्यादिंचा साक्षेपी आढावा प्रस्तावनेच्या या भागातून पुरेसा स्पष्टपणे मांडला गेला आहे.

या अतिशय महत्त्वाच्या लेखाचा एक मोठा दोष म्हणजे अत्यंत विद्वज्जड भाषा. मी काही लिहितो, तेव्हा 'प्राज्ञ मराठी लिहितोस. जरा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहीत जा.' असा सल्ला मला अनेकदा मिळतो. माझ्यासारख्या आरोपीलाही ही भाषा अनावश्यक जड आणि नि केवळ त्या कारणानेच वाचकाला लेखापासून दूर ठेवू शकेल अशी वाटते यावरून काय ती कल्पना यावी. एखाद्या अभ्यासपूर्ण पुस्तकाची भाषा नि लेखाची भाषा यात फरक असायला हवा. उदाहरणच द्यायचे तर 'अंतःस्थ/बहिर्गत द्विविभाजन', 'प्रतिमानक विकास', 'बृहद्-सिद्धांत', 'अनुभविक दाखले' असे शब्द खडयासारखे त्रास देतात. मूळ लेखन जरी अभ्यासपूर्ण असले, तरी लेखस्वरूपात त्याचा अनुवाद करताना त्याचे भान ठेवून सोपे प्रतिशब्द निवडण्याची, ते नाही जमले तर मूळ इंग्रजी शब्दही सोबत देण्याची काळजी घ्यायला हवी होती.

भाषेच्या राजकारणासाठी केलेल्या वापरावरचा नरेंद्र पंजवानींचा लेख ठाकठीक. एखादा अपवाद वगळला, तर त्यावर आवर्जून लिहावे असे फार नाही.

या शिवाय गुजरातच्या चित्रपटसृष्टीबद्दल, बुधन नाट्यचळवळीबद्दलचे लेखही यात समाविष्ट केले आहेत. याशिवाय 'हे पुस्तक तुम्हांला का लिहावंसं वाटलं?' या सुमार प्रश्नाने सुरुवात झालेली, अपेक्षेप्रमाणे उरलेल्या मजकुरातही फारशी उंची गाठण्याचा प्रयत्न न केलेली, 'The Political Biography of An Earthquake' या पुस्तकाचे लेखक एडवर्ड सिम्प्सन यांची आतिश पटेल यांनी घेतलेली मुलाखत केवळ सामान्यच नव्हे; तर न वाचली तरी चालेल अशी.

या अंकाचा सर्वाधिक महत्त्वपूर्ण भाग आहे ती अंकात सर्वांत प्रथम छापलेली आयन रँड या लेखिकेची 'अँथम' ही लघुकादंबरी - तिचा नितीन साळुंखे यांनी केलेला भावानुवाद. काही वैयक्तिक अनुभवांमुळे कट्टर कम्युनिस्टविरोधक असलेली आयन रँड साहित्यिकांना ठाऊक आहे; ती तिच्या 'फाउंटनहेड', 'अ‍ॅटलाश श्रग्ड', 'वी द लिविंग' या दीर्घकादंबर्‍यांमुळे. टोकाची व्यक्तिस्वातंत्र्यवादी असलेली आणि 'कॅपिटॅलिजम, द अननोन आयडियल' आणि 'कम्युनिजममधे दोष नाहीत, कम्युनिजम हाच दोष आहे' असे म्हणणारी ही लेखिका प्रामुख्याने तिच्या कम्युनिजम नि कम्युनिस्ट यांना असलेल्या विरोधामुळेच अमेरिकेत अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. पण त्यापलीकडे तत्त्वविचारावर आधारित लेखन करणारी आणि 'ऑब्जेक्टिविजम' या नव्या विचारव्यूहाचा पाया घालणारी ही लेखिका एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाची लेखिका मानली जाते.

जॉर्ज ऑर्वेलने सर्वंकश एकाधिकारशाहीच्या विरोधात लिहिलेली 'अ‍ॅनिमल फार्म' ही कादंबरी त्या वेळी सोविएत युनिअनच्या प्रयोगामुळे भरात असलेल्या कम्युनिस्टांच्या विरोधातील मानली गेली; त्याच्या नेमके उलट रँडच्या 'अँथम'बद्दल घडते आहे. मुळात तथाकथित एकांगी कम्युनिस्ट मॉडेल समोर ठेवून तिने लिहिलेली ही टीका, तिच्याही नकळत धर्मसंस्थेवरची टीका म्हणूनही समोर आली आहे. याला कारण त्यात तिच्या कम्युनिस्टविरोधापेक्षाही तिचा व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह अधिक ठळक आहे. आणि साहजिकच स्वहितासाठी समाजाचे एकसाचीकरण करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यवस्थेला असा आग्रह बाधक ठरत असतो. धर्मसंस्था ही अशा प्रकारची, आजही अस्तित्वात असलेली सर्वात जुनी व्यवस्था आहे. जगण्याचा योग्य मार्ग एकच आहे, तो आम्हांलाच सापडला आहे आणि तुमचे उत्थान केवळ ही वस्तुस्थिती स्वीकारण्यानेच होणार आहे असे मानणारे या धर्मसंस्थेचे हस्तक जेव्हा प्रबळ होतात; तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याचा होत जाणारा संकोच, त्यातून मावळत जाणार्‍या नवनिर्मितीच्या शक्यता, सर्जनशीलतेपेक्षा आज्ञाधारकतेला आलेले महत्त्व, गुणवत्तेपेक्षा संख्याबलामुळे वा जन्मबलामुळे अधिकारी होऊन बसलेले खुजे लोक, त्यातून अधःपाताकडे जाणारा समाज आणि त्याविरोधात ताठ उभे राहण्याचा एका व्यक्तीने केलेला प्रयत्न, त्यासाठी परागंदा होण्याचा पत्करलेला पर्याय... या मार्गाने जाताना ही कादंबरी अशा वास्तवाचे अनेक पैलू उलगडून दाखवत जाते. किंबहुना कादंबरीच्या कथनापेक्षाही इंग्रजीत ज्याला 'एक्स्ट्रपोलेशन' म्हणतात - किंवा ढोबळपणे मराठीत आपण ज्याला 'रेघ लांबवून घेतलेला वेध' असे म्हणू शकतो - तसा हा वेधच अधिक लक्षणीय. तो तिचा 'यूएसपी' म्हणायला हवा. एरवी कादंबरीचा शेवट फडके-खांडेकर पठडीतला, रँड यांच्या दृष्टीकोनाला अजिबात न शोभणारा.

-oOo-

सदर परिचय 'रेषेवरची अक्षरे' या ऑनलाईन अंकाच्या 'अंकनामा' या दिवाळी अंक परिचय सदरासाठी लिहिलेला आहे. (http://www.reshakshare.com/2016/11/blog-post_7.html)

आभारः मेघना भुस्कुटे आणि 'रेषेवरची अक्षरे' टीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा