गुरुवार, २७ जुलै, २०१७

आम्ही विरोधी

काँग्रेसी म्हणाले, समाजवादी चुकीचे आहेत.
कम्युनिस्ट म्हणाले, समाजवादी माती खातात.
समाजवादी म्हणाले, काँग्रेस जातीयवादी आहे.
आंबेडकरवादी म्हणाले, काँग्रेस जातीयवादी आहे.

आंबेडकरवादी म्हणाले, कम्युनिस्टांना जातिव्यवस्थेचे आकलन झालेले नाही.
काँग्रेसी म्हणाले, आंबेडकरवादी भाजपच्या सोबतीने संघाच्या मांडीवर बसलेत.
डावे कम्युनिस्ट म्हणाले, उजवे कम्युनिस्ट हे उजवेच राहणार शेवटी.
उजवे कम्युनिस्ट म्हणाले, डाव्या कम्युनिस्टांना वास्तवाचे भानच नाही मुळी.

काँग्रेसचा माणूस दिसताच कम्युनिस्ट बाणेदारपणे सभा सोडून बाहेर पडला.
डावे म्हणाले, मधल्यांना बाहेर ठेवून आम्हीच देशाला उर्जितावस्था आणू शकतो.
काँग्रेसवाले म्हणाले, यांनी तेलंगाणात शेपूट घातलं
डावे म्हणाले, यांनी फासिस्टांसमोर शेपूट घातलं.
आंबेडकरवादी म्हणाले, हे दोघेही आमच्यावर अत्याचार करणार्‍यांचे समर्थक आहेत.

शरद पवार म्हणाले 'आमचा विनाअट पाठिंबा आहे.'

ब्ला... ब्ला... ब्ला...
भू:... भू:... भू:...
म्यांव... म्यांव... म्यांव...

ते म्हणाले 'हे छान चाललंय '...
असं म्हणून कमरेचं सोडून बेभान नाचले.
'राजा नागडा आहे' हे सांगण्याऐवजी
प्रजाच नागवी होऊन नाचू लागली.

- रमताराम (मरु घातलेला कवी आणि माणूस)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा