गुरुवार, २० जुलै, २०१७

दशावतार म्हणजे उत्क्रांती?

दशावतार म्हणजे आम्हाला आधीच माहीत असलेली उत्क्रांती वगैरे नासामान्य, युनेस्कोमान्य बाता मारणार्‍यांसाठी. याचे नवे व्हर्शन म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीवाद नि दशावताराची कल्पना येकदम म्हण्जे बघा तंतोतंत फिट्टं बसते वगैरे नव्या बाता.

तुमच्या दशावतारात एकही पक्षी, जमिनीवरचा एकही सरिसृप कसा नाही? तुमची उत्क्रांतीची व्याख्या वेगळी असेल तर घरी ठेवा, पण डार्विनच्या उत्क्रांतीवादाशी संबंध जोडायचा नि एकही पक्षी वा सरिसृप नाही? नरसिंह हा पशुमानव, डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या मांडणीत याची शक्यता कुठेही दिसत नाही. (ग्रीक मिथलॉजीमधे सेंटॉर, हार्पी, मर्मेड किंवा इजिप्तमधे असलेली स्फिंक्सची संकल्पना याच्या जवळ जाणारी, पण हे सारेच मिथिकल.) हां, परशुराम तेवढा नृशंस रानटी माणसाचा, निएंडरथालचा प्रतिनिधी म्हणता येईल कारण त्याचे हत्यार अगदीच प्राथमिक स्वरूपाचे, आदिम आहे. पण असे म्हटले तर कोकणस्थ ब्राह्मणांच्या भावना दुखावतील. जेनेटिकली ७५% क्षत्रिय असलेला हा अवतार त्यांचा आदर्श आहे म्हणे.

राम, कृष्ण, परशुराम आदि मनुष्यजातीचे प्रतिनिधी एकमेकांहून कोणते वेगळे गुणधर्म दाखवतात, यांच्यापैकी कोण उत्क्रांतीच्या पुढच्या पायरीवर नि कोण मागच्या आहे हे सांगणार का म्हणावं? एकाच पायरीवर पण वेगळ्या दिशेने पुढे गेले आहेत म्हटले तर मग त्यांना वेगळे अवतार का मानावे? किंबहुना कत्स्य, मत्स्य, वराह आणि नरसिंह वगळता उरलेले सहाही अवतार हे मानव आहेत, त्यांच्यात फिजिऑलजिकली (आणि खरंतर आयुष्यक्रमातही!) काही फरक नाही. त्यांना वेगळे प्राणीकूळ अजिबातच देता येणार नाही.

असल्या बाता मारणारे बहुसंख्य हे शाकाहाराचे पुरस्कर्ते असतात. त्यांना वनस्पतींना सजीव मानता येत नाहीत, कारण मग शाकाहाराबाबतच्या नैतिकतेच्या बातांना बाध येतो. (मग ते नर्वस सिस्टम वगैरे पळवाट काढतात, त्यावरही उत्तर आहे पण आणखी विषयांतर नको.) त्यामुळे यांच्या उत्क्रांती संकल्पनेत वनस्पतींना स्थानच नाही.

तस्मात डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नि दशावतारांचा गाईच्या शेपटावरील एका केसाइतकाही संबंध नाही. 'प्लुटो ग्रहावरही पूर्वी आमचेच राज्य होते' म्हणणे आणि दशावताराचा नि उत्क्रांतीवादाचा संबंध लावणे हे सारखे हास्यास्पद आहे.

हे प्रश्न अनेक परंपरावादी पोपटांना विचारून झाले आहेत. विरोधी प्रश्न मनावर न घेता, 'एकच एक गोष्ट निर्बुद्धपण घोकत राहावे, अखेर लोक मान्य करतील; काही झाले तरी आपण विचार करू नये' असे बाळकडू असल्याने ते तात्पुरते दुसरा बावळट बकरा शोधतात इतकेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा