सोमवार, २४ जुलै, २०१७

सजीवाची भाषा

प्रत्येक सजीवाची त्याची त्याची एक भाषा असते.

कुत्र्याने तोंड उघडून ते भुंकले की ते भो: भो: च करणार (फारतर भॉ भॉ , भॅ: भॅ: किंवा भोऊऽ हा पाठभेद दिसेल, पण 'भ'कार चुकत नाही.), मांजर म्यँव म्यँवच करणार, कोकिळ कुहू कुहूच करणार, कावळा 'काव काव'च करणार तर चिमणी 'चिव चिव'च करणार.

भले एखादा कुत्रा भुंकून एखाद्या जोडीदारणीला प्रेमाची साद घालत असेल, स्पर्धकाला 'हा माझा एरिया आहे भाव, हितून गुमान कटायचं' अशी धमकी देत असेल किंवा पलीकडच्या गल्लीतल्या दोस्ताला 'आमचं मालक लै यडंय, बायलीपुडं यकदम नंदीबैल हाय.' अशी खबरबात देत असेल; माणसाला त्यातून भो: भो:च ऐकू येणार.

पण हे समजून न घेता माणूस मात्र कुत्र्याला भुंकण्याखेरीज दुसरा आवाजच काढता येत नाही नि आपण आपल्या स्वरयंत्रातून शेकडो आवाज निर्माण करू शकतो अशी आत्मवंचक समजूत करून घेत असतो. आपल्यातील विसंवादाचे मूळ कारण प्रत्येकाची भाषाच निराळी आहे हे तो समजू शकत नाही; एकमेकांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे त्याला उमगत नाही.

इथे पोपटाचा एक अपवाद करावा लागेल. त्याला मात्र जो खायला प्यायला घालेल त्याची भाषा तो उचलतो नि बोलतो. त्यामुळे पोपटाला पोट भरण्याची ददात नसते, त्यासाठी कुणाची पोपटपंची करावी लागली तर त्यात काय एवढं.

ता.क. ही प्राणीजीवनाच्या अभ्यासातून लिहिलेली पोस्ट आहे. तिला समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमात टाकू नये... राज्यशास्त्रात तर अजिबात नको.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा