बुधवार, १७ जानेवारी, २०१८

उत्तरांचे प्रश्न

माणसांना प्रश्नांना बगल देऊन थेट उत्तरेच हवी असतात, परीक्षेतही नि आयुष्यातही. 

जीएंच्या बिम्मला किल्ली सापडते नि तो तिचे कुलूप शोधत असतो. माणसे कुलूप नि किल्ली दोन्ही हाती असूनही ती किल्ली घेऊन कुलूप उघडणारा शोधत बसतात. त्यामुळे कोणत्या किल्लीने कोणते कुलूप उघडते किंवा एखादे कुलूप उघडण्यासाठी कोणती किल्ली उपयोगात आणावी लागते हे त्यांना आयुष्यभर ठाऊक होत नाही, तसे करुन घेण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. ते फक्त कुलूप उघडणार्‍याची वाट पाहात बसतात. 'वेटिंग फॉर गोदो' मधल्या व्लादिमिर किंवा एस्ट्रागोन सारखे.

पण तो तर येत नाही. मग सहनशक्ती संपलेले हे लोक दगड घालून कुलूप आणि दरवाजा फोडतात. आपले हात दगड उचलून कुलूप फोडू शकतात याची बालंबाल खात्री असलेल्या त्या धडांना ते किल्ल्या उचलू शकतात का याबाबत मात्र साशंकता असते. म्हणून ते किल्लीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत नाहीत... ते फक्त त्या देवबाप्पालाच जमते असे ते म्हणतात. त्याने किल्लीने कुलूप उघडायचे नि आपण दगडाने तोडायचे याला हजारो वर्षांची परंपरा आहे, ती खंडित कशी करणार असा त्यांचा सवाल असतो. 

दगडांनी विखंडित झालेली अनेक कुलपे, अनेक प्रश्न आपल्या आजूबाजूला विखरुन पडलेले दिसतात आणि त्यांच्या किल्ल्या, त्यांची उत्तरे दूर कुठेतरी अडगळीत पडून विस्मृतीची काजळी लेवून पडून राहतात. कुणी चुकून उचलून आणल्याच तरी दगडी परंपरेचे पाईक त्याला/तिला हसतात, अडाणी म्हणतात. या किल्लीने उघडतील अशी कुलुपे अस्तित्वात कुठे आहेत? असा कुत्सित प्रश्न विचारतात. पण त्याचवेळी हजारो वर्षांपासून जतन केलेले जुनेच दगड घेऊन नवी कुलुपे फोडण्याचे काम मात्र ते 'परंपरेचे पाईक' म्हणून निष्ठेने, तत्परतेने करत राहतात...त्या दगडांनाच अनेक कुलुपांची किल्ली समजू लागतात ! 

दगड तेच राहतात, मोडक्या कुलुपांची संख्या मात्र वाढत जाते... 

- बाबा रमताराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा