शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

माकडाचे काय नि माणसाचे काय

मागे जेन गुडाल ही चिंपांझींवर काम करणारी विदुषी आणि तिच्या कार्यावर असलेले एक दोन वीडिओ पाहण्यात आले. चिंप्स आणि माणूस यांच्या डीएनए मध्ये ९९ टक्के की कितीतरी साम्य आहे असे म्हणतात. (नाही, हे ही वेदांत लिहिलेले नाही. म्हणजे अजून तसा दावा कुणी केलेला नाही. सारे काही इथेच प्रथम घडते या न्यायानुसार भविष्यात कुणी करेलही.) चिम्प्स हे ही बहुसंख्य माणसांप्रमाणेच टोळी करून राहतात. सर्वात बलशाली नर त्या टोळीचा प्रमुख असतो. या प्रमुखपदासाठी जो संघर्ष होतो त्यात बाहुबलापेक्षाशी जोरदार आव्हानात्मक ध्वनि निर्माण करणारा नेता होण्याची शक्यता अधिक असते. (कदाचित चिम्प्स हे ही शांतताप्रिय प्राणी असावेत^, एखादा फार ओरडा आरडा करु लागला की ’घे बाबा ते प्रमुखपद, पण कटकट करु नकोस. गप्प बस’ असे म्हणत असावेत.)

माकडाचे काय नि माणसाचे काय म्हणताना त्याच वीडिओतला एक तुकडा आठवला. त्यातल्या एका लहानखुर्‍या - बहुधा अजून वयातही न आलेल्या - एका चिम्पला जेनच्या कॅम्पवरचा एक पत्र्याचा चौकोनी डबा सापडला. (साधारणपणे पूर्वी आपल्याकडे बिस्कीटचे किंवा रॉकेलसाठी वापरत तसा किंवा अलिकडे खाद्यतेलासाठी वापरले जातात तसा.) त्याने सहज तो हाताने उडवला तर त्याचा जोरदार आवाज झाला, तो चिम्प दचकला. पण इथे त्याने जरा माणसाचे ट्रेट्स दाखवले. त्याने तो डबा मुले सायकलचे टायर जसे काठीने मारत पळवत नेतात तसा ढकलत ढकलत नेऊन त्याच्या कर्णकटू आवाजाने त्या टोळीत नुसती धमाल उडवून दिली. टोळीचा म्होरक्याही त्याला घाबरुन पळाला आणि त्या छोट्या चिम्पला म्होरक्याचे पद मिळाले (हे तात्पुरते की कायम्चे हे मात्र आठवत नाही.)

थोडक्यात काय, कुवत नसतानाही ’तोंड वाजवून किंवा आवाज करुन सत्ता मिळवणे’ हे माणसांत नि माकडांत मोठे साम्य दिसते!

#मन्कीबात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा