---
जात या मुद्द्याबद्दल तर मी अजिबात बोलत नाही. चर्चेने जुने द्वेष, जुन्या खपल्या उघडून पुन्हा नव्याने गोंधळ घालण्यापलीकडे काही घडते असे मला वाटत नाही. जातिअंताचा सर्वोत्तम मार्ग त्यांची दखल न घेता विचार नि निर्णय घेणे हाच आहे असे मी मानतो. जो बहुसंख्येला अमान्य आहे हे मला ठाऊक आहेच. पण मी माझ्याच विचाराने, मताने चालणारा माणूस आहे नि तसाच अखेरपर्यंत राहीन. बहुसंख्या माझ्या मताच्या विरोधात असली तरीही!
माफी मागणे हे थोतांड आहे, पूर्णविराम. कॅनडाच्या मंत्रिमंडळात चार शीख असतील तर तो कॅनेडियन्सच्या गुड इंटेन्शन्सचा, भूतकाळातील चूक सुधारल्याचा पुरेसा पुरावा आहे असे मी मानतो. शाब्दिक माफीला काडीची किंमत नाही.
मागच्या पिढीच्या पापांसाठी पुढील पिढीने अपराधगंड बाळगावा हे मला नामंजूर आहे. मी व्यक्तिवादी माणूस आहे. कोणत्याची जमावाचा भाग म्हणून माझी ओळख मला मुळीच मान्य नाही. जन्मजात मिळालेल्या सामाजिक लेबलांना मी मानत नाही. त्याचा वायफळ अभिमान बाळगत भूतकालातील जातीच्या नेत्याचे प्रोफाईल फोटो लावून काव आणत बसत नाही, तसंच त्यांच्या अपकृत्यांची जबाबदारी माझ्यावर येते असे मानत नाही. माझ्या चुकांना मीच १००% जबाबदार असतो तसेच मागची पिढी त्यांच्या चुकांना. फारतर त्याचे विश्लेषण करुन काय चूक, काय बरोबर हे मी तपासेन नि जाहीर करेन. जे पूर्वग्रह नि आपापले जातीचे जोखड उतरवून बोलू इच्छितात त्यांच्याशी बोलेनही. पण ते मूर्खांची प्रचंड मांदियाळी असलेल्या अशा माध्यमात मुळीच नाही.
मी भूतकाळाबाबतच्या चर्चेत रमत नाही, भूतकाळ जितका लवकर त्यागला जाईल तितके उत्तम. इतिहासाच्या कर्दमात रुतलेला देश जितक्या लवकर बाहेर येऊन ’भविष्य कसे हवे?’ याबाबत चर्चा करत नाही तोवर या देशाला भवितव्य नाही. भूतकाळातील तथाकथित सुवर्णकाळाची जपमाळ ओढणारे आणि सारा भूतकाळ काळाकुट्टच होता म्हणणारे असे दोन्ही लोक मला त्याज्य आहेत. (ते बरोबर आहेत की चूक हा माझा मुद्दाच नाही) मी मध्यममार्गी नि भविष्यवेधी माणूस आहे नि तसाच राहू इच्छितो.
यावर अधिक काही लिहिण्याची इच्छा नाही. कारण आपली जात विसरुन तटस्थपणे यावर कुणी लिहील याची सुतराम शक्यता नाही आणि त्यामुळे बहुतेक वेळा समोरचा काय म्हणतो आहे या पेक्षा:
"तो काय म्हणतो आहे असे ’मला वाटते"
किंवा
"त्याने काय म्हणावे असे मला वाटते"
किंवा
"तो समोर असे बोलतो आहे पण मनातून त्याचे असेच मत असणार, कारण तो अमुक जातीचा आहे/तिकडचा आहे "
अशा गृहितकांवर आरोप-प्रत्यारोप होतात... चर्चा होत नाहीत.
#भविष्यकसेहवेतेबोला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा