रविवार, ४ मार्च, २०१८

भारतातील धार्मिक संघर्षावरचा हुकमी उपाय

'राजकारणात धर्म आणू नका' असे जगातले कुसंस्कारी लोक म्हणत असतात. पण धर्माने राजकारणाकडून शिकू नये असे कुठे म्हटले आहे?

आपल्या देशातील हिंदू मुस्लिम झगडा सनातन आहे. काही हिंदूंना सारा देश इस्लाममय होईल ही भीती भेडसावते आहे. तर काही मुस्लिमांना भूतकाळात आपण या देशाचे राजे/सुलतान होतो म्हणजे आपण जन्मजात राज्यकर्ती जमात आहोत असा गंड आहे. त्यामुळे पुन्हा आपण राज्यकर्ते होत नाही तोवर आपण पारतंत्र्यातच आहोत असे ते समजतात. पण या समस्येवरचा दोघांचा उपाय मात्र एकच आहे, आपल्या वैभवशाली भूतकाळाकडे चला, तेव्हाची परिस्थिती परत निर्माण करा म्हणजे आपल्याला हवे ते घडेल. अगदी अर्वाचीन जगाचे सगळे फायदे उपटणारेही फेसबुकवर किंवा बारमध्ये, देवळा/मशीदीमध्ये हाच एक उपाय आहे हे तावातावाने बोलत असतात.

मध्यंतरी ’भारतातले सारे हिंदूच आहेत’ असं कुणीतरी, कुठेतरी म्हटलं होतं. नेमके त्याला जोडून राजकारणातल्या काही घोषणा ऐकल्या आणि मला हिंदू-मुस्लिम झगड्यावरचा रामबाण/अल्लाकृपा उपायच सापडला. या उपायाने त्यांना भूतकाळात जाऊन वर्तमानाचे, त्यात झालेल्या प्रगतीचे फायदेही सोडावे लागणार नाहीत. उपाय तसा जुनाही आहे नि नवाही. यातील नवतेचा भाग मी सद्य राजकारणातून उचलला आहे.

हिंदू धर्मियांनी मुस्लिमांना हिंदू धर्मांतर्गत एक जात म्हणून मान्यता द्यावी. (या तोडग्याला इतिहासात आधार आहे.) पुण्यातल्या सिनेगॉगला जसे ’लाल देऊळ’ म्हणून त्याला आपले म्हटले तसे सद्य हिंदूंनी मशीदींना ’अल्लाचे देऊळ’ म्हणून आपलेसे करावे. तसेही पीर आणि दर्ग्यांवर हिंदू जातातच की, मग मशीदींनाही आपलेसे करायला काय हरकत आहे? मुस्लिम ’जातीचे’ लोक त्याला मशीदच म्हणतील. पण त्याला हरकत नसावी. काही सद्य हिंदू देवांच्या देवळांऐवही ’देव्हारा’ असतो, ’स्वारी’ असते, ’स्थान’ असते तसे या जमातीच्या देवळाचे हे आणखी एक नाव. त्यांचा अल्ला, त्यांचे प्रेषित, त्यांची उपासनापद्धती आहे तसे राहतील. हिंदूंमध्ये जातीबाहेर विवाह फारसे होत नसल्याने समाजही बव्हंशी एकसंधच राहील. फक्त सरकारदरबारी नोंद तेवढी हिंदू म्हणून होईल. द्वैती, अद्वैती, विशिष्टाद्वैती यांच्याप्रमाणे हिंदू धर्मात आणखी एका एकेश्वरवादी पंथाची भर पडेल इतकेच.

मुस्लिमांनी हे मान्य केल्याबद्दल त्यांना राजकारणात त्यांच्या लोकसंख्येइतके आरक्षण द्यावे. त्यातून त्यांना पुन्हा एकवार राज्यकर्ती जमात होण्याची संधी मिळेल.

मुस्लिम पुन्हा सत्ताधारी झाले की त्यांच्यातील जे अस्वस्थ आत्मे होते खुश होतील, तर राज्य हे हिंदूंचेच राहिले म्हणून हिंदुत्ववादी खुश होतील.

हिंदुत्ववाद्यांना एक जास्तीचा आनंद मिळेल, तो म्हणजे त्याचा ’मुस्लिममुक्त भारत’ (!!!) करण्याचा मनसुबा सिद्धीस गेलेला असेल.

युद्ध आणि लग्न या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांनी प्रश्न सुटत नाहीत असे मुळीच नाही, फक्त नवे प्रश्न निर्माण होतात इतकेच. तसेच या तोडग्याने नवे झगडे निर्माण होतील पण धार्मिक संघर्ष हा शब्द मात्र इतिहासजमा होईल. पण इतकी वर्षे त्या झगड्यांवरच ज्यांची दुकानदारी चालू आहे त्यांना नवे शॉप अ‍ॅक्ट लायसन घेऊन, नवी दुकाने उघडावी लागतील. त्या तयारीत जो काही थोडा वेळ जाईल, निदान तेवढा काळ आपण शांततेने जगू.

धार्मिक समस्या 'राजकीय फॉर्म्युला'ने सोडवल्याचे दुर्मिळ उदाहरणही आपल्या खात्यात जमा होईल. कसं म्हणता मग?

#कॉंग्रेसमुक्तभारत
#मुस्लिममुक्तभारत

---

ता.क.: सदर पोस्ट ही वक्रोक्ती आणि व्याजोक्ती अलंकाराचे उदाहरण आहे. वक्रोक्ती म्हणजे काय हे ठाऊक नसेल तर कृपया 'छोटा भीम’ चा पुढचा एपिसोड पहायला निघून जावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा