सोमवार, २१ मे, २०१८

देवबाप्पा, समस्याविहीन समाज वगैरे

जगभरातील प्रत्येक माणसांत एक संभ्रमित जनावर दडलेले असते. जनावरांच्या तुलनेत माणसाची ग्रहणशक्ती जितकी वाढली आहे त्या मानाने आकलनशक्ती अजून कैक मैल मागे आहे. त्यामुळे अनेकदा माणसाला अनेक प्रश्नांना, माहितीला, समस्यांना सामोरे जावे लागते ज्याच्याबाबत काय करायचे हे त्याला/तिला उमगत नाही. समस्या समोर असते पण तिच्या कारणांचे आकलन त्याला/तिला झालेले नसते. अशा वेळी एकतर कुणाला तरी ते झाले आहे आणि त्या समस्यांचे उत्तर त्याच्याकडे आहे (आध्यात्मिक बुवा-बाबा) असे गृहित धरायला त्याला आवडते. त्याहून अधिक संभ्रमित, अधिक आळशी मंडळी आकलनाचा मधला टप्पा ओलांडून थेट उपायाचा, निराकरणाचा आयता मार्ग शोधतात. वैयक्तिक आयुष्यात ’देवा’ची आणि सत्ताकारणात ’राजा’ची भूमिका यातून तयार होते. तो ऑलमायटी आपल्या समस्यांचे कसे निवारण करणार, त्यासाठी आवश्यक कौशल्ये त्याच्याकडे आहेत का याचा विचार त्या दोघांना शरण जाणारे करत नसतात. ते त्याचे काम आहे नि त्याने ते करायलाच हवे, तो त्यासाठी सक्षम आहे हे त्यांनी ठरवून टाकलेले असते. त्यांच्या क्षमतेबाबत विचार वा मूल्यमापन करण्याची गरज नसते.

तिसरा एक पर्याय जगभर सर्वत्र वापरला जातो तो म्हणजे भूतकाळातील गृहितसत्य, तथाकथित समस्याविहीन व्यवस्थेकडे अथवा परिस्थितीकडे परत जाणे. धार्मिकांमध्ये हा पर्याय अधिक आढळतो. त्याशिवाय वर्तमानातील समस्यांचा डोंगर कसा उपसायचा या विचाराने हतबुद्ध झालेल्या समाजातही. धार्मिकांना धर्माच्या उगमापाशी गेले की सगळे काही आलबेल होईल असा विश्वास असतो. विज्ञान, विचार यांनी अनेक क्षेत्रात कोपर्‍यात रेटत नेलेल्या धर्माला परत उजाळा द्यायचा असेल तर भूतकाळात जेव्हा तो बलवान होता तिथवर आपण मागे गेलो, तीच सामाजिक राजकीय परिस्थिती निर्माण केली तर धर्मही पुन: त्याच उर्जितावस्थेला पोहोचेल असा त्यांचा विश्वास असतो. अफगाणिस्तान पासून इराण पर्यंत सर्व मुस्लिम देशांची ही परागती आपण पाहिली आहे. काही देशांतून ख्रिश्चॅनिटीच्या मूळ रूपाकडे परत गेलो की जग अधिक सुंदर होईल असा समज असणारे ’मूळ रूप म्हणजे काय? ते कुणी नि कसे निश्चित करायचे?’ या प्रश्नांना स्पर्श न करता कठोर नियमन म्हणजे मूळ रूप असे स्वत:च ठरवूनही टाकत असतात. या दोन बिब्लिकल धर्मांच्या पावलावर पाऊल ठेवत इतरधर्मीय देखील भूतकालगामी होऊ पाहात आहेत.

देशाच्या वर्तमानातील समस्यांच्या निराकरणाचे कोणतेही परिणामकारक उपाय सापडत नसले की भूतकाळात आपण फार सामर्थ्यशाली होतो असा समज करून घेणे सोयीचे असते. आपल्या समाजात काही समस्याच नव्हत्या, बलात्कारासारख्या गुन्ह्यांसह ज्या काही समस्या आहेत त्या केवळ आपण आपले सोवळे सोडून बाहेरून आलेले ओवळे स्वीकारले म्हणून, असा झापडबंद, विचारशून्य तर्क देणारे आपल्या आसपास आहेतच. त्या तथाकथित भूतकाळाकडे परत गेलो की आपल्या समस्या चुटकीसरशी नाहीशा होतील असा त्यांचा समज असतो...किंवा इतरांचा तसा समज करून द्यायला त्यांना आवडते.

बरं अशा प्रतिगामी व्यक्तींना पर्याय म्हणून उभे असलेलेही त्यांच्याहून वेगळे असतात असेही नसते. अनेक वर्षे आपण शासक होतो, जनतेचे प्रतिनिधी होतो. आज अचानक एक वावटळ आली नी आपली सत्ता हातून निसटली हे वास्तव जुन्या शासकांना मान्य करावे लागतेच, त्याला इलाजच नसतो. पण याची कारणमीमांसा करत बदललेली परिस्थिती, त्यामुळे कालबाह्य झालेली व्यवस्था, ती राबवण्याची हत्यारे, नव्या परिस्थितीत तगून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये, उभी करण्याची यंत्रणा आणि व्यवस्था याबाबत विचार ते करत नाहीत. आपल्या विरोधकांप्रमाणेच आपल्यापुरता सोपा निष्कर्ष ते काढतात. ’निवडीची प्रक्रिया बदलली म्हणून आपण हरलो, मागे पडलो.’ आता जी प्रक्रिया आपल्या गैरसोयीची ती भ्रष्ट असणार यात काही शंकाच नाही. ते सिद्ध करायची गरज नाही. कार्यकारणभाव उलगडून दाखवण्याची गरज नाही. रंगलेल्या क्रिकेट सामन्यात पराभव झाल्याचे खापर, ’तू मध्येच उठलास म्हणून विकेट पडली’ असे म्हणत सोबत्यावर फोडणे आणि हा तर्क यात फरक नाहीच. जिथे कार्यकारणभाव, परस्परसंबंध सिद्ध होत नाही तिथे असे दावे करणे म्हणजे कुणीतरी आपली जागा सोडली म्हणून सचिन आऊट झाला नि भारत हरला म्हण्यासारखेच आहे.

काही वर्षांपूर्वी आळेकरांचे एक नाटक आले होते ’एक दिवस मठाकडे’ नावाचे. कोण्या डोंगरावर एक मठ आहे नि त्यात जगातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात हे गृहित धरून त्याच्या शोधांत निघालेला एक विधुर आणि प्रेयसी गमावलेल्या एक तरूण यांच्या संवादातून हे नाटक उलगडत जाते. आपल्या समस्यांना आपल्यालाच सामोरे जावे लागते. परिस्थिती बदलली की अट्टाहासाने तिला वळवून भूतकाळात नेता येत नसते, गमावलेले पुन्हा हस्तगत करता येत नसते. त्या गमावलेपणाची चिकित्सा करून कारणमीमांसा मात्र मांडता येते. ज्यातून आपला भूतकाळ पुनरुज्जिवीत करता आला नाही तरी आपण गमावले ते ज्याच्या वर्तमानात शिल्लक आहे, त्याने ते गमावू नये यासाठी आपल्या अनुभवाचे शेअरिंग करून निदान आपल्या चुकांची पुनरावृत्ती त्याने/तिने करू नये यासाठी प्रयत्न करता येतो. आपला भूतकाळ कुणाचा तरी वर्तमान म्हणून पाहता येतो. तितपत तरी- खरं तर तितपतच, साध्य करता येते हे समजून घेणारा मठाचा नाद सोडून घराकडे वळत असतो. बदलत्या परिस्थितीत घराचा सांभाळ करण्याचा विचार करत असतो.

भूतकाळाकडे नजर लावून बसलेला, घड्याळाचे काटे फिरवून नेहरूपूर्व भारत निर्माण केला की आपले वर्चस्व अधिक दृढ होईल असे समजणारा भाजप आणि राजकारणाचे, सत्ताकारणाचे आयाम आमूलाग्र बदलले आहेत, आपले खेळाडू नव्या परिस्थितीत खेळण्यास अद्याप सक्षम नाहीत हे समजून न घेता, मतपत्रिकांच्या निवडणु्कांत आपण जिंकत होतो म्हणून 'ईवीएम’वर आगपाखड करत पुन्हा मतपत्रिका आणा म्हणणारी काँ ग्रेसहे दोघेही या बाबतीत* एकाच माळेचे मणी असतात.

---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा