सोमवार, १४ मे, २०१८

भाजपविरोधकांसाठी काँग्रेस ही अपरिहार्यता का आहे

फक्त भाजपविरोधकांसाठीची पोस्ट (अगदी ’तमीकोपसेने’च्या कार्यकर्त्यां/सैनिकांसाठीही स्ट्रिक्ट नो नो.)

माझा मोदी आणि भाजप सरकार विरोध जगजाहीर आहेच. हे सरकार मला नको आहे. याची असंख्य कारणे आहेत. ती एकदा कधीतरी एकत्र इथेच मांडेन. सुटी सुटी कारणे, अप्रत्यक्षपणे इथे मांडत आलो आहेच. आता हे सरकार घालवायचे असेल तर तिथे पर्यायी सत्ताधारी यायला हवेत. या माझ्या मुद्द्याशी सहमत होणारे अनेक लोक मला इथे आणि बाहेरही भेटत आले आहेत. आपापल्या परीने त्यांनी हे पर्यायी राजकारण कसे असावे याची चाचपणी केली, शक्य तिथे काही कृतीचा प्रयत्नही केला. पण चार वर्षांच्या होय-नाही नंतर आजही नवे काही उभे करण्यात यांना अपयश आले हे मान्य करून पुढे जावे लागणार आहे. तेव्हा आता जे आधीच अस्तित्वात असलेले विरोधी पक्ष आहेत त्यांतूनच पर्याय निवडावा लागेल हे निश्चित झाले आहे. यासाठी समोरचे आव्हान कोणत्या स्वरूपाचे आहे हे आधी नीट ध्यानात घ्यावे लागणार आहे.

भाजप हा संघाच्या नेटवर्कच्या आधारे सत्ताधारी झाला, आणि भाजपच्या सत्तेच्या आधाराने संघी मानसिकता फोफावते आहे. हे वास्तव आहे हे बहुतेक भाजप-विरोधकांना मान्यच असावे. आता ही साखळी तोडायची तर संघी नेटवर्क तोडणॆ ही किचकट आणि दीर्घकाळ चालणारी लढाई आहे हे ही मान्य व्हायला हरकत नाही. पण लढाईत एक महत्वाचा भाग असतो तो प्रतिस्पर्ध्याची रसद तोडणे. संघाची सध्या रसद आहे भाजपची सत्ता! आता ही सत्ता हस्तगत केली पाहिजे. म्हणजे २०१९ ला हे सरकार घालवायचे तर आदर्श वगैरे सोडा पण एक वर्केबल पर्यायी सरकारची शक्यता निर्माण करायला हवी. आता हे पर्याय कोणते हे पाहिले पाहिजे

भाजप-विरोधकांत एक मोठा गट सातत्याने काँग्रेसचाही विरोधक राहिला आहे. विशेषत: आमच्या समाजवादी आणि आमच्या कम्युनिस्ट मित्रांना काँग्रेस नि भाजपत काहीच फरक दिसत नाही... म्हणे. (आणि असे असूनही कुंपणावर असल्याचा आरोप मात्र आमच्यावर, हा ही एक विनोद. पण ते जाऊ द्या) म्हणजे आता यांच्या म्हणण्यानुसार हे दोघे सोडून इतर तिसर्‍या पर्यायाची सत्ता आणली पाहिजे, बरोबर? आता ’भाजप-काँग्रेस सारखेच’ (भाकासा) पंथीयांपैकी कुणीही प्रत्येक राज्य, त्यातून निवडून दिल्या जाणार्‍या खासदारांची संख्या, तिथे भाजप-काँग्रेस वगळून तिसरा कोणता पक्ष निवडून येऊ शकतो, किती जागा निवडून आणू शकतो याचा एक ठोकताळा घ्यावा आणि मला एक संभाव्य तिसरी आघाडी दाखवावी, जी भारतीय राजकारणातल्या तुम्हा भाकासा’ पंथीयांच्या मते दोन असुर असलेल्या पक्षांना वगळून २०१९ ला सरकार स्थापन करू शकेल. मला व्यवस्थित आकडेवारी हवी हं. मोघम जोडकाम नको. असा वर्केबल अल्टरनेटिव चे गणित जो मांडून दाखवेल तो सांगेल त्या पक्षाला मी मत देईन, प्रॉमिस.

फासिझमचा बागुलबुवा दाखवून मते मागणारी काँग्रेस आणि काँग्रेस वा मुस्लिमांचा बागुलबुवा दाखवून मते मागणारी भाजपा ही नको आहे म्हणताय तर हरकत नाही. असा कोणताही बागुलबुवा उभा न करणारा पक्ष सांगा, ते २०१९ ला सत्तेपर्यंत कसे पोचणार याचे गणित मांडून दाखवा. मग आपण सारेच त्या पक्षाच्या मागे उभे राहू.

एरवी नीतिशकुमार यांच्यासारख्या भाजपविरोधकांच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवाराने भाजपच्या चरणी लोळण घेतल्यावर, आणि हे घडल्यावर हर्षवायु होत, ’यांनी माती खाल्ली, माती खाल्ली’ म्हणत नाचणार्‍या कम्युनिस्टांनी बंगालमध्ये काँग्रेस-भाजप करतात तसे ’वरच्या पातळीवर नकार-निषेध आणि खाली भाजपाशी सुखेनैव युती’ हाच प्रकार केल्यावर ’ भाजपच्या सोबत जाणार नाही.’ अशी खात्री असणार्‍या पक्षांची संख्या शून्यावर आल्यावर ’तिसरा पर्याय’ हा प्रकार माझ्या मते रिडंडंटच झाला आहे! आज नीतिशकुमार, मागे गोवा फॉर्वर्ड, जेडीएस, मायावती इत्यादि सर्वांनीच कधीना कधी भाजपशी घरोबा केला आहे. तेव्हा ही संभाव्य तिसरी आघाडी ही सर्वात मोठ्या पक्षाला - जो पुन्हा भाजपच असेल हे माझे वास्तववादी गृहितक आहे - सत्तास्थापनेसाठी मदत करुन सत्तेचा तुकडा आपल्या पदरी पाडून घेण्यास उत्सुक पक्षांची तात्पुरती मोटच असणार आहे. महाराष्ट्रात सध्या भाजपला लाल डोळे करून धमकावणारे दोनही पक्ष यात आघाडीवर असतील याची मला खात्रीच आहे.

म्हणजे मी भाजपविरोधक, पण मी मतदान केले तो पक्ष भाजपचा सत्तेतला भागीदार हे चित्र मला नको आहे. यासाठी कशीही असली तरी काँग्रेसला मत देणे ही माझी अपरिहार्यता आहे. तेव्हा ती तशी आहे हे मान्य करून हे असले ’काँग्रेस नि भाजप सारखेच’ टाईपचे पांडित्य दाखवणे मी बंद केले आहे.

निव्वळ पांडित्य दाखवून ’मी त्यातल्या त्यात चांगला उमेदवार निवडून देईन’ या वांझोट्या तर्काला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. मी जेव्हा खासदार निवडतो तेव्हा मी पॉलिसी मेकर्स निवडत असतो, ज्यावर सरकारचे नियंत्रण नि वर्चस्व असते. तेव्हा मला सरकार कोणाचे किंवा कोणत्या कंपोजिशनचे असेल याचा विचार करायलाच हवा. सज्जन उमेदवार म्हणून मी अपक्ष खासदार निवडून दिला तर त्याला संसदेत तोंड उघडण्याची संधीही मिळणार नाही याची संभाव्यता ९०% हून अधिक असते. तेव्हा धोरणात्मक बाजूंचा विचार केला तर तुमचा हा ’सुज्ञ’ वगैरे प्रतिनिधी कुचकामी ठरतो. तिथे कदाचित थोडा कम अस्सल असलेला पण जो धोरणांवर प्रभाव पाडू शकेल अशा (सत्ताधारी वा विरोधी) पक्षाचा असणे अधिक उपयुक्त ठरते असे माझे प्रामाणिक मत आहे. तेव्हा हा पर्याय माझ्या मते बाद समजायला हवा.

काँग्रेसला मत देणे ही माझी अपरिहार्यता आहे. एका मर्यादेपर्यंत त्यांची मूळ विचारधाराही मला पटणारी आहे. पण याचा अर्थ काँग्रेस सरकार लगेच ’अच्छे दिन’ आणेल असला मूर्ख आशावाद माझ्या मनात मुळीच नाही. २०१४ पूर्वी (जेव्हा मतदार यादीत गोंधळ घालण्यात सातत्य दाखवणार्‍या निवडणूक आयोगाच्या कृपेने मला मतदान करता आले नाही) जेव्हा जेव्हा मी मतदान केले तेव्हा मी ’काँग्रेसविरोधात’ म्हणून भाजपला मतदान केले आहे. (तेव्हा 'तमीकोपसेने’च्या बावळटांनी पुन्हा पुन्हा मला काँग्रेसचे दोष वा राहुल गांधींच्या मर्यादा सांगायला येऊ नये. तुमच्यासारख्या वैचारिक भोंगळ्यांपेक्षा त्या मी अधिक स्पष्ट जोखल्या आहेत.) आज परिस्थिती उलट आहे इतकेच.

तेव्हा काँग्रेस तिच्या मर्यादांसह सत्तेवर येणार आहे याचे भान मला आहे. त्यावेळी ’नेता जरी का पादला, होयबा सुगंधु म्हणे’ टाईप भक्तांच्या रांगेत मी नसेन याची खात्री आहे.

तसंच केवळ बौद्धिक पांडित्य दाखवून राजकारणात नगण्य बळाच्या नेत्यांना मतदान केल्याने आपण फार काहीतरी नैतिकदृष्ट्या उच्च आहोत असे समजणार्‍या गटातही नसेन. सत्तेचा खेळ तिथल्या नियमांनुसार खेळावा लागतो. ते नियम बदलायचे झाले तर बदलता येतील इतके बळ सद्य नियमांनुसार खेळूनच त्या व्यवस्थेत मिळवावे लागते. आधी नियम बदला म्हणणे याचा अर्थ शहरातले सगळे सिग्नल हिरवे झाल्याखेरीज मी गाडी गॅरेजबाहेर काढणार नाही’ असे म्हटल्यासारखे आहे.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा