बुधवार, १६ मे, २०१८

कॉंग्रेस, भाजपविरोध आणि राजकारणातील सामान्यांचे पर्याय

एका पोस्टच्या चर्चेतून नवे मुद्दे निघणे आणि ’वादे वादे जायते तत्त्वबोध:’ या न्यायाने माणसांनी संवाद वाढवत आदानप्रदान करणे ही मोठी मौज असते.

Vishalशी चर्चा करणे नेहमीच उपयुक्त असते. मी कालच २०१९ च्या निवडणुकीतील संभाव्य भाजप-कॉंग्रेस शिवाय सत्ताधारी होणारे संभाव्य इक्वेशन दाखवा अशी पोस्ट केली होती. त्यावर त्याचे हे उत्तर आहे. यातले मुद्दे लहान पणापासून माझ्या मध्यमवर्गीय परिसरात कायम चर्चिले जाणारे आहेत. त्यामुळे त्याला द्यायची उत्तरे मी इथेच पोस्ट करतो आहे.

<< १. विश्वासार्हता संपूर्ण नष्ट झालेलं कॉंग्रेस नेतृत्व बदलून नवीन आश्वासक चेहरे समोर आणणे. >>

<<विश्वासार्हता संपूर्ण नष्ट झालेलं >>हे तू कसं ठरवलंस. समजा माझ्यासारखे अनेक लोक अजूनही त्यांना विश्वासार्ह मानत असतील तर? (हा हायपोथेटिकल प्रश्न आहे.) आणि ही संख्या जर अजूनही बरीच असेल तर "विश्वासार्हता संपूर्ण नष्ट झालेलं" हे विधानच खोटे ठरत नाही का? ’विशालच्या मनातील त्यांची विश्वासार्हता नष्ट होणं’ आणि ’संपूर्ण नष्ट होणं’ यात फरक नाही काय?

हे नेतृत्व कुठले? राहुल गांधी हे विश्वासार्हता नष्ट झालेले नेतृत्व आहे का? याचे उत्तर हो असे देत असशील तर त्यांची विश्वासार्हता नक्की कशी तपासली? मुळात राजकारणात विश्वासार्हता नष्ट होणे कसे मोजतात? तुझा मुद्दा केवळ राहुल गांधींबाबत नसेल तर अन्य कुठले नेते आहेत जे तुझ्या दृष्टीने विश्वासार्हता नष्ट झालेले आहेत नि त्यांना बदलण्याची गरज आहे? आणि त्यांना बदलण्यासाठी किती काळाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे? आणि ती पुरी होईपर्यंत आताचे सरकार आम्ही सहन करावे (कदाचित तुझी तयारी असेल, माझी नाही!) असे म्हणणे आहे का? मुळात अशी प्रक्रिया बटन दाबून आज अशुद्ध तर उद्या शुद्ध अशी असते का? तसे नसेल तर मग नक्की कोणत्या ठिकाणी तू ’हां, आता कॉंग्रेस मला हवी तशी शुद्ध झाली बरं का.’ असे म्हणणार आहेस?

दुसरा मुद्दा हे नवे आश्वासक चेहरे शोधायचे कुठून? माझा आसपासच्या पांढरपेशा समाजाकडे पाहिले तर असे लक्षात येते की त्यांना दाढी वाढवलेला प्रत्येक जण गुंडच वाटतो. आणखी थोडे खोलात गेले तर त्यांना - आणि एकुणच समाजाला - आपापल्या जातीचा नेता विश्वासार्ह वाटतो. विश्वासार्हता हा फसवा निकष आहे असे माझे मत आहे.

दुसरे असे की हे आश्वासक नेतृत्व येणार कुठून, आपल्या आसपासच्या समाजातूनच ना. मग आज तुझ्या आसपास कुणी असे आश्वासक, नेतृत्वगुण असलेले लोक दिसतात का जे तुला रेकेमेंड करता येतील? बरं समजा केले, तरी त्यांना राजकारणाच्या खेळात टिकून राहण्यासाठी आवश्यक ते डावपेच जमतील का? की त्यांच्यासाठी राजकारणाचे नियम बदलायला हवेत असे तुझे म्हणणे आहे? आणि बदलायचे असल्यास कसे? माझ्या मते त्यासाठी आधी सत्ताच हस्तगत करायला हवी ना? मग ती आजच्या नीतिनियमांच्या अधीन राहूनच करत यायला हवी. हे मान्य की एकदा ते हत्यार कामाचे म्हटले की ते बदलायची तयारी नसते कुणाची. पण आजची राजकारणाची अवस्था त्यामुळेच आहे. पण हे व्हिशस सायकल आहे. ते तोडायचे कसे याचा प्लान नसेल एकवेळ, पण निदान ढोबळ मुद्दे तुझ्याकडे आहेत काय? हे आश्वासक वाटणारे लोक राजकारणात तेव्हाच टिकून राहतील जेव्हा ते सध्याच्या नेत्यांना टक्कर देऊ शकतील. आणि ते करायचे तर आजचे राजकारणाचे नियम स्वीकारले नाहीत तरी अंगीकारावे लागतीलच. आणि तसे झाल्यास तुझ्या मते त्यांची विश्वासार्हता वा आश्वासकता संपुष्टात येणार असेल तर काय करायचे?

<< २. पक्षांतर्गत बाहुबलींच्या, मातब्बर भ्रष्टाचारी सरदारांच्या मुसक्या आवळणे. >>

मला अशा चार जणांची नावे सांगता येतील का? मुख्य म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला हे कसे ठरवणार? माझ्या मते भ्रष्टाचार हे केवळ पर्सेप्शन आहे, समोरच्यावर हुकमी आरोप करण्याचे (’गेल्या सत्तर वर्षांत काय केले?’ या र्‍हेटरिकल प्रश्नासारखे. कितीही प्रगती दाखवली तरी प्र्श्न विचारतानाच ती झालेली नाही हे गृहित धरून विचारलेला प्रश्न असतो तो. त्याला उत्तर असूच शकत नाही.). आपल्या विरोधी पक्षांतील लोकांना बाहुबली, गुंड, भ्रष्टाचारी ठरवणे हे केवळ पर्सेप्शन आहे असे माझे मत आहे. हां व्यवस्थेअंतर्गत दंडव्यवस्था, न्यायव्यवस्था या मार्गाने जाऊन ज्यांचा भ्रष्टाचार सिद्ध झालेला नाही तोवर ते केवळ एक पर्सेप्शन आहे. आणि अशी पर्सेप्शन रुजवता आली की ती खरी वाटू लागतात. आणि पर्सेप्शन रुजवण्यासाठी आज माध्यमे उपयोगी पडतात. ती आज आपल्या दारात आहेत म्हणून हे समजून येते. एरवी जात, पोटजात, धर्म आदिंच्या टोळ्यांनी एखादे असत्य स्वीकृत केले की ते सत्य होऊन जाई.

मी ज्या ब्राह्मण समाजात राहतो वावरतो त्या समाजाचे एकत्रित असे अनेक पूर्वग्रह आहेत, जे त्यांच्या जातिश्रेष्ठत्वाच्या अहंकाराला साजेसे आणि पोषक आहेत. (इतर जातींनी खुश व्हायचे कारण नाही. इथे फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने चांगभलं करणारे प्रच्छन्नच नव्हे तर टळटळीत जातीयवादी मला दिसतात. समतेचे तत्त्वज्ञान बडबडता बडबडता जातिहिताचा मुद्दा आला की तिकडे धार्जिणे होतात. ) कॉंग्रेस सगळा गुंडांचा पक्ष वा बिल्डरांचा पक्ष हा असाच जोपासलेला गंड. तो तसा नाही असे मला मुळीच म्हणायचे नाही.

राजकारणात बाहुबल, आर्थिक बळ, जातीचे वा तत्सम गटाचे बळ यांचे आधार घेऊन उभे राहिलेले नेते असतातच. कॉंग्रेसमध्ये आहेत, भाजपमध्ये आहेत, कम्युनिस्टांतही आहेत नि आता नावापुरत्या उरलेल्या समाजवाद्यांतही. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा तर त्यांना वगळून पक्ष कसा उभा राहील याचा पर्यायी आराखडा हवा. सत्ता मिळवायची तर निवडणुका लढवायला हव्यात. आणि निवडणुका लढवायच्या तर मतदारांची मते मिळवता यायला हवीत. सध्या चार मार्गांनी मिळवता येतात, १. पैसा वाटून, २. बाहुबल अर्थात दहशत माजवून ३. एखाद्या प्रभावशाली वा प्रस्थापित (वा दोन्ही) पक्षाच्या आधाराने आणि ४. एखाद्या प्रभावशाली नेत्याच्या नावावर (पूर्वी कॉंग्रेसने गांधी-नेहरू-इंदिराजींच्या आधारे तर आता भाजपचे उमेदवार मोदींच्या आधारे मागतात). या पलीकडचा पाचवा प्रकार जो मोदी-शहांच्या भाजपने उभा केला तो निवडणुकीचे नियोजन हा. अर्थात वरीलपैकी चारही प्रकारचे पर्याय इथे मायक्रो लेवलला वापरले जात असल्याने त्याला वेगळा पर्याय म्हणावे का यावर तुंबळ रण माजेल. ते सोडून देऊ,

आता या परिस्थितीत मी सहावा पर्याय उभा करू शकतो का ज्यातून तुला अपेक्षित असणारे विश्वासार्ह वा आश्वासक नेते उभे राहू शकतील? माझ्या मते हे अशक्य आहे. जगातील एक माणूस पहिल्याने खोटे बोलला आणि सत्याचे जग संपुष्टात आले असे म्हणावे लागते, तसेच बाहुबली आणि धनदांडगे/भ्रष्टाचारी राजकारणात आले (हे कॉंग्रेसचे पाप असे आपण म्हणू शकतो. ते सध्या मान्य करून पुढे जातो.) की पापभीरू, कार्यनिष्ठा असणार्‍यांच्या हातून ते निसटले. आता यांना संपूर्ण दूर करून ते नव्याने उभे करणे अशक्य आहे. ’होऊच्चं शकते’ असे घरबसल्या, स्वत:च्या आयुष्याला किंचितही खार लावून न घेता म्हणणार्‍यांना सोडून देऊ. शेवटी राजकारणात येऊ इच्छिणार्‍यांतूनच मला निवड करावी लागते. आणि निस्वार्थपणॆ समाजसेवा करणारे, लाभाची अपेक्षा नसणारे तिथे येत नसतात. अशा निस्वार्थांनी राजकारणात यावे नि ते शुद्ध करावे म्हणणारे स्वत: त्याबाबत काही करू इच्छित नसतात. किंबहुना ते तसे असतात म्हणूनच त्यांच्या अपेक्षा अशा अवास्तव असतात. चांगले आणि वाईट असे पर्याय नसतात, राजकारणात तर नाहीच. वाईटाचे, स्वार्थाचे प्रमाण प्रत्येक पक्षांत, नेत्यांत असणारच. शिवाय चांगल्या-वाईटाच्या आपल्या व्याख्या गृहित धरल्या तरी आपल्यासमोर असे वाईट’ विरुद्ध ’तसे वाईट’ एवढेच पर्याय असतात. तिसरा ’चांगला पर्याय’ आपण देऊ असे सांगत उभे राहिलेले अपरिहार्यपणे त्या नियमांना शरण जातात नि टिकून राहतात किंवा अस्तंगत होतात.

या माझ्या दाव्याला पुष्टी देणारे भक्कम उदाहरण म्हणजे भाजप हाच पक्ष आहे. मी ९८ पर्यंत भाजपचा मतदार होतो आणि संघाची विचारसरणी मानणारा. भाजप हा खरोखर सुशिक्षितांचा, सुसंस्कृतांचे प्रातिनिधित्व करणारा पक्ष होता असे मला तेव्हा वाटत होते, तेव्हा खरंच होता असे आजही वाटते. (यात संघ विचारसरणीचा संबंध नाही. मी व्यक्तींबाबत बोलतो आहे.) पण त्याचा फायदा काय झाला? त्यांना सत्ता मिळवता आली का? अखेर त्यांनी बाहुबली, गुंड प्रवृत्तीचे पण स्वत:ला साधू म्हणवणारे (ज्यातून त्यांना धार्मिक आधारावर आपोआपच एक जास्तीचे संरक्षण मिळते. ) लोढांसारखे बिल्डर, अनेक उद्योगपती यांची संगत केली आणि सत्ताकारणात वेगाने पुढे गेले. थोडक्यात गटेच्या फाउस्ट सारखा त्यांनी आपला आत्माच विकला आणि बदल्यात सत्तासुख मिळवले. अनेक वर्षे जमिनीवर काम करणारे अनेक कार्यकर्ते (ज्याबद्दल मला संघाचे नेहमीच कौतुक वाटते.) आज या कम्प्लीट यू-टर्न मुळे अचंबित झाले असले तरी त्या सत्तेच्या आधारानेच त्यांच्या कार्याला (जे मला मान्य नसेल) वाढीची संधी मिळते आहे हे ही नाकारता येत नाही. एक वदंता अशी आहे की एका भेटीत अरुण जेटली यांनी ’सार्वजनिक इमेजचा विचार करा’ असा सल्ला देऊ पाहणार्‍या सरसंघचालकांना खडसावले होते, ’तुम्हाला सत्तेचा आधार हवा असेल तर आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ द्या, अन्यथा तुमच्या सल्ल्यांना अनुसरून राजकारण करतो आणि राजकारणात कायम तिसरी, चौथी पार्टी म्हणून राहतो.’ ही वदंता खरी असो वा सोडलेली पुडी, भाजपने आपले सोवळे सोडले हे उघड आहे. साठ सत्तर वर्षे भाजपने केलेले राजकारण तू म्हणतोस तसे होते, त्यांनी ते सोडले म्हणून ते आज सत्ताधारी आहेत हे विसरता कामा नये.

मी भ्रष्टाचार करणार नाही म्हटले तर माझ्या आसपास कार्यकर्त्यांचा मागमूस राहणार नाही. कालच्याच दुसर्‍या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य मतदार म्हणून आपल्याही अपेक्षा भ्रष्टाचारीच असतात, त्या पूर्ण करणारे नेते आपल्याला हवे असतात. मग ते तुमच्यासाठी नियमबाह्य वर्तन करू लागले की स्वार्थासाठी करणार नाहीत ही अपेक्षा चुकीची आहे. त्यातून भ्रष्टाचार उभा राहणारच.

ज्या पक्षात असे बाहुबली, भ्रष्टाचारी नाहीत अशाच पक्षाला मी मतदान करेन असे ठरवले तर मला मतदान न करणे हा एकच पर्याय राहात नाही का? आपल्याला हवा तसा पक्ष उभा राहीपर्यंत मतदान न करणे म्हणजे पुन्हा ’शहरातले सगळे ट्रॅफिक सिग्नल हिरवे होईतो मी गाडी गॅरेजबाहेर काढणार नाही’ असे म्हणण्यासारखे आहे. ते तसे कधीच होणार नसतात. जिथे तांबडा दिवा लागेल तिथे काही सेकंद थांबून, हिरवा झाला की पुढे जावे लागते (पण त्याचवेळी आडव्या बाजूने येणार्‍यांना तांबडा दिवा दिसत असतो हे ही विसरता कामा नये)

<< ३. जमिनीवरच्या जुन्या सामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देणे. >>

इथे माझे काही सहमतीचे, काही असहमतीचे मुद्दे आहेत. पहिलाच मुद्दा असहमतीचा आहे. जुन्या कार्यकर्त्यांचे उलट विसर्जन करावे आणि मूळ विचारधारेला मानणारे नवे कार्यकर्ते उभे करावेत असे माझे मत आहे. जुन्या मुशीतले नेते आणि त्यांचे ’बाबा वाक्यम्‌ प्रमाणम्‌’ असणारे कार्यकर्ते हे नव्या राजकारणाच्या परिघात आता उपरे ठरले आहेत. चार वर्षांनंतरही आपण अशा निवडणुका एकामागोमाग का हरतो आहोत हे त्यांना समजत नाही, कारण परिस्थिती बदलते हे त्यांना शब्दांत समजत असले तरी जाणीवेत नाही. आजही ते तशाच पारंपरिक विचाराने निवडणुकीकडे जातात. आपण डी-फॅक्टो सत्ताधारी आहोत असा त्यांचा समज आहे. हे गेले की आपण’ अशा वर्तुळाच्या न्यायाने राजकारण अजूनही चालू आहे असे त्यांना वाटते. ’पर्सेप्शन’ चा मोठा रोल आजच्या राजकारणात आहे हे त्यांना समजत नाही, समजले तरी तो कसा हाताळायचा हे त्यांना ठाऊक नाही. त्यांच्या कंडिशनिंग मध्येच नाही ते. जितक्या नेत्यांना भेटलो त्यांच्यात सोशल मीडिया म्हणजे काहीतरी रिकामटेकड्यांचे उद्योग वाटतात. त्यातून तयार झालेले पर्सेप्शन व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून थेट प्रत्येकाच्या हाती जाते याचे महत्व त्यांनी अजून ओळखलेले नाही.

एका गटात मला बोलावले होते. तिथे भेटलेल्या एका महिला नेत्याने ’आपण बॅनर लावू’ अशी सुरुवात केल्यावर मी कपाळावर हात मारून घेतला होता. असे कार्यकर्ते जुने असले तरी कुचकामी आहेत. नवे कार्यकर्ते जागरूक हवेत, अरे ला कारे करता येणारे हवे पण त्याचबरोबर बदलती परिस्थिती ओळखणारे (म्हणजे सत्तेचा प्रवाह बदलतो आहे असे दिसताच विचारधारा वगैरेची काशी करून बिनदिक्कत विधिनिषेधशून्य तडजोडी करत ’भारी नेता आहे हं’ असली स्तुती आपल्या भाटांकडून मिळवणार्‍या नेत्यांसारखे नव्हेत.) असायला हवेत. जुन्या मुशीतले कार्यकर्ते त्या कामाचे नाहीत.

त्यामुळे इथे तळापासून बदल करायला हवा या तुझ्या मताशी मी एकदम सहमत आहे. पण हा बदल एकदम होतच नसतो. आणि तळाच्या पातळीवर तो होतो आहे याची निदान मला तरी चिन्हे दिसत आहेत. त्या बदलांना पृष्ठभागावर यायला वेळ लागेल हे खरे. पण तोवर मी ’बदल होऊ तर द्या, मग बघतो’ असे म्हणून पुन्हा पाच वर्षे भाजपला निरंकुश सत्ता द्यावी हे मला त्याहून अधिक धोकादायक वाटते.

या पाच वर्षांतला उद्दामपणा, त्यांची प्रतिगामी वाटचाल, उद्योगधंदे नि पैसा या खेरीज अन्य कुठल्याच बाबतीत काही धोरणच नसणे, पर्यावरण आणि शिक्षण यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांना सरळ अनुक्रमे उद्योग आणि आपली सांस्कृतिक विंग यांच्या वेठीस धरणे आणि मुख्य म्हणजे सामाजिक बाबतीत द्वेषाच्या मुळ्या सतत रुजवत राहणॆ हे आणखी पाच वर्षे मला नको आहे. त्यासाठी दगडापेक्षा वीट मऊ असे मी म्हणणार आहे. कॉंग्रेसने सारे दुर्गुण झाडून टाकेपर्यंत जा मी नाही मत देणार’ हे म्हणणे कॉंग्रेसपेक्षा मलाच आणखी खोलात नेणारे आहे. फारतर कॉंग्रेस विसर्जित होईल किंवा एखादा इटुकला पक्ष म्हणून शिल्लक राहील. ’कॉंग्रेसमुक्त भारत झाला’ म्हणून भक्त जल्लोश करतील. पण हे झाले म्हणजे काय झाले? माझे आयुष्य त्याने अधिक चांगले झाले की वाईट? हा प्रश्न त्यांना पडणार नाही. कपाळाला भगव्या पट्ट्या बांधलेल्यांचे वैयक्तिक बाबतीत ढवळाढवळ करणारे आदेश ते गुलामांच्या आनंदाने मान्य करतील... मी करणार नाही. ’त्यासाठी कॉंग्रेसच्या गुंडांना सहन करावे का?’ या प्रश्नाचे उत्तर मी निसंदिग्धपणे ’हो’ असेच देणार आहे. असं म्हणू या की गुलाम होऊन राहणे हे जर माझे भागधेयच असेल तर त्यातल्या त्यात कमी त्रास देणारा मालक मी निवडणार आहे. पण शेवटी तो ही मालकच आहे हे विसरणार नाही. स्वतंत्र होण्याची शक्यता नाकारणार नाही, पण आज माझ्यासमोर तो पर्यायच नाही, तेवढी ताकद माझी नाही हे मान्य करून पुढे जाणार आहे.

<<४. मुस्लीमअनुनयाचे राजकारण दीर्घकाळ करून बहुसंख्याकांचा विश्वासघात केल्याची सार्वत्रिक भावना समूळ नष्ट करायला सुरुवात करणे.>>

अलीकडे हा युक्तिवाद मला फार गंमतीशीर वाटू लागला आहे. पर्सेप्शन कसे बांधले जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मुस्लिम-अनुनय हा मुद्दा मांडणार्‍या प्रत्येकाला माझा हा प्रश्न आहे की ’म्हणजे काय बाबा?’ (पुरोगामी विचारवंत वर्तुळ हे मुस्लिम समाजावर टीका करण्यात तुलनेने कमी उत्साही असते हे मला मान्यच आहे. आणि ते समजण्याजोगे आहे असेही माझे मत आहे. पण तो एक स्वतंत्र नि मोठा मुद्दा आहे. तो इथे नको.) मग उल्लेख येतो मतपेढी म्हणून वापरल्याचा. अरे पण प्रत्येक जात, समाज हे आपापल्या गटांचा मतपेढी म्हणून वापर करत नाहीत का? पुस्तकांवरचे, नाटकांवरचे, चित्रपटांवरचे फुटकळ मुद्दे घेऊन जातींच्या संघटना बांधायच्या नि सत्तेशी बार्गेनिंग करायचे हे आज दिसत असले, तात्कालिक मुद्दे वेगळे असले तरी वर्षानुवर्षे हे राजकारण सुरू आहेच की. आता हे त्यांना सांगा की झाले ना? हो झालेच. पण विशिष्ट एका जातीचे वा धर्माचे अनुनय असे म्हणतो तेव्हा ’इतरांहून अधिक’ धार्जिणेपण सिद्ध व्हायला हवे ना? ते मुस्लिम संदर्भात कसे मोजायचे? आणि मुस्लिमांचा अनुनय म्हणजे बहुसंख्येचा विश्वासघात हे डी-फॅक्टो कसे काय सिद्ध होते. मुळात बहुसंख्यावादी आपण बहुसंख्य आहोत नि म्हणून आपल्याला अधिक हक्क हवेत या मानसिकतेचे असतात, त्यांना समानतेची लोकशाही मान्य नसते. मुस्लिम आपल्या बरोबरीने बसू शकतात हे त्यांना मान्य नसते. त्यांना दुय्यम स्थान द्यायला हवे असे त्यांचे म्हणणे असते. ते घडत नाही म्हणून त्याला ते मुस्लिम अनुनय म्हणत असतात. रस्त्यावर एखादी मजार उभी राहिली की ’बघा हे xडे कसे माजलेत’ म्हणून दात ओठ खाऊन मुस्लिम-अनुनयाचे ढोल वाजवणारा त्याच्या दहापट मंदिरे अशाच तर्‍हेने उभी राहतात तेव्व्हा त्याला ती दिसत नसतात. दिसली तरी ती ’आपल्या’ हक्काचा भाग आहेत असे कुठे तरी त्याच्या मनात रुजलेले असते. आयुष्यात हाताच्या बोटांवर मोजता येणार नाही इतक्या मुस्लिमांशी संपर्क आलेला ’सगळे मुस्लिम हरामखोर असतात’ या मतावर ठाम असतो. त्याचे ते मत त्याच्यापर्यंत पोचवलेल्या पर्सेप्शनचा भागच केवळ असते. माध्यमांतून, परिचितांकडून हे सतत समोर येत जाते. त्या पलीकडे त्यालाही हेच खरे वाटावे असे वाटत असते, त्यामुळे त्याला अनुकूल डेटा पॉईंट आला की तो खुश होत असतो. आता हेच पहा ना. ज्या फेसबुकवर असे मुस्लिमद्वेष्टे मेसेज येतात तिथेच हे माझे तर्कही उमटलेले असतात. पण हे मात्र त्याला मान्य होत नाही, कारण ते त्याच्या पूर्वग्रहाला अनुकूल नाही!

मुस्लिम-अनुनयाचा आरोप हा हिंदुत्ववाद्यांनी विरुद्ध बाजूला आपली जागा निर्माण करण्यासाठी जागता ठेवला आहे. (जसा ब्राह्मण समाजातली सुमार अकलेची पोरे, आपल्याला आयुष्यात फारसे काही साधले नाही की आपल्या अपयशाचे खापर आरक्षणावर फोडत बसतात. आणि दुसर्‍या बाजूने चांगल्या सुखवस्तू घरातला, पण बापाच्या जिवावर अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांच्या नावावर चैन करत बसलेला आणि नंतर हाती काही उरले नाही, की आपल्या अपयशाचे खापर बामणी व्यवस्थेवर फोडत बसतो तसेच.) आणि देशात शेवटचा मुस्लिम शिल्लक आहे तोवर तो ते करतच राहतील. आपापल्या जातीचे राजकारण करत गट बांधणारे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठीही मनुवादी व्यवस्थेच्या नावे खडे फोडत बसतात तसेच. ज्याला पूर्वग्रह जपायचा आहे त्याच्या मनातून तो नाहीसा करणे शक्यच नाही. त्याला हजारो उलट पुरावे दिले तरी तो अमान्यच करणार आहे. जे सुज्ञ आहेत त्यांनी विचार नि पुराव्यांचा आधार घ्यावा इतकेच आपण सांगू शकतो.

मुळात जे पर्सेप्शन कॉंग्रेस विरोधकांनी प्रपोगंडाच्या माध्यमांतून रुजवले, ते कॉंग्रेसने बदलायचे म्हणजे काय करायचे? आणि वर म्हटले तसे ज्यांनी तो समज करून घेतला आहे तो त्यांना करून घ्यायला आवडतो म्हणूनच. अशा किती माठांशी त्यांची मते चुकीची आहेत हे दाखवत वाद घालत बसायचे? आमचा चिन्नास्वामी म्हणून एक ज्येष्ठ मित्र आहे. तो एकदा (सर्वस्वी वेगळ्या संदर्भात, एका व्यक्तीच्या चुकांबद्दल) म्हणाला होता, ते मला पटते. ’खरकट्या ढुंगणांनिशी गावभर नाचणारे एक पोर असेल तर त्याला पकडून स्वच्छ करता येईल. अशी अनेक असतील तर माझ्याकडे पुरेसे टॉयलेट पेपरच नाहीत. आणि मुख्य म्हणजे ते पहिले पोरही परत काही वेळाने त्याच स्थितीत जाणारच आहे. आपले ढुंगण धुणे, स्वच्छ राहणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे हे त्याला समजले तरच फरक पडणार आहे. पण आजकाल, इतकी सारी मुले तशीच आहेत म्हणजे तेच बरोबर आहे.’ हा तर्क द्यायची पद्धत असल्याने बाहेरून हे कुणी बदलू शकेल असे मला वाटत नाही. बाबरी-रामजन्मभूमी वादात कॉंग्रेसची भूमिकाही हिंदू धार्जिणीच होती हे उघड सत्य आहे. पण ते मान्य करायची आपली तयारीच नसेल तर कॉंग्रेस काय करू शकते? का कपाळाला भगवी पट्टी नि हातात तलवार किंवा मुस्लिमांवर आग ओकणारे ट्विटर अकाऊंट घेऊन कॉंग्रेस कार्यकर्ते उतरले तरच त्यांचे तथाकथित मुस्लिम धार्जिणेपण संपणार आहे? नक्की काय केले म्हणजे ’हां आता मुस्लिम अनुनय नाही बरं का.’ हे सर्टिफिकेट मिळणार आहे? आणि मुळात मिळणार आहे का? कारण वर म्हटले तसे ज्यांना हिंदुत्ववादाचेच राजकारण करायचे आहे ते हे मान्य करणारच नाही, आणि ते नाहीत म्हणून त्यांचे भाट + हिंदुत्ववादी नसलेले पण तरीही मुस्लिमद्वेष वारसाने मिळालेले लोक आपला मुद्दा मुळीच अमान्य करणार नाहीत. मग आता समाजातील किती टक्के लोकांनी किंवा किती नि कोणत्या प्रभावशाली माध्यमांनी हे मान्य केले की कॉंग्रेस मुस्लिम-अनुनय करणारा पक्ष उरलेला नाही हे तू मान्य करशील?

<< ५. आपल्याला अभिप्रेत असलेली निधर्मी, पुरोगामी मुल्यव्यवस्था रुजवणाऱ्या संघटनांची बांधणी करणे. >>

ही तर दीर्घकालीन प्रक्रिया आहे. ती चालूच ठेवावी लागणार आहे. त्याबाबत दुमत असायचे कारण नाही.

<< यातली एकही गोष्ट न करता, भाजपवाले कित्ती खराब आहेत हे पाहिलंत ना आता, त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की नाही, मग आम्हाला द्या बघू मते आता. हा युक्तिवाद निवडणुकीच्या राजकारणात कितीही तर्कसंगत असला तरी समाजाच्या दीर्घकालीन भल्याच्या दृष्टीने अजिबात उपयोगाचा नाही.>>

एकदम मान्य. पण माझ्यासमोर सरळ सरळ ही परिस्थिती आहे की अजून एक निरंकुश टर्म ही देशाचे इतके वाटोळे करणारी ठरेल की त्यातून उभे राहायला अनेक दशके जातील. हे मत अनेकांना अमान्य असेल, असू द्या. मला असंख्य कारणे देता येतील, त्याचा इतकाच मोठा लेख/पोस्ट करता येईल. पुन्हा केव्हातरी टाकेन. पण न्यायव्यवस्था, संरक्षणव्यवस्था, दंडव्यवस्था, यांत सरळसरळ हस्तक्षेप, त्यातील अनेकांचा स्वार्थासाठी वापर करून घेणे, विरोधाला द्वेष मानणे, स्वत: इतरांच्या द्वेषावरच उभे असणॆ, शिक्षण क्षेत्राला प्रगती ऐवजी हेतुत: अधोगतीकडे नेणे (जे एनयू तो झॉंकी है, टीआयएसएस बाकी है’ ही घोषणा देणारे यांचे विद्यार्थी प्रतिनिधी) , त्यातून आपल्या कामाचे अडाणी, अविचारी सैनिक तयार करणे, पर्यावरणमंत्रालय उद्योग मंत्रालयाचा गुलाम करून ठेवणे, एकुणच समाजात द्वेषाधारित फूट पाडत राहणे, या मार्गाने देशाचे सामाजिक राजकीय वातावरण दूषित करत नेणारे हे लोक मला नको आहेत. त्यासाठी <<भाजपवाले कित्ती खराब आहेत हे पाहिलंत ना आता, त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की नाही>> या उपहासाला झुगारून मी होय, ते वाईटच आहेत, नव्हे धोकादायक आहेत. त्यांना घालवण्यासाठी कितीही वाईट असली तरी दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने कॉंग्रेसलाही निवडून द्यायची माझी तयारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा