शनिवार, १९ मे, २०१८

किल हिम... किल हिम...

रोमन साम्राज्यातून ’ग्लॅडिएटर्स’चा खेळ भरात होता. रिंगणातल्या एका माणसाने दुसर्‍याला भोसकल्यावर उडालेले रक्ताच्या कारंजे पाहून, एकाने दुसर्‍याचा उखडून काढलेला हात वा पाय पाहून, दुसर्‍याचा शिरच्छेद करून रक्त-गळते त्याचे शिर मिरवणार्‍याला पाहून प्रेक्षकांतून आनंदमिश्रित आश्चर्याचे चीत्कार उमटत असत. लढाऊंपैकी एखादा हतवीर्य होऊन जमिनीवर पडला नि प्रतिस्पर्धी त्याच्या छाताडावर पाय देऊन उभा राहिला, आणि सम्राटाकडे ’जिवंत ठेवू की मारू?’ असा प्रश्न असलेल्या डोळ्यांनी पाहू लागला, की आपणच न्यायाधीश असल्याप्रमाणॆ हे प्रेक्षक ’किल हिम, किल हिम’ चा गजर सुरू करत असत. सम्राटाने अंगठा उचलून पराभूताला जिवंत सोडण्याची आज्ञा केली की या प्रेक्षकांतून नाराजीचे सूर उमटत.

वास्तविक पाहता रिंगणात लढणार्‍या त्या दोघांशीही या प्रेक्षकांपैकी बहुतेकांचे काही देणे-घेणे, सोयर-सुतक नसे. पण प्रत्येकाच्या मनात आदिम हिंसा असते. सर्वसामान्यांच्या, दुबळ्यांच्या मनातील हिंसेचे विरेचन व्हायला वाव नसतो. मग ते अशा परोक्ष भावे किंवा साक्षीभावाने तिचा निचरा करीत असत. जो मारला गेला, पराभूत झाला, ज्याच्या रक्ताची कारंजी अथवा पाट वाहिले त्याच्याशी यांचे काही वैर नसेच. पण तरीही त्याच्या त्या वेदनेत त्यांना आपला आसुरी आनंद गवसत असे. बहुतेकांची त्याच्याशी पुसटशी ओळखदेखील नसे मग वैर तर सोडूनच द्या. तरीही त्यांच्या मनातील हिंसा, कल्पित भावनेने त्याच्यावरचा आपला विजय नेणीवेतून साजरा करत असे.

कदाचित त्या झुंजीचा निकाल नेमका उलट लागला असता, पराभूत हा विजयी खेळाडूला भारी पडला असता तरी ही झुंड त्याच त्वेषाने ’किल हिम, किल हिम’ ओरडली असती, सम्राटाने पराभूताला जीवदान दिल्यावर तितकीच नाराज झाली असती ही शक्यताच जास्त असे. कारण मृत्युची झुंज खेळणार्‍या दोघांसाठी तो अस्तित्वाचा प्रश्न असला तरी प्रेक्षकांच्या दृष्टीने तो केवळ एक खेळ होता. त्या खेळासाठी आज आपण जशी कोंबड्यांची, बोकडांची, बैलांची झुंज लावतो तशी माणसांच्या झुंजी लावून आपल्या करमणुकीसाठी त्यांच्यातील काहींचा जीव गेला तरी त्यांची हरकत नसे.

आजही आपला ज्याचा कधीही संबंध आलेला नाही, येण्याचा संभव नाही आणि म्हणून त्याच्या आपल्या वैराचे कोणतेही प्रत्यक्ष कारण उपस्थित नाही अशा हजारो मैल दूर असणार्‍या कुणाला तरी कुणीतरी तरी संपवले याचा आनंद घरबसल्या आपल्या मनात उमटतो की नाही? या अस्थानी वैरासाठी आपण काही काल्पनिक, उसनी कारणे शोधतो की नाही? मुळात कुणाच्या तरी वेदनेने, मृत्यूने आपण आनंदीत होतो ही आपल्या मनातील विकृती आहे हे मान्य करत नाही.

राजकारणाच्या झुंजीतही ’किल हिम किल हिम’ ओरडणार्‍या झुंजीचेही असेच असते. आज एक ग्लॅडिएटर यशस्वी होतो म्हणून त्याला चीअर करणारे बाजू पलटली, प्रतिस्पर्ध्याने त्याचे रक्त काढायला सुरुवात केली, त्याचे बळ घटते आहे असे दिसले की बाजू बदलून ’किल हिम, किल हिम म्हणताना दिसतील यात शंका नाही. कारण मुळात भित्र्यांचा हा जमाव कायम विजेत्याच्या बाजूला, त्याच्या मर्जीत राहून त्याच्या गैरमर्जीपासून बचाव करत असतो. आणि यातून येणार्‍या अपराधगंडाला गाडून टाकण्यासाठी त्या पराभूताच्या पराभवात आपलाही विजय शोधून, जणू आपणच त्याचा पराभव केला असे स्वत:ला बजावून आपला नसलेला विजय आपला म्हणून साजरा करत असते. त्यायोगे आपण भित्रे नव्हे तर शूर आहोत, विजयी आहोत हे सिद्ध करण्याची धडपड करत असते. अशा जमावाचा आवाज नेहमी कर्णकटू मोठा असतो. ऐकणार्‍याला त्या कोलाहलात स्पष्ट विचार करता येऊ नये, या विजयाचा आपला संबंध नाही याची त्याला उकल करता येऊ नये, अशी त्यांची इच्छा असते.

तेव्हा बाजू पलटली की ’किल हिम, किल हिम’ म्हणणार्‍या बोटांची टोके आपल्याकडेही वळू शकतात हे विजयी खेळाडूने कधीच विसरता कामा नये. आपला विजय साजरा करू पाहणार्‍या झुंडीला ’आपली’ मानण्याची चूक करू नये. त्याचा विजय हा झुंडीला आपला विजय वाटत असला, तरी त्याचा पराजय आणि/किंवा मृत्यु मात्र पोरकाच असतो.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा