शनिवार, २८ जुलै, २०१८

नागरी टोळ्या आणि माणूस

वैयक्तिक पातळीवर काहीही दिवे लावता न येणारे लोक गल्ली, आळी, गाव, शहर, शाळा, कॉलेज, खरेदीसाठी निवडलेले एकमेव दुकान, गावात मिळणारे पदार्थ, ... आणि अर्थातच जात, धर्म आणि देश इत्यादि जन्मदत्त अथवा आपल्या कर्तृत्वाचा काडीचा वाटा नसलेल्या गोष्टींच्या अस्मितांचे तंबू उभारून, पार्ट्या पाडून खेळत बसतात.

मनुष्य जनावराच्या पातळीवरून टोळीच्या मानसिकतेत रूतलेला राहतो. त्यामुळे तो नागर झाला तरी सुसंस्कृत झाला आहे यावर माझा विश्वास नाही. टोळ्यांची व्याख्या बदललेली आहे इतकेच!

समोरच्याला एखाद्या गटाचा भाग म्हणूनच ओळखत, त्या गटाबद्दलचे आपले पूर्वग्रह त्याच्यावर लादतच आपण त्यांच्याशी आपली वर्तणूक कशी असावी हे ठरवतो. आपल्या पूर्वग्रहाला प्रतिकूल असे हजारो पुरावे त्याच्यासंदर्भात दिसून आले तरी ते सारे अपवाद म्हणून नाकारतो आणि आपल्या पूर्वग्रहाला अनुकूल असे हातभर वा बोटभर पुरावे दाखवून आपणच बरोबर असल्याचे स्वत:ला नि इतरांना पटवत राहतो. 

जमावाने ठार मारलेली व्यक्ती, एखादी बलात्कार झालेली अभागी स्त्री, अन्याय होऊनही न्यायव्यवस्थेकडून न्याय न मिळालेली दुर्दैवी व्यक्ती आपल्या गटाची नसेल तर बहुतेक वेळा आनंद, समाधान याच भावना दिसून येतात. तुमच्या गटातील उरलेले ती गोष्ट बिनमहत्वाची म्हणून दुर्लक्ष करतील फारतर. पण गटाबाहेरच्या व्यक्तीबाबत सहानुभूती असणारे दुर्मिळ. आणी असे दोन्ही गटांना नकोसे असतात, किंवा सोयीपुरते हवे असतात म्हणू. जरा आपल्या विरुद्ध मत दिले की 'छुपा तिकडचा की हो' म्हणून त्याच्या नावे घटश्राद्ध घालून मोकळे.

एखाद्याने असल्या मूर्ख जमावांचा भाग न होणे हे ही एकसाचीकरणाच्या काडेपेट्यांत राहू पाहणार्‍यांना रुचत नाही. मग सतत ते तुम्हाला या ना त्या डबीत बसवू पाहात असतात. स्वत: खुजे असतात. तुम्हीही खुजे राहावे अशी अपेक्षा ठेवतात... नव्हे स्वत:च न्यायाधीश होत तसे जाहीरही करतात.

आपला झाडू घेऊन ही अवाढव्य गटारगंगा स्वच्छ करणे अशक्य होते तेव्हा अशा जमावांतील व्यक्तींशी संवाद थांबवणे हा एकच शहाणपणाचा आणि मन:शांतीचा उपाय असू शकतो.

जमावाच्या पाठिंब्याविना यातून तुम्ही इतरांसाठी शिरोधार्य असे तत्वज्ञान वा विचार रुजवू शकणार नाही कदाचित, पण एक उदाहरण नक्की समोर ठेवता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा